राघवेंद्रने राधक्काला तर सावरलं होतं पण तो स्वतःही मनातून कोलमडला होता. तो ना स्वतःचे दुःख कोणासमोर व्यक्त करू शकत होता ना कोणाशी बोलू शकत होता. सावित्री आणि मधुमालती मुलांना घेऊन राधक्काच्या खोलीत झोपत होत्या. राघवेंद्र सुभानरावां सोबत झोपत होता. राघवेंद्रची मात्र आता घुसमट होत होती. रात्री काही केल्या त्याला झोप येत नव्हती. अशा वेळी माणसाला त्याच्या प्रेमाच्या माणसाची गरज असते मन मोकळं करायला आणि रडायला त्याला एक आधार हवा असतो. आणि त्याचा तो आधार म्हणजे कस्तुरी होती. तो उठला त्याने सुभानरावांना पाहिलं ते गाढ झोपले होते. त्याने त्यांच्या अंगावरचे पांघरूण नीट केलं आणि तो हळूच उठून दार लावून माडीवर गेला. कस्तुरीने दार वाजलेलं ऐकून दार उघडलं आणि त्याला खोलीत घेऊन दार लावलं. राघवेंद्र जाऊन खाटवर बसला. तो काहीच बोलत नव्हता.
कस्तुरी,“ सरकार मला म्हैत हाय तुमास्नी लय दुक हाय थोरलं सरकार गेल्याच पर ते कुणाला बी सांगता येत नाय आन बोलता बी येत नाय. पर म्या हाय नव्हं तुमी तुमच्या मनातलं समदं मला सांगा असं आतल्या आत समदं घुटून घिनं बरं नाय जी.”
ती त्याच्याजवळ बसत त्याचा हात धरून बोलत होती आणि राघवेंद्रचा बांध फुटला तो तिच्या कुशीत शिरून हुंदके देऊन रडत होता. कस्तुरीच्या डोळ्यातून ही अश्रू वाहत होते. ती नुसतं त्याच्या केसातून हात फिरवत राहिली. भावनांचा बहर ओसरला आणि राघवेंद्र शांत झाला. तो उठून बसत बोलू लागला.
राघवेंद्र,“ तात्या म्हंजी माजं नुसतं बा नव्हतं कस्तुरी ते माजा आदार हुतं. ते माजी ताकत हुतं. त्यांच्या जीवावर मी बिनघोर हुतु पर आता ते गेलं मला लय एकटं वाटतंया. मी पोरका झालु कस्तुरी.” असं म्हणून तो पुन्हा रडायला लागला.
कस्तुरी,“ असं काय बुलतायसा जी. ते गेलं पर त्येचं आशीर्वाद तुमच्या बरुबर हायती नव्हं. माजी आय गिली तवा तुमी काय म्हणला का तिला म्या असं रडताना वंगाळ वाटलं म्हंजी थोरलं सरकार जितं अस्त्याली ततंनं तुमास्नी बगत असत्याली त्यास्नी तुमास्नी असं रडताना बागूनशान वंगाळ वाटत असंल नव्हं.आन तुमास्नी पोरकं वाटाया काय झालं जी मालकीणबाई हायत्या की खंबीर तुमच्या साटनं. आन अण्णा हायती. तुमचं मामा-मामी हायती. उगा काय तर इचार करून तरास करून घिवू नगासा. जी झालं ती वंगाळ झालं जी. कुणाच्या ध्यानीमनी नसताना असं थोरलं सरकार आपल्या समद्यास्नी सुडन गिलं पर देवाच्या मर्जी पुडं आपलं काय बी चालत नाय जी. आन म्या हाय की माज्या सारकरां साटनं. परत एकलं वाटतया असं नाय बुलयाचं जी.” ती त्याचे डोळे पुसत बोलत होती.
राघवेंद्र,“ हुंम.तुज्या समुर मन मोकळं करूनशान लय बरं वाटतंया मला. मी जातू.” तो स्वतःला सावरत म्हणाला.
कस्तुरी,“ नगा जाऊ निजा हतंच म्या शुक्राची चांनी उगीवली का उटवती तुमास्नी मग जावा खाली.” ती त्याचा हात धरून म्हणाली.
