दुसऱ्या दिवशी सकाळी राघवेंद्र उशिराच उठला. त्याने त्याचं सगळं आवरलं.त्याच्या आधीच महेंद्रप्रताप आणि सुभानराव आवरून न्याहरीसाठी त्याची वाट पाहत बसले होते. तो परसदारातुन स्वयंपाक घरात न जाता तसाच पुढे जाऊ लागला तर महेंद्रप्रतापरावांनी त्याला रोखले.
महेंद्रप्रताप,“ कुटं निगाला? चल न्ह्यारी कर. मंग मला तुझ्याशी बोलायाचं हाय.” ते म्हणाले.
राघवेंद्र,“ बोलण्यावाणी काय राहिलं हाय का आजूनशान?” त्याने विचारलं आणि महेंद्रप्रताप भडकले.
महेंद्रप्रताप,“ ह्याला म्हणत्यात चोराची उलटी बॉम! पोरगं तरनं हाय म्हणूनशान जरा गॉड बोलावं म्हणलं तर ह्यो डोस्क्यावर बसाया लागला की.”त्यांचा वाढलेला आवाज ऐकून राधक्का आणि सुभानराव बाहेर आले.
सुभानराव,“ काय झालं रं आवाज चडवाया महिंद्रा?” त्यांनी विचारलं.
महेंद्रप्रताप,“ याला ईचारा की अण्णा. काय झालं ते. डोस्क्यावर बसला हाय ह्यो.” ते तणतणत होते आणि सगळे नोकर चाकर काम सोडून आवाज ऐकून गोळा झाले. राधक्काने ते पाहिलं.
राधक्का,“ आपून आमच्या खुलीत जावूनशान बुलू. आन तुमी तुमास्नी कामं नायत का? जावा कामाला लागा.” त्या म्हणाल्या. तसे सगळे नोकर चाकर पांगले.
सुभानराव,“ तुमी दोगं बी चला.” ते म्हणाले आणि सगळे राधक्का आणि प्रतापरावांच्या खोलीमध्ये गेले.आणि राधक्काने दार लावून घेतले.
महेंद्रप्रताप,“ याला सांगा अण्णा त्या पोरीचा नाद सोडाया नाय तर लय वंगाळ हुईल. आमी उंद्या मालूची आन ह्याच्या लगनाची सुपारी फोडाया भावकी आन गावकी घिवून जातूया.गप लगानाला हुबं ऱ्हायाचं.” ते रागाने बोलत होते.
राघवेंद्र,“ माजं लगीन? त्ये बी मधुमालती संगट? मला ईचारलं का? मला नाय करायचं हे लगीन.” तो ही आता रागाने म्हणाला.
महेंद्रप्रताप,“ मगं कुणा संगं लगीन करायाचं हाय तुला त्या तामसगिरणीच्या पोरी संगं? तिच्या संग लगीन करून या पोराला समद्या खानदानाच्या इब्रतिला बट्टा लावायाचा हात अण्णा. लोकं श्यान घालत्याल आपल्या तोंडात. नांदाया गेलेल्या आपल्या रमीला तिच्या सासरची अनुनशान सोडत्याला हतं. पर म्या हे समदं हु नाय द्यायचो. म्या त्या तमासगिरणीचा आन तिच्या पोरीचा मुडदा पाडन आन मंग संवता जीव दिईन पर जहागीरदार खानदानाचं नाव बुडू द्यायचो नाय. मगं कर म्हणवं याला काय करायाचं ते.” ते रागाने बोलत होते.
राघवेंद्र,“ म्हंजी लोकं आपल्या इशयी बोलत्यात ते समदं खरं हाय तर? जहागीरदार मुडदं पडून त्यास्नी परसात पुरत्यात. मला वाटायाचं की उगाच भ्या घालाया हे आपल्या आज्या पंज्यानी अवई उटवली असलं. पर तसं नाय म्हणायाचं. पर तात्या मी तुमच्या धमक्यास्नी नाय भ्यायाचू.” तो चिडून बोलत होता.
महेंद्रप्रताप,“ बगतलंस राधे कसं पकं फुटलं हायती याला? राघवा ह्यो महेंद्रप्रताप निसत्या धमक्या दित नस्तूया माज्या घरणाच्या इब्रतीवर कोण उटला तर त्यो मेला. त्या दुगी आता जित्या ऱ्हायाच्या नायत्या.” ते गरजले.
