मराठी लघुकथा त्यालाही थोडं समजून घ्यायला हवं




 सकाळची वेळ होती सारिका नाश्त्याला शिरा बनवत होती पण नेहमीप्रमाणे तिची चिडचिड सुरू होती.


सारिका,“ आठ वाजले नाश्त्याचं तर झालं अजून डबे करायचे आहेत. प्रत्येकाची वेगळी तऱ्हा असते. आता निमिषला कोबी आवडत नाही तर निधी आणि यांच्या बापाला आवडते. आता निमिषसाठी काही वेगळी भाजी करावी लागेल.” तिने बडबडत नाश्त्याची प्लेट धीरज समोर आणून आपटली. धीरज पेपर वाचत बसला होता.


धीरज,“ अगं सारिका तुला नाही होत सगळं तर मग कशाला करतेस गं? पोरं कँटीनमध्ये काही तरी खातात की. त्यांना नुसता डबा देत जा जेवणाचा आणि मला देखील मीही खात जाईन काही तरी ऑफिसमध्ये.” तो तिला समजावत बोलत होता.


सारिका,“ हो ना खा बाहेरच आणि पडा आजारी. मला काय? बाई या घरात माझ्या कामाला किंमतच नाही. यांच्यासाठी मरमर करा आणि वरून हे असं उसनं बोलणं!” ती चिडून बोलत होती.


धीरज,“ तसं नाही गं बाई तुलाच त्रास होतो ना म्हणून म्हणलो मी.” तो  तिला पुन्हा समजावत म्हणाला.तोपर्यंत निमिष आणि निधी तयार होऊन आले.


निधी,“ बाबा तू ना या आईला काहीच सांगत जाऊ नकोस. आपण चांगलं जरी बोललो तरी हिला चिडचिडच करायची असते.”


सारिका,“ हो ना. एवढी घोडी झालीस पण आईला जरा मदत करायला नको तुला. आणि म्हणे मीच चिडचिड करते.


धीरज,“ अगं तिला किती अभ्यास असतो. यावर्षी बारावी हिला डॉक्टर व्हायचं मग NEET चे क्लासेस आणि त्याचा अभ्यास तिला वेळ तरी आहे का? तू एक काम का करत नाहीस? सखू बाईंना विचार त्या सकाळी लवकर येऊन तुझी मदत करतील का?तसं असेल तर लावून टाकू त्यांना. असं ही त्या बाकी कामं आणि संध्याकाळच्या पोळ्या करतातच ना.” तो बोलत होता.


सारिका,“ घे मुलीची बाजू घे हो तू आणि सखूला नाही जमत ना! आणि इतक्या सकाळी कोणतीच बाई येत नाही रे कामाला. मी पण बोलत काय बसले तुम्हाला. तो शिरा खाऊन घे आणि निधी मॅडम शिरा घेऊन या बरं तुमचा आणि आपले राजे उठले का?” ती उठून किचनकडे जात म्हणाली.


निधी,“ आई माझ्यावर घसरायचं नाही आ. मला खूप अभ्यास असतो.” ती तोंड फुगवून म्हणाली.


निमिष,“ आई लवकर नाश्ता दे आज लेक्चर आहे दहाला.” तो सॅक घेऊनच घाईत हॉलमध्ये येत म्हणाला.


सारिका,“ आणि हे तू मला आत्ता सांगतो आहेस? अरे डबा तयार व्हायचा आहे अजून.”


निमिष,“ नको मला डबा मी बाहेर काही तरी खाईन.” तो म्हणाला.


धीरज,“ पैसे आहेत का देऊ? आणि हा घे शिरा खा आणि पळ आता.” तो स्वतःची शिऱ्याची प्लेट त्याच्यासमोर सरकवत म्हणाला.


निमिष,“ आहेत बाबा पैसे.” तो भरभर खात म्हणाला आणि पळतच निघाला.


सारिका,“ हळू जा रे.” ती किचनमधून म्हणाली.


   सारिका म्हणजे चाळीशी पार केलेली एक सामान्य गृहिणी होती. तर धीरज एका कार्पोरेट कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर होता. त्यांना निधी आणि निमिष अशी दोन मुलं. निधी बारावीत तर निमिष दहावीत होता. चार माणसांचे छान कुटुंब होते त्यांचे.


