राघवेंद्र खाटवर जाऊन झोपला आणि मधुमालतीला ही विचार करत कधी तरी रात्री झोप लागली. तिला जाग आली ती सुगंधाच्या रडण्याने. ती उठली तर पाहट झाली होती. ही वेळ सुगंधाला दूध पाजण्याची होती.ती उठली आणि तिने रात्री विस्तवाच्या छोट्याश्या शेगडीवर खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवलेलं दूध वाटीत घेतलं. फुंकर मारून दूध जरा गार केलं आणि सुगंधाला वाजलं. तशी ती शांत झाली आणि थोडावेळ थोपटल्यावर झोपून गेली. मधुमालतीने तिला पुन्हा पाळण्यात झोपवलं आणि ती खोलीच्या बाहेर निघाली. इतका वेळ तिच्याच नादात असलेल्या तिचा हात अचानक कोणी तरी धरला त्यामुळे ती दचकली. राघवेंद्र ही सुगंधाच्या रडण्याच्या आवाजाने जागा झाला होता. डोळे उघडून दोघींकडे पाहत होता पण मधुमालतीचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. त्यामुळे ती चांगलीच दचकली होती.
मधुमालती,“ सोडा मला. मला तुमच्याशी नाही बोलायचं.” ती रागाने म्हणाली.
राघवेंद्र,“ मधू ऐकून तर घी माजं. यी की बस हतं.” तो तिचा हात धरून तिला खाटावर बसवत म्हणाला.
मधुमालती,“बोला. मला खूप काम आहे एक तर पृथ्वी आणि सुगंधा पुन्हा उठण्याआधी मला अंघोळ आणि देवपूजा करून घ्यायची आहे.” ती नाराजीने म्हणाली.
राघवेंद्र,“ तुला राग कशापाय आला हाय मधू? मी कस्तुरीचा हतका इचार किला म्हणूनशान का?” त्याने तिला विचारलं.
मधुमालती,“ तुम्हाला अजून ही मला ओळखता आलेच नाही ना? अहो बाई जेंव्हा मनापासून कोणाला तरी आपलं मानते तेंव्हा ती त्याच्या भल्याचाच विचार करते आणि कस्तुरी माझी सखी आहे आणि माझ्या पोरांची माऊ. आणि मी कधीच हे मान्य केलं आहे की ती तुमचा आत्मा आहे मग तिचा विचार केला म्हणून मला राग येईल का? मला राग याचा आला की तुम्ही घरात कोणाला ही या निर्णयात सामील करून घेणार नाही. अगदी कस्तुरीचे ही मत तुम्हांला महत्त्वाचे वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट नसबंदी करून घेणे म्हणजे मला जीवाशी खेळणे वाटते. तुम्हाला काही झालं म्हणजे?” ती डोळ्यातले पाणी आडवत आवंढा गिळून म्हणाली.
राघवेंद्र,“ मला म्हैत हुतं का तू फुगली का तुला बोलतं करायचं म्हंजी लय अवघाड काम म्हणूनशान तुला मी असा सवाल करूनशान बोलतं केलं. आन घरात सांगटलं तर घरातली मला असं काय करू देतील व्हय गं? आन अपुन तुज्या सकीला तिचं मत ईचारु पर ती तुज्या परास भित्री हाय. आन इतकं भ्या वाटण्यावानी काय नाय मधु यात. तुला मुलं पायजेल का त्ये इचार करूनशान मला सांग. आन मी तुला त्या डॉक्टर सायबास्नी भेटवटतू एकदाम. पुडं जावूनशान मला नसबंदी करून घिवी लागलं नव्हं. त्वां तुज्या समद्या शंका त्येस्नी इचार तुजं समादान झाल्यावर अपुन फैसला करू. मग तर झालं?” त्याने तिचा हात धरून हसत तिला विचारलं.
मधुमालती,“ बरं. मी जाते.” ती उठून जात म्हणाली.
राघवेंद्र,“ वाईस थांब की.” तो तिला जवळ ओढत म्हणाला.
