राघवेंद्र निघून गेला. मधुमालती माडीवर गेली. तर कस्तुरी खाटावर रडत बसली होती. मधुमालती तिच्याजवळ गेली.
मधुमालती,“ काय झालं कस्तुरी त्यांच्यात आणि तुझ्यात असं? यांनी मी इतकं चिडलेलं कधीच पाहिलं नव्हतं. आणि तू पुढे शिकायला का नको म्हणतेस?” तिने कस्तुरी जवळ बसत विचारलं.
कस्तुरी,“ म्या अब्यास नाय केला. माजं मन नाय जी लागत अब्यासात इवड समदं तर शिकिली नव्हं आता अजून कशा पाय शिकायचं जी? तर आता सरकार म्हणत्याती गोऱ्यांची भाषा बी शिक त्ये बगा उजळणी आन वह्या अणूनशान ठिवल्या हायत्या. पर म्या काय करू गोऱ्यांची भाषा शिकून? मला म्हणलं का मी हाय तवर शिकवूनशान घी समदं. मी नसल तवा तुला उपयोगाला पडलं म्हणं. भरल्या घरात असं वंगाळ कशा पाय बोलायाचं सांगा बरं?” ती लहान मुली सारखी रडत बोलत होती.मधुमालती ही तिचे बोलणे ऐकून विचारात पडली पण तिने तसं काही दाखवलं नाही.
मधुमालती,“ तू रडणं थांबवा आधी. आणि घे ना शिकून कस्तुरी ते म्हणत आहेत एवढं तर अगं आपण खूप भाग्यवान आहोत आपल्याला शिक्षणाचे महत्त्व माहीत असलेला नवरा मिळाला आहे. नाही तर सगळे बायकांच्या शिक्षणाला विरोधच करतात. ते तुला किती अट्टाहासाने शिकवतात हे तुला ही माहीत आहे. आणि राहिला प्रश्न त्यांच्या असं वाईट बोलण्याचा तर ते रागात बोलून गेले असतील. तू कशाला इतकं मनावर घेतेस. आणि तू काय म्हणलीस ते नाही सांगितलं मला. ते उगीच चिडले आहेत का इतकं?” तिने तिला पाहत विचारलं.
कस्तुरी,“ व्हय मला म्हैत हाय का सारकरांच इचार लय पुडचं हायती. पर मला जमल व्हय ती गोऱ्यांची भाषा. तुमी आन सरकार हुशार हायसा जी डोक्यानं पर म्या मला नाय जमायाचं. आन व्हय माजं बी चुकलं म्या त्यास्नी म्हणलु का की तुमची जहागीरदारी तुमी जहागीरदार म्या कुटं जाणार हाय सरकारी कागुद वाचाया म्हणूनशान हतंक चिडलं हायती ते. मला म्हणलं का जवर म्या शिकाया तयार हुत नाय तवर ते माडीवर यायचं नायती. आन गेलं म्या ऐकलं की पोरांवर अन तुमच्यावर बी राग काडलाया त्यांनी.” ती तोंड वाकडं करत म्हणाली.
मधुमालती,“ कस्तुरी तू पण हुशारच आहेस. तू किती लवकर शिकलीस सगळं आणि भाषेचे म्हणशील जशी आपली भाषा तशी त्यांची आणि आपल्या भाषेची सुरुवात जशी बारा खडीने होते तशी त्यांची ही त्या भाषेच्या बाराखडीने होते अगं इतकी ही अवघड नाही इंग्रजी भाषा. आणि तू असं बोलल्यावर चिडणारच ना ते! ते जहागीरदार आहेत त्यांची जहागीरदारी आहे. मग तू कोण आहेस त्यांची? त्यांच्याशी तुझा संबंध नाही असं बोलली त्यांच्याशी. मग त्यांना वाईट वाटणार नाही का? कस्तुरी तुलाही चांगलं माहीत आहे तू त्यांचं पहिलं प्रेम आहेस. त्यांनी खूप काही केलं आहे तुझ्यासाठी आणि तू त्यांच्या हट्टासाठी इंग्रजी शिकू शकत नाहीस का? ते चिडले पण ते दुखावले गेले आहेत तुझ्या बोलण्यामुळे आणि ते आमच्यावर रागावले पण त्यामागे उद्देश चांगला होता. आणि पोरांना ही धाक हवाच की. असो मी तुमच्यामध्ये बोलणार नाही पण इतकं खरं आहे की तू त्यांना आज दुखावलं आहेस. येते मी.” ती म्हणाली आणि निघून गेली.
