दुसऱ्या दिवशी मधुमालतीने न्याहरीच्या वेळी साताऱ्याला जायचा विषय काढला. सगळेच न्यारी करत होते.
मधुमालती,“ आत्या मी चार दिवस साताऱ्याला जाऊन यावे म्हणत होते. मध्ये दादाचे पत्र पण आलं होतं की आईला आणि वहिनीला पोरांची आठवण येतेय. त्यांना भेटायचं आहे दोघांना. मी जाऊ का? यांचे ही काम आहे तिथं मी जाऊन चार दिवसात येईन माघारी.”
राधक्का,“ जा की मग त्येत ईचारायाचं काय हाय मला? जा मस आट दिस ऱ्हावुनशान या की ततं. काय वं बरुबर बुलतुया ना म्या?” तिने महेंद्रप्रतापरावांकडे पाहत विचारलं.
महेंद्रप्रतापराव,“ व्हय तर मालू तुला म्हाइरला जायाला ईचाराव लागतंया व्हय अमास्नी? त्वां आमची सून हाईस पर त्या परास ज्यादा राधाची भाची आन माज्या साटनं पोरगी हाईस. जा की आट दिस रावूनशान यी.” ते म्हणाले.
मधुमालती,“ तसं नाही मामंजी पण तुम्हाला विचारायला हवंच की.”
राधक्का,“ बरं पर पृथ्वी त्येच्या माऊला सुडूनशान ऱ्हाईल का? बग बया.”ती सुभानरावांच्या ताटात बसून खाणाऱ्या पृथ्वीकडं पाहत म्हणाली.
मधुमालती,“ नाही राहिला तर यांच्याबरोबर पाठवून देते हे येणार आहेत दोन दिवसात माघारी.”
महेंद्रप्रतापराव,“ आमच्या घरात समदं येगळंच हाय ही पोरगी सक्या आईकडं डुकून बी बगत नाय. हिला निस्ती मालू पायजेल आन पोरगं ते आईजवळ ऱ्हात नाय त्येला कस्तुरी पायजे.पर लय झाक हाय बग हे. मालू तुज्यावानी सून मिळाया नशीब लागतंया. त्वां नुस्ती कस्तुरीला नाय तर तिच्या पोरीला बी आपलं मानलिस बग. लय मोटं मन लागतंया पोरी ही समदं कराया.” ते कौतुकाने बोलत होते.
राधक्का,“ व्हय तर. मालू गेल्या जलमाच काय तर देणं लागत असलं बगा जी कस्तुरीच.” ती म्हणाली.
मधुमालती,“ मी इतकं ही काही मोठं केलं नाही. उलट तिनेच मला इतकी सुंदर मुलगी दिली आणि ही माझी आहे हो ना बब्बू?” ती सुगंधाला भरवत बोलत होती आणि सुगंधा खुदकन हसली.
सुभानराव,“ पर महिंद्रा आन राधक्का पुण्यानदा ह्यो इशन बोलायाचा नाय. गडी असत्याती वाड्यात उगा इशाची परीक्सा नगु हाय सुगंधा मालूची पोरगी हाय हे ध्यानात ठिवा.” ते जरा दाटवत म्हणाले.
महेंद्रप्रतापराव,“ व्हय. ह्यो इशय पुण्यांदा नगु.”
राघवेंद्र,“ बरुबर हाय अण्णा तुमचं. बरं मधू समदी कापडं भारूनशान ठिव उंद्या तांबडं फुटाया निगु.” तो म्हणाला.
मधुमालती,“ हो मी करते तयारी.”
★★★
दुसऱ्या दिवशी राघवेंद्र, मदन आणि कुटुंबाला घेऊन साताऱ्याला गेला. ते दुपारपर्यंत तिथे पोहोचले. सावित्री, विमल आणि बाकी सगळे त्यांना पाहून खुश झाले. जेवण वगैरे झाले.
मधुमालती,“ अप्पा महाबळेश्वर जवळच्या जंगलात एका बाबांचे आश्रम आहे ते असतात ना तिथे अजून?” तिने जयसिंगरावांना विचारलं.
जयसिंगराव,“ असत्यात म्हणं पण तू का विचारत हाईस मालू?”
मधुमालती,“ मला त्यांना भेटायचं आहे.”
