माडीवरची बाई भाग 46

 




रात्र गेली दिवस उगवला. कस्तुरीचे मन मात्र राघवेंद्रच्या बोलण्यामुळे अस्वस्थ झाले होते. तिच्या मनाच्या महासागरात अनेक विचारांच्या लाटा उसळत होत्या आणि तिने महादेवा पुढे हात जोडले.


“ देवा महादेवा तुला तर समदं म्हैत अस्तया. आज आन येणाऱ्या येळत काय हुनार हाय हे बी तुला म्हैत हाय. त्वां फकस्त सारकरांच्या मगं ऱ्हा. इवडच मागती तुज्याकडं.” 


★★★★


   मधुमालती रोज तिच्याकडं भजन शिकायला येत होती. तिने जाऊन सुरपेटी आणली होती. तिचा रियाज  सुरू होता. कस्तुरी आता वाचायला लिहायला तर शिकली होती आता ती पाढे आणि आकडेमोड शिकत होती.राघवेंद्र आता दीड वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीची तयारी करू लागला होता. त्याने बाकी गावात देखील मूलभूत सोयीसुविधा हळूहळू आणायला सुरुवात केली होती. शाळा, शेती आणि बाकी कामे यात त्याचा वेळ जात होता पण तो किती ही व्यस्त असला तरी  संध्याकाळी पाच नंतरचा त्याचा सगळा वेळ कुटूंबासाठी असे पृथ्वीबरोबर  खेळणे, मधुमालती, सुभानराव आणि महेंद्रप्रतापरावांशी राजकारण, समाजकारणावर चर्चा करणे. तासभर माडीवरवर कस्तुरीबरोबर गप्पा मारणे तिचा अभ्यास घेणे हे सगळं त्यांचं सुरू होते. त्यातच तो रात्री कधी मधुमालतीबरोबर तर कधी ती झोपल्यावर कस्तुरीबरोबर घालवत होता.


  आज कस्तुरीला थोडे अस्वस्थ वाटत होते.मधुमालती  माडीवर आली तर कस्तुरी झोपली होती.


मधुमालती,“ काय झालं कस्तुरी? बरं वाटत नाही का? आपण वैद्य बुवांना बोलावू थांब मी गड्याला पाठवून देते.” ती काळजीने तिच्या कपाळावर हात ठेवून बोलत होती.


कस्तुरी,“ नगु जी. ते मला ना कसतरी हुतया. मळमळ करतया आन गरागरा फिरतया जी.” ती कशी बशी उठून बसत म्हणाली.तिचं बोलणं ऐकून मधुमालती विचारात पडली


मधुमालती,“ कस्तुरी तुझी पाळी चुकली आहे का?” तिने विचारलं.


कस्तुरी,“ तसं सांगता याच नाय पर तारीक हून गिली पर आजूनशान आली नाय जी. या बया. म्या पुटूशी हाय का काय? देवा महादेवा असं व्हाया नगं.” ती घाबरून रडत म्हणाली.


मधुमालती,“ अगं इतकं घाबरायला काय झालं? जर तसं असेल तर आनंदाची बातमी आहे की.” ती आश्चर्याने म्हणाली.


कस्तुरी,“ तुमास्नी जहागीदारांची रीत म्हैत नाय? बाईसाब जहागीरदार माडीवरल्या बायचं मूल ठिवित नायती.परसातल्या  त्या भीती पड्याल जितं मूल निवूनशान गाडत्याती. म्या वाड्यात यायच्या आदी सरकार आन माज्याकडनं वादवूनशान घितलं हाय तसं थोरल्या सरकारांनी. मला मूल नगु मला आयपण नगु. माज्याच्यानं सहीन नाय व्हायचं माजं जितं मूल गाडलेलं.” ती घाबरून मधुमालतीला मिठी मारून रडत होती.


  मधुमालती मात्र तिचे बोलणे ऐकून सुन्न होती. तिचा  विश्वास बसत नव्हता की ती ज्या  लोकांमध्ये इतके दिवस राहतेय ते इतके क्रूर पण वागू शकतात.


मधुमालती,“ कस्तुरी… माझ्याकडं बघ. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?” तिने तिचे डोळे पुसून तिच्या डोळ्यात पाहत विचारलं.


