मधुमालती आणि राघवेंद्रने मुंबईला जायची तयारी सुरू केली. राघवेंद्रने मदतीला मदनला ही बरोबर घ्यायचं ठरवलं होतं. रमा मुंबईत असल्यामुळे राघवेंद्रला रमाकडे जातो म्हणून मधुमालतीला बरोबर घेऊन जाणे तसे सोपे होते. दोनच दिवसांनी संध्याकाळी जेवण करताना राघवेंद्रने मुंबईला जायचा विषय काढला.
राघवेंद्र,“ मी मुंबईला जाणार हाय. ततं बैटक हाय पक्षाची. तवा मी काय म्हणत हुतू आई या येळला मधूला घिवूनशान जातू. ही ऱ्हाईल चार दिस पोरास्नी घिवूनशान रमी कडं असं बी रमी बी लय वरडतिया का मी मुंबईत जातूया ऱ्हातुया पर तिला आन दाजीस्नी हुब्या हुब्या भिटूनशान इतुया म्हणूनशान.जाऊ का?” तो जेवत बोलत होता.
राधक्का,“ वरडील नाय तर काय रं?त्वां जातूस सरकारी पावना बानूनशान त्येंच्या घरात ऱ्हातुयास अन इतुस म्हागारी. ती रमी आली का त्वांडाची टकळी वाजीवतीया.पावनं बी माग वरडीत हुतं. आता जा की ईचारतुस काय रं? आन मालूला नेणार म्हंजी मग काय रमा बाय खुश. पर मालू सुगंधीला एकलीला घिवूनशान जा बाय. पृथ्वीला ऱ्हाव दि. आमास्नी गमायाच (करमायच) नाय बाय दुनी पोरं न्हिलिस तर. आन पृथ्वी दिस भर ऱ्हाईल माज्या संग आन राती जाईल त्येचे कस्तुरी माऊ कडं. त्येला सवय हाय तिची. अन तिच्याकडं गिलं की प्याया मिळतंया नव्हं त्येला मग काय उड्या मारल.” ती बोलत होती
राधक्काचे बोलणे मधुमालतीच्या पथ्यावर पडले होते.कारण दोन्ही पोरांना नेऊन राघवेंद्रचे ऑपरेशन केलंच तर तिला त्याची काळजी कशी घेणार हा प्रश्न पडला होता.आणि तो प्रश्न आपसूकच राधक्काने सोडवला होता.
राघवेंद्र,“ ऱ्हावुदी पृथ्वीला हतं आन आई रमाकडं नाय जायाला काराण हाय ती शिकतीया. तिला तिच्या दोन पोरास्नीच आन नवऱ्याच करूनशान कालजात जायाला लागतंया. कामाला बाया अन माणसं हायती पर सैपाक तर हिलाच करावा लागतुया नव्हं आन मी गिलू तिच्याकडं तर ती काय भाकर आन आमटी घालल व्हय मला? रोज काय तर नवं नवं करणार. आता हुब्या हुब्या गिलं तरी बी जेवाण केल्या बगार सुडीत नाय. कुटं मासं आन कुटं मटान आन असं करतीया. तिला तरास नगु म्हणूनशान मी जात न्हाय बग.” तो बोलत होता.
महेंद्रप्रतापराव,“ आरं भन हाय तुजी पाटची तवा जिव वडणारच नव्हं. तुला सांगतु राधे म्या मागं राघव बरुबर गिलू आन आट दिस राहिलू तिच्याकडं तर ततं समुंदर हाय नव्हं मासं झाक मिळत्याती. आन पोरगी लय भारी शिकतीया कराया मासं. लय झाक मासं करूनशान घातलं बग. आन पावनं तर निसता त्वांड फाटू सत्वर कौतिक करत्याती तिचं आन नातवंड निस्ता टापटीप ठिवतीया. पोरगी संसाराला लागली बाय आपली.आन शिक्षाण बी शिकतीया कालेजात जातीया.जावा तुमी आन ऱ्हावुनशान या. तिची मालू ताय जाणार म्हणल्यावर तर काय ईचारायला नगु.” ते कौतुकाने बोलत होते.
