माडीवरची बाई भाग 17

 




    राघवेंद्र दिवसभर विचार करत राहिला. संध्याकाळ झाली राधक्का आणि सुभानराव दिवाणखान्यात बसले होते. तोपर्यंत शेतावरून महेंद्रप्रतापराव आले. ते हातपाय तोंड धुवून आले आणि त्यांनी हळूच सुभानरावांना विचारलं.


महेंद्रप्रताप,“ काय म्हणाला राघव अण्णा?” 


सुभानराव,“ थांब वाईस. इल खाली त्यो आन त्यो काय बी बोलला तरी त्वां गप बसायाच.” ते म्हणाले.


महेंद्रप्रताप,“ असं कसं म्हणतायसा अण्णा तुमी? त्यो मालू संगट लगीन कराया नाय म्हणला तर बी म्या गप बसू?” त्यांनी विचारलं.


सुभानराव,“ पर त्यो मालू संग लगीन कराया नाय म्हणायचा नाय पर बाकी काय बाय बडबडला तर त्येला काय बी उत्तार द्यायचं नाय महिंद्रा नाय तर जमून आलेला मामला फिस्काटल.” ते त्यांना समजावत होते.


महेंद्रप्रताप,“ असं व्हय. मगं त्यो मालू संग लगीन कराया व्हय म्हणला की मगं काय बी बडबडू द्या की म्या नाय बोलायचो काय.” ते बोलत होते तोपर्यंत राघवेंद्र आला. तो येऊन सोफ्यावर बसला.


सुभानराव,“ मंग काय फैसला केला त्वां? मालु संग लगीन करणार का नाय?” त्यांनी सरळ विचारून टाकले.


राघवेंद्र,“ मी लगीन कराया तयार हाय पर तात्याच्या धमकीला भिवूनशान नाय तर हरणी साटनं माज्यामुळं तिला तरास हुवू नाय म्हणूनशान आन रमी साटनं माज्यामुळं तिचं नुकसान व्हायला नगं म्हणून पर अण्णा मी आज पासनं तात्या संग बोलणं टाकलं.” तो गंभीरपणे म्हणाला आणि कोणी काय बोलेल याची वाट न पाहता निघून गेला.


महेंद्रप्रताप,“ शांत शांत म्हनूत हुतो आपून याला बघितलंसा का कसा राग हाय ते? पर त्यो राग दुसऱ्यावर कमी आन संवतावर जादा काडून घेतूया  पोरगा अण्णा! आता किती दिस संवताला तरास करून घिल देव जाणं. मला नाय बोलणार म्हणतुया. त्याच्या भल्या साटनं मला मंजूर हाय.  बगू किती दिस बस्तुया रुसून?” ते बोलत होते.


सुभानराव,“ पर मालू संग लगीन कराया तयार झाला नव्हं. त्ये महित्वाचं. उंद्या तांबड फुटाया निगा तुमी.”


राधक्का,“ व्हय पर राघवची काळजी वाटतिया त्यो नीट जेवणा झाला हाय.” ती काळजीने म्हणाली.


सुभानराव,“ म्या हाय नव्हं म्या घितो त्येची काळजी.” ते तिला समजावत म्हणाले.


   दुसऱ्या दिवशी पहाटे महेंद्रप्रताप आणि राधक्का भावकी आणि गावकीची तीस लोकं घेऊन रेल्वेने साताऱ्यात पोहोचले. त्यांना पोहचायला दुपार उलटून गेली होती. जयसिंगरावांनी आणि सावित्रीबाईने सगळी जय्यत तयारी करून ठेवली होती. साताऱ्यात देसायांचा जहागिरदारां इतका मोठा वाडा नसला तरी दोन मजली प्रशस्त वाडा होता. साताऱ्यात त्यांची दीडशे एकर शेती होती आणि लाकडी दारे-खिडक्या बनवण्याचा कारखाना होता. जहागिरदारां इतकी श्रीमंती नसली तरी देखील त्यांची एकूण परिस्थिती उत्तमच होती. जयसिंगरावांनी सगळ्यांचे हसत मुखाने स्वागत केले. सावित्रीबाई सगळ्या बायकांना आत घेऊन गेल्या तर पुरुष मंडळी सोफ्यात बसली. सगळ्यांना गुळपाणी आन खायला देण्यात आले.


     मधुमालती स्वयंपाक घरात होती. तिने राधक्काला आणि बाकी बायकांना वाकून नमस्कार केला.


