अप्पा मदनला घेऊन दुसऱ्याच दिवशी पहाटेच कुठे तरी निघून गेले. राघवेंद्रला मात्र त्याच्या मागे काय घडत आहे त्याची कोणतीही कल्पना नव्हती. तो नेहमीप्रमाणे मदनला भेटायला दुकानावर गेला तर त्याला मदनच्या भावाकडून कळलं की मदन आणि अप्पा बाहेर गावाला गेले आहेत आणि ते आठ दहा दिवस येणार नाहीत.
राघवेंद्र निराश होऊन घरी परत आला. त्याच्या मागावर मात्र महेंद्रप्रतापांनी दोन माणसे सोडली होती आणि तो काय काय करतो याची इत्यंभूत माहिती महेंद्रप्रतापना कळत होती. आज पाच दिवस होऊन केले तरी राघव माजगावला गेला नव्हता त्यामुळे सुभानरावांना मात्र आता मिळालेल्या बातमीबद्दल शंका येत होती. आज राघवेंद्र महेंद्रप्रतापांच्या सांगण्यावरून शेती पाहायला जीप घेऊन जवळच्या गावात गेला होता. महेंद्रप्रताप आणि सुभानराव राघवेंद्रच्या लग्नासाठी लागणाऱ्या पैशाचा हिशोब करत बसले होते.
महेंद्रप्रताप,“ इवड्यावर भागतया का नाय अण्णा? मला वाटतंया की रिन काडाव लागतंया का काय? तरी राधी लय हुसार हाय बगा आपली. तिनं रमी साटनं कसं जरा जरा दागीनं करूनशान ठिवलं हुतं तसं तिच्याबरुबर सुनं साटनं बी दागिनं करून ठिवलं हायती.बाकी कपडालत्ता इवड्यात भागतुया आन जेवणान पदंरा का इस दिस समद्या गावाला घातलं तरी बी आपल्याला वरीसभर पुरलं ईवडं धान्य हाय ठेचलंलं घरात.जरा पैकं कमी पडत्याल असं वाटतंया हात खर्चालाच.” ते विचार करत बोलत होते. तोपर्यंत राधक्का तिथे आली.
राधक्का,“ ही घ्या पंचइस हाजार हायती जी.” ती डोक्यावरचा पदर सावरत नोटांचा गठ्ठा त्यांच्यासमोर ठेवत म्हणाली.
महेंद्रप्रताप,“ हिवडं पैकं कुटून आलं राधे तुज्याकडं?” त्यांनी आश्चर्याने विचारलं.
राधक्का,“ माजी कमाई हाय ही हिवड्या वरसातली. गोट्यात इतक्या म्हशी, गया हायत्या आन दोन-चारसे कोंबड्या. आन गया, म्हशीच दूद आन तूप अपुन चार माणसं आन धा बारा नोकर चाकर बी खाऊन खाऊन किती खाणार हाय जी? म्हणूनशान म्या ऱ्हाइलेल्या दुदाच तूप काडून आन अंडी तर किती खाणार अपुन म्हणूनशान अंडी बी रकमीला आठवडा बाजारात निवून इकाया लावत हुती. कदी तर पैका कामाला इनार नव्हं म्हणूनशान साटविला आन आता त्यो कामाला आला. जशी लेक पाटीवली नव्हं दागिन्यांनी मडवून तशी सून बी येणार हाय. समदं दगीनं अक्षी मंगळसूत्र बी करून ठिवलं हाय म्या. आता फकस्त आयार म्हायार आन मानपान करायला पैका लागिल आन बाकी समदं घरात हाय की.आन रिन काडायची काय बी गरज नाय पडायाची जहागीदार हाऊत आपण रिन काडलं तर लोकं काय म्हणत्याली?” ती बोलत होती.
सुभानराव,“ म्या माज्या घरात राधक्काच्या रुपात लक्ष्मीच आणली हाय महिंद्रा! अक्षी सासूच्या पावलावरी पाऊल हाय पोरीचं. म्या तर बिन इचार करता दौलत जादा करून यायचो आन मग पैका कमी पडला की त्वांड पाडूनशान बसायचो आन तुझी आय हळूच कनवटीच्या नोटाकाडून द्यायाची.” ते कौतुकाने बोलत होते.
