दिसते तसे नसते भाग 1

भाग 1

  




  मिथिला नटून थटून ऑफिसला निघाली होती. मिथिला म्हणजे मिथिला देसाई गोरी गोमटी, गोल चेहऱ्याची नाकीडोळी नीटस आणि आकर्षक बांध्याची पस्तीस वर्षांची महिला. ती बॅग घेऊन पार्किंगमध्ये आली आणि स्कुटी काढून बाहेर पडली. चौथ्या मजल्यावरून तिला दहा वर्षांच्या किर्तीने गॅलरीत उभं राहून  बाय केलं.


“ बाय मम्मा!”


“ बाय बेटा.” ती हसून म्हणाली आणि स्कुटीवर बसून निघून गेली.किर्ती आज्जीबरोबर घरात गेली.


   त्याच सोसायटीतल्या सुधा आणि वीणा ते सगळं पाहून कुजबुजत होत्या.


सुधा,“ काय बाई ही मिथिला सहा महिने झाले आपल्या सोसायटीत राहायला आली आहे. आई-बाबा, भाऊ-वहिनी सगळे माहेरचीच लोकं दिसतात. तिच्या सासरचे तर कोणीच दिसत नाही.” 


वीणा,“ हो ना! सासरचे सोड नवरा ही दिसला नाही एकदा सुद्धा! पण बघ ना  नटते काय मुरडते काय! रोज नवीन ड्रेस काय! मेकअप काय आणि रोज नवनवीन डिझानचे मंगळसूत्र काय! दहा वर्षाची मुलगी आहे पण नवऱ्याचा पत्ता नाही. किती तो खर्च काय काम करते काय माहित?”



       ती नाक मुरडून बोलत होती आणि काही तरी राहिलं म्हणून स्कुटी सोसायटीच्या दारात लावून तिच्या आईला फोन करून खाली यायला सांगून  मिथिला त्यांच्या मागे उभी राहून आणि तिकडून तिची आई पुढे उभी राहून दोघींची त्यांच्या विषयी रंगलेली चर्चा ऐकत होत्या. दोघींचं ही लक्ष त्या दोघींकडे नव्हते. मिथिलाने घसा खाकरा आणि दोघी दचकल्या आणि जवळजवळ पळतच तिथून निघून गेल्या.


आई,“ हा घे डबा! आणि या बायकांकडे लक्ष देऊन तुझा मूड नको खराब करू. तू प्रसंन्न चित्ताने ऑफिसला जा.” त्या तिला समजावत म्हणाल्या.


मिथिला,“ हो आई! आणि अशा गोष्टींचा फरक पडत नाही आता मला. मी संध्याकाळी येताना बाबांचे औषध घेऊन येते. बाय.” ती हसून म्हणाली आणि निघून गेली.


 मिथिला एका मोठ्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर होती आणि सहा महिने आधीच तिची बदली प्रमोशनवर पुण्यात झाली होती. ती सहा महिने आधीच मधूबन  सोसायटीत  भाड्याने फ्लॅट घेऊन राहायला आली होती. ती राहायला आल्यापासून तिचे आई-बाबा, छोटी किर्ती असे चौघे राहत होते.   सामान शिफ्ट  करताना तिचे  दादा आणि वहिनी आणि त्यांची दोन मुले नीरज आणि सूरज आले होते आणि अधून मधून ते येत जात असत. त्यामुळे सोसायटीतल्या महिला मंडळात तिच्या विषयी सतत चर्चा रंगत असत. की तिच्या माहेरचे लोकच दिसतात. सासरचे कोणीच दिसत नाही एवढेच काय पण गेल्या सहा महिन्यात तिचा नवरा एकदाही दिसला नाही. पण हिला विधवा म्हणावी तर ही मोठाले मंगळसूत्र घालून फिरते आणि घटस्फोटीत असेल तरी बायका इतकी मोठाली मंगळसूत्र थोडीच घालून फिरतात? सोसायटीतल्या बायकांना प्रश्न पडायचे पण त्याची उत्तरं मात्र मिळत नव्हती मिथिला आणि तिच्या घरच्यांनी देखील काही सांगण्याची तसदी घेतली नव्हती.उलट ती आणि तिची आई सगळ्यांकडे दुर्लक्ष करत होत्या आजही दोघींनी सुधा आणि वीणाकडे दुर्लक्ष केलं होतं.


