राघवेंद्रने दुसऱ्याच दिवशीपासून कस्तुरीला इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. त्याने लिहलेल्या अक्षररांवर गिरवून अक्षरं शिकायची आणि मग लिहायला शिकायचं असं त्याने तिला सांगितलं होते. तो चार दिवस मुंबईला जाणार होता आणि जाण्या आधी त्याने तिला अभ्यास देऊन तो दुसऱ्या दिवशी निघून गेला. मुलं शाळेत गेली. मधुमालती ही शेजारच्या गावातल्या शाळेत जाऊन आली. ती दुपारी नेहमीप्रमाणे कस्तुरीकडे माडीवर गेली तर कस्तुरी मोठ्याने ए, बी, सी,डी असं म्हणून अक्षरं गिरवत होती.
मधुमालती,“ कस्तुरीचे सरकार जाताना चांगलंच कामाला लावून गेले आहेत बाबा कस्तुरीला.” ती कस्तुरीला चिडवत म्हणाली.
कस्तुरी,“ काय जी बायसाब गरिबाची मस्करी करतायसा. एक येळ काम केलेलं बरं पर डोसक्याला ह्यो ताप नगु तुमी आन सरकार ही गोऱ्यांची भाषा कसं शिकलासा तुमास्नीच म्हैत. मला काय बी कळना गेलया बगा.आन चार दिसानी आल्यावर त्यास्नी लिवूनशान नाय दावलं तर चिडत्याली माज्यावर.” ती वैतागून बोलत होती.
मधुमालती,“ अगं इतक ही अवघड नाही इंग्रजी; तुला अजून सुरुवात आहे म्हणून तसे वाटते आणि मी आहे ना मीही मदत करेन की तुला शिकायला.” ती तिला समजावत म्हणाली.
कस्तुरी,“ व्हय जी.”
मधुमालती,“ कस्तुरी तुला स्वयंपाक करायला येतो का गं?” तिने अचानक विचारलं.
कस्तुरी,“ व्हय इतुया की जी. पर तुमच्यावानी लय काय बाय नाय येत जी. अमी गरीब माणसं जी भाकर, खर्डा, भाज्या असलं येतया जी बनवाया पर आता किती वरीस झालं काय बी केलं नाय जी. आयतं ताट मिळतंय नव्हं. पर सरकार मला भेटाया यायचं तवा खर्डा आन भाकर हाटानं खायचं आन गव्हाच्या पिटाच लाडू त्यास्नी लय आवडायचं बगा. जवा बी भेटाया यायचं तवा लाडू मागायाचं.” ती जुन्या आठवणीत रमली होती.
मधुमालती,“ म्हणजे मला ही माहीत आहे त्यांना खर्डा, भाकरी, पिटल आणि कधी तरी मटण देखील खायला आवडते. पण गव्हाच्या पिटाचे लाडू? ते कसे करतात? त्यांना इतके आवडतात तर आधी का नाही सांगितलं मी केले असते ना. असो आता सांग. मी बनवते आता. आणि आल्यावर खायला घालते.” ती बोलत होती.
कस्तुरी,“ काय बी अवघाड नाय बगा त्येत. गव्हाचे पिट तुपात घवळं भाजूनशान घ्यायचं आणि भाजत आलं नव्हं का त्यात साकऱ्या बारीक कुटून टाकायाचा आन ऊन ऊन पिटाचं लाडू बांदायाचं. हा तुमी त्यात काजू, बदाम आन इलायची बी घातली तर लयच खमंग हुत्याली.” ती म्हणाली.
मधुमालती,“ इतके सोपे आहेत? मी ते यायच्या आधी करते आणि आल्यावर खायला देते. कित्ती खुश होतील ते.” ती उत्साहाने म्हणाली.
कस्तुरी,“ व्हय. बायसाब एक ईचारु का जी?”
मधुमालती,“ विचार की गं?”
