माडीवरची बाई भाग 49




    राघवेंद्र बाळाच्या रडण्याचा आवाज येताच अधिरपणे बंद दारासमोर उभा राहिला. रखमाने बाळाची नाळ तोडली आणि रक्ताने माखलेला तो बदामी लुसलुशीत गोळा कापडात गुंडाळून राधक्काच्या हातात दिला.


रखमा,“ मालकीणबाय समद्याच्या मनावानी झालंया जी. लक्ष्मी आली बगा तुमच्या वाड्यात. पोरगी झाली जी पोरगी.” ती हसून म्हणाली.


राधक्का,“ बाय बाय कसलं गॉड हाय लेकरू जावाळ तर कुरळं हाय. पर हिला हिच्या आय वानी सुवास नगु बाय. म्या चुलीवर अजून पाणी ठिवलं हाय ऊन व्हाया. बाळाची समदी घाण कडूनशान धून आणती. पर कस्तुरी बरी हाय नव्हं रकमा?ती गप झाली हाय.” तिने काळजीने विचारलं.


रखमा,“ व्हय कस्तुरी बरी हाय जी. फकस्त दमली हाय नव्हं म्हणूनशान अर्धवाट बेसूद हाय.आन बाळ किती मोटं हाय जी कस्तुरीला तीन मास काय बी पचलं नाय तवा बाळ बारीक असलं असं वाटीत हुतं पर हि पोर तर चांगली पोसली हाय जी. आता एकल्याच तुमी बाळाला पाणी कसं घालणार जी?” तिने विचारलं.


राधक्का,“ व्हय बाळ मातूर मोटं हाय बग म्हणूनशान लय तरास झाला पोरीला.एकली का हिचा बा हाय की बाहीर. पाणी घालू लागलं आन जाती म्या समदी काय झालं असलं म्हणूनशान वाट बगत्यात त्वां कस्तुरीची काळजी घी.” ती म्हणाली आणि एका हातात बाळ घेऊन तिने दारं उघडली तर राघवेंद्र समोरच उभा होता. त्याने बाळाकडं पाहिलं.


राघवेंद्र,“ काय झालं आई पोरगं का पोरगी?” तो अधिरपणे विचारत होता.


राधक्का,“ आरं लक्ष्मी आली आपल्या घरी. पोरगी झाली पोरगी.”त्या हसून म्हणाल्या आणि राघवेंद्रच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. राधक्का बाळाला घेऊन जिना उतरत होती.


महेंद्रप्रतापराव,“ काय झालं राधा? पोरगी का पोरगं?” त्यांनी विचारलं आणि सुभानरावांचे कान ही टवकारले गेले.


राधक्का,“ लक्ष्मी आली जी आपल्या घरी लक्ष्मी. ये पोरा ततंच उबा रातू का आता? यी तुज्या लेकीला पाणी घालायाचं हाय. घालू लाग.” ती हसून राघवेंद्रकडे पाहत म्हणाली.


सुभानराव,“ लक्ष्मी आली रं महिंद्रा. समद्याच्या मनावानी झालं.म्या पनजा झाकू अजून एकदाव.” ते बोळक पसरत म्हणाले.


राघवेंद्र,“ व्हय आई आलू पर कस्तुरी कशी हाय?” त्याने काळजीने विचारलं.


राधक्का,“ बरी हाय ती. पोरगी लय मोटी हाय रं म्हणूनशान कस्तुरीला तरास झाला बग. आपल्या पृथ्वी परास लय मोटी हाय ही बग. आन चल बिगी बिगी मला लय कामं हायती. त्या पोरीला काय तर खायला बी कराया पायजेल.” ती चौकात येऊन म्हणाली.


महेंद्रप्रतापराव,“ व्हय आन बाळ आयला दावून लगोलग घिवून जा साताऱ्याला. रातच्या रात हितं आलं पायजेल तुमास्नी परत. आन कस्तुरीची काळजी घ्याया हतं रकमा हाय. तवा हुता हुईल तिवडं लवकर निगा. आन आमाला बी बागायाचं हाय की बाळ जावा बिगीनं धून आना.” ते खुश होत बोलत होते.


