सुनंदा आज पुन्हा निराश होऊन दवाखान्यातुन आली होती. आणि तिच्या सासूच्या तोंडाचा पट्टा पुन्हा सुरू झाला होता.
“ म्या वशाला दिवा मिळल म्हणून आशा लावून बसली हुती आन ही बाई तर वांजोटी निगली. किती दिस अजून माज्या लेकाचा पैका दवाखान्याला घालणार हाय. माजी जणी असती तर आता पातुर झाला असता मुलगा! तिनं किती साजिऱ्या नाती दिल्यात्या मला पर ती भरल्या संसारातून दुसऱ्या बाळांपणात देवाघरी गिली आन ही आली सटवी तिच्या मुळावर न्हाय न्हाय माज्या अख्या खानदानाच्या मुळवर! सहा वर्स हुत आली अजून पातूर पाळणा हलं ना या घरात.” त्या तणतणत होत्या आणि सुनंदा रडतच आत निघून गेली.
“ आयं या बी डॉक्टरनं वैनी मधी काय बी दोष नाय म्हणून सांगितलं हाय. कुटंल्या बी डॉक्टरकडं जा सगळे तेच सांगत्यात मंग तू कशा पाई तिला दोष दितीस गं? खरं तर तुज्या दोन नाती तिनं पत्करून दादाशी लगीन केलं. नाय तर इतकी सुंदर बायको मिळाली असती का दादाला? दोन्ही पोरींना तिनं पदराखाली घेतलं. किती माया करती पाच वर्षात कदी सावत्रपणा दावला का? तुला तरी दुखावलं का तिनं? तू इतकं तिला बोलतीस पर सगळं ऐकून घिती नव्हं. आन वरून बसल्या जागेवर सगळं करती गुणाची हाय ती. आता तिच्यात दोष नाय दादात दोष नाय दोष हाय त्यो नशिबाचा. पण तू का तिचं रगात पितीस रोज. ऊस गोड लागला की मुळा संगट खायाचा नस्तू आय.” मीरा सुनंदाची मोठी नणंद मीरा स्वतःच्या आईला समजावत होती.
“ मला नगु शिकवुस तू! उगाच नाय करून घितलं माज्या लेकाला त्यो शाळा मास्टर हाय सरकारी नोकरी हाय नव्हं त्याला आन इस एकर बागायत. आन एकटाच हाय माजा लेक! समदं बगून करून घितलं. तुज्या सासरची हाय मग तू तिची बाजू घिनारच की! तूच गळ्यात बांदली ही पीडा माझ्या मुकुंदाच्या.” पुन्हा म्हातारी तणतणली.
मीरा,“तुज्या संगट बोलण्यात काय बी राम नाय आय.” ती वैतागून म्हणाली.
तोपर्यंत शामा आणि रमा शाळेतून आल्या. शामा सात वर्षांची तर रमा पाच वर्षांची होती. पोरींनी दप्तरं टाकली.
रमा,“ आई कुठं हाय आत्ती?” तिने विचारलं.
मीरा,“ जा आत हाय.” ती म्हणाली.
तशा दोन्ही पोरी पळत पळत स्वयंपाक घरात गेल्या आणि आई आई करत सुनंदाला बिलगल्या.लहानग्या रमाने तिला मिठी मारली. तिने डोळे पदराने पुसून तिला कुशीत घेतलं. मोठ्या शामाला मात्र तिच्या डोळ्यातले पाणी दिसले.
शामा,“ आई तू रडत होतीस? तुला आजी पुन्हा बोलली ना. आज अप्पा आले की मी नावच सांगते त्यांना तिचं. तू नको ना रडू मग मला पण रडू येतं.” ती तोंड बारीक करून तिच्या गळ्यात हात घालत म्हणाली.
सुनंदा,“ नाय गं बाळा मी नाय रडत. जा हात-पाय धून या भूक लागली असलं की तुमाला? मी तुमच्यासाठी काय तर करते.” ती शामाला मायेने कुरवाळत म्हणाली.
रमा,“ आई शिरा कर ना.” ती लाडात येत म्हणाली.
सुनंदा,“ बरं माझ्या चिमणीसाठी शिरा करते हा.” ती हसून म्हणाली.
शामा,“ जा बाबा आई तू हिच्याच आवडीचं करते रोज.” ती तोंड फुगवून म्हणाली.
सुनंदा,“ माझ्या ताईसाठी उपिट आन चिमणीसाठी शिरा करणार.झालं?” ती म्हणाली आणि पोरी खुश होऊन परसात पळाल्या. मुकुंद शाळेतून येऊन स्वयंपाक घराच्या दारात उभं राहून तिघींचे सगळं संभाषण ऐकत होता.
मुकुंद,“ सुनंदा तू पोरींना बिघडवर बघ अशाने.” तो हसून म्हणाला
सुनंदा,“ काय बिगडत नायत्या. तुमी बी जा परसात, मी करते तवर.( असं म्हणून ती माजघरात गेली.) ताईसाब तुमी आणि आत्या तुमी काय खाणार शिरा का उपिट?” तिने विचारलं.
