दिसते तसे नसते भाग 2 अंतिम

  




    दुसऱ्या दिवशी दुपारपासूनच सगळे तयारीला लागले होते. वृंदाने दारात सुंदर रांगोळी काढली. सतीश आणि बाबा तोपर्यंत घर आवरत होते तर बच्चे कंपनी घर आवरायला त्या दोघांना मदत करत होती. मिथिलाची आई आणि ती येणाऱ्या महिला मंडळासाठी नाश्ता बनवण्यात किचनमध्ये बिझी होत्या. वृंदाने बाहेर रांगोळी काढून हळदी- कुंकवाची सगळी तयारी करून ठेवली. जवळजवळ सगळे काम आवरत आले होते आणि वृंदा छान साडी नेसून तयार होऊन आली.


वृंदा,“ ताई तुम्ही आणि आई जा आता तयार व्हा. मी बाकी पाहते.” ती म्हणाली.


मिथिला,“ अगं मी काय ड्रेसच घालणार आहे. मी पाहते इथलं तुम्ही दोघी जा.” ती म्हणाली.


आई,“ मिथु तू आज साडी नेसून छान तयार होणार आहेस. मी माझी हिरवी पैठणी ड्रायक्लिन  करून आणली आहे. तुझ्याकडे गोल्डन ब्लाउज आहे पैठणीच्या काठासारखा जा नेस जा पैठणी तुझ्या रूममध्ये आहे. वृंदा सतीशला सांग पोरांना तयार करायला.” त्या बोलत होत्या पण मिथिलाचे डोळे मात्र आता पाण्याने गच्च भरले होते.


मिथिला,“ पण आई हे सगळं कशासाठी?” तिने आवंढा गिळत कातर आवाजात विचारलं.


आई,“मिथु बाळा तुझ्याच भल्यासाठी चालले आहे हे सगळं. विश्वास आहे ना माझ्यावर.” त्या तिचा हात धरून पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणाल्या.


मिथिला,“ स्वतः पेक्षा जास्त आहे आई.” ती म्हणाली.


आई,“ मग जा आणि तयार हो छान आणि हो चेहऱ्यावर हसू येऊ दे बाई. नाही तर तुझे बाबा माझ्यावर चिडतील.” त्या हसून म्हणाल्या आणि मिथिला हसून निघून गेली.


   ती तयार होऊन आरशात पाहत होती तर पाठी मागून वृंदा गजरे घेऊन आली आणि तिच्या केसात माळले.


वृंदा,“ आता बघा अजून छान दिसत आहात.” ती हसून म्हणाली.


मिथिला,“ हो का? तू पण गोड दिसतेस गं!” ती हसत म्हणाली.



    सोसायटीमधल्या बायका यायला सुरुवात झाली. सगळ्या नटून थटून आल्या होत्या. वृंदा आणि मिथिला सगळ्यांचे स्वागत हसत मुखाने करत होत्या. बाबा आणि सतीश मुलांना घेऊन बेडरूममध्ये बसले होते. मिथिलाच्या आईंनी मिथिलाला सगळ्यांना हळद-कुंकू लावायला सांगितले आणि वृंदाला आणलेल्या भेटवस्तू द्यायला लावल्या.सगळ्यांना नाश्ता देण्यात आला सगळ्यांचे खाऊन झाले आणि आता सगळ्या निघणार तर मिथिलाच्या आई म्हणाल्या.


आई,“ थांबा इतक्यात कुठे निघालात बसा ना.(त्या म्हणाल्या आणि सगळ्या बायका एकमेकिंकडे पाहत पुन्हा बसल्या.) तुम्हाला माझ्या मिथिलाबद्दल खूप प्रश्न पडले आहेत ना? तिचा नवरा दिसत नाही! तिचे सासरचे कोणी दिसत नाही! ती विधवा आहे की सधवा? जर विधवा असेल तर मंगळसूत्र कसं घालते? आणि घडस्फोटिता असेल तरीही मंगळसूत्र घालून का मिरवते? ती इतकी कशी  नटते? तिच्या मुलीच्या म्हणजे किर्तीच्या नावापुढे बापाचे नाव का नाही? ती असे  काय काम करते की तिने किर्तीला इतका महागातला टॅब घेऊन दिला? वगैरे वगैरे…आज तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत.म्हणून तर हा हळदी-कुंकवाचा घाट घातला आहे ना मी” त्या शांतपणे बोलत होत्या. आणि सगळ्या बायका चपापल्या.


सुधा,“असं काही नाही काकू आम्हाला काय करायच्या आहेत ना गोष्टी.” ती नाटकीपणे हसून म्हणाली.


