राधक्का मात्र आज मनोमन खुश होती. तिने मधुमालतीला तिच्या खोलीत बोलवून घेतले.
राधक्का,“ मालू बस हतं. आन म्या काय सांगती ते नीट समजून घी. आज समद्या बाया तुज्यावर फिदीफिदी हसत हुत्या का म्हैत हाय का?” तिने विचारलं.
मधुमालती,“ नाही ना! पण तुम्ही पण हसलात रखमा मावशी पण हसत होत्या.” ती असंमजसपणे म्हणाली.
राधक्का,“ बाय माजी ईवड शिकलीस पर भाबडी हाय माजी मालू. खोलीमदून बाहीर येताना आरसा बगतला हुतास का? नाय. बाय तू कशा अवतारात बाहीर आली हुती. कुक्कु फिस्कटलं हुतं, केस ईस्कटल हुती आन पातळ गडबड करूनशान उलटं निसून आलतीस नव्हं. अगं समद्या बायस्नी कळलं नव्हं राती काय झालं असल ते.” ती हसून म्हणाली आणि मधुमालतीने लाजून मान खाली घातली.
मधुमालती,“ मला समजलंच नाही. उठायला खूप उशीर झाला म्हणून घाईघाईत तशीच आले मी आत्या.” ती लाजून बोलत होती.
राधक्का,“ अगं व्हय झाला उटाया उशीर तर ईवड काय बी नाय त्यात, नवं लगीन हाय तुमचं तवा असं हुनार पर खोली बाहीर इतना आरसा बगायाचा वाटलं तर फनी फिरवीत जा क्यासातून आन पातळ नीट निसून यायाचं. दुसरं काय नाय पर कुणाची नजर कशी असतीया. नवी नवरी त्वा त्यात पांडरी शिपाट नजर लागतीया पोरी.” ती तिला समजावत होती.
मधुमालती,“ चूक झाली माझ्याकडून इथूनपुढे लक्षात ठेवीन.” ती खालची मान वर न करता म्हणाली.
राधक्का,“ हा आता जा.”
मधुमालती,“ आत्या मी वर जाऊ? वर यांच्या खोलीत खूप पुस्तकं आहेत. त्यातलं एखादं वाचायला आणते.” तिने विचारलं.
राधक्का,“ मंग ईचारायचं काय त्यात समदा वाडा तुजा हाय कुटं बी फिर पर मालू थोडं दिस वाड्या बाहीर नगं जाऊ बाय.” ती म्हणाली.
मधुमालती,“ हो नाही जाणार वाड्या बाहेर. मी जाते वर.” ती म्हणाली आणि निघून गेली.
★★★
आज राधक्काने राघवेंद्रला आवडतो तसा गूळ घालून साजूक तुपातला शिरा केला होता. सगळे जेवायला बसले आणि ताटात शिरा दिसला.
सुभानराव,“ आज गॉड केलं राधक्का काय भानगड?” त्यांनी विचारलं.
राधक्का,“ काय नाय जी असंच.” ती म्हणाली महेंद्रप्रतापरावांनी मात्र राधक्काला डोळ्यांनी विचारलं आणि राधक्काने डोळ्यांनीच त्यांना इशारा केला आणि ते खुश झाले.
महेंद्रप्रतापराव,“ असं काय करता अण्णा धाकल्या सरकारास्नी आवडतु शिरा म्हणूनशान केला असल नव्हं.” ते हसून म्हणाले.
थोड्यावेळाने सगळे पांगले. राघवेंद्र त्याच्या खोलीत जात होता तर महेंद्रप्रतापरावांनी राधक्काला त्याला थांबवायला सांगितले.
महेंद्रप्रतापराव,“ त्वां संसाराला लागला हे बेस झालं.”
राघवेंद्र,“ समदा जुलमाचा राम -राम हाय. आन मी तुमी दोगांनी सांगतल म्हणूनशान हे केलं न्हाय. मदन म्हणला मला ते पटलं. मधुची या समद्यात काय बी चूक नाय. ती बायकू हाय माजी तवा तिला तिचा हाक मिळाया पायजे. आन यांनी हरणीला काय केलं म्हंजी त्यो बी इचार हुताच की आई. म्हणुशान मी तुमास्नी माफ केलं असं नाय हाय. मी संसार तर करण पर किती मना पासनं ते तर मला बी म्हैत नाय. हा पर मधुला सुकात ठिविन.” तो रागाने म्हणाला आणि निघाला.
महेंद्रप्रताप,“ बरं त्वां म्हंतु तसं पर जहागीदारांच्यात पयल्या राती बायकूला दागिना द्याची रित हाय तर उंद्या तालुक्याला जावूनशान दागिना घुवूनया धाकलं सरकार.” ते म्हणाले.
राघवेंद्र,“ व्हय तर तुमच्या समद्या रितीभाती पाळाया पायजेल नव्हं.” तो म्हणाला आणि निघून गेला.
★★★
लग्न होऊन तीन महिने होऊन गेले. वरून सगळं आलबेल वाटत होतं. मधुमालती खूप खुश होती. मुलगा संसाराला लागला म्हणून घरातले खुश होते. पण राघवेंद्रला मात्र त्याचा आत्मा हरवल्यासारखं झालं होतं. त्याला हरणीला विसरून मधुमालती बरोबर संसार करणे जितके सोपे वाटत होते तितके त्याच्यासाठी ते नव्हते. तो जगत होता. हसत होता. पण कशातच त्याला हवा असलेला आनंद नव्हता. तो सारखा हरणीच्या आठवणीने व्यथित होत होता. तिने दिलेले अत्तर त्याने जपून ठेवले होते. तिची आठवण आली की तो ते अत्तर काढून त्याचा सुवास श्वासात भरून घ्यायचा आणि पुन्हा ती अत्तराची कुपी सांभाळून ठेवून द्यायचा. त्याच्या मनात अनेक वेळा हरणीला शोधून तिला भेटावे असा विचार यायचा पण कोणत्या तोंडाने तिला भेटायला जाणार असा प्रश्न त्याला पडायचा. आजही दुपारी तो बाहेरची कामं उरकून घरी आला होता. दुपारी तशी वाड्यावर सामसूमच असायची. तो त्याच्या खोलीत न जाता वर गेला. त्याने दारं पुढं ढकलली आणि फडताळात ठेवलेली हरणीने दिलेली अत्तराची कुपी बाहेर काढली. मनगटावर अत्तर लावून घेतले आणि पुन्हा ती कुपी मौल्यवान वस्तूसारखी सांभाळून ठेवून दिली.तो पलंगारवर बसला आणि मनगट नाकाजवळ नेऊन वास श्वासात भरून घेतला.
‛ हरणीची हीच काय तिवडी आटवण हाय माज्याकडं पर ही अत्तराची कुपी सपल्यावर काय? मला वाटीत हुतं की हरणीला इसरीन मी पर ते ईवड सोपं नाय. हरणी जणू माज्या अंगात भिनली हाय. मधुबरुबर संग करतु तिला पायजे नकु ते बगतु पर तिच्या साटनं ती वड नाय जी हरणी साटनं वाटतीया. मधू येगळी हाय आन हरणी येगळी मी तिच्यात हरणीला हुडकतूया पर ती नाय गावत मला. असं वाटतंया हरणी बरुबर माजा आत्मा बी गेला हाय. आन निसतं धड हाय हतं. हरणीला भेटावं का? पर कुटलं त्वांड दावू तिला? ज्या समद्यावर तिचा हक हुता ते समदं तर मी मधुला दिवून टाकलं की. माजं शरीर आन चरित्र पर मन आन आत्म्याच काय? त्यो मातूर हरणी संग गेला. पर कोणाला बी समजणार नाय हे! हरणी कुटं असलं? काय करत असंल? तिच्या आईनं तिचं लगीन करून दिलं असल का? पर हरणीनं घितलं असल का लगीन करून? का तिनं का करू नाय लगीन तिला बी सुकी हुण्याचा हक हायच की. मद्याला पाटवूनशान खबर काडाया लावायाची का? नगु नगु तात्याला समजलं तर ते हरणीला काय तर करायचं. मद्याला बी एकदाव उचलून आणला हाय त्यांनी. नगुच ते समदं. ती कुटं हाय कळालं की भिटू वाटल आन तिजं लगीन झालं असलं तर त्वा तिला दुसऱ्या बर बगू शकशील का? नाय नगुच ते.’
तो या सगळ्या विचारात डोळे झाकून पलंगावर पडला होता आणि दार उघडून मधुमालती आली. त्याच्याजवळ बसत म्हणाली.
मधुमालती,“ झोपला काय हो?”तिचा आवाज ऐकून राघवेंद्र उठून बसला.
राघवेंद्र,“ नाय गं. असच पडलू हुतो.”
मधुमालती,“कधी आलात तुम्ही? खोलीत का नाही आला?” तिने विचारलं
राघवेंद्र,“ त्वां झोपली हुती नव्हं म्हणूनशान नाय आलू.” तो म्हणाला.
मधुमालती,“ बरं पण हा सुगंध कुठून येतोय? तुम्ही अत्तर लावलंय का?” तिने मोठा श्वास घेऊन विचारलं.
राघवेंद्र,“ व्हय. लावलं हाय हाताला.” त्याने उजव्या हाताचे मनगट तिच्यासमोर धरले.तिने पुन्हा खोल श्वास घेतला.
मधुमालती,“ मोगरा! किती छान आहे वास. म्हणजे धाकल्या सरकारास्नी ह्यो बी शोक हाय तर?” ती हसून म्हणाली.
राघवेंद्र,“ शोक नाय गं पर आवडतुया मला सुवास.”तो म्हणाला.
मधुमालती,“ पण ज्यांच्या श्वासातच सुवास आहे त्यांना अत्तराची गरज काय?” ती त्याच्या अगदी जवळ गेली दोघांचे श्वास एकमेकांमध्ये मिसळत होते आणि ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती.
राघवेंद्र,“ मधू दिस हाय अजूनशान तवा दमानं घी. आन त्वां आजकाल लय लाडात इतियास. दार उगडं हाय. ईल कुणी तर.” तो उसनं हसू आणून तिच्यापासून दूर होत म्हणाला.
मधुमालती,“ तुमच्यासारखा लाड पुरवणारा नवऱ्या असल्यावर कोणी बी लाडात येणारच ना. आणि कुठल्या बी बाईला वेड लागेल तुमच्या सहवासाने असे आहात तुम्ही. मग मी वेडी झाले तर त्यात माझी काय चूक?” ती म्हणाली.
राघवेंद्र,“ नाय म्हंजी वकील मी हाय पर बोलण्यात तुला नाय हरवाया येत.” तो पुन्हा हसून म्हणाला.
मधुमालती,“ हो का? पण मी तर हरले ना या काळ्याभोर डोळ्यावर! बरं ते जाऊ दे. तुम्ही दिलेलं अथ्थेल्लो मी वाचलं बरं का?” ती म्हणाली.
राघवेंद्र,“ मी बी वाचलं हाय.”
मधुमालती,“ तुम्हाला कुठं मिळालं पुस्तक?” तिने आश्चर्याने विचारलं.
राघवेंद्र,“ मुंबईस्न आणलं म्हणलं तुला वाचायाच हुतं तवा काय हाय असं त्यात म्हणुशान आणलं आन वाचलं बी.” तो म्हणाला.
मधुमालती,“ मग कसं वाटलं?”
राघवेंद्र,“ कसं वाटलं? काय नाय गं त्यो अथ्थेल्लो बी बाकी पुरुषांवानीच निगला. डेस्टिमोनाचा खून केला त्येनं कुणाच्या तर परक्या माणसाच्या सांगण्यावरून संशय घितला संवताच्या बायकू वर. आन ती येडी पिरिम करत ऱ्हाईली त्याच्यावर.जगात कुटं बी जा पुरुष जात समदीकडं सारकीच हाय सवार्ती.”तो उदास होऊन म्हणाला.
मधुमालती,“ मला नाय वाटत तसं याचा आणखीन एक पैलूपण आहेच ना! अथ्थेल्लोचे इतके प्रेम होते डेस्टिमोनावर की तो सहन करू शकला नाही तिची प्रतारणा. तिच्या चारित्र्यावर उडणारे शिंतोडे म्हणून कदाचित मारले त्याने तिला.” ती त्याच्याकडे पाहत बोलत होती.
