राघवेंद्र आणि राधक्का रातोरात परत वाड्यावर आले आणि तीन दिवसांनी जहागीरदार वाड्यावर साताऱ्यावरून मधुमालतीला मुलगी झाल्याची खबर घेऊन एक माणूस पाठवला गेला.सगळ्या गावात पुन्हा एकदा जहागीरदारांनी साखर वाटली.
निवडणूक तोंडावर आल्याने राघवेंद्र प्रचारात गुंतला. राधक्का आणि रखमा कस्तुरीची सर्वोतोपरी काळजी घेत होत्या. सव्वा महिना झाला आणि मधुमालतीने बाळ घेऊन पुन्हा वाड्यात प्रवेश केला. बाळाचे बारसे धुमधडाक्यात झाले. राघवेंद्रने मुलीचे नाव तो म्हणाल्याप्रमाणे सुगंधा ठेवलं.
दुपारच्या वेळी मधुमालती बाळाला आणि पृथ्वीला घेऊन कस्तुरीकडे जायची. कस्तुरीला बाळाला घेतलं की पान्हा फुटायचा पण बाळ मात्र तिचे दूध अजिबात पित नव्हते. किती ही जबरदस्ती केली तरी बाळ मात्र रडायचं पण दूध पायचं नाही. असं दहा दिवस रोज सुरू होतं.
मधुमालती,“ कस्तुरी आज हिला मी वरचं दूधच पाजलं नाही. म्हणून तर लवकर घेऊन आले तुझ्याकडं. चांगली भूक लागली असेल माझ्या बब्बूला आता बघू कशी तुझं दूध पित नाही.” ती म्हणाली आणि कस्तुरीने बाळाला छातीशी लावलं. तिला पान्हा तर फुटला होता पण बाळ मात्र दुधाला तोंड लावत नव्हतं.
कस्तुरी,“ नाय जी बगा रडाया लागलीया पर दुदाला त्वांड लावीना जी.” ती रडकुंडीला येऊन म्हणाली.
मधुमालती,“ हिला भूक तर लागली आहे पण भलतीच हट्टी आहे की गं ही.” दोघी बोलत होत्या आणि तिथेच जवळ खेळत असलेला दीड वर्षाचा पृथ्वी कस्तुरीजवळ आला. तो चवड्यावर बसला आणि त्याने तिच्या छातीला तोंड लावलं.
कस्तुरी,“ आता वं पृथ्वीसाब? बायसाब म्या पृथ्वीसाबला माजं दुद पाजलं तर चाललं का जी?” तिने संकोचून पृथ्वीला बाजूला करण्याचा प्रयत्न करत विचारलं.
मधुमालती,“ हावरट आहे बग हा लबाड. हिला दहा दिवस झालं दूध पाजयचा प्रयत्न करतोय आपण पण ही पोरगी तोंड लावेना आणि हा बळेच येऊन बसला की गं डल्ला मारायला आणि नाही चालायला काय झालं. तू माऊ आहेस त्याची. तुला चालणार असेल आणि याला चलतंय तर मी कोण बाई आडवणारी.” ती हसून म्हणाली.
कस्तुरी,“ मंग घ्या हिला, हिला पाजा वरच दुद आगाव कुटली. पृथ्वीसाब या तुमी.”
तिने बाळाला मधुमालतीकडे दिले आणि पृथ्वीला आडवे मांडीवर घेतलं. तिचं मातृत्व आज तृप्त होत होतं आणि पृथ्वी अमृताची धार पिऊन तृप्त होत होता.ती पृथ्वीला मायेने गोंजारत होती. आज कस्तुरीचे मातृत्व पृथ्वीने तृप्त केलं होतं जणू दोघांचे नाते अजूनच घट्ट झाले होते.
मधुमालती,“ अवघड आहे बाई. माझ्या बब्बूच्या हक्काच्या दुधावर तुझ्या पृथ्वीने डल्ला मारला की.” ती हसून म्हणाली. पृथ्वी मात्र मस्त दूध पिऊन ढेकर देत उठून कस्तुरीच्या मांडीवर बसला.
कस्तुरी,“ तुमची ही लाडाची मैना लय आगाव हाय जी.ही फकस्त दिस्तीया सरकारांवानी पर स्वबावानं कुणागत हुती काय म्हैत. लय हट्टी हाय आताच. माजं पृथ्वीसाब दिसत्याती तुमच्यागत पर सरकारांवानी हुत्यात कनाय बगा.” ती पृथ्वीला मायेने कुरवाळत बोलत होती.
मधुमालती,“ पण बघ बाई पृथ्वी खूप सतावतो हा. आता त्याला चटक लावली तू. मी साताऱ्याला गेल्यावर त्याची सवय मोडली होती. मलाच दूध येत नाही आता. मात्र आता पुन्हा सवय लावणार असं दिसतंय अंगावरच्या दुधाची बरं मी हिला दूध पाजते खाली नेऊन उपाशी आहे गं कधीची.” ती बाळाला घेऊन गेली पृथ्वी मात्र कस्तुरीजवळ बराच वेळ खेळत होता.
पुढे दोन महिन्यांनी निवडणूक झाली आणि राघवेंद्र बहुमताने विजयी झाला. विजयाचा गुलाल जहागीरदार वाड्यावर उधळला गेला. सगळेच खुश होते आणि सगळा गाव आणि महेंद्रप्रतापराव देखील म्हणत होते की सुगंधाच्या पायगुणाने राघवेंद्र आमदार झाला. मग काय सुगंधा एक तर नवसाची आणि दुसरं शुभ शकुणाची म्हणून ती जहागीरदारांची आणखीनच लाडकी लेक झाली.
राघवेंद्र मुंबईत जाऊन शपथ घेऊन आला पण त्याने सरकारमध्ये असून ही कोणतेही मंत्रिपद अजून तरी स्वीकारलं नव्हतं. त्याचे मत होते की तो राजकारणात अजून नवीन आहे अनुभव घेऊन कोणतीही जबाबदारी घ्यावी. तरी सरकारदरबारी त्याचे चांगलेच वजन निर्माण झाले होते. त्यामुळे त्याची कामे चुटकी सरशी होत होती.त्याने अवघ्या पंचक्रोशीत सुधारणांचा सपाटा लावला होता. वीज, पाणी, रस्ते सुरवातीला अशा पायाभूत सुविधा करण्याकडे त्याचा कल होता. आता लोकं त्यांची गाऱ्हाणी घेऊन जहागीरदार वाड्यावर येऊ लागली होती आणि राघवेंद्र त्यांना निराश करत नव्हता. वेळ प्रसंगी पदरमोड करून तो लोकांची कामं करत होता.
एक दिवस मदन संध्याकाळच्या वेळी राघवेंद्रला सहजच भेटायला आला होता. मदन थोडा अस्वस्थ दिसत होता. दोघे दिवाणखान्यात गप्पा मारत बसले होते.
राघवेंद्र,“ काय झालं हाय मदू? लय ईचारात दिस्तुयास?” त्याने विचारलं.
मदन,“ आरं काय सांगू तुला अप्पांनी अंतरुन धरलं हाय एक वरीस झालं.तुला तर म्हैत हाय की समदं. आन समदा कारभार थोरल्या दादाकडं गेला. आता थोरला दादा आणि माधव वाटणी करायाची म्हणत्याती दादाला दुकान आन धा एकर बागायत पायजेल आन माधवला इस एकर बागायत पायजेल. दोगं म्हणत्यात का म्या तिगात ज्यादा शिकलू हाय तवा मला माळावरची जिरायत जिमीन घी धा एकर मला दादा म्हणला तुला सरकारी नोकरी लागलं तुला काय गरज हाय म्हणं? आता शिकूनशान म्या काय गुना किला व्हय रं? का ह्यास्नी शिकू नगा म्हणलु? मला बी बायकू हाय दोन मुलं हायती माजा संसार माळ रानावर धकलं व्हय रं? सरकारी नुकरी असच मिळतीया व्हय? आन मिळाली तरी बी गावापासनं खाईमच लांब जावं लागील मला मग माज्या बायका लेकरास्नी कोण बगायाचं? लेकरं बारकी हायती आजूनशान. आन काय बोलाया गेलं का आता भांडणाला त्वांड हाय राघव.” तो रडकुंडीला येऊन बोलत होता.
राघवेंद्र,“ याक बुलू का तुला? लय दिस झालं बुलावं म्हणतुया पर धाडास हुत नवतं बग.” तो जरा संकोचून म्हणाला.
मदन,“ बुल की. मला बोलाया तुला ईचाराव लागतंय व्हय रं? आन धाडास नाय मला बोलाया ते बी आमदार जहागीरदार सायबांस्नी?” त्याने रोखून पाहत त्याला विचारलं.
राघवेंद्र,“ झालं का वाकड्यात शिरूनशान तुजं?” त्याने विचारलं.
मदन,“मंग त्वां बुलतुयाच वाकड्यात शिकाया गत. म्या मैतर हाय तुजा अन मला बुलाया धाडास लागतंया व्हय रं तुला?” त्याने रागाने विचारलं
राघवेंद्र,“ नाय म्हंजी तुला राग ईल म्हणूनशान नाय इचारलं मद्या आज पातूर. तुमचं दुकार हाय हतकी मायदंळ शेती हाय म्हणूनशान गप बसलु हुतू. मला एका स्वीय सायांक म्हंजी सेक्रटरी बायजेल हाय पर त्या साटनं इश्वासातला माणूस पायजेल नव्हं तवा तुजं नाव आलं बग मनात पयल्यांदा. पर कसं ईचारणार म्हणूनशान नाय इचारलं. तुला नगु असलं आन सरकारी नुकरीच पायजल असलं तर मी शेजारच्या गावात शाळा सुरू करणार हाय आपल्या संस्थेची पाचवी ते धावी ततं तुला घितु मास्तर म्हणूनशान त्वां नगु काळजी करू.” तो बोलत होता.
मदन,“ मला त्वां काय समजूतुयास रं?” त्याने रागाने विचारलं.तसा राघवेंद्र मनातून चरकला.
राघवेंद्र,“ आरं मदू रागाला नकु यवू बाबा. मला माप कर.” तो आवंढा गिळत म्हणाला. तोपर्यंत तिथे मधुमालती काही तरी खायला घेऊन आली होती.
मदन,“ वैनीसाब ह्यो माणूस आमदार झालाया. बाहीर शिकूनशान आला हाय पर याला जरा सुदीक डोस्क नाय बगा.” तो तोंड वाकडं करून म्हणाला.मधुमालतीला दोघांमध्ये काय बोलणे सुरू आहे हेच माहीत नव्हतं त्यामुळे ती शांतच उभी होती.
राघवेंद्र,“ मद्या तुला दुनी बी नगु असलं तर ऱ्हावु दि की उगा कशापाय वाडीचार?” तो खाली मान घालून बोलत होता.
मदन,“ दुवू का ठिवून तुला? आरं तुज्या मागं ऐटीत हिंडायाचं सुडूनशान म्या मास्तरकी करत बसू व्हय हतं. मला त्यो दादा लय बुलत हुता का त्वां मैतर हाईस माजा तवा तुला नुकरी लवाया सांग की मला म्हणूनशान आता दावतू त्याला. आन कंदी पसनं इवू तुजा शेकटरी म्हणूनशान ड्युटीवरी त्ये सांग?” तो हसून आखडत म्हणाला.
राघवेंद्र,“ मद्या असं भ्या दावतूस व्हय रं? आन पगार पाणी तर ठरवू की रं आदी.मी तुला मासाकाटी शंभर रुपय देतू आन वरीस भराच धान्य बी.बग पटतंया का?” त्याने विचारलं.
मदन,“दर मासाला शंबर रुपय? आन वरसाचं धान्य? आरं नाय पटाया काय झालं. राघव त्वां माजं लय मोटं कोडं सोडीवलस बग. कुटं त्या आडाण्याबरुबर डोस्क लावूनशान भांडत बस्तुस गड्या. ही लय झाक झालं. म्या उंद्या पासनं ड्युटीवर हजर आमदार साहिब.” तो खुश होत म्हणाला.
मधुमालती,“ हे एक बरं झालं. आता अधिवेशनाला आणि काही कामं असली की मुंबई आणि नागपूरला यांच्याबरोबर तुम्ही जाणार म्हणजे आमची काळजी मिटली.” दोघांचे बोलणे इतका वेळ ऐकत उभी असलेली मधुमालती म्हणाली.
मदन,“ व्हय जी.आन पोरं कुटं हायती? आमचं पृथ्वीसाब आन सुगंधा बाईसाब?” त्याने गमतीने विचारलं.
मधुमालती,“ काय भाऊजी आता आपल्या शेंबड्या पोरांना साब आन बाईसाब म्हणणार व्हय तुम्ही. काका आहात तुम्ही त्यांचे तर तसंच बोलत जा. थांबा घेऊन येते त्यांना.” ती म्हणाली.
मदन,“ अवो गमतीनं म्हणलु म्या. घिवून या जी पोरास्नी.” तो हसून म्हणाला.
आणि त्या दिवशीपासून मदन राघवेंद्रचा सेक्रेटरी म्हणण्यापेक्षा त्याची सावली झाला.
★★★
या काळात तो कामानिमित्त बऱ्याच वेळा मुंबईला जाऊन आला होता. पृथ्वीप्रताप आता दोन वर्षांचा तर सुगंधा सहा महिन्यांची झाली होती. आता कस्तुरीला ही करमायला लागलं होतं. एकीकडे तिचा अभ्यास आणि देवाधर्माचे वाचन सुरू असायचं आणि दुसरीकडे दुपारी तिच्याकडं दोन्ही पोरं घेऊन भजन शिकायला मधुमालती यायची ती तिन्ही सांजेला जायची. राघवेंद्र वाड्यावर असेल तेंव्हा तिला सकाळी आणि संध्याकाळी भेटायला यायचा तिने किती अभ्यास केला ते पहायचा. पण गेले सहा महिने तो रात्रीच्या वेळी कस्तुरीकडे फिरकला नव्हता. त्यामुळे कस्तुरी थोडी अस्वस्थ होती. आज राघवेंद्र वाड्यावर होता आणि त्याच्या शिरस्थ्या प्रमाणे तो तिला भेटायला गेला त्याच्याबरोबर पृथ्वी होता. पृथ्वी कस्तुरीकडे गेला आणि राघवेंद्र जाऊन खाटवर बसला. कस्तुरीच्या मनाची मात्र घालमेल होत होती.तिने आज राघवेंद्रशी या विषयी बोलायचंच असं मनोमन ठरवलं होतं. कस्तुरी पृथ्वीला घेऊन त्याच्याजवळ बसली.
कस्तुरी,“ सरकार माजं काय चुकलं का जी?” तिने डोळ्यात पाणी आणून विचारलं.
राघवेंद्र,“ नाय तर. पर तुला का असं वाटतंया कस्तुरा?” त्याने विचारलं.
कस्तुरी,“ सा मास हून गिलं जी. तुमी रातीचं माडीवर इत नाय जी? म्हणूनशान ईचारलं म्या.” तिने रडतच विचारलं.
राघवेंद्र,“ कस्तुरा असं काय बी नाय. पर मला कोडं पडलाया आन त्या कोड्याच उत्तार मिळत नाय तवर मी तुज्यापसनं लांब ऱ्हाइलेलू बरा हाय बग.” तो म्हणाला.
कस्तुरी,“ कसलं कोडं जी?उगा कशापाय कोड्यात बुलतासा?” तिने असमंजसपणे विचारलं.
राघवेंद्र,“ लय भुळी हाय बग त्वा. अगं या येळी आपल्याला देव दयेनं पुरगी झाली. आन ती मधूनं मोट्या मनानं पदरात घितली आन समद्यानी बी तिला मान्यता दिली पर पुन्यांदा तुला मुल राहिलं आन या येळी पोरगं झालं म्हंजी? आन समज पुन्यांदा पोरगी झाली तरी बी मधुनं तिला कशापाय पदरात घ्यायाची?ऊस गॉड लागला म्हणुनशान त्येला मुळा संगट खायाचा नस्तुया कस्तुरा. म्हणूनशान म्हणतुया वाईस दम धर. एकदाव कोड्याच उत्तर मुळालं नव्हं म्हंजी मग हायच की त्वां आन मी.” तो हसून तिलाजवळ ओढत म्हणाला.
कस्तुरी,“ म्हंजी मला मुलं हुनार नायती असं काय तर कराया पायजेल. पर सरकार मंग आपल्याला खाईम साटनं लांब ऱ्हायाला पायजेल. कारण या कोड्याच उत्तार फकस्त हीच हाय. मला नाय जमायचं तुमच्या पसनं लांब ऱ्हायाचं पर आता जमवलं पायजेल.”ती डोळ्यात आलेलं पाणी परतवून लावण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण एक चुकार अश्रूचा टपोरा थेंब तिच्या टपोऱ्या काळ्या डोळ्यातून राघवेंद्रच्या हातावर पडलाच.
राघवेंद्र,“आता रडाया काय झालंया? तुज्या परास मला आवघाड हाय तुज्या पासनं लांब ऱ्हानं आन त्वां नगु काळजी करू कोडं लवकारच सुटतया. आन मी चार आट दिस मुंबईला जातूया. ततं पक्षाची बैठक हाय. पर ल्हाण्या पोरां संगट ल्हान हुनशान खेळत बसायाचं नाय आन तुज्या महादेवाचं पारायण बी करायाचं नाय. आकडं मोडचा अब्यास करायाचा. काय आडलं तर मधू हाय सांगाया. मी आल्यावर समदं ईचारणार बग.” तो म्हणाला.
कस्तुरी,“ व्हय त्यो अब्यास म्हंजी माज्या जीवाचा घोर झाला हाय. करती म्या.” ती तोंड फुगवत म्हणाली आणि राघवेंद्र हसला. तो पृथ्वीला घेऊन निघून गेला.
दुसऱ्या दिवशी तो मदनला घेऊन मुंबईला निघून गेला.राघवेंद्रला त्याच्या कोड्याचे उत्तर सापडणार होते का?
क्रमशः
©स्वामिनी चौगुले
तो काळ पन्नास ते साठच्या दशकातील होता. त्या काळात गर्भनिरोधासाठी आजच्यासारख्या सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. राघवेंद्र करत असलेल्या विचारच मुळी काळाच्या पुढचा होता.
कथेचा या आधीचा भाग खालील लिंकवर👇
माडीवरची बाई भाग 49

Raghvendrach khar prem Kasturi varch ahe asa disun yet. Madhula fakt varas dyayla analyasarkhe diste. Ya saglyat madhuchya nashibi bhog alet. Tari ti anandane sahan kartiye. Madhu baddal halhal vatate khup.
ReplyDelete