माडीवरची बाई भाग 59




 कस्तुरीने चवीने कुलूप काढून ट्रंक उघडला.त्यात एक हिरवा कंच शालू होता. कस्तुरीने तो शालू हातात घेतला.

शेवंता,“ ह्यो शालू याला बावन कशी सोन्याची जर हाय.आन माणिक मोत्यानं जडला हाय. ह्यो तुज्या आजी साटनं म्हंजी माज्या आय साटनं सांगलीच्या सरकारांनी खास बनवूनशान घितला हुता. माज्या आयनं ह्यो मला दिला आता म्या तुला दिती. तुज्या आयची शेवटाची भेट समज.” ती म्हणाली.


   दुपार टाळून गेली आणि शेवंताने दिवस मावळतीला झुकत असताना जीव सोडला. कस्तुरी खूप रडली. शेवंताचे सगळे सोपस्कार पार पडले. तिसऱ्या दिवशी राघवेंद्र तिथे आला. शेवंताची राख त्याने स्वतः कृष्णा नदीत सोडली. कस्तुरीच्या बापाची खाण्या-पिण्याची व्यवस्था करून तो पुन्हा कस्तुरीला घेऊन वाड्यावर आला. कस्तुरी मात्र आठवडाभर सारखी रडत होती. तिला कोण आणि काय समजावणार होते? कारण तिची आई म्हणजे शेवंताच तिच्यासाठी सगळं काही होती. शेवंताने तिला अगदी  छातीला कवटाळून मोठं केलं होतं. बाप तर असून नसल्या सारखाच.  रात्री राघवेंद्र तिच्याकडं आला.कस्तुरी शेवंताने दिलेला शालू घेऊन रडतच बसली होती.


राघवेंद्र,“ कस्तुरा मला म्हैत हाय तुजी आय गेल्याच तुला लय दुक हाय. पर त्यास्नी तुला असं रडताना बगूनशान वंगाळ वाटत असलं नव्हं. असं रडत बसली तर  आजारी पडशील की. आन मी हाय नव्हं तुज्या साटनं.” तो तिला समजावत होता. आणि ती त्याच्या कुशीत शिरली.


कस्तुरी,“ सरकार माजी आय ss ती माज्या साटनं समदं हुती. पर तिला म्या असं रडत बसली तर वंगाळ वाटल. म्या नाय रडायाची आता.” ती डोळे पुसत म्हणाली.


राघवेंद्र,“ आता रडायाच नाय.” तो  तिला जवळ घेत म्हणाला.


कस्तुरी,“ व्हय जी.”


      दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी मधुमालती माडीवर पोरं घेऊन आली होती. नुकताच बाहेरून आलेला राघवेंद्र ही माडीवर आला. पृथ्वी आणि सुगंधा तिथेच खेळत होते.


मधुमालती,“ कस्तुरी आता बरी आहेस ना तू? मला माहित आहे की आई जाणे हे खूप मोठे दुःख आहे पण त्यांना ही तू अशी दुःख करत बसलेली आवडणार नाही ना!” ती कस्तुरीला समजावत होती.


कस्तुरी,“ व्हय बाईसाब. म्या नाय रडायची आता. तुमास्नी मला काय तर दावायच हाय जी.( असं म्हणून तिने शेवंताने दिलेला शालू तिला दाखवला.) ह्यो बगा ह्यो शालू माज्या आजीचा हाय आन तिनं आयला दिला आन तिनं तिची आठवाण म्हणूनशान मला. अस्सल सोन्याची जर आन माणिक- मोती हायती म्हणं याला.” ती सांगत होती.


मधुमालती,“ खूपच सुंदर आहे गं हा. आणि तुझ्या दोन पिढ्यांचे आशीर्वात आहेत यात मग आता हा पुढे बब्बूला( सुगंधा) मिळणार म्हणायचं.” ती म्हणाली.


कस्तुरी,“ माजी एक विच्छा हाय जी.” ती संकोचून म्हणाली.


मधुमालती,“ मग बोल की इतका संकोच का?” 


कस्तुरी,“ मला ह्यो शालू सुगंधीला नाय द्यायाचा मला ह्यो शालू माज्या पृथ्वीसाबच्या बायकूला द्यायाचा हाय. दिला तर चाललं नव्हं?” तिने अडखळत विचारलं.