राधक्का,“ व्हय जी. पर तिला म्या म्हणलु हुतु का शिकूनशान काय करणार हाईस? उगा डोस्क्याला भुंगा नगु लावूनशान घिव तर मलाच म्हंली गबस तुला काय कळत न्हाय.” ती म्हणाली.
मधुमालती,“ मग मी तयारी करते. कधी निघायचं हो?” ती पृथ्वीला भरवत म्हणाली.
राघवेंद्र,“ परवा पाटच निगु.मी मदनला उंद्या सांगतु.” तो म्हणाला.
मधुमालती,“ आत्या पण पृथ्वी आणि त्याची माऊ यांच्यावर लक्ष ठेवा बरं का? ती याला पाजते याने मागितलं की. मग हा वरचं काही खायला नको म्हणतो. आणि आता रात्री पण तिच्याकडे गेला तर त्याची वरच खायची सवय मोडायची आता दोन महिन्यांनी दोन वर्षांचा होईल हा. पण तिच्या लाडाने नुसता वेडा झाला आहे.बदमाश कुठला?” ती पाण्याने त्याचे खरकटे तोंड धुवून पदराने पुसत बोलत होती.
पृथ्वी,“ आऊ… माऊ.. वल..” तो उठून नाचायला लागला.”
राधक्का,“ घी निस्ता याच्या माऊच नाव कडायाचा दम ह्यो लागला नाचाया. आता तिच्याकडं निवूनशान आणल्या बगार निजायाचा सुदीक नाय.”
राघवेंद्र,“ मी जातूया माडीवर आज कस्तुरीनं अब्यास काय किला ते बी बगायाच हाय.” तो जेवून पृथ्वीला उचलून घेत म्हणाला.
सुभानराव,“ या पोरानं त्या बिचाऱ्या पोरीला बी सुडलं नाय. तिच्या बी मागं अब्यास लावला हाय. कस्तुरी काय करायाची शिकूनशान. ह्येलाच म्हैत.” ते म्हणाले.
राघवेंद्र,“ अण्णा शिक्षाण कंदी बी वाया जात नस्त्यया.” असं म्हणून तो गेला.
★★★★
निघायचा दिवस उजाडला. पहाटे चार वाजता मदन हजर होता. गडी जीपमध्ये सामान भरत होते. आणि मधुमालती झोपलेल्या सुगंधाला घेऊन उभी होती.
राधक्का,“ मालू ततं गिलं का लोणच्याच्या बरण्या आन पापूड, शेवया, लाडू, तुपाचा डबा,अंडी आदी काड बाय अन धान दमानं कडलं तरी बी हुतया. समदं वाईस, वाईस दिलं हाय आन हेत पोरीच दुद हाय आन ही जेवणाचं गटळं, पाण्याची कळशी बी ठिवली बग. कुटं तर वाटतं जिवा बाय पाणी बगूनशान म्हंजी परत कळशी भरून घिता ईल.” ती सूचना करत होती.
मधुमालती,“ व्हय आत्या.”
महेंद्रप्रतापराव,“ ती पोरगी ऐकूनशान घिती म्हणून किती येळा सांगतीयास? राघव कुटं हाय पर.”
सुभानराव,“ त्येंचा पाय कस्तुरीला भेटल्या बिगार निगल व्हय? गेला असलं माडीवर.” ते म्हणाले.
br />माडीवर..
राघवेंद्र,“ मी आता धा-बारा दिसनं इतुया बग.” तो म्हणाला. पण कस्तुरीच्या डोळ्यात मात्र पाणी होते.
कस्तुरी,“ न्हाय ती खुळ घेतलया तुमी डोस्क्यात जी. बगा नाय तर या जी मागारी आपल्याला नगु ती नसबंदी.” ती कातर आवाजात बोलत होती.
