मराठी लघुकथा तिचे घर कोणते?

 



  सुमेधा आणि सुनील तरुण दाम्पत्य होतं. त्यांना एक मुलगा विनीत  आणि एक मुलगी कविता अशी दोन अपत्ये आणि सुनीलची आई असे पाच जणांचे कुटुंब एका छोट्याशा शहरात राहत होते. सुनील  सरकारी  शाळेत शिपाई होता तर सुमेधा गृहिणी होती. तसे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते पण सुनीलला लॉटरी काढण्याचा नाद होता. तो पगार झाल्यावर पाच तरी लॉटरीची तिकिटे काढून आणायचा पण त्याला आजपर्यंत एक दमडा देखील लॉटरीमधून लागला नव्हती. त्याची ही सवय सुमेधाला आवडत नसायची त्यामुळे दोघांचे खटके उडायचे. आजही सुनीलचा पगार झाला आणि  पाच लॉटरीची तिकिटे खरेदी केली आणि उरलेला सगळा  पगार सुमेधाच्या हातावर आणून ठेवला.सुमेधाने पैसे मोजले आणि तिला कळले की सुनीलने पुन्हा लॉटरीची तिकिटे काढली असणार.


सुमेधा,“ पुन्हा तुम्ही लॉटरी काढली ना? इथं महिना अखेरीपर्यंत घर भागवे पर्यंत नाकीनऊ येतं आणि तुमची उधळपट्टी सुरूच आहे.” ती रागाने तणतणत होती.


सुनील,“ हो काढली मी लॉटरी! मी स्वतः कमावतो मग पन्नास शंभर रूपये स्वतःच्या मनाने खर्च केले तर बिघडलं कुठं? आणि मी उधळपट्टी करणारा असतो ना मग इतका सुखाचा संसार झाला नसता तुझा!” तो ही रागाने बोलत होता.


सुमेधा,“ पण तेच पन्नास शंभर रुपये महिन्याच्या शेवटी उपयोगी येतील ना! पण नाही तुम्हाला तर पटतच नाही त्या लॉटरीमधून आजपर्यंत एक छदाम तरी मिळाला आहे का तुम्हाला?” तिने विचारलं.


सुनील,“ हे असं तू दर वेळी पणवती लावतेस म्हणून मला लॉटरी लागत नाही.” 


सुमेधा,“ अग्गो बाई पाहताय ना आई मीच पणवती लावते म्हणे. मग असं करा. हा सगळा पगार तुम्हीच ठेवा आणि महिना भागवा.” ती पैसे त्याच्या हातावर ठेवत म्हणाली.


सुनील,“ कमवून आणायचं मी. दिवसभर राबायचं मी आणि वरून घरदार सगळं मीच बघू का?” तो चिडून म्हणाला. कारण त्याला माहित होतं की त्याच्या तुटपुंज्या पगारात सुमेधा ज्या निगुतीने घर चालवते तसे त्याला जमणार नाही.


सुमेधा,“ मग घरातली सगळी कामं मी करते ना. ते दिसत नाही वाटतं. ते काही नाही तुम्हीच घर चालवा.” तीही रागाने म्हणाली.


सुनील,“ सुमे उगीच माझं डोकं नको फिरवू तू. मला काही सांगायचं नाही.” तो चिडून म्हणाला 


सुमेधा,“ मलाही काही सांगायचं नाही. तुमचा संसार तुमचे घरदार तुम्ही पाहून घ्या माझं काम रांधून वाढणे आहे फक्त!” तीही इरेला पेटली होती.


. सुनील,“ अच्छा म्हणजे हे सगळं माझं आहे तर मग फक्त रांधून घालण्यासाठी तू कशाला हविस? निघ मग माझ्या घरातून.” तो रागाने ओरडला. 



   खरं तर त्याने ब्रम्हास्त्र काढले होते. त्याला माहित होतं की सुमेधा त्याला भांडणात ऐकत नाही म्हणून मग तो 

माझ्या घरातून जा असं म्हणायचा आणि सुमेधा मात्र गुपचूप तिच्या कामाला लागायची. दहा वर्षांची कविता मात्र अशी त्यांची भांडणं पहायची आणि तिला प्रश्न पडायचे. आजही ती ओसरीवर आजीबरोबर अभ्यास करत बसली होती. आणि आई- बाबांचे भांडण ऐकून तिने आजीला विचारलं.


कविता,“ बाबासारखं आईला जा माझं घर सोडून म्हणतात मग आईचं खरं घर कोणते आहे गं आजी?” तिने निरागसपणे विचारलं.


आजी,“ बाईचे खरं घर तिच्या नवऱ्याचे असते बेटा आणि हेच तुझ्या आईचे घर आहे. तुझा बाबा काय खरंच थोडीच तुझ्या आईला घराबाहेर काढणार आहे? भांडणात पुरुष काहीही बोलतात. ते काही खरं नसते. तू अजून खूप लहान आहेस मोठी झाली की कळेल तुला.” त्या तिला समजावत म्हणाल्या.


कविता,“ पण बाबांनी आईला असं बोलावेच का? आणि मग माझे घर कुठं आहे?” तिने विचारलं आणि मागून खेळायला गेलेल्या विनीतने तिचा प्रश्न ऐकला आणि तो म्हणाला.


विनीत,“ तुझ्या नवऱ्याच्या घरी.” 


कविता,“ नाही नवऱ्याचे घर म्हणजे माझे घर नाही बाबा पण आईचा नवरा आहे तरी ते आईला उठसूट माझ्या घरातून जा म्हणतात. हे पण माझे घर नाही. मी स्वतःचे घर बनवणार जिथून मला कोणी जा म्हणणार नाही.” ती तोंड वाकडं करत ठामपणे म्हणाली.


  त्या दिवसापासून  मात्र छोट्या कविताने तिच्या मालकीच्या घराचा ध्यासच घेतला. ती तिला खाऊसाठी आईने दिलेले पैसे एका मातीच्या गल्ल्यात साठवत असे आणि सगळ्यांना ती स्वतःच्या घरासाठी आत्तापासून  पैसे साचवत आहे असं सांगत असे. सुमेधा आणि सुनीलला वाटले लहान आहे काही दिवसांनी विसरून जाईल पण कविता मात्र स्वतःच्या घराचा ध्यास घेऊनच मोठी होत गेली. ती शिक्षणात हुशार होती. तिने बारावी सायन्स करून नर्सिंगचा चार वर्षांचा कोर्स केला. आणि सरकारी दवाखान्यात नोकरीला लागली. त्या दरम्यान विनीतने ही इंजिनिअरिंग केलं आणि त्याच लग्न देखील झालं. कविता नोकरीला लागली आणि तिलाही आता चांगली स्थळं सांगून यायला लागली. निवृत्त झालेल्या सुनीलला आणि सुमेधालाही कविताचे लग्न व्हावे आणि तिने तिच्या आयुष्यात सेटल व्हावे असे वाटत होते. कविता मात्र लग्नाला तयार होत नव्हती. कवितासाठी एका डॉक्टरचे स्थळ सांगून आले होते. मुलगा आणि घरदार चांगले होते. सुनील आणि सुमेधाला वाटत होते की या ठिकाणी कविताचे लग्न व्हावे म्हणून आज ती कामावरून आल्यावर दोघांनी विषय काढायचा ठरवले.कविता कामावरून आली. ती फ्रेश झाली आणि सुमेधाने आणलेला चहा घेत टि. व्ही पाहू लागली.


सुनील,“ कविता तुझ्याशी आम्हाला बोलायचं आहे.”


कविता,“ बोला ना बाबा.”


सुमेधा,“ तुझ्यासाठी स्थळ सांगून आले आहे. मुलगा डॉक्टर आहे शिवाय घरदार आणि माणसं देखील चांगली आहेत. आम्हाला वाटते की हे स्थळ हातचे घालवू नये. तू लग्नासाठी तयार हो आता.”


कविता,“ आई स्थळ कितीही चांगलं असू दे मी माझं स्वतःच हक्काचं घर घेतल्या शिवाय लग्न करणार नाही.” 


सुनील,“ कसला मूर्ख हट्ट आहे गं तुझा? आपल्या समाजात मुली वेगळं घर घेत नाहीत तिचं सासर म्हणजे तिच्या नवऱ्याचे घर म्हणजेच तिचे हक्काचे घर असते.” तो चिडून म्हणाला.


कविता,“ हो का? जर खरंच तसं असतं ना तर उठसूट तुम्ही आईला माझ्या घरातून जा असं म्हणाला नसता. माहेरीही भांडून आलेल्या मुलीला ठेवून घेत नाहीत. तिला दुसरीकडे जायला जागा नव्हती. म्हणून ती अपमान सहन करून इथेच राहिली. पण मी तसं करणार नाही. माझे स्वतःचे छोटे का असेना घर घेणार आणि जर माझा नवरा मला त्याच्या घरातून बाहेर हो म्हणाला तर मी माझ्या स्व कमाईच्या घरात राहणार. त्यालाही कळायला हवं की भांडण झाले आणि त्यात तो मला माझ्या घरातून जा असं म्हणाला तर माझ्याकडे माझे घर आहे जाऊन राहायला.” ती म्हणाली.


सुनील,“ सुमे समजावं तुझ्या पोरीला.” असं म्हणून ते निघून गेले.


    कविता मात्र तिच्या निर्णयावर ठाम राहिली. दोन वर्षे गेली आणि तिने थोडे पैसे जमवून आणि पगारावर लोन काढून दोन खोल्यांचे छोटेसे घर घेतले. त्यात तिने सगळ्या सोयीसुविधा करून घेतल्या. अगदी भांडी-गॅसपासून सगळा संसार उभा केला. सगळीकडे तिचे कौतुक होत होते कारण एका मुलीने स्व कष्टाने स्वतःचे घर घेणे खूप मोठी गोष्ट होती. नाही म्हणलं तरी सुनील आणि सुमेधाला ही लेकीचे कौतुक होतेच. कविताने वास्तुक शांतीचा छोटासा कार्यक्रम ठेवला. सुनील आणि सुमेधा पूजेला बसणार होते.  सगळे आदल्या दिवशी तयारी करायला  कविताच्या घरी गेले आणि बाहेर नेमप्लेट पाहून सुमेधा आणि तिची वहिनी अंकिता चकित झाल्या. बाहेर पाटी होती सौ.सुमेधा पाटील, सौ.अंकिता पाटील आणि कु.कविता पाटील.


अंकिता,“ ताई तुम्ही स्वतःच्या कष्टाने घर घेतले आहे हे; मग माझं नाव पाटीवर कशाला?” तिने विचारलं.


कविता,“ अगं वहिनी हे घर मी एकटीसाठी नाही घेतले तर आपल्या तिघींसाठी ही घातले आहे. आता जर दादा तुला किंवा आई बाबा तुला माझ्या घरातून निघून जा म्हणाले तर सरळ कपडे घेऊन इथं येऊन राहायचं आपल्या हक्काच्या घरात.” ती हसून म्हणाली.


सुमेधा,“ गुणाची गं माझी पोर!” असं म्हणून तिने कविताच्या अलाबला घेतल्या.


सुनील,“ विनू  ऐकलं ना रे! आता बायकोशी भांडताना शब्द जपून वापरावे लागणार आपल्याला.” ते हसून विनीतला पाहत म्हणाले.


विनीत,“ हो बाबा आता जमाना बदलत आहे मग आपल्याला सावध राहायला लागणार आहे. आणि या कविताचा नवरा जो कोणी होणार आहे त्याचे मात्र काही खरे नाही. त्याचे तर हिच्याशी भांडायचे सुद्धा वांदे होणार.” तो तिला चिडवत म्हणाला आणि सगळेच हसायला लागले.


खरं तर नवरा- बायकोच्या भांडणात बऱ्याच वेळा नवरा माझ्या घरातून चालती हो असं म्हणतो. तर माहेरचे लोक नवऱ्याचे घर म्हणजे तुझे घर आहे असं तिला लहानपणापासून शिकवतात. पण स्त्री मात्र तिचे अख्खे आयुष्य माझे घर कोणते? या संभ्रमात घालवते. आजकाल स्त्रिया सुशिक्षित झाल्या आहेत स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्यामुळं त्यांनी आयुष्य संभ्रमात न काढता स्वतःचे हक्काचे घर घ्यायला काहीच हरकत नाही कथेतील  कवितासारखं! बरोबर ना!


अशाच रंजक कथा वाचण्यासाठी लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला!

©swamini chougule







  





Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post