   पण सारिका आजकाल सतत चिडचिड करणारी थोडा जरी तिला त्रास झाला तरी स्वतःला खूप काही होत आहे असं समजून कांगावा करणारी झाली होती. रोज तिची कोणत्या ना कोणत्या कारणावरून चिडचिड ठरलेली होती. धीरज मात्र शांत आणि समंजस होता. त्याला आणि मुलांनाही तिच्या स्वभावाची सवय झाली होती. आज देखील तिची नेहमीप्रमाणे चिडचिड करून झाली होती. मुलं निघून गेली आणि धीरज देखील तयार होऊन ऑफिसला निघाला. सारिकाने त्याच्या हातात डबा दिला.


सारिका,“ आजकाल माझे हात पाय खूप दुखायला लागले आहेत. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन यावं म्हणतेय.” ती सोफ्यावर बसत म्हणाली.


धीरज,“ ठीक आहे जाऊन ये.” तो डबा बॅगेत ठेवत म्हणाला.


सारिका,“ हो जाते ना एकटीच. तुला काय रे? तुम्ही पुरुष आरामात असता बाबा! कसली म्हणून तुमच्या शरीराची झीज होत नाही. इथं दोन सिझेरियन आणि आता मेनोपॉज सुरू झाला. बेचाळीस वयातच हाडं पार खिळखिळी झाली माझी.” ती स्वतःच्या हातानेच स्वतःचे पाय दाबत बोलत होती.


धीरज,“ बरं बाई संध्याकाळी मी लवकर येतो. आपण जाऊ हॉस्पिटलमध्ये.” तो म्हणाला आणि निघून गेला.

★★★★


     संध्याकाळी धीरज ऑफिसमधून आला होता त्याला साडेआठ वाजले होते घरी यायला. तसा तो थकलेला  दिसत होता. सारिका मात्र हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार होऊन बसलेली दिसत होती. निमिष घरीच होता. निधी मात्र अजून आली नव्हती. सारिका मात्र रागाने धुमसत होती.


धीरज,“ सॉरी गं आज खूप काही घडलं ऑफिसमध्ये! आपण उद्या नक्की जाऊ नाही तर तू निमिषला घेऊन जायचंस ना.” तो थकून सोफ्यावर बसत म्हणाला.


सारिका,“ तुला रोजच काम असते धीरज. माझ्यासाठी तुला वेळ कुठं असतो? आणि निमिषला घेऊन जायला उद्या त्याची युनिट टेस्ट आहे तो अभ्यास करत बसला आहे. माझीच चूक झाली तुझ्याकडून अपेक्षा ठेवली मी जाईन राखीला सोबत घेऊन उद्या दुपारी.” ती त्याला पाणी ही न विचारता रागाने म्हणाली आणि कपडे बदलून किचनमध्ये गेली.

★★★


   ती दुसऱ्या दिवशी राखी तिची सोसायटी मधील मैत्रीण तिच्याबरोबर दुपारून हॉस्पिटलमध्ये जाऊन आली. संध्याकाळी धीरज घरी आला त्याने तिला जेवण वगैरे झाल्यावर बेडरूममध्ये गेल्यावर विचारलं.


धीरज,“ आज हॉस्पिटलमध्ये गेली होतीस ना? काय म्हणाले डॉक्टर?”


सारिका,“ काही नाही ब्लड टेस्ट केल्या आणि व्हिटॅमिन डी कमी झालं आहे म्हणून सांगितलं. त्याच्या स्प्लिमेंट्स दिल्या आहेत. आज सूरजदादाचा फोन आला होता. सूरजदादा आणि रतीने फ्लॅट घेतला आहे ना नवीन त्याची वास्तुशांत आहे. आपल्याला बोलावले आहे.


धीरज,“ मग आता वेळेवर त्या स्प्लिमेंट्स घे.  तू आणि मुलं जा. हो मलाही आला होता फोन त्याचा पण मी मिटिंगमध्ये होतो. इअर एंडिंग सुरू आहे ना त्यामुळे मला जमणार नाही गं यायला.” तो म्हणाला.


सारिका,“ तुझं हे नेहमीचच आहे. तुझा भाऊ आणि भावजय पण नाती कोण सांभाळायची मी. आता तिथं गेल्यावर तू का आला नाहीस म्हणून सगळे विचारणार सगळ्यांना तोंड कोण देणार मी.” ती बडबडत होती.


धीरज,“ सांग काही तरी कारण. आणि उद्या गिफ्ट घेऊन ये.” तो म्हणाला.


