माडीवरची बाई भाग 47

 




   थोडावेळ खोलीत शांतता पसरली. जो तो आपल्या आपल्या विचारात गढून गेला होता. राधक्काला भीती होती की जहागीरदारांच्या पापात आणखीन भर पडणार. राघवेंद्रला भीती होती. आधीच अन्याय झालेल्या कस्तुरीवर आणि आता तिच्या आणि त्याच्या मुलावर देखील अन्याय होणार की काय? मधुमालतीला भीती होती एक स्त्री, एक आई आणि एक मैत्रीण म्हणून कस्तुरीवर आणि तिच्या बाळावर होणारा अन्याय ती रोखू शकेल की नाही? तर महेंद्रप्रतापरावांना भीती होती कडू बी निपजले तर जहागीरदारांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल आणि पुढे जाऊन त्यांच्या खऱ्या वारसांना सावत्रपणातून निर्माण झालेला द्वेष आणि संघर्ष सोसावा लागेल. सुभानराव मात्र या सगळ्यात थोडे शांत दिसत होते. इतकावेळ उभं राहून पायाला रग लागल्यामुळे ते खाटवर बसले.तिथे उपस्थित प्रत्येक जण स्वतःला वाटणाऱ्या भीतीने ग्रासला होता. 

 

   शेवटी पुन्हा महेंद्रप्रतापरावच बोलायला लागले.


महेंद्रप्रतापराव,“ राघव तुला  असा शबूद फिरवायाला यायचा नाय. जहागीरदारांच्या खानदानात कडू बी निपजलं न्हाय आन पुडं बी म्या ते हु द्यायाचू नाय.” ते आता शांतपणे पण निश्चयाने बोलत होते.


राघवेंद्र,“ पर मी बी माजं आन कस्तुरीच मुल असं मारू द्यायाचो नाय तात्या.” तोही इरेला पेटला.


राधक्का,“ मामंजी तुमी काय तर बुला की जी. कसं भांडायाला लागल्याती बाप-लेक.” ती रडकुंडीला येत मध्येच म्हणाली.


महेंद्रप्रतापराव,“ व्हय अण्णा तुमी सांगा हेला का आपल्या खानदानात कडू बी ठिवत नायती. म्हणूनशान म्या म्हणत हुतो का माडीवर बाय नगु ठिवाया आन त्यात कस्तुरी तर नगुच नगु. मला म्हैत हुतं  ही येळ येणार आन आपलं हे पोर असच वागणार हाय. राघव उगा हट करू नगुस त्याचा काय बी उपयाग व्हायाचा नाय.” ते तणतणत होते.


राघवेंद्र,“ तात्या कस्तुरीच्या पोटालं मुल कडू बी न्हाय. मी तिच्या संगट देवा-बामनाच्या समुर लगीन केलं हाय जशी मधू माझी बायकू हाय तशी ती बी हाय. मंग ते कडू बी कसं झालं?” 


महेंद्रप्रतापराव,“ पर कस्तुरी फकस्त तुज्या साटनं तुजी बायकू हाय पर समाजा साटनं आन आमच्या साटनं ती त्वां ठिवलेली बाय हाय. माडीवरली बाय तुजी रखेली आन तिचं मुल म्हंजी कडू बी.” ते आता चांगलेच चिडले होते.


राघवेंद्र,“ तात्या मला मान्य हाय माजं आन तिचं लगीन समाज मान्य नाय पर म्हणूनशान तुमी आमचं मुल जित्त गाडणार व्हय. आदीच जहागिरदारांनी लय पापं किली हायती त्येत आजूनशान भर कशा पाय घालतायसा? ती समदी पापं माज्या आन आपल्या म्होरच्या पिड्या समुर उबी राहणार हायती.”तोही ऐकण्याच्या मनःस्थित नव्हता.


महेंद्रप्रतापराव,“ लय बुलतुयास राघव त्वां. हीच शिकिवलं हाय का अमी तुला.. बा समुर त्वांड उचलूनशान कवा बसणं बुलया लागला हाईस त्वां. त्वां माज्या लाडाचा हाईस म्हणूनशान तुजी आगळीकी आन घराण्याची रीत अमास्नी मोडता याची नाय. अण्णा सांगा हेला जरा.” 


span face="Arial, sans-serif" style="font-size: 11pt; font-variant-alternates: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; font-variant-position: normal; vertical-align: baseline; white-space-collapse: preserve;">सुभानराव,“ तुमी जरा गप बसा दुगं बी. आन राघव बाला वाद घालाया त्वां आजूनशान हतका मोटा नाय झाला. आन जहागीरदारांच्या खानदानात बा समुर हुबारून आवाज वडवीत नायती इसरला काय त्वां?” ते राघवेंद्रला दम देत म्हणाले तसा राघवेंद्र वरमला.