मीरा,“ मला काय बी चलताया वैनी. चला मी करू लागते.”
आई,“ कशाला करलं की ती तेवडं तर करू दि की. आन मला शिरा पायजे.” त्या टेचात म्हणाल्या. तोपर्यंत तिथे मुकुंद आला.
मुकुंद,“ आई तुला किती वेळा सांगितलं आहे मी की सुनंदाशी असं बोलत जाऊ नकोस? आज पुन्हा तू तिला बोललीस ना?” त्याने विचारलं.
आई,“ बग बग गरीब गाय आन पोटात पाय. लगीच नवऱ्याला कागाळी केली मीरे!” त्या कांगावा करत म्हणाल्या.
मुकुंद,“ तिनं मला काय सांगितलं नाय आई. मी आलो तवा तिच्या डोळ्यात पाणी होतं. आन किती वेळा सांगितलं मी तुला की मला मुलगा नको हाय. दोन पोरी बास मला.” तो थोडा चिडून म्हणाला.
आई,“ तू म्हणून काय हुतया मला पायजेल की नातू. वसाला दिवा नगु का?” त्या म्हणाल्या.
सुनंदा,“ तुमाला किती वेळा सांगितलं तुमी नका पडत जाऊ यात.” ती मुकुंदला म्हणाली. आणि तो रागाने निघून गेला.
सुनंदा म्हणजे सौ. सुनंदा मुकुंद थोरात! गोल चेहरा, गोऱ्या रंगांची, नाकी-डोळे नीटस उंचीपुरी एकूणच सुंदर स्त्री! मुकुंदची दुसरी बायको. त्याची पहिली बायको जनाबाई दुसऱ्या बाळांपणात दीड वर्षाची शामा आणि नुकतीच जन्माला आलेल्या रमाला मागे टाकून गेली. मुकुंदा शाळेत शिक्षक होता. दोन बहिणींची लग्न झालेली त्या त्यांच्या संसारला लागलेल्या. घरात सत्तर वर्षांची आई आणि दोन मुली. त्याला दिवसभर शाळेत जावे लागे. शाळा सांभाळून शेतीकडे पाहणे ही गरजेचे होते. त्याच्या आईचे वय झाल्यामुळे त्यांना काहीच जमत नव्हते. घरात मुलींना सांभाळणारे कोणीच नव्हते त्यामुळे रमा एक वर्षाची झाल्यावर सगळ्यांच्या सांगण्यावरून तो दुसऱ्या लग्नाला तयार झाला. मीराने तिच्या नात्यातल्या सुनंदाचे स्थळ त्याच्यासाठी आणले. सुनंदा चौथीपर्यंत शिकलेली. घरची परिस्थिती उत्तम नसली तरी खाऊनपिऊन सुखी. ती घरातली मोठी मुलगी तिच्या पाठीवर दोन बहिणी आणि एक भाऊ! आई, वडील असे कुटुंब होते. तिच्या वडिलांना खरं तर त्यांच्या बिनलग्नाच्या सुनंदाला दोन मुली असणाऱ्या विधुराला द्यायचे नव्हते. पण मीरा नात्यातली असल्याने तिचा शब्द न मोडता बघण्याच्या कार्यक्रमाला ते तयार झाले. मुलगा बघून गेला तरी नाही म्हणून सांगायचं असं त्यांनी मनोमन ठरवून टाकले होते. मुकुंद आईबरोबर तिला पहायला आला तोच दोन्ही मुली घेऊन. त्याने त्याच्याबद्दलची सगळी माहिती स्पष्ट सांगून टाकली. अडीच वर्षांची शामा मात्र सरळ जाऊन सुनंदाच्या मांडीवर बसली. जणू हीच आपली आई होणार असं त्या छोट्या शामाने सांगून टाकले होते. सुनंदाने तिला तिथेच कुशीत घेतले. आणि दोघींची नाळ जुळली.
खरं तर सावळ्या रंगाचा बलदंड मुकुंद ही सुनंदाबरोबर सगळ्यांना आवडला होता आणि त्याहीपेक्षा त्याचे स्पष्ट बोलणे आणि खरेपणा सुनंदाच्या वडिलांना भावला होता. तरी त्यांनी मुकुंदच्या गावात त्याची चौकशी केली. निर्वसनी आणि सुस्वभावी मुकुंद, त्याच्याबद्दल आक्षेपार्ह काहीच नव्हते. तसेच सरकारी नोकरी आणि बागायत जमीन भाऊ वगैरे काही नाही. या सगळ्याचा विचार करून ते लग्नाला तयार झाले सुनंदाला ही त्यांनी तू मुकुंदच्या मुली स्वीकारायला मनापासून तयार आहेस ना? हे पुन्हा पुन्हा विचारलं आणि सुनंदाने होकार दिला. दोघांचे लग्न एका मंदिरात साध्या पद्धतीने झाले. आणि सुनंदाने मुकुंदच्या आयुष्यात आणि घरात प्रवेश केला. सुनंदाने दोन्ही मुलींना आपलेसे केले. सासूला ही माया लावली पण तिची या घरात कशीबशी दोन वर्षेच चांगली गेली असतील आणि मूल होत नाही म्हणून सासूने मागे टूमणे लावले. दवाखाने झाले. उपास-तापास झाले. नवस-सायास झाले पण लग्नाला सहा वर्षे होऊन गेली तरी तिची कुस उजवली नव्हती. सासूचे टूमणे आधी टोमण्यात आणि आता जाचात परिवर्तित झाले होते. बिचारी सुनंदा मात्र या सगळ्या गोष्टींमुळे कोमेजून गेली होती. तरी बरं तिच्या दोन्ही नणंदा आणि मुकुंद समजूतदार होते. दोन्ही नणंदा आगीत तेल ओतण्यापेक्षा आईलाच सुनंदाची बाजू घेऊन बोलत त्यामुळे म्हातारी नुसती तोंडाची वाफ घालण्याशिवाय काहीच करू शकत नव्हती.