राघवेंद्र,“ काय? पर यावर माज्या गंधाचा हाक हाय कस्तुरा.” तो थोडा रागाने म्हणाला.


कस्तुरी,“ आजाबात नाय ह्यो शालू हतचं राहायाला पायजेल आन मला पृथ्वीसाबच्या बायकूला द्यायाचा हाय ह्यो. बायसाब बोला की जी म्या ह्यो पृथ्वीसाबच्या बायकूला दिला तर चालतंया नव्हं?” ती आशाळभूतपणे विचारत होती.


मधुमालती,“ कस्तुरी मला न चालण्याचा प्रश्न येतोच कुठे? अगं यात तुझ्या आईचे आणि आजीचे आशीर्वाद आहेत त्यांची माया आहे. मला माहित आहे तुझा जीव सुगंधा पेक्षा पृथ्वीवर जास्त आहे पण या शालूवर हे म्हणाले तसं सुगंधाचा हक्क आहे ना? मग तू हा पृथ्वीच्या बायकोला पर्यायाने पृथ्वीला नको देऊस.” ती तिला समजावत होती.


कस्तुरी,“ म्या म्हणलं नव्हं मला ह्यो आशीर्वाद आन शालू पृथ्वीसाबच्या बायकूलाच द्यायाचा हाय.आन सुगंधीला द्याया माज्याकडं मस दगीनं आन काय बाय हाय. तुमास्नी नगु असलं तर ऱ्हाव द्या जी.” ती थोडी नाराजीने म्हणाली.


मधुमालती,“ अगं मी नको म्हणाले आहे का? बरं दे बाई तुज्या पृथ्वीच्या बायकोला हा शालू लग्नातच घालायला लावू आपण. झालं का समाधान?” ती त्या सुंदर शालूवर प्रेमाने हात फिरवत म्हणाली.


कस्तुरी,“ लय झाक.लगीन हुताना नगु बाय द्याया पर पूजंला द्यायाचा.” ती पृथ्वीकडे प्रेमाने पाहत म्हणाली आणि पृथ्वी खेळता खेळता माऊ म्हणून तिच्या गळ्यात पडला.


मधुमालती,“ तुला केंव्हा द्यायचा तेंव्हा तुझ्या हाताने दे तुझ्या सुनेला.” ती हसून म्हणाली.


राघवेंद्र,“ म्हंजी माज्या गंधाचा हाक त्वां दिनार नाय तर? पर गंधाचा बा हाय नव्हं. मधू गंधाच्या लग्नात असाच सोन्याची जर आन माणिक-मोत्यानं जडलीला शालु  बनवुनशान घ्यायाचा. मी असलू- नसलू तरी बी ध्यानात ठीक.” तो म्हणाला.


मधुमालती,“ हो बनवू आपण पण असं अभद्र कशाला बोलता हो. तुम्हीच करणार ना तिचे कन्यादान. उगा असलं काही तरी बोलत जाऊ नका.” ती नाराजीने म्हणाली.त्याचे शब्द ऐकून तिच्या मनात चर्रर्र झाले होते पण तिने तसे दाखवलं नाही.


कस्तुरी,“ उगा वंगाळ कशापाय बोललासा वं सरकार? तुमी सुगंधीच लगीन काय पर परतांड बगाव म्हणूनशान म्या महादेवाला रोज मागानं मागतीया.” ती ही थोडी चिडून म्हणाली.


राघवेंद्र,“ मी तर असंच बुलून गिलू तर तुमी दुगी बी लयच मनावर घिताय. बरं माजं चुकलं. आन मी जातू आता. काम हाय.” तो सुगंधाला खाली ठेवत म्हणाला.


मधुमालती,“ बरं पण जेवायला लवकर या. उगा गावात वेळ करू नका.” ती म्हणाली.


राघवेंद्र,“ व्हय जी बायसाब.” तो हसून म्हणाला आणि निघून गेला.