राधक्का,“ व्हय व्हय.चल राघव.” ती म्हणाली आणि राघव तिच्याबरोबर परसात गेला.


   राधक्काने बाळाला राघवेंद्रच्या मदतीने त्याच्या तोंडातली वगैरे घाण काढून स्वच्छ अंघोळ घातली. आणि बाळाला पुन्हा एका स्वच्छ सुती कपड्यात  गुंडाळले. राघवेंद्रने बाळाला घेतलं आणि चौकात येऊन बाळाला नीट पाहिलं. महेंद्रप्रतापराव आणि सुभानराव देखील बाळ पाहत होते. बदामी रंग, काळेभोर कुरळे जावळ, लांब नाक आणि काळेभोर डोळे तो गुबगुबीत गोळा तिघे म्हणजे तीन पिढ्या त्यांची चौथी पिढी पाहत होते. बाळ राघवेंद्रसारखे दिसत होते. 


सुभानराव,“ अक्षी बापावर गेली हाय पोरं. क्यास फकस्त आय गत हायती. राधक्का सुवास हाय काय गं पोरीला?” त्यांनी ही बाळाच्या हाताचा वास घेत विचारलं.


राधक्का,“ नाय नी सुवास नाय आयवानी पोरीला.” ती हात पुसत म्हणाली आणि बाळ रडायला लागलं.


महेंद्रप्रतापराव,“ जा जा आयकडं न्या पोरीला आन तिला सांग जहागीरदारास्नी हिवडा गॉड ऐवज दिला हाय तिनं तिला या वाड्यात हितुन पुडं काय बी कमी पडायाचं नाय.” ते म्हणाले.


राधक्का,“ व्हय जी.” ती म्हणाली. 


 राघवेंद्र आणि ती बाळाला माडीवर घेऊन गेले. तोपर्यंत कस्तुरी शुद्धीवर आली होती आणि तिला मुलगी झाली म्हणून रखमाने सांगितलं होतं. खरं तर त्याकाळी मुलगा होणे म्हणजे आनंदची गोष्ट आणि मुलगी म्हणजे नकोशी असं होतं पण जहागीरदार कुटुंब मात्र आज मुलगी झाली म्हणून प्रचंड खुश होते. मधुमालती आणि राघवेंद्रने तर नवसाने मागून घेतली होती मुलगी. 


   कस्तुरीने मुलीला कुशीत घेतलं.तिला डोळे भरून पाहिलं.तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. तरी तिच्या काही तरी लक्षात आले आणि तिचा चेहरा चिंताक्रांत झाला. तिने बाळाचा वास घेऊन पाहिला आणि ती समाधानाने हसली.


कस्तुरी,“ बाळाला सुवास नाय जी. आन अक्षी सरकारांवानी झालीया की ही.” ती बाळाला पदरा आड घेऊन दूध पाजण्याचा प्रयत्न करत म्हणाली पण बाळ नुसते रडत होते. तिच्या छातिला तोंड लावत नव्हतं.


राधक्का,“ व्हय बावर गिलिया पोर क्यास मातूर तुज्यावाणी हायती. दुद का पी ना गं ही? म्या गायच दुद घिवून येती थांब वाईस आन तुला हाळीवाची खीर बी करतू. आन आताच काय ती बाळाला बगून घी बाय. आता सव्वा मासानी इनार बाळ परत.” ती म्हणाली आणि रखमाला खुणावुन घेऊन गेली.


 आता खोलीत फक्त राघवेंद्र आणि कस्तुरी होते. कस्तुरी बरीच थकलेली आणि कोमेजलेली दिसत होती. राघवेंद्र तिच्याजवळ बसला आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाला.


