दुसऱ्या दिवशी सगळ्यांना तार पाठवल्या गेल्या. राघवेंद्रने सुभानरांच्या इच्छे प्रमाणे वाड्यातल्या दोन तीन गड्यांच्या मदतीने घोंगडीच्या झोळीतून त्यांना माडीवर नेले.त्यांच्या पाठोपाठ राधक्का आणि मधुमालती होत्याचं. कस्तुरीने त्यांना खटावर बसवायला मदत केली.
कस्तुरी,“ अण्णां साबास्नी हतं हिवडा तरास करूनशान कशा पाय आणलं जी? त्यास्नी महादेवाचं दर्शन घ्यायाचं हुतं तर महादेवाला घिवून जायचं हुतं की.” ती काळजीने म्हणाली.
सुभानराव,“ देव कवा भक्ताकडं जात नस्तुया कस्तुरी? आन गेला तर भक्त तिवडा मोटा असाया लागतुया तुज्यावानी. म्हणूनशान म्या राघवला घिवून चल म्हणलं मला आन निस्ता महादेवाचं दर्शन घ्यायाचं नवतं मला तर तुला बी भेटायाचं हुतं. आता माजं काय बी खरं नाय. माज्या जवळ असलेलं समदं म्या वाटणार हाय तवा तुजा वाटा द्याया आलू हाय म्या.” ते थांबून थांबून बोलत होते.
कस्तुरी,“ माजा वाटा? माजा कसला जी वाटा? मला काय बी नगु तुमी फकस्त माज्या डोस्क्यावर हात ठिवा जी बास. आन उगा कशाला वंगाळ बुलतायसा.” ती त्यांच्याजवळ बसत म्हणाली.
सुभानराव,“ त्यो तर हायची की खाईम पर माज्या समद्या पोरीबाळीस्नी म्या दगीनं देतूया बग.त्वां बी माजी सून हाईस नव्हं. मग तुला तुजा हिस्सा द्याया नगु. ह्यो लक्ष्मीहार आन या राघवच्या आजीच्या हिऱ्याच्या कुड्या आन मंगळसूत्र तुज्या साटनं.” ते तिच्या हातावर दागिने ठेवत म्हणाले आणि कस्तुरी मात्र रडायला लागली.
कस्तुरी,“ या घरातल्या पोरीबाळी बरुबर मला बी दगीनं? मला तुमी सून म्हणालासा? यातच मी भरून पावले जी. आन हे दगीनं मला नगु. या मंगळसूत्रावर तर बाईसाबांचा हाक हाय ते म्या कसं घ्यायाचं जी?” ती रडत म्हणाली.
मधुमालती,“ माझा वाटा मला मिळाला आहे कस्तुरी अण्णांनी हे तुला दिलं आहे तर ते घे. त्यांची इच्छा अशी मोडू नकोस.” ती म्हणाली आणि कस्तुरीने राघवेंद्रकडं पाहिलं त्याने डोळ्यांनीच तिला घे म्हणून खुणावलं आणि तिने ते दागिने कपाळाला लावले.
सुभानराव,“ मालू त्वां आन कस्तुरी त्वां एक भजन म्हणा की.” ते म्हणाले.
कस्तुरी,“ बरं.”असं म्हणून तिने डोळे पुसले आणि सुरपेटी घेतली.
मधुमालती,“ विठ्ठला शरण तुला आलो. हे भजन गाऊ.” ती म्हणाली आणि कस्तुरीने होकारार्थी मान हलवली.
आलो शरण तुला भगवंता
पेटून उठला वनवा सारा
तिन्ही जगाला लागली आग
नसे आसरा नाहीं निवारा
जाऊ कुठे मी सांग विट्ठला
जाऊ कुठे मी सांग
आलो शरण तुला भगवंता
घेई कुशीत तुझ्या भगवंता
पूण्य झाले स्वस्थ जगी
त्याला नाहीं भाव
पुण्यवान होई रंक
पापी झाला राम
नाही थारा इथ गुणवंता
आलो शरण तुला भगवंता
दोघी तल्लीन होऊन भजन म्हणत होत्या आणि सुभानराव डोळे झाकून भजन ऐकत होते. वाड्यावर काम करणारे सगळे गडी आणि बायका हातातली कामे सोडून दोघींचे सुरेल भजन ऐकण्यात तल्लीन झाले होते. जणू सगळा वाडा भक्ती रसात न्हाऊन निघत होता. भजन संपलं.
सुभानराव,“ कसलं गॉड गातासा पोरीनु.”ते हात जोडून म्हणाले.
राघवेंद्र आणि मधुमालतीच्या मदतीने ते उठले आणि महादेवा पुढे नतमस्तक झाले.तार मिळताच रमा आणि सुभानरावांच्या चारी लेकी आल्या. सुभानरावांनी सगळ्यांना डोळे भरून पाहिलं. सगळ्यांच्या हातात त्यांची शेवटची आठवण दिली आणि पुढच्या दोनच दिवसात ते गेले. वाड्यात पुन्हा एकदा आक्रोश झाला.