मधुमालती,“ पहाट झाली आहे. तुम्हाला रात्री भांडताना आणि खाटवर येऊन झोपताना बरं सुचलं नाही ओ हे? आणि मला माहित आहे तुमचं एवढ्या तेवढ्याने भागत नाही.” ती हसून म्हणाली.
राघवेंद्र,“ त्वाच भांडान सुरू केलं हुतं. आन वाईस थांबूनशान जा की गं.” तो आर्जवी स्वरात म्हणाला.
मधुमालती,“ इतकं पण लाडिगोडी लावायची गरज नाही. थांबते मी पण थोडाच वेळ.” ती हसून म्हणाली.
★★★★
दोन दिवस असेच निघून गेले.राघवेंद्र त्याच्या कामात गुंतला होता. मधुमालती विचार करत होती. आणि तिचा निर्णय झाला होता. आज रात्री तिने राघवेंद्रला तिचा निर्णय सांगायचं ठरवलं होतं.कामानिमित्त तालुक्याला गेलेला राघवेंद्र तिन्ही सांजेला परत आला. रात्रीच्या वेळी मधुमालतीने मुलांना झोपवलं आणि ती राघवेंद्रजवळ खाटवर जाऊन बसली. तो जागाच होता पुस्तक वाचत बसला होता. त्याने त्याच्या हातातले पुस्तक बाजूला ठेवलं.
राघवेंद्र,“ बुल काय बुलायाचं हाय तुला?” त्याने तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून ती काहीच न बोलता तिला काही तरी बोलायचं आहे हे ओळखले होते.
मधुमालती,“ मी दोन दिवस विचार केला तुम्ही म्हणाला त्या गोष्टीचा. आणि एक निर्णय घेतला आहे. मला अजून मुलं नको आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी बास मला.” ती म्हणाली.
राघवेंद्र,“पर का नगुती अजून पोरं तुला?” त्याने विचारलं.
मधुमालती,“ मला माहित होतं तुम्ही मला हा प्रश्न विचारणार. समजा अजून एक मुलगा झाला तरी तो पृथ्वीच्या सगळ्या गोष्टीत वाटेकरी होणार म्हणजे अगदी प्रेमापासून ते जमीनजुमल्यापर्यंत आणि मुलगी झाली तर बब्बूच्या(सुगंधा) सगळ्या गोष्टीत वाटेकरी होणार. मग भावांमध्ये आणि बहिणींमध्ये हेवे-दावे त्यापेक्षा एक मुलगा एक मुलगी बस की. आणि तुमच्या प्रेमात ही मला अजून एक वाटेकरी नको आहे. बास दोनच मुलं आपल्याला त्यांनाच छान शिकवू मोठं करू. मला तर माझ्या बब्बूला डॉक्टर नाही तर प्राध्यापक करायचं आहे आणि पृथ्वी तर काय त्याला हवं ते शिकेलच. मला आबांनी नोकरी करू दिली नाही. लोकं काय म्हणतील या भीतीने पण मला बब्बूला तिच्या पायावर उभं राहताना पहायचं आहे. आजही बायका शिकत असल्या तरी त्या स्वतंत्र नाहीत. घरचे आणि नवरा म्हणेल तसंच तिला राहावे लागते. मुलींना डिग्री दिली जाते पण त्यामागे चांगलं स्थळ मिळावं हाच एक उद्देश असतो. आणि अजून एक मूल झालं तर मला इतकं लक्ष देता येणार आहे का? दोघांकडे? म्हणून मला आता मूल नको.
पण याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला नसबंदी करण्याची परवानगी दिली आहे. मी तुमच्याबरोबर येणार त्या डॉक्टरांना माझ्या सगळ्या शंका विचारणार आणि त्याने माझे समाधान झाले तरच मग पुढचे पाऊल उचलायचं.
आणि कस्तुरीला हे सगळं कळण्याचा हक्क आहे आणि तिचा निर्णय ही महत्त्वाचा आहे पण हे सगळं मी सांगणार नाही तुम्ही तिला सांगायचं आणि तिला कसं मनवायचं यासाठी ते तुमचं तुम्ही पहायचं.” ती गंभीरपणे बोलत होती.
