मराठी लघुकथा गोष्ट तिच्या आणि त्याच्या संसाराची

 



    आज फॅमिली कोर्टात ती उभी होती तिच्या वकिलांबरोबर! आज कोर्टाची पहिलीच तारीख होती. तो तिला कोर्टाच्या पायऱ्या चढून येताना दिसला. ती त्याला तब्बल एक वर्षांनी पाहत होती. लांबून ही त्याला पाहून त्याची ढासळलेली तब्बेत तिच्या नजरेतून सुटली नव्हती. तो जसा जवळ येत होता तसा त्याचा निस्तेज चेहरा आणि खोल गेलेले डोळे तिच्या नजरेला खटकत होते. 


     तिला क्षणभर वाईट वाटले पण लगेच ती सावरली. त्याने तिच्याकडे पाहिलं ती एक वर्षे आधी होतो तशीच होती फक्त वयापेक्षा थोडी मोठी वाटत होती.त्याचा वकील ही तोपर्यंत आला. दोघांचे वकील बाजूला जाऊन त्यांच्याच केसची चर्चा करत होते. पण हे दोघे शांतच होते. दोघे ही एकमेकांच्या नजरेला नजर देणे टाळत होते. दोघांना ही मनात चाललेली घालमेल दिसू द्यायची नव्हती. दोघांमध्ये एक प्रकारची शांतता होती. शेवटी तिनेच न राहवून  शांततेचा भंग करत विचारलं.


ती,“ तुझी तब्बेत ठीक आहे ना?”


तो,“ हो मी ठीक आहे. आपली बबडी कशी आहे?तिला ही भेटून दोन महिने झाले भाऊ घेऊन आले होते भेटायला तिला.” तो म्हणाला.


ती,“ती छान आहे.” ती कसणुसं हसत म्हणाली.


  तोपर्यंत दोघांचे ही वकील चर्चा करून आले.


वकील,“ मॅडम तुम्ही इथेच बसा. आपला नंबर यायला अजून वेळ लागणार आहे.” ते म्हणाले आणि तिने होकारार्थी मान हलवली त्याच्या वकिलाने ही तेच सांगितले.आणि दोन्ही वकील निघून गेले 


  दोघे तिथेच बेंचवर बेंचच्या दोन टोकावर बसले. लोकांची ये- जा गडबड गोंधळ सुरू होता. कोर्टातून केस नंबर आणि नावाचा पुकारा झाला की वकील आणि त्यांच्या आशिलाची लगबग सुरू व्हायची. बाहेर आभाळ गच्च भरून आले होते. दिवसाही संध्याकाळ झाल्याचा भास होत होता आणि कधीही  आभाळ धो -धो कोसळेल अशी परिस्थिती होती.


   ते दोघे मात्र एकाच बेंचवर शांत बसून होते. जणू दोघे दोन समांतर विश्वात जगत होते. ती त्याच्याच  विचारात गढून गेली होती.


‘ असा का दिसतोय हा?नेमकं काय झालं असेल याला?मला तर म्हणाला ठीक आहे पण ठीक तर दिसत नाही. एक तर ऑफिसचे किती टेन्शन असते याला. त्यात आईंच्या तावडीत हा एकटाच सापडला आता.’


 ती याच सगळ्या विचारात  मनाने काही वर्षे मागे गेली. दोघांचं लग्न होऊन सात वर्षे झाली होती. दोघांचे तसे अरेंज मॅरेज रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम होऊन दोघांचे लग्न झाले होते. खरं तर तो तिला पाहून गेल्यावर तिच्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने( जी त्याला भाऊ म्हणत असे.) दोघांनी बाहेरून चौकशी केली होती. त्यात त्यांना कळले होते की मुलगा खूप चांगला आहे. तो आणि त्याची आई दोघेच आहेत पण त्याची आई खूप  विक्षिप्त आहे. सतत शेजारी भांडत असते. त्यामुळे घरातून तिच्या लग्नाला नकारच होता परंतु रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या  त्याने  तिच्या मनात घर केले होते आणि तिने घरच्यांना लग्नासाठी मनवले.   