पण रोज मुकुंदची आई शब्दांचे वार सुनंदावर करत असे आणि त्याने ती घायाळ होत असे. मीरा तिची मोठी नणंद जिने तिचे आणि मुकुंदचे लग्न ठरवले ती तिच्या संसाराच्या रहाट गाडग्यातुन वेळ काढून कोणी सांगेल आणि सुचवले त्या डॉक्टरकडे सुनंदाला घेऊन जात असे. पण सगळीकडून एकच उत्तर मिळत असे की तिच्यात कोणताही दोष नाही ती आई होऊ शकते पण इतके प्रयत्न करूनही आई होण्याचे सुख अजून तरी तिच्या पदरात पडले नव्हते. आज ही मीरा तालुक्याच्या ठिकाणी एक डॉक्टर आहे आणि त्यांच्या हाताला गुण आहे असं कोणाकडून तरी ऐकून सुनंदाला त्या डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी तिला तपासले आणि पुन्हा तेच उत्तर दिले की सुनंदा आई हाऊ शकते. दोघी घरी आल्या आणि मुकुंदच्या आईने तोंडाचा पट्टा सुरू केला.
मुली खाऊन बाहेर खेळायला गेल्या होत्या. मुकुंद ही शेतात गेला होता आणि आई शेजारी गप्पा मारायला गेली होती. मीरा आणि सुनंदा दोघीच घरात होत्या. मीरा तिला स्वयंपाकात मदत करत होती.
मीरा,“ एक ईचारु का वैनी? म्हंजी लाजू नको.नाय तर म्हणायचीस ताईसाब काय बी ईचारती.” ती विचार करून म्हणाली.
सुनंदा,“ आवं असं काय बोलताय? ईचारा की.”
मीरा,“ दादा आणि तुमच्यात संबंद कसे हायती? म्हंजी जना वैनीवर त्याचा लय जीव होता. तो तुला जवळ घेतु ना? तुला सुख मिळतं ना? तो तुज्यावर प्रेम करतो ना? नाय म्हंजी डॉक्टर म्हणत्यात तुज्यात काय बी दोष नाय. दादाला तर अदीच दोन पोरी हायत्या त्याच्यात दोष असण्याचा सवालच नाय. मगं तुला मुल होत नाय म्हणून विचारतेय मी.”ती हळूच आवाजात विचारत होती आणि सुनंदाचे गाल लाजेने आरक्त झाले. तिने लाजून पदर तोंडासमोर घेतला आणि बोलु लागली.
सुनंदा,“ हे काय ईचारानं झालं व्हय ताईसाब? आवं त्यांचं माज्यावर प्रेम हाय मी लय सुखात हाय. ते तर मला सारखं म्हणत्यात की माज्यासारखी देखणी आणि समजदार बायको त्यांना दुसऱ्या लग्नाने मिळाली ते त्यांचं भाग्य हाय. आन राती ताई तर आत्याजवळ झोपते आणि चिमणी एकदा झोपली की सकाळीच उठती. सप्तातुन चार-पाच येळा आणि कंदी कंदी तर रोज बी हुतया की. आन तुमचे भाऊ त्या बाबतीत लय चांगले आणि समजूतदार बी हायती. मला ईचारत्यात की तुला समाधान मिळलं का म्हणून? ताईसाब आवं सा वरीस झालं आमचा संसार बिन बोंबाट सुरू हाय तो काय सुख आन प्रेम असल्याशिवाय व्हय?”
मीरा,“ बाय बाय किती लाजतिया नव्या नावरीवानी! म्हंजी सगळं आलबेल हाय तर. ते आज डॉक्टर म्हणले तसं कदीकदि दोगात बी दोष नसला तरी मूल व्हायला येळ लागतो. पण आमच्या म्हातारीला दम कुटं हाय? तू तिचं काय बी मनावर घित जाऊ नको. एका कानानं ऐकायचं अन दुसऱ्या कानानं सुडून द्याचं. आन मुलाचं काय आज नाय तर उद्या हुईल की. तुमी दोगं काय म्हातारं झाला व्हय? आन दोन सोन्यासारख्या पोरी हायत्या की तू बिनआईच्या पोरीसनी पदरात घेतलं आईची माया लावली. ही पुंण्याई फळंल बग कुटं तरी.” ती तिला समजावत होती.
