माडीवरची बाई भाग 13

   




    महेंद्रप्रताप शेतावर निघून गेले. इकडे दिवस मावळण्याआधी राघवेंद्र वाड्यावर आल्या पण महेंद्रप्रतापांनी सांगितल्या प्रमाणे त्याच्याशी कोणीच काही बोलले नाही. दिवस मावळला आणि रंग्या अजून दोन माणसं घेऊन  दिवे लागणीच्या वेळी मदनच्या घरी पोहचला. मदन,अप्पा दुकान बंद करून नुकतेच घरी आले होते. त्याचे दोन मोठे भाऊ माल आणायला साताऱ्याला गेले होते ते दुसऱ्या दिवशी येणार होते. 


 अप्पाचा देखील मोठा नसला तरी छोटे खाणी दगडी वाडा होता. रंग्या आणि त्याची माणसे चौकात गेली.


रंग्या,“ अप्पा शेठ बाहीर या.” त्यांनी हाक मारली. 



   अप्पा आणि त्यांच्या मागे मदन बाहेर आले दोघे ही रंग्याला पाहून जरा घाबरलेच होते. कारण रंग्या म्हणजे लूटमार करणारा आणि जहागीदार सरकारचे काम करणाऱ्या टोळीचा म्होरक्या होता. त्यामुळे तो असा कोणाच्या घरी जाणे म्हणजे जहागीदार सरकारांची अवकृपा समजली जायची कारण गावात त्यांना जहागीदार सरकारांनी चोरीमारी करण्याची मुभा दिली नव्हती. तो सरकारांचे काम असेल तरच कोणाच्याही घरी जायचा आणि काम साधे नसायचे. त्या घरातील एखाद्या सदस्याला उचलून घेऊन जायलाच बऱ्याच वेळा तो जायचा.आज तो अप्पाच्या  दारात उभा होता म्हणजे काही तरी गडबड आहे हे अप्पांनी ओळखले होते.


आप्पा,“ रंग्या आज हकडं कुटं वाट चुकलास?” त्यांनी विचारलं.


रंग्या,“ वाट चुकलो न्हाय बरुबर आलू हाय अप्पा तुज्या या पोराला थोरल्या  सरकारांनी बोलीवल हाय. चल ये मद्या.” तो दम देतच म्हणाला.


अप्पा,“ पर काय केलं माज्या मद्यानं? मद्या काय केलास लेका? आरं असं रंग्याला पाठवूनशान थोरल्या सरकारांनी बोलीवनं म्हंजी सादी गोस्ट नाय.” ते विचारत होते.


मदन,“ पर म्या काय बी नाय केलु आप्पा. रंग्या म्या उंद्या धाकल्या सरकारांसमुर थोरल्या सरकारास्नी भेटाया येतू.” तो म्हणाला.

br />

रंग्या,“ गप गुमान चल नाय तर उचलून न्हेनार तुला. थोरल्या सरकारांचा हुकूम हाय.” तो आता दरडावत म्हणाला.


अप्पा,“ बरं मंग म्या बी येतू ह्याच्या बरुबर. काय सांगाता याचं नाय बाबा तुमचं माज्या पोराला मारूनशान गाडसाल तुमी. अन तुला म्या लय येळला सांगितलं मद्या धाकल्या सरकारांची दोस्ती नगं म्हणूनशान आता काय वाडून ठेवलंया समुर त्या काशी लिंगालाच म्हैत. चल.” ते म्हणाले आणि दोघे रंग्याबरोबर जहागिरदारांच्या शेतावर गेले.


    महेंद्रप्रताप शेतातल्या घरात त्यांची वाटच पाहत बसले होते.  उजेडासाठी पेटवलेल्या मशालीचे पलिते वाऱ्याबरोबर फरफरत होते. महेंद्रप्रताप घराच्या ओसरीत एक बाज होता त्यावर बसले होते. रंग्याच्या टोळीतील काही माणसं त्यांच्याबरोबर होती आणि शेतात देखरेखी साठी ठेवलेले तीन गडी देखील.  चांगलाच अंधार होता डोळ्यात बोट घातले तरी दिसले नसते.  रंग्या आणि त्याची माणसे कंदिलाच्या प्रकाशात वाट काढत मदन आणि अप्पाला घेऊन आले आणि अप्पा सरळ जाऊन बाजेवर बसलेल्या महेंद्रप्रतापरावांच्या पुढे लोटांगण घालत म्हणाला.