सावित्री,“ अगं येडी का खुळी तू? भर जंगलात त्यांचा आश्रम हाय आन ते कुणाला बी भेटत न्हाईती म्हणं आन लय कुणी आगळीकी किली तर शाप देत्याती. तुला कशा पाय भेटायचं हाय त्यास्नी. आन मी नाय जाऊ द्यायची त्यांच्याकडं तुला. उगा चार दिस ऱ्हा आन गप तुज्या घरी जा.” त्या सुगंधा खेळवत बोलत होत्या.
मधुमालती,“ माझं आहे काही तरी काम त्यांच्याकडं. जर ते नाही भेटायला तयार झाले तर मी निघून येईल. अप्पा मला जायचं आहे त्यांच्याकडं.” ती हट्ट करत बोलत होती.
जयसिंगराव,“ उगा गप बस मालू राघव तू तरी समजाव की हिला.”
राघवेंद्र,“ मामा हिनं माज्याकडून आंदीच शबूद घितला हाय का मी तिला ततं घिवूनशान जाईन म्हणूनशान. तुमी नगा काळजी करू मी घिवून जातू.फकस्त कुणाला तर पाटवा जंगलाची म्हैती असणाऱ्याला आमच्या बरुबर.” तो म्हणाला.
सावित्री,“ तुमी लय डोस्क्यावर बसवूनशान घितली हाय हिला. आता तुमीच जाणार म्हणल्यावर अमी काय बोलायचं जी?” ती तक्रारीच्या सुरात म्हणाली.
जयसिंगराव,“ व्हय तर. राघव तू मालूला लय लाडावली हाय बग.” ते हसून म्हणाले.
मधुमालती,“ मी जातेच इथून.” ती लाजून म्हणाली.
जयसिंगराव,“ अगं बस की कुटं जातीस? आणि राघव कुणाला कशाला न्यायला पायजेल मी येतू की मी चार-पाच वर्षा मगं एका मित्रा बरुबर गेलो होतो. त्याला पाऱ्याच शिवलिंग पायजेल होतं.पर त्या बाबांनी आमला हलवून दिलं. मला तितला रस्ता आन आश्रम समदं म्हैत हाय उंद्या लवकर निगु.” ते म्हणाले आणि मधुमालतीचा चेहरा खुलला.
★★★★
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राघवेंद्र, मधुमालती आणि जयसिंगराव तयार झाले. ते घरातून बाहेर पडणार तर दारात राघवेंद्रच्या पक्षाचे काही कार्यकर्ते दारात त्यालाच भेटायला येताना राघवेंद्रला दिसले. तो त्यांच्याजवळ गेला. राघवेंद्र आणि कार्यकर्त्यांमध्ये काही तरी बोलणे झाले आणि राघवेंद्रचा चेहरा गंभीर झाला. तो मधुमालती आणि जयसिंगरावांजवळ आला.
राघवेंद्र,“ मधू आज जयाला जमायाच नाय बग. त्ये हतलं आमदार वारलं हायती. त्योच सांगावा घिवूनशान ही लोकं आली हायती. आज सांच्याला बैटक हुती आन मी इनार हाय हे म्हैत हुतं नव्हं म्हणूनशान लगोलग आले हायती हे मला तकडं जाया पायजेल. अपुन उंद्या जाऊ.” तो बोलत होता.
जयसिंगराव,“ आरं असं घरातून बाहीर निघून परत फिरनं बरुबर नाय. मी घिवून जातू मालूला त्वां जा मयतीला.” ते म्हणाले.
राघवेंद्र,“ पर तुमी दुगंच कसं जाणार मामा? असं करा मदूला घिवूनशान जावा तुमी.”
मधुमालती,“ बरं. आम्ही जातो मदन भाऊजींना घेऊन. तुम्ही निघा.” ती म्हणाली.
राघवेंद्र त्या कार्यकर्त्यांबरोबर निघून गेला. मदन,जयसिंगराव आणि मधुमालती जीप घेऊन महाबळेश्वरच्या दिशेने निघाले.दीड तासानंतर पक्का रस्ता जाऊन गाडी कच्च्या रस्त्याला लागली. जयसिंगराव रस्ता दाखवत होते आणि मदन गाडी चालवत होता. थोड्याच वेळात घनदाट जंगल दिसू लागलं. सगळीकडे नुसती झाडं आणि झुडपं. आता जीप पुढे जाणे अशक्य होतं.
जयसिंगराव,“ इथंन पंदरा इस मैल आत चालत जावं लागतंया मालू बारकी पायवाट हात जायला. मदन ही घी कुराड,मी कोयता घेतो. वाटत जनावरं बी हायती. मालू हात धर माझा आन चल.” ते म्हणाले.
तिघे एका छोट्या वाटेवरून निघाले. जसजसे आत जाईल तसे जंगल आणखीनच घनदाट होत होते. सकाळची वेळ होती तरी कुठे थोडा अंधार तर कुठे कवडस्यासारखा सूर्यप्रकाश दिसत होता. मोठाली झाडे त्यात उंबर, जांभूळ, कडुलिंब, चिंच, वगैरे झाले आणि त्यांच्या आश्रयाला वाढलेल्या भल्यामोठ्या वेली त्या जंगलाची घनता वाढवत होत्या. झाडावर चि- चि आवाज करत या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारी वानरे, मधूनच वेगवेगळ्या पक्षाचे आवाज यामुळे शांतता भंग होत होती.मधूनच एखादा सांबराचा कळप धावत जाताना दिसत होता. कुठे पाण्याचा छोटासा झरा तर कुठे छोट तळे देखील नजरेस पडत होते. एका झाडाच्या फांदीवर बऱ्याच आतल्या बाजूला एक बिबट्या निवांत पहुडलेला देखील त्यांच्या नजरेतून सुटला नव्हता. आता पायवाट देखील चिंचोळी होत गेली होती कारण सगळीकडे जंगली गावाताचे साम्राज्य पसरले होते. त्यातून वाट काढत मधुमालती जयसिंगरावांचा हात धरून पुढे तर मदन मागे चालत होता. दोघांच्या हातात संरक्षणासाठी हत्यार होते. तिघे जवळजवळ दोन तास चालत होते.मधुमालती आता चांगलीच दमली होती.
मधुमालती,“ अप्पा अजून किती लांब आहे आश्रम?” तिने पदराने घाम पुसत विचारलं.
जयसिंगराव,“ झालं पोरी अजून एक दोन फर्लांगभर.” ते म्हणाले.
पुढच्या अर्ध्या तासात त्यांना कुडाची एक झोपडी दिसली. झोपडी कुडाची होती आणि पानांनी ती शेकरलेली दिसत होती. आजूबाजूला शेणाने सारवलेली जमीन आणि छोटी मोठी फुलझाडे होती. बाकी सगळीकडे घनदाट जंगल आणि त्याच्या मधोमध मानवी वस्तीची साक्ष देणारी ती छोटीशी झोपडी. तिघांची नजर त्या साधू बाबांना शोधत होती. तोपर्यंत जंगलातून साधारण साठी ओलांडलेला, डोक्यावर खांद्याच्या खालीपर्यंत रुळणारे पांढरे केस,पांढरी शुभ्र दाढी, उभट चेहरा,गोरा रंग, कपाळावर गंध,तरतरीत नाक,तीक्ष्ण नजर, चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे तेज विलसत होते. सहा फूट उंची आणि अंगावर भगवी कफनी घातलेले एक साधू हातात हरणाचे एक पाडस घेऊन येताना दिसले.
त्या साधू बाबांनी तिघांना त्यांच्या तीक्ष्ण नजरेने एकदा न्याहाळले. त्यांची नजर इतकी तीक्ष्ण होती की ते आरपार पोहचत आहे असं वाटत होते. त्यांनी क्रोधानेच विचारलं.
साधू बाबा,“ इथं कशाला आला आहात तुम्ही मरायला?”
जयसिंगराव,“ बाबा ही माझी मुलगी मालू हिला तुम्हाला भेटायचं होतं जी.” ते हात जोडून नम्रपणे म्हणाले.
साधू बाबा,“ जयसिंगा पूर्ण नाव सांगत जा हिचं; ही सौभाग्यवती मधुमालती राघवेंद्रप्रताप जहागीरदार आहे. हा तिचा मानलेला भाऊ आणि हिच्या नवऱ्याचा जिवलग मित्र मदन वानी आणि तू आधी पण येऊन गेला आहेस इथं. तुला माहीत आहे ना मी कोणाला भेटत नाही. मग पुन्हा का आलास तू इथं? का जीव वर आला आहे तुझा?” ते पुन्हा रागाने बोलत होते. आणि मधुमालती आणि मदन आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते.