आई,“ आरे आमच्या मागे चर्चा करताना माझ्या मिथुबद्दल मग आज तुम्हाला तिच्याबद्दल कळायलाच हवं. पहिलं तर तुमचा झालेला  एक गैरसमज दूर करते. मिथिला माझी मुलगी नाही तर सून आहे आणि ही वृंदा आणि सतीश तिचे जावू आणि दिर. म्हणजे आम्ही तिचे माहेरचे नाही तर सासरचे लोक आहोत मी तिची सासू आणि ते तिचे सासरे. पण आता आम्ही तिचे आई-बाबा आणि माझा सतीश तिचा भाऊ झालो आहोत रक्ताने नसलो तरी कर्माने हवं तर धर्माने म्हणा ना.


   कोणाबद्दल ही काहीही बोलताना माणसाने विचार करून बोलावे. तुम्ही सगळ्या आमच्याबद्दल आमच्या मिथुबद्दल काही ही जाणून न घेता तिच्या विषयी नको-नको ती चर्चा केली. माझ्या सुनेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला ही तुम्ही मागे-पुढे पाहिलं नाही. स्त्रीचं-स्त्रीची  शत्रू आहे असं म्हणतात ते काही खोटे नाही.


   तुम्हाला माहित तरी आहे का मिथिलाने तिच्या आयुष्यात काय सोसले आहे? माझा मोठा मुलगा रवी खरं तर त्याला मुलगा म्हणायची ही मला लाज वाटते. त्याने आणि मिथिलाने प्रेम विवाह केला होता आमचा विरोध नव्हता पण तिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता तरी रवीच्या प्रेमा खातर तिने तिच्या घरच्यांना डावलले. ती माझ्या घरी माझी सून म्हणून आली आणि तिच्या लाघवी स्वभावाने माझी मुलगी झाली. ती शिकली सवरलेली होती पण रवी त्याला तिचे नोकरी करणे मान्य नव्हते. म्हणून मग मन मारून ती घरातच राहिली. रवी मात्र मिथिला त्याच्या मनाप्रमाणे वागून देखील तिच्यावर संशय घेऊ लागला. याच्याकडेच पाहिले, त्यालाच बोलली असं करायला लागला. आम्ही त्याला आधी समजावलं मग खडसावले पण तो काही बदलत नव्हता. लग्नानंतरची  दोन वर्षे अशीच निघून गेली. सतीश  मिथिलाचा दिर असला तरी दोघांचे नाते भावा बहिणीसारखे होते पण  रवीला आता आमची रोक-टोक म्हणजे अडचण वाटायला लागली. त्याने त्याची बदली कोणाला ही न कळू देता दुसऱ्या गावाला करून घेतली. सतीश आणि मिथिलाचे नाव जोडले. घरात धिंगाणा केला. आणि मिथिलाला त्याच्याबरोबर घेऊन गेला. मी मिथिलाला खूप आडवण्याचा प्रयत्न केला पण जर ती आमच्याबरोबर राहिली तर रवीला खरंच वाटेल की सतीश आणि तिच्यात काही तरी आहे असं म्हणून ती त्याच्या मागे गेली.


  पण रवी तिथे जाऊन मोकाट सुटला. त्याला अडवणारे तिथे कोणीच नव्हतं. तो मिथिलाला आता मारायला लागला. तिचा मोबाईल देखील त्याने काढून घेतला. कोणा पुरुषाने साधं तिच्याकडे पाहिलं तरी तो त्याच्याशी मिथिलाचे नाव जोडून मोकळा व्हायचा. त्याचा विक्षिप्त आणि संशय खोर स्वभाव दिवसेंदिवस वाढत चालला होता. आता तर तो ऑफिसला जाताना तिला कोंडून बाहेरून कुलूप लावून जाऊ लागला. दरम्यान सतीशचे लग्न झाले पण तो लग्नात हिला घेऊन आला आणि तिथूनच तिला घेऊन गेला.मिथिला मात्र सगळं  शांतपणे सहन करत राहिली एक तर तिच्या  आई-वडिलांची तिच्याशी संबंध तोडले होते. आणि आम्हाला सांगून तिला सतीशच्या संसारात अडथळा निर्माण करायचा नव्हता म्हणून ती त्याचे अत्याचार सहन करत राहिली आम्ही दोघे तिला भेटायला जात होतो पण ती काहीच बोलायची नाही. बऱ्याच वेळा रवी समोर असायचा त्यामुळे बोलणार तरी कशी बिचारी. आणि तिला आमच्याबरोबर यायचं देखील नव्हतं मग त्यामुळे ती गप्पच राहायची पण त्यामुळे रवीची हिम्मत वाढायला लागली. आमचा जीव तिळतिळ तुटायचा तिच्यासाठी तिचा अवतार पाहून. नटने नाही मुरडणे नाही की कुठे जाणे येणे नाही. कुठं बाहेर रवी घेऊन गेला तर घरी  आलं की तिला मारायचा तू याच्याकडे पाहिलंस. तो तुला आवडला काय? असं नाही नाही ते बोलायचा. पण आम्ही हतबल होऊन पाहत होतो. बऱ्याच वेळा तिला आम्ही दोघांनी घरी चल म्हणून आग्रह केला पण ती तयार होत नव्हती पण ती हळूहळू  डिप्रेशनमध्ये जायला लागली होती.