अप्पा,“ सरकार एकदाव माफ करा जी. तरनं पोरगं हाय चुकी झाली असलं.” 


महेंद्रप्रताप,“ आरं अप्पा आदी पाय सोडा तुमी; गावातली परतिष्टीत आसामी असं आमच्या पायावर लोटांगीन घितीया सोबत नाय  आन इतकं भ्याया काय जालं. म्या तुज्या पोराला काय बी करणार नाय फकस्त काय सवाल इचारन त्याची उत्तर त्यानं बरुबर दिली की झालं. तुमी घरी जा मंग. ” ते अप्पाला उठवत म्हणाले.


अप्पा,“ मद्या सरकार काय इचारत्यात ते सांग बाबा.” ते मदनला रागावत पण केविलवाणे होत बोलत होते. बापाच काळीज ते मुलाच्या चिंतेने व्याकुळ झाले होते.


महेंद्रप्रताप,“ काल त्वा आणि राघव कुटं गेला हुता?” त्यांनी मदनकडे रोखून पाहत  विचारलं आणि मदन चपापला. तरी स्वतःला त्याने लगेच सावरले.


मदन,“ माजगावला गेलतू जी.”


महेंद्रप्रताप,“ कशापाय गेलतासा?” 


मदन,“ तुमची जहागिरी हाय नव्हं ततं ती बगाया जाऊ म्हणाला हुता राघव तीच बगाया गेलतु जी.” तो म्हणाला आणि महेंद्रप्रताप कडाडले.


महेंद्रप्रताप,“आमच्या समुर खुटं बुलतुयास? मद्या खरं सांग कुणाला भेटाया गेलतासा?” 


मदन,“ न्हाय जी कुनाला भेटाया जाणार.” तो खाली मान घालून म्हणाला.


महेंद्रप्रताप,“ म्हंजी तुला नीट सांगायचं नाय तर? बरं सपस्ट इचारतू ही हरणी कोण हाय? आन राघव आन तिचं काय चालू हाय? आन ते कुटंवर आलं हाय? ” त्यांनी विचारलं. आणि मदन शांतच उभा होता थोडा वेळ असाच गेला तरी तो काहीच बोलत नव्हता.


महेंद्रप्रताप,“ बऱ्या बोलणं सांगतुस का आता?” ते ओरडले.


अप्पा,“ सांग की रं मद्या सरकार काय इचारत्यात.” ते म्हणाले तरी तो गप्पच.


रंग्या,“ सरकार याला चांगला लोळीवतू मग ह्यो थोबाड उगडलं.” तो त्याच्या अंगावर गेला आणि मदन शांतपणे म्हणाला.


मदन,“माजा जीव घेतलासा तर बी म्या काय बी सांगायचो नाय. राघव तुमच्या साटनं धाकलं सरकार हाय पर माज्या साटनं त्यो माजा जीवाभावाचा मैतर हाय आन त्याच्याशी गद्दारी म्या करणार नाय.” तो रंग्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. रंग्या त्याच्या अंगावर मारायला गेला. आणि महेंद्रप्रतापनी त्याला हाताने नको म्हणून थांबवले. अप्पाने मात्र त्याच्या एक कानाखाली दिली.


अप्पा,“ आरं काळ येळ काय हाय अन त्वा काय बुलतुयास? आरं तुला मारूनशान गाडत्याल आन कुनास्नी कळायचं बी नाय.आन म्या काय करायचं मद्या? आरं मला आन तुज्या आयला सहीन हुईल का ही? आरं तळ हाताच्या फोडा गत वाडीवला तुला असं कुणा साटनं मराया व्हय रं? सांग की बाबा कोण हाय ती बाय. हात जुडतु तुज्या पुडं.” ते आता रडत बोलत होते.