सुनंदा,“ ताईसाब तुमी आला की लय बरं वाटतंय बगा. तुमी नणंद नाय तर मोट्या भणीसारखं आन मैत्रिणीसारखं मला समजून घेता आन सांगता बी.” ती समाधानाने म्हणाली.
मीरा,“ अगं बाय! अगं तू एकुलती एक वैनी हाय माजी. आन मीच तुमचं लगीन जमवलं नव्हं. बरं उद्या सकाळच्या पारी मी जाते. मुक्काम इस्टीनं शेतातली कामं हायती आन अवंदा सरू धावीला हाय. तवा तिच्यावर घर सुडून जमत नाय तिला अभ्यास अस्तूय गं लय.” ती म्हणाली.
सुनंदा,“ बरं मग मी पहाटं उठती आन शेंगदाण्याच्या पोळ्या,चपात्या आन भरली वांगी करून बांदून दिती. सरू ताईंना आन विनूदादांना लय आवडत्यात माज्या हातच्या पोळ्या आन भरली वांगी.” ती म्हणाली.
मीरा,“ व्हय मामीच्या हातंच लय आवडतया सगळं मामी सुग्रण हाय नव्हं.”ती कौतुकाने हसून म्हणाली.
सगळे जेवले आणि झोपायला गेले.सुनंदा खोलीत गेली तर छोट्या रमाला मुकुंदने झोपवले होते आणि तो पुस्तक वाचत बसला होता.सुनंदा अंथरुणावर बसली आणि झोपलेल्या रमाला मायेने कुरवाळले.
मुकुंद,“ आज पण आई तुला बोलली ना? तू आणि मीरा दवाखान्यात गेली होतीस ना? तुला कितीवेळा सांगितलं मी नंदा की दवाखाण्याचे खेटे घालणे बंद कर. किती डॉक्टरांनी सांगितलं तुला तुझ्यात काही दोष नाही मग कशाला जायचं दवाखान्यात आणि मला मुलगा नको आहे. आपल्या मुली काय मुलापेक्षा कमी आहेत का? की तुला स्वतःचे मुल हवेच आहे नंदा?” त्याने तिला पाहत विचारलं
सुनंदा,“ असं काय विचारताय ओ तुमी. ही चिमणी आन ताई माज्याचं हायत्या. त्यांनी मला आदीच आई बनवलं हाय. ज्या दिवशी तुमी मला बागायला आला आन ताई (शामा) मनानी माज्या कुशीत शिरली त्याच दिवशी मी आई झाले.पण आत्याना आस हाय नाताची म्हणून खटाटोप आन मीरा ताईसाब कोण सांगिलं हितं डॉक्टर चांगला हाय म्हणून की धावत येत्यात मग त्यांचं मन मला नाय मोडवत.” ती म्हणाली.
मुकुंद,“ हो पण आईच बोलणे तू मनावर घेऊ नको. मी बोलू का तिच्याशी?” त्याने विचारलं.
सुनंदा,“ नको परत मलाच बोलत बसत्यात म्हणून जस सुरू हाय तसं राहूदे.” ती म्हणाली.
मुकुंद,“ पण माझं हे फुल कोमेजतं ना.” तो हसून तिचा चेहरा हनुवटीला धरून वर करत म्हणाला.
सुनंदा,“ जावा तिकडं तुमचं आपलं काय बी.” ती लाजून म्हणाली.
मकुंद,“ असा कसा जाईन तिकडं!” असं म्हणून त्याने तिला जवळ ओढली.
★★★
दिवस महिने पुढे सरकत होते. आता सुनंदा आणि मुकुंदच्या लग्नाला सात वर्षे होऊन गेली. घरातली परिस्थिती मात्र आणखीन बिघडत होती. मुकुंदची आई आधी फक्त घरात सुनंदाला बोलायची आता ती गावात सांगत सुटली की सुनंदा वांज आहे. गावात बायकांमध्ये तिच्याबद्दल चर्चा होऊ लागली. मुकुंद ही या सगळ्यामुळे अस्वस्थ व्हायचा. तो सुनंदाला समजवायचा पण सुनंदा मनातून खचत चालली होती. तिला मुल न होण्याच्या दुःखपेक्षा मुकुंदच्या आईचे वागणे बोलणे दुःखी करत होते.
असेच एक दिवस शेजारच्या घरातील पाटील वहिणींच्या सुनेचे डोहाळे जेवण होते. सुनंदाचा स्वभाव प्रेमळ आणि मनमिळाऊ असल्याने तिला लोक लबुद होते. त्यात पाटील वहिनी म्हणजे तिच्या खास दोन्ही घरात चांगलाच घरोबा होता. पाटील वहिनी सुनंदाला डोहाळे जेवणाचे आमंत्रण द्यायला आल्या होत्या.
पाटील वहिनी,“ सुनंदा आज सीमाचे ढवाळ जेवण हाय तर सांजला पोरी घेऊन ये. आज सैपाक करू नगं. मास्तरास्नी आन मामीला बी जेवण घेऊन ये.” तोपर्यंत कुठे तरी गेलेली आई घरात आली.