★★★
जहागीरदार वाड्याचा सगळ्यात जुना बुरुज ढासळला होता. पण सगळ्यांना हे समाधान होते की सुभानराव तृप्त मनाने आणि सगळ्यांना भेटून गेले होते. पुन्हा सगळ्यांची दिनचर्या पूर्व पदावर आली होती. राघवेंद्र त्याच्या तर मधुमालती तिच्या कामात गढून गेले होते. कस्तुरीचे मन मुलांमध्ये रमायचे शाळेतून आलं की पृथ्वी तिच्याचकडे असायचा. पण सुगंधा मात्र राधक्काच्या मागे असायची. तीही माडीवर जायची पण ती कस्तुरी जवळ जास्त जात नसे पृथ्वी माडीवर असायचा म्हणून ती त्याच्याबरोबर खेळायला आणि अभ्यासाला जायची.कस्तुरी संध्याकाळी मुलांमध्ये रमायची पण पहाटे उठल्यापासून ती महादेवाची भक्ती आणि दुपारी धर्मग्रंथ वगैरे वाचत असे. आणि अभ्यास करत असायची.
राघवेंद्र मात्र अजून ही तिला शिकवतच होता. आता तो तिला मापे-परिमाणे शिकवत होता.
पृथ्वी आता चौथीत तर सुगंधा तिसरीत गेली होती. आज शाळेत गुरुजींनी सुगंधाच्या वर्गात वजाबाकीचे खूप अवघड गणित दिलं होतं आणि अख्ख्या वर्गात तिचेच गणित बरोबर आले होते.त्यामुळे गुरुजींनी तिचे खूप कौतुक केलं होतं. तिची मैत्रीण शोभा मात्र कायम सुगंधाचाच नंबर येतो तिचेच कौतुक होते म्हणून तिच्यावर जळायची पण सुगंधा मात्र तिला चांगली मैत्रीण समजत होती. शाळा सुटली. सगळे घरी जायला निघाले होते. सुगंधा गेटपर्यंत शोभाशी गप्पा मारत जात असे आणि सुगंधाच्या संरक्षणासाठी ठेवलेला गडी मागे असे.
शोभा,“ काय गं इतकं अवघड गणित कसं सोडवलस तू?” तिने विचारलं.
सुगंधा,“ अगं माझी माऊ आहे ना ती खूप छान समजावून सांगते मला आणि दाद्या; तिनेच मला शिकवलं. तुला सांगते शोभा माझ्या माऊच्या अंगाचा इतका छान वास येतो की असं वाटतं तिच्याजवळच बसून राहावे.” ती कौतुकाने सांगत होती.
शोभा,“ तुझी माऊ म्हणजे ती माडीवर राहते ती बाई का गं?” तिने विचारलं.
सुगंधा,“हो तीच की पण असं बाई नाय म्हणायचं तिला ती माऊ आहे माझी.” ती थोडी रागाने म्हणाली.
शोभा,“ अगं माऊ कुठली ती? ती काय तुझ्या आईची बहीण आहे का? उगा काय तर. माझी आई म्हणते की त्या तुमच्या वाड्यातल्या माडीवरच्या बाईने धाकल्या सरकारांना तिच्या सुगंधाच्या जाळ्यात ओढलं आणि आली त्यांच्याबरोबर वाड्यात. तिने धाकल्या सरकरांबरोबर लग्न केलंय तुझी आई असताना. आणि जी बाई असं करते ना ती चांगली नसते. बघ बाई एखाद्या दिवशी ती धाकल्या सरकारांना तुमच्यापासून लांब घेऊन जायची. ती चांगली नाही खूप वाईट आहे. आणि हे मी सांगितलं म्हणून कोणाला सांगू नकोस बाई धाकलं सरकार आम्हाला गावातून हाकलून देतील आणि तू पण कोणाला बोलू नकोस. त्या माडीवर राहणाऱ्या बाईला कळलं तर ती तुझ्या आईला आणि तुम्हाला तुमच्या आबापासून दूर करेल. लक्षात ठेव.” ती असं म्हणाली आणि पळून गेली.सुगंधा मात्र विचारात पडली.
‛ म्हणजे माऊ चांगली नाही. ती वाईट आहे म्हणून तर मला तिच्याजवळ जाऊ वाटत नाही. मी दाद्याला सांगू का हे? नको..नको दाद्या तिला जाऊन सांगेल आणि मग ती मला माझ्या आऊ आणि आबापासून दूर करायची.’ ती विचार करत घरी गेली.
ती दप्तर ठेवून आजी आऊ अशा हाका मारत परसात गेली तर कस्तुरी मागच्या जिन्यात बसून तर मधुमालती तिथेच एका दगडावर बसून गप्पा मारत होत्या.
मधुमालती,“ आलीस तू? आणि पृथ्वी कुठं आहे?”
सुगंधा,“ दाद्या लय वेळ लावतो आऊ तो अजून रस्त्यात असेल.”
