माडीवरची बाई भाग 15




    दिवस मावळून गेला. वाड्यातली गडी माणसं त्यांच्या घरी निघून गेली आता वाड्यावर घरातले तिघे आणि चार कायम वाड्यावर मुक्काम असणारी विश्वासातले नोकर उरले. राघवेंद्रचा अजून ही पत्ता नव्हता सगळ्यांचा जीव अगदी टांगणीला लागला होता. रोज दिवस मावळण्याआधी घरी जाणारे दिवाणजी देखील वाड्यावर थांबले होते. राधक्का आता रडकुंडीला आली होती.


राधक्का,“कुटं गेलं असलं माजं लेकरू. कडूसं पडून गेलं तरी आलं नाय आजूनशान. काय वं तुमी घिवून का नाय अलासा बरुबर त्येला.” ती रडत म्हणाली.


महेंद्रप्रताप,“ व्हय बाय म्या त्येला पुडं घालूनशान आणाया पाजेल हुतं. म्या गडी धाडला हाय त्येच्या मागं पर दोगास्नीचा पत्ता नाय बग.” ते ही आता काळजीने बोलत होते.

★★★


   इकडे राघवेंद्र मात्र माजगावच्या नदीकाठी एकटाच बसून होता. त्याच्याबरोबर महेंद्रप्रतापरावांनी पाठवलेला गडी होता पण तो त्यांच्यापासून लांब उभा होता. राघवेंद्र त्याच्याच विचारात गढला होता. त्याला संध्याकाळ होऊन गेलेली ही कळली नाही. त्याच्याबरोबर असलेला गडी देखील आता ताटकळला होता शेवटी हिम्मत करून तो राघवेंद्र जवळ गेला.


गडी,“ धाकलं सरकार किती येळ बसणार जी हतं.?पार कडूसं पडूसशान अंदार झाला जी. वाड्यावर समदी काळजी करत असत्यात नव्हं.” 


राघवेंद्र,“ त्वां कवा पासनं थांबला हायस हतं?” त्याने भानावर येत त्याला विचारलं.


गडी,“ जी तुमीच्या मागंच आलू नव्हं म्या. तवा पासनं हतंच हाय जी. गावातल्या एकाला खंदिल अनाया लावलं हुता त्यो बगा त्यो आलाच नव्हं. सरकार अपुन शेतात  जावूनशान जीप घुवून जायाचं? का चालत वाड्यावर जायाचं?” त्याने विचारलं आणि कंदील घेऊन एक माणूस आला त्याच्या हातात दोन कंदील होते त्यातला एक  त्याने काहीच न बोलता गड्याच्या हातात दिला आणि तो आला तसा  निघून ही गेला.


राघवेंद्र,“ चल चालत. शेतावर जाऊ पातूर आपून वाड्यावर जातूया हतंनं. जीप काय आपल्याच शेतावर हाय. कवाबी घेऊन जाया इत्या.” तो स्वतःला सावरत म्हणाला आणि चालायला लागला. गडी त्याला कंदिलाच्या उजेडात वाट दाखवत होता.


   राघवेंद्र दीड तासाने वाड्यावर पोहोचला. गड्याने महेंद्रप्रतापरावांकडे पाहून  मी जातो म्हणून डोळ्यांनी खुणावले आणि तो निघून गेला.  राधक्काने राघवेंद्रला पाहून त्याच्याकडे धाव घेतली.


राधक्का,“ कुटं गेलतास रं लेकरा? हिवडा येळ लावत्यात व्हय घरी यायाला. आमचा जीव टांगणीला लागला हुता नव्हं.” त्या त्याच्या गालावरून मायेने हात फिरवत बोलत होत्या.तो मात्र शांतच होता. केस विस्कटलेले. रडून डोळे सुचले होते त्याचे.


सुभानराव,“ राधक्का अगं ईचारत काय बसलीस त्याला? जा जेवाया घी. सकाळ कवा जेवला हाय नव्हं त्यो भुका लागल्या अस्तिल्या त्याला. जा राघवा तोंड-हात-पाय दूवूनशान ये. नाम्या जा खंदील दाव सारकारास्नी परसात.” ते म्हणाले.


