तिघांना घरी पोहोचायला दुपार कलून गेली होती. सावित्री आणि विमल त्यांचीच वाट पाहत होत्या. नाही म्हणले तरी दोघींच्या चेहऱ्यावर तणाव होता. सुगंधा आजी जवळ बसून मस्त खेळत होती पण विमलच्या कडेवर असलेला पृथ्वी किरकिर करत होता. सावित्रीने तिघांना आलेलं पाहिलं आणि लगबगीनं आतून पाणी जाऊन आणले. पृथ्वी मात्र रडतच मधुमालतीच्या गळ्यात पडला.
पृथ्वी,“ आऊ …. माऊकलं.” म्हणून तो हुंदके देऊन रडत होता.
मधुमालती,“ काय झालं माझ्या सोन्याला? माऊची आठवण येतेय का? आपण जाऊ हा माऊकडे तू रडू नको हा.” ती त्याला शांत करत म्हणाली. ती माऊकडे जाऊ म्हणाली आणि पृथ्वी रडायचा थांबला.
विमल,“ ताईसाब अहो पृथ्वी सकाळपासून नुसतं रडत्याती त्यांनी काय बी खाल्लं नाय आन दूध बी पिलं नाय.नुसतं माऊ माऊ म्हणून रडत्याती.” ती काळजीने बोलत होती.
मधुमालती,“ मला वाटलयचं होतं की हा राहणार नाही कस्तुरीला सोडून. उगीच आणलं बघा याला बरोबर तरी आत्या म्हणल्याच होत्या तसं.” ती त्याला कुशीत घेऊन पदराने त्याचे तोंड पुसत म्हणाली.
सावित्री,“ लय सव झाली वाटतं कस्तुरीची याला बग. बरं मी ताटं वाडायला घिती. तुमी हातपाय धून या. अन पोराला बी काय तर चार बाई. एक तर राघवराव सकाळी गेल्याती अजून त्ये बी नाय आले बग मयतावरून.” ती म्हणाली.
मधुमालती,“ होय मी आलेच वहिनी याला जरा सांभाळा. मी खायला घालते याला.पृथ्वी जा मामीकडं आन रडू नको आपण माऊकडं जायचं हा तुझ्या.” ती त्याला समजावत म्हणाली आणि पृथ्वीने होकारार्थी मान हलवली.
जयसिंगराव, मदन आणि मधुमालती जेवायला बसले. नाही म्हणले तरी तिघांना सडकून भूक लागली होती. मधुमालतीने पृथ्वीला ही जेवायला घेतलं होतं. सुगंधा ही तिचं लक्ष वेधण्यासाठी तिच्या मागेपुढे रांगत होती.
मधुमालती,“ पृथ्वी आपण माऊकडे जायचं हा तुझ्या पण आधी आपण जेवण करायचं मग जायचं. जेव बरं. बब्बू तू इथं ये. माझ्या राणीला आऊ दिसली नाही ना सकाळपासून.” ती एका हाताने सुगंधाला मांडीवर बसवून घेत पृथ्वीला भरवत होती.
सावित्री,“ मालू पोरीला दे माज्याकडं तिला विमलनी चारलं हाय. अजून काय खाती का बगतु मी. तू जेव बाय पोट भर लय दमला हाय तुमी.” ती म्हणाली आणि तिने सुगंधाला तिच्याकडून मांडीवर बसवून घेतलं.
जयसिंगराव,“ दमल नाय तर काय हुईल दोन तीन मैल अवघड वाट चालली नव्हं जंगलाची.”
विमल,“ भेटलं का साधू बाबा? आन काय म्हणलं? काय काम हुतं तुमचं ताईसाब त्यांच्याकडं?” तिने उत्सुकतेने विचारलं.
मधुमालती,“ भेटले आणि मला पारद शिवलिंग बनवून हवे होते त्यांच्याकडून कस्तुरीसाठी. तर देतो म्हणाले चार दिवसांनी बोलावलं आहे पुन्हा.” ती म्हणाली.
सावित्री,“ काय? ते तुला शिवलिंग बनवून देणार हायती? बाय बाय नशीब काडलं पोरी तू? जी बी त्यांच्याकडं जातया त्येंना ते हलकून देत्याती. आज पातूर फकस्त एकाला बनवून दिलं हाय म्हणं त्येंनी ते.” ती आश्चर्याने बोलत होती.
