माडीवरची बाई भाग 58

 




      चार दिवस असेच निघून गेले. पुन्हा मधुमालती जयसिंगराव आणि मदनला घेऊन जंगलात गेली. बाबांनी पारद शिवलिंग सिद्ध करून ठेवलं होतं.


बाबा,“ हे शिवलिंग हे खास तुझ्या कस्तुरीसाठी दैवी आज्ञेतून तयार केलं आहे. ती जन्मोजन्मीची शिवभक्त आहे. आणि तुम्ही ही पुण्यंवान आहात की तुम्हाला या शिवलिंगाचे दर्शन झाले. हे कस्तुरी नंतर देखील तुझ्या घराण्यात राहील त्याची योग्य पद्धतीने पूजा-अर्चा करा. आणि मी या आधी तुला जे सांगिलं ते लक्षात ठेव.” ते म्हणाले.


मधुमालती,“ हो बाबा.” ती म्हणाली आणि त्यांना वाकून नमस्कार केला. 


  जयसिंगराव आणि मदनने देखील त्यांना वाकून नमस्कार केला.तिघे पुन्हा घरी आले तोपर्यंत राघवेंद्र ही त्या आमदारांचे तिसरे करून घरी आला होता. मधुमलतीने सगळ्यांना पांढऱ्या शुभ्र कापडात झाकून ठेवलेले पारद शिवलिंग काढून दाखवलं. सगळ्यांनी त्याला नमस्कार केला.


सावित्री,“ लय पुण्यवान हाय पोरी आमी तुझ्यामुळं या शिवलिंगाचे दर्शन झालं.” ती कौतुकाने म्हणाली.



   दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच राघवेंद्र, मधुमालती आणि मदन पोरांना घेऊन निघाले. संध्याकाळी ते वाड्यावर पोहोचले. मधुमालतीने राधक्का, महेंद्रप्रतापराव आणि सुभानरावांना पारद शिवलिंग दाखवलं.


मधुमालती,“ आत्या कस्तुरीने मला भजन शिकवलं आहे ना. मग तिची गुरू दक्षिणा म्हणून मी हे पाऱ्याचे शिवलिंग तिच्यासाठी आणलं आहे. खरं तर मी फक्त माध्यम आहे. ते बाबा तिच्यासाठी शिवलिंग बनवून देण्यासाठी इतकी वर्षे वाट पाहत होते. कस्तुरी खूप मोठी शिवभक्त आहे.” ती सांगत होती.


महेंद्रप्रतापराव,“ आपलं पुण्य थोर हाय पोरी तवा महादेव आपल्या घरी आल्याती बग. आन कस्तुरी बी लय पुण्यवान हाय. तिची भक्ती लय मोटी हाय बग.” ते शिवलिंगाला नमस्कार करत म्हणाले.


राधक्का,“ व्हय तर आपल्या घराण्याचा उद्दार हुनार बग.”


सुभानराव,“ हतनं पुडं वाड्यात शिवरात्रीचा मोटा उत्साव करू आपून.जा तिला दिवूनशान यी. लय खुश हुईल बग ती.” ते शिवलिंगाला नमस्कार करत म्हणाले.


मधुमालती,“ हो.अहो  तुम्ही ही चला ना. आन या पृथ्वीला पण घ्या बघा त्याची धडपड माऊला भेटायला.” ती हसून दोन तीन पायऱ्या बसत चढून माडीवर  निघालेल्या पृथ्वीकडे पाहत हसून म्हणाली.


राघवेंद्र,“ व्हय या पृथ्वीनं तर वैताग आणला हाय. निस्ता माऊ माऊ करूनशान. चला पृथ्वीसाब तुमच्या माऊच्या गळ्यात पडा. आन गंधाला बी न्ह्याया पायजेल.” तो पृथ्वीला उचलून घेत म्हणाला. आणि सुगंधाला मधुमालतीने घेतलं.


 दोघे माडीवर गेले. कस्तुरी काही तरी करत बसली होती. पृथ्वीने तिला पाहिलं आणि पळत जाऊन तिच्या गळ्यात पडला तिने ही त्याला छातीशी घट्ट धरलं.


कस्तुरी,“ पृथ्वीसाब मला लय याद आली जी तुमची.” ती भरल्या डोळ्याने त्याचे मुके घेत म्हणाली. 