मधुमालती,“ मीच हट्टाने घेऊन आले आहे त्यांना इथं बाबा. मला तुमच्याशी बोलायचं आहे मी हात जोडते एकदा ऐकून तरी घ्या माझं.” ती नम्रपणे हात जोडून म्हणाली.साधू बाबांनी तिला नखशिखांत न्याहाळले आणि त्यांचा क्रोध जरा कमी झालेला त्यांच्या चेहऱ्यावर दिसला.
साधू बाबा,“ माझ्याशी बोलायचंय? बरं बोल.” ते नाटकीपणे हसून म्हणाले आणि त्यांनी हातातले हरणाचे पाडस जमिनीवर सोडून दिले.
मधुमालती,“ मी ऐकलं आहे की तुम्हाला पाऱ्याचे शिवलिंग करण्याची सिद्धी प्राप्त आहे आणि मला ते शिवलिंग हवे आहे. माझ्या सखीसाठी ती शिवभक्त आहे…” ती पुढे बोलणार तर साधू बाबा रागाने तिच्यावर ओरडले.
साधू बाबा,“ खोटं बोलू नकोस ती तुझी सखी नाही तर सवत आहे. तिने तुला भजन शिकवले म्हणजे ती तुझी गुरू आहे आणि तुला तिला गुरू दक्षिणा म्हणून पारद शिवलिंग द्यायचे आहे बरोबर?” त्यांनी तिला रोखून पाहत विचारलं.
मधुमालती,“ हो म्हणजे तुम्हाला तर सगळंच माहीत आहे की मग मी काय अजून वेगळं सांगू. तुम्ही सगळं जानता.” असं म्हणून तिने त्या साधू बाबांचे पाय धरले.
साधू बाबा,“ उठ मी तुझीच वाट इतकी वर्षे झालं पाहत होतो. तुम्ही दोघे तिथे माठ आहे त्यातले पाणी प्या आणि इथंच अंगणात बसा. मला हिच्याशी एकांतात बोलायचं आहे. आम्ही कुटीत आहोत.
जयसिंगराव,“ जी बाबा.” ते हात जोडून म्हणाले आणि साधू बाबा मधुमालतीला डोळ्यांनीच खुणावून आत घेऊन गेले.
मधुमालती कुटी न्याहळत होती.कुटी शेणाने सारवलेली होती. एका बाजूला छोटासा चिखलमातीचा चौकोनी कट्टा होता त्यावर एक कळ्यापाषाचे घोटीव शिवलिंग पुजलेले होते. एका मातीच्या पणतीचा दिवा तेवत होता. एका बाजूला चूल आणि काही मातीची भांडी, कमंडलू, एका दोरीवर एक भगवी कफनी लोंबत होती. तर एका ठिकाणी घोंगडी होती. ती त्या बाबांनी अंथरली.
साधू बाबा,“ मधूमालती बैस.” ते म्हणाले आणि ती भानावर आली आणि जाऊन घोंगडीवर बसली.
मधुमालती,“ तुम्ही माझी वाट पाहत होता म्हणालाय म्हणजे मी येणार आहे हे तुम्हाला माहित होते का?” तिने थोडं दबकत विचारलं.
साधू बाबा,“ हो.” ते हसून म्हणाले.
मधुमालती,“ मग तुम्ही मला पारद शिवलिंग द्याल ना?” तिने आशाळभूतपणे विचारलं.
साधू बाबा,“ हो मी एकशे साठ वर्षे झालं तुझीच वाट पाहत आहे पोरी. मला दोनच पारद शिवलिंग बनवण्याची आज्ञा होती एक मी साठ वर्षांपूर्वी बनवून दिले आहे आणि आता तुझ्या सवतीला कस्तुरीला तुझ्या करवी बनवून द्यायचे आहे. कस्तुरी तिचे नाव आधी हरणी होते. अद्भुद सौंदर्य आणि सुगंध आणि सात्विक मूर्ती आणि नि:सीम शिवभक्त! तू तिच्या आणि राघवेंद्रप्रतापच्या सानिध्यात आली ते तुझ्या अनेक जन्माच्या पुण्याईमुळे.” ते शांतपणे बोलत होते.
मधुमालती,“ म्हणजे मी समजले नाही बाबा?”
साधू बाबा,“ कस्तुरी आणि राघवेंद्रप्रताप ही या ऐहिक जगातली त्यांची नावे. खरं तर त्यांना ना नावाची गरज ना शरीराची! दिसतात दोन पण आहेत एक. लहान मुलं जसं भातुलकीचा खेळ पुन्हा पुन्हा मांडून तो मोडतात त्या प्रमाणे ते इहलोकी जन्म घेतात. एकमेकांसाठी आणि जनकल्याणासाठी.” ते बोलत होते.