जयसिंगराव,“ एवढंच नाय ते म्हणलं का ते हिचीच वाट बगत हुतं. हिच्याकडून कस्तुरीला शिवलिंग बनवून द्याया साटनं. कस्तुरी सादी नाय ही मला म्हैत हुतं. पुण्यवान हाय ती तवाच अंगाला सुवास हाय नव्हं तिच्या. तू आन राघव लय भाग्यवान हाय पोरी. राघवला तिनं निवडला हाय हे त्येचे पुण्य हाय. पारद शिवलिंगाचं दर्शन सुदीक लय पुण्य असल्यावर हुतया. आन अमास्नी बी तुज्या आन कस्तुरीमुळं ते हुनार बग. आन त्येची पूजा कराया मिळाली म्हंजी जलम सफल हुनार.त्वां बी रोज पूजा करीत जा तिच्या संगट. आंदी मला तुझा बाप म्हणूनशान राग आला हुता राघवचा का तर त्येनं माज्या लेकीला सवत आणली पर कस्तुरी तुमच्या घरात येणं म्हंजी जहागीरदारांची पूर्व पुण्याई बग.” ते मनापासून बोलत होते.
मदन,“ होय बगा काका अक्षी बरुबर हाय तुमचं. राघव नशीबवान हाय. तवा कस्तुरी आन वैणीसाब वानी समजदार आन सवती साटनं जंगलात जाणारी बायकू त्येला भेटली.” तो म्हणाला.
‛ ते नाही तर मी नशीबवान आहे. कस्तुरीच्या अंगाचा सुगंध आणि तिची शिवभक्ती सगळ्यांना दिसते त्यामुळे ती असाधारण आहे हे सगळ्यांना लगेच कळते किंवा पटते पण हे अगदी सामान्य मनुष्य वाटतात पण ते असामान्य आहेत हे कोणाला नाही कळत. त्यांना पुढे काय होणार हे माहीत आहे पण कोणाला सांगू शकत नाहीत. अगदी सामान्य मनुष्य म्हणून जगतात पण त्यांचे असामान्यत्व आज मला पटले आहे. मी भाग्यवान तर आहेच.’ ती तिच्याच विचारात गुरफटली होती.आणि तेवढ्यात सावित्रीने तिला हाक मारली.
सावित्री,“ ध्यान कुटं हाय मालू तुजं अगं किती येळ झालं ईचारतीया इमला का तुला कोरड्यास(सुकी भाजी)वाडू का? पृथ्वी बी भुक्याजला हाय त्यो आ करून बसला हाय घास चारशील म्हणूनशान तर तुजं ध्यानात नाय.” ती थोडी रागावून म्हणाली.
मधुमालती,“ हुंम वहिनी थोडी भाजी वाडा आणि पृथ्वी हे घे खा बाळा. आई हे अजून कसे आले नाहीत गं? मयतिला इतका वेळ लागतो का? सकाळी न्याहरी पण करून गेले नाहीत बग हे.” ती काळजीने बोलत होती.
सावित्री,“ अगं जवळ पास नातेवाईक असत्याल नव्हं त्येची वाट बगून मग नेणार मयत. आता येत्याल बग ते. आन आलं की अंघुळ झाली की जेवाया वाड त्येंसनी.” ती म्हणाली.
तिघांची जेवणं झाली. पृथ्वी दमला होता आता त्याच्या पोटात भर पडली आणि तो झोपून गेला. सुगंधा झोपून उठली होती ती खेळत होती. मधुमालती खरं तर दमली होती. तिला झोपावेसे वाटत होते पण ती राघवेंद्रची वाट पाहत दिवाणखान्यात बसली होती. तोपर्यंत राघवेंद्र आला. विमलने चुलीवर पाणी गरम करून त्याला अंघोळीला दिलं. तो अंघोळ करून आला तोपर्यंत मधुमालतीने जेवणाचं ताट वाढलं होतं. ती त्याच्यासमोर जेवण वाढायला बसली.
मधुमालती,“ अचानक आमदार साहेबांच असं कसं झालं हो? गेल्या वेळी भेटले तेंव्हा तर चांगले होते.” तिने विचारलं.
राघवेंद्र,“ काय नाय सकाळी समदं आवरूनशान न्याहारीला बसलं हुतं म्हणं तर छातीत कळ आली आन गेलं ते.” तो जेवत सांगत होता.
मधुमालती,“हुंम!वय ही झालतं म्हणा.”