राघवेंद्र,“ मापी करा तात्या मी चुकलो.” तो खाली मान घालून म्हणाला.


सुभानराव,“महिंद्रा म्या एक मदली वाट सांगतु. राघव चुकला पर चुकीचं बुलीत नाय. आदीच लय पापं झाल्याती आपल्या कडूनशान म्या तर माज्या हातनं चार जित्ती पोरं गाडली हायती. माज्या बानं आन त्येच्या बानं आन अजून त्येच्या बानं किती पिड्यानी अशी पोरं गाडली हायती आन किती माणसं मारली हायती त्येला हिसाब नाय. परसात त्या भीतीपल्याड मसनवाटा झाला हाय बाबा. म्या संवताला कदी बी माप करूयला नाय बाबा. चार संवताची पोरं गाडली हायती ह्या हातनं. आन त्या शेवंतीच रडणं आरडंनं आन छाती बडवूनशान शाप देणं समदं  आटवलं का भ्या वाटतया मला. तिचा शाप कदी बी फळंल या ईचारानं रात रात झ्वाप लागत नाय रं. आता आणूनशान पापंच भागीदार व्हाया नगु रं महिंद्रा. राघव तुजं आन कस्तुरीच पोर आमी नाय गाडायाचू पर ते जलमलं का त्येला साताऱ्याच्या पांजरपोळात (अनाथ आश्रमात) सुडूनशान याच. सवतरपणाची आग घराण्याची राक करत अस्तिया. त्येत कडू बी म्हणूनशान त्येला हिनविणार त्या परास सुडून यी तकडं. जित् ऱ्हाईल ते.त्या माऊलीला समादान पोर जित्त हाय म्हणूनशान कवा तर बागूनशान या जाऊन दोगं पोर.” ते धोतराच्या सोग्याने डोळे पुसत म्हणाले.


राघवेंद्र,“ म्हंजी शेवटाला तुमी माय-लेकराची ताटातूट करणारच?” 


सुभानराव,“ त्येला काय बी इलाज नाय बाबा. व्हय रं महिंद्रा तुला मान्य हाय का ही?” त्यांनी विचारलं.


महेंद्रप्रतापराव,“ खानदानाच्या नावाला बट्टा लागणार नसल तर माजं काय बी नाय अण्णा.” ते म्हणाले आणि इतका वेळ शांतपणे सगळं ऐकणारी मधुमालती आता बोलू लागली.


मधुमालती,“ माफ करा अण्णा, मामंजी मी लहान आहे खूप तरी मध्ये बोलतेय. मला काही तरी विचारायचं आहे. अण्णा तुम्ही म्हणालात की सावत्रपणा नको म्हणून मुल सोडून या पांजरपोळात.  मुलगा झाला तरच सावत्रपणा, जमीनदारीत भागीदारी वगैरे गोष्टी येतील किंवा मग लोक त्याला कडू बी म्हणून हिनवतील पण मुलगी झाली तर?” तिने विचारलं.


सुभानराव,“ तुला काय म्हणायाचं हाय मालू?” त्यांनी विचारलं.


मधुमालती,“ म्हणजे बघा कस्तुरीला मुलगी झाली तर ती मोठी झाली की लग्न होऊन तिच्या घरी जाईल ना? ती कुठे भांडत बसणार आहे?” ती म्हणाली.


महेंद्रप्रतापराव,“ पर मालू कस्तुरीची म्हंजी ठिवलेल्या बायची पोरगी तिच्या बरुबर लगीन कराया कोण तयार हुनार हाय?उगा काय तर नगु बुलू.”


मधुमालती,“ पण तिला मी पदरात घेतलं तर माझी मुलगी म्हणून आणि मुलगा झाला तरी मी पदरात घ्यायला तयार आहे. शेवटी मुल तर यांचच असणार आहे ना?” ती बोलत होती आणि राघवेंद्र तिच्याकडं आश्चर्याने पाहत होता.


राधक्का,“ मालू येडी का खुळी त्वां? सवतीची पोरं सावतरपणा बिन करता पोसायाची म्हंजी लय अवघाड काम हाय. उगा काय तर डोस्क्यात घिवू  नगु त्वा. त्या परास पांजरपोळ बरा हाय त्या मुलास्नी.” ती मधुमालतीला रागावत म्हणाली.


महेंद्रप्रतापराव,“ राधा बरुबर बुतीया मालू. आन पोरगं झालं म्हंजी तुज्या वट्यात दिवूनशान जहागीरदारांचा वारस करावा का आमी त्येला? उगा गप ऱ्हा.” ते राधक्काची री ओढत म्हणाले.


मधुमालती,“ पण मुलगी झाली तर? ती तुम्हाला थोडीच वारसा हक्क मागणार आहे? मी घेईन पदरात आणि माझ्या पृथ्वीसारखं सांभाळीन तिला. पण मुलगी झाली तर राहू द्याना मामंजी या वाड्यात तिला. ती माझी मुलगी म्हणून राहील.” ती हात जोडून बोलत होती.


सुभानराव,“ बरं पोरगी झाली तर तुज्या वट्यात घालू  पर एक अट हाय का त्वां त्या पोरीला संवताची पोरगी म्हणूनशान माया लावायाची तिला ही कंदी बी नाय कळलं पायजेल की त्वां तिची आय नाय.पर पोरगं झालं तर मातूर आमी ठिवूनशान घ्यायाचो नाय. नाय तर त्वां तुज्या आन त्या लेकरा मंदी फराक करशीला आन समदं अवगाड हून बशील. बग ही सोप नाय हाय एकदाव अजून इचार कर.”ते तिला समजावत म्हणाले.


मधुमालती,“ माझा विचार झाला आहे जर कस्तुरीला मुलगी झाली तर तुम्ही माझ्या पदरात टाकायची.मी तिचं आईपण पत्करेन तिला कधीच कळणार नाही की मी तिची खरी आई नाही. मी शब्द देते तुम्हाला. जसा पृथ्वी तशी ती असेल माझ्यासाठी.” ती ठामपणे म्हणाली.


सुभानराव,“ मंग त्वां पुटुशी हाय म्हणूनशान वावडी उटवाया पायजेल. आन त्वां वावडी उटली का हतं नाय ऱ्हायाचं साताऱ्याला जा. जयसिंग आन सवित्राला महिंद्रा समदं सांगल. ते काय परकी नायती. तवा काळजी नाय. आन कस्तुरी काय खाली उतरत नाय तवा ती पुटूशी हाय ती कुणाला नाय कळायाचं. जर कस्तुरीला पोरगी झाली तर राघव त्वां आणि राधक्का रातोरात साताऱ्याला मालुकडं निवूनशान सोडायची. सव्वा मास झालं का ती ईल घिवूनशान बाळ. पर पोरगं झालं तर मातूर मालूच मूल जलमाला इवूनशान मेलं असं सांगायाचं आन ते पोरगं रातोरात साताऱ्याच्या पांजरपोळात निवूनशान सोडायाचं राधक्का त्वां आन राघव. राघव हाय का मंजूर तुला?” त्यांनी राघवेंद्रकडे पाहत विचारलं. राघवेंद्रकडे दुसरा पर्याय तरी कुठे होता.


राघवेंद्र,“ बरं कबूल हाय मला.” तो म्हणाला.


महेंद्रप्रतापराव,“ राधक्का रकमीला सांगुनशान ठिव कुटं बी त्वांड उगडायाच नाय. आन तिचं सुईन हाय तवा कस्तुरीची समदी काळजी आन बाळांपण त्वां तिची मदत घिवूनशान करायाचं. बाकी एका बी नोकराला कळाया नाय पायजेल का कस्तुरी पुटूशी हाय ते. आन तिलाच सांग वावडी उटवाया मालू पुटूशी हाय म्हणूनशान. आन मालू त्वां म्या आन राघव त्वां आपून आट दिसात साताऱ्याला जाऊ. आन तुमी दोगं कस्तुरीला समदं समजावूनशान सांगा.” ते म्हणाले.


   मधुमालती पृथ्वी रडायला लागला म्हणून त्याला घेऊन तिच्या खोलीत गेली. राघवेंद्र तिच्या पाठोपाठ खोलीत गेला. आज जे काही त्याच्या आणि कस्तुरीच्या मुलासाठी मधुमालतीने केलं होतं त्यामुळे तो जन्मभरासाठी जणू तिचा ऋणी झाला होता.


   पण कस्तुरीच्या मुलाचा जीव जरी वाचला असला तरी तो मुलगा असेल की मुलगी यावर त्याचे भवितव्य ठरणार होते. मुलगा असेल तर त्याच्या नशिबी अनाथ नसून सुद्धा अनाथाचे आयुष्य येणार होते. आणि मुलगी झाली तर? तर ती वाड्यात राहणार होती पण मधुमालतीची मुलगी म्हणून स्वतःचे मूल असताना मधुमालती त्या मुलीवर स्वतःच्या मूलीसारखी माया करू शकणार होती का? की सावत्रपणाचे चटके त्या मुलीला सोसावे लागणार होते? पण हा आत्ता होणाऱ्या मुलाचा प्रश्न सुटला होता पण पुढे.!! पुढे अजून कस्तुरीला मुले झाली तर? त्यांच्या नशीबी काय होते. हा प्रश्न तर आ वासून उभा होताच की.


कस्तुरीला मुलगा होईल की मुलगी? 

क्रमशः

©स्वामिनी चौगुले


कथेचा या आधीच भाग खालील लिंकवर 👇

माडीवरची बाई भाग 46

अशाच मनोरंजक कथा वाचण्यासाठी लाईक आणि फॉलो करा आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला.

     

   













Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post