मदनची आई,“ राधक्का सून अक्षी धाकल्या सरकारास्नी  साजेशी  साजिरी हाय बगा. आन शिकली बी हाय म्हणं पंदरावी! जोडा शोबतूया.” 


दुसरी एक बाई,“ व्हय तर मंग राधक्काला हुडकाया जावं लागलं नाय बाहीर सून; घरातच नक्षत्र गावलं नव्हं.” ती हसून म्हणाली.


राधक्का,“ व्हय बायानु ते मातूर खरं हाय. मालू त्वां आन ईमला  तयार हु बाजारात जावूनशान येऊ. मामंजीनी तुला पातळ घ्याया सांगितलं हाय ते बी जरतारी. आन बाकी बायांना बी.”


सावित्री,“ ही काय उलटी रीत दिवाणसाब आवं अमी घ्यायाची समद्यास्नी कापडं आमी मानपान करायचा अस्तुया.” ती म्हणाली.


राधक्का,“ ते मला बी म्हैत हाय वहिनी पर नात सुनवर आजे सासऱ्यांचा जीव हाय आन सुपारीचं पातळ घ्यायाचंच अस्तया. आन तुमास्नी आन इमलाला बी घे म्हणूनशान सांगतलं हाय त्येंनी.” ती म्हणाली.



   संध्याकाळी बैठक बसली. 


जयसिंगराव,“ बोला काय अपेक्षा हायत्या तुमच्या? आन मानपान आन बाकी अजून काय?” त्यांनी विचारलं.


महेंद्रप्रताप,“ तुमी फकस्त नारळ आन मुलगी द्या तरी अमास्नी चाललं. आन आपलीच समदी तवा काय मानपान जयसिंगराव?” ते म्हणाले.


जयसिंगराव,“ह्यो तुमचा मोटेपणा झाला दाजी. पर जग रीत करावीच लागलं नव्हं आन एकुलती एक लेक हाय माजी तवा म्या समदी हाऊस करणार हाय. म्या पंचाहत्तर तोळं सोनं घालतु लेकीला.आन राघवरावास्नी सोन साकळी, अंगटी आन सोन्याच कडं. पोशाख पाच घितु आन कन्यादान मातूर आमी आमच्या दारात करणार बगा. मला माहित हाय ते समदं कमीच हाय तुमी रमीला शंभर तोळ्या पक्षा ज्यादा घातलं हाय सोनं आन जावई बापूस्नी बी तीस तोळं घातलं. पर माजी ऐपत हाय तिवडं म्या करतो जी आन समद्याचा मानपान बी करतु.” ते हात जोडून म्हणाले.


महेंद्रप्रताप,“ असं काय परक्यागत बोलतायसा जयसिंगराव. आवं तुमी जे बी कराल त्यात अमी राजी हाय. तुमची नक्षत्रावानी आन शिकलिली पोरगी तुमी देतायसा अमास्नी अजून काय मगायाचं. आमच्या समद्या तालुक्यात मालू इवड शिकलेली पोरगी घावायची नाय की. पर लगीन आमच्या दारात हुद्या की आवं समदी पंचकृषि हतं साताऱ्यात कशी घिऊन यायची?”


जयसिंगराव,“ तुमी या की किती बी माणसं घिवून पर दाजी कन्यादान आमच्या दारात व्हावं अशी लय इच्छा हाय जी आमची.” ते पुन्हा म्हणाले.


मदनचे अप्पा,“ म्या काय म्हणतू थोरलं सरकार आपून आपला गाव लगनाला घिवून येवू. हजार भर माणसं हुत्याल गावाची बाकी तुमच्या भणी आन नातेवाईक तर येणारच की आन पूजेला बोलवा की पंच कृषिला त्येत काय हाय ईवड.” ते समजावत म्हणाले. 


महेंद्रप्रताप,“ असं म्हणतायसा आप्पा मंग हुदे तुमच्या मना सारकं जयसिंगराव.” ते म्हणाले.


मदनचे अप्पा,“ मंग फोडा सुपारी जयसिंगराव तुमीच की धाकल्या सरकारांचं मामा आन लगीनाची तिथं आन म्हूतूर बी कडून घिवू लगोलग.


   दोन महिन्यानंतरची लग्नाची तारीख ठरली आणि पुन्हा एकदा जहागिरदारांच्या वाड्यात लग्नाची लगबग सुरू झाली. सगळे खुश होते पण राघवेंद्रला सोडून. तो अनिच्छेनेच लग्नाला तयार झाला होता. त्याच्या मनात मात्र हरणी घर करून बसली होती. मदन केंव्हाच गावात परत आला होता पण राघवेंद्र त्याला भेटत नव्हता. जणू राघवेंद्रने त्यांच्यावर ही राग धरला होता. 