आई,“ ये जानके येडी का खुळी तू? ढवाळ जेवणाला वांझोट्या बाईला बोलवत नायती. हिची सावली जरी तुज्या सिमीवर पडली तरी अपशकुन हुईल.” त्या रागाने म्हणाल्या आणि सुनंदाने तोंडात पदर कोंबून हुंदका दाबला.
पाटील वहिनी,“ कोण म्हणलं सुनंदा वांजोटी हाय म्हणून दोन सोन्यासारख्या पोरी हायत्या तिच्या पदरात. ती आई हाय त्यांची. आन तुमी देवाच्या दयेनं इतकी सोन्यावानी सून मिळाली. मास्तरच्या दोन पोरी पत्करल्या पोरीनं इतकी देकनी हाय कुणी बी कोरा नवरा मिळाला असता की. पण तिचं उपकार मानायचं सोडून तिलाच बोलताय व्हय. जनाची नार मनाची तर ठेवा की जरा. रोज लोकास्नी सांगत फिरता तुमची सून वांजोटी हाय म्हणून ती नाय तुमचं विचार वांजोटे हाय ती.सुनंदा ह्या म्हातारीचं काय बी ऐकू नगं ही अशीच मरिस्तवर बोंबलत राहील आन एक दिस मरून नरकात जाईल.” त्या रागाने चांगलं सुनावत होत्या. आणि मागे मुकुंद उभा राहून सगळं ऐकत होता. आईने मुकुंदला पाहिले आणि कांगावा सुरू केला
आई,“ बगितलं का मुकुंदा तुझ्या या बायकोनं शेजाऱ्या पाजाऱ्यास्नी कसं शिकवून ठिवलय. ही बोलत नाय पर यास्नी बोलाया लावती.”
पाटील वहिनी,“ तिनं काय बी नाय शिकवलं मला.आन तुमी ओ मास्तर सगळ्या जगाला शिकवता आन तुमच्या आईला शिकवता येत नाय का? सुनं बरुबर कसं वागायचं?”
आई,“ ये तू नगं शिकवू अमास्नी निग माझ्या घरातून.” त्या ओरडल्या.
पाटील वहिनी,“ इथं थांबायचं कुणाला हाय. या म्हातारीनं नरक केलाय घराचा, सुनंदे या म्हातारीच अजून सहन नगं करू एक दिवस जीव घिल तुजा ही बया.” त्या रागाने म्हणाल्या आणि निघून गेल्या.
आई,“ बगितलं का रं मुकुंदा कसा पान उतारा केला त्या बाईनी माजा या … या सुनंदीनंच सांगितलं असणार त्या दात ओठ खात म्हणाल्या आणि सुनंदा रडत आत निघून गेली.
मुकुंद,“आणि वांज म्हणून तू सुनंदाचा पान उतारा केला त्याच काय आई? पाटील वहिनी चुकीचं काहीच बोलल्या नाहीत. खूप झालं मी अजून गप्प राहिलो तर तू खरंच सुनंदाचा जीव घेशील.”असं म्हणून तो आत गेला आणि रडत बसलेल्या सुनंदाला हाताला धरून बाहेर घेऊन आला.
सुनंदा,“ कुठं नेताय मला? मी खरंच पाटील वैनीला काय बी नाय सांगितलं ओ! आन घिवून सांगते तुमच्या गळ्याची.” ती घाबरून रडत बोलत होती.
मुकुंद,“ एकदम गप्प बस सुनंदा! आन आई ही वांजोटी नाय हिला मुलं होऊ शकतं. वांजोटा मी आहे. मी जना गेल्यावर माझ्या पोरींना सावत्र आईचा जाच नको म्हणून नसबंदी करून घेतली मग कसं होणार हिला मुल? इतके दिवस मी गप्प होतो पण आता पाणी डोक्यावरून गेलं.सुनंदा खरं तर मी तुला फसवलं आणि माझ्या आईने तुला चार वर्षे त्रास दिला. मला सगळं दिसत होतं पण….” तो पुढे काही बोलणार तर सुनंदाने त्याच्या हातातून हात सोडवून घेतला आणि पळत जाऊन तिने खोलीत स्वतःला कोंडून घेतले.
आई,“ आरं देवा! काय केलंस तू हे मुकुंदा.” त्या डोक्याला हात लावून खाली बसत म्हणाल्या.
मुकुंद,“ दार उघड सुनंदा. उगीच भलता सलता विचार करू नकोस. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला सगळं सांगायचं आहे.” तो घाबरून रडत म्हणाला.
सुनंदा,“ मी तुमी समजता तसं काय बी करणार नाय. पर मला एकटं राहायचं हाय थोडा येळ.” ती आतून हुंदके देत म्हणाली.
बराच वेळ सुनंदाने दार उघडले नाही. आई डोक्याला हात लावून शांत बसून होत्या. मुकुंद विमस्क अवस्थेत बसून होता. तोपर्यंत पोरी शाळेतून घरी आल्या. मुकुंद आज तालुक्याला शाळेचे काम आहे म्हणून तो गेला होता आणि शाळेत काही कागदपत्रे देऊन लवकर घरी आला होता. पोरी घरात आल्या आणि मुकुंदला विचारलं.
