माडीवरची बाई भाग 18

 





  लग्नाची घाई गडबड सुरू झाली पुन्हा पाहुण्यांनी वाडा फुलून गेला होता.रमा तर तिच्या राघव दादाचे लग्न तिच्या आवडत्या मालूताईबरोबर होणार म्हणून खूप खुश होती. तिचा नवरा आणि ती पंधरा दिवस आधीच आले होते. लग्नाच्या घाई गडबडीत चार दिवसांवर लग्न येऊन ठेपले. घरातली आणि गावातली प्रतिष्ठित चारशे ते पाचशे माणसं साताऱ्याला आधीच रवाना झाली.बाकी गावताली माणसे लग्ना दिवशी येणार होती. जयसिंगरावांनी पाहुण्यांची यथोचित सोय केली होती. मन मारून का असेना पण राघवेंद्र लग्नाला तयार झाला होता. एका एका विधीला सुरुवात झाली. लग्नाच्या एक दिवस आधी हळद लागली आणि दुसऱ्या दिवशी थाटात लग्न पार पडले. जयसिंगरावांनी सगळ्यांचा योग्यतो मानसन्मान केला होता.लग्नाला तीन ट्रक भरून माणसं गावाकडून आली होती. 


   आणि एकदाचा मधुमालतीने जहागिरदारांच्या वाड्यात आणि राघवेंद्रच्या आयुष्यात प्रवेश केला. देवकार्य पार पडले आणि आज पूजा होती आणि अवघ्या  पंचक्रोशीत त्याची दवंडी पिटवण्यात आली होती. माणसांचे झुंडच्या झुंड वाड्यात दाखल होत होते. राघव आणि मधुमालती पूजेला बसले.पूजा योग्य पध्दतीने पार पडली.बाहेर जेवणाच्या पंगतीच्या पंगती उठत होत्या.  पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्ती वाड्याच्या चौकात बसले होते. महेंद्रप्रतापांनी राघवेंद्र आणि मधुमालतीला बाहेर बोलावून घेतले.दोघांनी सगळ्यांना वाकून नमस्कार केला. मदन ही कामात व्यग्र होता. तो घरचे कार्य समजून कोणाला काय हवे नको ते पाहत होता.


महेंद्रप्रताप,“ मदन शेठ हकडं या.” ते म्हणाले.


मदन,“ काय थोरलं सरकार गरीबाची मस्करी करतायसा व्हय?” तो त्यांच्याजवळ येत हसून म्हणाला.


महेंद्रप्रताप,“नाय रं! राधे त्ये घिऊन ये समदं.” ते राधक्काला आवाज देत म्हणाले आणि राधक्का भरजरी कपड्याने झाकलेलं  एक मोठे ताट घेऊन आली.


महेंद्रप्रताप,“ अण्णा धाकलं सरकारांच्या मैतराचा तुमीच मान करा.” ते म्हणाले आणि अण्णा काठी टेकत तिथे आले. त्यांनी कपडा काढला. त्यात कपडे, एक सोन्याचे लॉकेट, अंगठी आणि सोन्याचे कडे आणि रेशमी फेटा होता. 


सुभानराव,“ आरं ये की म्होरं मद्या.” ते फेटा हातात घेत म्हणाले. एका गड्याने लगबगीने एक लाकडी खुर्ची आणून ठेवली. मदन त्या सगळ्या वस्तूंकडे आश्चर्याने पाहत होता.


मदन,“ हे समदं काय हाय? मला नगं बाबा!” तो संकोचून म्हणाला.


महेंद्रप्रताप,“ आरं माणसाची कदर जहागिरदारांस्नी कळत्या. तुज्यावानी  मैतर मिळाया भाग्य लागतया लेका आन आमचं धाकलं सरकार भाग्यवान हायती मंग त्याची कदर व्हायला नगं व्हय. म्या तुज्यावर लय खुश हाय लेका. तुला बक्षिसी द्याव म्हणलं हुतं पण बक्षिसी दिवून तू घितली नसती आन तुमच्या मैतरिचा अपमान झाला असता नव्हं म्हणूनशान मंग असा तुज्या  मैतरिचा मान करायाचा ठरिवलं हुतं. आवं धाकलं सरकार सांगा की तुमच्या मैतराला.” ते राघवेंद्रकडे पाहत म्हणाले.


राघवेंद्र,“ घे की रं मद्या.” तो म्हणाला.


मदन,“ हे घ्याया म्या असं काय बी केलं नाय धाकलं सरकार मला नगु हे समदं.” तो हात जोडून म्हणाला.


