माडीवरची बाई भाग 63

 




राधक्का बोलली तसं तिने राघवेंद्र वाड्यावर आल्यावर त्याच्या कानावर कस्तुरीशी सुगंधाचे वागणे घातलं. त्याआधी मधुमालतीने ही सुगंधाला समजावलं होतं. संध्याकाळच्या वेळी राघवेंद्रने पृथ्वी आणि सुगंधाला खेळायच्या निमित्ताने बाहेर नेले. थोडावेळ तिघे खेळले. खिडकीतून कस्तुरी त्यांचा खेळ बघत होती.तिघेही तिथेच बाजावर बसले.


राघवेंद्र,“ मग मी नव्हतु तवा काय काय किलं माज्या वाघांनी?” त्याने विचारलं.


पृथ्वी,“ आबा तुम्हाला माहित आहे का सुगंधाने अवघड गणित सोडवलं म्हणून गुरुजींनी तिला शाबासकी दिली.” तो सांगत होता.


सुगंधा,“ दाद्या हे मला सांगायचं होतं ना आबांना.” ती कमरेवर हात ठेवून तोंड फुगवून म्हणाली.


राघवेंद्र,“ मंग दाद्यानं सांगटल तर काय बिघाडलं गंधा.माजी गंधा हायच हुशार व्हय ना पृथ्वी?”


पृथ्वी,“ हो पण ती खूप आगाऊ आहे आबा.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.


सुगंधा,“ दाद्या तू पण आगाऊच आहेस. काल नाही का त्या विनूची खोड काढलीस ती.” ती पृथ्वीला भांडायला उठली.


राघवेंद्र,“ पृथ्वी असं म्हणायाचं नाय. ती बारकी भन हाय तुजी. पर गंधा आजीनं तुजी तक्रारी किली हाय त्येचं काय करायाचं गं?” त्याने थोडं रागाने विचारलं.


पृथ्वी,“ चुकलं माझं आबा मी पुन्हा असं वागणार नाही.” तो खाली मान घालून म्हणाला.


राघवेंद्र,“ हुंम माजा पृथ्वी शाना हाय.पर गंधा तुज्या तक्रारीच काय करायाचं?” त्याने पुन्हा तिला विचारलं


सुगंधा,“ माझी तक्रार केली आजीने पण मी काहीच केलं नाही आबा.” ती विचार करत म्हणाली.


राघवेंद्र,“ खरंच का त्वां काय बी किलं नाय? माऊला उलाट कोण बोललं मग?” त्याने तिला पाहत विचारलं.


सुगंधा,“ पण आबा ती तशीच वागते माझ्याशी. ती दाद्याला साब म्हणते पण मला नाही. आणि मला नाही आवडत ती.” ती तोंड वाकडं करत म्हणाली. 


 कस्तुरी तिघांचे बोलणे वरून खिडकीत उभी राहून ऐकत होती.


राघवेंद्र,“ व्हय पर त्वां घरात समद्या मंदी ल्हानी हाईस ना म्हणून ती तुला सुगंधा म्हणती. आन ती तर किती लाड करती तुमच्या दोगांचा आन अभ्यास कोण घेतं तुमचा. तिच्या मुळंच तर त्वां अवघाड गणित सोडलीस नव्हं आन म्हणूनशान तुला गुरुजींनी शाबासकी दिली ना तुला? बाळा ती तुझी माऊ हाय नव्हं. ती रागावली तरी बी तुज्या चांगल्या साटनंच रागावणार नव्हं. ती तुमच्या दुगाचा बी किती लाड करतीया. तुमास्नी गुष्टी संगतीया आन तुमच्या बरुबर खिळतीया.” तो तिला समजावत होता.


पृथ्वी,“ हो ना माऊ माझा तर खूप लाड करते आणि सुगंधाचा पण आणि अभ्यास घेते. आबा तिच्या कुशीत शिरलं की अत्तराच्या कुपीत शिरल्यासारखं वाटतं. ती मला तर खूप खूप आवडते. माझी माऊ खूप खूप छान आहे……” तो बडबडत होता पण सुगंधा मात्र तिच्याच विचारात गढली होती.


‛ या दाद्याला कळतच नाही की ती माऊ चांगली नाही.ती मुळात आमची माऊच नाही ती म्हणे माडीवरची बाई आहे. आमच्या आबाला दूर केलं आऊ पासून आणि आता आपल्यापासून पण ती आबाला दूर करेल. मी बोलू का?..... नको नको …शोभा म्हणाली तशी ती माझ्या आबांना घेऊन दूर गेली तर? ती चांगली नाही. मी तर तिच्यापासून लांबच राहणार बाबा.’ सुगंधा हा सगळा विचार करत होती.


राघवेंद्र,“ हुंम  बग माऊ किती चांगली हाय व्हय ना रे पृथ्वी?(तो सुगंधाचा हात धरून म्हणाला आणि सुगंधा उठून त्याच्या कुशीत शिरली.) काय झालं माझ्या गंधाला?” त्याने मायेने तिला कुरवाळत विचारलं.


सुगंधा,“ बरं मी आता तिला नाही बोलणार उलट.चुकलं माझं. पण आबा तुम्ही ना मला खूप खूप आवडता. माझे आबा खूप खूप चांगले आहेत. सगळे मला काय म्हणतात माहीत आहे का? मी तुमच्यासारखी दिसते सुंदर. मी सुंदर आहे ना आबा?” तिने डोकं वर करून त्याच्याकडं पाहत विचारलं.


राघवेंद्र,“ व्हय माझी लाडाची मैना त्वां तर माझी सुंदरा हाय. आन आपला पृथ्वी कुनागत हाय गं?” तो हसून तिला मायेने बोलत होता.


सुगंधा,“ तो आऊ सारखा आहे. घाऱ्या डोळ्यांचा माझा दादा पण सुंदर आहे.” ती निरागसपणे म्हणाली.


पृथ्वी,“ मग मी पण सुंदर आहे. पण माऊ ही सुदंर आहे ना आबा मला माऊ खूप आवडते आणि तुम्ही पण आणि आऊ, आजी पण.” तो टाळ्या वाजवत म्हणाला.


राघवेंद्र,“ व्हय व्हय. चला आता मी ना लिमलेटच्या गोळ्या आणल्या हायत्या आन बिस्कीटबी चला.” तो उठून उभं राहत म्हणाला आणि दोन्ही पोरं खुश झाली आणि आत पळाली. राघवेंद्रने वर कस्तुरीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होते.दोघांची नजरानजर झाली आणि तिने पदराने डोळे पुसले आणि खिडकीतून लांब गेली.


   रात्री पोरं झोपून गेली.महेंद्रप्रतापराव गेल्यापासून सुगंधा राधक्काजवळ झोपत होती. तर पृथ्वी कधी मधुमालतीजवळ पण जास्तीत जास्त  कस्तुरी जवळ झोपत असे. आज ही पृथ्वी झोपायला माडीवर गेला होता. त्यामुळे खोलीत दोघेच होते. राघवेंद्र काही तरी वाचत बसला होता तोपर्यंत मागची सगळी व्यवस्था लावून मधुमालती खोलीत आली.


मधुमालती,“ तुम्ही बब्बूला सांगितलं का समजावून कस्तुरी विषयी? मीही माझ्या परीने सांगितलं होतं. काय म्हणाली ती?” तिने खाटवर बसत विचारलं.


राघवेंद्र,“ मी सांगटलं हाय गंधाला समजावून मला म्हणली चुकलं पुण्यादा ती कस्तुरीबरुबर असं बगायाची नाय. आन मला म्हणतीया मी आवडतु तिला लोकं म्हणत्याती ती माझ्यावाणी सुंदर हाय म्हणं.” तो पुस्तक बाजूला ठेवून हसून बोलत होता.


मधुमालती,“ हो मग माझी बब्बू आहेच सुंदर तिच्या आबांसारखी. पण एक बरं झालं तिची चूक तिला कळली आता ती कस्तुरीबरोबर असं वागणार नाही. मला भीती वाटत होती की तिच्या मनात कस्तुरी विषयी आढी निर्माण होती की काय? पण सुदैवाने तसं काही झालं नाही. पण मग आपले पृथ्वीसाब पण काही तरी म्हणाले असतील ना?” तिने हसून विचारलं.