राघवेंद्र,“ बरं.” तो म्हणाला.
★★★★
पुढचे दोन महिने कसे गेले ते कोणालाच कळलं नाही कारण जहागीरदार वाड्यावर सांत्वन करण्यासाठी लोकांची रीघ लागली होती. नाही म्हणले तरी दुःख थोडे कमी झाले होते. पण सुभानरावांनी अंथरून पकडलं ते पकडलंच. राधक्काने मात्र आता हळूहळू संसार आणि घरातले व्यवहार यातून मन काढून घ्यायला सुरुवात केली. ती आता देव आणि नातवंडांमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करत होती. खरं तर राधक्काचं दुःख कधीच कमी होणारे नव्हते पण तिने राघवेंद्र आणि रमाकडे पाहून स्वतःला सावरलं होतं. रमा ही राधक्काला बरं वाटावे म्हणून पुन्हा तिची मुलं घेऊन येऊन राहिली होती.
मधुमालतीच्या मनात मात्र एक तर त्या साधू बाबांचे शब्द घोळत होते. महेंद्रप्रतापरावांच्या जाण्याने साधू बाबांनी सांगितलेली एक गोष्ट पुन्हा तिच्या लक्षात आली. पण ही योग्य वेळ नव्हती तो विषय काढायची म्हणून ती शांत राहिली.
चार महिने होऊन गेले आणि पुन्हा सगळं हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं होतं. पण सुभानरावांची तब्बेत मात्र दिवसेंदिवस ढासळत होती. त्याची चिंता मात्र सगळ्यांना लागून राहिली होती. राघवेंद्र ही या काही महिन्यात जास्त दिवस दौऱ्यावर जात नव्हता.मधुमालती ही गरज असेल तरच शाळेत जात होती नाही तर ती घरीच असायची. कारण राधक्काला एकटं वाटू नये.
आज रविवार होता. राघवेंद्र घरातच होता. तो कसली तरी कागदपत्रे वाचत होता.
मधुमालती,“ मला तुमच्याशी बोलायचं आहे थोडं.” ती राघवेंद्रला म्हणाली.
राघवेंद्र,“बुल की.” तो म्हणाला.
मधुमालती,“ बरेच दिवस झालं माझ्या मनात एक विचार घोळत आहे. आपण साताऱ्यात काही शेती घेऊन तिथे एक छोटा वाडा बांधून घेऊयात का? म्हणजे आज ना उद्या मुलं तिकडेच शिकायला जातील तर पुढची सोय म्हणून?” ती बोलत होती.
राघवेंद्र,“ इचार तर चांगला हाय मधू आन आज ना उंद्या आपल्याला गरज तर लागायाची हायच. पर आई बी ईचाराया पायजेल नव्हं.”
मधुमालती,“ हो त्यांना विचारुयात ना. चला जेवण करा. तुम्हाला बाहेर जायचं आहे ना.”
राघवेंद्र,“ व्हय त्वां हु पुडं मी आलूच आन पोरास्नी बी बुलीव किती येळ बाहीर खेळत्याती.”
मधुमालती,“ हो मी बोलवते पण तुम्ही ही लवकर या.” ती म्हणाली आणि निघून गेली.
सगळे जेवायला बसले होते. मधुमालतीने सुभानरावांना आधीच खायला घातलं होतं.
राघवेंद्र,“ अण्णांनी खाल्लं का मधु?”
मधूमालती,“ थोडं खाल्लं आहे भाकरी आणि दूध कुस्करून नेलं होतं मी. त्यांना जबरदस्ती करून खायला घालावे लागते.” ती म्हणाली.
राघवेंद्र,“ आई मधू म्हणीत हुती का साताऱ्यात वाईस शिती घिवूनशान ततं एक बारका वाडा बांदाव. पुडं पोरं शिकाया ततं जात्याली नव्हं म्हणूनशान. त्वां काय म्हणतीयास?” त्याने जेवत विचारलं.