राघवेंद्र,” त्या दुगी नाय तर मी तुमच्या इब्रतीला बट्टा लावतुया. त्यास्नी नाय मला मारा की तात्या.” तोही रागातच म्हणाला.
राधक्का,“ आरं राघव काय बुलतुयास त्वां?” ती मध्येच रडकुंडीला येत म्हणाली.
महेंद्रप्रताप,“ अगं बुलू दि की.चांगलं पांग फेडतुया आपला लेक राधे.”
सुभानराव,“ राधक्का त्वां राघवला घिवून जा मला महेंद्रा संग बोलायाचं हाय.” ते शांतपणे म्हणाले आणि राधक्का राघवेंद्रला घेऊन बाहेर आली सुभानरावांनी दार लावून घेतलं.
महेंद्रप्रताप,“ बगातलं का अण्णा कसा बुलतुया त्यो.” ते रागाने म्हणाले.
सुभानराव,“ व्हय पर म्या काय सांगतलं हुतं तुला जरा सबुरीनं घे. पर त्वां धमकवाया लागलास की त्येला. असं वागलास तर पोरगं हातचं जाईल महिंद्रा! मामला लय नाजूक हाय. त्वां रागराग करशीला आन त्यो इरला पेटल. आरं त्या पोरीचा हात धरुण पळून गेला म्हंजी ह्यो! तुला कळतया का नाय. त्वां एक शबुद बी बुलू नगु त्याला म्या बगतू. समदं सवाल रागानं नायती सुटत लेका.” ते त्यांना समजावत होते.
महेंद्रप्रताप,“ ह्यो तर ईचारक केला नाय की म्या अण्णा! तुमीच बोला आन त्याला हे लगीन कराया तयार करा.” ते विचार करून म्हणाले.
सुभानराव,“ व्हय म्या बोलतु त्वा जा. शेतावर लगोलग आन त्वां लय रागात हाय असंच दाव बाकी म्या बगून घेतु.”ते म्हणाले.
महेंद्रप्रताप,“ अण्णा नातवा बरुबर राजकारण करणार व्हय तुमी?” त्यांनी हसून विचारलं.
सुभानराव,“ लेका दाम, दंड आन भेद चालत नसलं तवा सामवर यायाचं असतंया आन भेद करायचा रं! त्येचा मानगुटीवर पेरमाच भूत बसलया. आन तुजा लेक सदासुदा नाय बाबा गोऱ्यांच्या देशात शिकून आलाय नव्हं ते बी कायदा, मंग त्येला येगळ्या रितीनं सांगाया पायजे. त्वां जा समद्यास्नी आदीच सांगतलं हाय पर उंद्या तामडं फुटाया रेल्वे फलाटावर जायचं हाय म्हणूनशान सांग जा. म्या राधक्काला समदी तयारी कराया सांगतु. आन पोरीला सताऱ्यात दुकानामंदी निवूनशान झाक पाताळ घ्या. आन बाकी बायास्नी बी. जा आता.”
ते म्हणाले आणि महेंद्रप्रताप जोरात दारं उघडून चौकात बसलेल्या राघवेंद्रकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत निघून गेले. राघवेंद्र पण रागाने धुमसत होता. सुभानराव चौकात आले.
सुभानराव,“ राधक्का महिंद्रा उपाशीच गेला बाय शेतावर गड्याला धाड जेवान घिवूनशान. आन आमा दोगांची न्हारी वर पाटीव आन त्वां बी खाऊन घे बाई. राघव चल वरी.” ते म्हणाले आणि राधक्का होकारार्थी मान हलवून निघून गेली. राघवेंद्र रागातच वर गेला आणि त्याच्या पाठोपाठ सुभानराव देखिल.
राघवेंद्र,“ अण्णा मला काय बी बोलायाचं नाय.” तो रागाने म्हणाला.
सुभानराव,“ नगं बोलू पर ऐकूनशान तर घी बाबा. आरं त्वां जे काय ऐकलं नव्हं लोकांकडनं ते समदं खरं हाय. जहागिरदारांनी असं किती कडू बी आन ठिवलेल्या बाया आन आपल्या इरुद गेलेलं आन गद्दारी केलेलं बाप्यांचं मूडदं परसात ती भीत दिस्तीया ना तिच्या पल्याड पुरलं हायती. म्या संवता एका बाईचा मूडदा पुरला हाय ह्या हातांनं.” ते बोलत होते आणि राघवेंद्रने त्यांना आश्चर्याने पाहिलं.