पृथ्वी,“ माऊ…. तू…..दिशली …नाय… माऊ.” तो तिला बिलगून बोलत होता आणि राघवेंद्र आणि मधुमालती हसून दोघांना पाहत होते सुगंधा मात्र कस्तुरीकडे जायचं नाव घेत नव्हती.ती मधुमालतीच्या कडेवर बसून खेळत होती.


राघवेंद्र,“ झालं का तुमच्या दुका माय लेकाचं भिटूनशान. मधू गंधाला दि माज्याकडं. चल अपुन खाटवर बसून खिळू गं.” तो सुगंधाला म्हणाला आणि ती त्याच्याकडं गेली.


मधुमालती,“ या पोरानं नुसता माऊ कडं म्हणून हैदोस घातला होता कस्तुरी. आता बघ कसं हसायला येतंय लबाड कुठला.” पृथ्वी कस्तुरीच्या कडेवर बसून हसत होता.


कस्तुरी,“ मला बी लय याद आली जी पृथ्वीसाबची.” ती पृथ्वीला कुरवाळत म्हणाली.


पृथ्वी,“ माऊ मंमं..” तो कस्तुरीच्या चेहऱ्याला हात लावून म्हणाला.


कस्तुरी,“ व्हय दिती की माज्या रागुला. माजा राजा आज पाच- सा दिसनं आला गं बाय.” ती पृथ्वीचे मुके घेऊन खाली बसत म्हणाली.


राघवेंद्र,“ मधू आता या दुगाचं  माया पिरिम झाल्यावर मंग दाव त्वां हिच्या सटनं काय अनलया ते.” तो हसून सुगंधाला खेळवत म्हणाला.


मधुमालती,“ हो. आणि मला माहित होतं या दोघांचं हेच सुरू होणार आहे. पाज बाई तुझ्या लेकाला नाही तर तुला आणि त्याला ही चैन पडेल का?” ती म्हणाली तोपर्यंत कस्तुरीच्या मांडीवर आडवा होऊन पृथ्वी दूध प्यायला ही लागला होता.


कस्तुरी,“ माज्या सटनं काय आणलं हाय जी बायसाब?” तिने विचारलं.


मधुमालती,“ होऊ दे तुमच्या दोघांच मग दाखवते.” ती हसून म्हणाली.


      पृथ्वी थोडा वेळ दूध पीत राहिला आणि कस्तुरी त्याला मायेने कुरवाळत राहिली. दूध पिऊन त्याचे पोट भरलं आणि तो ढेकर देत उठून कस्तुरीच्या मांडीवर बसला. तिने त्याचे पदराने तोंड पुसलं. कस्तुरीला भेटून त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो तिच्या गळ्यात हात घालून तिला बिलगून बसला.


मधुमालती,“ तू तुझ्या माऊ जवळच रहा आम्ही काय तुला नेणार नाही आता.” ती हसून म्हणाली.


कस्तुरी,“ माजं पृथ्वीसाब लय शानं हायती. व्हय ना? आन काय आणलं जी तुमी माज्या साटनं?” तिने विचारलं. 


  आणि मधुमालतीने पांढऱ्या शुभ्र कपड्यात गुंडाळलेलं ते छोटे चंदेरी शिवलिंग तिच्यासमोर धरलं.


मधुमालती,“ तुला पारद शिवलिंग हवे होते ना? हे बघ तुला गुरुदक्षिणा म्हणून मी हे घेऊन आले महाबळेश्वरच्या जंगलातून त्या बाबांकडून.” ती म्हणाली.


कस्तुरी,“ पाऱ्याचा महादेव? बाईसाब तुमी माज्या साटनं घिवून आलासा? ते बी रानात जावूनशान? आन त्या बाबांनी दिलं तुमास्नी हे?” ती आश्चर्याने विचारत होती.


मधुमालती,“ हो. तुझ्यासाठी आणलं आहे मी. गुरुदक्षिणा म्हणून आणि त्या बाबांनी तुझ्यासाठी दिलं आहे हे.कस्तुरी तू खूप पुण्यंवान आहेस.” ती कौतुकाने म्हणाली.


 कस्तुरी,“ तुमी हिवडा तरास माज्या साटनं घितला जी? आन म्या कसली जी पुनवान तुमी पुनवान हाय जी.म्या तर तुमास्नी एकदाव बुलता ना बुलून गिली हुती आन तुमी जावूनशान घिवून आला. ते बी माज्या साटनं. लय उपकार झालं.जी माज्यावर.” ती डोळ्यात पाणी आणून शिवलिंगाला नमस्कार करत म्हणाली.