       

   या सगळ्यातच तिला बाळाची चाहूल लागली. आम्ही तिला एकदा भेटून आलो. मिथिलाला वाटत होते की बाळ झाल्यावर तरी तो सुधारेल पण ही तिची आशा फोल ठरली. आम्ही दोघे गावी सतीशचे काका वारले म्हणून गेलो आणि दोन महिने आम्हाला तिथेच राहावे लागले. तोपर्यंत मिथिलाला पाच महिने झाले होते. सतीश रवीच्या नकळत मिथिलाची चौकशी करत होता पण त्याला फारसे काही कळत नव्हते. त्या दोन महिन्यात रवी राक्षस बनला होता सात महिन्याच्या गरोदर मिथिलाला गुरासारखं मारायचा उपाशी ठेवायचा. एक दिवस तर तिच्या पोटातले बाळ त्याचे  नाहीच म्हणून त्याने मिथिलाला खूप मारले. तिच्या पोटातल्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा मात्र तिच्यातली आई गप्प बसली नाही. रवी घराला कुलूप लावून कामाला निघून गेला आणि तिने खिडकीतून आरडाओरडा केला. लोकांनी तिला कुलूप तोडून बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये नेले. त्या राक्षसाच्या मारण्यामुळे सातव्या महिन्यातच तिला प्रि मॅच्युअर मुलगी झाली. म्हणजे आमची किर्ती. तिने सतीशला फोन करून बोलावून  घेतले. बिचारीची अवस्था पाहून तो त्या दिवशी खूप रडला. आम्हाला ही बोलावून घेतले. आम्ही पोलिसात तक्रार केली. रवीला अटक झाली.


   पण मिथिला डिप्रेशनमध्ये गेली तिला त्यातून बाहेर यायला दोन वर्षे लागली. पण आम्ही आणि सतीश- वृंदा तिच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो. हळूहळू किर्तीकडे पाहून आणि आमच्या प्रेमाने तिच्या मनाला उभारी मिळाली. पुढे आम्ही तिला जॉब करायला पाठींबा दिला. तिला प्रोत्साहन दिले आणि आज अवघ्या आठ वर्षांत आमची मिथिला जनरल मनेजर झाली आहे.


   कोणी तरी दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते ना की ही इतकी नटते मुरडते मंगळसूत्र घालते तर हो ती नटते स्वतःसाठी कारण ज्याच्यासाठी तिला नटायच होतं त्याने कधीच तिला नटू दिलं नाही. ती मंगळसूत्र घालते कारण तिला ते घालायला आवडते. आणि तुम्हाला आर.के ग्रुप्सची हॉटेल चेन माहीत आहे ना? त्याच हॉटेलच्या इथल्या शाखेत ती जनरल मॅनेजर आहे  माझी मिथिला. तिला चांगला दिड लाख पगार आहे. आणि  आम्हाला पेन्शन आहे बरं का त्यामुळे आम्ही किर्तीला आणि माझ्या बाकी दोन नातवंडांना टॅब घेऊन दिले आहेत. मिथिलाने नाही घेतला तो टॅब, सुधा.. तिने ठरवलं तर त्यापेक्षा भारी टॅब देखील ती घेऊन देऊ शकते तिच्या लेकीला. झालं का तुमच्या सगळ्यांच्या शंकांचे निरसन?” त्यांनी डोळे पुसत विचारलं. मिथिला हुंदके देत त्यांच्या कुशीत शिरली.


  हे सगळं ऐकून सगळ्यांचेच डोळे पाणावले होते आणि सगळ्या खजील झाल्या होत्या.


सुधा,“ माफ करा काकू आम्हांला. आम्ही उगीच गैरसमज करून तुमच्या कुटुंबाबद्दल आणि मिथिलाबद्दल नाही नाही ते बोललो. खरंच तुमच्यासारखे सासू-सासरे आणि दिर- जावू सगळ्या मुलींना मिळोत.” ती हात जोडून म्हणाली.


   बाकी सगळ्यांनी ही हात जोडून मिथिला आणि आईची माफी मागितली.



मिथिला,“ तुम्हाला तुमची चूक कळली ना मग झाले.” ती डोळे पुसत म्हणाली.


आई,“  आणि हो  आम्ही मिथिलासाठी स्थळ पाहत आहोत लवकरच तिला तिच्या हक्काचा जोडीदार मिळेल बरं का? तुम्ही सगळ्यांनी लग्नाला यायचं.” त्या हसून म्हणाल्या.


 आणि सगळ्या एक सुरात हो म्हणाल्या. खरंच दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं.

©स्वामिनी चौगुले.


आधीच्या भाग खालील लिंकवर👇

दिसते तसे नसते भाग 1


अशाच मनोवेधक कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.



      




Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post