सुभानराव,“ अप्पा तुज्या लेकाला सांग गप हितं बसाया नाय तर पाटीत काटीच घालतु बग ह्येच्या.” ते म्हणाले.


अप्पा,“ जहागीदारांचा मान असाच कोणालाबी मिळत नाय मदू घे त्यो.” ते म्हणाले आणि मदन नाईलाजाने खुर्चीवर बसला. अण्णानी त्याला रेशमी फेटा बांधला. गळ्यात लॉकेट आणि हातात अंगठी घातली.


महेंद्रप्रताप,“ धाकलं सरकार हे मनाचा कडं तुमीच घाला की याच्या हातात.” ते म्हणाले आणि राघवेंद्रने पुढं येऊन त्याच्या उजव्या हातात सोन्याचे कडे घातले आणि त्याला मिठी मारली.


सुभानराव,“ मालू हे तुजं मदन भौजी बरं का! राघव साटनं भावा परास कमी नाय. पाया पड याच्या.” ते म्हणाले आणि मधुमालती पुढे आली.


मदन,“ काय बी कराया काय संगतायसा अण्णा. वैनीसाब नगं जी.” तो लाजून हात जोडून म्हणाला.


महेंद्रप्रताप,“ बरं ऱ्हायलं. राधाबाई घेऊन जावा सुनंला आत.” ते म्हणाले आणि मधुमालती  राधक्काबरोबर आत निघून गेली.


         दिवस कसा निघून गेला कोणालाच कळले नाही. संध्याकाळचे सात वाजले. पहिल्या रात्रीसाठी रमाने  पलंग सजवला. राघवेंद्र कोणाला तरी सोडायला गेला होता तो घरी आला. सगळ्यांची जेवणं झाली होती. आणि निनानिज सुरू झाली होती. राघवेंद्र नेहमीप्रमाणे वर जाऊ लागला.


महेंद्रप्रताप,“ अण्णा सांगा धाकल्या सरकारास्नी बायकुला घिवून माडीवर ऱ्हायाची रीत जहागिरदारांच्यात नाय. आता मुक्काम खाली हलवायाचा. खालची खोली तयार हाय म्हणावं. जावा ततं.राधे खोली दाव यांची” ते म्हणाले. 


  राधक्का आली आणि राघवेंद्रला खालची अण्णांच्या बाजूची खोली त्याला दाखवली.


राधक्का,“ त्वां आणि मालू आता हतं ऱ्हायाचं.” ती म्हणाली.


राघवेंद्र,“ म्हंजी आता समदं तुमच्याच मर्जीनं करायाच काय? लगीन केलं नव्हं.माणसं हायती म्हणूनशान मला काय बोलता नाय आलं.” तो रागाने म्हणाला.


राधक्का,“ राघव आरं लगीन झालं नव्हतं तवर ठीक हुतं माडीवर ऱ्हानं पर आपल्यात बायकूला माडीवर नायती ठिवत बाबा. म्हणूनशान तुजी खोली बदलली.जा आता आन अमचा राग मालूवर काडू नगंस.” ती त्याला समजावत म्हणाली आणि निघून गेली.


   राघवेंद्र खोलीत गेला तर पलंग फुलाने सजवला होता. ते पाहून तो आणखीनच चिडला. रमा मधुमालतीला बाहेरूनच सोडून गेली. ती अवघडून दुधाचा ग्लास घेऊन खोलीत आली. राघवेंद्र तिला  पिवळस पडलेल्या कंदिलाच्या प्रकाशात पाहत होता. तिने हिरवीकंच रेशमीसाडी नेसली होती.जी तिचा गोरा रंग अधिकच खुलवत होती. कपाळावर अगदी मोठे नसले तरी ठसठशीत कुंकू,कानात सोन्याची मोठी कर्णफुले,लांब सडक केसाच्या वेणीत मोगऱ्याचा गजरा सगळीकडे सुगंध पसरवत होता. गळ्यात दागिन्यांबरोबर मोठाले सोन्याचे मंगळसूत्र,  हातात हिरवा चुडा ती खाली मान घालून अवघडून चांदीचा ग्लास घेऊन उभी होती.


   तिला दोन क्षण पाहून तो भानावर आला.


‛ जे झालं त्यात हिचा हाय दोष? मी हिच्यावर राग नाय काडू शकत. हिला तर बिचारीला काय बी म्हैत नाय. आन लगीच हिला बायकू म्हणून बी नाय स्वीकारू शकत.माज्या मनात तर हरणीनं घर केलं हाय.’ (त्याने विचार केला आणि त्याचा राग निवळला.) 


राघवेंद्र,“किती येळ अशी हुबारणार हायस मधुमालती? ठिव त्यो गलास ततं आन पलंगावर बस की.” तो म्हणाला आणि ती बावरली.तिने तिच्या मोठ्या घाऱ्या डोळ्यांनी त्याला एकदा पाहिलं. त्याच्या अंगावर रेशमी मोती रंगाचा तंग अंगरखा अन चुडीचा पायजमा त्यातून त्याचे पुरुषी सौष्ठव आणि पिळदार शरीर उठून दिसत होते.  


मधुमालती,“ पण हे दूध घ्या की.” ती पलंगाजवळ जात त्याच्यासमोर दुधाचा ग्लास धरत म्हणाली.


राघवेंद्र,“ बरं आन पितू. आन झोप आता लय दमली असशील नव्हं. आट दिस झालं लय दगदग झाली नव्हं.” तो दूध पिऊन म्हणाला.


मधुमालती,“ अं sss झोपू?” तिने विचारलं.


राघवेंद्र,“ व्हय. मी हितं झुपतू या बाजूला तू त्या बाजूला झोप.” तो म्हणाला आणि झोपून गेला. मधुमालती मात्र विचारात पडली.


‛ आज लग्नानंतरची पहिली रात्र आहे हे झोपून गेले? कदाचित थकले असतील आणि त्यांना वाटलं असेल मी ही थकले आहे म्हणून कदाचित… चला मधुमालतीबाई तुम्ही पण झोपा आता.’ 

★★★


  दुसऱ्या दिवशी रमा आणि आत्याच्या सुनांनी मधुमालतीला चिडवून हैराण केलं. पण ती खाली मान घालून गप्प होती. राधक्काच्या मनात शंकेची पाल चुकचुकली पण ती गप्प बसली पुढच्या दोन रात्री तर राघवेंद्र  मधुमालती खोलीत यायच्या आधीच झोपून जात होता. मधुमालतीला मात्र त्याचे वागणे कळत नव्हते. ती आता हिरमुसली होती पण कोणाला काही बोलली नाही. आता घरातील पाहुणे ही निघून गेले रमा आणि तिचा नवराही निघून गेले. राधक्काला मात्र मधुमालतीकडे पाहून सगळे लक्षात आले होते. तिने आज महेंद्रप्रतापरावांशी बोलायचे ठरवलं. आज ही राघवेंद्र मधुमालती खोलीत येण्या आधीच  झोपून गेला होता. इकडे महेंद्रप्रतापराव झोपायला त्यांच्या खोलीत गेले. राधक्का त्यांचीच वाट पाहत होती.


राधक्का,“ ऐका की म्या काय म्हणती?” ती म्हणाली आणि महेंद्रप्रताप तिच्याजवळ बसत हसून म्हणाले.


महेंद्रप्रताप,“ जलम भर तर तुमचंच ऐकलं की राधाबाईसाब. आता तर काय भाची सून करून आणली बाबा. एकाच घरातल्या आत्या आन भाची. मगं खुश हाय ना माजी राधी?” ते तिलाजवळ घेत म्हणाले.


राधक्का,“ हाय का आता? तुमचं तर काय बी अस्तया जी. म्या खुश नसाया काय झालं? माजी रमी खुश हाय राघवच बी लगीन झालं आन तुमच्यावाणी नवरा हाय की. पर आवं मालू खुश नाय मालू आन राघव मंदी काय बी नाय झालं आजूनशान आज तीन दिस हून गेलं नव्हं पइली रात हुवून.” ती बोलत होती.


महेंद्रप्रताप,“ काय? मालू  तुला काय बोलली का तसं?”त्यांनी विचारलं.


राधक्का,“ नाय जी. आन ती बोलायची बी नाय. ईवडी वरीस संसार उगा केला व्हय म्या. आवं बाईंचं चाल ढाल कळतीया नव्हं बाईला. आत्ता पातूर तिचं आंग फुलून आलं असतं नव्हं. तोंडावर लाली फुलाय पायजेल हुती सुकाची. नवी नवरी हाय ती. कशी साजिरी दिसली असती नव्हं पर हिरमुसली हाय पोर.” ती बोलत होती. 


  महेंद्रप्रताप,“ मला वाटीत हुतं लगीन झालं की मालूवानी देकनी बायकू बगून  राघव भाळलं तिच्यावर.बाप्या हाय त्यो बाई बगतली की जाईल नव्हं जवळ. त्यात मालू त्याची हक्काची बायकू हाय. दोगं बी तरणी हायती. पर आपलं पोरगं येगळं निगलं राधे! म्या उंद्या त्याच्या संगट बोलतु.” ते म्हणाले.


राधक्का,“ व्हय मला बी वाटलं हुतं लोण्याचा गोळा आगी जवळ ठिवला की पागळणारच पर नाय जी या पोराच्या मनात काय हाय देव जाणं. आता वाटाया लागलंया याच लगीन मना विरुध करून चूक केली का काय अपुन?” ती गंभीर होत म्हणाली.


महेंद्रप्रताप,“ राधे अपुन काय बी चूक केली नाय. म्या बुलतु त्याच्या संगट. मालू संग त्याला संसार करायाच लागल. मालू बायकू हाय त्याची.” ते म्हणाले.


राधक्का,“ बरं पर दमानं घ्या जरा.” ती म्हणाली.


महेंद्रप्रताप,“ व्हय बाईसाब.त्वां नगं काळजी करू आन परवाच्याला मालूकडं बगूनशान सांग मला.” ते हसून म्हणाले.



   दुसऱ्या दिवशी मधुमालतीला रकमाबरोबर  महेंद्रप्रतापरावांच्या सांगण्यावरून राधक्काने शेत बघायला पाठवून दिले. राघवेंद्र दिवणजीबरोबर बसून हिशोब पाहत होता.सुभानराव पण तिथेच होते.


महेंद्रप्रतापराव,“ राधा याला दिवनखान्यात यी म्हणावं.” ते म्हणाले आणि आत निघून गेले.


राधक्का,“ राघव चल बाबा बोलायचं हाय  तुज्या संगट.” ती डोक्यावरचा पदर नीट करत म्हणाली आणि राघवेंद्र तिच्याबरोबर गेला.


महेंद्रप्रताप,“ काय सुरू हाय तुजं?” त्यांनी कठोरपणे विचारलं.


राघवेंद्र,“ आई तुमच्या मना परमान झालं नव्हं समदं मंग आता अजून काय बाकी हाय का?” त्याने ही चिडून विचारलं.


महेंद्रप्रताप,“ व्हय आमच्या मना परमान लगीन केलं पर मालू संग संसार कोण करायचा? आज चार दिस झालं हायती त्वां मालूला बायकू म्हणूनशान जवळ घेतलं नाय.” ते रागानेच म्हणाले.


राघवेंद्र,“ तिनं सांगतलं वाटतंया?” त्याने रागाने विचारलं.


महेंद्रप्रताप,“ ती कशा पाय सांगतीया असलं काय! खानदानी पोरगी हाय ती. त्वां कसा बी वागला तरी बी एक सबुद बोलणार नाय ती. आन तिनं सांगाया कशापाय पायजेल? डूई वरच क्यास उनात पांडर झालं नायती आमचं. पोरीकडं बागूनशान कळतंया की. नवी नवरी हाय ती.” ते रागानेच बोलत होते.


राघवेंद्र,“ म्हंजी आता माज्यावार समद्याच गुष्टीची जबरदस्ती काय? मला काय मन बिन हाय का नाय?” त्याने रागाने विचारलं.


महेंद्रप्रताप,“ व्हय तर तुमचं मन कुटं अडकलं हाय हे म्हैत हाय धाकलं सरकार अमास्नी! पर हतं बी लय देकना ऐवज हाय तुमच्याजवळ त्यो बी खानदानी, त्यात एकदाव मन रमलं नव्हं मंग समदं इसराल तुमी.” ते राघवेंद्रकडे पाहत बोलत होते.


राधक्का,“ राघव आरं लगीन झालं हाय मालू बरुबर तुजं आता तिला संसार सुक द्यायचं तुजं कर्तीव हाय बाबा नवरा म्हणूनशान. आन तुजा राग आमच्याव हाय तिला बिचारीला तर काय बी म्हैत नाय नव्हं. मंग तिला कशा पाई शिक्षा दितुस? असं नगं वागू बाबा!” ती त्याला समजावत होती आणि राघवेंद्र तिथून काहीच न बोलता निघून गेला. 



    राघवेंद्रने घरच्या लोकांच्या दबावात येऊन मधुमालती बरोबर लग्न तर केलं होतं. पण त्याच मन तिला बायको म्हणून स्वीकारायला धजावत नव्हतं कारण त्याच्या मनात तर हरणी घर करून बसली होती. तो मधुमालतीला बायको म्हणून स्वीकारेल का?

©स्वामिनी चौगुले

Sorry for late🙏

कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post