कस्तुरी मात्र विचारात पडली.
‛ बायसाब म्हणत्यात ते बरुबर हाय म्या सरकारास्नी आज दुकावलं हाय. पर इंग्रजी का काय? ती कसली भाषा मला जमल होय? आता इत्याली दोन तीन दिसात ते माडीवर एक तर बारा दिस नव्हत लय दिस माज्या पासनं लांब नाय ऱ्हाणार ते.मंग काडीन त्येचा रुसवा.’
★★★
संध्याकाळी राघवेंद्र वाड्यावर आला तर वाडा शांत होता. रोज असणारी पोरांची बडबड गोंधळ आज नव्हता. तो मागे जाऊन तोंड हात पाय धुवत होता. मधुमालती पंचा घेऊन तिथे गेली.
राघवेंद्र,“ आज वाडा लय शांत हाय मधू पोरं कुटं हायती?” त्याने विचारलं. तोपर्यंत राधक्का तिथे आली.
राधक्का,“ सकाळी रागावलास त्येच्यावर मग कशाला कालवा कर्त्याली रं? राघव त्वां विनाकारण पोरास्नी रागीवलास मला आजाबात आवडलं नाय. उगा म्या गप बसली नाय तुला दिनार हुती एक ठिवूनशान.आमदार आन जहागीरदार हायस ते घराच्या भाईर घरात नाय. म्या आय हाय तुजी पुना माज्या नातवंडांवर दुसऱ्याचा राग काडशील तर गाठ ह्या राधक्काशी हाय.” ती रागाने तणतणत होती.आणि मधुमालती गालात हसत होती.
राघवेंद्र,“ चुकलं आई माजं. म्या उगाच त्यांच्यावर चिडलू आन तुज्या समुर तर म्या तुजा राघवच हाय की अण्णा कसं मारायाचं तात्यास्नी काटीनं तशी मारती का मला आता?” तो राधक्काच्या गळ्यात हात घालून लाडात येत हसून बोलत होता.
राधक्का,“ मंग सुडतुया व्हय तुला. असं मला लाडीगुडी लावूनशान काय बी व्हायचं नाय. दोगं बी त्वांड फुगवून बसल्याती; आता गेल्याती अब्यास कराया माडीवर. त्यांचा रुसवा काडला तर बरं नाय तर तुला मारणार बग. आन मधु बोलीव त्यास्नी जेवाण कराया आज भुका लागत्यात्या का नाय त्येस्नी? आन कस्तुरीला बी जेवाया घिवूनशान जा. आज वशाट केलं हाय अपुन समदी खातूया पर ती पोरगी खात नाय म्हणूनशान तिला खीर किली हाय शेवयाची. निवूनशान दि.” ती बोलत होती.
मधुमालती,“ हो नेते ताट आणि पोरांना पण बोलावते. पण आत्या मला पण हे रागावले आहेत ते पण विनाकारण त्याच्याबद्दल नाही बोललात तुम्ही यांना?” ती मुद्दाम राघवेंद्रकडे पाहत म्हणाली.
राधक्का,“ व्हय की गं म्या इसरलीच की ते. अन कस्तुरी बरुबर बी भांडान केलं नव्हं यानं. राघव लय शेपारू नगुस आ तुला शेवटिन बग लय. उगा माझ्या पोरींना भांडतुया.” त्या तोंड फुगवून त्याच्यावर डोळे वटारून म्हणाल्या.
राघव,“ आई तुमी दुगी मला भांडणार तर मी माज्या लेकीला घिवूनशान घेतू भांडाया. आन मधु बाईसाब माफी करा जी.” तो नाटकीपणे म्हणाला.
मधुमालती,“ लेकीला भांडायला आणायला आधी ती फुगली आहे ते बघा. आता तुम्हालाच भांडणार.” ती असं म्हणाली आणि तिघे हसायला लागले.
राधक्का,“ बाबा समदं गाव परवाडलं भांडाया पर तुजी लेक समद्या गावाला भारी हाय. जा बाय मालू त्वां पोरास्नी घिवूनशान ये.” ती हसून म्हणाली. आणि पुन्हा तिघे हसले.
मधुमालती कस्तुरीला जेवण देऊन पोरांना खाली घेऊन आली. राघवेंद्र, पृथ्वी आणि सुगंधा स्वयंपाक घरात जेवायला बसले. मधुमालती ताटं वाढत होती. राघवेंद्र असला की त्याच्या ताटात त्याच्याबरोबर बसून जेवणारी सुगंधा मात्र आज म्हणाली.
सुगंधा,“ मला वेगळं ताट हवे आई माझे माझे.” ती तोंड फुगवून म्हणाली.
राधक्का,“सुगंधे तुझा बा असल्यावर त्वां त्येच्या ताटात जिवतीयास नव्हं? मग आज काय झालं हाय?” तिने विचारलं.
राघवेंद्र,“ आई तिला जेवायाचं हाय येगळं तर जीव दि की मधु तिला कर येगळं ताट.” तो म्हणाला मधुमालतीने होकारार्थी मान हलवली
पृथ्वी देखील आज गप्पच होता. रोज शाळेतल्या गमती सांगत जेवणारे पृथ्वी आणि सुगंधा गप्प बसून जेवत होते. दोघांनी जेवण केलं आणि उठून निघून गेले. दोघे ही राधक्काच्या खोलीत पुस्तकं वाचत बसले होते. खरं तर राघवेंद्र आला की पृथ्वी आणि सुगंधा त्याच्याच खोलीत असत ते त्याच्या मागे पुढे करत. तोही पोरांना त्याच्या दौऱ्यात घडलेल्या गमती जमती सांगत असे आणि झोपण्यापूर्वीची वेळ याच गप्पा गोष्टी करण्याची असायची. राघवेंद्र खोलीत आला. मधुमालती ही त्याच्या मागे होतीच.
राघवेंद्र,“ मधु पोरं आईच्या खोलीत गेली वाटतंया. मामला लयच बिगडलाया वाटतया.” तो गालात हसून म्हणाला.
मधुमालती,“ मग आज काय पोरं त्यांच्या आबांना बोलत नसतात.” ती ही गंमतीने म्हणाली.
राघवेंद्र,“ असं? जा बोलावून आन की त्यास्नी.”
मधुमालती,“ बरं घेऊन येते.”
ती म्हणाली आणि दोघांना राघवेंद्रने बोलावलं आहे म्हणून घेऊन आली. राघवेंद्र पलंगावर बसला होता. दोघे येऊन त्याच्यासमोर उभी राहिली. राघवेंद्र नुसता दोघांकडे पाहत होता. सुगंधाने पृथ्वीकडे आणि पृथ्वीने त्याच्याकडं पाहिलं.
पृथ्वी,“ ते आबा चुकलं माझं. सहामाहित माझा दुसरा नंबर आला. पण गणितात मला एकच मार्क कमी पडला आणि उमेशला एक जास्त म्हणून त्याचा पहिला नंबर आला. मी खूप अभ्यास करेन आता आणि पुन्हा पहिला नंबर येईल मग माझा.” तो रडकुंडीला येऊन बोलत होता. त्याच्या डोळ्यातून पाणी येणारच की राघवेंद्रने त्याला जवळ घेतलं.
राघवेंद्र,“ व्हय रं माझ्या सोन्या. मला म्हैत हाय मजा पृथ्वी लय हुशार हाय. मी उगाच रागावलो तुला.(तो त्याला मांडीवर बसवून त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवून बोलत होता.आणि पृथ्वी त्याला बिलगला. सुगंध मात्र रडत तिथून जायला लागली.) ये ठमे त्वां कुटं चाललीयास हतं ये की.” तो तिचा हात धरत म्हणाला.
सुगंधा,“ मला नाही बोलायचं तुमची. तुम्ही सकाळी विनाकारण मला ओरडला. मी तर आगाऊपणा पण करत नाही आता. आज त्या गंगीने माझ्या रिबीनचे आऊने किती छान घातलेले फुल सोडलं पण मी तिच्याशी भांडले नाही. उलट गुरुजींनीच तिला रागवलं. मी नसते बोलत तुमच्याशी कट्टी तुम्ही मला रागवलात माझ्यावर ओरडलात ते पण माझी चूक नसताना. मी जाते आजीकडे.” ती रडत हुंदके देऊन बोलत होती. आणि राघवेंद्रने तिला एका हाताने त्याच्या दुसऱ्या मांडीवर बसवून घेतलं.
राघवेंद्र,“ चुकलं माझं गंधा पर म्हणूनशान त्वां काय तुज्या आबाला बोलणार नाय व्हय गं. बरं मी कान धरूनशान उटाबशा काडू का आता? मी नाय वरडणार आता माज्या मौनावर.” तो तिला कुशीत घेऊन बोलत होता. सुगंधा मात्र अजून फुगलेलीच होती.
पृथ्वी,“ सुगंधा आबा चुकलं म्हणतात की नाही मग आता राग सोड. आबा तर आपल्या चांगल्यासाठीच ओरडतात की नाही आपल्याला हो ना आबा?” त्याने राघवेंद्रकडे पाहत विचारलं.
मधुमालती,“ हो पण बब्बूला ओरडले ते काही चूक नसताना. ते काही नाही तुम्ही आता कान धरून उटाबशा काढायच्या हो ना बब्बू?” ती नाटकीपणे म्हणाली.
सुगंधा,“ नको.आणि दाद्या बरोबर म्हणतोय आबा आमच्या चांगल्यासाठीच ओरडतात. मी आबांशी पुन्हा बट्टी केली.” ती राघवेंद्रच्या गालाचा मुका घेत म्हणाली.
राघवेंद्र,“मग माजी दोनी पोरं लय शानी हायती. मधु मी लिमलेटच्या गोळ्या आणल्या हायत्या त्या दे दोगांस्नी. आन त्या कपाटात दून पिशव्या हायत्या त्या काड म्या इसरलु हुतु बग. मी माज्या गंध आन पृथ्वी साटनं अजून काय काय आणलं हाय.(तो दोघांना खाटवर बसवत म्हणाला आणि मधुमालतीने पिशव्या काढल्या.) ह्यो गुलाबी स्वेटर माज्या सुगंधा साटनं आन ही बग ही लाकडाची भावली आन भावला हे बी आणलं हाय मी आन ही आकाशी रंगाचा स्वेटर माज्या पृथ्वी साटनं. आन ही बग ही मोटार आणली तुज्या साटनं.”
सुगंधा,“ आय्या आबा किती सुंदर आहेत हे बाहुला बाहुली. आणि स्वेटरपण मला आवडला.” ती खुश होत उड्या मारत म्हणाली.
राघवेंद्र,“ माज्या ह्या भावली परास सुंदर नाय.गीला ना माज्या भावलीचा रुसवा आता?” त्याने हसून दोघांच्या हातावर चार चार लिमलेटच्या गोळ्या ठेवत विचारलं.
सुगंधा,“ हो आबा गेला आता मी बट्टी केली ना तुमच्या. माझे आबा सगळ्यात भारी आहेत.” ती गोळ्या तोंडात घालत म्हणाली.
राघवेंद्र,“ अगं एक एक खा की समद्या घातलीस त्वांडात ठसका लागल ना सोन्या.” तो थोडा काळजीने म्हणाला.
सुगंधा,“ नाही sss लागत. मीsss आजीलाsss दाखवते” ती तोंडातल्या गोळ्या सांभाळत कशीबशी म्हणाली आणि पळाली.
मधुमालती,“ तसच झोपायचं नाही खाऊन झाल्यावर पाण्याने चुळू भर बब्बू.” ती ओरडून म्हणाली आणि सुगंधाने वळून नुसती होकारार्थी मान हलवली तोंडात एकदम इतक्या गोळ्या कोंबल्यावर तिला बोलता कोठे येत होते.
पृथ्वी,“ आबा मला पण खूप आवडली ही मोटार आणि स्वेटर.”तो म्हणाला. त्याच्या हातात गोळ्या तशाच होत्या.
राघवेंद्र,“ माज्या पृथ्वीचा राग केला का पण? आन गोळ्या का हातात धरल्या हायत्या? खा की रं.”
पृथ्वी,“ मला नव्हता आला राग आबा. तुमी तर चांगल्यासाठीच ओरडता ना आमच्या. आणि मी एकटाच खाऊ का सगळ्या गोळ्या? एक तुम्हाला एक आऊला एक माऊला आणि एक मला. आजी असलं काही खात नाही. हे घे आऊ, आबा ही तुमची ही माझी आणि ही माऊला देतो तिला सगळं दाखवतो आणि मी तिथेच झोपतो माऊ जवळ.”
तो बोलत होता आणि त्याचा समजूतदारपणा पाहून आणि इतक्या लहान वयात वाटून खाण्याची वृत्ती पाहून राघवेंद्र आणि मधुमालतीचा ही उर अभिमानाने भरून आला.
राघवेंद्र,“ मला नगु त्वां खा सोन्या.ही बग पुडा हाय नव्हं माज्या जवळ. त्वां खा.” तो मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला.
पृथ्वी,“ बरं मी जातो.” तो म्हणाला आणि केला.
राघवेंद्र,“ आपल्या दुनी पोरात किती फरक हाय मधु पोरगी रागीट हाय आन कुणाचा बी इचार करत नाय. चारी गोळ्याचा बकना मारला बग एकदावच. आन पोरंग समजूतदार हाय समद्याचा इचार करतया.आता कस्तुरी नगु म्हंली तरी बी तिला गोळी चारल बग.” तो कौतुकाने बोलत होता.
मधुमालती,“ हो दोघांचे स्वभाव वेगळे आहेत पण पृथ्वी मोठा आहे आणि बब्बू लहान. तिला नाही कळत अजून काही हो. पण तुम्ही कस्तुरीला काय म्हणालात की तुम्ही आहे तोपर्यंत सगळं शिकून घे म्हणून? असं भरल्या घरात बोलणं शोभतं का तुम्हाला तरी? बिचारी रडत होती. तिला राग येणं साहजिक आहे ना?” ती बोलत होती.
राघवेंद्र,“ अगं ते मी असंच बोललु हुतू. आन ती म्हणतीया तिला शिकायचंच नाय मी बी बगतु कशी शिकत नाय ती इंग्रजी. मी जातच नस्तुया माडीवर जवर ती तयार हुत नाय शिकाया तवर.”
मधुमालती,“ तुमच्या दोघांच्या भांडणात मला नाही पडायचं. आणा तो पुडा ठेवते.”
राघवेंद्र,“ नगुच पडू.आन ह्या पिशवीत शाली हायत्या बग तुला, आईला, कस्तुरीला,रमीला, मामी आन इमला वैनीला बी आणली हाय शाल.पर मी काय म्हंतु मधु बायसाब पोरांचा तर रुसवा काडला पर पोरांच्या आऊचा बी काडाया पायजेल का नाय.” तो तिला हाताने जवळ ओढत हसून म्हणाला.
मधुमालती,“ हो ना निमित्त नुसतं माझ्या रुसव्याच. थांबा दार लावून येते आता ही दोघं काही येत नाहीत.” ती हसून म्हणाली.
राघवेंद्र म्हणाला तसं तो कस्तुरीला इंग्रजी शिकायला तयार करू शकेल का? पण तो तिला शिकवण्यासाठी इतका अट्टाहास का करत होता? त्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल तर लागली नसेल ना?
©स्वामिनी चौगुले
क्रमशः