मधुमालती,“ मग असे असेल तर माझे लग्न यांच्याशी का झाले? मला त्यांच्या पत्नीचा मान मिळाला आणि कस्तुरी ती त्यांच्यासाठी पत्नी असली तरी जगासाठी ती त्यांनी ठेवलेली बाई आहे असं का बाबा?” तिने आश्चर्याने विचारलं.
साधू बाबा,“ पोरी जगाशी त्यांना काय देणे-घेणे? त्यांचे नाते या जगाच्या पलीकडले आहे. इथल्या कोणत्याच नात्याची किंवा नात्याच्या शिक्क्याची त्यांना गरज काय? तुला आणि बाकी तुझ्या घरात सगळ्यांना असं वाटतं की तू कस्तुरीच काही देणं लागतेस म्हणून ती तुझ्या सुखात वाटेकरी झाली आहे पण तसं नाही कस्तुरी तुझं देणं लागते म्हणून तिने तुझ्याबरोबर तिचा अर्धा आत्मा म्हणजे राघवेंद्रप्रतापला वाटून घेतलं आहे.तिने तुला मोठ्या मनाने त्याच्या धर्मपत्नीचा मान दिला आहे. तुझी पुण्याई थोर आहे पोरी तू त्याची पत्नी आहेस.आणि कस्तुरीच्या सानिध्यात तू आली आहेस. मी तिच्याचसाठी इतकी वर्षे इथं थांबलो आहे एकदा तिचे शिवलिंग बनवून दिले की माझी इहलोकीची यात्रा मी संपवेन.
पण पोरी तू मात्र सावध हो. इथून पुढचा काळ तुमच्यासाठी खूप खडतर असणार आहे. जहागीरदार घराण्याच्या पूर्व पुण्याईने राघवेंद्रप्रतापने या घराण्यात जन्म घेतला आणि कस्तुरी त्याच्या पाठोपाठ जहागिरदारांच्यात आली. पण आपण ज्या घराण्यात जन्म घेतो त्या घराण्याच्या कर्मांशी आपण बांधले जातो आणि राघवेंद्रप्रताव देखील त्याला अपवाद असणार नाही.प्रारब्ध खूप कठोर परीक्षा घेणार आहे तुमची. पुढचा दहा अकरा वर्षाचा काळ बरा असेल पण आता जहागीरदार घराण्याच्या पापांची फळं त्यांना भोगावी लागणार आहेत आणि त्यातून या तुमची पिढी आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्या ही सुटणार नाहीत.” ते शांतपणे बोलत होते.
मधुमालती,“ म्हणजे? या पापांची शिक्षा पृथ्वी आणि सुगंधाला ही भोगावी लागेल का?” तिने काळजीने विचारलं
साधू बाबा,“ शक्यतो नाही कारण सुगंधा कस्तुरीची मुलगी आहे आणि ती परक्या घरी जाणार त्यामुळे तिला हे कर्मबंधन असणार नाही. आणि पृथ्वी तो खूप चलाख आहे बरं का! त्याच्या आत्म्याने कस्तुरीतील दिव्यत्व ओळखले आहे आणि तो तिच्या दुधाची अमृतधार चाखत आहे त्यामुळे त्याच्यावर पडणारा प्रभाव कमी झाला आहे. पण तुमच्या सगळ्यांचेच आयुष्य एका तपानंतर खूप खडतर होईल तुम्हाला दुःखाच्या आगीत होरपळावे लागेल. आणि पृथ्वीची येणारी पिढी मात्र या पापांतून सुटणार नाही.