राघवेंद्र,“ उगं काय तरी सांगूनशान मला भ्या नगा दावू अण्णा.” तो अविश्वासाने म्हणाला.
सुभानराव,“ त्वां येडा हाय का राघव म्या कशा पाई तुला खोटं बोलीन रं? आरं आपल्यात पिड्यानपिड्या माडीवर बाय ठेवायाची रीत हाय त्या बायास्नी मुलं बाळं झाली नसत्यात काय? याचा इचार केला का कंदी त्वां?” त्यांनी त्याला विचारलं.
राघवेंद्र,“ व्हय की.” तो विचारात पडत म्हणाला.
सुभानराव,“ जनमाला आल्याली समदी बाळं घराण्यात कडू बी नगं म्हणुनशान जित्ती पुरली हायती ततं. म्या संवता ठिवलेल्या बाईची आन माजी चार पोरं ह्या माज्या हातानं पुरली हायती आन त्या बाईला बी मारून पुरलं हाय.” ते म्हणाले आणि राघवेंद्रला मात्र धक्काच बसला.
राघवेंद्र,“ काय बोलतायसा अण्णा? आवं तुमास्नी बगूनशान कोणी बी म्हणायाचं नाय की तुमी कुणाचा तरी जीव घितला असलं. मी तर माजा कुटुंबावर पिरिम करणारा आजा बगातला आज पातूर. पर तुमी कशा पाय त्या बाईला मारलं अण्णा?” त्याने विचारलं.
सुभानराव,“ राघवा ते ईचारु नगंस. जितकं मोटं घरानं अस्तया तिवडी काळी आन मोटी गुपितं बी असत्याती. आता म्या काय सांगतु ते ऐक. मला समजतया तुजं त्या पोरीवर पिरिम हाय पर ती पोरगी आपल्या घराण्याच्या आन तुज्या लायकीची नाय लेका. तिच्या संगट लगीन म्हंजी घराण्याला बट्टा. आरं त्वां असं काय केलं तर तुज्या नांदत्या भणीला म्हागारी अनुनशान सोडत्याला अन नवऱ्यानं टाकलेली बाई म्हंजी काय ही म्या तुला सांगाया नगं. पंचकृषित जहागीरदार घराण्याची बेअब्रू होईल. आपल्या घराण्याला जात पंचायत आन ह्यो समाज वाळीत टाकलं. त्वांड दावायला जागा नाय उरायची आपल्याला.
अन या उपर महिंद्रा हे समदं व्हायाच्या आदी त्या पोरीला आन तिच्या आयला जिता सोडायाचा नाय त्यो त्यास्नी मारलं आन संवता बी मरलं. तुज्या आयला आन मला बी ही समदं सहीन हुनार नाय. आन अमी बी मरू. एका पोरी साटनं त्वां अक्की खानदान पणाला लावणार हाईस का? आन तुजं पिरिम तुज्याच पिरिमाचा त्या पोरीचा जीव जाईल त्येच काय? काय म्हणूनशान तू त्या पोरीच्या जीवावर उटला हायस?
म्या तुजा आजा हाय लेका म्या सांगतु ते ऐक मालू बरुबर लगीन कर. ती बी देकणी हाय. तुज्यावानी शिकली सवरली हाय. आन खानदानी बी हाय. यात तुजं आन त्या पोरीच आन समद्याचं भलं हाय.” ते त्याला समजावत होते.
राघवेंद्र,“ पर अण्णा माजं मधुमालती वर नाय तर हरणीवर पिरिम हाय.” त्यांचे बोलणे ऐकून रडकुंडीला येत म्हणाला.
br />सुभानराव,“ आता हाय का? समदं रामायण सांगूनशान बी रामाची शिता कुन हुती? पोरा आपल्यात रीत हुती बाय ठिवायची तुला ठिव म्हणली असती माडीवर तुज्या हरणीला पर ती वाट लय वंगाळ हाय बाबा.नगु ते. आदीच आपल्या घरण्यावर लय पापं हायती अजून नगु बाबा. आन पिरिम काय हुतंया की एकदाव लगीन झाल्यावर. आरं त्वां मालूला भेटला हाय बगीलं हाय. पर तुज्या बानं तर तुज्या आयला आन म्या तुज्या आजीला लगना आंदी बगीलं सुदीक नवतं. म्या तर तुज्या आजीला पइल्या रातीला बगतलं बाबा. बग बाबा इचार कर आन तयार हु लगीन कराया.( ते बोलत होते आणि रखमा जेवण घेऊन आली.) चल खाऊन घी बाबा.”
