माडीवरची बाई भाग 19

 



   राघवेंद्र जीप घेऊन तिरिमिरीतच बाहेर पडला. त्याने सरळ मदनचे दुकान गाठले. त्याचा मोठा भाऊ आणि तो दुकानावर होता.


राघवेंद्र,“ मदन चल की वाईस काम हाय.” तो म्हणाला.


मदन,“ दादा म्या जाऊ का इतु लगीच.” त्याने विचारलं.


दादा,“ आरं ईचाराया कशाला पायजेल धाकलं सरकारांन संगट जाया. त्वां जा म्या हाय.” तो हसून म्हणाला आणि मदन राघवेंद्रबरोबर जाऊन जीपमध्ये बसला.


राघवेंद्र पूर्ण रस्ताभर शांतच होता. त्याने नदी काठाला एका निवांत ठिकाणी जीप लावली आणि दोघे उतरून एका झाडाच्या सावलीत जाऊन बसले. राघवेंद्र नुसताच बसून होता स्वतःच्याच विचारात हरवलेला. मदन त्याला पाहत होता.बराच वेळ शांततेत गेला आणि मदन आता बोलू लागला.


मदन,“ धाकलं सरकार तुमास्नी काम नाय केलं तरी बी चालतया तुमच्याकडं गडी माणसं हायती कामं कराया पर आमी गरीब माणसं तवा आमास्नी काम कराया लागतया म्हणलं.”


राघवेंद्र,“ झालं का तुजं टोमनं मारून?” त्याने त्याला रोखून पाहत विचारलं.


मदन,“ किती येळ झालं निस्ता बसून हायस काय बी बोलंनास मंग काय बुलू मी? काय झालं हाय राघव. लय ईचारात दिस्तुयास? त्वां सांगतल्या बिगार कळल का रं मला?” तो म्हणाला.


राघवेंद्र,“ कसं सांगावं मद्या तुला? मी लय पेचात पडलू हाय बग.” तो म्हणाला.


मदन,“ पर पेच काय ते सांगतल्या बगार तोडगा कसा काडायाचा लेका. सांग की काय झालं हाय?” त्याने विचारलं.


राघवेंद्र,“ मद्या घरच्यांनी सांगतलं. जबरदस्ती किली म्हणूनशान मनात नसताना बी मधुमालती बरुबर लगीन केलं. पर माजं मन तिला बायकू मानाया तयार नाय रं. माज्या मनात तर हरणी हाय. आन आता तात्या आन आई म्हंत्यात संसार सुरू केला पायजल तिच्याबरुबर. पर संसार सुरू कराया पिरिम पाजेल का नकु रं?” तो उदास होऊन बोलत होता.


मदन,“ आरं पुज्याहून पाच दिस झालं की त्वां आजूनशान वैनीसायबां बरुबर एक नाय झाला?” त्याने आश्चर्याने विचारलं.


राघवेंद्र,“ नाय.” तो म्हणाला.


मदन,“ येडा का खुळा रं त्वां? आरं मान्य की तुजं लगीन घरातल्यानी तुज्या मना विरुद लावून दिलं पर यात वैनीसायबांचा काय दोष रं? त्यास्नी तर काय बी म्हैत नाय नव्हं. आन हरणीवर तुजं पिरिम हाय मला कळतंया पर आता वैनीसायब तुज्या बायकू हायत्या. आन आता माजं ऐकशीला तर सांगतु त्वां हरणीला इसर आन वैनीसायबांबरुबर संसाराला लाग राघव. उगा मागचं आटवत झुरत बसूनशान काय बी नाय मिळायाच. हरणीला एक सुंदार सपान म्हणूनशान काळजात जप पर वैनीसायबस्नी  अंतर नगु दिवूस. त्यांच्यात काय कमी हाय मस देकण्या हायत्या. आन समद्या तालुक्यात त्यांच्या हिवडं शिकल्या- सवरल्याली बाय गावायची नाय की रं. हाताच सुडूनशिन पळत्याच्या मगं नगं लागू. आन पिरिम काय त्यांच्याबरुबर  राहून हुणारच की रं.” तो त्याला समजावत होता.