राधक्का,“ व्हय जी मामंजी आत्याबाईनचं शिकविलं हुतं मला फकस्त एक इश्वासातली नोकर बाई धर आन तिला पाठीव तिला बी त्या पैक्यातलं चार-दून रुपय देत जा सांगितलं आन मी अक्षी तसंच केलं जी. आता आलं बगा उपयुगाला पैकं.बास हुत्याल नव्हं ईवडं?” ती समाधानाने म्हणाली आणि तिने महेंद्रप्रतापांकडे पाहत विचारलं.
महेंद्रप्रताप,“ बास हुत्याल का? अगं राधे इवड्यात समदं लगीन हुईल की. काय ओ दिवाणजी?” त्यांनी विचारलं.
दिवाणजी,“ व्हय तर.” ते म्हणाले.
महेंद्रप्रताप,“ मंग माजी बायकू हायच हुसार.” ते हसून कौतुकाने राधक्काकडं पाहत म्हणाले.
राधक्का,“ तुमचं काय बी.”ती लाजून पदराने तोंड झाकून आत निघून गेली.
सुभानराव,“ महिंद्रा राघवची काय खबर बात? त्यो गिला का नाय त्या बाईला भेटाया?”
महेंद्रप्रताप,“ नाय तर आपली माणसं मागावर हायतं नव्हं. पर राघव तकडं फरकला बी नाय अण्णा.” ते बोलत होते.
सुभानराव,“ मंग त्या पोरानं अपल्यास्नी खुट तर सांगितलं नसलं व्हय रं?” ते विचार करत म्हणाले.
महेंद्रप्रताप,“ नाय नाय जहागीदारांचा वचक हाय समदीकडं आन अपुन काय करतु आपल्या संग खोटं बोलल्यावर ते म्हैत हाय लोकांस्नी आन धाकल सरकार हाय आपला राघव तवा असं खोटं नाय बोलणार त्यो पोरगा. बगू की आज ना उद्या हाती गावणार हाय अण्णा ह्यो आन याची कोण हाय ती हरणी का कोण ती.” ते बोलत होते.
सुभानराव,“ व्हय ते बी हाय म्हणा.” ते म्हणाले.
★★★
दोन दिवस असेच गेले राघवेंद्र मात्र आता मनातून हरणीला भेटण्यासाठी अस्वस्थ झाला होता. पण मदन नसल्यामुळे तो हरणीला भेटायला कचरत होता. कारण माजगावमध्ये त्याला सगळे ओळखत होते. मदन त्याच्या सोबत असला की तो हरणीला बोलवून आणत असे त्यामुळे त्याला स्वतःला समोर जायला लागत नसे म्हणून कोणी ओळखण्याचा किंवा बभ्रा होण्याचा प्रश्नच येत नसे. मात्र आता मदन नव्हता आणि तो स्वतः हरणीच्या घरी गेला तर लोक त्याला ओळखतील आणि घरापर्यंत त्याचे आणि हरणीचे प्रकरण पोहोचेल म्हणून तो कचरत होता खरा पण त्याच्या मनात द्वंद्व सुरू झाले होते. एक मन त्याला म्हणत होते की जा भेट हरणीला किती दिवस असा घाबरून राहणार आहेस एक दिवस घरी आणि सगळ्यांनाच कळणार आहे की तुझे तिच्यावर प्रेम आहे आणि दुसरे पण घाबरून सांगत होते. तू हरणीला भेटलास आणि वाड्यावर कोणी येऊन त्याबद्दल सांगितले तर नसतं वादळ उठेल.
या सगळ्या विचार चक्रातच तो रात्री झोपला होता पण त्याने खूप धाडसी निर्णय घेतला होता. तो सकाळी उठला त्याने त्याचे आवरले आणि न्याहरी करायला स्वयंपाक घरात गेला. महेंद्रप्रतापराव आणि सुभानराव ही तिथेच होते.
राघवेंद्र,“ मी काय म्हणतु तात्या मी आज माजगावला जाऊनशान येतू. ततंल श्यात म्या बगाया नाय अजून.” तो जेवत बोलत होता.
महेंद्रप्रताप, सुभानरावांनी आणि राधक्काने माजगावचे नाव ऐकून एकमेकांकडे पाहिले.