रमा,“ आई कुठं आहे बाबा?” ती म्हणाली. त्याला काय उत्तर द्यावे कळत नव्हते तोपर्यंत सुनंदा परदाने तोंड पुसत आली
सुनंदा,“ मी कुठं जाणार हाय? जा ताई चिमणीला घेऊन हात-पाय धुवून या. मी तुमास्नी खायला करते.”ती म्हणाली. मोठी शामा तिच्याकडे पाहत होती.
शामा,“ तू रडली ना आज बी? या आजीनेच तुला रडवलं असणार. आई अपुन इथं राहायला नको आपण ना मामाकडे आन आत्याकडे रहायला जाऊ. या आजीला बसू दे इथंच.” ती तिचे सुजलेले डोळे आणि उतरलेला चेहरा पाहून रडकुंडीला येत म्हणाली आणि सुनंदाने तिला कुशीत घेतले आणि रडायला लागली ते पाहून छोटी रमा पण तिला बिलगून रडायला लागली.
सुनंदा,“ रडू नगा माझ्या चिमण्यानो आता मी नाय रडायची आ. चला.” ती म्हणाली आणि डोळे पुसत छोटी रमा तोंड फुगवून म्हणाली.
रमा,“ आई तुझी चिमणी फक्त मी हाय ताई नाही.”
सुनंदा,“ होय बाई तूच फकस्त चिमणी हाय माझी, ताई नाही. ताई तर माझी मैना हाय. होय ना ताई?” तिने हसून विचारलं
शामा,“ हो ही चिमणी आणि मी मैना.” ती खुदकन हसून म्हणाली आणि रमा पण हसली. तिघी बडबड करत आत गेल्या.
मुकुंद आणि त्याची आई आवक होऊन सुनंदाचे वागणे पाहत होते. सुनंदा मात्र दोन्ही पोरींना सोडून त्या दोघांशी एक शब्दही बोलली नाही. तिने नाश्त्याला आणून दिले आणि रात्रीचा स्वयंपाक पण केला पोरींना भरवले आणि स्वतःही चार घास पोटात ढकलले. मुकुंद आणि त्यांच्या आईच्या मात्र गळ्या खालून घास उतरत नव्हता. शामा नेहमी प्रमाणे आजी जवळ झोपली आणि रमा सुनंदा जवळ. मुकुंदची मात्र चलबिचल सुरू होती. तो रमा झोपायची वाट पाहत होता. त्याला सुनंदाशी बोलायचं होतं. रमा झोपली आणि मुकुंद तिला म्हणाला.
मुकुंद,“ मला तुझ्याशी बोलायचं आहे.”
सुनंदा,“ पर मला नाय बोलायचं.” ती झोपलेल्या रमाच्या केसातून हात फिरवत म्हणाली.
मुकुंद,“ मला माहित आहे मी तुझा अपराधी आहे. पण कोणताही निर्णय घेण्याआधी माझे एकदा ऐकून तरी घे. मी म्हणत नाही की तू मला माफ कर पण एकदा ऐकून तरी घे. मग वाट्टेल ती शिक्षा दे मला” तो आवंढा गिळत म्हणाला.
सुनंदा,“ तुमास्नी भीती वाटत असलं की मी हे घर सोडून जाईन तर तसं होणार नाय. या निरागस लेकरांची आई आदीच देवाने हिरावून घेतली. आता मी नाय त्यांची आई हिरावून घेणार. ही माझी लेकरं हायती आन मी यांची आई! आन पोरं जन्माला घातलं म्हंजीच आई होता येतं असं नाय. मला तर देवाने बाळांत कळा न सोसताच दोन सोन्यावानी पोरी दिल्या. तुमच्या अपराधाची शिक्षा मी कदी बी यास्नी देणार नाय.मी आट दिस माहेरी जातेय पोरीस्नी घिवून.आन घाबरू नका इथं काय झालं? आन तुमी काय केलं? हे मी कदीच कोणाला नाय सांगणार.” ती म्हणाली आणि रमाला कुशीत घेऊन झोपून गेली. मुकुंद मात्र तिच्याकडे आवक होऊन पाहत राहिला.
दुसऱ्या दिवशी सुनंदा पोरींना घेऊन माहेरी निघाली. पोरी मामाकडं आणि आत्या पण त्याच गावात असल्याने आत्याकडे जायचं म्हणून हरखून गेल्या होत्या. दोघींना छान तयार करून ती मुकुंद आणि त्याच्या आईला ही काही न बोलता निघून गेली. चांगले आठ-दहा दिवसांनी ती घरी परतली. पण ती दोघांशी ही बोलत नव्हती. पण सगळं काम आणि दिनचर्या जिथल्या तिथे होती. दिवसभर घरात एक भयाण शांतता असायची मुकुंदच्या आईचे तर तोंडच बंद झाले होते. संध्याकाळी पोरी आल्या की सुनंदा आणि पोरीच्या हसण्याच्या आवाजाने घर भरून जायचे.
