माझं घर माझा संसार भाग 3 (अंतिम)




 रात्र अशीच गेली. पहाटेचे सहा वाजले होते.डॉक्टर विशाखाला तपासून बाहेर आले.


सिद्धार्थ,“ डॉक्टर विशाखा कशी आहे?”


डॉक्टर,“ त्या आता आऊट ऑफ डेंजर आहेत.तुम्ही त्यांना भेटू शकता पण एकच जण भेटा.” ते म्हणाले आणि निघून गेले.


  सिद्धार्थ आय.सी.यु मध्ये गेला.विशाखा डोळे उघडून सगळीकडे पाहत होती.सिद्धार्थ तिच्याजवळ स्टूलवर जाऊन बसला.


सिद्धार्थ,“ कसं वाटतंय विशु तुला?” त्याने तिचा हात धरून विचारलं.


विशाखा,“ सावी.. रावी.. कुठे ..आहेत? माझ्या.. पोरी… त्यांना ती… बाई… मला ….वनिताशी.. बोलायचंय.. ती.. असेल..ना.. इथे? तिला बोलवा तुम्ही…” ती अडखळत बोलत होती.


सिद्धार्थ,“ तू शांत हो ना विशु. बघ तुला त्रास होतोय. पोरी घरी आहेत.आणि वनिता आहे बाहेर.” तो तिचा हात धरून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत बोलत होता आणि तिने त्याचा हात झिडकारला.

 

विशाखा,“ तुम्हाला…. कळत.. नाही …का?.. मला तुमच्याशी नाही..बोलायचं… वनिता…ला.. बोलवा..” ती पुन्हा अडखळत बोलत होती.


सिद्धार्थ,“ प्लिज तू शांत हो मी वनिताला बोलावतो.(असं म्हणून तो बाहेर गेला.) वनिता विशु तुला बोलवतेय. जा तू लवकर.” तो डोळ्यातले पाणी पुसत म्हणाला आणि वनिता आत गेली. विशाखाने तिला पाहिलं आणि बोलू लागली.


विशाखा,“ वनिता… माझं एक.. काम.. करशील..? माझ्या पोरींना.. तू… तुमच्या.. घरी..घेऊन… जा… मी हॉस्पिटलमध्ये … आहे…तोपर्यंत.. तुझ्याकडे.. ठेवून घे. तुझ्या…शिवाय… माझा.. कोणावर…विश्वास… नाही.. ती.. बाई…मला भीती वाटते…” ती पुन्हा अडखळत बोलत होती.


वनिता,“ हो वहिनी मी घेऊन जाते आमच्या घरी पोरींना आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये असे पर्यंत का? तुम्ही चांगल्या ठणठणीत बऱ्या होऊ पर्यंत सावी-रावीच का? तुम्ही ही राहायचं हा तिथे. तुम्ही शांत व्हा बरं. असा त्रास करून घेतला तर लवकर बऱ्या कशा व्हाल तुम्ही?” ती विशाखाचा हात धरून धीर देत म्हणाली आणि विशाखा शांत झाली. तिला इतकं बोलल्यामुळे थकवा आला होता. तिने डोळे झाकून घेतले आणि वनिता बाहेर आली.


सिद्धार्थ,“ काय म्हणाली विशु वनिता? ती असं वागत नाही गं. काय झालं आहे तिला काही कळत नाही.” तो काळजीने बोलत होता.


वनिता,“ त्या घाबरल्या आहेत कशाला तरी. पोरींना तुझ्या घरी घेऊन जा. मला तुझ्याशिवाय कोणावर विश्वास नाही वगैरे बडबडत होत्या. काही तरी मोठं झालं आहे भाऊजी ज्यामुळे वाहिनींची अवस्था अशी झाली आहे. संदीप तू घरी जाऊन पोरींना घेऊन ये त्यांना भेटायला. वाहिनींना पोरींना भेटून बरं वाटेल आणि हो मी त्यांचं आवरून त्यांना काही तरी खायला घालून दुपारी पोरं घेऊन घरी जाते. आज पोरांचे स्कुल चुकलं तर चुकू दे.” ती बोलत होती. तोपर्यंत विशाखाची आई, भाऊ आणि सिद्धार्थचे बाबा हॉस्पिटलमध्ये आले.