मधुमालती,“ उगा काय तरी बोलू नकोस तू. तू परकी आहेस का? आणि तू माझी गुरू आहेस हे तुला गुरूदक्षिणा माझ्याकडून.” ती शिवलिंग तिच्या हातात देत म्हणाली.


कस्तुरी,“म्या ही तुमची भेट माज्या जिवापल्याड जपिन जी.” ती शिवलिंग कपाळाला लावत म्हणाली.


   त्यानंतर कस्तुरीने शिवलिंग पाटावर ठेवून त्याची पूजा केली. पंधरा दिवस असेच निघून गेले आणि कस्तुरीसाठी एक वाईट बातमी घेऊन तिच्या फडातील एक माणूस आला होता. राधक्काने दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला विचारलं. राघवेंद्र मुंबईला गेला होता.


राधक्का,“ कोण रं त्वां?” 


“ म्या बाळू हाय जी शेवंता बायच्या फडात हरकाम्या हुतु. शेवंता बायच काय खरं नाय जी मालकीणबाय तिनं हरणीला भेटाय साटनं जीव धरूनशान ठिवला हाय जी. हरणीला धाडलं तर बरं हुईल म्या दोन दिसात तिला सुडूनशान जातो जी.शेवटाला माय लेकीची भेट हु द्याजी.” तो हात जोडून अजिजीने बोलत होता.


राधक्का,“आरं देवा! रकमे कस्तुरीला भाईर यी म्हणावं. सांगावा घिवूनशान मुराळी आला हाय तिच्या साटनं.” ती म्हणाली आणि रखमा माडीवर गेली. तोपर्यंत मधुमालती पण बाहेर आली. कस्तुरी मागच्या जिन्याने पुढे आली.


कस्तुरी,“ बाळू त्वां? आय बरी हाय नव्हं?” तिनं काळजीने विचारलं.


बाळू,“ न्हाय बग. तिचं काय खरं नाय हरणे. तिनं तुला भेटाया जीव धरला हाय बग. त्वां भीटली म्हंजी तिचा जीव जाईल बाय.” तो डोळे पुसत म्हणाला आणि कस्तुरी रडायला लागली.


कस्तुरी,“ मालकीणबाय म्या माज्या आयला भेटाया जाऊ का जी? मला जायाचं हाय.” ती रडत म्हणाली.


राधक्का,“ हाय का आता? त्येत ईचारायाचं काय हाय गं? जा की पर रकमीला घिवूनशान जा. आमी कशा पाय माय लेकीची शेवटाच्या वक्ताला ताटातूट करावं गं? जा जा लगोलग कापडं बांद आन तवर म्या रकमीला सांगतु. आन काय तर खायला बी बांदती.” ती म्हणाली आणि कस्तुरी धावत मागे गेली.


 पुढून मधुमालती ही माडीवर गेली. कस्तुरी रडत कपड्याच गाठोडं बांधत होती.


मधुमालती,“ मला माहित आहे तुला समजावनं सोपं आहे पण आपली आई आपल्याला कायमची सोडून जाणार हे दुःख खूप मोठे आहे. पण काही ही झालं तरी ही तुझी सखी तुझ्याबरोबर आहे. जा आईला भेट ही वेळ पुन्हा येणार नाही.” ती तिचे डोळे पुसत म्हणाली आणि कस्तुरीने तिला मिठी मारली.


कस्तुरी,“ व्हय. पर सरकारास्नी सांगा जी मला मापी करा म्हणूनशान म्या त्यास्नी बिन ईचारता जातीया. आन पृथ्वीसाबकडं ध्यान द्या. ते राडत्याली नव्हं.” ती स्वतःला सावरत म्हणाली.


मधुमालती,“ तू कोणाची काळजी करू नकोस. जा तुझ्या आईला भेट आणि स्वतःची काळजी घे.” ती म्हणाली.


  कस्तुरी बाळू बरोबर निघून गेली. ती तिच्या घरी गेली तर बाहेर वडील नेहमीप्रमाणे दारू पिऊन लोळत पडले होते. ती आत गेली तर अंथरुणावर हाडाचा सापळा झालेली शेवंताबाई डोळे झाकून निपचित पडून होती. तिच्या उशाला हौसा बसली होती.


हौसाबाई,“ बरं झालं बाय त्वां आलीस. तुज्या आयचा जीव तुज्या साटनं घुटमळतुया. वाटीत हुतं का तुला सरकार सोडत्याती का नायती. पर आता  तुला बगुनशान शेवंती सुकानं जीव सोडल बग. शेवंता ये शेवंता डोळं उघिड वाईस बग तर कोण आलं हाय त्ये. अगं हरणी आली हाय तुला भेटाया.”



     ती शेवंताला उठवत म्हणाली आणि शेवंताने डोळे उघडले. कस्तुरीला पाहून तिच्या चेहऱ्यावर क्षीण हसू आले.


शेवंता,“ माजी बाय आली. कशी हाय त्वां?” तिने हळू आवाजात विचारलं.


कस्तुरी,“ म्या बरी हाय आय पर त्वां…” असं म्हणून ती तोंडाला पदर लावून रडायला लागली.


शेवंता,“ रडू नगस पोरी. आता तुला बगतलं नव्हं आता म्या मराया मोकळी झाले बाय. तुज्या साटनं थांबली हुती म्या.” ती म्हणाली.


कस्तुरी,“ आयं असं नगु बुलू की गं.” ती हुंदका देत म्हणाली.


शेवंता,“ आता या कुडीत जीव गुदमरतुया बग. बास झालं की भोग आता. त्वां आलीस लय बरं झालं बग. तुज्या संगट नीट वागत्याती नव्हं ती लोकं? आन तुला हितकं दिस झालं मूल बिल ऱ्हायलं नाय व्हय गं? का सरकारांनी पुरलं ….?” ती हळूहळू विचारत होती. पण रखमाला पाहून गप्प झाली. 


कस्तुरी,“ हौसा मावशे त्वां रकमा मावशीला घिवूनशान बाहीर जा मला आयला बोलायाचं हाय.( ती म्हणाली आणि दोघी बाहेर गेल्या. कस्तुरीने दार लावून घेतलं आणि ती शेवंताच्या जवळ बसली.) आय असं काय बी झालं नाय बग. उलाट मला पोरगी झाली हाय सुगंधा नाव हाय तिचं आन ती बायसाब म्हंजी सरकारांच्या बायकूनं पदरात घितली हाय. त्यांची पोर म्हणूनशान लय लाड कारत्याती समदी तिचा. बायसबस्नी पोरंग हाय पृथ्वीसाब ते माज्या जवळ असत्याती बग. मलाच पित्याती.पृथ्वीसाब माजं हायती बग निस्त माऊ माऊ करत्याती. आन समदी माणसं लय चांगली हायती. राधक्का मालकीणबायनी तर माजी संवताच्या पोरी वानी काळजी घितली बाळातपणात ही रकमा मावशी दिमतीला हुती बग. आन बायसाब तर मला सकी म्हणत्याती. तुला सांगतु मला पाऱ्याच शिवलिंग अनुनशान दिलं त्येंनी आन सरकार तर निस्ता जीव ववाळून टाकत्याती माज्या वरून आन मला पुण्यांनदा मुलं व्हाया नगु म्हणूनशान ते म्हामईला जावूनशान अपरेशन करून आलं संवता. म्या लय नशीबवान हाय आयं.” ती शेवंताचा हात धरून बोलत होती.


शेवंता,“ म्हंजी थोरलं सरकार नातीला शिवूनशान फिरत्याती ती तुजी पोरगी हाय? आन धाकल्या सरकारनी आपरेशन केलं फकस्त तुला मुलं हु नै म्हणूनशान? पर त्येंची बायकू काय म्हंली नाय?” तिने आश्चर्याने विचारलं.


कस्तुरी,“ नाय उलटा दोन मुलं बास म्हणल्या बाईसाब. त्या लय चांगल्या हायत्या आयं.” 


शेवंता,“ तुज्या कडनं ही समदं ऐकूनशान म्या भरून पावलु बग. त्वां इवडी सुकात हाईस वाटलं नव्हतं बाय मला. आता म्या जाया मोकळी झालु बग. एकच गुष्ट द्यायाची हुती तुला. हौसाला बुलीव.” तिला आता बोलण्याचा त्रास होत होता.कस्तुरीने तिला पाणी पाजलं आणि  दार उघडून हौसा आणि राखमाला आत घेतलं.


शेवंता,“ हौशे ती कुलूप लावलेली ट्रंक घिवून यी.हरणी ही किल्ली.(तिने तिच्या कनवटीला असलेली चावी थरथरत्या हाताने कस्तुरीला दिली. तोपर्यंत हौसा एक छोटा ट्रंक घेऊन आली.) हरणे ट्रंक उघिड.”


त्या ट्रंकमध्ये काय असेल?

क्रमशः

©स्वामिनी चौगुले


कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग 57
br />

      


 

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post