मदन,“ माफ करा अप्पा पर तुमी हात नगासा जोडू म्या नाय सांगायचो काय. म्या राघवचा इश्वास नाय तोडायचो.” तो त्यांचे हात धरत म्हणाला. महेंद्रप्रताप त्यांचे बोलणे शांतपणे ऐकत होते. मदनचे बोलणे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर पुसटसे हास्य आले पण त्यांनी लगेच चेहरा कठोर केला.


रंग्या,“ सरकार याला चांगला बुकलतो. म्हंजी रागूवानी कसा घडाघडा बुलतुया बगा. ये हानम्या, सुभ्या धरा रं याला.” तो ओरडला आणि दोघांनी मदनला करकचून  धरलं. महेंद्रप्रताप उठून उभे राहिले आणि ओरडले.


महेंद्रप्रताप,“ सोडा त्येला. इसरू नगासा त्यो धाकल्या सरकारचा मैतर हाय.(ते ओरडले आणि दोघे मदनला सोडून  बाजूला झाले.) मद्या तुला काय वाटतंया त्वां अमास्नी नाय सांगतलस तर अमास्नी  नाय समजणार व्हय? अमी जहागीदार  सरकार हाऊत इसरला का काय लेका?” त्यांनी त्याला रोखून पाहत विचारलं.


मदन,“ मला म्हैत हाय जी सारकार. पर राघव माजा मैतर हाय म्या त्याच्या संग गद्दारी नाय करायचू.” तो पुन्हा तेवढ्याच ठामपणे म्हणाला.


महेंद्रप्रताप,“ याचं परिनाम काय हुत्याल तुला म्हैत हाय नव्हं? अमी ठरीवलं तर हतं आताच्या आता तुजा अन तुज्या बाचा मूडदा पाडू.” ते रागाने त्याला धमकावत म्हणाले.


मदन,“ सरकार माज्या अप्पास्नी यात घुवू नगासा जी. या समद्यात त्यांची काय बी चूकी नाय. त्यास्नी सोडा.अन माजा मूडदा तुमास्नी पाडायाचा असलं तर पाडा जी.” तो तितक्याच ठामपणे न डगमगता बोलत होता. अप्पा मात्र आता हात पाय गाळून तिथेच जमिनीवर बसले.


महेंद्रप्रताप,“ लय हिमतीचा हायस की! का मरणाचं भ्या वाटत नाय व्हय रं तुला?” त्यांनी पुन्हा विचारलं.


मदन,“ वाटतंया जी पर राघववानी मैतराबरुबर गद्दारी करूनशान जितं ऱ्हान्या परास मेललं कदी बी बेस.” तो त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला.


महेंद्रप्रताप,“ व्हय का? हनम्या, सुभ्या  मदनरावास्नी त्येंच्या घरी सोडा अन त्यांच्या घरावर नजर ठेवा. अप्पा तुमी थांबा हतं.” ते म्हणाले.


मदन,“ नाय नाय अप्पास्नी हतं एकलं सुडून म्या नाय जायचो. अप्पांची काय बी चुकी नाय जी.” तो डोळ्यात पाणी आणून हात जोडून म्हणाला.


महेंद्रप्रताप,“ आरं म्या तुज्या बाला काय बी नाय करणार. मला बोलायाच हाय त्यास्नी. बरं हनम्या या मदनला ततं घिवून जा आन हुबार. ततंन अमी तुला नजरं पडणार बग.” ते म्हणाले आणि होकार्थी मान हलवून मदन हनम्याबरोबर त्यांच्यापासून बराच लांब उभा राहिला. ते त्याला दिसत होते पण ऐकू काहीच येत नव्हतं.


महेंद्रप्रताप,“ माफी कराजी अप्पा तुमी गावातली मोटी आसामी आन जे काय बी झालं त्यात तुमच्या लेकाची काय बी चुकी नाय हे बी अमास्नी म्हैत हाय. पर मला मनात नस्ताना बी असं वागावं लागलं.” ते बोलत होते.


अप्पा,“ असं काय बोलतायसा जी तुमी गावचं सरकार हायसा आन तुमी जी बी केलं ते बा म्हणूनशान आन जहागीदार म्हणूनशान बरुबर हुतं पर आमचं कार्ट थोबाड उगडं ना नव्हं. द्यायचं हुतं तुमी बी दोन रट्ट ठिवून.” ते महेंद्रप्रतापरावांचा बोलणं ऐकून जरा निर्धास्त झाले होते.


महेंद्रप्रताप,“ नाय वं धाकलं सारकरांचं मैतर हायती ते बी  जिवाभावाचं! असं कसं रट्ट द्यायचं. पर अप्पा तुमचा मदन अमास्नी लय आवडला. असा मैतर हुडकून बी गावायचा नाय अप्पा. त्यो मैतरा साटनं जीव घ्याया बी तयार हाय. माणसांची पारक आन कदर अमास्नी हाय. तुमचा पोरगा म्हंजी बावन्नकशी सोनं हाय.आमी लय खुश काय तेच्यावर त्याला आमी आज बक्षिसी दिली असती पर येळ वंगाळ हाय आन त्यो धाकल्या सरकारचा मैतर हाय बक्षिसी दिवूनशान म्या त्याच्या  दोस्तीची किंमत कमी नाय करायचो पर येळ आल्यावर त्याचा मानपान हुनार अप्पा. आता तुमच्या ध्यानात समदा मामला आला असलं? एका तमासगिरणीच्या पोरीच्या नादाला लागला हाय माजा लेक. आन तुमचा मदन त्याच्याबरुबर हुता म्हणूनशान आणलं हुतं त्याला हतं दम दिवून काय मायती हाती लागलं वाटलं हुतं पर ह्यो पट्ट्या त्वांड उगडीना की. जाऊ द्या म्या बगतु समदं.” ते बोलत होते.


अप्पा,“ व्हय जी ते आलं माज्या ध्यानात.ही तरणी पोरं हायती जी चुका व्हायच्याच, पाय बी घसरायचा. पर घरची इब्रत महित्वाची. म्या मद्याला ओळीकतू लय खट हाय बेनं नाय उगडायच त्वांड! हकडची गोट तकडं नाय करायचा.आन धाकल सरकार मंजी तर त्याचा जीवभावाचं दोस्त हायती. माफी कराजी सरकार माजं पोर तुमास्नी उलटून बोललं.” ते हात जोडून म्हणाले. मदनचे मात्र सगळे लक्ष दोघांकडे होते पण इतक्या लांबून  ऐकू मात्र काही येत नव्हते त्याला.


महेंद्रप्रताप,“ आणी एक काम हाय अप्पा म्या हे परकरण निस्तरु तवर मदनला कुटं तरी आट दिस पाटवा. नाय तर त्यो कवा राघवला इवून समदं सांगल आन सावद करलं सांगता यायचं नाय. मामला नाजूक हाय. अन त्याला सांगा म्या दम दिला हाय हात पाय गळ्यात टांगीन म्हणूनशान त्यो काय भ्यायचा नाय पर मनातून जरा कचरल. आन हनम्या आन सुभ्या तुमच्या घरावर आज रातच्याला नजर ठिवत्याल आन मदनला कुटं धाडणार ततं बी मागं जात्याल. ते त्याला काय बी दगा फटका नाय करणार पर ह्यो पळून आला मजी गावात राघवला भेटाया म्हणशान.” ते म्हणाले.


अप्पा,“ तेची तुमी काय बी काळजी नगा करू सरकार म्या संवता त्याला घिवून जातू उंद्याच तांबड फुटाया मुक्काम इस्टी नं आन नजर बी ठिवतु तुमी धाडा माणसं म्हंजी त्यो बी बिचकल. आता मला बी इचार कराया बायजेल जी याच्या दोनी भावांच, आन दोन भनीची बी लगीन लावून दिली जी येळत पर हे घरचं शेंडे फळ लाडकं हाय जी जरा म्हणूनशान म्हणलं हुंदडू द्यावं. पर आता हेच्या बी गळ्यात बायकू बांदावी लागलं मला. आता पोरी बगाया पायजेल. राग ईनार नसलं तर याक बोलू का सरकार?” त्यांनी अडखळत विचारलं.