राघवेंद्र,“ तुमी असं गप कशा पायी हाय सा?” त्याने विचारलं
महेंद्रप्रताप,“ काय नाय रं त्वां जा की खुशाल.” ते हसून म्हणाले
आणि राघवेंद्र जीप घेऊन निघून गेला. महेंद्रप्रतापरावांच्या सांगण्याप्रमाणे दोघे त्याच्या मागे त्याच्या नकळत गेलेच होते. महेंद्रप्रतापराव ही तयार झाले.
महेंद्रप्रताप,“ गण्या घोडा काड.” ते म्हणाले. जर काही महत्त्वाचे काम असेल आणि लवकर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तरच ते घोडा काढायचे.
राधक्का,“ जरा सबुरीनं घ्या जी आपला पोरगा तरणा हाय काय म्हणता काय व्हायाचं. डोस्क्यात राग घालूनशान गेला कुटं म्हंजी?” ती पदराने डोळे पुसत म्हणाली.
महेंद्रप्रताप,“ तेवडं कळतंया राधे मला. म्या काय त्याचा दुष्मन नाय बा हाय.” ते म्हणाले आणि अजून दोन माणसं बरोबर घेऊन गेले.
इकडे राघवेंद्र आधी शेतावर गेला. तिथं त्याने शेत पाहिलं शेतात काय पेरलं आहे ते पाहिलं आणि जीप इथंच राहू दे म्हणून तो गावात शिरला.पण त्याने शाल डोक्यावरून पांघरून घेऊन स्वतःचा चेहरा कोणाला दिसणार नाही याची दक्षता घेतली होती. आता दुपारचे बारा वाजले होते त्यामुळे गावात सामसूम होती कारण सकाळी सकाळीच लोकं न्याहरी करून जेवण बांधून शेतावर निघून जायचे ते दिवस मावळायला यायचे. त्यामुळे गावात यावेळी जास्त वर्दळ नसते हे त्याला ही माहीत होते.
त्याने सरळ हरणीच्या घरचा रस्ता धरला आणि तिच्या दारात पोहोचला. या पाच सहा दिवसात महेंद्रप्रतापरावांनी देखील शेवंता आणि हरणीची सगळी माहिती काढून घेतली होती. राघवेंद्रने हाक मारली.
राघवेंद्र,“ हरणी sss” तशी हरणी बाहेर आली. तिची आई शेवंता देखील घरातच होती.
हरणी,“ सरकार तुमी हतं ते बी सवंता? पर मला तुमास्नी भेटायचं नाय जी, तुमी आल्या पावली निगुनशान जा.” ती तोंड फिरवून कशी बशी कातर आवाजात म्हणाली.
राघवेंद्र,“ पर का? मी तुला हतं भेटाया ईवडी जोकिम घिवूनशान आलू हाय हरणे आन त्वां भेटायाचं नाय म्हणतीयास?” त्याने थोडं रागानेच विचारलं आणि शेवंता कोण आलं आहे पहायला बाहेर आली आणि राघवेंद्रला पाहून घाबरली.
शेवंता,“ धाकलं सरकार तुमी हतं काय करताया? जावा जी हतंनं म्या हात जोडतु तुमास्नी.” ती हात जोडून रडकुंडीला येत म्हणाली.
राघवेंद्र,“ मी नाय जायाचो! हरणी का अशी वागयल्या माज्याशी ते समाजल्या बिगार मी नाय जाणार.” तो दारातच उभं राहून बोलत होता.
शेवंता,“ घरात या तुमी.” आणि त्याला कोणी तरी पाहिल म्हणून तिने त्याला घरात घेतले. हरणी एका कोपऱ्यात अपराध्यासारखी खाली मान घालून उभी होती.
राघवेंद्र,“ बोल की हरणे काय झालंया तुला?” त्याने पुन्हा रागाने विचारलं आणि हरणी भिंतीकडे तोंड फिरवून रडायला लागली.
शेवंता,“ तिला काय इचारता म्या सांगतु की. धाकल सरकार तुमी मोटी माणसं कशा पायी आमच्यावानी गरीबाच्या जीवावर उटलासा जी. माजी पोर अल्लाड हाय. तिला नाय कळतं ती विस्तवावर पाय द्याया निगाली हाय पर म्या तिची आय हाय. मला तिचं भलं बुरं कळतया. माफी करा तुमी माज्या लेकीला नगा भेटू. जर थोरल्या सरकारास्नी हे समदं कळलं नव्हं तर ते अमास्नी जितं सोडायचं नायती जी.” ती रडत हात जोडून बोलत होती.