संदीप,“ मी जातो. दादा तू ही घरी चल. तुझं आवरून काही तरी खाऊन ये.” 


सिद्धार्थ,“ नको मी आहे इथेच. ही ऑफिस बॅग घेऊन जा माझी. मी इथेच फ्रेश होईन.” तो म्हणाला.


विशाखाची आई,“ कशी आहे विशु आता.” त्यांनी काळजीने विचारलं.


वनिता,“ त्या आता आऊट ऑफ डेंजर आहेत मावशी. तुम्ही जा दोघे भेटा त्यांना. त्यांना बरं वाटेल. मी त्यांना नाश्ता काय द्यायचा ते विचारून येते.” ती म्हणाली आणि विशाखाची आई आणि भाऊ तिला भेटायला गेले.


सिद्धार्थ,“ बाबा आई आणि विशाखामध्ये असं काय झालं? ती खूप घाबरली आहे. पोरींना वनिताला घेऊन जा म्हणाली घरी. माझ्याशी तर ती बोलली सुद्धा नाही हो नीट. जणू तिचा माझ्यावरचा विश्वास उडाला आहे.” तो कातर आवाजात बोलत होता आणि त्याच्या डोळ्यातून कढ वाहत होते.


बाबा,“ आरे मी बाहेर गेले होते.जेंव्हा घरी आलो तेंव्हा मालन मला पाहून म्हणाली की विशाखा किचनमध्ये बेशुद्ध पडली आहे. मला नाही माहीत दोघींमध्ये काय झालं आहे.” ते बोलत होते.


वनिता,“ दोघींमध्ये काही तरी भयंकर घडलं आहे बाबा. त्याचा विशाखा वाहिनींनी धसका घेतला आहे. आणि त्यामुळेच त्यांची अवस्था अशी झाली आहे.” ती म्हणाली.


सिद्धार्थ,“ मी आईलाच विचारतो. तिने असं काय केलं विशाखाबरोबर? की विशाखाची अवस्था अशी झाली आहे?” तो थोडा रागात म्हणाला.


संदीप,“ उगा वेडेपणा करू नकोस दादा तू. आई कशी आहे माहीत आहे ना तुला? ती कांगावा करेल. आधी वहनीला बरं वाटू दे. आपण तिच्याकडे लक्ष देऊ आधी. मी जातो आणि पोरं घेऊन येतो.” तो त्याला समजावत म्हणाला आणि निघून गेला.

br />

आठ दिवसांनंतर


  आज विशाखाला डिस्चार्ज मिळणार होता. या आठ दिवसात विशाखा सिद्धार्थशी खूप तुटक वागली होती. ते सिद्धार्थच्या ही लक्षात आले होते पण तरी तो शांत होता. सध्या विशाखा बरी होणे त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. या आठ दिवसात मात्र मालनबाई एकदा सुद्धा विशाखाला हॉस्पिटलमध्ये भेटायला आल्या नव्हत्या.डॉक्टरांनी विशाखाला कोणताही मानसिक आणि शारीरिक ताण येणार नाही याची काळजी घ्या अशी सक्त ताकीद दिली होती.


   विशाखाच्या आईने विशाखाला आवरायला मदत केली. वनिता ही हॉस्पिटलमध्ये आलीच होती. सिद्धार्थ, संदीप आणि त्यांचे बाबा देखील हॉस्पिटलमध्ये आले होते.


विशाखा,“वनिता मला माहित आहे मी तुला खूप त्रास देत आहे. आधीच आठ दिवस झालं सावी-रावी तुझ्याकडे आहेत. पण मी पुन्हा त्या घरात पाऊल ठेवणार नाही. मी दोन तीन दिवस तुझ्या घरी येऊ का? त्यानंतर मी दादाकडे पोरींना घेऊन निघून जाईन कायमच. मला आता हे सगळं नाही सहन होत. आणि मी सहन केलं पंधरा वर्षे पण माझ्या मुली त्यांनी का सहन करावे?त्यांनी का मन मारून जगावे?” ती बोलत होती.