राघवेंद्र,“ त्वां म्हंतू ते बी बरुबर हाय मद्या. हरणीची याद घिवून झुरन्यात काय बी फायदा नाय बग कारण ती आता कदी बी परत माझ्या जिंदगीत यायची नाय. मधुमालती मातूर बायकू हाय माझी तिला डावलून बी चालणार नाय. पर मद्या तू इवड्या शान्या गुष्टी कवा पासनं कराया लागला रं?” त्याने मुद्दाम त्याला डिवचत विचारलं.


मदन,“ जवा पासनं त्वां पिरिमात येडा झाला नव्हं तवा पासनं.” तो तोंड वाकडं करून म्हणाला.


राघवेंद्र,“ मदन शेठ आमी धाकलं सरकार हाय इसरू नगा.” तो उठून तोंड फुगवून ऐटीत म्हणाला.


मदन,“ जी सरकार पर म्या बी धाकल्या सरकारचा मैतर हाय. ते जाऊ दे राघव त्वां येड्यागत नगु वागू बाबा. नीट संसाराला लाग. समद्याच भलं हाय त्यात. आन वैनीसाब तुला हरणीला इसराया लावतील बग. हुसार आन देकन्या हायत्या त्या.” तो त्याच्या खांद्यावर हात ठेवत समजावत म्हणाला.


राघवेंद्र,“ मद्या तुज्या समुर मन मोकळं केलं की लय बरं वाटतंया बग. आन मंग तुमच्या लगनाच कुटं वर आलं?” त्याने हसून विचारलं.


मदन,“ राघव मैतर ह्याच साटनं असत्यात नव्हं. आन तुज्या पराकरमामुळं अप्पा हात धुवुनशान माज्या लगनाच्या मागं लगल्याती. गेल्याती मोट्या वैनीच्या नात्यातली कोण तर पोरगी बगाया त्यास्नी पास पडली की मला नेणार म्हणं.” तो तोंड वाकडं करत बोलत होता.


राघवेंद्र,“ मंग लगीन करायाची शिक्षा मी एकला का भुगु तुला बी मिळाया पायजेल की.बस जीप मंदी सोडतु तुला.  भिटू आता उद्याला” तो हसून म्हणाला आणि निघाला.


मदन,“ व्हय पर म्या काय म्हंतू ते ध्यानात असू दे.” तो जीपमध्ये बसत म्हणाला.



    राघवेंद्रने मदनला पुन्हा दुकानावर नेऊन सोडले आणि तो वाड्यावर गेला.तोपर्यंत दिवस मावळतीकडे झुकला होता. राधक्का आणि मधुमालती स्वयंपाकाला लागल्या होत्या. सहा वाजता सगळ्यांची जेवणं झाली. सात साडेसात वाजून गेल्या आणि सगळे झोपायला गेले. मधुमालती खोलीत गेली तर आज राघवेंद्र तिचीच वाट पाहत बसला होता.


मधुमालती,“ आज झोपला नाही तुम्ही? नाही म्हणजे तुम्हाला हल्ली लवकर झोप लागते ना!” ती त्याला पाहून तोंड फुगवून बोलत होती.


राघवेंद्र,“ टोमणा मारतीस व्हय गं? ये हतं बस की.” तो हसून तिला पलंगावर त्याच्याजवळ बसायची खूण करत म्हणाला.आणि ती त्याच्याजवळ बसली.


मधुमालती,“ नाही बाबा माझी एवढी हिम्मत? तुमी तर धाकलं सरकार.” ती पुन्हा त्याच तोऱ्यात म्हणाली आणि राघवेंद्रने तिच्या पाठीवर हात ठेवला तशी ती शहारली.