त्या घटनेला एक महिना होऊन गेला होता. मुकुंद मात्र आतल्या आत पोखरला जात होता. त्याने एक दिवस रात्री सुनंदाशी पुन्हा बोलण्याची हिम्मत केली.
मुकुंद,“ सुनंदा माझं एकदाच ऐकून घे. मी पुन्हा नाही बोलणार तुझ्याशी तू जन्मभर जरी मला अबोल्याची शिक्षा दिलीस तरी ती मला मान्य असेल.पण एकदाच ऐक ना.” तो काकुळतीला येऊन बोलत होता.सुनंदा उठून बसली आणि शांतपणे म्हणाली.
सुनंदा,“ बोला.”
मुकुंद,“ मला माहित आहे की मी तुला फसवलं. तुझ्यावर अन्याय केला.पण त्या मागे माझा एक अनुभव होता. पण प्रत्येक वेळी प्रत्येकाला तसाच अनुभव येईल असे नाही.माणसं बदलतात तसा स्वभाव आणि वृत्ती देखील बदलत जाते.हे मी विसरलो होतो. मी नवीन शिक्षक म्हणून कामाला लागलो तेंव्हा माझ्या वर्गात एक श्रीपाद जोशी नावाचा मुलगा होता. अभ्यासात अगदी हुशार घरची परिस्थिती उत्तम त्याचे वडील साताऱ्यात कोर्टात कामाला होते. घरी शेतीवाडी उत्तम. पण त्याचे कपडे कायम फाटलेले असायचे. शाळेत कधीच तो वेळेवर येत नव्हता. घरचा अभ्यास कधीच पूर्ण नसायचा. पण वर्गात मात्र सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला यायची वर्गात ही पहिल्या तीनमध्ये याचा नंबर असायचा.डब्याला मात्र कायम शिळी भाकरी आणि चटणी. मला आश्चर्य वाटायचं या गोष्टीचे मग एक दिवस मी त्याला विचारलं की तुझ्या घरची परिस्थिती उत्तम आहे. तरी शिळी भाकरी आणि चटणी का? आणि तुझे कपडे कायम फाटलेले असतात घरचा अभ्यास कधीच पूर्ण नसतो. का रे असं? तेंव्हा ते चौथीतलं पोरगं रडायला लागलं आणि म्हणाले.
‛गुरुजी घरदार चांगलं असून काय उपयोग? नशीब बी चांगलं पाहिजे ना? ज्याच्याजवळ सख्खी आई असते ते नशीबवान असतात. माझी आई मी दुसरीत असतानाच देवाघरी गेली. वडिलांनी दुसरं लग्न केलं पण ती सावत्र आई तिने माझा छळ मांडला आहे. घरातली शेतातली कामं करून मला अभ्यासाला वेळच मिळत नाही. शाळेत शिकल तेवढंच काय ते. इतकं गुरासारखं काम करून खायला आन घालायला चांगलं मिळत नाही. माझ्या सावत्र भावंडांना मात्र सगळं चांगलं मिळतं. वडील दोन आठवड्यातून घरी आले की मात्र माझी दिवाळी असते. त्यांच्यासमोर माझ्याशी चांगलं वागते. जेवायला घालते. मी त्यांना एकदा सांगायचा प्रयत्न केला. तर ते गेल्यावर मला बेदम मारलं तिने आणि दोन दिवस उपाशी ठेवलं. त्यानंतर मी त्यांना काही सांगायची हिम्मत केली नाही.’
श्रीपाद त्याची कैफियत रडून सांगत होता. त्यानंतर मी त्याचे वडील गावी आल्यावर त्यांना गाठले. त्यांना शाळेत बोलावून घेऊन श्रीपादला सगळं सांगायला लावलं. त्यांना ही आपल्या मुलाबद्दल खूप वाईट वाटत होते पण त्यांना यातून मार्ग सुचत नव्हता तेंव्हा मी साताऱ्यातल्याच एका बोर्डिंगचा पत्ता सांगितला श्रीपादला तिथे स्वतः त्यांच्याबरोबर जाऊन ऍडमिशन घेऊन दिलं. श्रीपाद मुळातच हुशार होता. सावत्र आईच्या कचाट्यातून सुटला आणि त्याने अभ्यासात चांगली प्रगती केली दहावीला बोर्डात आला तो आणि त्यानंतर बारावीत देखील पुढे इंजिनियरिंग केलं.आणि मुंबई तो सरकारी अधिकारी आहे आज, लग्न होऊन मुलं-बाळं आहेत त्याला. लग्नाला स्वतः न्यायला आला होता तो मला. या गोष्टीला पंधरा वर्षे झाली. पण ज्यावेळी जना बाळांतपणात वारली. मुली लहान होत्या. आईला काही जमत नव्हते त्यामुळे मला लग्न करणे क्रमप्राप्त होते. पण लग्नाचा विचार केला आणि माझ्या डोळ्यासमोर श्रीपादच्या जागी माझ्या दोन मुली दिसू लागल्या. मी लग्न करणे म्हणजे माझ्यासाठी बायकोपेक्षा माझ्या मुलींसाठी सावत्र आई आणणे असा माझा पक्का समज होता. म्हणून मग मी एक निर्णय घेतला. तालुक्याला जाऊन नसबंदी करून आलो. जर मी लग्न केलेल्या बाईला मुलंच झाले नाही तर ती आपोआप माझ्या मुलींना मनापासून नसले तरीही वरवर तरी चांगलं सांभाळेल असा स्वार्थी विचार केला मी.