सारिका,“ हो ते तर करावंच लागणार ना.” ती रागनेच म्हणाली.

★★★

  

   दोन दिवस असेच गेले. सारिका आणि मुलं सकाळीच कार्यक्रमला निघून गेले. धीरज ऑफिसला गेला. संध्याकाळी आठ वाजता. सारिका आणि मुले घरी आली. धीरज ऑफिसमधून आला आहे म्हणून तिने बेल वाजवली पण बराच वेळ बेल वाजवून पण दार उघडले नाही. तिला जरा विचित्र वाटले कारण पार्किंगमध्ये त्याची कार उभी होती. तिने  घाईतच तिच्याकडे असलेल्या चावीने दार उघडले. तिघे आत आले. तर हॉलमध्ये धीरज बेशुद्ध पडलेला त्यांना दिसला. घाबरून तिघे त्याच्याजवळ गेले. निधीने धावत जाऊन पाणी आणले.


सारिका,“ धीरज काय झालं?” ती रडत त्याच्या तोंडावर पाणी शिंपडत बोलत होती पण तो काही केल्या उठत नव्हता.


  तोपर्यंत निधीने घाबरतच त्याच्या हाताची नस चेक केली आणि छातीला कान लावून पाहिलं.


निधी,“ निमिष राकेश काका आणि राखी मावशीला बोलवून आन बाबाला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल.” ती घाबरून रडतच बोलत होती तसा निमिष धावतच गेला.


सारिका,“ काय झालं याला निधी? उठ ना धीरज.” ती रडत त्याला हलवत बोलत होती.


निधी,“ आई कदाचित बाबांला हार्ट अटॅक आला आहे. आपल्याला त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल. त्याच्या हार्ट बिट्स खूप मंद झाल्या आहेत.” ती रडत बोलत होती आणि तिचे बोलणे ऐकून सारिकाच्या पाया खालची जमीनच सरकली. 


   तोपर्यंत राखी आणि राकेश आले. धीरजला हॉस्पिटलमध्ये घेऊन ते पोहोचले. डॉक्टरांनी त्याला इमर्जन्सीमध्ये घेतले. तोपर्यंत निधीने सूरज म्हणजे धीरजच्या भावाला फोन केला. डॉक्टर इमर्जन्सीमधून  बाहेर आले.


सारिका,“ डॉक्टर धीरज कसा आहे? काय झालं आहे त्याला.”


डॉक्टर,“ हे बघा मॅडम तुमच्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला आहे. आपल्याला तातडीने  त्यांची अँजिओप्लास्टी करावी लागेल. तुम्ही फॉर्मेलिटी पूर्ण करा आणि पैसे भरा. आम्ही सर्जरीची तयारी करतो.” ते म्हणाले आणि निघून गेले.


 हे ऐकून सारिका तर पुरती गारद झाली. तोपर्यंत सूरज आणि रती हॉस्पिटलमध्ये पोहोचले. सारिकाने फॉर्म भरून पैसे भरले. रात्री बारा वाजेपर्यंत धीरजची अँजिओप्लास्टी झाली. डॉक्टर ओ. टी मधून बाहेर आले आणि सगळ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली.


डॉक्टर,“ रिलॅक्स तुम्ही अगदी वेळेवर त्यांना हॉस्पिटलमध्ये आणले त्यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळाले आणि मोठा धोका टळला. त्यांच्या जीवाला तसा धोका नाही पण अजून त्यांना स्टेबल व्हायला तीन दिवस तरी लागतील. आपण त्यांना आय.सी.यु मध्ये शिफ्ट करत आहोत. तुम्ही त्यांना पाहू शकता पण एक किंवा दोन जण आत जाऊन पहा बाकी सगळे बाहेरून.” ते म्हणाले आणि निघून गेले.


निधी,“ आई तू आणि काका पाहून या बाबांना.” ती म्हणाली.


         सारिका आय.सी.युमध्ये गेली ती लग्नानंतर  इतक्या वर्षात धीरजला पहिल्यांदाच असं पाहत होती. त्याच्या शरीराला मेडिकल मशिन्स  लावल्या होत्या. तोंडाला ऑक्सिजन मास्क आणि हाताला ड्रिप. तो निपचित पडून होता. तिने त्याला पाहिलं आणि बाहेर येऊन बसली.


सूरज,“ वहिनी तुम्ही आणि मुलं घरी जा रतीला घेऊन; मी आहे इथं. राकेश तू आणि राखी वहिनी देखील जा.”


सारिका,“ नाही दादा मी नाही जाणार कुठं. निधी तू  निमिष आणि तुझ्या काकुला घेऊन घरी जा.राखी तुम्ही दोघेही जा आता.दादा आहेत इथं माझ्याबरोबर.” ती म्हणाली.


राखी,“ नको मी थांबते इथं तुझ्याबरोबर. राकेश सगळ्यांना घेऊन जा तू.” ती म्हणाली.


  मुलांनी केविलवाणे होत एकदा आय.सी.यु मधून धीरजला पाहिलं आणि राकेश, रती बरोबर त्यांना घेऊन गेला. सूरज कॉफी आणायला गेला. सारिका मात्र सतत रडत होती.


सारिका,“ माझ्याच मुळे आज धीरजची अवस्था अशी झाली आहे राखी. मी कायम त्याला घालून पाडून बोलले. त्याला मी कायम गृहीत धरलं. मला वाटायचं त्याला कधीच काही होणार नाही. पण तोही माणूस आहे हे मी पार विसरून गेले. स्वतःचीच गाऱ्हाणी मांडत राहिले. सतत स्वतःचीच दुखणी कुरवाळत राहिले. आणि या सगळ्यात त्याला ही काही तरी होत असेल त्यालाही दुखत खुपत असेल याचा विचार नाही केला. ऑफिसमधले टेन्शन आणि घरातली माझी सततची कटकट! मी कधी त्याचा विचारच नाही केला की त्याच्या ऑफिसमध्येही त्याला टेन्शन असते. कधीच त्याला नाही विचारलं की ऑफिसमध्ये काय झालं? तुझा दिवस कसा गेला? स्वतःच्याच विश्वात राहिले मी त्याच्याकडूनच त्याने माझी काळजी घ्यावी म्हणून अपेक्षा करत राहिले पण त्याची काळजी घ्यायला साफ विसरले मी. तो माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा आहे. त्याला तर रोज बाहेरच्या जगाला तोंड द्यावे लागते हे पण माझ्या लक्षात येऊ नये. तू मला सांगत होतीस की त्याचं पण आता वय व्हायला लागलं आहे त्याची काळजी घे पण मी त्याला काय होतंय या भ्रमात जगत राहिले.” ती रडत बोलत होती.


राखी,“ तुला मी खूप वेळा समजावलं सारिका की धीरजची काळजी घे. अगं आपल्यासारखं पुरुषांचं पण वय वाढत जातेच ना उलट पुरुष आपल्यापेक्षा दोन-चार वर्षांनी मोठेच असतात. शिवाय ऑफिसमधला ट्रेस तिथले राजकार आणि अधेमधे बॉसची खावी लागणारी बोलणी नोकरी टिकवण्याची आणि पुढे जाण्याची स्पर्धा. शिवाय मुलांच्या भवितव्याचे टेन्शन किती काय काय टेंशन्स असतात त्यांना. आणि इतकं दहा तास काम ते कोणासाठी करतात? आपल्यासाठीच ना? मग त्यांना समजून घ्यायला नको का आपणच? पण नाही तुला तर स्वतःचच पडलेलं असायचं. माझं हे दुखले आणि ते दुखले मग तो कशाला सांगेल तुला त्याच काही दुखलं खुपलं तरी? सततची आपली चिडचिड! तरी देवाचे आभार मान त्याला माईनर  हार्ट अटॅक आला तरी अँजिओप्लास्टी करावी लागली त्याची पण तो आता सुखरूप आहे. त्याला काही कमी जास्त झालं असतं तर काय करणार होतीस तू? सांग ना? मुलांना पाहिलंस का किती घाबरली आहेत ती? दोघांची ही महत्त्वाची वर्षे आहेत. बघ बाई इथून पुढे तरी सुधार.” ती तिला सूनावत होती. 


सारिका,“ चुकलं माझं मी धीरजला इतकं गृहीत धरायला नको होतं. पण यापुढे असं होणार नाही. मी त्याची पुरेपूर काळजी घेईन चांगली अद्दल घडली मला.” ती रडत बोलत होती. तोपर्यंत सूरज कॉफी घेऊन आला.

★★★


  आज सकाळीच तब्बल आठ दिवसांनी धीरजला सक्तीची विश्रांती आणि बरीच पथ्यं-पाणी सांगून घरी सोडण्यात आले. तो घरी आला मुलं आणि सारिका देखील शांतच होती. निधी आणि निमिष कॉलेजला जायच्या आधी त्याला भेटायला बेडरूममध्ये आले.