राघवेंद्र,“ नगं मला जेवाया.” तो म्हणाला आणि मागच्या दारात निघाला.नाम्या त्याच्या मागे धावत गेला. 


महेंद्रप्रताप,“ राधे जा. जा उपरनं घिवून.” ते हळूच म्हणाले.


दिवाणजी,“ म्या बी येतू जी सरकार आता.”


महेंद्रप्रताप,“बरं पर गण्या. तुमास्नी सुडून इल. जा रं गण्या.” ते म्हणाले आणि गण्या दिवाणजींबरोबर  गेला.


सुभानराव,“ महेंद्रा आता काय बी इशय काडू नगं बाबा. बगीतला नव्हं पोराचा अवतार रडून पार डोळं सुजल्याती. जरा दमानं घी बाबा. तरनं पोरगं हाय आपलं.” ते त्याला समजावत होते.


महेंद्रप्रताप,“ व्हय अण्णा उंद्या बुलतु म्या पर कडाक शबुदात त्येला समज द्यायाला  पायजेल. तुमी आन राधी मातूर गॉड बोला त्येचेशी म्हंजी त्येला घरातली समदी दुष्मन वाटायची नायती. म्या हुतु त्याचा दुष्मन एकला.” ते आवंढा गिळत म्हणाले.


सुभानराव,“ महिंद्रा म्या तुला बुलतु काय बाय पार त्वां मला कंदी बी तरास दिला नाय बग! माजा गुणाचा ल्योक हाय.  राघव बी हाय गुणाचा पर त्येचा पाय घशीरला हाय. त्या बाईला आणून बी ठिवली असती माडीवर त्येच्या साटनं पर नगं बाबा ती रीत बी आन ते पाप बी आता. आदीच कमी पापं हायती व्हय जहागिरदारांच्या डोस्क्यावर पर पुण्याई हाय आजूनशान पाटीशी म्हणूनशान समदं निभतया.” ते बोलत होते.


महेंद्रप्रताप,“ व्हय अण्णा म्हणूनशान म्या असं वागतुया नव्हं. राघव ज्या वाटंवर जातूया नव्हं ती वाट लय वंगाळ हाय.” ते दोघे बोलत होते तोपर्यंत राघवेंद्र चौकात आला. आणि पायऱ्या चढून वर जाऊ लागला. राधक्का त्याच्या मागोमाग लगबगीने आली.


राधक्का,“ आरं राघव थांब की वर कुटं निगालास बिन जेवता?” त्यांनी विचारलं.


राघवेंद्र,“ आई मला जेवान नाय करायाचं.” तो म्हणाला आणि निघून गेला. त्याने खोलीचे दार धाडकन लावून घेतले. 


सुभानराव,“ त्यो नाय जेवायचा आता. राधक्का ताब्याभर  ऊन ऊन दूद घिवूनशान ये म्या त्येची समजूत काडूनशान त्येला दूद पाजून येतू. मंग आपून जेवान करू.” 


   ते म्हणाले आणि राधक्का गरम दूधाचा तांब्या कापडात  धरून घेऊन आली. आणि सुभानरावांच्या हातात दिला ते काठी टेकत जिना चढून वर गेले. खोलीचे दारनुसते पुढे लोटलेलं होतं ते हातातल्या काठीने  ढकलून आत गेले. राघवेंद्र खाटावर पालथा पडून हुंदके देत होता. सुभानरावांनी तिथल्या टेबलवर दूध ठेवले आणि ते खाटावर बसून त्याच्या  केसात हात फिरवत बसले.


राघवेंद्र,“ म्या म्हणलो नव्हं अण्णा मला जेवायाच नाय. तुमी जावा बगू.” तो तोंड फिरवून घेत म्हणाला.


सुभानराव,“ आरं पर म्या तुला जेवाया बुलवाया नाय आलो लेका. म्या दूद घिवून आलो हाय. ऊन ऊन हाय पिऊन घे बाबा.” ते त्याची समजूत काढत म्हणाले.


राघवेंद्र,“ नगं मला जावा तुमी हतंन.” तो पुन्हा चिडून म्हणाला.