राघवेंद्र,“ मामला लयच तापलेला दिस्तुया. आता चूक झाली हाय आमच्याकडून तर बुलनी तर खावी लागत्याल नव्हं. पर तुमी बी धाकल्या बाईसाब हायसा नव्हं.” तो तिला आणखीन जवळ ओढत बोलत होता.


मधुमालती,“ एक विचारू? मी तुम्हाला पसंत आहे का? की आत्या आणि मामंजी म्हणाले म्हणून तुम्ही लग्न केलं माझ्याशी.” तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. पण हे बोलताना तिचे घारे डोळे काठोकाठ भरून आले होते.


राघवेंद्र,“ मधू तुज्या मंदी ना पसंत करन्यावाणी काय तर हाय का? तू देकनी हाय. शिकलेली हाय मंग मी का तुला ना पसंत करीन गं? आन हे डोळ्यात पाणी कशा पाय? तुज्या  आत्यानं बगतलं तर माजी काय खैर नाय.” तो हसून तिचे डोळे पुसत म्हणाला.


मधुमालती,“ मग चार पाच दिवस असं का वागलात माझ्याशी.मी हे दिवस कसे काढले मला माहित. मनात नाना शंका येत होत्या माझ्या.” ती कातर आवाजात म्हणाली.


राघवेंद्र,“ हुंम! अगं पर लहान हुतं तवा अपुन दुगं खेळलो तू माज्या मामाची पोरगी. आन अचानक नातीच बदलली. तू बायकू झालीस माजी. मगं तुला बायकू म्हणूनशान बगाया मला येळ तर लागणारच नव्हं. तुमच्या पोरींचं बरं अस्तया बग तुमी नवी नाती लगीच जवळ करतायसा.” तो एकाहाताने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर करत बोलत होता आणि दुसऱ्या हाताने त्याने तिला मिठीत घेतले होते.


मधुमालती,“ तसं नाही. मी तर तुमचा पेपरमध्ये छापून आलेला तुमचा फोटो पाहून आणि तुमचे विचार वाचून तुमच्या प्रेमात….” ती पुढे बोलणार तर ती लाजून गप्प झाली आणि तिने तिचा चेहरा त्याच्या मिठीत लपवला.


राघवेंद्र,“ काय? पुण्यांदा बोल की मला तर म्हैतच नवतं की हे.” तो हसून म्हणाला.


मधुमालती,“ मी नाही.” ती तिचा चेहरा त्याच्या छातीवर घासूत लाजून म्हणाली. 


  राघवेंद्रने मात्र तिचा ताबा घेतला होता. पहाटेपर्यंत तिच्या चुड्याचा किणकिणाट आणि वाढलेले श्वास खोलीत घुमत राहिले. मधुमालती  त्याच्या बहुपाशात निश्चिन्तपणे झोपली होती. राघवेंद्र मात्र जागाच होता. कंदीलाच्या मिणमिणत्या प्रकाशात तृप्त होऊन झोपलेल्या मधुमालतीचा चेहरा तो न्याहळत विचार करत होता.


‛ देवानं बी काय नशीब लिवलं हाय माजा जीव हरिणीत आन मधुचा जीव माज्यात गुंतला हाय.मला तर कदी हरणी नाय मिळायची पर मधुला तिच्या हक्काचं समदं सुक द्याया पायजे. हरणी माज्या काळजात आज पसनं मद्या म्हणला तसं एक सुनदार सपान बनून खायमची बंद झाली. आता मी फकस्त मधुचा हाय. तिच्या सुकात माजं सुक.’ 


   सकाळी मधुमालतीला  उशिराच जाग आली तर चांगलं उजाडलं होतं ती धडपडून उठली. राघवेंद्र अजून गाढ झोपलेला होता. तिने त्याच्या शांत चेहरा पाहिला आणि गालात हसून प्रेमाने त्याच्या केसातून हात फिरवला. ती उठली आणि साडी नीट करून बाहेर आली तर सगळे आप-आपल्या कामाला लागले होते. राधक्का  स्वयंपाक घरात भाकरी थापत होती. तर रखमा काही तरी कुटत होती. बाकी बायका काही ना काही काम करत होत्या. पण मधुमालतीला पाहून सगळ्या हसून एकमेकींशी तोंडासमोर पदर धरून काही तरी कुजबुजत होत्या आणि पुन्हा हसत होत्या. मधुमालतीला काहीच कळत नव्हते. तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वयंपाक घरात डोकावून म्हणाली.


मधुमालती,“ आत्या मी आलेच आवरून.” ती म्हणाली आणि राधक्का आणि रखमाचे  लक्ष तिच्याकडे गेले तशा त्याही हसायला लागल्या.


राधक्का,“ जा आदी अंघुळ करून ये.” ती हसतच म्हणाली. तशी मधुमालती मात्र थोडी रागातच निघून गेली.


रखमा,“ बाईसाब लवकर पाळणा हालतुला आता जहागिरदारांच्या घरात.” ती हसून म्हणाला.


राधक्का,“ व्हय बाय. पर आजकालच्या पोरी बी कणाय त्यास्नी काय बी  कळत नाय बग. तरी बरं गडी माणसं गेली हायती जकडं तकडं.  कुक्कु समदं ईस्कटल हाय. केसाचा अवतार. पातळ तर उलटं नेसलं हाय पोरीनं. काय बोलावं.” ती खुश होत हसून बोलत होती.


रखमा,“ पर बाईसाब तुमी सासू आन आत्या बी हायसा धाकल्या बाईसाबच्या. ही समदं जावा भावा शिकवत्यात्या पर धाकलं सरकार एकुलतंएक हायती. तवा तुमीच समजवा त्यास्नी. नवी नवरी हायत्या त्या असं फिरया लागल्या म्हंजी नजर हुईल नाय तर लागिर व्हायचं जी. म्या मध्यानीला नजर काडतू पर तुमी जरा शिकवा त्यास्नी आन आता ज्यादा वाड्या बाहीर नगा सुडू जी आन धाकल्या सरकारांची बी नजर कडा आन कळा दोरा बांदा जी डाव्या पायात.” ती सांगत होती.


राधक्का,“ बरं सांगितलंस बग रकमे म्या ह्यास्नी उंद्याच तालुक्याला धाडतु आन काळा दोरा घिऊन याला सांगतु बग.” त्या म्हणाल्या.


  तोपर्यंत मधुमालती तिचं आवरून डोक्याला पंचा बांधून आली. 


राधक्का,“ जा आदी देवाला नमस्कार करून ये.”


मधुमालती,“ हो आलेच.” ती म्हणाली आणि देवाला नमस्कार करून आली.


राधक्का,“ राघव उटला नाय व्हय गं आजूनशान?” त्यांनी विचारलं.


मधुमालती,“ नाही झोपले आहेत ते अजून.” 


राधक्का,“ उटवायच नाय व्हाय गं त्याला. ह्यांनी त्येला शेजारच्या गावात जावूनशान शेतात काय पेरलं हाय ते बगून यायला सांगतलं हाय. बरं त्वां न्ह्यारी करून घी. मगं त्याला उटीव.” त्या म्हणाल्या.


मधुमालती,“ आत्या नको मी त्यांना उठवते मग त्यांचं आवरलं की करते न्ह्यारी.” ती म्हणाली.


राधक्का,“ अगं बाय लगीनहून चार  दिस झालं फकस्त आन ते उटल्यावर करते म्हंन न्ह्यारी. बगतलं का रकमा? आन व्हय गं तुला भुका लागल्या नायत्या का?” त्यांनी हसून विचारलं.


मधुमालती,“ लागली आहे भूक पण मला आई म्हणाली की नवऱ्याच्या आधी जेवायचं नाही.” ती लाजून खाली मान घालून बोलत होती.