राघवेंद्र,“ व्हय. आन ते बाबा भेटलं का? काय म्हणलं गं? ते पाऱ्याच शिवलिंग करून दितु म्हणलं का?” त्याने विचारलं.
मधुमालती,“ हो.चार दिवसांनी बोलावलं आहे. तुम्ही जेवा आणि खोलीत जाऊन आराम करा.”
राघवेंद्र,“ व्हय. त्वां बी आराम कर वाईस.दमल्यावानी दिस्तीयास.” तो म्हणाला.
मधुमालती,“ हो.”
मधुमालती त्याच्याशी बोलत होती पण तिची नजर मात्र त्याच्यावर खिळली होती. ती वेगळ्याच तंद्रीत त्याला न्याहाळत होती. राघवेंद्रच्या ते लक्षात आले होते पण तो काहीच बोलला नाही.
संध्याकाळच्या वेळी कारखान्यातून मधूमालतीचा भाऊ आला.सगळे गप्पा मारत बसले. दिवसभर शाळेत गेलेली विमलची पोरं आता पृथ्वी आणि सुगंधाबरोबर खेळत होती. त्यामुळे पृथ्वी थोडा रमला होता. रात्रीची जेवणं झाली आणि सगळी निजानीज झाली. मधुमालतीने पोरांना झोपलं. राघवेंद्र खाटवर काही तरी वाचत बसला होता आणि मधुमालती त्याच्याकडे एकटक पाहत विचारात गढली होती. त्याचे लक्ष तिच्याकडं गेलं आणि राघवेंद्र तिला म्हणाला.
राघवेंद्र,“ मधू काय बगतीयास किती येळ झालं?” त्याने विचारलं आणि मधुमालती त्याच्याजवळ गेली ती त्याच्या डाव्या हातावर डोकं ठेवून त्याला मिठी मारून झोपली.
मधुमालती,“ काही नाही. ते मला आज तुमच्या जवळ झोपायचं आहे.” ती त्याच्या डोळ्यात पाहत बोलत होती.
राघवेंद्र,“ मला तर वाटलं हुतं का आज लय दमली हाईस त्वां. पर त्वां तर..” तो हसून तिला जवळ घेत म्हणाला.
मधुमालती,“ तुमचं काही ही असतं बघा; मला फक्त तुमच्या मिठीत झोपायचं आहे.” ती लाजून म्हणाली.
राघवेंद्र,“ बरं. पर मधू आज तुजी नजर येगळी वाटतीया मला. त्या साधू बाबांनी काय सांगटलं हाय का तुला?” त्याने विचारलं.त्याच्या या प्रश्नाने ती थोडी गोंधळली
मधुमालती,“ अं … नाही ओ. मी ना आज खूप खुश आहे. मला धाकधूक होती की ते बाबा ते शिवलिंग मला बनवून देतील की नाही म्हणून. पण ते हो म्हणाले. कस्तुरी खूप खुश होणार आहे पारद शिवलिंग पाहून.” ती विषय बदलत म्हणाली.
राघवेंद्र,“ व्हय तर. त्वां एक येडी आन ती धा येडी. तिला महादेव पायजेल ते बी पाऱ्याचा आन त्वां बी गिली रानात त्यो अनाया. मला मातूर घरी इव पातूर घोर लागला हुता. का काय झालं असलं म्हणूनशान. हा ते बाबा तुला दिनार शिवलिंग वाटत हुतं.” तो तिच्या केसातून हात फिरवत बोलत होता पण मधुमालती मात्र त्याच्या चेहऱ्याकडे पाहत तिच्याच विचारत गढली होती.
‛साधू बाबा म्हणाले की यांना पुढं काय घडणार ते माहीत आहे.सगळं माहीत असून ही हे इतकं कसं माहीत नसल्यासारखे वागू शकतात? आणि जर कस्तुरी यांचे जन्मजन्मांतरीचे प्रेम आहे त्यांची ती अर्धांगिनी आहे तर मग माझ्याबद्दल यांच्या मनात प्रेम असेल की नुसती कर्तव्य भावना?’
राघवेंद्र,“ मधू अगं मी एकलाच बडबडतुया किती येळ झालं.ध्यान कुटं हाय तुजं? आज काय तर बिनासलं हाय बग तुजं.काय झालं हाय मधू?” तो तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला आणि ती भानावर आली.
