दुसऱ्या दिवशी सकाळी राघवेंद्र, मधुमालाती, मदन आणि चंद्रशेखर दवाखान्यात पोहोचले. रमा मुलांना घेऊन घरातच थांबली होती. डॉक्टरांनी सगळी तयारी केली होती. मधुमालाती मात्र खूपच काळजीत होती. डॉक्टरांनी त्याला ऑपरेशनची तयारी करायला चला म्हणून बोलावले.आणि ती रडायला लागली.
मधुमालती,“ खरचं या सगळ्याची गरज आहे का हो? नको आपण परत जावू.” ती म्हणाली.
राघवेंद्र,“ मधू अगं असं काय करतीयास आपलं समदं ठरलं हाय कनाय?मला काय बी हूनार नाय आन रडू नगु त्वा.” तो तिला समजावत म्हणाला आणि डॉक्टर बरोबर निघून गेला.
थोड्याच वेळात ऑपरेशन सुरू झाले. तिघांचा ही जीव थाऱ्यावर नव्हता. अर्ध्या तासात डॉक्टर बाहेर आले. आणि राघवेंद्रला एका खोलीत आणून झोपवण्यात आले. तो बेशुद्ध होता.
मधुमालती,“ डॉक्टर हे ठिक आहे ना?” तिने अवंढा गिळत विचारलं.
डॉक्टर,“ हो जहागीरदार साहेब ठीक आहेत. त्यांना दुपारपर्यंत शुध्द येईल. घाबरण्यासारखे काहीच नाही ताई.” त्यांनी मधुमालतीला समजावलं.
मधुमालती,“ मी त्यांना पाहू शकते का?”
डॉक्टर,“ हो तुम्ही पाहू शकता त्यांना आणि तिथेच त्यांच्याजवळ बसू ही शकता.” ते म्हणाले आणि निघून गेले.आणि तिघे राघवेंद्रला झोपवलं होतं त्या खोलीत गेले. राघवेंद्र अजून बेशुद्ध होता
मदन,“ तुम्ही आन दाजीसाब वैनीसाब हतं थांबा जी. म्या च्या आन खायाला काय तर घिवून इतु. सकाळपासूनशान कुनी बी काय खायला नाय जी.” तो म्हणाला.
मधुमालती,“ भाऊजी आणि दाजीसाब तुम्ही दोघे ही काय तर खाऊन या. मला नको काही.” ती स्टुलवर बसत म्हणाली.
चंद्रशेखर,“ वैनीसाब डॉक्टर म्हणाले ना की आता दादासाब ठीक आहेत म्हणून मग इतकी काळजी करू नका. तुम्ही काही खाल्लं नाही तर तुमची तब्बेत बिघायची. मदन दादा चहा आणि बिस्कीट घेऊन या. बाहेर छोटेसे हॉटेल आहे बघा दवाखान्याच्या.” तो मधुमालतीला समजावत म्हणाला आणि मदन गेला.
डॉक्टरांनी सांगितले होते काळजी करण्याचे काही कारण नाही तरी मधुमालतीच्या मात्र जीवात जीव नव्हता. राघवेंद्रला दुपारनंतर शुद्ध आली.
मधुमालती,“ कसं वाटतंय तुम्हाला आता? दुखतंय का खूप?” तिने डोळ्यात पाणी आणून विचारलं.
राघवेंद्र,“ मी बरा हाय.पाणी दि जरा मला.” तो उठून बसत म्हणाला.आणि मधुमालतीने त्याला पाणी दिलं.
संध्याकाळी राघवेंद्रला डॉक्टरांनी घरी सोडून दिलं. घरी रमाचा जीव देखील थाऱ्यावर नव्हता. राघवेंद्रला मदनच्या मदतीने स्वतःच्या पायावर चालत येताना पाहून तिला बरं वाटलं. राघवेंद्र खोलीत जाऊन झोपला. पुढचे सात दिवस मधुमालती मात्र राघवेंद्र जवळून हलली नव्हती. ती सुगंधाला घेऊन त्याच्याजवळच बसून असायची. त्याला जास्त हालचाल न करू देता सगळं त्याच्या हातात द्यायची. सात दिवसांनी राघवेंद्रचे टाके काढले. पुढचे सात दिवस रमाच्या घरी राहून सगळे पुन्हा गावी आले.
इकडे कस्तुरीचा जीव खालीवर होत होता. तिला राघवेंद्रला कधी भेटते असं झालं होतं. तरी मधुमालती गेल्यापासून पृथ्वी दुपारनंतर तिच्याच जवळ असायचा रात्रीही तो तिच्याचजवळ झोपत होता त्यामुळे तिचा जीव रमायचा. राघवेंद्र आणि मधुमालती संध्याकाळच्या वेळी परत आले होते. त्यामुळे राघवेंद्र कस्तुरीला भेटायला गेला नव्हता तो थकून जेवण करून झोपला होता. मधुमालतीला ही राधक्काला लेकीची ख्याली खुशाली ऐकायची होती त्यामुळे तिच्याकडे जायला वेळ मिळाला नव्हता. तरी पृथ्वी माडीवर होता आणि कस्तुरीला जेवायला द्यायचं होतं हे कारण काढून ती माडीवर गेली.
कस्तुरी,“ सरकार कसं हायती जी बायसाब? त्यास्नी लय तरास झाला का जी?” ती काळजीने विचारत होती.
मधुमालती,“ अगं ते ठीक आहेत आता आणि त्रास तर होणारच ना पण खूप नाही झाला औषधं होती ना त्यामुळे. आजच ते भेटायला आले असते तुला पण प्रवासामुळे थकले आहेत म्हणून नाही आले आणि बब्बू पण झोपली आहे गं. ती अर्धवट झोपेतून जागी झाली तर किती किरकिर करते तुला माहीत आहे ना? म्हणून तिला ही नाही आणले.” ती बोलत होती.
कस्तुरी,“ समदं नीट झालं महादेवच पावला बगा जी. मला तर लय भ्या वाटीत हुतं. म्या नगु म्हणत हुतु पर सरकार ऐकत्याती व्हय कुणाचं. अन बरं झालं जी सुगंधाला नाय आणलं.तिनं लय तरास तर नाय दिला नव्ह तुमास्नी ततं?” तिने विचारलं.
मधुमालती,“ हो बाई मला पण भीती वाटत होती पण सगळं नीट झालं बघ. आणि बब्बू तिच्या आत्याच्या घरी मस्त रमली होती आणि आत्या होती की तिची लाड करायला मग कशाला त्रास देते.पृथ्वी ये की रे जरा आऊ कडे” ती हसून म्हणाली.कस्तुरीच्या मांडीवर खेळत असलेला पृथ्वी मात्र कस्तुरीला आणखीनच बिलागला.
कस्तुरी,“ जावा की जी पृथ्वीसाब आऊकडं.” ती त्याला म्हणाली.
पृथ्वी,“ नाय..आऊ.. तू …जा.” तो तोंड फुगवून म्हणाला आणि मधुमालती हसायला लागली.
मधुमालती,“ हुंम आता माऊला कसं सोडू वाटेल. माऊने जास्तच लाड केलेला दिसतोय पंधरा दिवस.नुसतं ममं पिऊन चांगला सुधारला की हा. लबाड कुठला बरं नको येऊन पण एक पापी तर दे की आऊला.” असं म्हणून तिने हात पूढे केले आणि पृथ्वी तिच्याकडं गेला.
कस्तुरी,“ बायसाब उगा लेकराला नजर नगा जी लावू आन काय तुमी आन सरकार सारकं त्याला अंगावर पाजूनगु म्हणतायसा वं. पिऊ द्या की जी. मला दुद हाय आन पृथ्वीसाब पॉट भर पित्याती.” ती तोंड वाकडं करत म्हणाली.
मधुमालती,“ बरं बाई तुमच्या दोघात मी पडत नाही आणि जेवून घे आता. मुंबईहून मिठाई पण पाठवली आहे रमाने तू पण जेव आणि पृथ्वीला पण भरव. मी जाते. प्रवासाचा खूप शिन आला आहे बग.” ती पृथ्वीला कुरवाळत म्हणाली आणि निघून गेली.
★★★
दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून शाळेत आणि बाकी कामासाठी निघण्यापूर्वी राघवेंद्र माडीवर कस्तुरीला भेटायला गेला. कस्तुरी खिडकीत उभी राहून अंगणात गड्याच्या मुलांबरोबर खेळणाऱ्या पृथ्वीला पाहत होती.
राघवेंद्र,“ कस्तुरी.” तो म्हणाला आणि त्याचा आवाज ऐकून कस्तुरीने त्याच्याकडं पाहिलं आणि ती खाटवर येऊन बसली.
कस्तुरी,“ मला तुमच्या संगट बुलायाचं नाय. केलं नव्हं तुमी तुमच्या मनातलं? संवताला तरास करूनशान घिवून.” ती तोंड फुगवून बोलत होती पण डोळे मात्र गच्च पाण्याने भरले होते. राघवेंद्र तिच्याजवळ बसला आणि तिचा हात हातात घेऊन बोलू लागला.
राघवेंद्र,“ हिवडा बी तरास नाय झाला मला कस्तुरा. आन आता लय बरं वाटतंया नाय तर आंदी काळजावर दगड ठिवल्या गत झालं हुतं. अजून पंदरा दिस नाय पर त्या नंतार मी तुला असा सोडायाचू नाय बग. आन बुलायचं नाय नव्ह तुला? मला बी नाय बुलायाचं. आता पंदरा दिसानी इतु मग; म्हंजी बुलायाची गरज बी नाय पडायाची. समदं कसं गप गुमान करतू.” तो खट्याळ हसून तिच्या डोळ्यात पाहून बोलत होता. आणि कस्तुरीने लाजून पदराने तोंड झाकून घेतले.
कस्तुरी,“ जावा तकडं तुमचं काय बी अस्तया. आन आता जावा नाय तर उशीर व्हायाचा. आन कडूसं पडल्यावर या जी भेटाया.” ती म्हणाली.
राघवेंद्र,“ व्हय पर मी अब्यास बगणार हाय त्वां किती किला हाईस त्यो.” तो म्हणाला.
कस्तुरी,“ व्हय.” ती हसून म्हणाली आणि राघवेंद्र निघून गेला.
★★★
आता राघवेंद्र निश्चिंतपणे त्याच्या कामाला लागला होता.नसबंदी करून घेऊन त्याच्या डोक्यावरच खूप मोठं ओझं उतरल्या सारखं त्याला झालं होतं. सकाळची वेळ होती. राघवेंद्र त्याचे आवरत होता. सुगंधा तिथेच खेळत होती. मधुमालती खोलीत आली.
मधुमालती,“ अहो तुम्ही मला काही तरी देणार होतात विसरलात का?” तिने विचारलं.
राघवेंद्र,“ असा कसा इसरीन मी! दोन दिसानी तयार ऱ्हा अपुन साताऱ्याला जाणार हाय. माजी बी कामं हायती ततं. पर तुला कशा पाय जायाचं हाय तकडं?का मामा-मामीची आटवन इतिया?” त्याने विचारलं.
मधुमालती,“ म्हणजे आई आणि अप्पाला, दादा आणि वहिनींना भेटणे तर होईलच पण मला ना कस्तुरीला गुरू दक्षिणा द्यायची आहे. ती माझी गाण्याची गुरू आहे ना म्हणून.” ती म्हणाली.
राघवेंद्र,“ गुरू दक्षिणा पर असं काय द्यायाचं हाय माज्या बायकूला तिच्या गुरूला? आन निस्ती शिकतीयास पर आमला कवा भजन म्हणूनशान दावणार हाईस.”
मधुमालती,“ तुम्ही तर कस्तुरीला चांगलं ओळखता. तिला पातळं, दागिने असा कशाचाच सोस नाही. दागिने तर किती आहेत तिच्याकडे तिच्या आईने आणि तुम्ही ही दिलेले पण ती नाही घालत. तिला तीनच गोष्टी आवडतात. आणि त्यातल्या तर दोन तिच्याकडं आहेतच.” ती बोलत होती.
राघवेंद्र,“ दून गुष्टी तिच्याकडं हायत्या त्या कुटल्या गं? आन तिसरी गुष्ट कुटली हाय जी कस्तुरीकडं नाय?” त्याने विचारलं.
मधुमालती,“ एक तिचे सरकार आणि दुसरा तिचा पृथ्वी दोघांवर खूप जीव आहे बरं तिचा आणि तिसरा तिचा महादेव. तिच्याकडं पिंड आहे पण एक दिवस लहान मुलीसारखं मला सांगत होती की तिने म्हणे कुठे तरी ऐकलं आहे की पाऱ्याचं शिवलिंग असते आणि त्याची पूजा केल्यावर खूप पुण्य मिळतं म्हणे. आणि ती महाबळेश्वरच्या जंगलात एक बाबा आहेत फक्त ते तयार करू शकतात त्यांच्याकडं सिद्धी आहे म्हणे तशी.मीही त्या बाबांबद्दल ऐकलं आहे. हे सगळं सांगताना तिचा डोळ्यात जी भक्तीची चमक होती ना ती खूप वेगळी होती आणि मी जर पाऱ्याचे शिवलिंग तिला दिले तर किती आनंद होईल माझ्या सखीला. म्हणून मला जायचं आहे साताऱ्याला.” ती कौतुकाने सांगत होती.
राघवेंद्र,“ व्हय का आन माज्या मधूला कोण आवडतंया?” त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं.
मधुमालती,“ उम्म्म sss मला फक्त माझी बब्बू (सुगंधा) आवडते. तुम्ही मला घेऊन जाणार का नाही ते सांगा त्या जंगलात?” ती मुद्दाम म्हणाली.
राघवेंद्र,“ निस्ती बब्बू आडवतीया? बरं आन जातू मी घिवूनशान तुला कापडं भराया घी आन पृथ्वी येतू का बग का ऱ्हातुया माऊकडं त्येच्या?” तो तोंड फुगवून म्हणाला आणि निघाला.
मधुमालती,“ त्याला घेऊन जाऊ आई आणि वहिनींना खूप आठवण येतेय त्याची म्हणून पत्र पाठवलं होतं दादाने.”
राघवेंद्र,“ पर मधू ते जंगल लय निबीड हाय. आत चालत जावं लागतंया बाबाच्या आश्रमात लय बिकट वाट हाय. आन त्या बाबाबद्दल मी बी ऐकलं हाय ते कोणाला बी थारा देत नायती. हाकलून देत्याती आन कुणी आगळीकी किली तर चिडूनशान शाप बी दित्याती म्हणं. त्वां अजून एकदाव इचार कर.” तो गंभीरपणे म्हणाला.
मधुमालती,“ मी प्रयत्न तर करते ना हो. मला कस्तुरीच्या डोळ्यात तो आनंद पाहायचा आहे.” ती म्हणाली.
राघवेंद्र,“ बरं जाऊ अपुन.मी येतू.” असं म्हणून निघाला.
मधुमालती,“ हो. आणि मला नुसती बब्बू नाही बरं तिचे आबा पण आवडतात बरं का!” ती हळूच त्याच्या कानात म्हणाली आणि छोट्या सुगंधाला घेऊन निघून ही गेली. राघवेंद्र मात्र गालात हसत होता.
मधुमालतीला कस्तुरीसाठी पाऱ्याचे शिवलिंग आणायचे होते. ते तिला ते बाबा देतील का? की इतर लोकांप्रमाणे तिला ही हाकलून देतील?
क्रमशः
कथेचा मागील भाग खालील लिंकवर👇
©स्वामिनी चौगुले