सुभानराव,“ पर माज्यावर का रागवला हायस त्वां? म्या काय केलं? जे केलं तुझ्या बानं केलं नव्हं.” ते म्हणाले आणि राघवेंद्र उठून बसला.


राघवेंद्र,“ अण्णा म्या बारका नाय आता. तुमी काय बी संगसाला आन माजा इश्वास बसल. तात्या तुमाला आन आईला सांगतल्या बगार आन ईचारल्या बगार काय बी करत नायती. तात्या ततं अचानक आलं आन माजं काय बी ऐकूनशान घेतलं नाय. वरून हरणी आन तिच्या आईला दम दिला. मला वाटायाचं तुमच्या समद्याचा माज्यावर लय जीव हाय तवा तुमी हरणी बरुबर माजं लगीन लावून देसाल पर तसं नाय.” तो रागाने बोलत होता.


सुभानराव,“ ही बग राघव आपून उद्या बुलू आता त्वां दूद पी आन निज. त्वां दूद पिलं नाय तर ते दुगं बी काय खायची नायती आन मला म्हाताऱ्याला बी उपास घडलं लेका. एक तर भुका सहीन हुतं नायत्या मला. रातभर झ्वाप बी लागायची नाय मला.” ते तोंड फुगवून बोलत होते.


राघवेंद्र,“ व्हय का? तुमास्नी काय पर मी जेवलु आन नाय जेवलु?” तो डोळे पुसून फुर्गटून लहान मुलासारखे म्हणाला.


सुभानराव,“ लेका मंग आमाला नाय तर कुणाला असलं रं? ऱ्हा बाबा उपाशी अमी बी निजतु उपाशी .” ते खाटावरून उठत  म्हणाले.


राघवेंद्र,“ पितु मी दूद पर फकस्त तुमच्या साटनं अण्णा.” तो म्हणाला आणि दुधाचा तांब्या तोंडाला लावून एका दमात संपवला आणि त्यांच्या हातात दिला.


सुभानराव,“ आंग असं. आता निज बाबा.”ते म्हणाले आणि निघून गेले.


  ते खाली आले तर राधक्का आणि महेंद्रप्रतापराव चौकात त्यांचीच वाट पाहत होते.


महेंद्रप्रताप,“ पिलं नव्हं दूद त्येन?” त्यांनी विचारलं.


सुभानराव,“ लेका म्या आजा हाय त्येचा. त्याच्या बाचा बी बा नाय पिऊन करतुया काय? चला जिवून निजू आता.” ते म्हणाले.


  तिघे जेवायला बसले.


राधक्का,“ राघव इवडा चिडला हाय, काय झालं जी ततं? तुमी काय बी नाय सांगितलं जी.” तिने विचारलं


महेंद्रप्रताप,“ह्यो आपला लेक त्या तमासगिरणीच्या पोरी संग लगीन कराया निगला हाय. मला तसं म्हणला नव्हं तुला सांगतो राधे माजी तळपायाची आग मस्तकात गेली बग. मला वाटलं हुतं त्या हरणी बाईनं आपल्या लेकाला जाळ्यात वडलं हाय. अगं पर ती पोर तर सतरा आटरा वरसाची कवळी पोर हाय. लय झालं आता दोन तीन वरीस जालं न्हातीधुती झाली असलं. आन शेवंता बाय  ती तर घरात नस्तीया. चुकून झालं हाय त्या पोरी कडून समदं. आन आपलं पोरगं परिमात पडलं हाय तिच्या.” ते सांगत होते.


सुभानराव,“ काय सांगतुया मला बी वाटलं हुतं मोटी बाय असलं म्हणूनशान. पर हे तर इपितर हाय की रं.”