पण मी चुकीचा होतो प्रत्येक सावत्र आई श्रीपादच्या सावत्र आईसारखी नसते हे तुला पाहून माझ्या लक्षात आले तू माझ्या मुलींना पहिल्या दिवशीपासून जी माया लावली ती आजपर्यंत माया वाढत गेली. इतकच काय मी तुला फसवलं तुझ्यावर अन्याय केला. आई तुला विनाकारण इतकं बोलत होती तरी गप्प राहिलो म्हणून तुला आमच्या दोघांसारखा पोरींवर देखील राग काढता आला असता शेवटी मी तुझ्यावर अन्याय त्यांच्यासाठी त्यांचा बाप म्हणूनच केला ना? तरी तू माझ्या पोरींवरची माया तसूभर देखील कमी होऊ दिली नाही. आणि मी आणखीनच खजील झालो.
मला माफ कर मी तुला फसवलं, तुझ्यावर, तुझ्यातल्या मातृत्वावर अन्याय केला.तुला मला काय शिक्षा द्यायची ती देऊ शकतेस.” तो रडत तिच्यासमोर हात जोडून बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून सुनंदा देखील रडत होती.
सुनंदा,“ मला समजतंय तुमी जे केलं ते पोरींचा बाप म्हणून केलं पर तुमी हे मला आदी सांगायला पायजे होतं. ते तुमचं चुकलं. आन हाताची पाची बोटंसारखी नसत्यात वो. मी ज्या दिशी दोगीस्नी बगितलं त्याच दिशी मी त्यांची आई झाले आन आई काय मुलांस्नी जन्म दिवूनच हुता येतंय होय. मनाची मन संग नाळ जोडली की आई होता येतं. आन बास झालं आता हे रडणं बिडन पुरुषास्नी रडणं सोबा देत नाय.” ती स्वतःचे डोळे पुसत म्हणाली.
मुकुंदा,“ अजून एक बोलायचं होत मला.मी काल पेपरमध्ये आणि बऱ्याच दिवसांपूर्वी एका नियतकालिकामध्ये वाचले आहे. एक नवीन तंत्रज्ञान आले आहे. ज्याला टेंस्टूब बेबी म्हणजे परीक्षा नलिकेतले बाळ म्हणतात. मुंबईतल्या एका मोठ्या दवाखान्यात दोन तीन लोकांना त्या तंत्रज्ञाना व्दारे मुलं झाली आहेत. त्यात तुझ्या शरीरातले बीज अंडे आणि माझ्या शरीरातले शुक्राणू काढून एका परीक्षा नळीत एकत्र करतात आणि बाईच्या गर्भाशयात सोडतात. तू त्या तंत्रज्ञाना व्दारे आई होऊ शकतेस. त्याला खर्च खूप आहे मी चौकशी केली आहे. मी जमिनीचा एक तुकडा विकतो नाय तर पगारावर कर्ज काढतो. तू मुंबईला चल माझ्याबरोबर तुला बाळ होईल आणि तुझ्या माथ्यावर माझ्यामुळे जो वांजपणाचा कलंक लागला आहे तो पुसला जाईल.” तो बोलत होता आणि सुनंदा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती.
सुनंदा,“ आता गं बया पण एवडा कुटाना करायला कोण सांगितला हाय? आन शेत माझ्या पोरींच हाय त्याला हात लावला तर माझ्यासारखी वाईट कोण बी नसलं. आन कर्ज काढणार म्हणं आले मोठे. आन मला नाय कोण वांज म्हणत उलट गावातली माणसं नावाजत्याती बगितलं नव्हं पाटील वैनी काय काय बुलून गेल्या तुमच्या आईला. तुमची आईच म्हणायची वांज मला आता त्यांचं बी तोंड बंद झालं. आता तुमास्नी रोज शिव्या खाव्या लागणार हायत्या.आता काय त्या बोलायच्या नायत्या मला. मी तर सुटले बाबा!माझ्या पोरींची उद्या सकाळची शाळा हाय लवकर उठायचं हाय मला.(असं म्हणून ती पांघरूण घेऊन निवांत झोपली.(मुकुंद मात्र तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता.) झोपा की आता पोरींच्या बापाला बी शाळा हाय उद्या.” ती गालात हसून म्हणाली आणि मुकुंदने तिला पाठी मागून मिठी मारली.
पण सुनंदा म्हणाली तसंच झालं. म्हातारीचं पारड फिरलं आता सुनंदा ऐवजी म्हातारी रोज मुकुंदला शिव्या घालत होती. आणि मुकुंद गुपचूप त्या खात होता. आणि सुनंदा मात्र मजा पाहत होती. खरं तर तिच्यासाठी हीच त्याला मोठी शिक्षा होती.
©स्वामिनी चौगुले
अशाच मनोरंजक कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा
