शार्दूली तिच्या रूममध्ये उदास बसून होती. तिची मम्मा म्हणजेच निधी तिथे आली.शार्दूलीचे तिच्याकडे लक्ष नव्हते. निधीने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि शार्दूलीने तिला मिठी मारली आणि रडू लागली.
निधी,“ बच्चा रडू नको.तुला का असं वाटतंय. तुझ्या मनातला न्यूनगंड काढून टाक बेटा!” ती तिला समजावत होती.
शार्दूली,“ मम्मा अग माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या ब्रेस्ट भरलेल्या दिसतात. एक माझ्या सगळ्या मैत्रिणींना पिरिएड्स आठवी आणि नववीत आले. मला मात्र मी दहावीत गेल्यावर पिरिएड्स सुरू झाले. किती उशीर झाला शेवटी आपण डॉक्टरकडे गेलो होतो. आठवतंय का तुला?” ती रडक्या आवाजात बोलत होती.
निधी,“ हो शार्दु सगळं आठवतं मला! पण तेंव्हा ही मी तुला समजावले होते की कोणाला लवकर कोणाला उशिरा येतात पिरिएड्स तरी तुझ्या समाधानासाठी तुला डॉक्टरकडे घेऊन गेले मी! तर डॉक्टर मॅडम काय म्हणाल्या होत्या. इतकं घाबरण्यासारखे काही नाही प्रत्येकाची बायोलॉजी वेगळी असते कुणाला लवकर तर कोणाला उशिरा पिरिएड्स येतात आणि तू दहावीत गेली की आले की तुला पिरिएड्स! आणि बच्चा तुला ब्रेस्ट कमी आहेत तर त्यात न्यूनगंड बाळगण्यासारखे काहीच नाही. तुझी शरीर प्रकृती नाजूक आहे किती छान दिसते माझी शार्दु अगदी बाहुली सारखी! बच्चा जे नैसर्गिक आहे ते सुंदर असतं आणि तू सुंदर आहेस.” ती तिला पुन्हा समजावून सांगत होती.
शार्दूली,“मम्मा आईला आपली मुलं सुंदरच दिसतात गं! मी काल डाऊन नेक आणि बॅकलेस फ्रॉक घातला होता तर ती पायल मला काय म्हणाली माहीत आहे का? म्हणे काय गं शार्दु तुझ्या ब्रेस्ट किती छोट्या आहेत यार! तुझ्यात सेक्स अपीलच नाही त्यामुळे! मम्मा मला ना खूप लो फिल होत आहे या सगळ्यामुळे! माझ्यातला कॉम्फीडन्स कमी होतोय मी काय करू?” ती राडवेली होत निधीशी बोलत होती.
शार्दूली निनाद सुपेकर एक्कोनीस वर्षाची उच्चभ्रू घरातील कॉलेजला जाणारी एक सुंदर पण अंगाने अगदी शिडशिडीत बांध्याची नवतरुणी! काल ती तिच्या एका मित्राच्या बर्थडे पार्टीला गेली होती आणि तिथे तिच्याच एका मैत्रिणीने तिला तिच्या अगदीच कमी असणाऱ्या उरोजांवरून हिनवले होते. त्यामुळे ती आज उदास होती. तिची आई निधी तिची समजूत काढायचा प्रयत्न करत होती पण शार्दूलीला मात्र तिच्या मैत्रिणीचे बोलणे चांगलेच जिव्हारी लागले होते.तिचा आत्मविश्वास या सगळ्यामुळे कमी होत चालला होता. ती आता लोकांमध्ये कमी मिसळू लागली होती. कॉलेजमध्ये देखील एकटी एकटी राहू लागली होती. लोकांमध्ये मिसळणे तिला नकोसे झाले होते. काल तिच्या आईने तिला बळेच तिच्या मित्राच्या बर्थडे पार्टीला पाठवले होते आणि तिथे देखील तिच्या कोणा मैत्रिणीने तिला हिनवले म्हणून ती उदास होती. निधीला भीती होती की असेच चालू राहिले तर शार्दूली डिप्रेशनमध्ये जाईल. म्हणून ती तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती. निधीने तिचा न्यूनगंड दूर करण्यासाठी एक उपाय शोधून काढला होता.
निधी,“तू लक्ष नको देऊस राणी त्या पायलकडे! तुझ्यासारखं देखणं रूप, गोरा रंग आहे का तिच्याकडे? मे बी ती तुझ्यावर जळत असेल पण मी तुला वाटणाऱ्या न्यूनगंडावर एक उपाय शोधला आहे.” ती म्हणाली आणि शार्दूलीचे डोळे चमकले.
शार्दूली,“ काय उपाय आहे गं मम्मा सांग ना?” तिने उत्सुकतेने विचारले.
निधी,“ आपण तुझ्यासाठी पॅडेड ब्रा आणू. त्या घातल्यानंतर तुझे उभार चांगले दिसतील. तू अशा ब्रा कायम वापरू शकतेस.” ती तिला म्हणाली.
शार्दूली,“ हो गं मम्मा माझ्या लक्षातच आले नाही ते, आपण उद्याच जाऊन तशा ब्रा खरेदी करू.” ती खुश होत म्हणाली.
निधीने शार्दूलीच्या मानत असणाऱ्या न्यूनगंडावर तात्पुरता का होईना उपाय शोधून काढला होता आणि त्या उपायाने शार्दूली खुश होती.त्यानंतर मात्र शार्दूली सगळीकडे आत्मविश्वासाने वावरू लागली.
★★★
काही वर्षांनंतर...
शार्दूलीने तिचे मास्टरेड पूर्ण केले आणि ती कॉलेज कॅम्पसमधून एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पॅकेज सह सिलेक्ट देखील झाली. तिचे मॉम-डॅड त्यामुळे खुश होते. शार्दूली बेंगलोरला तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन राहिली. तिथे निधीने तिच्यासाठी सेप्रेट फ्लॅट रेंटवर घेतला. कारण निधी देखील कधी मधे तिच्या सोबत राहू शकेल आणि शार्दूली एकुलती एक असल्याने तिला कोणतीच गोष्ट शेअर करायची सवय नव्हती मग शेअरिंगमध्ये फ्लॅट घेतला तर ती ऍडजेस्ट करू शकली नसती.
शार्दूली तिच्या ऑफिसमध्ये चांगलीच रुळली. तिला आता ऑफिस जॉईन करून एक वर्ष होत आले होते. तिचा हसरा मनमिळाऊ स्वभाव, कोणाला ही मदत करण्याची वृत्ती आणि कामातली हुशारी यामुळे तिचे चांगले फ्रेंड सर्कल तयार झाले होते. तिच्याच ऑफीममध्ये काम करणारा आणि तिचा चांगला मित्र असणारा राघव तिच्यावर मनोमन प्रेम करत होता.राघव मूर्ती कर्नाटकी सावळा, नाकीडोळी नीटस आणि जिममध्ये जाणारा धिप्पाड तरुण! तितकाच हुशार आणि स्मार्ट देखील होता. तो बेळगाव या सीमावर्ती भागातून आला होता त्यामुळे त्याला मराठी ही चांगले बोलता येत होते.त्याने आता शार्दूलीला प्रपोज करायचे ठरवले होते.
शार्दूली मात्र तिच्या मनात असणाऱ्या न्यूनगंडामुळे प्रेम या भावानेपासून लांब पळत होती. कॉलेजमध्ये तिला बऱ्याच मुलांनी प्रपोज केले होते पण तिने त्यांना न दुखावता नकार कळवला होता पण राघवची गोष्टच वेगळी होती. नाही म्हणाले तरी ती देखील त्याच्याकडे आकर्षित होत होती.आज त्यांचा कलीग असलेल्या पार्थोचा बर्थडे असल्याने त्याने एका हॉटेलमध्ये सगळ्या मित्र-मैत्रिणींना पार्टी दिली होती.राघवने हीच संधी योग्य समजली होती आणि शार्दूलीला प्रपोज करण्यासाठी सगळी तयारी केली होती. शार्दूली मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ होती. ती नेहमीप्रमाणे मस्त तयार होऊन लाईट मेकअप करून पार्टीत गेली. सगळे मित्र-मैत्रिणी एक-एक करून पार्टीत दाखल होत होते. राघव तर तिच्या आधीच पार्टीत आला होत.
त्याच्या मनात अनेक भावनांचा हलकल्लोळ माजला होता. एका बाजूला शार्दूली कशी रियाक्ट होईल याची उत्सुकता तर दुसऱ्या बाजूला ती काय उत्तर देईल म्हणून हुरहूर! तिने आपले प्रेम स्वीकारले नाही तर? हा प्रश्न देखील त्याला भेडसावत होता. जर त्याने विचार केला होता की शार्दूलीने त्याचे प्रेम नाही स्वीकारले तरी ती त्याची चांगली मैत्रीण म्हणून त्याच्या आयुष्यात कायम राहील. हा थोडं वाईट वाटेल, तिच्या नकाराचा त्रास देखील होईल पण प्रत्येकाला स्वतःचे मत आहे आणि नकार अधिकाराचे व्यक्तिस्वातंत्र्य देखील म्हणून तो आज तिला मनाचा हिय्या करून प्रपोज करण्याच्या तयारीत होता.सगळे एकमेकांशी बोलण्यात आणि ड्रिंक आणि स्टार्टर एन्जॉय करण्यात गर्क होते. थोड्याच वेळात पार्थोने केक कापला. सगळे गप्पा मारण्यात दंग होते आणि राघव पुढे आला.
राघव,“मला तुमच्यासमोर आज काही तरी सांगायचे आहे.(असं म्हणून तो शार्दूली जवळ गेला आणि तिचा हात धरून तिला पुढे आणले.) शार्दूली आय लव्ह यु! कॅन यु बी माय गर्लफ्रेंड?” तो गुडघ्यावर बसून तिच्यासमोर रिंग आणि लाल गुलाब घेऊन म्हणाला आणि सगळ्यांनी ओ म्हणून आरोळी ठोकली.
शार्दूलीला माहीत होतं की राघवला ती आवडते पण तो तिला असं प्रपोज करेल असे वाटले नव्हते. तिला देखील राघव आवडत होता पण तिला त्याला लगेच उत्तर द्यायचे नव्हते.तिला विचार करायला थोडा वेळ हवा होता.
शार्दूली,“ राघव मला या बाबत विचार करावा लागेल मग मी तुला उत्तर देईन.” ती म्हणाली.
राघव,“ठीक आहे टेक युवर टाईम!” तो म्हणाला.
सगळे जेवले आणि घरी निघून गेले. शार्दूली घरी पोहोचली. मनोमन ती आज खुश होती कारण राघव तिला देखील आवडत होताच.तितक्यात निधीचा म्हणजे तिच्या मम्माचा फोन तिला आला.
निधी,“ काय मॅडम कशी झाली पार्थोची बर्थडे पार्टी?” तिने विचारले.
शार्दूली,“ छान झाली. मम्मा गेस व्हॉट? राघवने मला आज प्रपोज केले.” ती आनंदाने म्हणाली.
निधी,“कोण राघव? तो राघव मूर्ती का? चांगला मुलगा आहे तो मी भेटले आहे की त्याला, बेंगलोरला आल्यावर! मग तू काय उत्तर दिले आणि शार्दु इफ आय एम नोट रॉन्ग तुला ही तो आवडतो ना?” तिने तिला विचारले.
शार्दूली,“ हो मम्मा तोच राघव मूर्ती आणि हो तो मला आवडतो गं! पण मी त्याला विचार करायला वेळ मागितला आहे. तुला काय वाटतं मम्मा?” तिने विचारले.
निधी,“राघव तसा चांगलाच मुलगा आहे आणि मला काय वाटतं यापेक्षा तुला काय वाटतं? हे महत्त्वाचे आहे बेटा! विचार कर तुझं मन काय सांगत याचा? तुला तो मनापासून आवडत असेल तर त्याला हो म्हणायला काहीच हरकत नाही. असं ही तू आता सेटल आहेस. मॅच्युअर आहेस तर रिलेशिनमध्ये पडायला आणि पुढे जाऊन लग्न करायला काहीच हरकत नाही.” ती म्हणाली.
शार्दूली,“ काय मम्मा तू पण इथं अजून कशात काय नाही आणि तू लग्नापर्यंत पोहोचलीस देखील!” ती हसून म्हणाली.
निधी,“ बरं बाई तुझं तू ठरवं काय ते!” ती ही हसून म्हणाली.
शार्दूलीला आज रात्र भर झोप लागली नाही. तिच्या मनात सतत राघवचा विचार येत होता आणि पोटात फुलपाखरे उडत होती.तिला आज राघव तिला नुसता आवडत नाही तर तिचं ही प्रेम राघव वर आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली. तिला सकाळ कधी होते आणि ती राघवला होकार कधी देते असे झाले होते. तिला तिने होकार दिल्यावर राघवच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद पहायचा होता.ती सकाळी लवकरच उठली. आज छान तयार झाली.तिने राघवला फोन करून ऑफिसच्या आधी ऑफिसपासून जवळच असलेल्या एका कॅफेमध्ये भेटायला बोलावले.
राघवला ही अंदाज आला होता की शार्दूलीने त्याला तिचे उत्तर सांगण्यासाठी बोलावले आहे पण उत्तर होकार असेल की नकार या विवंचनेत तो कॅफेमध्ये पोहोचला. शार्दूलीने राघवला पाहिले आणि त्याला मिठी मारली.
शार्दूली,“ आय एक अलसो लव्ह यु राघव!” ती त्याच्या कानात हळूच म्हणाली आणि राघवचा चेहरा खुलला.
शार्दूली आणि राघवचे प्रेम आता फुलत होते. विक एण्डला फिरायला जाणे. एकमेकांना चोरटे स्पर्श करणे. किस करणे हे सगळं सुरू झालं होतं आणि त्यात गैर काहीच नव्हतं कारण दोघांच्या ही घरी त्यांच्या नात्याबद्दल माहिती होत आणि कोणाचा ही त्याच्या नात्याला आक्षेप नव्हता. पण राघव अधिक जवळ आला की मात्र शार्दूली थोडी अस्वस्थ व्हायची. दोघांना ही एकमेकांची ओढ होती पण ते अजून तरी शारीरिक दृष्ट्या एकमेकांच्या खूप जवळ आले नव्हते.
शार्दूलीच्या मनात मात्र आता कुठे तरी खोल गाढला गेलेला. तिच्या शरीरा विषयीचा न्यूनगंड डोके वर काढू लागला होता.राघव जेंव्हा आपल्याला तसे पाहिल तेंव्हा तो कसा रियाक्ट होईल. त्याचा भ्रमनिरास तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न तिला आता सतावू लागले होते. इकडे मात्र राघव शार्दूलीशी एकरूप होण्यासाठी आसुसला होता.
असं ही लग्ना आधी हे सगळं आजकालच्या काळात अगदी नॉर्मल आहे हे दोघांना ही माहीत होते. राघवच शार्दूलीवर प्रेम होते आणि त्याला पुढे जाऊन तिच्याशी लग्न करायचे होते त्यामुळे त्याच्या शार्दूलीकडून अपेक्षा आता वाढत चालल्या होत्या. शार्दूलीला देखील राघवची ओढ होती पण ती मनातून तिच्या शारीरिक न्यूनगंडामुळे कचरत होती.पण लोण्याचा गोळा आगी जवळ ठेवल्यावर वितळणारच ना!
ज्या गोष्टीपासून शार्दूली पळत होती ती गोष्ट आज तिच्यासमोर उभी होती. आज ते असतच टू व्हीलरवरून संध्याकाळी विकेंड आहे म्हणून फिरायला गेले होते आणि अचानक पाऊस सुरू झाला. दोघे ही पावसात चिंब भिजले. शार्दूलीचा फ्लॅट तिथून जवळच असल्याने दोघे ही तिच्या फ्लॅटवर पोहोचले.भिजल्यामुळे शार्दूलीचे कपडे तिच्या अंगाला पूर्ण चिटकले होते. दोघांना ही थंडी वाजत होती आणि राघव मात्र तिला वेगळ्याच नजरेने पाहत होता. त्याची नजर तिला अस्वस्थ करत होती. ती त्याची नजर टाळण्यासाठी त्याला म्हणाली.
शार्दूली,“ तुला टॉवेल देते आणि डॅडचे कपडे आहेत ते ही देते तू जा बाथरूममध्ये गरम शॉवर घे आणि चेंज कर म्हणजे तुला बरं वाटेल. मी ही चेंज करून तोपर्यंत कॉफी आणते तुझ्यासाठी!” ती त्याला म्हणाली आणि वळणार तर राघवने तिचा हात धरला आणि तिच्या कानात म्हणाला.
राघव,“ यातल्या कशानेच मला बरं वाटणार नाही शार्दु! आय व्हॉन्ट यु!” तो कापऱ्या आवाजात म्हणाला आणि शार्दूली देखील स्वतःला रोखू शकली नाही.
दोघांनी ही बेडरूम गाठले. राघव तिला खुलवत होता आणि ती खुलत होती. हळूहळू कपड्याचे अडसर दूर झाले आणि शार्दूली त्याच्यासमोर टॉप लेस होती. राघवने तिला पाहिले आणि तिला हळूच हसून म्हणाला.
राघव,“ शार्दु यार तू मला खूप सेक्सी वाटायचीस पण तू तर पॅडेड ब्रा वापरतेस! बट यु नो आय लव्ह यु!”
असं म्हणून त्याने तिला मिठी मारली पण त्याच्या अशा शब्दांनी मात्र शार्दूलीच्या जुन्या जखमेची खपली निघाली. तिला वाटणारा तिच्या शरीराबद्दलचा न्यूनगंड आणि भीती सगळं सगळं एकदम ताज झालं. तिने राघवला ढकलले आणि ती रागाने बोलू लागली.
शार्दूली,“हो आहे माझ्यात कमी पण तुमच्यासारख्या मुलांना ना मुलींच फक्त शरीर हवं असतं राघव! तुम्हांला तिचं मन नाही दिसत. मला वाटले होते तू वेगळा असशील. मला समजून घेशील कमीत कमी तू तरी मला माझ्या शरीरावरून हिनवणार नाहीस पण नाही तू ही तसाच निघालास.” ती रडत रागाने बोलत होती.राघवला त्याची चूक लक्षात आली आणि तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन बोलू लागला.
राघव,“ आय एम सॉरी शार्दु, माझा तुला हिनवण्याचा उद्देश नव्हता. मी तुला दुखावले असेल तर सॉरी पण मी तुझ्या शरीरावर नाही तर मनावर खरं प्रेम केलं आहे. शरीर तर एक मध्यम आहे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचे. तू जशी आहेस तशी मला पसंत आहेस आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” तो तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता आणि शार्दूलीने त्याला झिडकारले.
शार्दूली,“ व्हॉट डू यु मीन जशी आहे तशी?राघव गेट आऊट फ्रॉम माय हाऊस! मला तुझं तोंड ही पहायचं नाही.” ती आणखीन चिडून म्हणाली.
राघव,“शार्दु अगं मी काय म्हणतोय ते एकदा नीट ऐकून तरी घे. ओके आपण तुझा राग शांत झाल्यावर बोलू.” तो म्हणाला आणि निघून गेला.
शार्दूली मात्र राघवच्या अशा बोलण्याने चांगलीच दुखावली गेली. राघव तिला सॉरी म्हणाला त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला हे तर तिच्या गावी देखील नव्हते. शार्दूलीने ऑफिसला मेल करून रजा काढली आणि ती मनोमन काही तरी ठरवून, पुण्याला तिच्या आईकडे निघून आली. तिने ना राघवचा फोन उचलला ना त्याच्या मेजेसजला उत्तर दिले. राघवला ही तो भावनेच्या भरात शार्दूलीला जे बोलला त्याचे वाईट वाटत होते. त्याला या विषयी शार्दूली इतकी सेन्सिटिव्ह असेल याची यत्किंचितही कल्पना नव्हती.
राघव ही तिच्या मागोमाग तिच्या घरी पुण्याला गेला. त्याने निधीला फोन करून त्याला शार्दूलीशी भेटायचे आहे असे सांगितले. निधीला वाटत होतं की शार्दूलीने राघवला माफ करावं कारण त्याच तिच्यावर मनापासून प्रेम होतं म्हणून तिने शार्दूलीच्या न कळत राघवला घरी बोलावून घेतले. राघव आला आणि निधी काही तरी काम काढून बाहेर पडली. इकडे राघवला पाहून शार्दूली प्रचंड चिडली.
शार्दूली,“ तू का आला आहेस राघव इथे?”
राघव,“ प्लिज यार शार्दूली आय एम व्हेरी व्हेरी सॉरी! मला माहित नव्हतं की तू किशोर वयापासून या बाबतीत खूप काही सहन केले आहे. मला निधी आंटीकडून सगळे कळले. माझा तुला हिनवण्याचा हेतू अजिबात नव्हता गं! मी भावनेच्या भरात बोललो ते! प्लिज मला एकदाच माफ कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.” तो डोळ्यात पाणी आणून बोलत होता.
शार्दूली,“ जी गोष्ट तू एकदा बोललास ती पुन्हा बोलणार नाहीस कशावरून राघव? आणि वर तू काय म्हणालास की मी जशी आहेस तशी तुला पसंत आहे. म्हणजे तू माझ्यावर प्रेम करून माझ्याशी लग्न करून उपकार करणार का?कोणाचे ही उपकार नको आहेत मला राघव!” ती रागानेच म्हणाली.
राघव,“प्रेमात उपकार कुठून आले गं? माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि तू आहेस तशी मला आवडतेस.” तो म्हणाला.
शार्दूली,“ राघव इट्स ओहर आता आपल्यात पुढे काही नाही होऊ शकत. मी ठरवले आहे मला काय करायचे आहे ते!” ती ठामपणे म्हणाली आणि निघून गेली.
तिने नोकरीचा राजीनामा दिला आणि पुण्यात परत आली कायमची. त्यानंतर देखील राघवने खूप प्रयत्न केले तिला समजावण्याचे पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. तिच्या आई-वडिलांनी देखील तिला खूप समजावले पण तिने कोणाचेच ऐकले नाही. तिचा निर्णय झाला होता. त्याच बरोबर तिने आणखीन एक निर्णय घेतला होता.
निधी,“ शार्दुली खरंच तुला हे करायचे आहे? अजून एकदा नीट विचार कर याचे वाईट परिणाम देखील तुझ्या शरीरावर होऊ शकतात. उगीच वेड्या सारखे निर्णय घेऊ नकोस!” त्या पोट तिडकीने तिला समजावत होत्या.
शार्दूली,“ माझा निर्णय झाला आहे मम्मा मी अजून हा न्यूनगंड आणि ही अवहेलना नाही सहन करू शकत. ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले त्याने देखील मला याच कारणावरून हिनवले. मी ब्रेस रिप्लान्ट सर्जरी करून घेणार आहे. सिलिकॉनच्या ब्रेस कायमच्या प्लांट करून घेणार म्हणजे मला कोणी ही हिणवू शकणार नाही.तू माझ्याबरोबर नाही आलीस तरी मी एकटी जाऊ शकते.” ती म्हणाली आणि निधीचा नाइलाज झाला.
शार्दूलीने सिलिकॉन ब्रेस्ट रिप्लान्ट करून घेतल्या. त्यामुळे तिच्या ब्रेस्टचा आकार वाढला. तिला बेंगलोरमधील मल्टिनॅशनल कंपनीत एक वर्षाचा अनुभव असल्याने पुण्यात तिला लगेच जॉब मिळाला. तिला वाटलं होतं की ब्रेस्ट रिप्लान्ट केल्यावर तिला आनंद मिळेल पण तिला तर सतत राघवची आठवण यायची त्याच्याबरोबर घालवलेले क्षण तिला आठवत राहायचे. तरी तिने स्वतःला सावरले होते. एक वर्ष कसं बसं गेले असेल आणि तिच्या रिप्लान्ट केलेल्या सिलिकॉन ब्रेस्टचा आकार बदलायला सुरुवात झाली आणि तिच्या ब्रेस्टस दुखू लागल्या. ती हॉस्पिटलमध्ये गेली तिच्यावर उपचार करण्यात आले त्याने थोडा आराम मिळाला पण हळूहळू वेदना वाढत गेल्या आता तर त्यातून पस यायला सुरुवात झाली. आता वेदनानांचे प्रमाण वाढू लागले. तिने डॉक्टर बदलला. डॉक्टरांनी तिचे चेकअप केले आणि सांगितले की सर्जरी चुकीची झाली आहे त्यामुळे हा त्रास होत आहे. आपल्याला दोन्ही उरोज पूर्णपणे काढून टाकावे लागतील नाही तर या सगळ्याच रूपांतर कॅन्सरमध्ये होईल.
डॉक्टरचे बोलणे ऐकून शार्दूली आणि निधीच्या पाया खालची जमीनच सरकली. दोन्ही ब्रेस्ट काढण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे शार्दूलीच्या दोन्ही ब्रेस्ट काढून टाकाव्या लागल्या. शार्दूलीला नैसर्गिक शरीरापेक्षा जास्त हवे होते आणि तो हव्यांस तिला नडला होता. शार्दूली आता पूर्ण डिप्रेशनमध्ये गेली. ती ऑफिसला ही जाईनाशी झाली. तिने स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेतले. राघव निधीला फोन करून अधेमध्ये शार्दूलीची विचारपूस करायचा आणि निधीकडून त्याला शार्दूलीची झालेली परवड कळली.
तो शार्दूलीला भेटायला आला. त्याला पाहून शार्दूली म्हणाली.
शार्दूली,“ माझी अवस्था काय झाली हेच पहायला आलास ना तू? बघ तुझ्या खऱ्या प्रेमाचा अपमान केला मी, स्वतःचा न्यूनगंड स्वतःपेक्षा मोठा केला. तुला नाकारले. स्वतःच्या निसर्गाने दिलेल्या सुंदर शरीराची हेळसांड केली. म्हणूनच मला ही शिक्षा मिळाली.” ती दोन्ही हातांनी तोंड लपवत रडू लागली. राघव तिच्याजवळ गेला आणि तिचे हात काढून तिचे डोळे पुसून बोलू लागला.
राघव,“ शार्दु या तुझ्या अवस्थेला तू एकटीच जबाबदार नाहीस. मी ही कुठे तरी या तुझ्या अवस्थेला जबाबदार आहे रादर आपल्या समाजाची मानसिकता आणि आपला समाज ही तुझ्या अवस्थेला जबाबदार आहे कारण आपल्या समाजाने स्त्री आणि पुरुषाच्या शरीराचे मापदंड ठरवून ठेवले आहेत. स्त्री असेल तर तिचे स्त्रीत्व तिच्या उरोजांवरून ठरवायचे. तिचे सेक्स अपील तिचे शरीर न्याहाळून ठरवायचे. जर एखाद्या स्त्रीमध्ये काही कमी असेल तर पुरुष काय पण स्त्रिया देखील तिला हिनवतात हे विरून की ती देखील आपल्यासारखीच स्त्री आहे.समाजाच्या याच मानसिकतेचा बळी तू ठरलीस.
खरं तर तू ही कुठे तरी चुकलीस. तुझ्यात असलेल्या कमतरतेचा तू बाऊ केलास. त्याचा न्यूनगंड बाळगून राहिलीस. स्वतः तू जशी आहेस तशी स्वतःला न स्वीकारता. मनातून कुढत राहिलीस. खरं तर तू खूप सुंदर होतीस रादर आहेस शार्दु!स्वतःला निसर्गाने जे दिले त्याचा आदर न करता. तू त्याचा अपमान केलास. जर तू वेळीच सावरली असतीस किंवा मला तुला सावरायची संधी दिली असतीस तर तुला इतका त्रास भोगावा लागला नसता. माझं देखील चुकलं मी तुला भावनेच्या भरात का असेना असे बोलायला नको होते. कदाचित म्हणूनच ब्रेस्ट रिप्लान्टचे पाऊस तू उचललेस आणि जे होतं ते ही गमावून बसलीस.मी तुझ्या शरीरावर कधीच प्रेम केले नव्हते मी तर प्रेम केले तुझ्यातल्या निरागस आणि प्रेमळ शार्दूलीवर जी खूप सुंदर आहे.आज ही माझं त्या शार्दूलीवर प्रेम आहे अगदी मनापासून जीवापाड! मला तुझ्यातल्या त्या सुंदर शार्दूली बरोबर जगायचे आहे. तिला या सगळ्यातून बाहेर काढून स्वतःकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन द्यायचा आहे. मला माफ करून एक संधी देशील पुन्हा त्याच सुंदर शार्दूलीवर प्रेम करण्याची? विल यु मॅरी मी?” त्याने तिच्या डोळ्यात पाहत तिचा हात धरून विचारले.
शार्दूली,“ आय एम सॉरी राघव मी तुझ्याशी खूप वाईट वागले. तुला स्वतःपासून तोडलं पण तुला विसरू शकले नाही. स्वतःचा न्यूनगंड मी स्वतःपेक्षा आणि आपल्या प्रेमापेक्षा ही मोठा केला. तू भावानेच्या भरात बोललास पण त्यानंतर खूप वेळ माफी मागितली पण मी इरेला पेटले. तुला नाकारले आणि मम्मा नको म्हणत असताना देखील ब्रेस्ट रिप्लान्टचा निर्णय घेतला कारण माझ्यात असलेला किशोर वयात असल्यापासूनचा न्यूनगंड! शेवटी निसर्गावर कुरघोडी करून मिळवलेली गोष्ट किती दिवस टिकणार? आणि व्हायचे तेच झाले. मी तर जास्त मिळवण्याच्या हव्यासा पोटी माझ्याकडे होते ते देखील गमावून बसले राघव. मी तुझा तुझ्या प्रेमाचा अपमान केला आहे. तुझा मोठेपणा आहे हा की तू पुन्हा माझ्याकडे आलास पण मी कोणत्या तोंडाने तुला हो म्हणू सांग ना? आता तर मी कोणाचीच बायको बनण्याच्या योग्यतेची राहिले नाही. तू जा राघव.” ती त्याचा हात सोडून रडत म्हणाली.
राघव,“ पुन्हा चुकत आहेस तू शार्दु! मी तुला कसे आणि कोणत्या शब्दांत पटवून देऊ की माझे तुझ्यावर प्रेम होते आणि आहे. मी जातो पण एक लक्षात ठेव तू नाहीस तर कोणीच नाही.” तो असं म्हणाला आणि निघून जाऊ लागला.
त्याचे बोलणे ऐकून शार्दूलीने त्याला पाठी मागून मिठी मारली.
आपण अनेकदा निसर्गाने दिलेल्या आपल्या शरीरा विषयी असंतुष्ट असतो. आपल्याला अगदी कथित आखीवरेखीव शरीर हवे असते.स्त्री सौंदर्याचे काही मापदंड समाजाने ठरवले आहेत. स्त्रिचे स्त्रीत्व आणि सौंदर्य समाजाचे हेच मापदंड ठरवत असतात. पण स्त्रीही नुसते शरीर नसून माणूस आहे आणि तिला निसर्गाने जे दिले ते समजाणे आणि मुख्य म्हणजे तिने स्वतः स्वीकारायला हवे. तिने आपण आहोत तसे स्वतःला स्वीकारून स्वतःवर प्रेम करावे. उगीच न त्या हव्यासापोटी निसर्गाच्या विरुद्ध गेलो तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात.
©स्वामिनी चौगुले