 मधुमालतीचे मन मात्र अशांत झाले होते. तिने महादेवाला हात जोडले आणि राघवेंद्रच्या दीर्घ आयुष्याची मनोमन प्रार्थना केली. पण तिला ही माहीत होते की किती ही प्रार्थना केली तरी प्रारब्ध टाळता येत नाही. त्यातून पुढे काय होणार हे जर राघवेंद्रला सगळं माहीत होते तर तो असंच काही तरी बोलणार नव्हंता.    

 ★★★


पाच वर्षांनंतर


        दिवस वाऱ्याच्या गतीने पुढे पळत होते. मुलं त्यांच्या कलाने वाढत होती. पृथ्वी कस्तुरीला चिटकला तो चिटकलाच. सुगंधा मात्र मधुमालतीची लाडकी होती. राघवेंद्र आणि बाकी घराले सगळेच तिचा प्रचंड लाड करत होते. महेंद्रप्रतापराव तर तिला गावभर घेऊन फिरायचे. पृथ्वी देखील लाडाकोडात वाढत होता. राघवेंद्रचे राजकारणातील वजन वाढत होते. त्याने आता तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांच्या संस्थेच्या दहावीपर्यंत शाळा सुरू केल्या होत्या त्यामुळे मुलं आणि मुली कमीत कमी दहावी पर्यंत शिक्षण घेत होते. बाकी मूलभूत सुविधा ही तो करतच होता.आता पंचकृषीचा काया पालट होत होता. कृष्णा आणि कोयना नदीचे पाणी त्याने कॅनल व्दारे शेतीसाठी उपलब्ध करून दिलं होतं त्यामुळे छोटे शेतकरी देखील आता संमृद्ध जीवन जगत होते आणि सगळा तालूका सुजलाम सुफलाम झाला होता. लोकं राघवेंद्रची स्तुती करून थकत नव्हते.


राघवेंद्र त्याच्या कामाच्या जीवावर पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आला होता आणि यावेळी त्याला मंत्रिपद देखील मिळाले होते.लेकाचे यश पाहून राधक्का आणि महेंद्रप्रताप भरून पावले होते. सुभानराव देखील नातवाचे यश पाहून तृप्त झाले होते. सगळं सुरळीत सुरू होतं. आता पृथ्वीप्रताप सात तर सुगंधा साडे पाच वर्षांची झाली होती. दोन्ही मुले शाळेत जाऊ लागली होती. पृथ्वी पहिली तर सुगंधा बालवाडीत होती. पृथ्वी तसा शांत होता पण सुगंधा खोडकर होती. शाळेत मुलांच्या खोड्या काढणे मारामारी करणे असे तिचे उद्योग सुरूच असायचे पण अभ्यासात देखील ती हुशार होती.


      राघवेंद्रचा व्याप मात्र वाढत होता. पाच-सहा  शाळांचा कारभार पाहणे. शेतीकडे ही लक्ष द्यावे लागत होतेच कारण महेंद्रप्रतापरावांना आता वयोमानानुसार होत नव्हते तरी ते राघवेंद्रला त्रास नको म्हणून शेतीकडे लक्ष देत होतेच पण त्यांना सगळंच करणे शक्य होत नव्हते. त्यात राघवेंद्रला राजकारणा निमित्त कधी दौऱ्यावर तर कधी मुंबईला जावे लागे. त्यामुळे त्याची चांगलीच दमछाक होत होती. तरी तो वाड्यावर असला की मुलांना आणि मधुमालती आणि कस्तुरीला वेळ देत असे. 


आज राघवेंद्र दहा दिवसाच्या दौऱ्यावरून दिवस मावळायला  वाड्यावर परत आला होता. त्याला पाहून सुगंधा आणि पृथ्वी त्याच्या मागे लुडबुड करत होती. दोघांची शाळेत काय काय झाले हे सांगण्याची चढाओढ लागली होती. आणि राघवेंद्र दोघांचे ही ऐकून घेत होता.


पृथ्वी,“ आबा आज पुन्हा सुगंधाने त्या रमेशला मारलं बघा.माझ्या पण वर्गात येते आणि म्हणते की शाळा आमच्या आबाची आहे. तर आमच्याशी नीट वागायचं आम्ही जहागीरदार आहोत म्हणे. नुसती दादागिरी करते. सांगा जरा हिला.” तो तक्रारीच्या सुरात बोलत होता.


