माडीवरची बाई भाग 68





    राघवेंद्र आठ दिवसांनी वाड्यावर परत आला होता.तो रात्री उशिरा घरी आल्यामुळे माडीवर कस्तुरीला भेटायला गेला नाही. दुसऱ्या दिवशी तो त्याचे आवरून बाहेर पडण्याआधी कस्तुरीकडे माडीवर गेला. कस्तुरी आतुरतेने त्याचीच वाट पाहत होती. राघवेंद्र खुर्चीवर जाऊन बसला. 


राघवेंद्र,“  मी दिवूनशान गेलूला अब्यास केला का नाय कस्तुरी बाई?” त्याने तिच्याकडे पाहत हसून विचारलं.


  कस्तुरी त्याच्यासमोर खाली वही आणि सिसपेन्सिल घेऊन बसली आणि त्याला A to j पर्यंतची सगळी अक्षर म्हणत काढून दाखवली नंतर 1 to 20 पर्यंत आकडे ही म्हणत काढून दाखवले. ते बघून राघवेंद्र खुश झाला त्याने उठून तिला उठवत जवळ ओढून घेतलं.


राघवेंद्र,“ आरं वा माजी कस्तुरी तर लय शाणी झाली की. त्वां तर आट दिसात समदा अब्यास केला की.” तो खुश होत म्हणाला.


कस्तुरी,“ व्हय मग मला बक्षीशी मिळल का जी आता?” त्याला पाहत तिने प्रश्नार्थक नजरेने विचारलं.


राघवेंद्र,“ कस्तुरा हतक्या वरसात त्वां मला काय बी मागतलं नाय आज मागतीयास काय पायजेल तुला सांग? मी दितु तुला. माज्या कस्तुराला काय पायजेल पाताळ, दागिना का अजूनशान काय?” त्याने विचारलं.


कस्तुरी,“ सरकार ती समदं म्या बिन मागता तुमी दिलं हाय जी. राती सांगती तवा समदी निजल्यावर जरा लवकर याल नव्हं?” तिने विचारलं.


राघवेंद्र,“  मी इतु राती.पर तुला काय पायजेल सांग की? लय दिस झालं तुला काय नाय घितलं.” त्याने तिचा हात धरून विचारलं.


कस्तुरी,“  राती मागती मला काय पायजेल ती. तुमी फकस्त लवकर या जी.” तिने त्याच्या टाके घातलेल्या हाताच्या तळव्यावर ओठ ठेवले आणि राघवेंद्र शहराला.


राघवेंद्र,“ कस्तुरा! काय झालं हाय तुला आज? लय येगळी वागतीयास.मी तुला असं सुडलू नस्तु पर दिस हाय राती येतू मी.” तो स्वतःचा हात तिच्या हातातून काढून घेत म्हणाला. त्याच्या आवाजात झालेला बदल कस्तुरीच्या लक्षात आला होता.


कस्तुरी,“ राती या जी म्या समदं सांगती. आता जावा जी येळ हुतुया तुमास्नी.” ती त्याच्यापासून दूर होत म्हणाली.


राघवेंद्र,“ कस्तुरा आता दिस लय जड जातूया बग मला.बरं जातू मी.” तो हसून म्हणाला.


कस्तुरी,“ जातू नाय इतु म्हणायाच जी आन राती मातूर लवकर या.आन उगा नगा लबाड बुलू तुमी. एकदाव वाड्या बाहीर पडलासा का तुमाला संवताच तर ध्यान अस्तया का? लोकांच्या  आडी- अडचणी आन त्यांचे प्रशन समदं सोडवत बसतायसा. माजं ध्यान बी इनार नाय आन म्हणं दिस जड जाईल. दिस कसा मावळल ते बी कळायाचं नाय तुमास्नी.” ती तोंड फुगवून म्हणाली.


राघवेंद्र,“ ध्यान यायला आदी इसराया लागतंया कस्तुरा आन मी एक येळ मला ईसरीन पर तुला नाय. इतु मी राती मग तुला दावतू; आज येगळाच रंग हाय माज्या मौनेचा.” तो मादक हसून म्हणाला.


कस्तुरी,“ जावा म्हणतीया नव्हं आता आन बोलण्यात तुमास्नी कोण हरवणार जी.” ती लटके रागावत म्हणाली आणि राघवेंद्र हसून निघून गेला.


   कस्तुरी म्हणाली तसेच झाले राघवेंद्रचा पूर्ण दिवस लोकांच्या समस्या ऐकून घेण्यात आणि सोडवण्यात गेला. सरकारकडून  मदत मिळत असेल तर ठीक नाही तर वेळ प्रसंगी तो पदर मोड करून लोकांच्या समस्या सोडवत होता. असंच त्यांच्या गावातील रामोशांच्या वस्तीत त्याच्या स्वतःच्या पैशातून प्रत्येक कुटुंबाला पक्क्या दोन खोल्या बांधून देण्याचे काम सुरू  होते. पंचवीस कुटुंब काही उघड्यावर तर काही कुडाच्या झोपडीत राहत होती. पावसाळ्यात तर त्यांचे नुसते हाल व्हायचे हे ओळखून राघवेंद्रने स्वखर्चातून त्यांना पक्क्या प्रत्येकी दोन खोल्या बांधून देण्याचे काम सुरू केले होते. रामोशी म्हणजे चोर- दरोडेखोर असे समजून त्यांना गावात कोणी काम देत नव्हंतं तर राघवेंद्रने त्याच्या शेतावर त्यांना काम देखील दिले होते. आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था गेल्या पाच वर्षांपासून केली होती. गावतल्या त्याच्याच शाळेत या रामोशी लोकांची मुले शिकत होती.  राघवेंद्र रामोशी वस्तीवर जाऊन बांधकाम कुठं पर्यंत झाले आहे अजून किती सामान लागणार आहे याची मोजदाद करून आला.


        संध्याकाळी पोरांबरोबर गप्पा झाल्या जेवणं झाली. पृथ्वी आणि सुगंधाचा नुसता दंगा सुरू होता. राघवेंद्र त्यांच्याशी बोलत होता पण त्याचे सगळे  लक्ष माडीवर होते. त्याला असं झालं होतं की कधी एकदा तो कस्तुरीकडे जातो पण त्याला सगळे झोपूपर्यंत  थांबावे लागणार होते. त्याने त्याच्या मनाला कसे बसे आवरले होते.


‛आज कस्तुरा  येगळीच वागत हुती. मला म्हंली का तिला बक्षिसी पायजेल पर काय पायजेल असल तिला? तिनं मला कंदी काय बी मागतलं नाय आन तिला सोस बी नाय पातळ आन दागिन्याचा. पर माडीवर गेल्या बगार बी कळायाचं नाय. पर समदी निजानीज व्हाया पायजेल नव्हं.’ तो विचारात मग्न होता आणि सुगंधाने त्याला हलवले आणि तो भानावर आला.


सुगंधा,“ आबा sss सांगा ना दाद्याला.” 


राघवेंद्र,“ अss काय सांगायाचं त्येला?” त्याने भानावर येत विचारलं.


सुगंधा,“ म्हणजे तुमचे लक्ष नव्हतं ना आमच्याकडं?” तिने तोंड फुगवून कमरेवर हात ठेवत विचारलं.


राघवेंद्र,“ तसं नाय गंधा.” तो गोंधळून म्हणाला आणि तिने मधुमालती आली.


मधुमालती,“ किती वाजले आहेत अजून तुम्ही इथेच का? चला झोपायला. बब्बू पळ आजीकडे आणि तू रे पृथ्वी इथं झोपणार की माडीवर?” तिने विचारलं.


पृथ्वी,“ मी आज आबा जवळ झोपणार.” 


सुगंधा,“ मग मी पण झोपणार आबा जवळ.” 


मधुमालती,“ बब्बू आजी एकटी असते की नाही मग त्यांच्या सोबत कोण झोपणार? असं करा तुम्ही दोघे इथे आबा जवळ झोपा मी जाते आत्यांकडे झोपायला.” ती समजावत म्हणाली.


सुगंधा,“ नको मी जाते आजीकडे.” 


पृथ्वी,“ मी पण जातो. आजी गोष्ट सांगते मस्त मस्त चल सुगंधा.” असं म्हणून दोघे पळून गेले.


राघवेंद्र,“ बरं झालं आलीस त्वां नाय तर आपल्या मौनेच्या तावडीत सापडलू हुतु मी. मला भांडाया उटलीच हुती ती.” तो हसून म्हणाला.


मधुमालती,“ म्हणजे सरकार घाबरतात म्हणायचं लेकीला.” ती ही हसून म्हणाली.


राघवेंद्र,“ घाबरायाच पायजेल कसली तिकाट काय ती. पर माजी गंधा लय हुशार हाय. पण भांडखोर बी, कुणावर गिली बरं? तिच्या आऊवरच गिली असलं कनाय.” तो डोळे मिचकावून म्हणाला.


मधुमालती,“ हो का? चला झोपायला आता.” ती हसून म्हणाली.

★★★


  मधुमालती झोपून गेली. राघवेंद्र सगळे झोपण्याची वाट पाहत होता. त्याने बाहेर चौकात  येऊन पाहिले. तर वाडा सगळा शांत झोपला होता. राघवेंद्र माडीवर गेला. कस्तुरी त्याची वाट पाहत जागीच होती. तिने दार उघडेच ठेवले होते. राघवेंद्र खोलीत गेला आणि दार लावून घेतले.


कस्तुरी,“ बरं झालं लवकर आलासा.” ती म्हणाली.


राघवेंद्र,“ काय करणार माज्या कस्तुरा बाईंनी सांगलं हुतं नव्हं.” तो खाटावर बसत तिला जवळ ओढत म्हणाला.


कस्तुरी,“ मला तुमच्या संगट बोलायाचं हाय जी.” 