कस्तुरी,“ व्हय.” 


मधुमालती,“ मग तुझ्या मुलाच्या बाबतीत असं काही होणार नाही. मी ते होऊ देणार नाही. तू शांत हो. रखमा मावशी आली वर तर तिला काहीच बोलू नकोस. मी हे घरी आल्यावर यांच्याशी बोलते. तू धीर नको सोडू. मी आहे ना? तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही मी शब्द देते तुला.” ती तिच्या हातावर हात ठेवत म्हणाली.


कस्तुरी,“ म्या नाय बोलायची काय. तुमी हायसा नव्हं माज्याबरुबर मंग झालं.” ती म्हणाली.


    आज मधुमालती राघवेंद्रची वाट आतुरतेने पाहत होती. तिला त्याला सगळं कधी सांगेन असं झालं होतं. पण तिने मनोमन निश्चय केला होता की जर कस्तुरी गरोदर असेल तर तिच्या बाळाला ती काही होऊ देणार नाही. शेवटी मधुमालती देखील आई होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं कस्तुरी तिची सखी आणि तिची गुरू होती. संध्याकाळी राघवेंद्र आला. तो पृथ्वीबरोबर चौकात खेळत होता पृथ्वी आता एक वर्षाचा झाला होता आणि तो नुकताच चालायला शिकला होता. 


मधुमालती,“ मला तुमच्याशी बोलायचं आहे.”


राघवेंद्र,“ बुल की मंग.” तो सहज म्हणाला.


मधुमालती,“ तुम्ही खोलीत चला ना तो एक लेख लिहला आहे ना वर्तमानपत्रात द्यायला तोच दाखवायचा होता. सखू sss जरा पृथ्वीकडे लक्ष दे. अण्णांना आवरत नाही तो. वर पायऱ्या चढायला जातो.” ती म्हणाली आणि सखू तिथे आली.


राघवेंद्र,“ अण्णा मी आलूच.” असं म्हणून तो गेला. तोपर्यंत राधक्का ही चौकात आली.


सुभानराव,“ राधक्का मालू जरा इचित्र वागतीया आज.”


राधक्का,“ व्हय. माडीवरून आली तवा बसणं तिचं मन थाऱ्यावर नाय बगा.” ती म्हणाली.


सुभानराव,“ दोगीत काय तर बिनासलं असल.” ते म्हणाले.


इकडे खोलीत


मधुमालती,“ असली कसली अघोरी प्रथा आहे आपल्या घराण्यात हो? माडीवरच्या बाईला मुलं झाली तर ती जिवंत गाडायची. आणि तुमच्याकडून आणि कस्तुरीकडून अण्णा आणि मामंजींनी तिला वाड्यात आणताना हे असं कबूल करून घेतलं. आणि तुम्ही तयार कसे झालात याला?” ती चिडून बोलत होती.


राघवेंद्र,“ माज्या समुर कंदी असं झालं नाय मधू. तात्यांनी बायच ठिवली नाय. पर अण्णा त्येंनी ठिवली हुती बाय आन तिची आन त्येंची चार मुलं त्येंनी परसातल्या भीती पल्याड जिती पुरली असं ते म्हणत्यात. आन कस्तुरीला आणताना माज्या समुर ही अट मान्य करण्या बगार दुसरा रस्ता नव्हता. पर तुला हे समदं… म्हंजी कस्तुरी पोटूशी हाय?” त्याने खुर्चीवर बसत विचारलं.


मधुमालती,“ हो मला तरी तसं वाटतंय पण मी कस्तुरीच बाळ असं पुरु देणार नाही.समजलं तुम्हाला.” ती चिडून म्हणाली.


राघवेंद्र,“ येडी का खुळी त्वां. आन मी असं माजं आन तिचं बाळ पुरु दिन व्हय गं? मधू त्वां माजी सात दिशील नव्हं. तात्या ऐकणार न्हाईत.ते  जहागीरदार घरण्यात कडू बी नगु म्हणूनशान इरंला पेटत्याल. ते दिसत्याती साद पर त्येंच्या घरण्याचं नाव आन इब्रत लय प्यारी हाय त्येस्नी. ते माज्या बरुबर लय वंगाळ वागले हायती. पर मी बी नाय गप बसायाचू  मला माजं अन कस्तुरीच बाळ पायजेल.” तो ठामपणे बोलत होता.