   शेवटी मदन राघवेंद्र जीप घेऊन कुठं तरी निघाला होता त्याच्या जीपसमोर येऊन उभा राहिला.राघवेंद्र चिडला.


राघवेंद्र,“ मरायचं हाय व्हय रं तुला?”


मदन,“ नाय पर त्वां भेटत न्हाईस, मला बगूनशान वाट बदलतुस म्हणूनशान देवाचं नाव घिऊन आलू समुर.” तो म्हणाला.


राघवेंद्र,“ मगं आता तसाच जा.”


मदन,“ ऐक की रं राघव मला बोलायाच हाय तुज्या संग. तुला लय काय काय सांगायाचं हाय.” तो बारीक तोंड करून म्हणाला आणि राघवेंद्र त्याच ऐकून घ्यायला तयार झाला.


राघवेंद्र,“ बस जीप मदी शांत जागा बगूनशान बोलू.” तो म्हणाला आणि मदन जीपमध्ये बसला.


   राघवेंद्रने एक निवांत जागा पाहिली. तिथेच एका गर्द झाडाच्या सावलीत  जाऊन उभे राहिले.


मदन,“ किती दिस झालं तुला भेटाया बगतुया पर मला बगूनशान पळून का जातूस रे?”त्याने विचारलं.


हे ही वाचा👇


राघवेंद्र,“ गपस मला जवा तुजी गरज हुती तवा कुटं कडमडला हुतास त्वां? मी एकलाच हरणीला भेटाया गेलु आन तात्यानी पकडला मला. मला धमकावल मला मधुमालती संग लगीन कराया भाग पाडलं. नाय तर हरणीला मारुतु म्हणलं. तुला तर तुज्या अप्पा कडनं समदं म्हैत झालं असलं नव्हं त्या दिशी त्वां आला असता तर मामला इवडा बिगडाला असता का?” तो रागाने तणतणत होता.


मदन,“ धाकलं सरकार मामला त्या दिशी नाय तर त्येच्या आदीच बिगडाला हुता! फकस्त तुमास्नी म्हैत नाय. म्या मनानी नव्हतु गेलू तर तुमच्या तात्यांनी मला अन अप्पाला धमकावून दहा बारा दिस गायब व्हायला लावलं हुतं.म्हणुशान आमचं अप्पा घाबरून मला घेऊन गायब झालं हुतं इवडच नाय तर रंग्याच्या टुळीतला एक माणूस आमच्यावर नजर ठिवाया धाडला हुता.” तो सांगत होता.


राघवेंद्र,“ काय? आरं पर त्यास्नी समदं कसं समजलं?”त्याने आश्चर्याने विचारलं.


मदन,“ ते काय मला म्हैत नाय पर त्यांनी मला तुमच्या  शेतावरच्या घरी उचलून अनाया लावलं हुतं. अप्पा बी घाबरून माज्या बरुबर आलं. त्यांनी मला इचारल हरणी आन तुज्याबद्दल मला जीवाची धमकी बी दिली पर म्या सांगितलं त्यास्नी माजा जीव घ्या पर म्या काय सांगत नस्तू. म्या  मैतराबरुबर  गद्दारी करीत नसतू. मगं मला अप्पाला सांगूनशान गायब व्हाया लावलं. जहागीरदार चांगलं तेवडं वंगाळ हायती बाबा. त्वां लगीन कराया तयार झाला ते लय बरं केलं नाय तर हकनाक त्या हरणीचा जीव गेला असता राघव.” तो बोलत होता आणि राघवेंद्रने त्याला मिठी मारली.


राघवेंद्र,“ तुज्यावानी मैतर भेटाया नशीब लागतं मद्या.” तो कारत आवाजात म्हणाला.


मदन,“ बरं असू दे असू दे त्वां नगं रडू आता.” तो नाटकीपणे म्हणाला आणि राघवेंद्रने हसून त्याला एक फटका दिला.


      राघवेंद्र मन मारून लग्नाला तर तयार झाला होता पण बायको म्हणून तो मधुमालतीचा मनापासून स्वीकार करेल काय? 

©स्वामिनी चौगुले


कथेचा या आधीचा भाग खालील लिंकवर👇
माडीवरची बाई भाग 16

अशाच मनोवेधक कथा वाचण्यासाठी लाईक आणि फॉलो करा आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post