 लग्न झाले आणि ती त्याची बायको म्हणून त्याच्या आयुष्यात आली. शांत आणि समंजस ती आणि थोडा चिडका पण प्रेमळ तो दोघांचे चांगले सूर जुळले होते. पण त्याची आई ती मात्र हेकट आणि तिरसट होती प्रत्येक काम तिच्या मनाप्रमाणे व्हायला हवे. नाही तर आई तांडव करत असे. पण ती मात्र  त्याच्या प्रेमासाठी  त्याच्या आईचा  विक्षिप्त स्वभाव सहन करत राहिली. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांच्या संसार वेलीवर सुंदर फुल उमलले. माणूस किती ही शांत आणि समजूतदार असला तरी शेवटी त्याच्याही सहनशीलतेला मर्यादा असतात. सात वर्षे झाली पण  त्याच्या आईचा हेकट आणि विक्षिप्तपणा वाढतच चालला होता. आता तीही त्याच्या आईच्या उत्तराला उत्तर  द्यायला लागली होती. परिणामी घरात रोज भांडण सुरू होते.


    एक वर्षांपूर्वीही असच शुल्लग कारणावरून संध्याकाळच्या वेळी दोघीत भांडण जुंपले होते.


ती,“ एक दिवस माझ्या बबडीला आवडतो म्हणून पास्ता केला तर बिघडलं कुठं? तुमच्यासाठी केली आहे ना भाजी पोळी मग खा की. 


आई,“ पोरीला लाडावून ठेवले आहे. हिच्या आईने काय संस्कार केले हिच्यावर म्हणून ही करणार आता हिच्या पोरीवर!”


ती,“ माझ्या आईवर घसरायची गरज नाही. तुम्ही तुमचा बघा म्हातारपण आलं तरी स्वतःचच खरं; जीव नकोसा गेला आहे.” ती भांडत होती आणि तो घरात आला.


आई,“ आलास तू? बघ तुझी बायको कसं वागते बोलते. या कार्टीला बिघडवणार ही.” त्या चार वर्षाच्या तिच्या मुलीकडे बोट दाखवून रागाने  बोलत होत्या आणि बबडी घाबरून तिच्या मागे लपली होती.


तो,“ ऐक ना तू शांत हो. आईचा स्वभाव कसा आहे माहीत आहे ना तुला?” तो तिला समजावत म्हणाला.


 ती,“ हो ना. हेच ऐकत आहे सात वर्षे झालं. एक दिवस मनासारखं काही तरी करून दिलं पोरीला की झाला सुरू थयथयाट.  स्वतः म्हाताऱ्या झाल्या पण अक्कल नाही थेरडिला.”


    रागात तिच्या तोल ढासळला. आणि त्याचाही स्वतःवरचा ताबा सुटला. त्याने तिच्या एक कानाखाली दिली आणि ती त्याच दिवशी मुलीला घेऊन तिरिमिरीत घर सोडून माहेरी निघून गेली. त्याने तिला खूप वेळा फोन केले मेसेज केले पण तिने कशालाच उत्तर दिलं नाही. तो भेटायला गेला तर भेटली देखील नाही. त्याने खूप वेळा तिचे आई वडीलांसमोर माफी मागितली. पण काहीच फरक पडला नाही. शेवटी ज्याची भीती होती तेच झाले त्याला एक दिवस तिने डिव्होर्स नोटीस पाठवून दिली आणि आज ते कोर्टात होते.


   कोणी तरी तिला आवाज दिला आणि ती भानावर आली. तोच चहा घेऊन तिच्यासमोर उभा होता.


तो,“ चहा घे.” 


ती,“ थँक्स.याचे किती झाले?” ती चहाचा कप हातात घेत म्हणाली.


तो,“ मला माहित आहे आता तू नोकरी करतेस पण चहाचे पैसे देण्या इतकी ही तू मला परकी झाली नाहीस अजून.” तो खिन्नपणे हसत म्हणाला.


   पुन्हा दोघांमध्ये शांतता पसरली. तिच्या मनाची मात्र चलबिचल सुरू होती आणि त्याच्याही; शेवटी तिने न राहवून विचारलंच. 


ती,“ आई कशा आहेत?” 


तो,“ परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. सतत आरडाओरडा करते. समोर कोणी नसले तर वस्तूंवर राग काढते आणि मी समोर दिसलो की माझ्यावर.” तो सांगत होता.