राघवेंद्र,“ ते नंतार दिस भर दम कसा काडला हाय मला म्हैत त्वां आंदि हकडं यी की.” तो तिला मिठी मारत म्हणाला आणि कस्तुरी अलगद त्याच्या मिठीत शिरली.


    बऱ्याच वेळाने राघवेंद्रचा आवेग ओसरला आणि कस्तुरी त्याच्या मिठीत विसावली.


कस्तुरी,“ आता बुलू?” 


राघवेंद्र,“ हुंम.”


कस्तुरी,“ ही हाताला काय झालं हुतं जी टाकं घातल्याच्या खुणा हायत्या सरकार तळव्यावर.” तिने त्याचा हात हातात घेऊन विचारलं.


राघवेंद्र,“ लागलं हुतं काय तर. किती येळा सांगटलं हाय तुला.”


कस्तुरी,“ लबाड बोलायाचं नाय सरकार. हतकं वरीस झालं तुमी सांगतलं नाय. म्या बायसाबास्नी इचारल आन त्यांनी सांगतल मला समदं. म्या दिलीली अत्तराची कुपी फुटली म्हणूनशान तुमी ती हाताला लावून घितली. किती मुटी जकम झाली हुती. आन काय तुमी पीरिमाची निशाणी कुरली अशी? संवताला तरास करूनशान, टाकं घालाया लागलं ते बी सुदित असताना किती दुकलं असलं तुमास्नी? किती तरास झाला असलं? तीन मास तुमास्नी तरास झाला पाच दिस ताप आला. काय गरज हुती असली पिरिमाची अघोरी निशाणी कुरूनशान घ्यायची? तुमास्नी काय झालं असतं म्हंजी? का वागलासा तुमी सरकार असं?” ती रडत पण रागाने त्याला विचारत होती.


राघवेंद्र,“ अगं पर मला बी कळलं नाय मी ती कुपी हातात कवा आवळली आन आता त्येला किती वरीस हून गिल्याती. जकम कवाच भरली की. त्वां असं वागणार म्हणूनशान मी सांगतलं नव्हतं. आन कस्तुरा काय गरज हुती म्हंजी? त्वां दिलेली एकच वस्तू हुती माज्याकडं तुजी आटवन आन ती बी फुटली मंग मला तुजी निशाणी पायजेल हुती म्हणूनशान ….” तो पुढे बोलणार तर कस्तुरीने त्याचे बोलणे मध्येच तोडले.


कस्तुरी,“ म्हणूनशान तुमी असं वागणार व्हय. म्या काय मिली नवती.तसल्या हजार अत्तराच्या कुप्या घिवूनशान दिल्या असत्या म्या. का करतायसा माज्या सारक्या अडाणी बाय वर इवड पिरिम सरकार? का संवताला हिवडा तरास करूनशान घितला. तवा बी ती नसबंदी करूनशान घिवनगा म्हणलं तर माजं काय बी ऐकलं नाय घितला संवताला तरास करून. का सरकार काय हाय माज्यात? तुमाला माज्यावानी  पन्नास बाया मिळत्याल्या की.” ती रडत बोलत होती.


राघवेंद्र,“ बास लय बुलतीयास कस्तुरा. उगा मी ऐकूनशान घितुया म्हणूनशान. आन त्वां एकच हाईस पन्नास बायांच मी काय करू? मी जातू. ” तो रागाने म्हणाला उठायला लागला.


कस्तुरी,“ कुटं निगालासा?माजं बुलून पुरं नाय झालं आजूनशान.” ती त्याला दरडावत म्हणाली.


राघवेंद्र,“ दम द्याया लागलीस की मला.” तो आश्चर्याने म्हणाला.


कस्तुरी,“ व्हय मग हाक हाय माजा तुमच्यावर आन मला बक्षिसी कोण देणार हिवडा अब्यास किला त्येची?” तिने त्याला मिठी मारून त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं.


राघवेंद्र,“ व्हय का आता मला भांडुनशान झाल्यावर तुला बक्षिसी बी पायजेल व्हय? कस्तुरी त्वां माज्या साटनं काय हाईस मला सांगता बी नाय यायाचं. त्वा माजा आत्मा हाईस. आन तुज्यात काय हाय असं म्हणूनशान ईचारतीस? माजं तुज्यावर इवडं पिरिम हाय का तुला मी सांगू बी नाय शकत. आन सांगा आता माज्या कस्तुरी बाईला काय पायजेल?”  तो तिच्या डोळ्यात पाहून विचारत होता.



  कस्तुरी राघवेंद्रकडे बक्षीस म्हणून काय मागणार होती?

©स्वामिनी चौगुले


   कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग 67



















Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

2 Comments

  1. यापुढचे भाग कुठे वाचायला मिळतील ? 69 पासून पुढे काहीच दिसत नाहीयेत. 5 ऑगस्ट नंतर पुढचे भाग पोस्ट नाही केलेत का?

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post