राघवेंद्र,“ लय तरास दिला बग पोरीनं तुला पर लय देकनं हाय बाळ तुज्यावानी. सव्वा मास बाळाचा दुरावा सोसाव लागलं तुला कस्तुरा पर परत ती तुज्या समुर राहील आय म्हणूनशान नाय पर माऊ म्हणूनशान तर तुला तिला जवळ घिता ईल. मला तुला तुजा हक तुला नाय दिता आला पर आपल्या पोरीला त्यो मिळलं मधुच्या मोट्या मनामुळं. ती माजी पोरगी म्हणूनशान वाड्यात वावरत सुगंधा राघवेंद्रप्रताप जहागीरदार! ह्येचा मला लय आनंद हाय. त्वां आता आराम कर. मी आन आई बाळाला सोडूनशान येतू साताऱ्यात मधूच्या कुशीत घालूनशान, पोरगी कृष्णाच नशीब घिवूनशान आली बग देवकीकडनं  लगीच यशोदेकडं जानार.” तो कातर आवाजत बोलत होता.


कस्तुरी,“ व्हय जी बायसाबचे लय उपकार हायती माज्यावर. आन आपली पोरगी भाग्याची हाय तिला बायसाब सारकी आय मिळतीया आन हतकं मोटं आजोळ बी.” ती तिच्या कुशीत झोपलेल्या बाळाच्या चिमुकल्या  कपळाचे चुंबन घेत म्हणाली.


  थोड्याच वेळात राधक्काने बाळाला कापसाच्या बोळ्याने दूध पाजलं. कस्तुरीची काळजी घ्यायला राखमाला ठेवून बाळाला चांगलं दुपट्यात गुंडाळलं. एका छोट्या कडीच्या डब्यात दूध घेतले आणि कापूसबरोबर घेतला. सुभानराव आणि महेंद्रप्रतापराव वाड्याच्या बाहेर येऊन जीपमध्ये बसणाऱ्या राधक्काशी बोलत होते. राघवेंद्र आधीच ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. दोन आजे नातीच्या काळजीने सूचना देत होते आणि वरून खिडकीतून कस्तुरी सगळं पाहून आणि ऐकून भरून पावली होती. तिने स्वप्नात ही विचार केला नव्हता की तिच्या बाळाचे इतके कौतुक होईल. कारण जहागिरदार माडीवरच्या बाईच्या बाळाला जित्त ठेवत नाहीत हेच ती आज तागायत ऐकत आली होती पण आज भलतच घडत होतं आणि ती ते उघड्या डोळ्यांनी पाहत होती.


सुभानराव,“ राधक्का जावळाचं मुल घिवूनशान निघाली हायस. बरुबर कोळसा घी आन बाळाला पदरा आड लपवूनशान घी.उगा लेकराला लागिर व्हायाचं.”  ते काळजीने सांगत होते.


महेंद्रप्रतापराव,“ दुद आन कापूस घितलीस नव्हं? पोरीला रस्त्यात भुका लागल्या म्हंजी.” ते बोलत होते. 


राधक्का,“ म्या घितलं हाय समदं संग आन न्हिती म्या नीट बाळाला तुमी निजा आता जावूनशान. आमी तांबडं फुटायाच्या आदी इतु परत.” ती बाळाला घेऊन शाल पांघरून जीपमध्ये राघवेंद्रच्या शेजारी बसत म्हणाली.


 राघवेंद्रने जीप सुरू केली. गावात आत्ता लाईट आली असली तरी रस्त्याने किर्रर्र अंधार होता.काय तो जीपच्या हेडलाईटचाच  उजेड होता. निम्म्या रस्त्यात दोघे गेले आणि बाळ रडायला लागले. तसं राधक्काने चालत्या गाडीतच कडीचा डबा उघडून त्यात असलेल्या दुधात कापूस भिजवून बाळाला दूध पाजलं तसं ते रडायचं शांत झालं आणि झोपी गेले. पुढच्या तीन तासात ते साताऱ्यात पोहोचले होते. राघवेंद्रने जयसिंगरावांच्या वाड्यासमोर गाडी थांबवली. आणि पुढे होऊन वाड्याची कडी  वाजवली. गाडीचा आवाज ऐकून मधुमालतीने खिडकीतुन वरून राघवेंद्र आणि राधक्काला पाहिलं होतं.त्यामुळे ती खाली आली. सावित्री आणि जयसिंगराव देखील उठून दिवाणखान्यात आले होते इतक्या रात्री कोण आले म्हणून विमल आणि मधुमालतीचा भाऊ ही आलेच होते.