ती,“ एक सल्ला देऊ. राग येणार नसेल तर? या आधीही मी तसा प्रयत्न करून झाला आहे पण त्यांनी मला धुडकावून लावले. तूही त्यांच्यासमोर जास्तकाही बोलू शकला नाहीस. त्यांना सायकॉलॉजीस्टची गरज आहे.” ती म्हणाली.


तो,“ हो ते मला ही माहीत आहे पण ती ऐकत नाही.” तो म्हणाला.


ती,“ किती दिवस त्यांचा त्रास तू आणि मी देखील सहन करणार आहोत सांग ना? जसं त्यांना तुझी गरज आहे तशी मला आणि आपल्या बबडीला देखील आहेच ना? मला ही त्यांचा विक्षिप्त स्वभाव सहन नाही झाला. मला माहित आहे त्यादिवशी मी त्यांच्यासाठी वापरलेले शब्द चुकीचे होते. सॉरी पण मी तरी काय करू? जेंव्हा गोष्ट मुलीवर येते तेंव्हा माझ्यातली आई गप्प बसू शकत नाही. आपल्या मुलीवर ही त्यांच्या अशा स्वभावाचा परिणाम व्हायला लागला म्हणून मग मला काळजावर  दगड ठेवून घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागला.” तिच्या डोळ्यातून श्रावण सरी बरसत होत्या. त्याच्याही डोळ्यांतील पाणी  पापण्यांचा किनारा ओलांडू पाहत होते.


तो,“ माझं ही चुकलं त्या दिवशी सॉरी! त्या दिवशी ऑफिसमध्ये बॉसचे आणि माझे वाजले होते. त्यात आपल्या घरात रोजचेच भांडण. मी वैतागलो होतो खूप पण तुझ्यावर हात उचलणे माझी खूप मोठी चूक होती. सॉरी फॉर दॅट! पण त्या एका चुकीची शिक्षा मला आयुष्यभर भोगावी लागणार आहे. आणि आईचे म्हणशील तर ती उपचार करून घ्यायला तयार होणार नाही. आणि तिचा स्वभाव ही बदलणार नाही उलट ती आता आणखीनच विक्षिप्त होत आहे. पण तू का सहन करावास तिचा विक्षिप्तपणा. तुझा निर्णय योग्य आहे.तू म्हणशील ते तुला मिळेल. तुझी आणि बबडीची जबाबदारी माझी आहे ती कायम असणार आहे.” तो कातर आवाजात म्हणाला आणि तिथून जाऊ लागला. तर तिने त्याचा हात धरला.


ती,“ मी काय बोलले तुला कळले नाही की तुला ते कळून घ्यायचं नाही? मला आणि आपल्या बबडीला गरज आहे तुझी. आणि आईंचे म्हणशील तर त्यांना आता आपले ऐकावेच लागेल. त्यांचा विक्षिप्त आणि हेकेखोरपण तू ही का सहन करावास सांग ना? का तर त्या तुझ्या आई आहेत म्हणून? पण त्यांना योग्य उपचाराची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्यालाच काही खंबीर पावले उचलावी लागणार आहेत. आणि हो मला तुझ्याकडून तूच हवा आहेस मी नाही राहू शकणार एकटी तुझ्याशिवाय.” ती हुंदका देत म्हणाली.


तो,“ हुंम. खरं तर मीच आईच्या उपचारांसाठी खंबीरपणे निर्णय घ्यायला हवा होता. असो आता घेईन. आणि मी ही तुझ्याशिवाय आणि आपल्या बबडीशिवाय नाही जगू शकणार.”त्याच्या ही डोळ्यातून आता पाऊस बरसायला लागला होता.


ती,“ मग आपण इथं काय करतोय?” तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं



  आणि त्याचा हात धरून चालू लागली मागून मिस्टर अँड मिसेस तो आणि तीचा पुकारा होत होता. आणि तिचे आणि त्याचे वकील मागून हाका मारत होते. पण तो आणि ती तर पळत सुटले होते. मघाशी भरून आलेलं आभाळ आता मनसोक्त कोसळत होतं आणि दाटून आलेलं मळभ आता रितं होत होतं.


©स्वामिनी चौगुले



अशाच लक्षवेधी कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. 













Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post