मधुमालती,“ मी तुमच्याबरोबर आहे. कस्तुरी माझी सखी, गुरू आणि सगळ्यात महत्त्वाचं एक बाई आहे. तिच्यापासून तिचे बाळ असं कोणी हिरावून नाही घेऊ शकत.पण थोडे दिवस आपण शांत राहू कस्तुरी खरंच आई होणार आहे का? ते आपल्याला कळले की मग काय ते पाहू. तुम्ही थोड्यावेळ पृथ्वीबरोबर खेळा आणि वर जा. खूप घाबरली आहे ती. तिला गरज आहे तुमची.”  ती त्याचा हात हातात घेत म्हणाली.


राघवेंद्र,“मधू मी तुजं हतकं उपकार कसं फेडणार गं? त्वां मला समजून घितलीस. कस्तुरीच माजं नातं समजूनशान घितलीस आन आता त्वां आमच्या बाळा साटनं समद्या संगट भांडायाला तयार हायस.” तो आवंढा गिळून कातर आवाजात म्हणाला.


मधुमालती,“ मी काही तुमच्यावर उपकार वगैरे करत नाही. कस्तुरी माझी ही कोणी तरी आहे आणि तिच्या पोटातले बाळ देखील आणि लक्षात ठेवा म्हणलं ते काय तुमच्या दोघांचचं बाळ नाही. आपलं बाळ आहे. मी मोठी आई आहे त्याची असा माझा हक्क सोडत नसते मी.” ती त्याच्या डोळ्यातले पाणी हाताने पुसत तोंड फुगवून म्हणाली.


राघवेंद्र,“ बरं बाय त्येच्यावर समद्यात ज्यादा हाक तुजा असलं.” तो गालात हसून म्हणाला.


      राघवेंद्र बाहेर आला तो पृथ्वीशी खेळत होता पण त्याचे लक्ष त्याच्याकडं नव्हतं. सुभानराव आणि महेंद्रप्रतापराव यांच्या अनुभवी नजरेतून राघवेंद्रचे वागणे सुटले नव्हते पण त्यांनी दुर्लक्ष केलं. तो थोड्या वेळाने वर गेला. तर कस्तुरी उठून महादेवा पुढे सांजवात लावत होती.तिने त्याला पाहिलं आणि त्याला मिठी मारली.


कस्तुरी,“ सरकार म्या पुटूशी हाय वाटतं. आता काय हुनार? का माजं बी मुलं परसात जितं गाडलं जाणार जी?” ती घाबरून रडत त्याला विचारत होती.


राघवेंद्र,“ असं काय बी नाय व्हायचं मी अन मधू नाय हु द्यायचं असं. त्वां फकस्त शांत ऱ्हा. रकमा मावशीला काय बी कळू दिव नगुस. अपुन काय तरी रस्ताकाडू  यातनं.” तो तिला खाटावर बसवून समजावत होता.


कस्तुरी,“ पर आपून शबुद दिला हाय नव्हं थोरल्या सरकारास्नी?” 


राघवेंद्र,“ कस्तुरा अपुन दिला नाय त्येंनी घितला हाय शबुद. त्वां लय इचार करू नगुस. शांत ऱ्हा मी हाय नव्हं.” तो तिला समजावत म्हणाला.



  पुढचे चार दिवस असेच गेले. कस्तुरी रखमाबरोबर जरा फटकुन वागत होती.  पण फुलांचा सुगंध आणि उगवणारा सूर्य झाकून राहत नाही तसेच बाईचे गरभारपण देखील जास्त दिवस झाकून राहत नाही त्यात घरात जर रखमासारखी अनुभवी सुईन असताना तिच्या नजरेतून कस्तुरीचे बदललं रंगरूप जेवणात झालेला बदल तिच्या लक्षात आल्या शिवाय राहिला नाही. रखमा होती चांगली. तिचा कस्तुरीवर मुली प्रमाणे जीव होता पण तिचे इमान जहागीरदार  वाड्याशी बांधले गेले होते. ती एक दिवस न्याहरी घेऊन आली आणि कस्तुरी अजून झोपलेली तिला दिसली. ती झोपलेल्या कस्तुरी जवळ गेली आणि तिचा हात हातात घेऊन नाडी परीक्षण केलं. कस्तुरी जागी झाली आणि तिच्या हातातून हात काढून घेतला पण तोपर्यंत उशीर झाला होता आणि रखमाला जे कळायचं ते कळून चुकलं होतं.