राघवेंद्र,“ पर असं काय बी हुनार नाय. माजं पिरेम हाय हरणीवर आन लगीन करायचं हाय मला तिच्या संगट. आन तात्यास्नी समजाविन….” तो पुढे बोलणार तर शेवंताने त्याचे बोलणे मध्येच तोडले.
शेवंता,“ लय भोळं हायसा सरकार तुमी. तुमी त्यास्नी समजावाल आन ते तुमचं लगीन लावून देणार व्हय हरिणी बरुबर? आवं तुमी जहागीदार सरकार हायसा अन म्या तमासगिरीन थोरलं सरकार इब्रतिला जपणारं हायती आन तुमी माज्या लेकीशी लगीन केलासा तर जहागीदार सरकारांची इब्रत जाईल नव्हं? त्ये तुमास्नी काय बोलायाचे नायती पर माज्या लेकीचा हकनाक जीव जाईल सरकार. नगा उटू माज्या लेकीच्या जीवावरी.” ती पुन्हा हात जोडून बोलत होती.
तोपर्यंत घोडा दैडवत महेंद्रप्रताप शेवंताच्या घरा बाहेर पोहोचले होते. पुढं लोटलेलं दार त्यांनी जोरात ढकलून दिलं आणि रागानेच राघवेंद्रवर गरजले.
महेंद्रप्रताप,“ हे श्यात हाय काय राघवा?” त्या आवाजाने तिघे ही दचकले.राघवेंद्रला दरदरून घाम फुटला होता पण तो हिम्मत करून बोलू लागला.
राघवेंद्र,“ तात्या ते मी तुमास्नी सांगणार हुतो पर तुमी हतं?”
महेंद्रप्रताप,“ आता तू बाला सवाल करणार का? त्वाचं सांग की त्वां काय करतुयास हतं? आन काय सांगायचं हुतं तुला आमास्नी?” ते पुन्हा रागाने ओरडले.
राघवेंद्र,“ माजं पिरेम हाय हरणीवर. मला तिच्याशी लगीन…” तो पुढे बोलणार तर महेंद्रप्रताप कडाडले.
महेंद्रप्रताप,“ खबरदार पुडं एक सबुद बोलशील तर. घरान्याच्या इब्रतीला डाग लावाया निगाला की त्वां. पर म्या जिता हाय तवर असं काय बी हुनार नाय. गावची घाण त्वां आमच्या डोस्क्यावर बशिवणार का? आन त्वां गं शेवंते त्वां आन तुजी ही पोर लय मोटं सपान बागतायसा. इसरलीस का काय जहागिरदारांच्या परसात लय जागा हाय म्हणलं मुडदे पुराया.”
त्यांचे अंग रागाने थरथरत होते डोळे लाल झाले होते. त्यांचे बोलणे ऐकून शेवंता त्यांच्या पायात कोसळली. त्यांचा अवतार पाहून हरणी तर त्याच कोपऱ्यात घाबरून बसली होती आणि राघवेंद्र त्याच्या वडिलांचा हा चेहरा आज पहिल्यांदा पाहत होता. तो स्तब्ध होऊन उभा होता पुतळ्या सारखा शेवंता मात्र भानात होती.
शेवंता,“ माफी करा सरकार म्या पाया पडतु तुमच्या असं नगासा बोलु जी! अमास्नी आमची लायकी म्हैत हाय जी पर माजी पोर अल्लाड हाय तिला जग रहाटी नाय म्हैत जी. म्या तिला समद्या जगाच्या नजरं पासनं वाचीवली पर धाकलं सरकारांची नजर कंदी तिच्यावर पडली दोगं कदी भेटलं मला काय बी म्हैत नाय जी.म्या आन माजी लेक हा गाव सुडून जातू जी. पर आमचा जीव घेऊ नगासा माजी लेक कवळी हाय जी! हे समदं तिच्या हातनं आजणपनी झालंया.” ती अश्रूने त्यांचे पाय भिजवत बोलत होती.
आणि महेंद्रप्रतापरावांनी हरणीकडे पाहिले. ती खरंच अजून लहान दिसत होती जास्तीत जास्त सतरा वर्षांची. आणि शेवंताच्या बोलण्यात ही त्यांना तथ्य वाटत होते.