राघवेंद्र,“ नगु मला.”
सुभानराव,“ आता रं उपाशी ऱ्हावुनशान काय हुनार हाय तवा? गप जीवतुस का आता? काय दिव एक रट्टा? राती बी जीवला नाईस त्वां.” ते म्हणाले आणि राघवेंद्र नाईलाजाने जेवायला बसला.राघवेंद्र मात्र सुभानरावांच्या बोलण्याने विचारात पडला होता.
सुभानराव,“ बरं म्या जातू आता आन त्वां इचार कर आन कडूसं पडाया मला आन तुज्या बाला सांग काय ठरिवलं ते.” ते म्हणाले आणि निघून गेले. राधक्का चौकात त्यांचीच वाट पाहत होती.
राधक्का,“ काय म्हणला राघव? जेवाण केलं नव्हं त्येनं? राती बी नवतं जेवलं माजं लेकरू.” ती म्हणाली.
सुभानराव,“ व्हय जेवला हाय त्यो, पॉटभर नाय पर जेवला तर नव्हं. जा त्वां बी जेव आन उंद्या जाणार हायसा नव्हं सुपारी फोडाया मंग तयारीला लाग बाय आता.” ते म्हणाले.
राधक्का,“ पर मामंजी राघव लगीन कराया नाय म्हतुया नव्हं. मंग कसं करायचं जी?” ती काळजीने म्हणाली
सुभानराव,“ त्वां त्येची काळजी करू नगंस. त्यो कडूसं पडायच्या येळी संवता संगतुया कनाय बग म्या मालू बरुबर लगीन कराया तयार हाय म्हणूनशान.” ते मिशी पिळत म्हणाले.
राधक्का,“ तुमी सांगताया म्हंजी तसंच हुनार.” ती हसून म्हणाली आणि निघून गेली.
राघव आणि हरणीने प्रकरण वाड्यावर कळल्यामुळे वाड्यात वादळ आले होते. महेंद्रप्रताप राघवेंद्रच्या या प्रेम प्रकरणाला उघड विरोध करत होते तर राधक्का आणि सुभानरावांचा छुपा विरोध होता. या मागे तो एकटा पडू नये किंवा आपलं इथं कोणी नाही असा त्याचा समज होऊ नये हा हेतू होता. आज तर महेंद्रप्रताप आणि राघवेंद्रमध्ये खडाजंगी झाली होती आणि सुभानरावांनी मध्यस्थी केली होती. त्यांनी राघवला बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या ज्या त्याला माहित नव्हत्या. सुभानराव म्हणजे बेरकी माणूस माणसाला कुठं, काय आणि कसं पटवून द्यायचं ते पण आपण त्याच्या विरोधात आहोत हे न कळू देता हे त्यांना चांगलं जमत होतं. त्यात राघवेंद्र जरी त्यांच्यापेक्षा जास्त शिकला असला तरी अनुभवाने कमी असा तरुण मुलगा होता. त्याच्या मनाच्या विरुद्ध न बोलता देखील त्याला आपले म्हणणे पटवून देणे सुभानरावांना अगदी सहज नसले तरी शक्य नक्कीच होते आणि त्यांनी तेच केलं होतं. त्यांचे सगळे बोलणे ऐकून राघवेंद्रला त्यांनी विचार करायला भाग पाडले होते.
राघवेंद्र सुभानरावांना वाटत होतं तसा मधुमालतीशी लग्न करण्याचा निर्णय घेणार होता का? की हरणीशी लग्न करण्याच्या निर्णयावर तो ठाम राहणार होता?
क्रमशः
©swamini chougule
कथेचा या आधीचा भाग खालील लिंकवर👇
अशाच मनोरंजक कथा वाचण्यासाठी लाईक आणि फॉलो करा आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला

