हरणी घरी पोहोचली शेवंता तिचीच वाट पाहत होती. हरणीचा दारुडा बाप नुकताच दारू ढोसून झिंगत घरी आला होता. हरणी आत आली आणि कोपऱ्यात बसलेल्या हौसाकडे तिचे लक्ष गेलं तर तिचे गाल सुजलेले होते. डोळा काळा-निळा झाला होता ते पाहून हरणीने तिच्याकडे धाव घेतली.
हरणी,“ मौशे कोण मारलं तुला ईवड?” तिने काळजीने विचारलं.
शेवंता,“ तिला काय ईचारतीस गं? मला इचार म्या मारलं हाय तिला. ती माजी नोकार हाय. तिला तुज्यावर नजर ठिवाया आन तुला संभाळाया ठिवलं हुतं. त्या बदलात तिला पैकं आन दोन येळ जेवाण बी दित हुती नव्हं पण हिनं हिचं काम नाय केलं. म्हणूनशान मारलं हिला. आन त्वा कुटं गिलतीस? जहागिरदार सरकारास्नी भाकर चाराया का?” तिच्या एक कानाखाली देत शेवंताने विचारलं.
हरणी,“ आय मारतीयास कशा पायी?” ती रडत गाल चोळत म्हणाली. तिच्या गोऱ्या गालावर पाच बोटं उमटली होती.
शेवंता,“ का तुला म्हैत नाय? अगं तुज्या साटनं म्या मरमर मरतुया. तुजं लगीन करायचं ते बी एकाद्या चांगल्या घरात! माज्यावानी आन तुज्या आजीवाणी वंगाळ जिंदगानी तुज्या तकदिरात यायाला नगं म्हणूनशान. आन त्वा त्या सरकारच्या नादाला लागलीयास व्हय गं? ते कोण हायती अन त्यांची खानदान काय हाय तुला म्हैत हाय का? अगं तुला आन मला त्यांच्या परसात कवा निवूनशान गाडत्याल कुणाला बी कळायचं नाय.काय किलीस तू ही?” ती रडत डोक्याला हात लावून खाली बसली.
हरणी,“ आय माजं त्यांच्यावर आन त्यांचं बी माज्यावर पिरिम हाय.” ती रडत म्हणाली.
शेवंता,“ अगं येडी का खुळी तू हरणे? तुला काय वाटतंया ते काय तुज्याशी लगीन करूनशान तुला बायकू करत्याल व्हय गं? अगं जहागीदार हायती ते. लय मोटं सपान नगं बगू. आपल्यास्नी नाय झेपायचं ते.” ती तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती. तोपर्यंत हरणीचा बाप बबन दारूच्या नशेत बोलू लागला.
बबन,“ कोण….जहागीदार… ते..ते सावते गावचं सरकार का? त्ये सरकार….. अगं शेवंते तुला उब्या जिंगीत नाय करता आलं ते माज्या लेकीनं केलं बग अगं लय मोटा बकरा फसीवला की हिनं आन त्यानच्या खानदानात माडीवर बाय ठिवत्याल की त्या सुबानराव सरकारनं ठिवली हुती की बाय माडीवर. अगं आपुली समदी खानदान जगवत्याल ते.” तो नशेत बळत होता.
शेवंता,“मूडदा बशिवला तुजा मेल्या माजी जिंदगी वाटला लावलीस आता माज्या लेकीवर टपला व्हय रं.” ती उठून रागाने त्याला ही मारत बोलत होती.
हरणी,“ पर आयं ते म्हणत्यात की त्याचं पिरिम हाय माज्यावर. आन माजा इश्वास हाय त्यांच्यावरी.” ती रडत भाबडेपणाने बोलत होती
शेवंता,“ इश्वास आन बाप्याच्या जातीवर? अगं ह्या तुज्या बा वर इश्वास ठिवला हुता म्या. ह्यान माज्या बरुबर लगीन तर केलं तर मला धंद्याला लावलंया. आन ते तर जहागिरदार सरकार हायती. त्यास्नी आपल्यावानी बाया म्हंजी खेळणी वाटत्यात्या मन भरू पातूर खेळत्यात आन तोडूनशान फिकून देत्यात. जवर त्वा त्यांच्या अंगाखाली जात नाय तवर गॉड बोलत्याल तुज्यासंग, मन भरू स्तवर खेळत्यात आन देत्याल चुरगळुन फेकूनशान. आन लय तर लय तुला ठिवत्याल माडीवर निवूनशान पर थोरलं सरकार त्यास्नी हे काय बी नाय चालायचं ते आपल्यावानी बायांचा रागराग करत्यात ते त्यांच्या लेकाला काय बी म्हणायाचं नायती पर आपल्यास्नी सोडायाचं नाय ती. हरणे तू लय वंगाळ केलं बाय. आता म्या काय करू? तुला कुटं पाटवाया बी जागा नाय माज्याकडं. आन कुणावर इश्वास बी नाय. तुला तुजी आय जिती पाजेल असंल नव्हं तर मंग सरकारांस्नी पुण्यांदा नाय भेटायचं त्वा घे माजी आन.” ती रडतच हरणीचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवून घेत म्हणाली.
हरणी,“ आय म्या चुकलू पर आता नाय तुजी आन तोडायची म्या. पर माजा जीव जडला हाय सरकारांवर आय म्या काय करू?” ती रडत म्हणाली.
शेवंता,“ बाय माजे मला कळतंया तुजं मन पर नगु पडूस यात लेके. म्या तुज्या साटनं पोरगा हुडीकते त्याला बक्कळ पैका आन सोनं देतू. म्या तुज्या साटनंच मिळवलू हाय नव्हं समदं. तुजं लगीन करतू माजी बाय.” ती रडत तिला कुशीत घेत म्हणाली.
हरणी,“ आय म्या नाय करायची लगीन! म्या नाय भेटायाची सरकारांस्नी पर म्या फकस्त त्यांची हाय.” ती रडत शेवंताच्या कुशीत शिरत बोलत होती.
शेवंता,“ असं बुलू नगं हरणे अगं एकली बाय म्हंजी उगड्या बासना गत असतीया. आन आपल्यावानी बाय म्हंजी लोकांस्नी खिरापत असत्यात्या. आन आपलं रूप आन सुवास आपलं वैरी गं माजी बाळे. म्या तुज्या लगीनाच सपान घिवून जिती हाय माज्या लेकरा.” ती हरणीला मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवत समजावत होती. हरणी मात्र नुसती रडत होती.
★★★★
इकडे वाड्यावर मात्र सगळं आलबेल होतं. अजून तरी वाड्यावर हरणी आणि राघवेंद्रबद्दल कोणाला ही कुणकुण नव्हती. पण हे सगळं किती दिवस असेच राहणार होते याची कल्पना मात्र राघवेंद्रला नव्हती कारण एक वावटळ त्याच्या दिशेने त्याच्याही नकळत घोंगावत येत होती. जी त्याचे पूर्ण आयुष्यच बदलून टाकणार होती. राघवेंद्र मात्र हरिणीची स्वप्न पाहण्यात रममाण होता.
आज वाड्यावर सगळं नेहमी सारखेच सुरू होते. राघवेंद्र आज जवळच्याच एका गावची शेती पहायला जीप घेऊन गेला होता. पण मांजर डोळे झाकून दुध पीत असते आणि त्याला वाटते की आपल्याला कोणी पाहिले नाही किंवा एखादे लहान मुलं इकडे तिकडे पाहून चोरून हळूच मुठभर माती तोंडात घालते पण त्याच्या ओठांना लागलेली माती आई पाहते आणि बरोबर ओळखते तसेच प्रेमाचे ही असतेच ना आग लागली की धूर उठणार आणि धूर झाला की लोकांना कळणार.
काल नदी काठी चार नाही तर पाच माणसे होती. म्हणजेच गणपत सोडून आणखीन कोणी तरी राघवेंद्र आणि हरणीला पाहिले होते. तो माणूस म्हणजे हरणीच्या गावचा मंगेश शिर्के होता. तो कुठे तरी जाता जाता त्याला तहान लागली म्हणून तो नदी काठी पाणी प्यायला गेला होता पण तो मदन, राघवेंद्र आणि हरणीपेक्षा खूप लांब होता तरी त्याने राघवेंद्र आणि हरणीला ओळखले होते. पण राघवेंद्र किंवा त्यांच्या पैकी कोणी त्याला पाहिले नव्हतं. तो मनोमन खुश झाला. कारण जहागिरदारांना ही बातमी दिली तर त्याला बक्षीस मिळणार अशी आशा होती. जहागीदार बक्षीस देणार म्हणजे भरपूर पैसा! म्हणून तो त्यादिवशी थांबला आणि दुसऱ्या दिवशी जहागिरदारांच्या वाड्यावर पोहोचला होता. दुपारची वेळ होती. तो वाड्याच्या दारात पोहोचला तर गण्याने त्याला तिथेच आडवले.
गण्या,“ कोण रं तू? हतं कशा पायी आलास?” त्याने विचारलं.
मंगेश,“ म्या मंग्या माजलगावनं आलू हाय थोरल्या सरकारास्नी भेटायाच हुतं.” तो हात जोडून म्हणाला.
गण्या,“ बरं पर काय काम हाय तुजं?” त्याने विचारलं
मंगेश,“ ते म्या त्यास्नीच सांगन. लय महीत्वाच काम हाय जी.” तो पुन्हा म्हणाला.
गण्या,“ बरं म्या सांगतु त्यास्नी पर ते तुला भेटत्याली का हे मातूर सांगता यायचं नाय.” तो म्हणाला.
मंगेश,“ त्यास्नी म्हणावं लय महित्वाची खबर हाय धाकल्या सारकरांच्या बदल.”तो म्हणाला
आणि गण्या आत निघून गेला. त्याने महेंद्रप्रतापरावांना चौकात येऊन सांगितले.
गण्या,“ सरकार माजलगावास्न मंग्या नावचा एक गडी आला हाय जी त्याला तुमास्नी भेटायाचं हाय. धाकल्या सरकारांची काय तर खबर घिवून आला हाय असं म्हणतुया.”
महेंद्रप्रताप,“ बरं पाटीव त्येला आत.” ते म्हणाले आणि मंगेशला गाण्याने आत पाठवले.
मंगेश,“ राम राम जी सरकार! म्या मंगेश शिर्के माजलगावास्न आलू हाय जी. खबर हाय जी धाकल्या सरकारांची पर त्या आदी मला अबय द्या.” तो हात जोडून म्हणाला.
महेंद्रप्रतापांनी त्याचे बोलणे ऐकले आणि त्याने अभय मागितल्यावर त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. काही तरी जिकिरीचे असल्याशिवाय कोणी त्यांना अभय मागत नसे त्यातही राघवेंद्रची खबर म्हणल्यावर ते सावध झाले. त्यांनी तिथं काम करत असलेल्या गडी माणसांना बाहेर जायला सांगितले. आता चौकात फक्त चार माणसं होती महेंद्रप्रताप, दिवाणजी, सुभानराव आणि खबर द्यायला आलेला मंगेश.
महेंद्रप्रताप,“ दिलं अभय हा बोल त्वां. काय खबर घिवून आलास धाकल्या सरकारांची?” त्यांनी त्याला रोखून पाहत विचारलं.
मंगेश,“ सरकार म्या धाकल्या सरकारास्नी माजलगाव मंदी बगीतलं जी काल….” तो पुढे बोलणार तर महेंद्रप्रताप रागाने कडाडले.
महेंद्रप्रताप,“ धाकलं सरकार हायती ते. आन ततं आमची जहागिरी हाय इसरला काय रं? गेलं असत्याल जहागिरी बगाया.” ते ओरडले आणि मंगेश घाबरून थरथरत खाली मान घालून म्हणाला.
मंगेश,“ ते मला म्हैत हाय जी. पर धाकलं सरकार जहागिरी बगाया नवतं आलं जी. ते भेटाया आलतं हरणीला.”
महेंद्रप्रताप,“ हरणी? ही कोण हाय?” त्यांनी आश्चर्यानी विचारलं.
मंगेश,“ ती शेवंता सातारकरीन हाय नव्हं तमासगिरीन तिची लेक हाय जी. म्या पल्याडल्या गावाला जात हुतो तान लागली म्हणूनशान गावा बाहीर नदीवर गेलू ततं धाकलं सरकार आन ती हरणी बसले हुते जी बोलत. त्यांच्या बरुबर आणी एक माणूस हुता जी.” तो सांगत होता.
महेंद्रप्रताप,“ काय बोलीत हुते रं ते?” त्यांनी रागाने विचारलं.
मंगेश,“ सरकार ते म्या कसं सांगाव जी? पर एक मातूर हाय त्यांचं जी काय चालू हुतं ते बगून वाटतंया की त्या पोरीनं सरकारास्नी नादाला लावलं हाय जी. ती पोरगी म्हंजी दिसाया अपसरा हाय जी आन अंगाला सुवास हाय तिच्या ती चालाया लागली म्हंजी निस्ता घमघमाट पसरतुया. पर शेवंतानं तिला समद्या दुनियेच्या नजरं पासनं दडवून ठिवली हाय. पर धाकल्या सरकारास्नी कुटं भेटली हाय म्हैत?” तो बोलत होता. आणि महेंद्रप्रताप रागाने लालबुंद झाले होते पण त्यांनी स्वतःचा राग आवरला.
महेंद्रप्रताप,“ लय बेस केलंस अमास्नी येवुनशान सांगितलास त्वा. दिवणजी याला बक्षिसी द्या 25 रुपये. आन ध्यानात ठिव ही खबर कुटं बी कळाया नाय पायजेल. आन जर का खबर खुटी निगाली तर तुज्या साटनं एक खड्डा खुदून घेतु परसात.” ते त्याला धमकावत बोलत होते.
मंगेश,“ सरकार तुमास्नी खुटी खबर द्याला मला काय नरकात नाय जायचं जी. आन खबर पक्की हाय जी म्या माज्या डोळ्यानी बगीलं हाय जी.” तो हात जोडून म्हणाला. दिवाणजींनी त्याच्या हातावर पैसे ठेवले आणि तो कमरेत वाकून नमस्कार करत निघून गेला.
आत उभं राहून इतका वेळ सगळं ऐकत असलेली राधक्का बाहेर आली. महेंद्रप्रतापांचा रागनुसता उफाळत होता.
महेंद्रप्रताप,“ लय वंगाळ केलंया राघवनं. त्येच्यावर लय इश्वास हुता माजा.पर पोरंगं बाईच्या नादाला लागलं. त्येबी तमासगिरनीच्या पोरीच्या? हतं मालूवानी नक्षत्रावानी घरातली पोरगी असताना याला भिकारचाळे सुचायल्याती.” ते रागाने बोलत होते.
सुभानराव,“महिंद्रा जरा दमानं घे पोर तरनं हाय. त्यात जहागिरदारांचं रगात. वळणाचं पाणी वळणावरी जाणार नव्हं लेका.” ते त्यांना समजावत म्हणाले.
महेंद्रप्रताप,“ अण्णा तुमी त्येला पाटीशी नगा घालू. गुरुजी काय म्हणल्याती म्हैत हाय नव्हं? गण्या sss त्या रंग्याला बुलिवलं हाय म्हणनशान सांग शेतावर आज राती.” ते म्हणाले.
सुभानराव,“ जे करायचं ते इचार करूनशान कर महिंद्रा.” ते म्हणाले.
महेंद्रप्रताप,“व्हय अण्णा.”
राधक्का,“ आवं जरा दमानं घ्या जी. आपलं पोरगं तरनं हाय. डोक्यात राग घालूनशान काय तरी इपरित व्हयचं जी.” ती काळजीने बोलत होती.
महेंद्रप्रताप,“ ते कळतंया मला. त्वां दिवाणजीकडनं डाक लिवून घी, तुज्या भावाला म्हणावं अमी म्होरल्या सप्तात सुपारी फोडाया येतूया म्हूतूर बगूनशान. तवा तयारी करा. त्याच दिशी लग्नाची बी तित धरायची.आन दिवाणजी तुमी सवता जावूनशान डाक टाकून या. तवर म्या निस्तारतु समदं. आन म्या शेतावर हाय आता उंद्या येणार. गडी बी लय माजल्याती. पिकास्नी दारं मुडून पाणी पाजलं का बगतु. नाय तर आज चामडीच लोळावतो एका एकाची.आन अण्णा आन राधे त्वां राघवला काय बी बोलायचं नाय आन इचारायाच बी नाय.” ते रागाने म्हणाले आणि निघून गेले.
जहागिरदारांच्या वाड्यावर राघव आणि हरणीचे प्रेम प्रकरण कळले होते. आता पुढे काय होणार होते? महेंद्रप्रताप हे प्रकरण कसे निस्तारणार होते? आणि राघव मधुमालतीशी लग्न करायला तयार होणार होता का? आणि महेंद्रप्रतापांनी रंग्याला शेतावर का बोलावले असेल?
©स्वामिनी चौगुले
कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