महेंद्रप्रताप,“मदन मॅट्रिक हाय. आन तुमचं पीडिजात दुकान हाय, शेती हाय आन तुमच्या समद्या पोरां परसा उजवा बी हाय दिसया आन बुद्दीनं बी तवा कुणी बी हसत पुरगी दिल की त्येला, उडवून टाका अवंदा बार. आन असं अडकळतायसा कशा पायी? बोला की अप्पा.” ते म्हणाले.


अप्पा,“ व्हय जी समदी पोरं माज्यावर पडली आन ह्यो आई वानी देकना झाला.आन हुसार बी हाय भावंडात. मोटा चौती शिकलाया वाचाया लिवाया येतं त्येला, मदवा सातवी हा मातूर मॅट्रिक, समद्यात जात शिकला नव्हं  आन शेंडेफळ नव्हं तवा ज्यादाच लाड झाला बगा जी याचा.म्या काय म्हणतु धाकल्या सारकरांचं लगीन लावून द्या जी आन नव्हरी  तुमच्या घरचीच हाय की. जयसिंगरावाची पोर देकनी हाय आन पंदरावी शिकली हाय म्हण! म्या रमा ताईसाबांच्या लगीनात ऐकलं हुतं आन बगितली बी हाय जी पोरीला अक्षी नक्षत्रगत हाय. आपलं धाकलं सरकार बारिस्तर हायती ते बी गोऱ्यांच्या देशात शिकूनशान आल्याती देकनं हायती दोगांचा जोडा अक्षी लक्ष्मी नारायणावाणी सोबल जी. आन एकदाव लगीन झालं नव्हं ते हरणी का  कोण ती बया तिला इसरून जात्याली जी. ज्यादा बोललं तर माफी करा जी सरकार.” ते अडखळत म्हणाले.


महेंद्रप्रताप,“ माफी कशा पायी मागतायसा अप्पा आवं आमच्या समद्याच्या  मनातलं वळीखलासा बगा. आवं कवाच लगीन आतून ठरिवलं हाय आमी  मालू बरुबर राघवच आता पूडल्या सप्तात सुपारी फोडू तुमी येणारच की साताऱ्याला.” ते दोघे बोलत होते आणि उभं राहून वैतागलेला मदन त्यांच्याकडे येऊ लागला.


अप्पा,“मंग झाक हाय. आला बगा मुडदा पळीतच म्या समदं बगतु याला कसं बागायाचं ते. बा पक्षी या पोरास्नी भ्यायाची येळ आली.” ते हसू दाबत गंभीर भाव चेहऱ्यावर आणत म्हणाले.आणि महेंद्रप्रताप पण गालात हसून रागात असल्याचे नाटक करत म्हणाले.


महेंद्रप्रताप,“ ध्यानात असू द्या अप्पा नाय तर वंगाळ हुईल लय.” 


अप्पा,“ व्हय जी सरकार. चल बाबा बिगिबिगी.” ते मदनचा हात धरून त्याला ओढत येत म्हणाले.


मदन,“ इतक्या येळ काय बोलत हुता तुमी?” त्याने चालत विचारलं


अप्पा,“ माजं कपाळ चल आता लय मोटा पराक्रम केला नव्हं त्वां म्हणूनशान शाबासकी देत हुतं. ऐकलं नाय काय कसं धमकावत हुतं.” ते रागाने म्हणाले.


हनम्या,“ तरी बी लय स्वस्तात सुटलासा गड्यानो. तुला तर लय बुकलला असता रं मद्या पर तू धाकल्या सारकरांचा मैतर म्हणूनशान थोरल्या सरकारांनी सोडला तुला.” तो म्हणाला.


महेंद्रप्रतापच्या डोक्यात काय योजना शिजत असेल? मदनला राघवशी न भेटू देणे. तसेच राघवला त्यांना सगळं कळले आहे हे न कळू देणं या मागे त्यांचा उद्देश काय असेल? आणि राघवला ते मधुमालतीशी  लग्न करायला कसे तयार करणार होते? राघव हरणीला विसरून मधुमालतीशी लग्न करायला तयार होईल का? 

क्रमशः

©स्वामिनी चौगुले


कथेचा या आधीच भाग खालील लिंकवर👇


माडीवरची बाई भाग 12


अशाच मनोवेधक कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.















Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post