माडीवरची बाई भाग 21





       दिवस पाखराचे पंख लावून उडत होते.  राघवेंद्र आणि मधुमालतीच्या लग्नाला सहा महिने होऊन गेले होते. सगळं नीट सुरू होतं. पण राघवेंद्र मधली समाजासाठी काही तरी करण्याची उर्मि त्याला स्वस्त बसू देत नव्हती. असं तर बऱ्याच वर्तमानपत्रात तो रोज लेख लिहून मुलींच्या आणि एकूणच सगळ्यांच्या शिक्षणाबाबत जागृती पसरवण्यासाठी प्रयत्न करत होता पण त्याला हे माहीत होते की नुसते लिहून काही होणार नाही आणि जे लोक अशिक्षित आहेत ते थोडीच वर्तमानपत्र वाचतात. वर्तमानपत्र तर मूठभर शिकलेले लोकच वाचतात. त्याला समाजाच्या शिक्षणासाठी काही तरी भरीव काम करायचे होते आणि त्याची सुरुवात त्याला त्याच्या गावापासून करायची होती.त्याच्या मनात अनेक योजना आकार घेत होत्या पण त्या सत्यात साकारण्यासाठी त्याला घरच्या लोकांचे पाठबळ लागणार होते. ते मिळेल का यात मात्र त्याला शंका होती. तरी त्याने घरात महेंद्रप्रतापराव आणि सुभानरावांसमोर विषय काढायचा ठरवले. एक दिवस रात्रीची जेवणं झाल्यावर वाड्याच्या चौकात महेंद्रप्रतापराव आणि सुभानराव बसले होते. राधक्का आणि मधुमालती देखील तिथेच होत्या.


राघवेंद्र,“ अण्णा माज्या मनात एक इचार हाय. म्हंजी बगा आपल्या गावात चौती पातूरच शाळा हाय. गावातल्या पोरीच काय पर पोरं बी जेमतेम चौती पातूर शिकत्याती. जी चांगल्या घरातली हायती ती पोरं तालुक्याला शिकाया जात्याती आन गरिबांची परं हतं मजुरी कर्त्याती. पोरी तर काय लय कमी शिकलेल्या हायत्या. मी काय म्हणत हुतो आपली हिवडी जिमीन हाय एक दोन एकर जिमीन शाळा बांदाया मला देणार का? म्हंजी जिमीन दावून मी सरकारकडून पैका घेतु आन मॅट्रिक पातूर शाळा बांदतू. पर पोरींची येगळी आन पोरांची येगळी बांदावी लागलं. आन हतं चौती पातूर जे मास्तर शिकीवत्यात आन जे मॅट्रिक झालं हायती अशी पोरं मास्तर म्हणून काम करत्याली त्यास्नी पगार काय सरकार दिलच की पर आदी शाळा बांदून व्हाया पायजेल.” तो थोडा कचरतच बोलत होता.


महेंद्रप्रतापराव,“ बगतलं का अण्णा कसं बोलाया लागल्यात धाकलं सरकार?” त्याने सुभानरावांकडे पहात  विचारलं.


सुभानराव,“ व्हय तर बागतुया नव्हं.” ते राघवेंद्रला पाहत म्हणाले.


राघवेंद्र,“ बरं ऱ्हाईलं. मी जातू.” तो आता रागाने म्हणाला आणि निघाला.


सुभानराव,“ बस्तु का मुडद्या हतं. काटीच घालतु नाय तर. राग निस्ता नाकावर बसला हाय.” ते म्हणाले आणि मधुमालती हसायला लागली. राघवेंद्रने तिच्याकडे रागाने पाहिलं तशी ती गप्प बसली. तो पुन्हा लाकडी खुर्चीवर बसला.


राघवेंद्र,“ तुमी असं बोलल्यावर पुडं बोलण्यावाणी काय ऱ्हाईल हाय का अण्णा?” त्याने विचारलं.


सुभानराव,“ असा कसा रं तू? जरा म्हणूनशान दम नाय. उतावीळ नवरा आन गुडग्याला बाशिंग.ऐक तर की जरा. महिंद्रा बोल बाबा.” ते म्हणाले.


महेंद्रप्रतापराव,“ अमास्नी म्हैत हुतं धाकलं सरकार या आदी बी तुमी बोलला हुता नव्हं साळंबद्दल तवाच अमी इचार करून ठिवला हुता. आपली जिमीन साळा बांदाया द्याची. पर असं उसनं कशा पाई बोलतुयास? आरं ह्यो जिमीन -जुमला काय वर जाताना आमी उरावर घुवून जाणार हाय व्हय लेका? जे काय बी हाय नव्हं ते समदं तुमचं हाय धाकलं सरकार. आन अपुन जहागीदार हाय म्हंजी जमीदार गावच्या भल्याचा इचार अपुन नाय तर कोण करणार हाय? आन तुमचा साळा बांदायचा इचार अमास्नी पटला हाय. आन भारत सरकार कडं मदत मागया जायची काय बी गरज नाय. पंदरा इस खोल्या बांदून काडाया असा किती पैका लागणार हाय. बांदू  अपुनच समदं. अपुन बी सरकार हाय म्हणलं. फकस्त मंजुरी कागुद-पतार तेवड्याच बगा आन ततं काय अडचण आली तर आपल्या लय वळकी हायत्या सरकार दरबारी! कुटल्या बाजूची जिमीन पायजे ते बगा. गावा जवळचीच बगा म्हंजी पोरास्नी जायाला-यायाला बरं हुईल  आन एक दोन एकार का पायजे तिवडी घ्या की जिमीन  कवा भूमी पूजान करायाचं त्याचा म्हूतूर काडा.” ते बोलत होते आणि राघवेंद्रचे मात्र आनंदाने डोळे चमकले.


राघवेंद्र,“ व्हय मी उंद्या पासनं काम सुरू करतु. आदी समदी कागदं गोळा करूनशान सरकारकडून शाळे साटनं  मंजुरी अनाया पायजे. म्हंजी पुडं शिक्षकास्नी पगारी सरकार  देणार आन शाळा चलवाया पैका बी.” तो उत्साहाने बोलत होता.


हे ही वाचा👇

सुभानराव,“ पर माजी एक अट हाय?” ते म्हणाले.


राघवेंद्र,“ झाल्या का तुमच्या अटीतटी सुरू?” तो कपाळावर आठ्या आणत म्हणाला.


सुभानराव,“ महिंद्रा लयच शेफारला हाय ह्यो.चार रट्ट द्यावं का हेला? ऐक तरी रं मूडद्या. आरं साळंला तुज्या आजीच नाव द्याचं सरोजाबाई सुभानराव जहागीदार नाय तर नाय देत जिमीन जा!” ते त्यांची पांढरी शुभ्र मिशी पिळत म्हणाले.


राघवेंद्र,“ ईवडच व्हय.मी म्हणलं अण्णा आता त्यास्नी  शिकायाचं हाय म्हणत्यात का काय शाळंत!” तो हसून म्हणाला आणि सुभानरावांनी त्याच्यावर काठी उगारली तसा तो पळून गेला.

★★★★


  राघवेंद्रने दुसऱ्या दिवशीपासून  कागदपत्रांची जमवाजमव सुरू केली. तो शाळेच्या मंजुरीसाठी दोन तीन वेळा साताऱ्याला जाऊन आला आणि जहागिरदारांचे सरकार दरबारी वजन असल्यामुळे लवकरच शाळेला मंजुरी मिळाली. आणि महेंद्रप्रतापराव आणि राधक्काच्या हस्ते चांगला मुहूर्त पाहून  भूमी पूजन झाले आणि  शाळेच्या बांधकांचा श्री गणेशा झाला.


    शाळेचे बांधकाम आणि पाच गावातली शेतीबाडी बघण्यात राघवेंद्र व्यग्र झाला. मधुमालती आणि राघवेंद्रच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेले. शाळा बांधून पूर्ण होत आली होती. पण गावात बायकांमध्ये कुजबुज सुरू झाली होती. अजून मधुमालतीला दिवस गेले नाहीत याची. ती राधक्काच्या कानावर एक दिवस रखमाने घातली.


रखमा,“ थोरल्या बाईसाब याक सांगायाचं हुतं जी. पर तुमी राग धरणार नसशीला तर.” ती अडखळत म्हणाली.


राधक्का,“ बोल की काय हाय.” तिने विचारलं.रखमाने मधुमालती आसपास नाही ते पाहिलं आणि हळू आवाजात बोलू लागली.


रखमा,“ बाईसाब गावात बाया बोलाया लागल्यात्या की एक वरीस हून गिलं तरी सरकारांच्या घरात पाळणा अजून पातूर हलला नाय.” ती म्हणाली आणि ते ऐकून  मधुमालतीची पावलं स्वयंपाक घराच्या दारातच अडखळली.


राधक्का,“ काय बाय बाया हायत्या गं रकमे अगं दोगं म्हतारं झालं व्हय? अगं कंदीकंदी उशीर लागतुया.अन बरच हाय बग मुलं झालं की नवरा-बायकूला मोकळीक ऱ्हात नाय बग.” ती म्हणाली. आणि मधुमालती तशीच परत फिरली. ती तिच्या खोलीत गेली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.


  राघवेंद्र दुपारी जेवायला आणि आराम करायला आला होता. तर त्याला मधुमालती रडताना दिसली.