राघवेंद्र,“ तुज्या पोरा परास कस्तुरीच्या पोरीचा हतका इचार? मधु त्वां म्हंजी ना समींदरावानी हाईस इशाल त्यो कसा एकदाम किती बी नद्यांच पाणी मिळालं तरी ते संवताच करूनशान घितो अक्षी तशी. त्वां एकदाव कुनाला तुजं किलं की ते फकस्त तुजं हून जातं.माजी गंधा नशीबवान हाय तिला तुज्यावानी आई भीटली. आन तिच्या परास मी नशीबवान हाय तुज्यावानी समींदराच्या मोट्या मनाची बायकू मला मिळाली हाय.” तो तिचा हात हातात घेऊन कृतकृत्य होत म्हणाला.
मधुमालती,“ एक तर बब्बू माझी मुलगी आहे आणि मी तिची आई. मग तिचा विचार मी नाही तर कोण करणार? पुन्हा म्हणायचं नाय की ती माझी नाही म्हणून भले कस्तुरीने तिला जन्म दिला असेल पण इतकी सुंदर मुलगी माझी आहे.आणि माझीच राहणार. राहिला पृथ्वीचा प्रश्न एक तर तो मुलगा आहे आणि त्याचा विचार करायला त्याचे आबा, आजोबा, आजी आणि माऊ इतके लोक आहेत मग मी अजून कशाला करू त्याचा विचार. आणि झोपा आता उद्या कस्तुरीला सांगायचं सगळं तिला तुम्हाला या गोष्टीसाठी तयार करता आलं तर मग जाऊ मुंबईला.” ती म्हणाली.
राघवेंद्र,“ म्हंजी समदं मी करायाचं व्हय गं?” तो तोंड वाकडं करत म्हणाला.
मधुमालती,“ हो. तुम्हीच करायचं.” ती म्हणाली आणि जाऊन झोपली.
★★★★
दुसऱ्या दिवशी मध्यरात्री राघवेंद्र माडीवर गेला. कस्तुरीला त्याला पाहून आश्चर्य वाटलं.
कस्तुरी,“ सरकार तुमी हतं आन ह्या वक्ताला?” तिने विचारलं.
राघवेंद्र,“ व्हय मला बुलयचं हाय तुज्या संगट आन त्ये मला दिसा बुलता नाय यायचं म्हणूनशान आलू बग.” तो दारं लावत म्हणाला.
कस्तुरी,“ असं काय बुलायाच हाय जी तुमास्नी?”
राघवेंद्र,“ चल सांगतु. मला कोड्याच उत्तार गावलं हाय कस्तुरा. त्येन तुला मुलं बी नाय ऱ्हायाची आन आपल्या दुगास्नी लांब बी ऱ्हायला नाय लागायाचं.त्येच सांगायाला आलू हाय बग मी.” तो उत्साहाने बोलत होता.
कस्तुरी,“ असला कुटला उपाय गावला हाय जी तुमास्नी?” तिने आश्चर्याने विचारलं.
राघवेंद्र,“ मी नसबंदीचे आपरेशन करूनशान घिणार हाय. त्येन तुला पोरं ऱ्हायाची नायती.” तो म्हणाला.
कस्तुरी,“ या बया ही काय अस्तया आणि? आन आपरेशन? म्हंजी माणसाला कापत्याती नव्हं आन टाकं घालूनशान शिवत्याती तेच नव्हं ? म्या आमच्या फडातमदल्या दामू अन्नाचं बगतलं हुतं त्येच्या पोटात गाट हुती म्हणं कसली. त्येच्या पोरानं त्येला म्हमईच्या सरकारी दवाखान्यात नेलं हुतं कसल्या तर रोगाची हुती गाट. त्येचं पॉट फाडूनशान ती गाट काडली. आयला त्येनं आल्यावरी सदरा वर करूनशान पॉट दावलं हुतं.म्या बी हुतु ततं बाय बाय पॉट फाडून गुमीवानी (गोम) टाकं घालूनशान शिवलं हुतं जी त्येचं. त्यानंतर त्यो दोन तीन वरीस जगाला फकस्त. त्येची बायकू लेकाला शिव्या देत हुती. ते आपरेशन का काय किलं म्हणूनशान त्यो मेला अस म्हणत हुती.पर तिचा लेक म्हणत हुता का पोटातली गाट फुटली असती आन त्यो तवाच मेला असता आपरेशन करून दोन तीन वरीस जगला. पर मला काय ही खरं वाटलं नाय. ते डागटर काय चांगलं नस्त्याती. चांगली माणसं फडूनशान मारत्याती. तुमी असलं काय बी करणार नाय जी.” ती रडकुंडीला येऊन बोलत होती.आणि राघवेंद्र हसायला लागला.
