माडीवरची बाई भाग 66




   आज आठ दिवस होऊन गेले होते राघवेंद्र वाड्यात होता पण तो माडीवर कस्तुरीकडे मात्र गेला नव्हता. ना दिवसा तिचा अभ्यास बघायला आणि घ्यायला; ना रात्री! आठ दिवस झाले कस्तुरीला त्याचे दर्शन दुरून फक्त खिडकीतून तो वाड्यातुन बाहेर पडताना आणि वाड्यात येताना होत होते. ते ही त्याचे लक्ष वर खिडकीत उभ्या असणाऱ्या कस्तुरीकडे गेले की तो तोंड फिरवून घेत होता. कस्तुरी मात्र आता त्याच्याशी बोलायला त्याच्या मिठीत शिरायला आसुसलेली होती.


आज ही सकाळी राघवेंद्र वाड्यातून बाहेर कामासाठी निघाला होता आणि मदनचा आवाज ऐकून कस्तुरी खिडकीत आली. राघवेंद्र वाड्यातून बाहेर आला आणि जीपकडे जाऊ लागला. कस्तुरी त्याला पाहत होती त्याचे लक्ष तिच्याकडं गेलं आणि त्याने तोंड फिरवून घेतले तो जाऊन जीपमध्ये बसला आणि जीप दिसेनाशी झाली. 


‛ का जी सरकार असं वागतायसा माज्या बरुबर म्या नाय ऱ्हाव शकत तुमच्या बगार तुमास्नी बी म्हैत हाय हे. पर कशा पाय अशी सजा देतायसा मला. मला वाटीत हुतं तुमी दोन तीन दिसानी याला राती तवा तुमचा रुसवा कडनं म्या. पण आज आट दिस झालं तुमी आला नायसा. आता मलाच काय तर कराया पायजेल.’


   दिवस कसाबसा गेला कस्तुरीचा; ती संध्याकाळच्या वेळी कानात प्राण आणून राघवेंद्रच्या जीपच्या आवाजाची वाट पाहत होती. आणि दिवस मावळायला तिला त्याच्या जीपचा आवाज आला. तशी ती खिडकीत गेली. राघवेंद्र आला होता. चौकात खेळणारी पोरं आबा आबा करून त्याच्याकडे पळाली. 


सुगंधा,“ आबा मला फेरी पायजेल जीपमधून.” ती लाडात येत म्हणाली.


राघवेंद्र,“ तुला एकलीलाच का? पृथ्वीला बी पायजेल का नाय?” त्याने विचारलं.


पृथ्वी,“ हो मला पण.” तो म्हणाला.


राघवेंद्र,“ मदन सुगंधा बायसाब आन पृथ्वीसाबच ऐकाया पायजेल बाबा. तुमी दोगं जा. मी घरात जातू.” तो म्हणाला आणि दोघं जाऊन जीपमध्ये बसली.


मदन,“ चला फेरी मारू पोरांनू.” तो म्हणाला आणि जीप सुरू केली.


 

     राघवेंद्र वाड्यात गेला आणि तो सरळ परस दारात आला. कस्तुरीला राघवेंद्रच्या सवयी सुपरिचित होत्या. तिला माहीत होते राघवेंद्र बाहेरून घरी आला की तो आधी परसदारात येऊन हात-पाय-तोंड धुतो. त्यामुळे कस्तुरी धावत मागच्या पायऱ्यांकडे गेली आणि मागच्या जिन्याच्या  शेवटच्या पायरीवर जाऊन उभी राहिली. राघवेंद्रने तिच्याकडं साफ दुर्लक्ष केलं आणि पिंपातुन पाणी घेऊन तो हात-पाय धु लागला. मधुमालती नेहमीप्रमाणे तिथे पंचा घेऊन आली.


  कस्तुरी पदराला चाळा करत उभी होती आणि ती भरल्या आवाजात बोलू लागली.


कस्तुरी,“ सरकार म्या तयार हाय गोऱ्यांची भाषा शिकाया.” 


   राघवेंद्रने तिच्याकडे एकदा वळून पाहिलं पण तो काहीच बोलला नाही. कस्तुरीने मधुमालतीला डोळ्यांनी खुणावलं. 


मधुमालती,“ अहो कस्तुरी काय म्हणतेय?” 


राघवेंद्र,“ ऐकलंया मी. आन त्यो पंचा.” तो म्हणाला आणि पंचा घेऊन निघून गेला.


कस्तुरी,“ आता अजूनशान किती दिस राग धरणार जी सरकार माज्यावर बाईसाब? म्या तयार झाली नव्हं गोऱ्यांची भाषा शिकाया.” ती डोळे पुसत म्हणाली.


मधुमालती,“ ते तर हट्टी आहेतच पण तुही काही कमी नाहीस कस्तुरी हे सांगायला तू आठ दिवस लावलेस. आणि काळजी करू नकोस मनात राग असला तरी तुला इंग्रजी शिकवायला तर ते नक्की माडीवर येतील मग बोल त्यांच्याशी.” ती म्हणाली.


कस्तुरी,“ चुकी झाली माजी जी. पर तुमी समजावा की बाईसाब त्यास्नी.” ती रडत बोलत होती.


मधुमालती,“ या आधीच मी समजावून झालं आहे कस्तुरी पण तुम्ही दोघेही हट्ट सोडायला तयार नव्हता तर मी काय करणार. आता येतील ते तू नको रडू; जा पोरं अभ्यासाला येतील.” ती म्हणाली.


कस्तुरी,“ जी.” ती म्हणाली आणि गेली.

★★★★


     रात्री सगळी निजानीज झाल्यावर राघवेंद्र माडीवर गेला. कस्तुरीने दार उघडलं. तो नेहमीप्रमाणे खाटवर जाऊन बसला नाही. उभाच राहिला. 


कस्तुरी,“ सरकार म्या गोऱ्यांची भाषा शिकाया तयार हाय जी.” ती खाली मान घालून म्हणाली.


राघवेंद्र,“बरं. मी उंद्या सकाळच्या पारी येतू शिकवाया तवर त्वां आदीचा अब्यास करूनशान ठिव.” तो गंभीरपणे म्हणाला आणि निघाला देखील. कस्तुरीने त्याचा हात धरला.


कस्तुरी,“ सरकार लगीच जनार तुमी? असं काय करतायसा जी. मला माफी करा. माजं चुकलं पर म्या तयार झाली नव्हं आता गोऱ्यांची भाषा शिकाया मग राग सोडा की.” ती रडत बोलत होती.


राघवेंद्र,“ त्वां शिकाया तयार झाली म्या शिकवाया तयार हाय झालं की आन म्या हतं थांबाया कोण हाय मी तुजा? मी तर फकस्त जहागीरदार हाय आन समदी जहागिरी माजी हाय. तुजा कोण काय मी? जातू मी.” तो रागाने म्हणाला आणि  हात सोडवून निघाला. कस्तुरी त्याच्या पुढे गेली आणि  तिने त्याचे पाय धरले.


कस्तुरी,“ असं नगा बुलू जी सरकार. माजं चुकलंया. माफी करा जी मला पर तुमी असं बुलू नगासा. मला म्हैत हाय म्या तुमास्नी दुकावलंया. एकदाव मला माफी करा म्या पुण्यांदा असं वागायाची आन बोलायाची नाय. तुमी माजं समदं काय हायसा जी.तुमच्या पायात माजा स्वरग हाय सरकार. तुमीच असं किलं तर म्या कोणाच्या तोंडाकडं बगायाचं जी.” ती त्याचे पाय धरून रडत बोलत होती. राघवेंद्रने तिला उठवलं.


राघवेंद्र,“ त्वां आंदि उट कस्तुरा. आन रडणं थांबीव आंदि.” 


कस्तुरी,“ माफी करा ना जी सरकार मला.” ती त्याच्याकडे पाहत त्याचा हात धरून हुंदके देत बोलत होती.


राघवेंद्र,“ कस्तुरा तुला म्हैत हाय का त्वां माजी कोण हाईस., त्वां माजा आत्मा हाईस.आन माजं समदं माज्या संगट तुजं हाय, माजं लय पिरिम हाय तुज्यावर. आन त्वां म्हणलीस का मी जहागीरदार आन जहागिरी माजी हाय. म्हंजी त्वां मला तुडतीयास व्हाय संवता पसनं? मग मी कसा बुलू तुज्या संग त्वां सांग मला?” तो खाटावर बसत तिच्याकडं रोखून पाहत म्हणाला.


कस्तुरी,“ न्हाय जी नाय. म्या रागात बुलून गिलू जी. सरकार तुमी हाय तर म्या हाय आन तुमी नायसा तर ही कस्तुरी नाय. तुमास्नी म्या तुडलं तर म्या ऱ्हाईल का जी? आन मला म्हैत हाय तुमचं लय पिरिम हाय माज्यावर आन माजं बि हाय जी तुमच्यावर पिरिम. म्या पुण्यांदा नाय बुलायाची असं. आन तुमी म्हणतायसा ती समदं शिकीन म्या. तुमाला म्हैत नाय ही आट दिस म्या कसं काडलं हायती ते.” ती पदराने स्वतःचे डोळे पुसत म्हणाली.


राघवेंद्र,“ मी बी लय मुस्कीलीनं हे दिस कडलं हायती कस्तुरा. पर त्वां बी लय हट्टी हाईस बग.” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि कस्तुरीने त्याला  मिठी मारली.


दोघांमधला वीस-बावीस दिवसांचा दुरावा आज संपला होता.दोघे एकमेकांनामध्ये रत होत होते आणि राघवेंद्रने कस्तुरीचा ताबा घेतला होता. बऱ्याच वेळाने कस्तुरी राघवेंद्रच्या बलदंड बाहुपाशात होती. राघवेंद्र तिच्या गालावरून हात फिरवत होता आणि पुन्हा कस्तुरीचे लक्ष त्याच्या तळ हातावरच्या टाक्यांवर गेले.


कस्तुरी,“ सरकार काय लागलं हुतं तुमच्या हाताला? का हतकं टाकं घालाया लागलं. तुमी मला भेटाया इत हुता तवा काय बी नव्हतं. म्या किती दिस झालं तुमास्नी इचारतीया जी.” ती त्याचा हात हातात घेऊन विचारत होती.


राघवेंद्र,“ लागलं हुतं काय तर. तुला लय प्रश्न पडत्याती बग.” तो तोंड फुगवून म्हणाला.


‛ किती वरीस झालं म्या ईचारतीया पर सांगत नायती मला. म्या बायसाबस्नीच ईचारती.’ ती मनात विचार करत होती आणि राघवेंद्रने तिला पुन्हा जवळ ओढलं.


   थोड्या वेळाने कस्तुरी झोपून गेली. पण राघवेंद्र जागाच होता. त्याच्या मिठीत बिनधास्त झोपलेल्या कस्तुरीला पाहून तो विचार करत होता.