राघवेंद्र,“पर पिरिमात जीव घ्यायाचा आदीकार कुणाला बी नाय. आन जर पिरिम जीव घित असलं तर ते पिरिम नाय मधु. पिरिम आयुष सुंदर करत असतया. ते सुक देत असतया. दुक दिवूनशान पिरिम करता येत नाय. आन तसं असलं तर ते पिरिमच नसतया. पिरिम म्हंजी देणं! घेणं नाय. जर आपुल्या पिरिमाला आपुल्या पिरिमामुळं तरास झाला नव्हं तर त्या पक्षी जीव दिलेला बेस बग.” तो त्याच्याच तंद्रीत उदास होऊन बोलत होता आणि मधुमालतीने त्याला पाठी मागून मिठी मारली.
मधुमालती,“ काही पण बोलू नका उगीच. आणि तुमच्या प्रेमाची व्याख्या कळली मला आणि तिचं अनुभवतेय ना मी.” ती कातर आवाजात बोलत होती.आणि तो भानावर आला
राघवेंद्र,“ अगं म्या अथ्थेल्लो नाटकाबद्दल बुलतुया आन तू तर रडाया लागली की.” तो हसून एका हाताने तिला समोर उभं करत दुसऱ्या हाताने तिचे डोळे पुसत म्हणाला.
मधुमालती,“ हुंम पण मी आल्यापासून पाहतेय तुमचा चेहरा उतरला आहे. उदास दिसताय तुम्ही? काही झालं आहे का? की तब्बेत बरी नाही?” तिने काळजीने विचारलं.
राघवेंद्र,“ काय बी नाय झालं. थोडं डोकं दुकतया.” तो म्हणाला.
मधुमालती,“ मग आधी का नाही सांगितलं. मी मूर्खासारखं तुमचं डोकं खात बसले. चला खाली डोकं दाबून देते. की वैद्यबुवांना बोलवायचं?” ती काळजीने विचारत होती.
राघवेंद्र,“ अगं ईवड काय बी नाय झालं. ते जीप मदनं फिरानं हुतया. वारं लागतंया नव्हं म्हणूनशान वाईस दुकतया. झोपलं की बरं वाटलं की. आन पुस्तकं वाचून मला बी सांगत जा आन बोलत जा की चांगलं वाटतंया.आन हतं या फडताळात हायती समदी पुस्तकं.” तो तिला भिंतीतले दारं असलेलं फडताळ उघडून दाखवत म्हणाला.
मधुमालती,“ हो माहीत आहे मला ते. तुमी चला बरं आधी. आराम करा मी डोकं दाबून देते आन तेल लावून देते डोक्याला.” ती काळजीने हात धरून त्याला खाली नेत म्हणाली.
खरंच तर होतं राघवेंद्रचे प्रेम म्हणजे कोणाचा तरी जीव घेणे नाही तर त्याला जीव लावणे असते. प्रेम म्हणजे घेणे नाही तर देणे आहे. राघवेंद्र ही त्याच्या प्रेमाचा जीव जाऊ नये त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्या प्रेमापासून दूर झाला होता. मनात नसताना मन मारून तो मधुमालती बरोबर लग्न बंधनात अडकला होता. आणि मनात नसताना देखील तिच्याबरोबर संसार करत होता.त्याला वाटत होते त्याच्यासाठी हरणीला विसरने सोपे असेल पण ते तितकेच त्याच्यासाठी कठीण होते. तिची आठवण त्याला पदोपदी सतावत होती. पण तो स्वतःला सावरत होता आणि मधुमालतीशी एकनिष्ठ राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. मधुमालती मात्र त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. तिला वाटायचं की राघवेंद्रच देखील तिच्यावर प्रेम आहे. पण तसे नव्हते. तो त्याची कर्तव्य निभावत होता.
हरणी कुठे होती? तिच्या आईने तिचे लग्न करून दिले असेल का? आणि तिने ते केले असेल का? की तिही अशीच राघवेंद्रसारखं कोणाशी तरी मन मारून संसार करत असेल?
©स्वामिनी चौगुले
क्रमशः
कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
अशाच मनोवेधक कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.