एवढंच काय कस्तुरी गेल्यावर तुमचा जहागीरदार वाडा राहण्या लायक राहणार नाही. तुझ्याकडं एकदा तिला थोपवण्याची शक्ती आहे पण दुसऱ्या वेळी जाताना तू तुझ्या पृथ्वीला तिच्याकडून वचन घ्यायला सांग तिने त्याच्या पोटी जन्म घ्यावा म्हणून. तिच्या मनात स्वतःच्या मुलीपेक्षा पृथ्वीसाठी प्रचंड ममत्व आहे आणि पुढे त्याची मुलगी होऊन ती आणि राघवेंद्रप्रताप दोघे पुढच्या जन्मी जहागीरदारांच्या घराण्याचा उद्धार करू शकतात. कारण हृदयाचा एक तुकडा म्हणजे कस्तुरी आहे आणि दुसरा तुकडा म्हणजे राघवेंद्रप्रताप आहे एक तुकडा दुसऱ्याला आकर्षित करणारच. तू ती जाताना तिच्याकडून पृथ्वीला वचन घ्यायला लाव कारण पृथ्वीमध्ये तिचा जीव गुंतला आहे. आणि सावध राहा तुला एकदा कस्तुरीला थोपवून धरावे लागणार आहे. हे देखील लक्षात ठेव. आणि साताऱ्यात एक वाडा बांधायला घे कारण जे काही जहागीरदार वाड्यात आहे ते कस्तुरीनंतर बाहेर येणार आणि जहागीरदार घराण्याचा नाश करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून तू त्याच्या परिघाच्या बाहेर ये.
पुढे गरज लागल्यास माझी जागा माझा शिष्य घेईल तो तुला इथेच भेटेल.” ते शांतपणे सांगत होते.
मधुमालती,“ पण जर हे आणि कस्तुरी असामान्य आहेत तर ते पुढे होणारा अनर्थ टाळू शकत नाहीत का?” तिने विचारलं.
साधू बाबा,“ पोरी प्रारब्ध कोणाला ही चुकलेलं नाही. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या कर्मबंधनात अडकला आहे. तुझा नवरा राघवेंद्रप्रताप त्याला पुढे काय घडणार आहे हे आधीच कळले आहे कारण तो असामान्य आहे पण त्याला काही विचारण्याची चूक तू करू नकोस कारण सगळं माहीत असून देखील त्याला सहदेवासारखा शाप आहे.सर्व जाणून देखील गप्प राहणे त्याला क्रमप्राप्त आहे.म्हणून तर नियतीने खेळ खेळला आणि त्याला माझ्यापर्यंत येऊ दिलं नाही कारण ज्याला सर्वच माहीत आहे त्याला मी काय सांगणार? मला हे काही शतकाचे आयुष्य आणि या सिद्धी खडतर तपातून प्राप्त झाल्या आहेत पण तो मात्र स्वयंसिद्ध आहे. ईश्वराचा अंश आहे सूर्याला मी काय उजेड दाखवणार?
असो मी तीन दिवसात पारद शिवलिंग तयार करेन. तू चौथ्या दिवशी ते घेऊन जा. पण मी जे -जे तुला सांगितलं आहे ते कोणालाही सांगायचं नाही आणि राघवेंद्रप्रतापला चुकूनही विचारायचं नाही.” ते बोलून शांत झाले.
मधुमालती,“ ठीक आहे बाबा.तुम्ही जे मला सांगितलं तसंच होईल. मी चार दिवसांनी येते.” ती त्यांना वाकून नमस्कार करत म्हणाली. त्यांनी आयुष्यमान भाव: चा आशीर्वाद दिला.
मधुमालती कुटीच्या बाहेर आली जयसिंगराव आणि मदन तिची वाट पाहत होते.
जयसिंगराव,“ काय म्हणले गं बाबा तुला?” त्यांनी विचारलं.
मधुमालती,“ ते पारद शिवलिंग बनवून देणार आहेत. चार दिवसांनी बोलावलं आहे परत आपल्याला.” ती म्हणाली.
जयसिंगराव,“ काय? त्यांनी आज पातूर फक्त एकाला शिवलिंग बनवून दिलं हाय पोरी. ते बी दूर हिमालयातून एक माणूस आला हुता म्हणं त्याला बी लय काळ लोटला हाय. मी तर नुसतं ऐकून हाय समदं. लय भाग्यवान हाईस तू तुला ते पाऱ्याच शिवलिंग बनवून द्याया तयार झाले.” ते आश्चर्याने बोलत होते.
मधुमालती,“ भाग्यवान तर मी आहेच अप्पा. चला निघुयात आपण.” ती म्हणाली.
तिघे पुन्हा जंगलातून वाट काढत रस्त्यावर आले आणि जीप घेऊन साताऱ्यात पोहोचले.
साधू बाबा म्हणाले तसं पुढं काय घडणार आहे ते राघवेंद्रला खरंच माहीत असेल का? आणि एक तप म्हणजे बारा वर्षांनंतर जहागीरदारांसाठी खूप खडतर काळ येणार आहे म्हणजे नेमकं काय घडणार होते?
क्रमशः
कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
माडीवरची बाई भाग 55