मधुमालती,“ काही नाही हो. आज पृथ्वी खूप किरकिर करत होता. सारखं माऊ कडं म्हणून रडत होता. मी येऊ पर्यंत त्याने काही खाल्ले ही नाही. त्याचाच विचार करत होते. त्याला आपण सोडून यायला हवं होतं. आता तुम्हाला ही तिसरा दिवस होऊ पर्यंत थांबवं लागेल ना त्या आमदार साहेबांचा. पृथ्वीला तीन चार दिवस सांभाळणे म्हणजे अवघड आहे.” ती विषय बदलत म्हणाली.
राघवेंद्र,“ अगं बारका हाय त्यो आन कस्तुरीचा लय लळा हाय त्येला. त्येला माऊकडं जाऊ म्हणूनशान थोपीव. दोन दिस सतवल आन मग रमल बग हतं.” तो तिला समजावत म्हणाला.
मधुमालती,“ हुंम तसंच करते. एक विचारू तुम्हाला? खरं उत्तर देणार का?” तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं.
राघवेंद्र,“ इचार की आन खोटं कशापाय बोलू मी तुज्या संगट? कदी बोललु हाय का मी लबाड तुला?” तो म्हणाला.
मधुमालती,“ तुमचं माझ्यावर खरंच प्रेम आहे की माझ्याबरोबर फक्त कर्तव्य म्हणून तुम्ही राहता?”तिने त्याला रोखून पाहत विचारलं.
राघवेंद्र,“ आता ही अजून हाय नवं? मधू हतकी वरीस झालं आपून संसार करतुया. तुला मी किती येळा सांगटलं हाय का माजं तुज्यावर पिरिम हाय. पर तुला माज्यावर ईश्वासच नाय बग. काय झालं हाय मधू? ते बाबा काय म्हणलं हायती का तुला? तुजी नजर आज येगळीच वाटतीया.आन आता ह्यो सवाल. मी काय करू म्हंजी तुला ईश्वास बसल का माजं तुज्यावर पिरिम हाय म्हणूनशान. आता त्वाचं सांग?” तो नाराजीने बोलत होता.
मधुमालती,“ तसं नाही हो माझा तुमच्यावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास आहे आणि काही करायची गरज नाही तुम्हाला.मीच वेडी आहे. तुमच्यासारखा नवरा माझ्यासारख्या सामान्य बाईला मिळाला आहे ना मग माझ्या मनात प्रश्न येतो. आणि माझं तर तुमच्या वर खूप म्हणजे खूप प्रेम आहे.” ती म्हणाली. आणि राघवेंद्र हसायला लागला.
राघवेंद्र,“ माज्यावानी म्हंजी? मी काय सवरगातून जिमनीवर उतरलु हाय व्हय गं? मी बी माणूस हाय तुज्यावानी. आन त्वां सामान्य हाईस? असं कुणी सांगटलं तुला मधू? त्वां लय खास हाईस माज्या साटनं.” तो म्हणाला आणि त्याने तिचा ताबा घेतला. तीही अलगद त्यांच्या स्वाधीन झाली.
‛ तुम्ही सामान्य नाहीत. पण मला माहित आहे तुम्ही हे कबूल करणार नाही आणि मीही तुम्हाला काही विचारणार नाही त्याबद्दल कारण मला तुमच्यावर कोणतेही संकट येऊ द्यायचं नाही. बाबांनी काय सांगितलं ते मी कधीच कोणाला सांगणार नाही.कारण तेच आपल्या सगळ्यांच्या भल्याचे आहे.’ तिने हा विचार करून तिने तिचे मन शांत केले आणि राघवेंद्रबरोबर समरस झाली.
नाही म्हणले तरी मधुमालतीने स्वतःचे मन शांत केलं होतं. तरीही पुढे काय घडणार आहे याची मात्र तिच्या मनात हुरहूर लागून राहिली होती. राघवेंद्रला मात्र काय माहित आहे किंवा कोणत्या घटना घडणार आहेत हे राघवेंद्रला माहीत असले तरी मधुमालती त्याला त्याबद्दल काहीच विचारणार नव्हती.पण एक मात्र नक्की होतं की दहा बारा वर्षानंतर काही तरी मोठं घडणार होते आणि त्याची सुरुवात व्हायला प्रारंभ झाला होता. शेवटी प्रारब्ध कोणाला चुकणार होते?
क्रमशः
©स्वामिनी चौगुले
कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