राघवेंद्र,“ उगा रडू नगु. आन काय हुत नस्त्यया. पृथ्वी हाय हतं पर त्येचा लय लाड करू नगुस. त्यो मागतला की त्वां पाजतियास त्येला. दून मासानं दून वरीस हुत्यात त्येला. आन लय देव देव बी नगु करू. उपास बी नाय करायाचा. तुला म्हैत हाय मला नाय आवडत ही समदं.” तो सांगत होता.
कस्तुरी,“ ते काय करायचं ते पृथ्वीसाब अन म्या मायलेक बागूनशान घितु. आन नाय करत म्या द्याव द्याव लय. पर तुमी काळजी घ्या जी सरकार.” ती डोळ्याला पदर लावत म्हणाली.
राघवेंद्र,“ व्हय. आन उगा डोळ्यातनं पाणी नगु काडू. येतू मी.” असं म्हणून तो निघून गेला.
राघवेंद्र आणि मधुमालती निघाले. पहाटे निघालेले ते दुपार टळून गेल्यावर मुंबईत पोहोचले. मधुमालती पहिल्यांदा मुंबई पाहत होती. बस, रस्त्यावर दिसणारी बरीचशी वाहने,सायकली आणि एका बाजूला नजर जाईल तिथपर्यंत खळाळणारा समुद्र!
तिघे यथावकाश रमाच्या बंगल्यावर पोहोचले. समोरच मोठ्या रोडच्या पलीकडे समुद्र होता. गेटवर वॉचमन होता त्याने राघवेंद्रची जीप ओळखली आणि सलाम करून गेट उघडून त्यांना आत सोडले. गाडी आत गेली. दोन्ही बाजूला छान अशी बग होती. विविध फुलांची आणि नारळाची वगैरे झाडे. दोन मजली टुमदार बंगला. तिघे खाली उतरले. रमाने त्यांना बघितलं आणि धावत जाऊन भाकर तुकडा आणि तांब्याभर पाणी आणून मधुमालती आणि तिच्या कुशीत झोपलेल्या सुगंधावरून ओवाळून टाकला. सगळ्यांना आत घेतले.मोठाला हॉल तिथे आधुनिक पद्धतीने सोफा, खुर्च्या, एका बाजूला पुस्तकाचे कपात, तर एका टेबलवर ग्रामोफोन होता. कुठे टेबलवर फुलदाणी तर कुठे देवाच्या मूर्ती दिसत होत्या. भल्या मोठ्या खिडक्या आणि त्याला लावलेले पडदे. सगळं अगदी तिच्या संमृद्धीची साक्ष देत होते.रमाच्या चेहऱ्यावर माहेरच्या तिघांना पाहून आनंद ओसंडून वाहर होता.
रमा,“ मालू ताई आत्ता सवड भेटली होय तुला? आणि पृथ्वीला नाय आणलं?” तिने विचारलं.
मधुमालती,“ आत्यानी त्याला ठेवून घेतलं त्यांना करमायचं नाही म्हणून.गड्याना सांगून समान आणायला लाव गं” ती बोलत होती तोपर्यंत साधारण चार वर्षाचा विजय मामा म्हणून राघवेंद्रच्या मांडीवर येऊन बसला.
रमा,“ बरं तुमी हात पाय धुवून या. विजू मामा आत्ता आलाय कनाय.” ती त्याला समजावत म्हणाली.
राघवेंद्र,“ मोटी आली शानी त्वां, बस रं.” तो विजयच्या गालाचा पापा घेत म्हणाला.
रमा,“ बरं बाबा तुमी मामा भाचं बगून घ्या. मदन दादा तू चल आणि मालू ताई आन सुगंधाला इकडं मी आत झोपवते.” ती सुगंधाला घेत म्हणाली.
मधुमालती,“ रमाची भाषा सुधारली की आता शुद्ध बोलायला लागली. मुंबईचा गुण की आमच्या दाजींचा? आणि छोटा जय कुठं आहे? विजू तू चल मी लाडू आणले आहेत.” ती रमाला चिडवत म्हणाली आणि विजय तिच्याकडं गेला.रमा मात्र लाजली.
रमा,“ तुजं तर काय पण चल! दाद्या आन मदन दादा त्ये तिथं न्हाणी आन संडास आहे. तू माज्या बरोबर चल स्वयंपाक घरात बी हाय न्हाणीघर.हे येतील थोड्या वेळात. आणि जय ना झोपला आहे उठल आता. मी काय तर खायला करते” ती मधुमालतीला स्वयंपाक घरात नेत म्हणाली. तिथे असलेल्या हाताखालच्या बाईला तिने कांदा वगैरे चिरण्याच्या सूचना दिल्या. मधुमालतीला न्हाणी दाखवून ती सुगंधाला खोलीत झोपवायला निघून गेली.
सगळ्यांनी नाश्ता केला. तोपर्यंत फॅक्टरीतुन आलेल्या चंद्रशेखरची अँबेसीडर गाडी गेटातून आत आली. तो घरात आला. त्याने बाहेर राघवेंद्रची जीप पाहिली होती.
चंद्रशेखर,“ दादासाब तुम्ही कधी आला?” त्याने विचारलं.
राघवेंद्र,“ थुडा येळ झालाया बगा.” तो म्हणाला तोपर्यंत मधुमालती आणि रमा बाहेर आल्या.
चंद्रशेखर,“ वैनीसाब पण आल्या लय दिवस झालं तुम्हाला बोलत होतो आम्ही, आत्ता सवड मिळाली तर? आणि दादासाब तर काय उभ्या उभ्या येतात आणि जातात निघून बहिणीच्या घरचा पाहुणचार नको वाटतो त्यांना. मागे मामा आले होते मस्त राहिले. आता वैनीसब तुमी आला आहात तर रहा चांगले पंधरा दिवस.आणि पोरं कुठं आहेत?”
राघवेंद्र,“ तसं काय बी नाय दाजी.”
मधुमालती,“ भाऊ तुम्ही काळजी नका करू मी काय पंधरा दिवस जाणार नाही आणि सुगंधाला घेऊन आले. आत्यानी पृथ्वीला ठेवून घेतले.”
चंद्रशेखर,“ मग आता दोन चार दिवस सुट्टी घेतो आणि तुम्हाला मुंबई फिरवतो. आणि मामींना करमणार आहे होय नातवंडा शिवाय.” तो म्हणाला.
रमा,“ तुमी हात पाय धून या जी मी तुमाला खायला देते.” ती म्हणाली.
चंद्रशेखर,“ मी आलोच. मग गप्पा मारू रमा मटण आणायला सांग तुक्याला.”
रमा,“ सांगितलंय मी त्यो गेला हाय बाजारातच.” ती म्हणाली.
चंद्रशेखर म्हणजे दिल खुलासा आणि स्वभावाने सज्जन माणूस. तसा आधुनिक विचारांचा आणि कुटुंबवत्सल देखील. त्याच्या मनात राघवेंद्रबद्दल आदर आणि कौतुक ही होते. त्याची मुंबईत कापडाची फॅक्टरी होती आणि या काही वर्षात त्याने मुंबईत चांगला जम बसवला होता. रमा आणि तो त्यांची दोन मुलं असा छान संसार सुरू होता. राघवेंद्रने रमाला पुढे शिक म्हणून सांगितल्यावर त्याच्या घरातल्यांच्या विरोधात जाऊन त्याने रमाला कॉलेजमध्ये पाठवलं होतं.
तो हातपाय धुवून आला आणि रमाने त्याच्या हातात नाश्ता दिला आणि ती पण तिथे बसली. तिची पोरं बाहेर खेळत होती तर सुगंधा तिथेच हॉलमध्ये खेळत होती.
चंद्रशेखर,“ मग दादासाब बैठक आहे का काय पक्षाची मुंबईत?”त्याने विचारलं.
राघवेंद्र,“ न्हाय मी नसबंदी करूनशान घिणार हाय म्हणूनशान आलू हाय. मधूला डॉक्टरला भेटायाचं हाय तिला भ्या वाटतंया नव्हं.” तो बोलत होता.
