माडीवरची बाई भाग 53

 





    राघवेंद्र वाड्याच्या चौकातच झोपला होता. त्याला जाग आली ती कोणाच्या तरी उठवण्याने त्याने डोळे किलकिले करून पाहिलं तर सुभानराव त्याच्याकडे बोळकं पसरून मिस्कीलपणे हसत होते. राघवेंद्रने ते पाहिलं आणि डोळे चोळत तो उठून बसला.


सुभानराव,“ काय रं काल मालू बरुबर भांडान झालंया का कस्तुरी बरुबर? हतं निजला हाईस म्हंजी दून घरचा पवना उपाशी का रं?” ते त्याची मस्करी करत बोलत होते.


राघवेंद्र,“ अण्णा रामाच्या पारी मीच गावलु व्हय.” ती नाराजीने म्हणाला.


सुभानराव,“ तसं नाय लेका आरं हतं निजलास म्हणूनशान इचारलं. भांडान झालं काय रं?पर कुणा संगट?” त्यांनी विचारला.


राघवेंद्र,“ अण्णा माजं दुकी बरुबर बी भांडान झालं नाय. पर या बायांना समजावनं लय आवघाड अस्तया बगा.लय वैतागलूया बगा मी.” तो वैतागुनच बोलत होता.


सुभानराव,“ हिवड्यातच वैतागला व्हय रं? आजूनशान समदी जिंदगी काडायाची हाय की दुगी बरुबर तुला. तुला याक गुपित सांगतु दूगिस्नी बी म्हणायाच म्या तुजाच हाय. आन खुश करायचं लेका. या बाया बी ना निस्त्या आपलं ध्यान संवताकडं पायजेल म्हणजनशान तळमळत्यात्या. त्वां आता राजकारणात गिला हाईस नव्हं मंग शिक की लेका वाईस.” ते बोलत होते 


  त्यांना वाटत होतं की राघवेंद्र जो समजावण्याबद्दल बोलतोय ते म्हणजे मधुमालती आणि कस्तुरी दोघी ही त्याच प्रेम कुणावर जास्त आहे वगैरे म्हणून त्याला विचारत असतील आणि राघवेंद्रला दोघींना ही समाधानकरक उत्तर देता येत नाही म्हणून तो वैतागला आहे.


‛ तुमी समजताया तसं असतं नव्हं तर लय बरं झालं असतं अण्णा पर दुनी एक हायत्या त्या. आन माजं हाल चालल्याती.’ अर्थात राघवेंद्र हे सगळं मनात बोलत होता.


राघवेंद्र,“ अण्णा मी जातू मला लय कामं हायती.” असं म्हणून तो गेला आणि सुभानराव मात्र हसत होते.

★★★


  राघवेंद्र बाहेर निघाला होता. मधुमालती  सुगंधाला पाळण्यात झोपवून त्याच्याकडं वळली. तो आरशात पाहून केस विंचरत होता आणि तिने राघवेंद्रचा पांढरा शुभ्र झब्ब्या पाठीमागे जाऊन नीट केला आणि राघवेंद्रने आरशातुनच तिच्याकडं पाहिलं.


राघवेंद्र,“ आज मधू बायसाबास्नी बरा येळ मिळाला नवरा बाहीर जाताना त्येंचे जवळ थांबायाचा?” त्याने विचारलं.


मधुमालती,“ कळतात हो तुमचे टोमणे. पण तुम्हाला माहित आहे ना सकाळ सकाळ किती कामं असतात मला आणि ही बब्बू मला सोडत नाही. पृथ्वी खेळतो आता अण्णांबरोबर. मला वाटते नवरा बाहेर निघाला की त्याच्या आसपास राहावे पण जमत नाही.” ती खट्टू होत म्हणाली.


राघवेंद्र,“ म्हैत हाय मला मी मस्करी किली तुजी वाईस.”तो तिच्याकडे वळून तिच्या कमरेत  हात घालूल तिला जवळ ओढत म्हणाला.


मधुमालती,“ हे काय करताय सोडा बरं. कोणी तरी येईल.” ती लाजून म्हणाली. तिचा लाजेने आरक्त झालेला चेहरा राघवेंद्र पाहून गालात हसत होता.


राघवेंद्र,“ कोण बी नाय इत. आज लय दिसनं मी बाहीर जाताना त्वां तावडीत गावली हाईस तवा असा सुडतुया व्हय मी.” तो तिला आणखीन जवळ ओढत बोलत होता.


मधुमालती,“ काही तरीच बघा तुमचं. दिवसा ढवळ्या असले चाळे बरे नव्हेत.” ती स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत बोलत होती.


राघवेंद्र,“ मंग राती करू म्हणतीस चाळं?” त्याने मिस्कीलपणे तिला सोडून देत विचारलं.


मधुमालती,“ उगीच शब्दात पकडू नका मला. ते बाहेर राजकारणात करत जा. आणि काय म्हणाली कस्तुरी? रात्री गेलता ना माडीवर.” तिने विचारलं.


राघवेंद्र,“ व्हय का? त्वां बुलण्यात ऐकतियास व्हय मला! आन कस्तुरी  येडपाट हाय. येडं तिसरच बडबडया लागलं. म्हण मला काय तर बाहीरवासा झाला नाय तर करणी किली का काय म्हणं माज्यावर कुणी. मी संगतुया नसबंदीच आन ते येडं नाय ती बरळतय.” तो वैतागून बोलत होता.


मधुमालती,“ कस्तुरीला वेडी नाही म्हणायचं. आणि तुम्ही अचानक जाऊन  तिला असं काही सांगितलं तर ती बिचारी असाच विचार करणार ना.” ती थोडी रागात म्हणाली.


राघवेंद्र,“ ती बिचारी नाय बिचारा मी हाय तुमच्या दोन बायांमंदी अडकलू हाय. असं वाटतंया तुमास्नी सांगायाच नवतं पायजेल. माजी मी नसबंदी करूनशान घ्याया पायजेल हुती.पर ते पटलं नाय मला.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.


मधुमालती,“ हो का? आले मोठे असा विचार जरी मनात आणला ना तर मी आहे आणि तुम्ही आहात.” ती रागाने म्हणाली.


राघवेंद्र,“ व्हय जी राणी सरकार. मधू ऐक की गं त्वां सांग की समजूनशान कस्तुरीला समदं. ती माजं काय बी ऐकायाची नाय बग.” तो तिला लाडिगोडी लावत म्हणाला.


मधुमालती,“ बाप रे राणीसरकार? बरं मी सांगते तिला समजावून पण मला काय मिळणार त्या बदल्यात?” तिने त्याला रोखून पाहत विचारलं.


राघवेंद्र,“ काय पायजेल तुला?दितु की मी.” तो म्हणाला.


मधुमालती,“ माझं एक काम आहे साताऱ्यात तर मला घेऊन जायचं.” 


राघवेंद्र,“ हिवडच. किलं तुजं काम.” तो खुश होत म्हणाला.


मधुमालती,“ मग मी सांगते आज तिला समजावून आणि मग मुंबईला कधी जायचं ते ठरवू.”


राघवेंद्र,“ बरं मला येळ हुनार हाय आज घरी याया. कडूसं पडल्यावर येतू मी. कस्तुरीला सांगून जातू. पृथ्वी चौकात खेळतुया नव्हं?” त्याने पाळण्यात झोपलेल्या सुगंधाला प्रेमाने गोंजारले आणि तिच्या गालाचा पापा घेतला आणि तो निघाला आणि मधुमालतीने त्याचा हात धरला.

. br />

मधुमालती,“ आत्ता थोड्यावेळापूर्वी तुम्हाला जे हवं होतं ते रात्री मिळेल बरं का! आणि आहे बाहेर पृथ्वी.” ती हळूच मन झुकवून लाजत म्हणाली.


राघवेंद्र,“ हुम्म!” तो गालात हसून म्हणाला आणि निघून गेला.

★★★★



   मधुमालती नेहमीप्रमाणे कस्तुरीकडे गेली.


मधुमालती,“ कस्तुरी यांनी तुला नसबंदीबद्दल सांगितलं ना?”


कस्तुरी,“ व्हय काय बाय सांगत हुतं जी. म्हमईला लावूनशान काय नाय ती खुळ डोस्क्यात घितलंया. मला काय वाटातया बाईसाब सारकारांवर करणी तर किली नशील नव्हं कुणी? का बाहीरवासा झाला हाय त्यास्नी तवा असं बडबडाया लागल्याती जी ते?” ती भाबडेपणाने बोलत होती आणि मधुमालती हसायला लागली.


मधुमालती,“ असं काही नसते गं कस्तुरी. अगं आता नवीन ऑपरेशन निघालं आहे त्याला नसबंदी म्हणतात. ते पुरुषांनी करून घेतलं की मुलं होत नाहीत. मलाही त्यांनी सांगितलं आहे ते.” ती तिला समजावत होती.


कस्तुरी,“ पर मला मुलं हु नाय म्हणूनशान हिवडा आटापिटा कशापाय जी? आन त्येस्नी काय झालं म्हंजी? आन त्येंच्या मर्दुनकीला धका लागला म्हंजी? आन तुमास्नी बी मुलं व्हयाची नायती तेच काय? अजूनशान याक तर मूल तुमास्नी बायजेल की हिवडी जहागीरदारी हाय नव्हं.मला एक तर समजत नाय काय बी.” ती गंभीरपणे बोलत होती.


मधुमालती,“ अगं मला एक मुलगा आणि मुलगी बास आहे आणि जहागिरी आहे म्हणून काय मुलं जन्माला घालायची का? त्यांचे नीट संगोपन व्हायला नको? त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्यायला नको? हे राजकारणात यांना वेळ असतो का? आणि आता जसे हे राजकारणात प्रगती करतील तसे घराकडे त्यांचे लक्ष कमी होईल.त्यापेक्षा आहेत त्या दोन मुलांचे चांगलं संगोपन करू की. आणि मी स्वतः त्यांच्याबरोबर मुंबईला त्या डॉक्टरांना भेटायला जाणार आहे. तुज्या मनात असलेल्या शंका मला ही आहेत त्यांना सविस्तर विचारून मग मी निर्णय घेईल. आणि तुला मुलं व्हायला नकोत यांचा आटापिटा का आहे? हे तुला ही चांगलंच माहीत आहे.” ती तिला पुन्हा समजावत म्हणाली.


कस्तुरी,“ व्हय पर अजून एक मूल व्हाया पायजेल तुमास्नी असं वाटतंया जी मला.  बाईसाब त्येंचा आटापिटा बगूनशान तुमास्नी असं वाटत असलं नव्हं का सरकारांच पिरिम माज्यावर लय अन तुमच्यावर कमी हाय?” तिने घाबरत विचारलं.


मधुमालती,“ मला नको आहे कस्तुरी मूल आता आणि माझा निर्णय झाला आहे. आणि मला असं काहीच वाटलं नाही कस्तुरी आणि तूच म्हणाली होतीस ना की प्रेम जास्त कमी नसते त्याचे मोजमाप करता येत नाही तर ते असणे महत्त्वाचे आहे आणि त्यांचे माझ्यावर प्रेम आहे अगदी माझे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध होऊन देखील.

      खरं तर माझ्या नवऱ्याचा मला खूप अभिमान आहे. ज्या काळात अजून ही बायकांना दुय्यम दर्जा दिला जातो. एका वस्तूसारखी तिची खरेदी-विक्री होते.घरात काय किंवा दारात काय तिच्या मनाचा विचार केला जात नाही. त्या काळात माझा नवरा एका नाही तर दोन बायकांच्या मनाचा विचार करतो. त्यांना स्वतःच्या सुखापेक्षा आपले मन जपणे महत्त्वाचे वाटते. त्यांनी मला विचारलं की तुला अजून मुलं हवी आहेत का? विचार करून सांग माझ्यावर त्यांनी कोणताही निर्णय लादला नाही.माझे मन जपलं प्रेम आहे म्हणूनच ना? आणि माझ्याच सांगण्यावरून तुझे मत घ्यायला आले. त्यांना तुझ्यातल्या आईवर अन्याय होऊ द्यायचा नाही. इतके दिवस झालं म्हणूनच ते तुझ्यापासून लांब आहेत ना? का तर त्यांना तुझे मन जपायचं आहे. समाज, घरातले इतकंच काय स्वतःचा ही विचार न करता ते नसबंदी करून घ्यायला तयार झाले आहेत.उलट बाईच्या मनाचा इतका विचार करणाऱ्या  अशा नवऱ्याचा  आपल्याला अभिमानच हवा कस्तुरी.”ती अभिमाने बोलत होती.आणि कस्तुरीच्या डोळ्यात देखील राघवेंद्र विषयीचा अभिमान झळकत होता.


कस्तुरी,“ व्हय मला बी आबीमान हाय जी त्येंचा पर त्येंस्नी काय झालं म्हंजी?मला भ्या वाटतया जी.” ती काळजीने म्हणाली.


मधुमालती,“ तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?” तिने विचारलं.


कस्तुरी,“ व्हय जी संवता परास ज्यादा.” ती म्हणाली.


मधुमालती,“ मग मी जाणार आहे ना त्यांच्याबरोबर तसं काही मला वाटलं तर मी यांना असं काही करू देणार नाही. तू काळजी नको करुस.” ती म्हणाली.


    मधुमालतीच बरोबर तर होतं.तो काळच तसा होता. ज्यात स्त्रीला पायपुसने समजले जात होते. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी अख्खी हयात झटून देखील स्त्री शिक्षणाचे प्रमाण कमीच होते मधुमालतीसारख्या उच्च वर्गातील स्त्रियांना शिक्षण मिळत होते पण कस्तुरीसारख्या तळागाळातील स्त्रिया अजूनही  शिक्षणापासून वंचित होत्या. एकाच वाड्यात दोन टोकाच्या सामाजिक स्थितीतील प्रतिनिधित्व करणाऱ्या  स्त्रिया राहत होत्या. आणि त्यांना सांधणारा दुवा म्हणजे राघवेंद्र होता. तो आधुनिक विचारांचा होता. त्याला स्त्री शिक्षणच नव्हे तर एकूणच समाजाच्या शिक्षणाबाबतीत तळमळ होती.त्याने अट्टाहासाने कस्तुरीला शिक्षित केलं होतं आणि  तो आता नसबंदी करण्याचा विचार करून आणखीन एक पाऊल पुढे टाकू पाहत होता.आणि अशा नवऱ्याचा मधुमालतीला अभिमान वाटणे साहजिकच होते.

©स्वामिनी चौगुले

क्रमशः

कथेचा या आधीचा भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग 52












 


Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post