राघवेंद्र,“ व्हय मग त्यो मगं ऱ्हातुया व्हय. त्येला त्येची माऊ आवडीतिया बाई मग त्वां मग मी आन मग आजी.” तो म्हणाला.


मधुमालती,“ हो पृथ्वीचा कस्तुरीवर खूप जीव आहे आणि तिचा ही त्याच्यावर. गेला बघा झोपायला तिच्याकडं आता पळून.” 


राघवेंद्र,“ व्हय ते दिसतंया. 

★★★★

 

   मधुमालती झोपली आणि तो रात्री कस्तुरीकडे गेला. कस्तुरी खाटवर पृथ्वीला घेऊन झोपली होती. तिने दार उघडलं. पृथ्वीला व्यवस्थित पांघरूण घातलं. 


कस्तुरी,“ सरकार हतं या मला म्हैत हुतं का तुमी येणार म्हणूनशान म्या हतं हातरुन घालूनशान ठिवलं हुतं जी.” ती हळू आवाजात म्हणाली.


राघवेंद्र,“ हुंम तुला बरं समदं आदीच म्हैत असतंया.” तो हसून अंथरुणावर बसत म्हणाला.


कस्तुरी,“ आता वळकाया लागली हात म्या तुमास्नी. आन तुमची आन बाईसाबांची  लाडाची मैना लय चुरुचुरू बुलाया लागली हाय. तरी बरं चुकलं तर म्हणाल्या बायसाब.म्या ऐकत हुती समदं.” 


राघवेंद्र,“ व्हय पर हुशार हाय माजी पोरगी आन ऐकलं नव्हं काय म्हणत हुती का ती माज्यावानी सुंदर हाय.कस्तुरा पोरांची मनं लय नाजूक असत्याती एकदाव तडा गिला की गिला. म्हणूनशान पिरिमानं समजावून सांटलं तिला. पृथ्वी तसा समजुतदार आन शांत हाय पर ही पोरगी तशी हट्टी हाय बग. पर तुज्या डोळ्यात पाणी का हुतं?” तो हळू आवाजात बोलत होता.


कस्तुरी,“ व्हय जी.पर तिचा सवाल बी बरुबर हुता म्या समद्यास्नी साब म्हंती. मग तिलाच का नाय? आता सुगंधाबायसाब म्हणाया पायजेल बाबा.आन डोळ्यात पाणी खुशीच हुतं जी. माज्या पृथ्वीसाबचा लय जीव हाय माज्यावर किती कौतुकानं बोलत हुतं माज्याबद्दल. म्या त्यास्नी आवडीया. सरकार तुमी मला समदं सुक दिलं जी. माज्यावर पिरिम किलं. बायकूचा मान दिला आयपण दिलं. म्या भरून पावली बगा जी.” ती आवंढा गिळत त्याच्या मांडीवर डोकं ठेवून बोलत होती.


राघवेंद्र,“ व्हय पृथ्वीचा तुज्यावर जीव हाय. पर मला खाईम खंत असलं कस्तुरा मी तुला समाजात बायकूचा मानपान नाय दिव शकलू. त्वां समाजासाटनं मी ठिवलेली माडीवरची बाय हाईस.” तो उदास होत तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला.


कस्तुरी,“ लोकं हाय समजत्याती त्येनं मला काय बी फराक पडत नाय. माज्या साटनं माजा समाज नाय तर माजं समदं जग फकस्त तुमी हायसा आन ह्यो वाडा आन हतली माजी माणसं हायती.” ती उठून त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाली.


    सगळं व्यवस्थित आणि सुरळीत सुरू आहे असं सगळ्यांना वाटत होतं. सुगंधाच्या मनातील कस्तुरीबद्दलची आढी राधक्का, मधुमालती आणि राघवेंद्रनेही त्यांच्या त्यांच्या परीने दूर करण्याचा प्रयत्न केला होता तिच्या बालमनाची समजूत घातली होती. पण सुगंधाच्या मनात कस्तुरी विषयी निर्माण झालेली ही आढी अजून देखील तशीच होती.

©स्वामिनी चौगुले


कथेचा मागचा भाग खालील लिंकवर👇
माडीवरची बाई भाग 62















 



Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post