‛ मला म्हैत हाय कस्तुरी त्वां मन मारून इंग्रजी शिकाया तयार झाली हाईस फकस्त माज्या साटनं तुजं मन नाय लागत अब्यासात आता.मला बी तुज्यापसनं असं लांब राहूनशान तुला असं तरास दिवून तुला शिकाया तयार करायाचं नव्हतं पर कस्तुरी तुमाला कुणाला म्हैत नाय आन मी सांगू बी शकत नाय कुणाला. कारण तुमी समदी भ्याल. पर मला संकेत मिळायला लागल्याती माज्या जवळ लय दिस नायती. मला तुमास्नी सुडूनशान जावं लागणार हाय. म्हणूनशान हा अट्टाहास. मी केल्यावर मधू एकटी पडलं तिला पोरं, जहागिरी, शाळा, राजकारण समदं सांभाळायला जमायाच नाय. आन माज्या नंतार त्वां तिचा आन ती तुजा आदार असलं. त्वां समदं शिकलीस तर त्वां तिला मदत करशील. मला दिसतंया नव्हं माजी ही भाबडी कस्तुरी उंद्या ही समदी जहागिरी बगणार हाय. मधु शाळा आन राजकारण बगल. मधूची मला काय बी काळजी नाय ती शिकली सवरी हाय पर त्वां तुला समदं शिकाया पायजेल उंद्या तुज्या अडाणीपणाचा फायदा घिवूनशान तुला कुणी फशीवलं तर? म्हणूनशान मला तुला समदं शिकवायाचं हाय. माजी कस्तुरी उंद्या माडीवरली बाईसाब हुनार हाय. पर मी नसलं तवा. मला नाय म्हैत मला कवा आन कसं बोलावनं येणार हाय पर येणार हाय हे मातूर खरं हाय.ह्या दोन तीन वरसात मी नसणार हाय ही मातूर खरं हाय. म्हणूनशान हे समदं करतुया मी.’ तो विचार करत होता आणि कस्तुरी जागी झाली.


कस्तुरी,“ काय झालं जी सरकार तुमी जागं का जी आजूनशान?” तिने त्याला पाहत विचारलं.


राघवेंद्र,“ काय नाय झोतुयाच की. कस्तुरा एक इचारु का?” 


कस्तुरी,“ इचरा की जी.” 


राघवेंद्र,“ तुला माजा राग आला असलं नव्हं? पर मी तुला इंग्रजी आन बाकी समदं शिकाया साटनं हतका आटापिटा का करतुया ते तुला आता नाय कळायाचं पर एक दिस कळलं बग आन मग त्वां म्हणशील का सारकांनी मला समदं शिकीवलं ते लय बेस केलं.” तो तिच्या डोळ्यात पाहत बोलत होता.


कस्तुरी,“ सरकार मला तुमचा कंदी बी राग यायचा नाय जी. तुमी माजं देव हायसा. माजं समदं काय तुमीच हायसा जी. म्या सपनात बी इचार किला नव्हता तिवडं सुक तुमी मला दिलं. माजं बी चुकलं नव्हं म्या तुमास्नी दुकवलं. आन बगू पुडं कंदी तुमच्या शिकिवन्याचा उपयुग हुतुया ते. उगा उंद्याचा इचार नगा करू जी. आन झुपा आता.” ती हसून त्याला बिलगत म्हणाली.


राघवेंद्र,“ उंद्याचा इचार तर करावा लागतुया कस्तुरा. माजी कस्तुरा अशी माज्या मिठीत असल्यावर  इचार करून येळ वाया घालवायचा नस्तुया.” तो हसून म्हणाला.


कस्तुरी,“ तुमी बी कनाय सरकार.” ती लाजून म्हणाली.


     राघवेंद्र कस्तुरीला सगळं शिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होता कारण त्याला काही तरी संकेत मिळाला होता आणि त्यानुसार तो जास्त दिवस जगणार नाही हे स्पष्ट होते. मधुमालती या सगळ्यात एकटी पडू नये आणि कस्तुरीने पुढे जाऊन तिला सगळं सांभाळण्यात मदत करावी हा त्यामागचा उद्देश मात्र अजून तरी कोणाला माहीत नव्हता. 


पुढे काय घडणार होते? खरंच राघवेंद्र मरणार होता का?

क्रमशः 

©स्वामिनी चौगुले


 कथेचा मागील भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग 65







Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post