निधी,“ बाबा तू आराम कर आम्ही कॉलेजला जातो.” ती म्हणाली.


धीरज,“ हो जा पण इतकी शांतता का आहे आज घरात? तुमची आई घरात नाही का?” त्याने हसत विचारलं.


निमिष,“ आहे की किचनमध्ये काही तरी करत आहे ती. आणि तू ना आता नीट आराम कर बाबा.” तो आवंढा गिळत म्हणाला. त्याच्या आवाजातील बदल धीरजला जाणवला.


धीरज,“ तू इथं ये बेटा, निधी तू ही! इतकं तोंड पाडायला काय झालं आहे तुम्हाला? अरे मी ठीक आहे आता.” तो दोघांना समजावत होता.


निधी,“ गप्प बस आम्ही लहान नाही आता तू काहीही सांगशील आणि आमचा विश्वास तुझ्यावर बसेल. तुला नाही माहीत त्या दिवशी कशा अवस्थेत तुला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे आम्ही. मी किती घाबरले होते. तुझी पल्स  लागत नव्हती आणि हार्ट रेट ही खूप कमी  झाला होता. अँजिओप्लास्टी करावी लागली तुझी. डॉक्टरांनी आराम कर म्हणून सांगितलं आहे तर तोच करायचा महिनाभर, तुला सिकलिव्ह मंजूर झाली आहे.” ती पाणावलेले डोळे पुसत बोलत होती.


धीरज,“ बाप रे बाप तू तर आत्तापासूनच डॉक्टरसारखं बोलायला लगलीस की. बरं जा आता उशीर होईल तुम्हाला जायला.” तो म्हणाला. आणि दोघे निघून गेले. सारिका नाश्ता घेऊन बेडरूममध्ये आली.


सारिका,“ नाश्ता कर आणि औषध घेऊन आराम कर.” ती म्हणाली.


धीरज,“ पण इतना सन्नाटा क्यों है भाई? इतकी शांती आपल्या घरात? मुलं ही आज शांतच होती. तू ही शांत. आपली पोरगी तर डॉक्टर व्हायच्या आधीच डॉक्टरसारखं वागायला लागली. ती खूप चांगली डॉक्टर होणार बाबा.” तो हसून बोलत होता.


सारिका,“ मग तुझी अपेक्षा काय आहे आमच्याकडून? तुला कळतंय का? तुला हार्ट अटॅक आला होता. अँजिओप्लास्टी झाली आहे तुझी. तीन दिवस तर तू आय.सी.यु मध्ये होतास आणि नंतर पाच दिवस हॉस्पिटल रूममध्ये!  तुला गम्मत  वाटते का ही सगळी?” तिने त्याला रोखून पाहत विचारलं.


धीरज,“ हो पण मी आता ठीक आहे ना.” तो कसनुस  हसत म्हणाला.


सारिका,“ खरंच? चेहरा पाहिला का स्वतःचा आरशात किती उतरला आहे?अजून किती अशी खोटी मला काही होत नाही झालं नाहीची नाटकं करणार आहेस? डॉक्टर म्हणत होते की तुला हार्ट अटॅक असा अचानक नाही आला दोन तीन दिवस आधी तुला काही तरी होत असणार आहे त्याकडे तू दुर्लक्ष केलं. आणि त्याचा हा गंभीर परिणाम आहे. त्यातून ही आम्हाला त्या दिवशी घरी यायला आणि तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला आणखीन उशीर झाला असता तर तुझा जीव देखील जाऊ शकला असता. 


    सोड ना मीच कमी पडले आहे. नुसतं स्वतःच गुऱ्हाळ गात बसले. मला हे होतं. मला ते होतं. सततची चिडचिड मग तुला काही त्रास झाला तरी तू कसा सांगणार मला? तुला काही तरी त्रास होत असेल. तुझे ही काही तरी दुखत खुपत असेल याचा विचारच केला नाही मी आणि त्या सगळ्याचा परिणाम व्हायचा तो झाला.” ती रडत बोलत होती.