राधक्का,“ पर आपला लेक तिच्या पिरिमात पडाया हाय काय त्या पोरीत ईवडं? आवं आपलं पोरगं म्हमईत हुतं,  गोऱ्यांच्या देशात शिकून आलं. त्यो असा कंदी वागला नाय जी.” तिने विचारलं


महेंद्रप्रताप,“ राधे पोरगीच तशी हाय कोणता बी बाप्या भुलल तिला. मंग आपला पोरगा तर तरणा ताटा हाय की. निसता मोत्या गत बदामी रंग,हरणीवानी डोळं, नकाशार, कुरळं काळ क्यास, शेलाटी आन तुला सांगतु म्या धा हात लांब हुतु तिच्या पासनं तरी बी तिच्या अंगाचा सुवास मला येत हुता. अक्षी देवानं संवताच्या हातानी घडीवली असलं तिला. उगा भाळला व्हय आपला राघव.” ते सांगत होते.


सुभानराव,“ रगात जहागीदाराचं हाय ते कुणावर बी भाळलं व्हय रं असंच.”


राधक्का,“ इतकं कौतिक नगा करू त्या नाचणारीच्या पोरीचं. आपली मालु बी लय देकनी हाय.” ती तोंड फुगवून म्हणाली.


महेंद्रप्रताप,“ अगं येडी का खुळी तू? दोगीची बरुबरी हुईल का राधे? अगं मालू म्हंजी सोन चाफ्याच फुल हाय. तुळशीची मंजिरी म्हणलं तरी चाललं. देवाला व्हात्याती दोनी बी. पवितर अक्षी गंगेवानी. आन ती पोरगी म्हंजी रानफुल हाय रानफुल किती बी सुनदार आन सुवासी असलं तरी  कोणी बी जनावर त्याला हुंगु शकतया नाय तर चोळामोळा करून टाकू शकतया.त्याच्या नशिबी मातीत मिळनं अस्तया देवाचे पाय नासत्यात त्याच्या नशिबी.” ते तिला समजावत होते.


सुभानराव,“ व्हय बाबा. पर तू दम दिलास म्हणं माय लेकिस्नी.” त्यांनी विचारलं.


हे ही वाचा👇


महेंद्रप्रताप,“ मंग काय आरती करू व्हय त्यांची? अण्णा म्या त्या मायलेकीचा मुडदाच पाडला असता पर पोर नादान हाय आन शेवंता पायात पडली माज्या. माजी माफी मागितली. म्हणूनशान निसता दम दिवून सोडलं म्या. पैकं दिलं तिला तर घितलं नाय तिनं. म्हणत हुती लगीन करणार हाय पोरीच धंद्याला नाय बसवायची. तिनं पोरीला समद्याच्या नजरंपसनं दडवलं हाय पर आपल्या राघवची नजर पोरीवर  कशी पडली तिला बी म्हैत नाय. पर त्यानं त्या पोरीला हात बी नाय लावला. वंगाळ वाटतंया बगा हिवडी देकनी पोर पर शेवंताच्या घरात जलमुन माती झाली तिच्या जिंदगीची. आता कोण करून घ्यायचं तिला सांगा? एकाद्या सावकाराच्या नजरला पडली तर उचलून घिवून जाणार बगा. पर ज्येच त्येच नशीब अस्तया.” ते खिन्नपणे बोलत होते.


सुभानराव,“ पर आपल्या पोराचा जीव जडला हाय तिच्यावर. पोरगं हळवं हाय. रडूनशान एका दिसात रया घालवून घितली बग त्यानं. उंद्या हुता हुईल तेवडं सुबुरीनं घे बाबा. पोराला जपाया पायजेल महेंद्रा.” ते काळजीने बोलत होते.


महेंद्रप्रताप,“ व्हय पर अण्णा त्याला दम द्याया लागलं नव्हं.” ते म्हणाले.


राधक्का,“ पर तुमी जरा सबुरीनं घ्या जी. आन मालू संग लगीन लावूनशान दिलं नव्हं, एकदाव हक्काची बायकू घरात आली म्हंजी त्यो इसरल समदं.” ती म्हणाली.


सुभानराव,“ मालू इसराया लावतीया बग त्येला समदं.चला आता निजूया बाबानू.” ते म्हणाले.


     पुढे काय घडणार होतं? राघवेंद्र मधुमालतीशी लग्न करायला तयार होईल का?

क्रमशः

©स्वामिनी चौगुले


कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग 14


अशाच मनोरंजक कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विचारू नका. 

       




Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post