कस्तुरी,“ किती येळा सांगटलं तुला सुगंधे पृथ्वीसाबास्नी असं दाद्या नाय म्हणायचं नीट दादा म्हणावं.” ती तिला समजावणीच्या सुरात म्हणाली.
सुगंधा,“ ये तो माझा दाद्या आहे मी त्याला दाद्याच म्हणणार आणि सगळ्यांना तू साब साब म्हणतेस दाद्याला पण मग मला पण सुगंधासाब म्हणायचं आता. सुगंधे नाही.” ती रागाने तोंड फुगवून बोलत होती आणि मधुमालती आणि कस्तुरी तिच्याकडं आश्चर्याने पाहत होत्या. राधक्का ही तोपर्यंत तिथे आली होती.
राधक्का,“ असं बोलत्यात काय मोट्या माणसास्नी सुगंधे? ती माऊ हाय नव्हं तुजी?” तिने दरडावलं. तशी सुगंधा रडत पळून गेली.
मधुमालती,“ ही आज अशी का वागली?मी बघतेच थांब तिला.” ती रागाने उठत म्हणाली.
कस्तुरी,“ ऱ्हावु द्या जी बाईसाब. हे समदं ती नाय तिच्यालं जहागीरदारांचं रगात बोलतया. आता हिला बी सुगंधासाब म्हणाया पायजे.” ती मिश्कीलपणे हसत म्हणाली.
राधक्का,“ आता त्वाचं जलमाला घातलील्या या डूचकीला सुगंधासाब म्हणायाची व्हय गं? थांब हिला दावतीच म्या लय लाड झालाया हिचा.” ती रागाने म्हणाली.
कस्तुरी,“ आवं मालकीणबाय ल्हानी हाय ती आन आदीच माज्याकडं येत नाय पृथ्वीसाब आब्यासाला इत्याती तवा त्येंच्याबरुबर इतिया आन तुमी दुगी तिला माज्या साटनं रागावचाला म्हंजी ती यायचीच बंद हुईल. तिला बी प्रश्न पडत असलं नव्हं म्या तिलाच असं सुगंधा का म्हंतु म्हणूनशान उगा तिच्या मनात काय बाय याया नगु म्या तिला आता साब म्हणती.” ती तिला समजावत म्हणाली.
मधुमालती,“ अगं पण हे बरोबर नाही. तुला मी किती वेळा सांगितलं की पृथ्वीला साब वगैरे म्हणू नकोस म्हणून पण तू ऐकत नाहीस.” ती नाराजीने बोलत होती.
राधक्का,“ व्हय पर कस्तुरीच बरुबर हाय. सुगंधीच्या मनात काय बाय याया नगु बाय. पर लयच चाबरी व्हाया लागली हाय ही. राघव काय चुकलं तर रागवतया तर हे आन मामंजी हुतं तर या सुगंधाला बोलायाची सोयच नव्हती.पर मालू त्वां लय लाड किला हाय पोरीचा.” ती बोलत होती
मधुमालती,“ माझी बब्बू तशी खूप हुशार आणि गुणी आहे आत्या मी समजावते तिला.” तोपर्यंत पृथ्वी तिथं आला.
पृथ्वी,“ आऊ सुगंधा रडतेय का? मला तर वाटलं तिला आज लाडू भेटणार पण तिला तर धम्मक लाडू भेटला की काय आज?” तो हसत म्हणाला.
राधक्का,“ धम्मक लाडूच भेटाया पायजेल तिला.”
पृथ्वी,“ अगं आजी आज तिचं गुरुजींनी खूप कौतुक केलं आहे. तिने खूप अवघड गणित सोडवलं. सगळ्यांना सांगत होती ती माऊ तिचा अभ्यास घेते म्हणून. तिने सांगितलं नाही का काही?” तो म्हणाला.
कस्तुरी,“ या बया पोरगी तेच सांगाया आली हुती वाटतं जी बायसाब आन म्या तिला रागवली म्हणूनशान हतकं चिडलं वाटतं लेकरू.” ती स्वतःवरच नाराज होत म्हणाली.
राधक्का,“ ते काय बी असू दि म्या राघव उंद्या आला का त्याला सांगणार हाय. ही पोरगी नुस्ती आगाव व्हायला लागली हाय. आन जा रं त्वां हात पाय धू.मालू जा तिला समजाव जा.तरव म्या त्यास्नी खायाला आणती.”
पृथ्वी,“ आजी मी माडीवर जाणार आहे. खायला घेऊन. माऊ मी आलोच.” तो न्हाणीकडे जात म्हणाला.
सुगंधाच्या बाल मनात आज कस्तुरी विषयी गैरसमज निर्माण झाला होता. बालमनावर अशा गोष्टींचा परिणाम खूप लवकर होतो. या घटनेमुळे कस्तुरी आणि सुगंधा यांच्या मायलेकीच्या नात्यात कायमची कटुता येणार होती का? की कालौघात सुगंधा ही घटना विसरून जाईल? हे तर येणारा काळच ठेवणार होता.
©स्वामिनी चौगुले
कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
br />