रखमा,“ जे घडाया नगु हुतं तेच झालं हाय.त्वां पुटूशी हाईस पोरी. मला थोरल्या मालकीण बायला सांगाया पायजेल.” ती म्हणाली आणि कस्तुरीला बोलायला वेळ ही न देता निघून गेली.


 राधक्का आणि मधुमालती स्वयंपाक घरात होत्या.


रखमा,“ बाईसाब आवं ती कस्तुरी पोटूशी हाय जी.” ती कसं बसं म्हणाली.


राधक्का,“ या बया. आता गं काय करायाचं? किती मास झालं हैती?” तिने घाबरत विचारलं.


रखमा,“ दोन मास झालं अस्त्याली जी.” 


राधक्का,“ मला ह्यास्नी, मामंजीस्नी आन राघवला बी सांगाया पायजेल. जे भ्या हुतं तेच झालं बाय.( ती काळजीने धडपडत उठली आणि चौकात आली.तिच्या पाठोपाठ मधुमालती ही होती.सुभानराव आणि  महेंद्रप्रतापराव पृथ्वीबरोबर खेळत होते. राघवेंद्र ही तयार होऊन नुकताच बाहेर आला होता.) तुमी समदी राघवच्या खुलीत चला रकमे पृथ्वीला घी.” ती म्हणाली आणि तिचे हावभाव पाहून सगळे गुपचूप तिच्या मागे गेले राघवेंद्रला तरी शंका आली आणि त्याने मधुमालतीला डोळ्यांनीच विचारलं तसं तिने होकारार्थी मान हलवली.


महेंद्रप्रतापराव,“ काय झालं या राधे? सकाळच्या पारी का बावचळलीयास त्वां?”त्यांनी विचारलं.


राधक्का,“ आवं कस्तुरी गरवार हाय. आता काय करायाचं?” तिने घाबरत विचारलं.


महेंद्रप्रतापराव,“ आज नाय उंद्या ही हुणारच हुतं नव्हं आन काय करायचं म्हंजी? जे आतापातूर हुतं आलं तेच हुनार.” ते कठोरपणे म्हणाले.


राघवेंद्र,“ पर आता पातूर झालं ते मी नाय हु द्यायचू. माजी अन कस्तुरीची पोरं जिती गाडू दिणार नाय मी.” तो रागाने म्हणाला.


महेंद्रप्रतापराव,“ जहागिरदाराच्या खानदानात कडू बी ठिवत न्हाईती. आन त्वां कबूल किलं हुतं कस्तुरीला आणताना तसं.” ते ही आता रागावले होते.


राघवेंद्र,“ मी कबूल किल नाय तर तुमी तसं कबूल करूनशान घितलं हुतं.कस्तुरीच आन माजं मूल तुमच्या असल्या अगोरी रितीला बळी पडणार न्हाय तात्या.” तो ही रागाने पण ठामपणे बोलत होता.


   महेंद्रप्रतापराव आणि सुभानराव पूर्वापार चालत आलेली अघोरी प्रथा राघवेंद्र आणि मधुमालतीला इतक्या सहज मोडीत काढू देतील का? की कस्तुरीच्या बाळाच्या नशिबी ही  जिवंत गाडले जाणे होते बाकी बायकांच्या बाळांप्रमाणे?

क्रमशः

©स्वामिनी चौगुले


कथेचा आधीचा भाग खालील लिंकवर👇


माडीवरची बाई भाग 45

अशाच मनोवेधक कथा वाचण्यासाठी लाईक आणि फॉलो करा शब्द मंथन पेजला.


 










Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post