माडीवरची बाई भाग 64

 




   दोन वर्षे अशीच निघून गेली. राघवेंद्र आता मंत्री झाला होता. त्याचा राजकारणात चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. त्यातच त्याच्या संस्थेच्या  तालुक्यातील प्रत्येक गावात दहावीपर्यंत शाळा सुरू झाल्या होत्या त्याचा ही व्याप वाढला होता आणि पर्यायाने मधुमालतीचा कामाचा व्याप ही वाढला होता. प्रत्येक शाळेवर लक्ष देणे. तिथली व्यवस्था पाहणे वेळोवेळी त्या संदर्भात होणाऱ्या मिटिंगसाठी कधी तालुक्याला तर कधी साताऱ्याला जाणे सुरूच होते. शेतीचा ही व्याप वाढला होता. पाचशे एकर शेतीची राघवेंद्रने सातशे एकर केले होती. त्याचे ही कामकाज पाहावे लागे. या सगळ्यात पृथ्वी आणि सुगंधा कस्तुरीच्या हाता खाली मोठे होत होते. राधक्का ही होतीच पण त्यांचा अभ्यास घेण्याचे आणि त्यांना बाकी सगळं शिकवण्याचे काम मात्र कस्तुरीवर मधुमालतीने सोपवले होते. सुगंधा मात्र कस्तुरीशी फटकूनच वागायची. ती अभ्यास वगैरे तिच्याकडे करत असे पण मधुमालती नसली तर राधक्का आणि मधुमालती असली तर तिच्याच जवळ जात असे. राघवेंद्र असला की मात्र दोन्ही पोरं खूप आनंदी असायची.ती त्याच्या मागे पुढे करायची.राघवेंद्र ही वडील म्हणून त्यांना जे माया प्रेम द्यायला हवे जे लाड करायला हवेत ते सगळं करत होता.


   आज राघवेंद्र दहा बारा दिवसांनी दौऱ्यावरून आला होता. आता तो दहा दिवस तरी कुठे जाणार नाही म्हणून दोन्ही पोरं खुश होती. कस्तुरीची मात्र अजूनही अभ्यासातुन सुटका झाली नव्हती. ती आता मोठी-मोठी पुस्तक सहज वाचू शकत होती.सगळ्या प्रकारची गणिते तसेच पाढे, अगदी व्याजापासून ते हिसाब किताब कसा करायचा हे सगळं राघवेंद्रने तिला शिकवलं होतं. 


 राघवेंद्र रात्री वाड्यावर आला होता.पोरांसाठी खूप काही खायला आणि कपडे वगैरे तसेच लहान मुलांची पुस्तके आणि पेन, पेन्सिल वगैरे आणले होते. ते सगळं पाहून दोघे भाऊ-बहीण भलतेच खुश होते. पृथ्वी आता सहावी तर सुगंधा पाचवीत गेली होती.


 सकाळी उठून राघवेंद्रने त्याचे सगळे आवरले. पृथ्वी आणि सुगंधाही शाळेत जाण्यासाठी तयार होत होते. मधुमालती आज कुठेही जाणार नव्हती. पोरांनी आणि राघवेंद्रने न्याहरी केली.राघवेंद्र  जहागीदारी (शेती)पाहायला जाणार होता. सुगीचे दिवस जवळ आल्यामुळे कुठल्या गावात काय आणि किती पिकले आहे हे पाहायला लागणार होते. नाही म्हणलं तरी जहागीदारांचे घर शेतीवरच होते. त्यातूनच सगळा खर्च होत असायचा आणि मुलांच्या भवितव्याची तजविज देखील त्यातूनच होणार होती. त्यामुळे शेतीकडे लक्ष देणे भागच होते. मदन अजून यायचा होता. राघवेंद्र त्याच्या नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे वाड्यातुन बाहेर पडण्याआधी कस्तुरीला भेटायला माडीवर गेला त्याच्या हातात कसली तरी पुस्तकं आणि वह्या होत्या. कस्तुरी कसली तरी पोथी वाचत होती. तिने राघवेंद्रला पाहिले आणि नमस्कार करून पोथी ठेवून दिली. राघवेंद्र येऊन खाटवर बसला.


कस्तुरी,“ सरकार दौरा लय लांबला जी या येळंला आन हातत काय आणलं जी?”


राघवेंद्र,“ व्हय या येळी दिल्लीला गिलतू म्या कस्तुरा ततं पक्ष श्रेष्ठींची सभा हुती नव्हं.आन म्या दिलेला परिमाण आन मापं, क्षेत्रफळचा अब्यास किलीस का?” त्याने विचारलं.


कस्तुरी,“ते आजूनशान जरा ऱ्हाईलं हाय जी. पर बास की आता म्या लय शिकली की. पोरास्नी बी शिकवतीया आता. अजून किती शिकायाचं? मला नाय शिकायाचं आता आजूनशान.” ती तोंड फुगवून बोलत होती.


राघवेंद्र,“ धा-बारा दिस झालं. त्वां आजूनशान मी दिलेला अब्यास केला नाय? आन आता शिक्षाण बास म्हंजी? मी ही इंग्रजीची उजळणी आन या व्हया या पेन्सिली कशा साटनं  आणलं हाय? आता तुला जरा जरा इंग्रजी बी शिकवायचं म्हणतुया.  इंग्रजी वाचायाला आन लिवाया बी आलं पायजेल तुला कस्तुरी, आन त्वां आता शिकणार नाय म्हणतीयास?”तो चिडून त्याने आणलेलं समान तिला दाखवत म्हणाला.


कस्तुरी,“ काय आता म्या गोऱ्यांची भाषा शिकू म्हणतायसा? तुमच्या हट्टा पाय म्या आत्ता पातूर समदं शिकली.  आन आता गोऱ्यांची भाषा बी शिकू व्हय? मला नाय जमायचं ते. आन हिवडं शिकूनशान म्या करणार काय हाय माजी समदी जिंदगी या वाड्यात आन माडीवर जाणार मग कशा पाय म्या शिकू हे समदं? म्या नाय शिकायची आता काय बी सरकार.” तीही रागातच बोलत होती.


राघवेंद्र,“ कस्तुरी पुडचं दिस कसं इत्याली आपल्याला म्हैत नाय. मी हाय तवर समदं शिकूनशान घी. उद्या मी नसल्यावर तुला ही समदं शिकलेलं लय उपयोगाला येणार हाय. तुला इंग्रजी वाचाया आन लिवाया बी याया पायजेल. उंद्या सरकारी कागुद त्या बगार तुला वाचाया ईल का? आन ज्याला इंग्रजी येतया त्यो खरं तुला वाचूनशान सांगत का?  पचतावा हुईल इंग्रजी नाय शिकली त्याचा. त्या परास मी हाय तवर समदं शिकूनशान घी.” तो तावातावाने मोठ्याने बोलत होता.त्याचे असे निर्वाणीचे बोलणे ऐकून कधी नाही ते कस्तुरीही भडकली.


कस्तुरी,“ उगा भरल्या घरात असं वंगाळ कशा पाय बोलतायसा? उगा वाईट वंगाळ बुलयाचं नाय सरकार. आन म्या कुटं जायाची हाय सरकारी कागुद वाचाया? तुमची जहागिरी तुमी जहागिरदार तुमी बगणार. आन तुमास्नी काय बी व्हायचं नाय. आन म्या नाय शिकायची गोऱ्यांची भाषा. आन आता तर बाकीच बी काय शिकायाच नाय मला.” तीही चिडून म्हणाली.


राघवेंद्र,“ म्हंजी तुला माजं ऐकायचं नाय. आन मी जहागीदार आन माजी जहागिरी म्हंजी तुजं काय नाय का? अक्षी मी बी?लय बोललीस त्वां. आज पसनं त्वां जवर इंग्रजी शिकाया तयार हुनार नाय तवर मी माडीवर पाय ठिवायचू नाय.” तो चिडून म्हणाला आणि  निघाला. कस्तुरी मात्र आता रडायला लागली.


कस्तुरी,“ मला तसं म्हणायचं नवतं. कसला हट हाय जी तुमचा ह्यो सरकार? ऐक की..” ती पुढे बोलणार तर राघवेंद्र रागाने पायऱ्या उतरून खाली आला.


  मधुमालती आणि राधक्का आवाज ऐकून चौकात आल्या होत्या पण त्यांना पुसटसे ऐकू आले होते. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले हे कळले असले तरी का हे कळलं नव्हतं. राघवेंद्र रागाने लाल होऊन खाली आला आणि तितक्यात बाहेर खेळत असलेले पृथ्वी आणि सुगंधा भांडतच चौकात आले.


पृथ्वी,“ आऊ ही सुगंधा बघ कशी चिडीचा डाव खेळते.” तो तक्रारीच्या सुरात म्हणाला.


सुगंधा,“ आबा दाद्याच चिडतो कायम.” ती तोंड फुगवून म्हणाली आणि आधीच चिडलेला राघवेंद्रच्या रागाचा अजूनच भडका उडाला.


राघवेंद्र,“ गपबसा तुमी दोगं. तुमच्या दोगांच बी अब्यासात लक्ष नाय. पृथ्वी तुजा सामाईत दुसरा नंबर आला हाय पायला नंबर का नाय आला रं? आन गंधे त्वां लय आगाऊपणा करतीयास शाळेत. मला मास्तर सांगत हुतं. मधू तुजं ध्यान नाय पोरांकडं. आन कस्तुरी निस्ता लाड करतीया यांचा. अशानं पोरं बिघडत्याली की का आता मी माजा कामधंदा सोडूनशान पोरांवर ध्यान दिवू? निस्ता मनमानी कारबार सुरू हाय समद्यांचा.” तो रागाने तणतणत होता आणि पोरं घाबरून मधुमालतीच्या मागे जाऊन लपली. मधुमालती ही खाली मान घालून ऐकत होती.


राधक्का,“ राघव आरं इतकं चिडया काय बी झालं नाय. उगा त्वां शिरा नगु तानु. त्वां हतं बस. रकमे पाणी घिवूनशान यी.” ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली.


मधुमालती,“ तुम्ही दोघे जा बरं शाळेत. बाहेर रामाकाका शाळेत सोडायला वाट पाहतोय ना तुमची. जा दप्तर घेऊन शाळेत.” ती दोघांना म्हणाली आणि दोन्ही पोरं होकारार्थी मान हलवून निघून गेली.राघवेंद्र मात्र अजूनही रागाने धुमसत होता. तोपर्यंत मदन आला.


राघवेंद्र,“ आला तुमी? या या किती वाजता याया सांगटल हुतं तुला? घड्याळ हाय नव्हं हातात कळतंया नव्हं ते?” तो रागाने मदनकडे पाहत म्हणाला.


मदन,“ पर म्या तर येळेवर आलू हाय की. काय झालया वैनीसाब वातावरण लय तापलया.” त्याने मधुमालतीकडे पाहून विचारलं आणि तिने तोंडावर बोट ठेवून बोलू नको म्हणून त्याला खूण केली. तसा तो गप्प बसला.


राघवेंद्र,“ व्हय का चला मग आता.” तो म्हणाला.


मधुमालती,“ ऐका ना जरा खोलीत चला तुम्हाला शाळेची ती कागदपत्रे द्यायची आहेत. तुम्ही शाळेत ही जाणारच असाल ना आज.” ती म्हणाली आणि खोलीकडे वळली.


राघवेंद्र,“ व्हय. मदू त्वां जीप काड मी आलूच.” तो म्हणाला आणि मधुमालतीच्या मागे गेला.राधक्का ही निघून गेली.


मधुमालती,“ इथं बसा. काय झालं इतकी चिडचिड करायला? कस्तुरी बरोबर भांडलात वाटतं.” ती त्याचा हात धरून बोलत होती.


राघवेंद्र,“ नाव घिवू नगुस तिचं लय शेपारली हाय ती. मला म्हणतीया तुमी जहागीदार तुमची जहागिरी. मी समदं शिकून काय करू म्हणं? म्हंजी ही कोण नाय का माजी? हिला आता शिकायाचं नाय म्हणं.” तो चिडूनच म्हणाला.


मधुमालती,“ असं म्हणाली ती? पण का?”तिने  आश्चर्याने विचारलं.


राघवेंद्र,“ एक तर मी दिलेला अब्यास केला नाय तिनं आन मी म्हणलू इंग्रजी शिक तर सरळ नाय म्हणतीया. मी बी सांगून आलू हाय का जवर ती तयार हुत नाय शिकाया तवर मी माडीवर जाणार नाय.”तो रागानेच म्हणाला.


मधुमालती,“ हुंम म्हणून भांडण झाले होय तुमच्या दोघांचे. बरं मी बोलते तिच्याशी. पण तुम्ही असं रागाने धुमसत घराबाहेर पडणार का? असं लालेलाल झालेलं तोंड घेऊन? नाय म्हंजी आज समदीकडं आग लावायाची हाय का जी सरकार?” ती डोळे मिचकावत म्हणाली आणि राघवेंद्रच्या चेहऱ्यावर हस्याची लकेर उमटली.


राघवेंद्र,“ हो का बाईसाब. तुम्हाला खूपच काळजी हो लोकांची. माफी कर मधू मी उगीच भडकलू तुज्यावर आन पोरांवर बी.” तो शांत होत म्हणाला.


मधुमालती,“ आता तुम्ही माफी मागणार का माझी? उगीच काही तरी. आणि पोरांना तर संध्याकाळी आल्यावर तुम्हालाच मनवावं लागेल ना गेली तोंड फुगवून शाळेत. पण एका अर्थी बरंच आहे धाक पण हवाच ना त्यांना. आणि मदन भाऊजींवर ही विनाकारण भडला तुम्ही. ते बिचारे वेळेच्या आधी आले आहेत बघा की घड्याळात पाऊने दहा झाले आहेत अजून तर.” ती भिंतीवरचे घड्याळ दाखवत म्हणाली.


राघवेंद्र,“ व्हय आता दोगांचा बी रुसवा काडाया लागल आन  आंदी मदन सायबाचा. आन राती आमच्या मधू बाईसाबचा काडतु आ रुसवा.” तो उठून तिला जवळ ओढत म्हणाला.


मधुमालती,“ तुमचं काही तरीच बघा. मी नाही रुसले तुमच्यावर आणि जा आता आणि हो लवकर या मी मटण करून ठेवते संध्याकाळी जेवणात.” ती म्हणाली राघवेंद्र निघून गेला.


  राघवेंद्र कस्तुरीला अगदी इंग्रजी शिकवण्याचा ही अट्टाहास का करत होता? आणि त्याच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय असेल? मधुमालतीला ते साधू बाबा म्हणाले तसं राघवेंद्र पुढं काही तरी मोठं घडणार आहे याची कल्पना आली असेल का? पण काय घडणार होते असे पुढे? 

©स्वामिनी चौगुले

कथेचा मागील भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग 63


काही वैयक्तिक कारणांमुळे कथा लिहायला उशीर झाला. त्यासाठी क्षमस्व🙏 पण पुढचे भाग रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करेन








   



 

 

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post