धीरज,“ सॉरी पण मला वाटलंच नव्हतं की असं काही होईल म्हणून दोन तीन दिवस माझा डावा हात पाठीपासून दुखत होता. पण दिवसभर खुर्चीवर बसून आणि कंप्युटरवर  काम करून कायमच माझी मान, पाठ आणि हात दुखतात हे देखील तसेच असेल असं वाटलं मला. त्या दिवशी मी घरी आलो. थोडं अस्वस्थ वाटत होतं मला पण चहा घेतला तर बरं वाटेल असा विचार करून फ्रेश होऊन किचनमध्ये जाणार तर चक्कर यायला लागली म्हणून हॉलमध्ये बसलो आणि कधी बेशुद्ध पडलो मलाच नाही कळले. डोळे उघडले तेंव्हा आय.सी.यु मध्ये होतो मी. पण यात तुझा काय दोष गं?” त्याने तिच्याकडे पाहत विचारलं.


सारिका,“ खरंच माझा दोष नाही यात? आणि तुझी मन, पाठ, हात दुखतात हे तू आज सांगत आहेस मला? म्हणा तू तरी काय करणार सतत मी माझंच रडगाणं गात बसले मग तू कसा सांगशील तुझं काही दुखलेलं खुपलेलं. मी विसरून गेले की माझी काळजी घेणं जशी तुझी जबाबदारी आहे तशी तुझी काळजी घेणं माझी जबाबदारी आहे. इतकी स्वार्थी कशी आणि कधी झाले मी मला ही कळले नाही. माझे जसे वय वाढले तसे तुझे ही ते वाढत आहे उलट चार वर्षे जास्तच याचा विचारच माझ्या मनात कसा आला नसेल? याची लाज वाटते मला आता. मी कमी पडले नाते निभावण्यात, प्रेमात आणि तुझी काळजी घेण्यात.सॉरी फॉर एव्हरी थिंग.” ती रडत बोलत होती.


धीरज,“असं काही नाही सरु. अगं कायम तू माझी आणि मुलांची काळजी घेतलीस. आणि प्रेम असल्याशिवाय इतक्या वर्षांचा संसार झाला का आपला? हा आता दोन वर्षे झालं तुझी चिडचिड होते पण त्यात तुझा दोष नाही. तुला होणाऱ्या शारीरिक त्रासांचा दोष आहे ना. मग मी तुला समजून नाही घेणार तर कोण घेणार? आणि जे झालं त्याला तू स्वतःला का जबाबदार धरत आहेस? तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही.” तो पुन्हा तिला समजावत म्हणाला.


सारिका,“ हो तू घेतलंस मला समजून पण तुला घेतलं का मी समजून? नाही ना. या दोन तीन वर्षांत आत्मकेंद्रित झाले मी. तुला ऑफिसमध्ये येणारा ट्रेस. तुझी होणारी ओढाताण याचा विचारच नाही केला मी. त्या दिवशी तू उशिरा आलास. थकलेला दिसत होतास. तू म्हणालास देखील की ऑफिसमध्ये काही तरी घोळ झाला म्हणून तुला लेट झालं पण मी काय झालं असं विचारण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. उलट तुझ्यावर चिडले. तू कितीही नाही म्हणालास तरी मी चुकले आहे. आणि त्याची खूप मोठी शिक्षा मला आणि मुलांना मिळाली असती धीरज. तुला काय झालं असतं तर आम्ही काय करणार होतो? मुलं किती केविलवाणी झाली होती तुला नाही माहीत. सगळं स्वतःच्या आत ठेवायचं. ट्रेस आला त्रास झाला तर सांगायचा नाही. बोलायचं नाही. नुसतं आपलं घाण्याचा बैलासारखं राबत राहायचं. तुला माझा राग नाही येत का रे? तुला कधीच माझ्यावर किंवा मुलांवर राग काढावासा वाटत नाही का? का तू असा वागतोस? का स्वतःचा त्रास एकटा सहन करतोस? त्याचेच नको तो परिणाम तुझ्या तब्बेतीवर झाला आहे. तुला काय झालं असतं तर काय करणार होतो आम्ही? तुझ्या या हृदयाच्या धडधडीवर माझा आणि आपल्या मुलांचा हक्क आहे कारण तुझ्यावर आमचं खूप प्रेम आहे इतकं ही नाही कळत का तुला?” ती त्याच्या छातीवर हात ठेवून रडतच बोलत होती. त्याने तिचा हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने तिचे डोळे पुसत बोलू लागला.


धीरज,“ सॉरी! पण मला असं काही घडेल असं वाटलंच नव्हतं. आणि तुला माहीत आहे का सूरज आणि मी लहान होतो. बाबा एका सरकारी संस्थेत शिपाई होते. तिथे दिवसभर त्यांना बरंच काम असायचं आणि बऱ्याच वेळा अधिकारी त्यांचा अपमान करायचे आणि ते घरी येऊन तो सगळा राग सूरज, आई आणि माझ्यावर काढायचे. रोज संध्याकाळी घरी आलं की आरडाओरडा, शिवीगाळ करायचे. तुमच्यासाठी मी सगळं सहन करतो म्हणून बोलून देखील दाखवायचे. आम्ही लहानचे मोठे होत गेलो पण बाबांपासून मनाने दूरावर गेलो. त्यांच्यासमोर जायची ही भीती वाटायची आम्हा दोघांना.


   जसं कळायला लागलं तसं मनाशी एक खूणगाठ बांधली. मी जेंव्हा लग्न करेन आणि मला जेंव्हा मुलं होतील तेंव्हा मी ऑफिसचा राग, ट्रेस घरी घेऊन येणार नाही. तो पायातल्या चप्पलबरोबर उंबऱ्या बाहेर सोडून घरात प्रवेश करेन. कारण माझं कुटुंब ऑफिससाठी तिथला राग काढण्यासाठी नाही तर मी ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी जातो. आणि सुरवातीला तू ऐकायचीस ऑफिसमध्ये काय घडलं वगैरे आणि विचारायचीस देखील पण काही वर्षांपासून तुला त्यात इंटरेस्ट नाही राहिला म्हणून मीही काही सांगायचं बंद केलं. यार सरू बास कर ना तू अशी रडकी चांगली नाही दिसत गं. तू तर चिडचिड करणारी. मुलांवर आणि माझ्यावर ओरडतानाच चांगली दिसतेस.” तो तिच्या डोळ्यात पाहून बोलत होता.


सारिका,“ हो ना. म्हणे चिडचिड करताना चांगली दिसतेस. आणि सॉरी म्हणून काहीच होणार नाही. आणि आता मला तुझ्याकडून ऑफिसमध्ये काय घडते ते रोज ऐकायचं आहे. जर ऑफिसमध्ये कुणाशी वाजलं तुझे बॉस काही बोलले तर तेही ऐकायचं आहे…” ती पुढे बोलणार तर त्याने मध्येच विचारलं.


धीरज,“ का आता तू माझ्या ऑफिसमध्ये येऊन त्यांना ही भांडणार की काय?” त्याने मुद्दाम हसत विचारलं.


सारिका,“ तुझं तर काही तरीच बघ. आरे कोणा जवळ तरी मन मोकळं केल्याने मन हलकं होतं आणि ट्रेसही कमी होतो म्हणून म्हणाले मी. खूप वेळ झालं बोलत आहेस डॉक्टरांनी तुला शांत राहायला आणि आराम करायला सांगितलं आहे. बघ बोलत बसल्याने नाश्ता पण गार होऊन गेला. मी गरम करून आणते. खा आणि   औषधं घेऊन झोप आता.” ती  डोळे पुसून हसत म्हणाली.


धीरज,“ हो पण तू थोडा वेळ माझ्याजवळ थांब ना.” तो तिचा हात धरत म्हणाला.


सारिका,“ हो बाबा आलेच.” ती म्हणाली.

★★★


   एक महिन्याने धीरज पुन्हा ऑफिसला जायला लागला. पण आता सारिका आणि निधी-निमिषमध्ये देखील आमूलाग्र बदल झाले होते. तो नेहमीप्रमाणे घरी आला.


धीरज,“ सारिका मी आलो आहे.” तो बॅग टेबलवर ठेवत म्हणाला.


सारिका,“ जा मग फ्रेश हो आणि गॅलरीत जा मी कॉफी घेऊन येते.” ती म्हणाली.


धीरज,“ पण आज तर किराणा आणायला जायचं होतं ना? मला वाटले तू तयार होऊन बसली असशील.” तो बोलत होता तोपर्यंत निधी आणि निमिष सामानाच्या पिशव्या घेऊन आले होते.


सारिका,“ हे काय मी तेच सांगणार होते. आले दोघे सामान घेऊन. जा किचनमध्ये सामान ठेवा आणि फ्रेश होऊन या.” ती म्हणाली.


धीरज,“ पण तुम्ही दोघांनी का आणले सामान? तुमच्या दोघांचीही महत्त्वाची वर्षे आहेत. या कामात वेळ वाया घालवला तर मग अभ्यास कधी करणार तुम्ही?” त्याने विचारलं.


निमिष,“ काय रे बाबा सारखं अभ्यास अभ्यास म्हणून ओरडतोस मला तर वाटतंय आईचा आत्मा तुझ्यात गेला की काय? माणसाला अभ्यास करून करून ही कंटाळा येतोच ना मग चेंज म्हणून गेलो सामान आणायला.” तो फुशारकी मारत बोलत होता.


निधी,“हो ना आणि अभ्यासाबरोबर व्यवहार ज्ञान ही हवं की नको माणसाला? आज काल  डाळ-आट्याचा भाव माहीत असायला हवा ना. आई तू जा कॉफी घेऊन गॅलरीत मी माझ्यासाठी आणि निमिषसाठी चहा करते आणि मग अभ्यासाला बसते.” ती बोलत होती.


धीरज,“ काय चमत्कार झाला आहे माझ्या घरात? की मी दुसऱ्याच्या घरात आलो आहे?इतकी शहाणी मुलं आणि बायको? बाप रे बाप!” तो आश्चर्याने म्हणाला.


सारिका,“ झालं का टोमणा मारून आम्हाला? काही चमत्कार वगैरे झाला नाही. फक्त कोणाची तरी किंमत वेळीच कळली आहे आम्हाला. जा आता फ्रेश हो मी कॉफी घेऊन येते. मला ऑफिसमध्ये काय झालं आज ते ऐकायचं आहे.” ती त्याला बेडरूमकडे ढकलत म्हणाली.



  संध्याकाळचे साधारण आठ वाजले असतील. मुलं त्यांच्या -त्यांच्या रुममध्ये अभ्यास करत होती आणि धीरज बेडरूममध्ये लोळत पडला होता आणि त्याला डोळा लागला. सारिका स्वयंपाक करत होती आणि राखी तिच्याकडे आली.


राखी,“ हे घे कढी आणली आहे निधी आणि धीरजला आवडते ना म्हणून. आणि आता धीरजची तब्बेत कशी आहे? कुठं आहे गं तो?” तिने विचारलं.


सारिका,“ तो ठीक आहे आता. गप्पा मारून आत्ताच गेला आहे आराम करायला. ऑफिसमध्ये दिवसभर खुर्चीवर बसून अंग दुखते गं त्याचेही.” ती बोलत होती.


राखी,“ हो माहीत आहे आता काय आमची मैत्रीण नवऱ्याबरोबर कॉलिटी टाईम वगैरे स्पेड करायला लागली बाबा म्हणूनच मी इतक्या उशिरा आले.” ती तिला चिडवत म्हणाली.


सारिका,“ काही तरीच काय राखी. आणि तूच हॉस्पिटलमध्ये माझी कान उघाडणी केली होतीस ना? असो राकेश कुठं आहे? आणि पोरं?” तिने विचारलं.


राखी,“ आमच्या साहेबांना आता नवीन खुळ लागलं आहे. योगा मेडिटेशन वगैरे करणार आहेत ते तर त्याचा क्लास लावला आहे ऑफिस सुटल्यावर घरी येऊन आजकाल तिथेच जातात ते आणि पोरं एक अभ्यास करतंय आणि दुसरं कंप्युटरवर काही तरी खाडखूड.” ती बोलत होती.


सारिका,“ हुंम आणि मॅडमचा स्वयंपाक आज लवकर झाला म्हणून मॅडम आज इथे आल्या आहेत.” ती हसून म्हणाली.


राखी,“ हो मग मी माझ्या मैत्रिणीला विचारायला आले आहे. ते कॉलिटी टाईम फक्त संध्याकाळीच स्पेड करते की रात्री ही?” तिने हळूच तिच्या कानात डोळे मिचकावून विचारलं.


सारिका,“ निर्लज्ज आहेस तू राखी! तू काय करते ते सांग आधी?” ती हसून म्हणाली आणि दोघीही मोठ्याने हसायला लागल्या.


  इकडे हसण्याच्या आवाजाने धीरजची झोप चाळवळी त्याने हसण्याचा आवाज ऐकला आणि त्यानेही हसून कुस बदलली.

©स्वामिनी चौगुले


अशाच मनोवेधक कथा वाचण्यासाठी लाईक आणि फॉलो करा आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला!











 




 




   



  

    



 



Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post