महेंद्रप्रताप,“ तुज्या पोरीला समजाव शेवंते नाय तर परिणाम लय वंगाळ हुत्याल. गटारगंगा कदी गंगाजळ हुतं नस्तीया. एक दाव सोडलंया तुजी पोर लाहाणी हाय अजून जर मोटी असती नव्हं तर जहागिरदारांच्या परसात दोन मूडद्याची भर झाली असती. आन गाव सुडून जा. आन त्वां राघवा चल घराकडं मला हतं तमाशा नाय करायाचा. ते पुन्हा कडाडले.
शेवंता,“ लय लय मेहेरबानी सरकार! तुमी म्हणाला तसं करतू जी. म्या माज्या लेकीला घिवूनशान जातू.” ती हात जोडून म्हणाली. राघवेंद्र मात्र अजून तिथेच उभा होता.तो हतबल होऊन सगळे पाहत होता त्याचा त्याच्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नव्हता.
महेंद्रप्रताप,“ चल की आता घरला राघव.”ते पुन्हा ओरडले आणि राघवेंद्र भानावर आला.त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते त्याने ते पुसले आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो तिथून निघून गेला. महेंद्रप्रताप बाहेर आले आणि एका गड्याला डोळ्यांनी खुणावले तसा तो राघवेंद्रच्या मागे पळत सुटला. ते पुन्हा शेवंताच्या घरात आले.
महेंद्रप्रताप,“ हे पैकं तुज्या पोरीनं धाकलं सरकारांचा जीव रमला नव्हं. आन त्यांनी हिला वापरली असलं तर त्याची बिदागी समज. ” ते पैशाची थैली तिच्या अंगावर फेकत म्हणाले.
शेवंता,“ नाय जी सारकार त्यांनी माज्या पोरीला हात सुदीक लावला नाय. आन म्या माज्या पोरीला धंद्याला बशिवली नाय आन बसवणार बी नाय. म्या हाय वंगाळ पर माजी पोरगी ती निर्मळ हाय. म्या तिचं लगीन करणार हाय.तुमचं पैकं घिवूनशान जा.” ती पैशाची थैली उठून परत त्यांच्या हातात देत म्हणाली.
महेंद्रप्रताप,“ बरं थोडं दिस गाव सोड आन पुण्यांदा हतं इवूनशान ऱ्हाइली तर चाललं. माज्या पोराला इसरी पडलं की तुजी माजी काय दुष्मनी नाय.” ते म्हणाले आणि निघून गेले.
ते घरी पोहोचले तर उन्हं कलली होती. राधक्का आणि सुभानराव चौकात बसले होते. दोघांचा ही जीव टांगणीला लागला होता कारण महेंद्रप्रतापरावांचा रागीट स्वभाव त्यांना माहीत होता. रागाच्या भरात ते त्या माय लेकींना मारायला ही कमी करणार नाहीत हे जाणून होते दोघे.
राधक्का,“ राघव कुटं हाय?” तिने इकडे तिकडे पाहत विचारलं.
महेंद्रप्रताप,“ चल म्हणलु घरी तर काय बी बिन बुलता गेला की त्यो. पर काळजी नगं करू त्येच्या मागं माणूस धाडला हाय म्या.” ते चौकाच्या पायरीवर बसत हातातल्या उपरण्याने घाम पुसत बोलत होते.
सुभानराव,“ पाणी घुवून ये आदी राधक्का.” ते म्हणाले आणि राधक्का लगबगिने आत गेली. ती तांब्या भरून पाणी घेऊन आली. महेंद्रप्रतापरावांनी पाणी पिले.
सुभानराव,“ काय काय झालं महिंद्रा ततं?” त्यांनी विचारलं. पण आसपास गडी माणसं काम करत होती त्यामुळे महेंद्रप्रताप त्यांना म्हणाले.
महेंद्रप्रताप,“ रातीच्याला सांगतु अण्णा. एकदाव राघव घरी आला नव्हं मंग बगतु त्याला बी.” ते रागाने तणतणत म्हणाले आणि निघून गेले.
दिवस मावळला अंधार झाला तरी राघवेंद्रचा अजून पत्ता नव्हता. राधक्का, सुभानराव आणि महेंद्रप्रताप ही आता काळजीत पडले होते.
राघवेंद्र खरंच हरणीला विसरू शकेल का? आजची भेट हरणी आणि त्याची शेवटची भेट ठरणार होती का? आणि राघवेंद्र कुठे गेला असेल?
क्रमशः
कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
अशाच मनोरंजक कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.