राधक्का,“ इचार तर चांगला हाय. ह्यांची बी विच्छा हुती साताऱ्यात घरदार घ्यायाची पोरां साटनं. मधू त्वां जयसिंग दादाला टपाल धाड का कुटं जिमीन इकाया निगली का ध्यान दि आन सांग म्हणूनशान सांग. आन राघव त्वां बी तुज्या माणसास्नी सांगून ठिव.” ती म्हणाली.
मधुमालती,“ हो आत्या मी आजच पत्र पाठवते.” ती म्हणाली.
राघवेंद्र,“ व्हय मी बी सांगतु माज्या लोकांस्नी.” तो म्हणाला.
थोड्याच दिवसात जयसिंगरावांच्या शेजारची पन्नास एकर जमीन विकायला निघाली आणि राघवेंद्रने ती खरेदी केली. तिथे राधक्का आणि मधुमालतीच्या सांगण्यावरून वाड्याचे बांधकाम ही सुरू झाले. राधक्का तिथेच माहेरी राहिली. राघवेंद्र येऊन जाऊन लक्ष देत होता पण जयसिंगराव लक्ष द्यायला होते आणि राधक्का जातीने वाडा बांधून घेत होती त्यामुळे त्याला इतकं लक्ष घालायची गरज पडली नाही. पुढे दहा महिन्यात वाडा बांधून झाला. तोपर्यंत महेंद्रप्रतापरावांचे वर्ष श्राद्ध होऊन गेले होते. तरी ही राघवेंद्रने अगदी घरगुती पद्धतीने वास्तुकशांती घातली. वाड्याच्या देखीभालीसाठी एक कुटुंब आणि शेतात एक कुटुंब अशी व्यवस्था त्याने केली. बाकी लक्ष द्यायला जयसिंगराव आणि सावित्री होतेच.
सुभानरावांची तब्बेत मात्र दिवसेंदिवस खालावत चालली होती आता ते काहीच खात नव्हते. नुसती तांदळाची पेज पीत होते. वैद्यबुवांनी ही आता सुभानरावांचे काही खरं नाही असं स्पष्ट सांगितलं होतं. त्यामुळे राघवेंद्र महिना झालं वाड्यातच होता.
राघवेंद्र सुभानरावांना पेज पाजायला गेला.त्याच्याबरोबर मधुमालती आणि राधक्का देखील होती. राघवेंद्रने सुभानरावांना उठवून भिंत्तीला उशी लावून टेकवून बसवलं.
राघवेंद्र,“ अण्णा वाईस पेज प्या. मी पाजतु.” तो म्हणाला.
सुभानराव,“ म्या पितु पर राघव म्या काय संगतुया ती ध्यान दिवूनशान ऐक बाळा. म्या लहानगा हुतु म्हंजी असलं तरी कळता धा-बारा वरसाचा मला याद हात समदं. माज्या बाला एका साधू बाबानं सांगटल हुतं का जहागीरदाराच्या येणाऱ्या पिड्यास्नी मागची पापं फेडाव लागत्याली. ज्या पिडीत बा समुर पोरगा मरणार त्या पिडी पसणं जहागिरदारांची पापं त्यांच्या पुडं येणार. आन बग माजा महिंद्रा माज्या समुर गेला रं. कर्म लय वंगाळ असत्याती ती फिरून इत्याती बाबा. म्या बी लय वंगाळ कामं किली बग.आन त्येचं फळ मला मिळलं माजा एकुलता एक लेक माजा महिंद्रा गिला रं. इतनं पुडंचा काळ तुज्या साटनं वंगाळ हाय बाबा तवा सावद ऱ्हा. संवताला आन समद्यास्नी जप.माजं काय खरं नाय आता. राधक्का ते कपात उघिड त्येत तुज्या सासूच्या दागिन्याची पिटी हाय ती आन.”ते बोलत होते.
राघवेंद्र,“ अण्णा असं वंगाळ बुलू नगा की. तुमी बी अमास्नी सुडून जाणार व्हय आता.” तो आवंढा गिळत कातर आवाजात म्हणाला. तोपर्यंत राधक्काने दागिन्यांची पेटी आणून सुभानरावांच्या पुढ्यात ठेवली.
