माडीवरची बाई भाग 60

 



संध्याकाळी जेवताना राघवेंद्रने विषय काढला.


राघवेंद्र,“ तात्या मी इचार करत हुतू का मधू समद्या शाळांचा कारभार बगल. मला बी लय दवदव हुतीया आन तुमास्नी बी आता पैल्यावानी जमत नाय तर मी शेती बगतु आन राजकारण बगतु. मधु शिकली हाय पोरं बी मोटी झाली आता तवा तिला जमल बी समदं. मधूला शाळेत जाऊ द्यायाचं का?” 


महेंद्रप्रतापराव,“ आरं हतं देशाचा कारभार बाई बगतीया आन आपल्या मालूनं शाळा बगतल्या तर काय हुनार हाय असं बी मालू मस शिकली हाय.घरात बसायाची ती शाळंत जाइल. आन तुजा बी भार हलका हुईल की रं.” ते म्हणाले.


मधुमालती,“ आत्या, अण्णा मी जाऊ का शाळेत?” तिने कचरत विचारलं.


राधक्का,“ ईचारायाचं काय त्येत जा की. राघवची बी लय दमणूक हुतीया बग आन ह्यास्नी बी आता नाय हुत. मामंजी जावुदि नव्हं मालूला?” तिने विचारलं.


सुभानराव,“व्हय पर माजी एक अट हाय.”ते गंभीर होत म्हणाले.


राघवेंद्र,“ कसली अट अण्णा?” 


सुभानराव,“ मालूला फिरायला चारचाकी घिवून दि आन  एक डायव्हर ठिव. जहागीरदाराची सून काय अशीच गावं फिरलं व्हय रं?” ते हसून म्हणाले.


राघवेंद्र,“ बरं दिली चारचाकी घिवूनशान.” 


  इतका वेळ मोठ्यांचे बोलणे ऐकत असलेली सुगंधा जेवता जेवता उठली आणि मधुमालतीच्या मांडीवर जाऊन बसली.


सुगंधा,“ ये ss आता आऊ शाळेत येणार. ती पण गाडी घेऊन मी पण गाडीतून जाणार.” ती आनंदाने म्हणाली.


पृथ्वी,“ मी पण गाडीतून जाणार.मी माऊला सांगतो.” तो घाईत हात धुवून उठला.


राधक्का,“ पृथ्वी आरं नीट जिवून तर जा की रं.” ती ओरडली.


पृथ्वी,“ माझं जेवण झालं.” तो म्हणाला आणि पळून गेला.


      आणि मधुमालतीने शाळांचा सगळा कारभार तिच्या हातात घेतला.

★★★★★


    दोन तीन महिने असेच गेले. खरं तर आता सुभानराव चांगलेच थकले होते पण अजून काठी घेऊन का असे ना चालून फिरून होते. महेंद्रप्रतापरावांची  तब्बेत मात्र बरी नव्हती. राघवेंद्रने त्यांना तालुक्याच्या दवाखान्यात दाखवून आणले होते. आज जरा बरं वाटत होतं म्हणून राधक्का नको म्हणत असताना ते शेतावर गेले. शेतात मळण्या सुरू होत्या आणि राघवेंद्र आज दोन गावातले तेच काम पाहायला गेला होता. मधुमालती आणि मुलं शाळेत गेली होती. वाड्यावर गडी,बाया आणि राधक्का, सुभानराव आणि माडीवर कस्तुरी इतकीच माणसं  होती.


  शेतावर गेल्यावर महेंद्रप्रतापरावांना अस्वस्थ वाटायला लागले होते. छातीत धडधड करून कळ येत होती त्यांना  घाम देखील फुटला होता. एका गड्याने त्यांना बाजावर बसवलं. आणि पाणी आणून दिलं. महेंद्रप्रतापरावांनी तांब्याभर पाणी पिलं आणि ते तिथेच कोसळले. शेतात काम करणारे गडी घाबरले. महेंद्रप्रतापरावांच्या तोंडावर पाणी मारून देखील ते उठत नव्हते. शेवटी एका घोंगडीवर त्यांना ठेवून तीन-चार गड्यांनी वाड्याकडे धाव घेतली. एक जण शाळेत मधुमालतीकडे तर एक जण राघवेंद्रला बोलवायला शेजारच्या गावात गेला. एक वैद्यबुवांना  बोलवायला गेला.


   राधक्का आणि सुभानराव महेंद्रप्रतापरावांना गड्यांनी असं झोळीत आणलेलं पाहून घाबरले. एका गड्याने जवळ असलेला बाज चौकातच टाकला आणि त्यावर महेंद्रप्रतापरावांना झोपलं.


राधक्का,“ काय झालं यास्नी?” तिने महेंद्रप्रतापरावांच्या उशाला बसून रडत विचारलं.


गडी,“ मालकीणबाय थोरलं सरकार शेतावर आलं तवा नीट हुतं पर जरा येळनं त्यास्नी कसतर व्हाया लागलं छातीत दुकाया लागलं. घाम आला म्हणूनशान  म्या बाजंवर बसवलं त्यास्नी आन पाणी अनुनशान दिलं. ते पाणी पिलं आन गप झालं बगा. लय उटीवलं पर उटतच नायती.” तो सांगत होता.


सुभानराव,“ असा कसा उटीत नाय. ये…. ये… महिंद्रा लेका उट की रं.” ते धडपडत काठी टेकत बाजावर महेंद्रप्रतापरावांच्या बाजूला घाबरून बसत बोलत होते.


  तोपर्यंत शाळातून मधुमालती आणि  तिच्या पाठोपाठ वैद्यबुवा आले. वैद्यबुवांनी नाडी परीक्षण केलं. हृदयाला कान लावून पाहिलं. एकदा गळ्याला हात लावला. सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडं होतं. आणि ते गप्पच होते.


राधक्का,“ बुला की काय तर वैद्यबुवा. यास्नी हाय तर औषिध द्या. बगा की हे उटना झाल्याती.” ती रडतच बोलत होती. 


   खाली सुरू असलेला गोंधळ कस्तुरी खिडकीतून पाहत होती. तोपर्यंत राघवेंद्र आला.


राघवेंद्र,“ काय झालं हाय तात्यास्नी? आई तुला म्हणलु हुतु नव्हं का त्यास्नी शेताकडं  धाडू नगु. वैद्यबुवा काय झालंया तुमी असं गप का? मदू जीप हतं घिवूनशान यी लगोलग तालुक्याला घिवूनशान जाऊ अपुन तात्यास्नी.” तो बडबडत होता.


वैद्यबुवा,“ धकलं सरकार आता त्याचा काही उपयोग होणार नाही थोरलं सरकार आपल्यातून गेलं.” ते कातर आवाजात म्हणाले आणि राधक्काने हंबडरडा फोडला.


राघवेंद्र,“ काय? पर…” त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. डोळ्यातून मात्र पाणी वाहत होते. तो महेंद्रप्रतापरावांच्या पायात बसला. मधुमालतीही रडत होती. 


सुभानराव,“ माजा महिंद्रा…… माजा.. महिंद्रा गेला….. माजं पाप पुडं आलं. मजा महिंद्रा माज्या आदी गिला.. राघव …. जहागीरदार खानदानाचं वंगाळ दिस सुरू झालं रं! बाच्या पुडं लेक गेला….. साधूनं संगटलं हुतं….जहागीरदारांची पापं … पुडं इनार…. माजा महिंद्रा ….. उलट झालं. आता मला धन( अग्नी) कुन देणार महिंद्रा त्वां मला सुडून गिलास.” असं बडबडत त्यांनी टाहो फोडला.



  जगात सगळ्यात मोठ्ठ दुःख कोणतं असेल तर ते आपल्यासमोर आपल्या संतांन मरणे. आणि सुभानराव आज तेच दुःख भोगत होते. त्यांचा चार मुलींवर नवसाने  झालेला लेक आज त्यांच्यासमोर मृतावस्थेत होता. एका छोट्याशा आजारपणाचे निमित्त होऊन चालता बोलता महेंद्रप्रतापराव कोणाच्या ध्यानीमनी नसताना अचानकपणे गेले होते खरं तर हा सगळ्यांसाठीच खूप मोठा धक्का होता.


   पुढे त्याच दिवशी अंत्यविधी झाले. सगळं अचानक घडल्याने महेंद्रप्रतापरावांच्या बहिणीच काय पण रमाला ही अंतिम दर्शनासाठी येता आले नाही. दुसऱ्या दिवशी मदनने सगळ्यांना एकदम तार केल्या. तिसऱ्या दिवशी मात्र सगळा गोतावळा जमला. नुसत्या अक्रोशाने वाडा सुन्न झाला होता.सगळीकडे महेंद्रप्रतापराव अचानक गेल्याने हळहळ व्यक्त होत होती. अख्या पंचक्रोशीतील लोकं सांत्वन करायला येत होती. सुभानरावांना मात्र त्यांच्या लाडक्या लेकाच्या जाण्याचा धक्का पचण्यासारखा नव्हता. त्यामुळे त्यांनी दोन-तीन दिवसातच अंथरून धरलं.


   तेरा दिवस  विधी यथासांग पार पडले. आणि नातेवाईक पांगले. राधक्का ही खचली होती. मधुमालती तिला सावरण्याचा प्रयत्न करत होती. सुगंधा आणि पृथ्वी ही त्यांचा लाड करणाऱ्या आजोबांच्या अचानक जाण्याने बावरले होते.


 राघवेंद्र दाखवत नसला तरी तोही आतून खचला होता. त्याच्यासाठी महेंद्रप्रतापराव म्हणजे त्याचे नुसते वडील नव्हते तर त्याचा भक्कम आधार होते. त्यामुळे त्याला ही निराधार वाटणे साहजिक होते पण तोच रडत बसला तर राधक्का,सुभानराव आणि रमाला कोण सावरणार म्हणून तो स्वतःच्या भावना धीराने सावरून होता. आज सगळे नातेवाईक पांगल्यामुळे वाडा भकास वाटत होता. त्यात महेंद्रप्रतापरावांची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. 



   राधक्का तर नुसती रडून रडून  अर्धमेली झाली होती त्यात तिने गेल्या तेरा-चौदा दिवसांपासून जेवण ही नीट केलं नव्हतं. आयुष्याचा जोडीदार तिने गमावला होता. तोही महेंद्रप्रतापरावांसारखा प्रेमळ आणि चारित्र्यवान त्यामुळे तिचे दुःख डोंगरा एवढे होते. तरी सावित्री पंधरा दिवस राहणार होती आणि त्यानंतर मग दुखवटा काढायला राधक्काला घेऊन जाणार होती.


    राघवेंद्र विमनस्क अवस्थेत चौकात बसला होता. तिथे मधुमालती आणि सावित्री आली.


सावित्री,“ राघवराव आवं ताईसाब नीट जेवणा झाल्यात्या. किती दिस असं चालायाचं? त्या असं वागल्या तर आजारी पडत्याल्या नव्हं. एक तर अण्णांनी बी हातरुन धरलं हाय. म्या काय म्हंती तुमी जरा ताईबास्नी दोन शबुद बोला की.” ती डोळे पुसत म्हणाली.


राघवेंद्र,“ व्हय मामी मी आलुच. मधू जा ताट घिवूनशान यी.” तो म्हणाला आणि उठला.


  राघवेंद्र,सावित्री राधक्काच्या खोलीत गेले. राधक्का नुसती शून्यात नजर लावून बसून होती. इतकी कडक आणि तडफदार बाई. कायम दागिन्यांनी मढलेली असायची. अगदी कोल्हापूरी साज, चिताक, मोठे मंगळसूत्र, मोहनमाळ,बोरमाळ,हातात हात भरून हिरव्या बांगड्या आणि त्यात पटल्या, बिल्वर(सोन्याच्या बांगड्या) कानात मोठ्या कुड्या कपाळावर ठसठशीत कुंकू. पण आता ना अंगावर दागिने होते ना कपाळावर कुंकू ना चेहऱ्यावर तेज अगदी मलूल जणू तिचा तडफदारपणा महेंद्रप्रतापराव त्यांच्याबरोबर घेऊन गेले होते.तसं तिला पाहून राघवेंद्रला गलबलून आलं. त्याने आवंढा गिळला. तोपर्यंत मधुमालती जेवणाचं ताट घेऊन आली. तिच्या पाठोपाठ पृथ्वी आणि सुगंधा होते.


राघवेंद्र,“ आई त्वां जेव.”


राधक्का,“ मला काय बी नगु.”


सावित्री,“ असं करुनशान कसं चालायाचं बाईसाब? जेवा जी. तुमी नीट जेवला नायसा किती दिस झालं.”


राधक्का,“ मला नगु म्हणलं ना म्या. ते गेलं आन त्यांच्याबरुबर माजी भूक-तान घिवून गेलं.” ती रडत म्हणाली.


राघवेंद्र,“ त्वांच असं किलं तर मी कुणाकडं बगायाचं आई. एक तर तात्या असं ध्यानीमनी नसताना आपल्याला सुडूनशान गिलं. अण्णांनी तर हबकी खावूनशान हातरुन धरलं हाय.आता त्वां बी अशी किली तर मी आन रमानं  काय करायाचं? तिचा पाय निगत नवता पर तेराव्याचा दिवा पोरीनं बगायाचा नस्तुया म्हणूनशान गिली. आता तात्या नायती पर आमला आई पायजेल नव्ह.” तो रडत तिच्या कुशीत शिरत म्हणाला आणि राधक्का ही हुंदके देऊन रडायला लागली.


राधक्का,“ नाय रं बाळा म्या असं नाय वागायची आता. माज्या राघव साटनं आन रमा साटनं. माज्या या कोकरां साटनं म्या जिवती.” ती राघवेंद्रचे डोळे पुसून पृथ्वी आणि सुगंधाकडे पाहत रडत म्हणाली आणि दोघांना रडताना पाहून सुगंधा आणि पृथ्वी ही रडत राधक्काच्या कुशीत शिरले.


मधुमालती,“ आत्या आता जेवतायना मग.” ती आवंढा गिळून म्हणाली डोळे पुसत म्हणाली आणि राधक्काने होकारार्थी मान हलवली.

    

 सुभानराव म्हणत होते तसं जहागीरदार घराण्याचे वाईट दिवस सुरू झाले होते का? आता पुढे अजून काय काय घडणार होते?

©स्वामिनी चौगुले


कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग 59

अशाच मनोरंजक कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.



Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post