राधक्का,“ फुरं तुज्या आयच आपल्यात असला काय बी नेम नाय. बस आन न्ह्यारी कर. मग त्याला उटीव आन मंग पायजेल तर तुज्या नवऱ्याला खायाला घाल अमी जातू हतनं.”ती तिला चिडवत म्हणाल्या.


मधुमालती,“ आत्या तुमी पण चिडवणार होय मला.” ती लाजून लहान मुलीसारखी म्हणाली.


राधक्का,“ नाय चिडवीत. बरं घे त्यो पाट आन कर न्ह्यारी.” ती हसून म्हणाली.


   तिने न्ह्यारी केली आणि राघवेंद्रला उठवायला जाणार तर तो उठून परसदाराकडे निघाला होता. मधुमालती आणि त्याची नजरानजर झाली आणि तिने नजर लाजून खाली झुकवली. तो त्याच आवरून आला. 


राधक्का,“ वाड गं त्येला आन ह्यांचा निरुप बी दी. म्या जरा झाडास्नी पाणी घातलया का बगून येती.” त्या म्हणाल्या आणि निघून गेल्या.


मधुमालती,“ जेवा आणि मामंजीनी सांगितलं आहे की शेजारच्या गावात आपल्या जमिनीत काय पेरलं आहे ते बघून या म्हणून.” ती त्याच्या पुढ्यात ताट ठेवत बोलत होती.


राघवेंद्र,“ बरं जातू मी. आज लय उशीर झालाया  बग उठाया. आन त्वां न्ह्यारी केलीस का मधू?” त्याने खात विचारलं.


मधुमालती,“ हो केली मी. एक विचारू?” तिने त्याला पाहत विचारलं.


राघवेंद्र,“ आता ईचारु का म्हणूनशान काय ईचारायचं हाय बोल की.” तो हसून म्हणाला.


मधुमालती,“ ते सगळे मला मालू म्हणतात अगदी माझी आई-आबा ही. पण तुम्ही मधू का म्हणता?” तिने विचारलं.


राघवेंद्र,“ मला आवडतया तुला मधू म्हणाया.  तुला आवडत नसलं तर मी बी मालू म्हणतू.” तो तिला रोखून पाहत म्हणाला.


मधुमालती,“ मी म्हणाले का तसं? आणि आवडतं मला तुम्ही मधू म्हणलेलं.” ती खाली मान घालून बोलत होती.


राघवेंद्र,“ बरं येतू मी. सांच्याला येणार आता.” तो म्हणाला. ती त्याच्या पाठोपाठ चौकापर्यंत गेली. तो जीप घेऊन निघून गेला.  मधुमालती निवांत बसली.


राधक्का,“ मालू हकडं ये जरा.”ती म्हणाली आणि मालती धावत परसात गेली.


मधुमालती,“ काही काम होतं का आत्या?” तिने विचारलं.


राधक्का,“ आपल्यात नव्या नवरीला काम लावत नायती बाय. आन हितकं नोकर चाकर कशापाय हायतं मगं त्वां फकस्त खुश ऱ्हा आन राघवला खुश ठेव. पुडं तर हे समदं तुलाच बगायचं हाय की जलमभर. रकमा काड पोरीची नजर.” त्या म्हणाल्या.आणि रखमाने मिरची, मीठ, मोहरी आणि काय काय दोन मुठीत घेऊन तिची नजर काढली.


रखमा,“बगा थोरल्या बाईसाब जरा सुदीक खाट नाय. धाकल्या सरकारांची बी तुमी काडा जी. आन पोरीला चार सबुद सांगा समजून.” ती म्हणाली आणि निघून गेली.


 राघवेंद्रने हरणीला विसरून मधूमालतीबरोबर संसार करायचं ठरवलं होतं. पण खरंच तो हरणीला विसरू शकेल का? आणि नियतीने त्याच्या नशिबात आणखीन काय वाढून ठेवले होते? 

©स्वामिनी चौगुले


कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
माडीवरची बाई भाग 18

    







Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post