सुभानराव,“ आरं माज्या सोन्या मराण कुणाला सुचलं हाय व्हय रं? म्या समदं सुक बगितलं अक्षी परतांड बगितलं की रं. समदं जगूनशान झालं बग. त्यात पापं बी झाली माज्या कडनं आन पुण्य बी. वंगाळ फकस्त एकच वाटतंया का माज्या महिंद्राला त्या देवानं माज्या आदी बोलिवलं. ही आपलं पीडिज्यात दागीनं हायती. राधक्का ह्यो कोल्हापूरी साज आन पाटल्या माज्या रमीला द्यायाच्या हाय. तिला टपाल धाडून बोलवा रं! ही मोहनमाळ माज्या सुगंधी साटनं ठिवायाची. या बोरमाळा चार हायत्या माज्या पोरीस्नी द्यायाच्या त्यास्नी बी बोलवून घ्या मला समद्यास्नी बगायाचं हाय. राधक्का हे चिताक तुज्या साटनं. मालू ह्यो चंद्रहार तुज्या साटनं बग. परत तुज्या सूनंला दे ह्यो खानदानी हाय बग. आन राघव या अंगट्या हायत्या आन ही सोन साकळी तुजी. आन ह्यो लक्ष्मीहार आन ह्या हिऱ्याच्या कुड्या आन महिंद्राच्या आयला म्या ही हिरे आन मणकाचं मंगळसूत्र किलं हुतं ते बी कस्तुरीला द्यायाचं मला तिला भेटायाचं हाय. महादेवा पुडं हात जोडायचं हायती. आपल्या कुटल्या तर पीडिचं पुण्य हाय बग तवा कस्तुरी आपल्या वाड्यात आली.अन ह्या बिल्वर(सोन्याच्या बांगड्या) आपल्या पृथ्वीच्या बायकू साटनं.” त्यांनी दागिन्यांची वाटणी केली. इतकं बोलू पर्यंत त्यांना दम लागला होता.
राधक्का,“ मामंजी म्या समद्यास्नी उंद्याच तार धाडाया लावती आन राघव उद्या मामंजीस्नी गडी आन त्वां मिळून घोंगड्याच्या झुळीतून माडीवर कस्तुरीला भेटाया घिवूनशान जायाचं आन मामंजी ही समदं तुमीच तुमच्या हातानं तुमच्या लेकी-बाळीस्नी द्या जी म्या फकस्त माजं घिती मालू त्वां तुजं, सुगंधी आन पृथ्वीच आन राघवच दगीनं ठिवून घि. कस्तुरीचं दागिनं उंद्या तुमी द्या तिला.” ती त्यांना पाणी पाजत आणि झोपायला मदत करून डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली.
सुभानराव,“ व्हय. मालू तुला राग तर नाय आला नव्हं पोरी? का म्या कस्तुरीला राघवच्या आजीच्या कुड्या आन मंगळसूत्र द्यायाचं म्हणलु म्हणून?” त्यांनी हळू आवाजात मधुमालतीकडं पाहत विचारलं.
मधुमालती,“ नाही हो अण्णा मला का राग येईल. उलट आनंदच झाला मला की तुम्ही आमच्या सगळ्यांबरोबर तिची ही या दागिन्यांत वाटणी केली.” ती त्यांचा हात धरून म्हणाली.
सुभानराव,“ हुंम. पोरी लय मोट्या मनाची हाईस त्वां. मला नाय म्हैत का पर महिंद्राच्या आयचं मंगळसूत्र आन कुड्या तिला दिव वाटल्या.” त्यांना आता दम लागला होता.
राघवेंद्र,“ दोन दिसात समदी येत्याती बगा अण्णा आता तुमी निजा वाईस. मी उद्या तुमास्नी माडीवर घिवूनशान जातू.” तो म्हणाला आणि सुभानराव झोपले.
दुसऱ्या दिवशी मदनला राघवेंद्रने सगळ्यांना तार करायला सांगितली.
सुभानराव आणि जहागिरदरांच्या मागच्या पिढ्यांची पापं राघवेंद्र आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणार आहेत का?
© स्वामिनी चौगुले
कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