मधुमालती,“ हे आणि आत्या आहेत दादा दार उघड.” ती म्हणाली आणि मधुमालतीच्या भावाने दार उघडलं.तसे दोघे आत आले आणि त्याने दार लावून घेतले.


सावित्री,“ पोरगी झाली नव्हं दिवानसाब?” तिने विचारलं.


राधक्का,“ व्हय वैनी पोरगीच झालीया म्हणून तर आलू नव्हं हतं.” ती पदरा आडून बाळ पुढे करत म्हणाली.


मधुमालती,“ मला माहित होतं कस्तुरीला मुलगीच होणार. बघू कोणासारखी आहे.” म्हणून ती उत्सुकतेने पुढे आली आणि सावित्रीने तिला अडवलं.


सावित्री,“ थांब वाईस. तुमी दोगं थांबा. इमला तांब्या भर पाणी आणि  भाकर तुकडा घिवूनशान यी. दारात लक्ष्मी आली हाय तिला असंच घ्यायची व्हय घरात जा बिगीनं.” ती म्हणाली आणि विमल धावतच गेली आणि सगळं घेऊन आली सावित्रीने राधक्काच्या पायावर पाणी घातलं. बाळावरून भाकर-तुकडा ओवाळून दाराच्या फटीतुन बाहेर फेकला.


जयसिंगराव,“ या आता आत आक्के, राघव या बसा.” ते म्हणाले आणि दोघे येऊन दिवाणखान्यात बसले. मधुमालतीचे सगळे लक्ष मात्र कापडात गुंडाळलेल्या बाळाकडे होते.


मधुमालती,“ आता तरी घेऊ का मी बाळाला आई?कोणासारखं असेल? त्याला कस्तुरीसारखा सुवास असेल का?” ती अधिरपणे बोलत होती.


सावित्री,“ दम की जरा. एका पोराची आय झालीस. आता दुसरी पोरगी पदरात घिणार हाईस पर लहान पोरावानी वागणं काय जात नाय. दिवनसाब तुमी दुगं जिवून निगला नसाल नव्हं? इमला जा बाय चूल पेटीव..”ती पुढे बोलणार तर राधक्काने तिचे बोलणे मध्येच थोडलं.


राधक्का,“ नगु वैनी आमा दोगास्नी तांबडं फुटायच्या आदी वाड्यावर पोचाया पायजेल.” ती म्हणाली.


सावित्री,“ असं कसं जी! तुमास्नी आन राघवरावास्नी बी भुका लागल्या अस्तिल्या नव्हं. जा बाय इमला राव्याची खीर रांध लगोलग हुतिया. वाईस वाईस प्या आन मंग जा. अन त्वां नुसती बाळ बग टकामका. पोरी असं सवतीचं मूल संबाळायाचं सोपं नाय. आन त्येची बिचारी आय त्वां या पोरी संगट उंद्या कशी बी वागली तर बी काय बुलयाची नाय.तिला त्यो आदीकार नाय. पर तिचा जीव मातूर तीळ तीळ तुटल नव्हं. पर म्या हाय तवर तुला ह्या पोरी बरुबर वंगाळ वागू द्यायची नाय. तुला तुज्या पृथ्वी परास या पोरीला जपाया पायजेल आता. आता ही तुजी हुनार हिला एकदाव पदरात घितलं की तुलाच ही आय म्हणील. बस दिवनसाबच्यासमुर आन तुजा  पदुर पुडं कर आन घी हिला तुज्या पदरात. आन अमास्नी वचन दि का तू या पोरीत आन तुज्या पोरात दुजाभाव कारायाची नाईस. आन तसं करशीला तर मंग म्या हाय आन त्वां हाय.” त्या तिला दम देत समजावत होत्या.


जयसिंगराव,“ बरुबर बुलतिया तुजी आई पोरी.या बाळाची जबाबदारी तुज्यावर हाय आता आन कुटली बी आगळीकी आमी खपवून घ्यायाचू नाय. या पोरीचा कशात काय बी दोष नाय आन आता त्वाचं तिची आई हाय ध्यानात ठिव.” त्यांनी ही सावित्रीच्या बोलण्याला दुजोरा दिला.


मधुमालती,“ मी वचन देते तुम्हा सगळ्यांना मी या बाळात आणि माझ्या मुलात कधीच भेदभाव नाही करणार.” असं म्हणून तिने पदर पसरला आन राधक्काने बाळ तिच्या पदरात टाकलं.तिने आणि सावित्रीने  बाळाला पाहिलं.


सावित्री,“ या बया दिवनसाब बाळ मोटं हाय की जी. याची आय बरी हाय नव्हं. लय तरास झाला असलं जी तिला.”ती बाळाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली.


राधक्का,“ व्हय तर तीन दिस पोर आडली होती जी. पर आता बरी हाय.” ती म्हणाली.


मधुमालती,“ हो ना पृथ्वीपेक्षा खूप मोठी आहे की ही. कस्तुरी बरी आहे पण आत्या काळजी घ्या तिची. आणि बाळ यांच्यासारखं आहे की. केस फक्त कस्तुरीसारखे  कुरळे आहेत. खूप गोड आहे ही. मी हिला कायम काळजाला धरून ठेवीन. इतकी सुंदर मुलगी माझी आता. आणि मी हिची आई.” ती बाळाला छातीला लावत म्हणाली आणि बाळ रडायला लागले. राधक्काने तिच्या हातात दुधाचा डबा दिला आणि तिने कापसाने बाळाला दूध पाजलं. तोपर्यंत विमल गरमगरम रव्याची खीर दूध घालून  घेऊन आली. तिनेही बाळाला पाहिलं.


विमल,“ लय देकनी हाय जी पोरगी.” ती म्हणाली.


मधुमालती,“ हो ना.”


 ती बोलत होती तोपर्यंत पृथ्वीच्या रडण्याचा आवाज आला तो बाहेर येऊन बसून पायरी  उतरू पाहत  होता. राघवेंद्र त्याच्याकडे धावत गेला आणि त्याने पृथ्वीला उचलून खाली आणले.


राघवेंद्र,“ बग बाळ…” तो म्हणाला आणि पृथ्वी मधुमालतीच्या शेजारी जाऊन बाळ पाहत बसला.दोघांनी खीर पिली आणि घाईघाईतच निघाले.


मधुमालती,“ आत्या कस्तुरीची काळजी घ्या.आणि आता निवडणूका आहेत पुढच्या महिन्यात तर जास्त ही धावपळ करू नका तुम्ही. मी येतेय तोपर्यंत आणि पत्र लिहीनच मी तुम्हाला आणि कस्तुरीला.” ती म्हणाली.


 राघवेंद्र आणि राधक्का रातोरात पुन्हा वाड्यावर पोहोचले होते.


  दुसऱ्याच बाळ त्यात ही जर सवतीच असेल तर कोणतीही बाई ते सहजासहजी स्वीकारत नाही आणि स्वीकारलं तर ते बाळ आणि आपले बाळ दोघांमध्ये फरक करतेच. हीच गोष्ट करायची नाही म्हणून मधुमालतीच्या आई- वडिलांनी तिला समजावून सांगितलं होतं. मधुमालतीने कस्तुरीच्या मुलीला पदरात तर घेतलं होतं आणि सगळ्यांना वचन ही दिलं होतं की तू तिच्या मुलात आणि या कस्तुरीच्या बाळात कधी भेदभाव करणार नाही पण ती तिचे वचन पाळू शकेल का?ती तिला स्वतःची मुलगी म्हणून तिच्या मुलात आणि त्या मुलीत फरक न करता तिची आई म्हणून सांभाळू शकेल का?

©स्वामिनी चौगुले

 

कथेचा या आधीचा भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग 48


  












 


  




Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post