कस्तुरी,“ बायसाब ते सरकारांच्या तळव्याला टाकं घातलं हुतं जणू. त्येच्या खुणा हायत्या नव्हं हातावर पर त्यास्नी हतकं काय लागलं हुतं जी?” तिने विचारलं.
मधुमालती,“ म्हणजे इतकी वर्षे झालं त्यांनी तुला काहीच सांगिलं नाही?” तिने आश्चर्याने विचारलं.
कस्तुरी,“ नाय जी. म्या इचारलं का काय तर सांगूनशान मला गप करत्याती. किती वरीस झालं ईचारतीया म्या. आता इचार केला का तुमास्नीच ईचाराव.”
मधुमालती,“ कमाल आहे बाई या माणसाची. इतक्या वर्षात तुला यांनी इतकी मोठी गोष्ट सांगितली नाही? असो मी सांगते. आमचे लग्न झाल्यावर एक दोन वर्षाच्या दरम्यानची गोष्ट आहे ही. यांच्याकडे एक मोगऱ्याच्या अत्तराची कुपी होती. ती त्यांनी याच खोलीतल्या एका फडताळात ठेवली होती. ते मनात आलं की इथं यायचे आणि त्यातले अत्तर हाताला लावायचे एकदा मला ही हाताचा सुवास दाखवला होता.”
कस्तुरी,“ मोगऱ्याचं अत्तर? म्या दिली हुती ती कुपी त्यास्नी. ते माज्या अंगाचा सुवास बगूनशान तर मला पायल्यांदि भेटाया आलं हुतं. त्यास्नी वाटत हितं का म्या अत्तर लावलया. पर माज्या अंगचाच सुवास हाय ही कळल्यावर गिल आन आमचं पिरिम ततंनच सुरू झालं हुतं नव्हं जी. म्हणूनशान म्या त्यास्नी मोगऱ्याच्या अत्तराची कुपी दिली हुती. पर त्या कुपीचा आन त्येंच्या हाताच्या जकमचा काय संमांद हाय जी?” तिने आश्चर्याने विचारलं.
मधुमालती,“ त्या कुपीचाच तर संबंध आहे कस्तुरी. कदाचित तुझी आठवण आली की ते ती अत्तराची कुपी उघडून त्यातला सुगंध घेत असावेत. एक दिवस असच दुपारी ते माडीवर आले होते आणि त्यांनी ती अत्तराची कुपी फडताळातुन काढली. पण कशी कोण जाणे ती त्यांच्या हातून फुटली आणि ती फुटकी अत्तराची कुपी यांनी हातात आवळून धरली. किती वेळ धरली होती ती त्यांचं त्यांना माहीत. मी आले तर हातातून रक्त येत होते आणि जमिनीवर रक्ताचे थारोळे तयार झाले होते. मी घाबरून ताकद लावून त्यांची मूठ सोडवली तर खूप मोठी जखम झाली होती यांच्या हाताला. हळद लावून कापड बांधून ही रक्त थांबत नव्हतं असं का केलंत म्हणून आत्यांनी विचारलं तर कुपी फुटली म्हणून त्याची आठवण कोरून घेतली हातावर असं काही तरी म्हणाले होते त्यावेळी मला त्याचा अर्थ लागला नाही पण नंतर तू आल्यावर लागला. वैद्य बुवांना बोलावून घेतले तर त्यांनी टाके घालावे लागतील म्हणून सांगितलं तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. पण बिना भूल देता टाके घालणे म्हणजे किती त्या यातना आणि डॉक्टरांकडे तालुक्याला जायचं म्हणलं तर कसं जाणार दारात वाहन होते पण चालवणार कोण? यांना तर हाताला किती लागले होते आणि रात्रभर थांबलं तर रक्त जाऊन जीवाला धोका निर्माण झाला असता यांच्या; सगळंच आड ना विहीर झालं होतं. तर हे म्हणाले वैद्य बुवांना की घाला टाके. मामंजींनी हात दाबून धरला आणि वैद्यबुवांनी टाके घातले. तर तोंडातून आवाज काढला नाही यांनी डोळ्यातून पाणी मात्र वाहत होते. त्यानंतर चार दिवस तापाने फणफणले होते ते. त्यानंतर आठ दिवसांनी हाताचे टाके काढले पण चांगला दोन तीन महिने जखमेने त्यांना त्रास दिला होता कस्तुरी!
मला आश्चर्य वाटतं की आजच्या काळात बाईला पायातली चप्पल समजणारी ही पुरुष जमात या काळात एखादा पुरुष एखाद्या बाईवर इतकं उत्कट प्रेम कसा करू शकतो? की तिने दिलेली प्रेमाची आठवण फुटली म्हणून त्या वस्तूची आठवण अशा प्रकारे कायमची हातावर कोरून घेईल? आणि ती बाई तू आहेस कस्तुरी! मी तर त्यांच्या या प्रेनाच्याच प्रेमात पडले बघ.” ती बोलत होती आणि तिच्या डोळ्यात पाणी होते. कस्तुरीच्या तोंडातून मात्र अस्फुट हुंदका बाहेर पडला. थोडावेळ शांततेत गेला कस्तुरी हुंदके देऊन थोडावेळ रडत राहिली.
कस्तुरी,“ हतकं वरीस झालं सरकारांनी माज्या पासनं ही गुष्ट लपवूनशान ठिवली जी बाईसाब. किती तरास झाला असलं त्यास्नी टाकं घालताना आन त्यानंतार बी. कशा पाय असलं अघोरी पिरिम करायाचं जी? म्या काय लय अप्सरा हाय व्हय? म्या अडाणी बाय. तुमी माज्या परास किती उजव्या हायसा जी. तुमच्यावानी बायकू असताना माजी कशा पाय आटवन काडायाची आन माज्यावानी छप्पन बाया मिळत्याल्या की सरकारास्नी.” ती रडतच म्हणाली.
मधुमालती,“ कस्तुरी प्रेम हे प्रेम असते गं एकदा कोणावर जीव जडला की जडला. मग त्यात डावं उजवं असत नाही. आणि तुझ्या प्रश्नातच तुझे उत्तर आहे कस्तुरी. तुझ्यासारख्या छप्पन भेटतील त्यांना पण तू फक्त एकच आहेस ना.ते मागे आजारी पडले तेंव्हा मला काय म्हणाले होते माहीत आहे का? त्यांचं माझ्यावर ही प्रेम आहे आणि तुझ्यावर ही. मी त्यांचे शरीर आहे आणि तू आत्मा! कस्तुरी शरीराला आत्म्याची गरज असते कारण आत्मा शरीरातून निघून गेला की ते मातीमोल होते. त्याला आपण नेऊन जळतो पण आत्मा अमर असतो त्याला शरीराची गरज असतेच असं नाही. आणि तू राघवेंद्रप्रताप जहागीरदारांचा आत्मा आहेस. यावरूनच तू ठरव की त्यांच्या आयुष्यात तुझे स्थान काय आहे? आणि मला त्यांचे नुसते शरीर नको आहे त्यांचा आत्मा ही हवा म्हणजे तुही हवी आहेस. म्हणून मी तुला सखी म्हणते ना कारण आपण त्यांच्या शिवाय आणि ते आपल्या दोघींशिवाय अपूर्ण आहोत.” ती कस्तुरीचे डोळे पुसत म्हणाली आणि कस्तुरी रडतच तिच्या कुशीत शिरली.
कस्तुरी,“ म्या लय नशीबवान हाय बायसाब मला सरकार आन तुमी मिळालासा.” ती म्हणाली आणि मधुमालती मात्र तिच्या केसातून मायेने हात फिरवत राहिली.
पण यांच्या दोघीचे हे सुख किती दिवस टिकणार होते हे मात्र येणारा काळच ठरवणार होता?
©स्वामिनी चौगुले
कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