रमा,“ काय दाद्या तू नसबंदी करून घेणार?पर का?आन घरात म्हैत हाय का?” तिने जरा रागानेच विचारलं.
राघवेंद्र,“ अगं दोन पोरं बास हायती अमास्नी म्हणूनशान करायाची हाय नसबंदी.”
रमा,“ उगा काय तर नगु सांगू दाद्या मी लहान हाय तुज्यापेक्षा पर तुझं हे सगळं का सुरू हाय हे नाय कळायला इतकी बी लहान नाय मी आता. त्या माडीवरच्या बाईसाटी सुरू आहे ना तुझं सगळं?आणि तू बरी तयार झालीस मालूताई?” ती रागाने तणतणत होती.
मधुमालती,“ रमा अगं उगीच इतका त्रागा करू नकोस. आणि हा निर्णय आमच्या दोघांचा आहे मला ही दोनच मुलं बास आहेत. एक तर यांना वेळ नसतो. आणि अजून मुलं झाली तर त्यांच्याकडं मला लक्ष द्यायला होणार नाही. मग उगीच मुलांची आणि स्वतःची आबाळ करून घ्यायला नकोच अजून मुलं दोन बास. आणि घरात काही माहीत नाही आणि असण्याची गरज तरी काय? हा निर्णय आमच्या दोघांचा व्यक्तिगत आहे.”
चंद्रशेखर,“ वैनीसाब बरोबर बोलत आहेत रमा. खरं तर आपण ही हा विचार करायला हवा. आपल्याला ही दोन मुलं बास की. आणि खूप चांगला निर्णय आहे दादासाब अगदी लोकनेत्याला साजेसा.माझ्याही एका मित्राने नसबंदी करून घेतली आहे काही दिवसांपूर्वी. आम्ही पण येतो उद्या तुमच्याबरोबर त्याची माहिती घ्यायला डॉक्टरकडे.”
राघवेंद्र,“ पण रमीला इचारा बाबा पैलं; नाय तर ती तुमास्नी आन मला बी फाडूनशान खाईल बगा.” तो हसून रमाकडं पाहत म्हणाला.
रमा,“ व्हय का? आणि मी बी इचार करते बरं का!तसं मालू ताई तुझंबरोबर हाय बग. खंडीभर पोरं झाली तर सगळ्यांकडं लक्ष कसं द्यायचं बाय? आणि दाद्या माझा गैरसमज झाला म्हणून बोलले मी. माफ कर.” ती वरमून बोलत होती.
राघवेंद्र,“ मापी कसली मागतीयास रमे अगं भन हाईस त्वां माजी. आन इचार तर चांगला हाय दाजी उंद्या चला आमच्या बरुबर.”तो हसून म्हणला.
रमा,“ मी नाय पर हे येतील तुमच्याबरोबर कारण मुलं आणि सुगंधाला कोण संभाळणार? आमी काय हितच हाय कवा बी जाऊ की.आन मालू ताई हाय की मला माहिती द्यायाला.” ती म्हणाली.
मदन,“ राघव मला बी दोन पोरं आन एक पोरगी हाय म्या बी इचार करतू हतनं गिल्यावर कारबारनीला राजी करतू बाबा.”तो विचार करत बोलत होता.
राघवेंद्र,“ आरं मग बेस हाय की आपलं बगूनशान अजून चार लोकं तयार झाली नसबंदी कराया तर तेवडीच समाज जागृती हुईल लेका.”
मधुमालती,“ चल रमा यांच्यातील नेता जागा झाला आता. आपण कामं बघू.” ती हसून म्हणाली आणि दोघी निघून गेल्या.
★★★
दुसऱ्या दिवशी राघवेंद्र आणि मधुमालती बरोबर मदन आणि चंद्रशेखर दवाखान्यात गेले. पहिल्यांदा राघवेंद्र आणि मधुमालती डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले.
डॉक्टर,“ या या आमदार जहागीरदार साहेब. मला माहित होतं तुम्ही नक्की येणार तुमच्या मंडळींना घेऊन.” ते हसत मुखाने म्हणाले.
राघवेंद्र,“ व्हय. ही आमची मंडळी मधुमालती जहागीरदार. ही ग्रॅज्युएट हाय बरं का डॉक्टर. आमच्या समद्या तालुक्यात एकली हाय ही हिवडं शिकलेली.” तो तिची ओळख करून देत म्हणाला.आणि मधुमालतीने हात जोडून नमस्कार केला.
डॉक्टर,“ आरे वा! म्हणजे चांगल्याच शिकलेल्या आहेत की ताई. बाकी तुमच्या भाषेवरून कोणाला नाही वाटणार पण तुम्ही ही बॅरिस्टर आहात म्हणलं जहागीरदार साहेब. मग तुमच्या अर्धांगिनी तर शिकलेल्या असणारच ना? ताई मी डॉक्टर जाधव. मी तुम्हाला नसबंदी विषयी सगळी माहिती देतो मग तुम्हाला ज्या शंका असतील त्या निःसंकोचपणे विचारा.” ते म्हणाले.
मधुमालती,“ चालेल.”
डॉक्टर,“ हे बघा ताई बाईच्या शरीरात गर्भाशय असते आपण सामान्य भाषेत त्याला पिशवी म्हणतो. त्यात बाईचे स्त्री बीज तयार होते आणि पुरुष आणि स्त्रीचे मिलन झाले की स्त्रिला गर्भधारणा होते. तसेच पुरुषाच्या देखील शरीरात बीज तयार होत असते आपण त्याला शास्त्रीय भाषेत शुक्राणू म्हणतो. ते लिंगाच्या खाली लटकत असलेल्या वृषणात आपण त्याला छोट्या थैल्या म्हणू शकतो त्यात तयार होतात. आपण नसबंदी करणार म्हणजे त्या वृषणाला एक छोटा कट देणार आणि ज्या नसेमधून विर्याव्दारे शुक्राणू पुढे जातात आणि शिश्र्ना मार्फत बाईच्या गर्भाशयात जातात आपण तीच नस कापणार किंवा मग ती बांधणार आणि पुन्हा दोन टाके घालून ती जागा शिवणार म्हणजे आपण नसबंदी करणार ज्यामुळे पुढे तुम्हाला आणि जहागीरदार साहेबांना पुढे मुलं होणार नाहीत.तुम्हाला कळले का?” त्यांनी सविस्तर सांगितलं.
मधुमालती,“ हो म्हणजे बऱ्यापैकी कळले पण माझे काही प्रश्न आहेत…(ती संकोचून म्हणाली.) अहो तुम्ही सांगा ना.” ती राघवेंद्रकडे पाहत म्हणाली.
राघवेंद्र,“ बगा डॉक्टरसाहेब माजी बायकू हतकं शिकलीया पर तुमच्या समुर शंका ईचाराया हिला लाज वाटतीया मंग अडाणी बायांच असं? ही शिकली हाय म्हणूनशान हतंवर आली तर. पर अडाणी बाया हतंवर सुदीक येणार नायत्या बगा. आपल्या देशात बाया कंदी मूकळ्या मनानं बुलणार आन कंदी सुदारणार?” तो नाराजीने बोलत होता.
डॉक्टर,“ जहागीरदार साहेब अहो या सगळ्याला वेळ लागेल पण एक दिवस नक्की स्त्रिया मोकळेपणाने या बाबतीत बोलतील.तुमच्यासारखे नेते आहेत म्हणल्यावर तो दिवस ही दूर नाही. ताई अहो त्यांना काय विचारा म्हणून सांगत आहात तुम्ही? मला तुमच्या भावासारखं समजा आणि निःसंकोचपणे मला तुमच्या शंका विचारा.” ते म्हणाले.
मधुमालती,“ बरं. तुम्ही हे ऑपरेशन सरळ लिंगावर करणार आणि लिंग म्हणजे माणसाचा जिवच म्हणावा लागेल. त्याला धक्का लागला तर माणूस जिवंत राहू शकत नाही मग हे ऑपरेशन करताना यांच्या जीवाला धोका तर नाही ना? आणि या ऑपरेशनचा यांच्या पुरुषत्वावर परिमाण तर होणार नाही ना? आणि ते ऑपरेशन केलं तर यांना काही त्रास तर होणार नाही ना?” तिने थोडे अडखकत पण तरी धिटाईने विचारलं.
डॉक्टर, “ तुम्हाला बायको म्हणून वाटणारी काळजी मी समजू शकतो. साहेबांना काहीही होणार नाही. हे खूप छोटे ऑपरेशन आहे ताई अगदी दोनच टाक्याचे आणि अर्ध्या तासात ऑपरेशन होते. ज्या दिवशी ऑपरेशन होईल त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. सात दिवसांनी येऊन टाके तोडून जायचे. ते अगदी हिंडूफिरू ही शकतात लगेच फक्त थोडी काळजी घ्यायची. जास्त वेळ बसायचं नाही टाके तोडूपर्यंत आणि पंधरा दिवस ते एक महिना शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत बास. आणि आम्ही भूल देऊन ऑपरेशन करणार त्यामुळे त्यांना कळणार देखील नाही. बाकी जखम झाल्यामुळे त्यांना दुखेल काही दिवस पण त्यासाठी आपण त्यांना औषध देणार आहोत त्यामुळे कमीत कमी त्रास होईल. आणि या ऑपरेशनचा यांच्या पुरुषत्वावर कोणताही परिणाम होणार नाही. मी आत्तापर्यंत पंचवीस ते तीस लोकांची नसबंदी केली आहे. त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यात कोणतीही अडचण आलेली नाही माझ्यावर विश्वास ठेवा.” ते तिला समजावत होते.
राघवेंद्र,“ झाल्या नव्हं तुज्या समद्या शंकच समाधान?” त्याने विचारलं.
मधुमालती,“ हो.”
राघवेंद्र,“ मंग या ऑपरेशनला तुजी हरकत नाय नव्हं?”
मधुमालती,“ नाही करून घेऊ आपण नसबंदी.”
राघवेंद्र,“ डॉक्टर साहेब मग कंदी येऊ मी?उद्या बी मी तयार हाय जी.”
डॉक्टर,“ ठीक आहे मग उद्या सकाळी या आपण ऑपरेशन करून घेऊ. संध्याकाळी तर तुम्हाला घरी ही पाठवून देऊ.”
राघवेंद्र,“ ठीक हाय. बाहीर माजे दाजी आन मैतर हाय. त्येंस्नी बी नसबंदी करूनशान घ्यायाची हाय जी. तवा त्येंस्नी माहिती पायजेल हाय समदी.” तो म्हणाला.
डॉक्टर,“ आरे वा! हा असतो एखाद्या नेत्याच्या कृतीचा परिणाम आम्ही कितीही सांगितलं तरी लोकं विश्वास ठेवत नाहीत पण तुमच्या सारख्या नेत्याने कृतीतून दाखवलं की मग लोकं तयार होतात. हीच तर एका लिडरची ताकद असते.” ते हसून म्हणाले.
राघवेंद्र,“ आवं तरी बी तुमचं काम माहीत्वाच डॉक्टर साहेब.” तो हसून म्हणाला आणि दोघे बाहेर आले. मदन आणि चंद्रशेखर आत गेले.
दुसऱ्या दिवशी राघवेंद्रची नसबंदी होणार होती.
© स्वामिनी चौगुले
कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
माडीवरची बाई भाग 53
Khara tyag madhumaltichach. Tine kiti sahan kelay te hi anandane. Tichi kahihi chuk nastana. Khar samaparn madhuchach. Lagnachi bayko asun adich tin varsh sansad karun navra jichyavar mahina 2 mahina prem karto asha strila evdhi kimat deto ani ti hi te sahan karte. Madhu sarkhya bholya baykamule tevhachya purushanche 2-3 lagn pachun jaychi
ReplyDelete