राघवेंद्र,“ काय झालं मधू रडाया? तुला कोण काय बोललं का?” त्याने विचारलं


मधुमालती,“ नाही.” ती डोळे पुसत म्हणाली आणि राघवेंद्र तिच्याजवळ बसला आणि तिलाजवळ घेत म्हणाला.

.

राघवेंद्र,“ मंग उगच कोण रडताया व्हय?सांग की काय झालं?” त्याने पुन्हा विचारलं आणि तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

हे ही वाचा👇
अर्धसत्य (लघुकथा)

मधुमालती,“ रकमा मावशी  आत्याला सांगत होत्या की गावात बायका चर्चा करतात की जहागिरदारांच्या घरात अजून पाळणा हलला नाही.एक वर्ष होऊन गेलं लग्नाला आपल्या तरी. मला बाळ होईल ना हो? मी आई होणार ना?” ती हुंदके देत बोलत होती.


राघवेंद्र,“ हाय का आता. बायास्नी काय तेवडीच कामं असत्यात आन तू ईवड शिकलेली तुला म्हैत नाय व्हय तू आई हु शकती का नाय ते? खुळी कुटली अगं होणार की तू आई! कदीकदी येळ लागतु. आन लगीन झालं की लगीच मुलं व्हायाला पायजे असा कुटं नेम हाय व्हय. उग काय तर.” तो तिचे डोळे प्रेमाने पुसत तिला समजावत होता.


मधुमालती,“ हुंम पण मला आपलं बाळ हवं आता.” ती डोळे पुसत तोंड फुगवून बोलत होती.


राघवेंद्र,“व्हय का? आदी संवता लहाण्या पोरीवानी  वागणं बंद कर. बाळ पायजे म्हण. रडून रडून गाल आन नाक निस्त लाल करूनशान घेतलं. आन या मोट्या मोट्या घाऱ्या डोळ्यातून ह्या मोट मोट पाण्याचं थँब पडत्याती. खुळी कुटली.” तो तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत हसून म्हणाला.


मधुमालती,“ गप्प बसा तुम्ही. मी लहान दिसते का तुम्हाला? मला तर तुमच्यासारखं बाळ पाहिजे. तुम्ही हसल्यावर मोत्याच्या सडा पडल्यासारखं वाटतं.” ती म्हणाली 


राघवेंद्र,“ व्हय का पर मला तर तुज्यावानी घारुळ्या डोळ्याच बाळ पायजे. पर बाळ व्हायला काय कराया लागतंया म्हैत हाय का तुला?” तो तिला जवळ ओढून हसत म्हणाला. आणि राधक्काने हाक मारली.


राधक्का,“ मालू-राघव आरं भुका लागल्यात्या का नाय तुमास्नी?”


मधुमालती,“ सोडा बरं मला.आणि जेवायला चला. आत्या बोलवत्यात.” ती स्वतःला सोडवुन घेत उठून उभी राहत लाजून म्हणाली.


राघवेंद्र,“ आता हाय का संवताच बाळ पायजेल म्हणायचं आन आता पळून जायाचं.” तो गालात हसत बोलत होता.


मधुमालती,“ तुम्ही चला ना.” ती त्याचा हात धरून त्याला उठवत म्हणाली.

★★★


  आता राघवेंद्र आणि मधुमालतीच्या  लग्नाला दोन वर्षे होत आली होती. रमालाही एक मुलगा झाला होता तो आता एक वर्षाचा झाला होता आणि ती तिच्या नवऱ्याबरोबर  मुंबईत राहायला ही गेली होती. पण अजून तरी मधुमालतीला दिवस गेले नव्हते. राघवेंद्रच्या शाळेचे बांधकाम पूर्ण होऊन शाळा सुरू देखील झाली होती. मधुमालती  मात्र आता अपत्य सुखाला आसुसली होती. ती जास्त देव-देव करणाऱ्यातली नव्हती पण राधक्काच्या सांगण्यावरून उपवास करायला लागली होती. आणि ते राघवेंद्रला पटत नव्हतं. आज ही मधुमालतीचा उपवास होता. ती रात्री झोपायला खोलीत आली. राघवेंद्र पुस्तक वाचत बसला होता.


राघवेंद्र,“ मधू हे काय  लावलं हाय त्वां? ईवडी शिकली हायस आन आडाण्यागत काय वागतियास गं? उपाशी ऱ्हावुन कुटं मुलं हुतं असत्यात व्हय? एक काम करू अपुन ईवड दोन-तीन मास बगू नाय तर साताऱ्याला डॉक्टरकडं जाऊ दोगं बी.” तो थोडा रागातच बोलत होता.


मधुमालती,“ कळतंय मला पण आत्याना वाटते ना तसे की उपवास केल्याने मूल होईल म्हणून त्यांच्या समाधानासाठी करते.पण तुम्ही नका ना रागावू उगीच.” ती त्याच्याजवळ बसत म्हणाली.


राघवेंद्र,“ तरी बी मला नाय पटत मधू. संवताला कशापायी तरास करून घ्यायाचा. मी काय म्हंतु मी बी उपास करू का तुज्या संग.” तो तिला जवळ ओढत हसून म्हणाला.


मधुमालती,“ तुमचं आपलं काही तरीच. आणि शाळेचं काम कसं सुरू आहे. भरायला लागली आहे ना आता शाळा? आणि शिक्षक मिळाले ना?” तिने विचारलं.


राघवेंद्र,“ मला वाटत नवतं इवड्या लगीच हितकी मायदाळ पोरं-पोरी शाळत इत्याली पर तुला सांगतु समदं वर्ग भरल्याती. तालुक्याला शिकाया गिलेली पंच कृषितली  पोरं बी परत आली की इकडं शिकाया.आन शिक्षक हायती. सरकारी अनुनदान मिळालं नाय नव्हं शाळेला तवा सरकारी नुकरी म्हणूनशान आली की शिकल्याली पोरं मास्तरकी कराया. बरं मला एक लेख लिवायचा हाय पेपारा साटनं मी लिवतो त्वां निज.” तो म्हणाला.


मधुमालती,“ मग चांगलं आहे की गावच्या आणि आसपासच्या गावच्या पोरांच्या शिक्षणाची सोय झाली जवळच्या जवळ. एक विचारू का? नाय विचारतेच. तुम्ही बोलताना इतकं अशुद्ध बोलता आणि किती शुद्ध लिहता हो. कसं काय जमतं तुम्हाला?मला तर नवलच वाटतं बाई.” तिने विचारलं तसा राघव हसला.


राघवेंद्र,“ बाप रे! त्यात काय नवल आहे बरे मधू बाईसाहेब! लिहणे वेगळे आणि बोलणे वेगळे असते हो.” तो हसत तिच्यासारखं बोलत म्हणाला.


मधुमालती,“ जा मला नाही बोलायचे तुमच्याशी माझी चेष्टा करता तुम्ही.” ती तोंड फुगवून म्हणाली.


राघवेंद्र,“ असं कसं बोलायचं नाही बरं? ऐक ना मधु माजं काम हाय तुज्याकडं.” 


मधुमालती,“ आत्ता तर लेख लिहायचा होता ना तुम्हाला? जा लेख लिहा. लगेच आले काम आहे म्हणे.” ती तोंड वाकडं करत म्हणाली.


राघवेंद्र,“ याला म्हणत्यात चोराच्या मनात चांदनं. अगं ते काम नाय.शाळा आन पाच गावची शेती अन बाकी कामं बी असत्याती नव्हं मला, येळच नस्तुया. आन त्यो पेपरवाला मागं लागतू सप्तातुन एक तर लेख लिवून द्या बॅरिस्टर साहेब! महिलांच्या समस्या आणि त्याचे उपाय, महिला सबलीकरण यावर एक स्तंभ  लिवायचा अस्तूया. त्वां लिवणार का? तू बी बाई हाय बाईच्या समस्या तू चांगलं लिवशील नव्हं.” तो बोलत होता.


मधुमालती,“ मी आणि पेपरमध्ये लिहू. मला जमेल का?” तिने त्याला पाहत विचारलं.


राघवेंद्र,“ का नाय जमणार? आन मी हाय नव्हं शिकवाया. मधु ऐक की माजं ईवडं काम कर की.” तो तिला लाडिगोडी लावत म्हणाला.


मधुमालती,“बरं मी प्रयत्न करते. जमलं तर लिहीत जाईन.” ती म्हणाली.


राघवेंद्र,“ मगं आता लिवायचं रद्द.” तो तिला घेऊन पलंगावर पडत म्हणाला.


   राघवेंद्रच्या मनाप्रमाणे गावात शाळा सुरू झाली होती. आणि शाळेत मुलं-मुली ही भरपूर येत होते. त्यामुळे त्याच्या कामाचा व्याप वाढला होता. पण लग्नाला दोन वर्षे झाली तरी मधुमालती आणि राघवेंद्रला अजून अपत्य प्राप्ती झाली नव्हती. राघवेंद्रने मात्र आता ठरवले होते की थोडे दिवस वाट पाहून साताऱ्याला डॉक्टरकडे जायचे.


खरंच मुल होत नाही म्हणून राघवेंद्र आणि मधुमालतीला डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येणार होती का? आणि जर दोघे डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर काय सांगतील?

क्रमशः

©स्वामिनी चौगुले.


कथेच्या आधीचा भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग 20


अशाच मनोरंजक कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला फॉलो करा.
















   


Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post