राघवेंद्र,“ कस्तुरा येडी का खुळी त्वां. अगं त्या तुज्या दामू अण्णाला गाट झाली हुती म्हणलीस नव्हं. त्येचा पोरगा बरुबर बुलत हुता मग ती गाट पोटात फुटली असती म्हंजी त्यो तवाच मेला असता. आन डॉक्टर काय मारेकरी असत्यात व्हय गं कुणाला बी फडूनशान माराया? ते आपला इलाज करत अस्त्याती वैद्यबुवा सारकं. आता बग माज्या हाताला लागलं हुतं तवा मोटी जकम झाली हुती ती शिवली नसती तर रगात जावूनशान म्या मेलु अस्तू आन तर शिप्टिक हून हात काडावा लागला अस्ता पर त्येंनी ती जकम शिवली आन रगात बी थांबलं आन शिप्टिक बी झालं नाय. हा टाकं घातलं तवा लय दुकलं. ताप बी आला हुता पर म्हणूनशान वैद्य बुवानी माजा जीव घ्याया ही समदं किलं व्हय गं? नाय उलाट पक्षी त्येंनी माजा जीव वाचिवला की. तसंच डॉक्टर अस्त्याती. त्येंनी मानसाच्या शरीराचा अब्यास केलीला अस्त्युया आन अपुन अडाणी लोकं त्येंच्याबद्दल नाय ती इचार करतुया.
अन नसबंदी म्हंजी साद्या तुला समजलं अशा भासत सांगायाचं म्हणलं तर पुरुषाच्या लिंगातून जे बी बाईच्या गर्भात जातंय आन बाय गर्भार हुतीया नव्हं तर ते बी बाईच्या गर्भात जाऊ नये म्हणूनशान ते बांदत्याती म्हंजी बाई अन पुरुष एक झालं तरी बी बाय गरवार ऱ्हात नाय. त्येला नसबंदी म्हणत्याती कस्तुरा.” तो तिला समजेल अशा भाषेत सांगत होता.
कस्तुरी,“ असं कसं बांदत्याती जी ते बी? आन ते बांदलं तर तुमचा मर्दपणा जायावंचा नाय का? उगा काय बाय डोस्क्यात घिवू नगासा तुमी. गप थंडवानी बसा आन तुमास्नी इवडीच माजी आस असलं तर म्या तुमचीच हाय जी. आन हतंका इचार नगा करू. जी बी हुईल ते हुईल माज्या नशिबाची म्या.” ती काळजीने त्याचा हात धरत म्हणाली. आणि राघवेंद्रने डोक्यावर हात मारून घेतला.
राघवेंद्र,“ हेला म्हणत्याती गडवा पुडं वाचली गीता आन कालचा गोंधुळ बरा हुता. समदी अडाणी ठोकळं माज्याच नशिबी आल्याती ती खाली झोपलिया ती शिकलेलं अडाणी हाय. आन हे ..हतं तर बोलायाचं कामच नाय.” तो चिडून म्हणाला.
कस्तुरी,“ ही बगा बाईसाबास्नी अडाणी म्हणायाचं काम नाय. त्येंच्या हतकी शिकलेली बाय समद्या तालुक्यात गावायाची नाय. आन तुमी ती कसली तरी बंदी करूनशान घितली तर त्येस्नी बी पोरं हुनार नायती की? बाय बाय त्या म्हमईला जाऊनशान तुमचं डोस्क फिरलं का काय? आरं देवा महादेवा तुमच्यावर कुनी करणी किलीया का काय? का बाहीरवासा झालाया तुमास्नी असं काय बाय बडबडताया.” ती घाबरून बोलत होती.राघवेंद्र मात्र आता भलताच चिडला आणि वैतागला होता.
राघवेंद्र,“ या बायला समजावूनशान काय बी फायदा नाय.दगडावर डोस्क आपटल्या गत हाय. मी जातू आता तू निज गुमान.” तो चिडून म्हणाला.
कस्तुरी,“ हतकं चिडाया काय झालंया जी? आन वाईस थांबा की म्या काय म्हंती आज राती ….किती दिस असं चलायाचं सरकार?” ती लाडात येऊन म्हणाली आणि राघवेंद्रला तिने मिठी मारली. राघवेंद्र थोडावेळ तिच्या सुगंधी मिठीत विरघळला पण लगेच भानावर येत त्याने तिला दूर केलं.
राघवेंद्र,“कस्तुरी लय लाडात इवू नगुस त्वां. दम काड वाईस.” असं म्हणून तो खोलीची दारं उघडून जीव मुठीत घेऊन जवळ जवळ पळतच खाली आला.
तो चौकात येऊन बसला आणि विचार करू लागला.
‛ समदा देशात बायांचं शोषाण हुतंया पर माज्या घरात या दोन बाया मिळूनशान माजं शोषाण करत्यात्या. एक शिकली हाय पर अडाणी आन एकीला मी शिकवली तर बी अडाणी. तुजं म्हंजी दोन बायका आन फजिती ऐका असं झालंया राघव. आज तर या कस्तुरीनं पार माजा पण उदळून लावला अस्ता. तिची सुवासित मिटी सोडवायाची म्हंजी खायाचं काम नाय. आता हतनं जवर नसबंदी करूनशान घित नाय तवर रातीच तिच्याकडं जायाचं नाय. नाय तर नसबंदीच्या आदी नजरबंदी व्हायाची आन मंग समदं अवघाडहून बसायाचं. मधुनं मुद्दाम मला कस्तुरीला सांगाया धाडलं हाय. तिच्या बूलण्यातला नाटकीपना मला कळाया पायजेल हुता. कस्तुरीला मी किती बी समजूनशान सांगटलं तर नाय समजायाचं. तिला मधुनच समजूनशान सांगाया पायजेल आता उद्या मधू समुर गोंडा घोळाया पायजे. आता हतंच झुपतू. दिवानजीची गादी हाय नव्हं. निजा आज चौकात सरकार. कसलं सरकार? या बाया मला पार त्येंच्या तालावर नाचावाया लागल्यात्या.’
तो तिथेच गादीवर आडवा झाला आणि या सगळ्या विचारांच्या गर्दीत त्याला कधी तरी रात्री उशिरा झोप लागली.
मधुमालतीला नसबंदी बद्दल समजून सांगणे आणि तिला तयार करणे राघवेंद्रसाठी सोपे होते. कारण मधुमालती तितकी शिकलेली होती आणि तिचे वाचन देखील भरपूर होते. तिची वैचारिक आणि मानसिक पातळी हे सगळं समजून घेण्याची होती पण कस्तुरी? कस्तुरी म्हणजे अडाणी ठोकळा त्यात तिच्या आईने तिला पदराला बांधून वाढवलं होतं. तिचे आजवरचे आयुष्य खेड्यात गेले होते. तिची वैचारिक आणि मानसिक पातळी तेवढी नव्हतीच. राघवेंद्र तिला सांगायला गेला आणि तिने या सगळ्याचा तिच्या वैचारिक आणि मानसिक पातळीनुसार वेगळाच अर्थ काढला होता.
क्रमशः
©स्वामिनी चौगुले
त्या काळातल्या गाव-खेड्यातील लोकांना डॉक्टर वगैरे बद्दल जास्त माहिती नव्हती आणि त्यांच्या बाबतीत पसरवल्या गेलेल्या आफवांमुळे डॉक्टरांची लोकांना भीती वाटायची.डॉक्टरांबद्दल अनेक समज-गैरसमज खेडूत लोकांच्या मनात होते आणि ते खूप पक्के होते. त्यातलीच एक कस्तुरी होती.
राघवेंद्र कस्तुरीला सगळं समजावून सांगू शकेल काय? आणि कस्तुरी ते समजून घेऊ शकेल काय?
कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇
