माडीवरची बाई भाग 51

 




   राघवेंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी मदनबरोबर मुंबईला निघून गेला. तो आठ दिवस मुंबईत राहणार होता. मधुमालती नेहमीप्रमाणे कस्तुरीकडे भजन शिकायला गेली. आता तिला राग, आलाप आणि बाकी गोष्टी चांगल्याच जमू लागल्या होत्या. ती पेटी वाजमायला ही शिकली होती आणि बरेच हिंदी, मराठी भजन, अभंग, दोहे तिचे पाठ झाले होते. आता तिचे गाण्यातील शिक्षण जवळजवळ पूर्ण होत आले होते. 


  मधुमालती दोन्ही मुले घेऊन माडीवर गेली तर कस्तुरी ज्ञानेश्वरी वाचत होती. तिने मधुमालतीला पाहिलं आणि अध्याय पूर्ण झाला म्हणून ज्ञानेश्वरी व्यवस्थित ठेवू लागली तर पृथ्वीने पाठी मागून जाऊन तिच्या गळ्यात त्याचे चिमुले हात घातले आणि तिच्या पाठवर चढला. सुगंधा तिथेच खेळत होती.


मधुमालती,“ तू दिसलीस की हा दम काढत नाही बघ कसा पाठीवर चढला तुझ्या.”


कस्तुरी,“ व्हय मग आता मी आन पृथ्वीसाब पोतं घ्या पोतं खेळणार. होय ना पृथ्वीसाब?” तिने पाठीवर चढलेल्या पृथ्वीकडे मागे वळून विचारलं.


पृथ्वी,“ माऊ… मंमं… पायजे.” तो लाडात येऊन तिच्या पाठीवरून उतरला आणि तिच्या मांडीवर येऊन आडवा झाला.


मधुमालती,“ घ्या आता बघा या माय-लेकाचे लाड. मी तोपर्यंत सुरपेटी घेते. बब्बू तू इथंच खेळ आ हा घे खुळखुळा.” ती उठून; बसलेल्या सुगंधाच्या हातात खुळखुळा देत म्हणाली आणि तिने सुरपेटी घेतली.


   मधुमालती सुरपेटीवर सूर पाहून आलाप घेऊन घसा साफ करत होती. तोपर्यंत पृथ्वी उठला आणि कस्तुरीच्या मांडीवर बसून त्याने ढेकर दिली आणि कस्तुरीने त्याचे तोंड पुसले.


पृथ्वी,“ माऊ पोतं … पोतं..” तो तिच्या चेहऱ्याला हात लावून लाडात येऊन बोलत होता.


कस्तुरी,“ आता नाय बाळा. आता दुद पिलं कनाय तुमी? आता खेळायाच बगा सुगंधा कशी खिळतीया. ही घ्या गाडी आन खेळा बरं तुमी बी.” ती त्याच्या हातात लाकडी बैलगाडी देत म्हणाली.


पृथ्वी,“ बलं. ” तो शहाण्या मुलासारखं म्हणाला.


मधुमालती,“ हे बरं आहे कस्तुरी तू काही सांगिलं की हा लगेच ऐकतो. मी किंवा आत्याबाईंनी काही सांगितले तर ऐकत नाही.” ती तोंड वाकडं करत म्हणाली.


कस्तुरी,“ तुमी नीट नाय सांगत माजे पृथ्वीसाब लय शाने हायती.” ती मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होती.


मधुमालती,“ हो ना. आगाऊ उठला.  बरं ऐक ना आज काय शिकायचं नवीन?” तिने विचारलं.


कस्तुरी,“ तुमचं समदं शिकूनशान झालं हाय जी. पर माजं अजूनशान  शिक्षाण सुरू हाय. सरकार अब्यास सांगूनशान गिल्याती. म्या नाय किला तर माजं काय खरं नाय बगा. आता काय ते गुण्या आन भागा माज्या तर डोस्क्यात घूशीत नाय. आन इवडं शिकूनशान म्या काय करणार जी? पर आपला महादेव ऐकतुया व्हय!” ती तक्रारीच्या सुरात बोलत होती.


मधुमालती,“ अगं शिकलेलं कधीच वाया जात नसते आणि अक्षर ओळख तू किती लवकर शिकली. शिवलीलामृत, ज्ञानेश्वरी किती मन लावून वाचतेस तशी हुशार आहेस तू कस्तुरी. एकदा मन लावून शिक मग बघ कशी झटपट आकडेमोड शिकशील. जाऊदे आज आपण गप्पा मारू मी तुला उद्या शिकवते गुणा आणि भाग. कस्तुरी तुला एक विचारू?” ती बोलत होती.


कस्तुरी,“ व्हय आज अपुन बुलत बसू आन ईचारायचं काय त्येत ईचारा की जी.” ती हसून म्हणाली.


मधुमालती,“ तुला शिवभक्तीची गोडी कशी लागली गं?”


कस्तुरी,“ ते व्हय मला बी म्हैत नाय जी. पर म्या लहानी हुतू तवा पासनं मला महादेव माजा वाटायाचा.म्या असल धा-बारा वारसांची  एकदाव एका जत्रंत मला देवळात अस्तुया तसा महादेव दिसला म्हंजी पिंड वं म्या हट्टानं घितली ही पिंड आयकडून आन आमच्या गावच्या  देवळात जावूनशान कशी पुजायाची ते समदं गुरुजीस्नी ईचारून आले त्येंनी बी कौतिकानं सांगटलं मला समदं. तवा पसनं ह्यो महादेव माज्या बरुबर हाय जी. आन तुमास्नी म्हैत हाय का? जावळीच्या जंगलामंदी एक बाबा हायती म्हणं त्येंना म्हणं पाऱ्याचं शिवलिंग बनिवता येतया. आन कुणा शिव भक्ताला त्येंनी दिलं हाय जी बनवुनशान. म्या एकदाव गावच्या महादेवाच्या देवळात सप्ता बसला हुता तवा त्या महाराजांकडूनशान ऐकलं हाय जी. का पाऱ्याच्या शिवलिंगाची पूजा किली म्हंजी लय पुण्य मिळतंया म्हणं पर त्ये कुणालाबी मिळत नसतंया म्हणं.” ती लहान मुलीसारखं डोळे विस्फारून हळू आवाजात सांगत होती.


मधुमालती,“ होय त्या बाबांबद्दल मीही ऐकून आहे गं. म्हणजे शिवभक्ती आमच्या कस्तुरीला या सुवसासारखी  जन्मापासूनच मिळालेली आहे तर. काही पण म्हण कस्तुरी तुज्या जवळ आलं की मन प्रसन्न होतं. तुजा दरवळ आणि तुझा हा सात्विक चेहरा पाहिला की मन अगदी शांत होतं.” ती तिचा हात धरून कौतुकाने बोलत होती.


कस्तुरी,“ काय जी बायसाब तुमी बी उगा कौतिक करतासा….” ती पुढे बोलणार तर सुगंधाबरोबर खेळून कंटाळलेला पृथ्वी पुन्हा कस्तुरीजवळ आला.


पृथ्वी,“ माऊ.. पोतं.. पोतं…खेलाय..” तो बोबडं बोलत तिच्यासमोर येऊन म्हणाला.


कस्तुरी,“ व्हय जी पृथ्वीसाब चला खेळू.” ती हसून म्हणाली.


  पण मधुमालतीच्या मनात मात्र कस्तुरीचे शब्द घोळत राहिले.

★★★


   आठ दिवस असेच निघून गेले आज दुपारी राघवेंद्र मुंबईहून घरी आला होता. त्याने येऊन जेवण  आटपले आणि झोपून गेला.काही लोकं त्याला भेटायला आली होती पण राधक्काने तो आजच मुंबईवरून आला आहे तर आराम करतोय भेटायला उद्या या म्हणून घालवून दिले होते. राघवेंद्र गाढ झोपला होता आणि त्याला जाग आली ती कोणी तरी त्याच्या पोटावर बसून त्याला उठवत होते त्यामुळे. छोटा पृथ्वी खाटवर चढून त्याच्या पोटावर बसला होता आणि त्याला हलवत होता.


पृथ्वी,“ आ…बा… आबा..” तो त्याला हाक मारत होता तो उठत नाही ते पाहून आता चिडून त्याच्या तोंडावर मारायला लागला. राघवेंद्रने त्याला दोन्ही हातात उचलले आणि तो उठून बसला.


राघवेंद्र,“ किती चिडतायसा पृथ्वीसाब. मी तुमस्नी घितलं नाय म्हणूनशान.” तो हसत त्याला बोलत होता.तोपर्यंत राधक्का तिथे आली.


राधक्का,“बग तुला उटवायला ह्यो ईल म्हणूनशान म्या चौकात खेळवीत बसली हुती बग ह्येला आन ह्यो आला माजी नजर चुकवुनशान बेनं लय आगाव झालंया.” ती बोलत होती.


राघवेंद्र,“ अगं कडूसं पडलं की आई. आन ह्यो कसला चिडला हाय बग मी घितलं नाय आन खेळलु नाय तर. चला पृथ्वीसाब अपुन त्वांड हातपाय धु आन बाहीर खेळू. गंधाला बी घुवू.” तो त्याला कडेवर घेऊन बोलत होता.


राधक्का,“ आरं पर वाईस काय तर खा मंग जा पोरं घिवूनशान बाहीर.” 


राघवेंद्र,“ नगु मला. जरा येळनं जेवान करतू. त्वां मधूला पिटलं भाकर कराया सांग. बाहीरच जेवाण खावूनशान कट्टाळा आलाया.मी पोरं घिवूनशान माडीवर जातू वाईस अन मग खेळतु बाहीर यांच्याबरुबर गंध कुटं हाय?” तो बोलत होता.


राधक्का,“ सुगंधा हाय रकमा जवळ बाहीरच. आन तुज्या बानं वशाट(मटण) अनलंया.मधू त्येचं करतीया. पिटलं-भाकर उद्या करतू.” ती म्हणाली.


राघवेंद्र,“ बरं.” तो बोलून निघून गेला.

★★★


    संध्याकाळी जेवणं वगैरे झाल्यावर मधुमालतीने  सुगंधाला झोपवून पाळण्यात व्यवस्थित झोपवले तर पृथ्वीला थोपटून झोपवलं. तोपर्यंत राघवेंद्रही खाटवर पडला होता डोळे बंद होते पण मनात मात्र विचरांचे काहूर होते. त्याला मधुमालतीशी बोलायचं होतं पण कसं बोलावे कळत नव्हतं. तो मनोमन शब्दांची जुळवाजुळव करत होता. आणि मधुमालतीने त्याला हळूच विचारलं.


मधुमालती,“ अहो झोपलात काय?” तिच्या आवाजातील बदल आणि लाडात येऊन  विचारण्याची पद्धत आता सगळं राघवेंद्रला कळू लागलं होतं. तो गालात हसून डोळे उघडून उठून तिच्याकडे पाहत तिच्या जवळ जात म्हणाला.


राघवेंद्र,“ नाय वाट बगत हुतु पोरं निजायाची.” 


   त्याने बसलेल्या मधुमालतीला अलगद अंथरुणावर झोपवले.पुढचा  बराच वेळ नुसता मधुमालतीच्या बांगड्यांचा आवाज येत होता तर मध्येच तिच्या अस्फुट हुंकाराचा. बऱ्याच वेळाने दोघे तृप्त झाले आणि ती राघवेंद्रच्या बाहुपाशात विसावली होती.तिचे डोळे झाकलेले होते. जणू प्रणयाची धुंदी अजून उतरली नव्हती. राघवेंद्र तिच्या मोकळ्या लांब सडक केसातून हात फिरवत होता.आणि त्याच्या दुसरा हात मधुमालतीच्या हाताशी चाळा करत होता.


राघवेंद्र,“ खुश ना?” त्याने हसून विचारलं.


मधुमालती,“ हुंम! एक तर तुम्ही आमदार झाल्यापासून आठ आठ दिवस घरी नसता आणि असला तरी तुम्हाला वेळ नसतो. मला ही माझा नवरा हवा असतो ना.” ती थोडं तक्रारीच्या सुरात बोलत होती.


राघवेंद्र,“ व्हय का? म्हंजी आता ध्यान द्यावं लागलं आमच्या मधुबायसाब कडं कंदी नाय ती तक्रारी आली नव्हं.” तो हसून खोडसाळपणे म्हणाला.


मधुमालती,“ हो मग द्यावेच लागेल.बायको आहे मी आमदारसाहेबांची.” ती हसून त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाली.


राघवेंद्र,“ हुंम बराबर हाय. पर एक ईचारु का मधू? तुला अजून पोरं पायजेल का गं?” त्याने विचारलं आणि मधुमालतीने त्याच्याकडे मान वर करून पाहिलं.


मधुमालती,“ असं काय विचारताय हो? आणि हे सगळं काय मुलं हवीत म्हणूनच करतात का? प्रेम आहे म्हणून ही करतात ना हे.” तिने त्याला त्याच्या डोळ्यात पाहत उलट विचारलं.


राघवेंद्र,“ तसं नाय गं. पिरिम तर हायच की पर सांग की तुला अजून पोरं पायजेल का? मी लय दिस झालं एका कोड्याचं उत्तार हुडकीत हुतु आन त्येचं उत्तार गावलं हाय म्हणूनशान ईचारतुया तुला अजून मुलं पायजेल हायती का?नीट इचार करूनशान मला सांग.” तो गंभीरपणे बोलत होता आणि मधुमालती उठून बसली.


मधुमालती,“ कसलं कोडं? कसलं उत्तर? जरा समजेल असं बोला ना?”


राघवेंद्र,“ मी समदं सांगतु.त्वां रागाला तर नाय ना येणार?मला म्हैत हाय तुला वाटलं का मी फकस्त कस्तुरीचा इचार करतुया. पर तसं नाय हाय. तुला अजून मुलं पायजेल अस्त्याली तर ..!” तो उठून बसत बोलत होता.


मधुमालती,“ तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही आणि कस्तुरीच काय आता? नीट सांगा मला तुमच्या मनात काय सुरू आहे ते.” तिने त्याला रोखून पाहत विचारलं.


राघवेंद्र,“ म्हंजी कस्तुरीला आता मुलगी झाली. त्वां मला सात दिली म्हणूनशान तात्या आन अण्णांनं त्येंची जुनी रीत मोडली.  अन त्वां गंधाला मोट्या मनानं पदरात घितलीस पर पुण्यांदा तिला दिस गिल म्हंजी? तात्या आन अण्णा ऐकत्याली का? आन तिला पोरगं झालं म्हंजी त्येला पांजर पोळात सुडणार. आन पोरगी झाली तरी बी मधू त्वां पुण्यांदा ती का पदरात घ्येवी गं? त्वां का मन मटं  करावं. आन तसं झालं तर मी आन कस्तुरी बी तुजा फायदा घितुया असं व्हानार नाय का? आदीच माज्या मनात तुज्यावर आन तिज्यावर बी अन्याव केल्याची सल काट्यागत टुचतीया. म्हणूनशान तुला ईचारतुया मी; का तुला अजून मुलं पायजेल का? कारान मला आता कस्तुरीला मुलं हु द्यायाची नायती. पर कसं हे कोडं हुतं माज्या साटनं पर आता त्येचं उत्तार मला मुंबईला गिल्यावर गावलं हाय बग. पर त्यो उपाय करायाच्या आंदी तुला अजून मुलं पायजेल का हेचा इचार कराव लागतुया कारान त्यो उपाय किला तर तुला बी मुलं हुनार नायती मधु.” तो बोलत होता.


मधुमालती,“ बाप रे! मी तर इतका पुढचा विचारच केला नव्हता की. पण तुम्ही किती विचार करता हो. म्हणून इतके दिवस झालं तिच्याकडं गेला नाहीत तर. पण असा कोणता उपाय तुम्हाला मुंबईत मिळाला आहे ते सांगा आधी मला?” तिने त्याच्याकडं काळजीने पाहत विचारलं.


राघवेंद्र,“ त्ये मी मुंबईला सारकं जातूया नव्हं तवा बाकी आमदार बी भेटत्याती. त्यांचेतले काय माजं मैतर झालं हायती. मुंबईचंच एक आमदार हायती सुधीर काळे म्हणूनशान तर त्येंना चार मुलं हायती आन अजून मुलं नगु हुती पर बायकू पसनं लांब ऱ्हानं बी अवगाड हाय नव्हं. तर त्येंचा एक मैतर लंडन मंदी डॉक्टर हून आला हाय. त्येचा मोटा दवाखाना हाय मुंबईत. आता नवं आपरेशान आलं हाय पुरुषां साटनं ते किलं का मुलं हुतं नायती म्हणं. त्येला नसबंदी म्हणत्याती. ते आपरेशान काळे सायबांनी करूनशान घितलं हाय वरीस झालं. त्ये डॉक्टरास्नी मी बी भिटलु हाय या खेपंला. आन त्वां बी त्ये मी तुला अनुनशान दिलल्या इंग्रजी मासिकात वाचला हाईस की लेक. म्हणूनशान मी ईचारतुया का तुला अजून मुलं पायजेल का?” त्याने तिला सगळं सांगून टाकलं.


मधुमालती,“ वेड लागलं आहे का तुम्हाला? आणि ती शस्त्रक्रिया करताना तुम्हाला काही झालं म्हणजे? आणि असला अघोरी उपाय घारातले तुम्हाला करू देणार आहेत का?” तिने त्याला थोडं रागाने विचारलं.


राघवेंद्र,“ यात समद्या घरातल्याचा काय बी संबंद नाय मधु. ह्यो सवाल फकस्त तुजा आन माजा हाय व्यक्तिगत समाजलं तुला? आन त्वां हितकी शिकली सवरलेली बाय आन तुला भ्या वाटाया लागलं तर बाकी अडाणी बायांच काय? मधू काळ बदतुया. आन चांगल्या गुष्टी बी त्याबरुबर आपल्या हतं येत हायत्या तवा अपुन बी इचार कराया पायजेल की त्या गुष्टीचा. आन मी काय लगोलग नाय चाललंलु आपरेशन कराया. त्वां जवर व्हय म्हणत नाय तवर मी काय बी करायाचू नाय. आन म्हणूनशान मी ईचारलं नव्हं का तुला अजून पोरं पायजेती का? तुजा हाक हाय त्यो.” तोही थोडा रागानेच तिला म्हणाला.


मधुमालती,“ आणि उद्या सगळ्यांनी विचारलं की मुलं का होत नाहीत? तर काय उत्तर देणार आहात तुम्ही? आणि कस्तुरीचे काय?माझा हक्क आहे तुमच्यावर म्हणता मग तिचा नाही का? की तिचे मत तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही.” ती आता भांडायला लागली होती.


राघवेंद्र,“ काय उत्तार द्यायाचं समद्यास्नी ते तवाच्या  तवा बगू. आन कस्तुरीला मुलं व्हाया नगु म्हणूनशानच ह्यो समदा आटापिटा हाय नव्हं. काराण कस्तुरी साटनं मुलं हुनं ही सुकाची नाय तर दुकाची गुष्ट हाय.आदीच मी लय पाप केलं हाय. तुमच्या दुगीस्नी बी माज्यात अडकून ठिवलं हाय. ना धड आड ना हिर तवा मला अजूनशान पापाच धनी करू नगासा. त्वां इचार कर थंड डोसक्यानं आन मला सांग. तुला अजून मुलं पायजेल का नाय?” तो डोळ्यातले पाणी अडवत म्हणाला आणि जाऊन खाटवर झोपला.


  मधुमालती मात्र विचारात पडली होती. तिला काय बोलावे आणि काय निर्णय घ्यावा काहीच कळत नव्हतं. 

©स्वामिनी चौगुले

क्रमशः

खरं तर त्या काळी नसबंदी ही आजच्या इतकी सरळ साधी गोष्ट तर नव्हती. पण 1954 मध्ये भारतात पुरुषांच्या नसबंदीची शस्त्रक्रिया केली जात होती. खरं तर राघवेंद्रचा स्वतःची  नसबंदी करून घेण्याचा विचार काळाच्या खूप पुढचा होता.कारण त्याकाळी अशा गोष्टींना लोकं घाबरत होती.

  

कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग 50

 








Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

3 Comments

  1. Raghvendra ajun kiti vela kadturisathi madhula compromise karayla lavnar ahe. Bichari madhu ata kasturimule madhula anakhi apatya sukhapasun vanchit rahave lagel

    ReplyDelete
  2. Kasturichya mulanchya nashibi vait yeu naye mhanun madhuchya nashibatali mule kadhun ghene navhe ka he.

    ReplyDelete
    Replies
    1. तुमच्या कमेंटबद्दल धन्यवाद🙏तुमच्या विचारांशी मी सहमत आहे. पण नाण्याला दुसरी बाजू ही असतेच ना? मधुमालतीला राघवेंद्रने विचारलं आहे . तिच्यावर हा निर्णय लादला नाही. आणि मधुमालतीचे विचार काय आहेत हे देखील महत्वाचे आहेच ना? तिला मुलं किती हवीत हा सर्वस्वी तिचा निर्णय असणार आहे आणि त्या मागची कारण मिमांसा ही होणार आहे.

      Delete
Post a Comment
Previous Post Next Post