  पाहता पाहता जानेवारी महिना उजाडला आणि संक्रात आली. मिथिलाच्या आईने संक्रांत पुजली. ओवसायला त्या सोसायटीच्या जवळ असलेल्या विठ्ठल मंदिरात जाऊन आल्या. पण मिथिलाने ना संक्रात पुजली ना  ओवसायला गेली.त्यामुळे पुन्हा त्यांच्या सोसायटीत तिच्या विषयी चर्चा रंगली. 


संध्याकाळच्या वेळी मुले सोसायटी गार्डनमध्ये खेळत होती आणि बायका गप्पा मारत बसल्या होत्या. हळदी-कुंकवाचा विषय सुरू होता आणि पुन्हा विषय मिथिलावर आला.


एक बाई,“ काय गं तुमच्या विंगमधली ती मिथिला तिने संक्रांत पुजली नाही म्हणे? तिची आई तर दिसली होती मंदिरात. मग ही इतके मोठे मंगळसूत्र कशाला घालून फिरते? मी तर बाई तिला नाही बोलावले हळदी-कुंकवाला.  कोण कुठली आहे नवरा कोण आहे? आहे तरी का नाही? काय माहित बाई.” ती बोलत होती.


सुधा,“ हो ना.काय सांगायचं अहो तिची मुलगी किर्ती माझ्या राणीच्याच क्लासमध्ये आहे ना. तर राणी सांगत होती की किर्ती तिचे पूर्ण नाव किर्ती मिथिला देसाई असे सांगते. आणि काल तर किर्ती राणीला टॅब दाखवायला घेऊन आली होती. तिच्या मम्माने म्हणे तिला अभ्यास करायला घेऊन दिला आहे. तो टॅब कमीत कमी चाळीस हजारांचा तर असेल बघा; मग काय आमची राणी लागली रडायला. तिला ही टॅब हवा पण दहा वर्षाच्या मुलांच्या हातात असल्या वस्तू द्यायच्याच कशाला? आणि इतका पैसा येतो कुठून बाई? माझ्या नवऱ्याला सत्तर हजार पगार आहे पण खर्च भागवता भागवता नाकी नऊ येते.” ती बोलत होती.


वीणा,“ हो ना.आणि किती नटून जाते पाहिलं का? काय काम करते देव जाणे. इतका पैसा मिळतो ते?” ती म्हणाली.


दुसरी बाई,“ जात असेल गं तसलं काम करायला. म्हणून तर इतका पैसा खर्च करते नाही तर एका बाईला आई-वडील,मुलगी सांभाळून, घर भाडे आणि बाकी खर्च करणे शक्य आहे का?” ती बोलत होती.


सुधा,“ अशा बाईला कशाला बोलवायचे हळदी- कुंकवाला? देव जाणे लग्न तरी झाले आहे की नाही? की दाखवायला मंगळसूत्र घालून फिरते?” ती तोंड वाकडं करत म्हणाली.



  आणि त्यांची सुरू असलेली चर्चा तिथेच थोड्या अंतरावर बसलेली मिथिलाची आई ऐकत होती. मिथिलाच्या आईला मात्र त्या बायकांच्या बोलण्याचे वाईट वाटले. त्यांनी किर्तीला हाक मारली आणि घरी निघून आल्या. मिथिलाच्या बाबांनी दार उघडले. मिथिलाच्या आईचा उतरलेला चेहरा पाहून त्यांना कळून चुकले की खाली काही तरी घडले आहे. 


बाबा,“ किट्टू तू जा बच्चा तुझ्या रूममध्ये अभ्यास कर.” ते म्हणाले.


किर्ती,“ हो आजोबा.” म्हणून निघून गेली. मिथिलाच्या आई काही तरी विचार करत सोफ्यावर बसल्या होत्या.


बाबा,“ काय झालं? चेहरा का पडला आहे तुझा?”


आई,“ काही नाही वो या सोसायटीतल्या बायका आपल्या मिथु विषयी आज नको नको ते बोलत होत्या.” त्या म्हणाल्या.


बाबा,“ हे आपल्यासाठी नवीन आहे का? सरळ दुर्लक्ष करायचं.” ते म्हणाले.


आई,“ इतर वेळी मी दुर्लक्ष करतेच ना पण त्या मिथुच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होत्या.आणि ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही. मी या बायकांचं तोंड कायमचे बंद करायचे ठरवले आहे. खूप झाले आता.” त्या ठामपणे म्हणाल्या.


बाबा,“ पण काय करणार आहेस तू?” त्यांनी विचारलं.


आई,“ आज शुक्रवार आहे परवा रविवार, मिथुला सुट्टी असते आणि सतीश-वृंदाला ही. मी रविवारी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवणार आहे आणि सोसायटीतल्या सगळ्या साळकाया- म्हाळकायांना बोलावणार आहे.” त्या मनोमन काही  तरी ठरवत म्हणाल्या.


बाबा,“ आले लक्षात तू आणि वृंदा काय करणार आहात ते? करा म्हणजे यांची तोंडं कायमची बंद होतील.” ते हसून म्हणाले.


   संध्याकाळी मिथिला कामावरून आली. जेवण करताना आईंनी विषय काढला.


आई,“रविवारी आपण हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करणार आहोत. वृंदा आणि सतीश ही येणार आहेत गं.” त्या म्हणाल्या.


मिथिला,“ पण असे अचानक? बरं झालं निरु आणि सुरूला पण भेटणे होईल. हो ना किट्टू? ” ती हसत म्हणाली.


किट्टू,“ येस मम्मा दादा येणार. खूप खूप मजा येणार.” ती आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाली.


मिथिला,“ हो ना. तुम्ही दोघी हळदी-कुंकू करा तोपर्यंत मी पोरांना बाहेर फिरवून आणते.” ती म्हणाली.


आई,“ तू कुठे ही जायचं नाही. घरातच थांबायचं.” त्या म्हणाल्या.


मिथिला,“ पण आई….” ती अडखळत म्हणाली.


आई,“ मिथु ऐकत जा बेटा. आणि उद्या आपण हळदी-कुंकू समारंभाचा बाजार घेऊन येऊ.” त्या म्हणाल्या.


मिथिला,“ बरं.” ती म्हणाली.

★★★★


   दुसऱ्या दिवशी मिथिलाच्या आईने सगळ्या सोसायटीत स्वतः जाऊन हळदी-कुंकवाचे आमंत्रण दिले. सगळ्या बायकांना खरं तर आश्चर्य वाटत होते पण जावून पाहू तरी असं सगळ्यांनी एक मताने ठरवले. मिथिला संध्याकाळी आल्यावर आई आणि ती बाजार घेऊन आल्या. त्या बाजारातून येऊ पर्यंत वृंदा आणि सतीश सूरज-नीरजला घेऊन हजर होते. पोरांनी दंगा घातला होता. बाबा आणि सतीश गप्पा मारत होते आणि स्वयंपाक घरातून स्वयंपाकाचा खमंग वास  सुटला होता. मिथिला किचनमध्ये पाणी घ्यायला गेली.


मिथिला,“ वृंदा आल्या आल्या स्वयंपाकाला लागलीस होय गं? तुला कंटाळा वगैरे येतो की नाही?” तिने हसून विचारलं.


वृंदा,“ कंटाळा कसला ओ ताई आपल्याच माणसांसाठी करायला. आणि आज तर किट्टूच्या आवडीचे सगळे आहे. बघा कशी खुश होणार आता. श्रीखंड येणातानाच घेऊन आलो आम्ही आणि हा काय पुलाव झालाच आणि ही भाजी. गरम गरम पुऱ्या तळल्या की झाले.सगळे जेवायला बसू.” ती पुऱ्या तळत बोलत होती.


मिथिला,“ मग आज बाईसाहेब खूपच खुश; आज आंटीच्या हातचे जेवण मिळणार. मलासारखं सुनावते मम्मा तुला आंटीसारखे काही येत नाही. बरं येताना मी आईस्क्रीम घेऊन आले आहे. फ्रीजमध्ये ठेवते. जेवण झाल्यावर आठवण कर तेवढी.” ती हसून म्हणाली.


वृंदा,“ माहीत आहे ताई मला आपल्या किट्टूला माझ्या हातचे जेवण आवडते.” ती हसून म्हणाली.


सगळे मस्त गप्पा मारत जेवले आणि झोपून गेले.


उद्या संध्याकाळी हळदी- कुंकवाच्या कार्यक्रम मिथिलाच्या आईने नेमकं काय करायचे ठरवले होते?


पाहूया पुढच्या आणि अंतिम भागात

©स्वामिनी चौगुले


अशाच मनोवेधक कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.





 

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post