सुगंधा,“ दाद्या त्या रमेशने माझी पेन्सिल घेतली होती. आणि आबा शाळा आपलीच आहे किनाय हो?” तिने निरागसपणे विचारलं.


राघवेंद्र,“ व्हय पर शाळा सरकार चालवतं गंधा आन दादागिरी नाय करायाची सोन्या. आन रमेशनं तुजी पेन्सिल घिलतली तर गुरुजीस्नी सांगायाचं मारायाचं नाय काय.” तो समजावत होता.


सुगंधा,“ बरं पण आबा तुम्हाला धाकलं सरकार म्हणत्यात आणि आजोबांना थोरलं सरकार म्हणजे मग शाळा आपलीच की. आणि आता मी नाही मारणार कोणाला पण या दाद्याला सांगा माझ्या पेन्सिली घेतो आणि माऊकडे माडीवर नेऊन ठेवतो. आणि ती माऊ पण याला काही बोलत नाही.” ती ही तोंड फुगवून तक्रार करत होती.


  राघवेंद्रने मात्र डोक्याला हात लावून घेतला आणि दारात उभं राहून तिघांचे बोलणे ऐकणारी मधुमालती खोलीत आली.


मधुमालती,“  द्या उत्तर आता. बब्बू अगं  तुझे आबा आणि आजोबा सरकार आहेत पण  ते वेगळे आणि तुझे आबा बोलत आहेत ते सरकार वेगळं. तू अजून लहान आहेस बाळा तुला कळणार नाही तू मोठी झाली की कळेल हा. आणि काय रे पृथ्वी लगेच बब्बूची तक्रार करायला लागलास ना आबांकडे. जा दोघे खेळा.” ती म्हणाली.


पृथ्वी,“ आऊ तू मलाच रागवते. मी नाय खेळत हिच्याबरोबर ही चिडीचा डाव खेळते. मी जातो माऊकडे अभ्यास करायला.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.


सुगंधा,“ हा जा जा. मी पण खेळणार नाही तुझ्याबरोबर. आऊ मी जाते अण्णाकडे.” ती ही तोंड फुगवून म्हणाली आणि गेली. पृथ्वी ही गेला.


   राघवेंद्र आणि मधुमालती दोघांचे भांडण पाहून हसत होते. 


राघवेंद्र,“ ही गंधा लय आगाव झाली हाय गं मधू. कोणावर गिली हाय ही पोरगी. शाळेत बी लय आगावपणा करतीया म्हणं. बग कसं पूडंपुडं बुलीत हुती. म्हणं सरकार अपुनच हाय. पृथ्वी तसा शाना हाय  आता भांडल्याती पर जरा येळ गिला का पृथ्वी ईल खाली आन खेळाया माडीवर वर घिवून जाईल हिला.” तो बोलत होता.


मधुमालती,“ आगाऊ नाही माझी बब्बू हुशार आहे.  बघा तुमची बोलती कशी बंद केली तिने.” ती हसून म्हणाली.


राघवेंद्र,“ व्हय बाय हुशार हाय ती बास. मधू मला तुज्या संगट बुलयचं हाय. मला समदं बगनं जमना झालं हाय. शाळा, शेत आन मंत्रिपद दौरं लय वडाताण हुतीया माजी. आन तात्यास्नी बी आता वया परमाण  झेपत नाय बग. मी इचार करत हुतु का त्वां समद्या शाळांचा कारभार बग की.हिवडं शिकली हाईस. पोरं बी मोटी झाल्याती. तुला जमल की समदं.” तो म्हणाला.


मधुमालती,“ हो तुमची होणारी ओढाताण दिसतेय  मला पण मामंजी आणि आत्याना विचारा. ते हो म्हणाले तर मी पाहीन सगळ्या शाळांचा कारभार.” ती म्हणाली.


राघवेंद्र,“ हे बेस हाय बग. मी आज ईचारतु. आई आणि तात्या नाय म्हणायाची नायती.” तो म्हणाला.


  राघवेंद्रला वाटत होते की मधुमालतीने आता त्याला त्याच्या कामात मदत करावी पण महेंद्रप्रतापराव, सुभानराव आणि राधक्का त्याची परवानगी देतील का?

क्रमशः


कथेचा मागील भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग 58

    


 














Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post