वनिता,“ असं काय बोलताय वहिनी ते घर ही तुमचंच आहे. तुम्ही आणि सावी- रावी किती ही दिवस काय कायमसाठी ही राहू शकता आपल्या घरी. पण तुम्ही असं  कायमच माहेरी जाण्याचा विचार नका करू. सिद्धार्थ भाऊजींचा ही विचार करा ना जरा.” ती विशाखाला समजावत होती. सिद्धार्थ आवंढा गिळत म्हणाला.


सिद्धार्थ,“ विशु तुम्ही तिघी मला सोडून गेलात तर मी कसा जगू गं? प्लिज असं नको बोलुस ना.” 


विशाखा,“ का नको बोलू मी? आणि तुम्ही माझा आणि माझ्या मुलींचा विचार कधी केलात का? माझ्या बाजूने कधी तरी उभं राहिलात का? तुमची आई वाट्टेल तसं माझ्याशी वागत राहिली. एक दोन नाही तब्बल पंधरा वर्षे पण त्या आता माझ्या मुलींच्या सुखावर  नाही तर जीवावर उठल्या आहेत. तुम्हाला माहित तरी आहे का त्या दिवशी काय झालं? रावीचा वाढदिवस आपण साजरा केला. त्यांना बाहेरून कळले. त्या पंधरा दिवस त्यावरून मला घालून पाडून बोलत होत्या.मी सगळं सहन केलं. पण त्या दिवशी मी किचनमध्ये काम करत होते आणि त्यांची पुन्हा भुणभुण सुरू झाली.अशाने पोरी शेफरतील. उद्या जातील हात धरून कोणाचा तरी. त्यांच्या बोलण्याला मर्यादा नाही पण माझ्या सहन करण्याला आहे की नाही?  


  त्यात माझ्या अवघ्या तेरा वर्षांच्या लेकीबद्दल मी चुकीचं कसं ऐकून घेईन? मी म्हणाले माझ्या मुली आहेत मी पाहून घेईन आणि वाढदिवस साजरा केला तर काय इतकं बिघडलं. तर मला म्हणाल्या की वाढदिवस साजरा केला नसता तर रावी काय मेली नसती. माझ्या कोवळ्या किरळ्या पोरीला असं म्हणायला त्यांना लाज नाही वाटली. माझी ही मग तळपायाची आग मस्तकात गेली. मीही म्हणाले मग; तोंड सांभाळून बोलायचं. मी स्वतः बद्दल ऐकून घेईन पण माझ्या पोरींबद्दल नाही. तुमचंच वय झालं आहे आता जायचं. तर चक्क त्यांनी मला थोबाडीत मारली. माझ्यावर हात उचलला आणि मी तिथेच चक्कर येऊन पडले.


              आता बास सिद्धार्थ मला तुमचा संसार नको ना तुमचे घर! ज्या घरात मीच काय माझ्या मुलींना ही मोकळा श्वास घेता येत नसेल तर काय उपयोग. मी माझं घर माझा संसार उभा करेन माझ्या मुलींसाठी आणि माझ्यासाठी. तेवढी धमक आहे माझ्यात अजून.” ती रडत बोलत होती.


सिद्धार्थ,“ काय आईने तुझ्यावर हात उचलला? मीच कुठेतरी जबाबदार आहे या सगळ्याला. मी गिल्ट घेऊन बसलो कविताने माझ्यामुळे जीव दिला म्हणून पण या सगळ्यात तुझा आणि आपल्या मुलींचा काय दोष? मी तुला कधीच त्या घरात चल म्हणणार नाही. गेलेले दिवस मी परत आणून तुला नाही देऊ शकत पण मी आपलं घर आणि आपला संसार उभा करेन. जिथे तू आणि आपल्या मुली मोकळा श्वास घेऊ शकाल. विशु मला एक संधी दे.” तो हात जोडून बोलत होता.


बाबा,“ अरे कसले गिल्ट आणि कसले काय? मला ही दीड महिन्यांपूर्वी पर्यंत असेच वाटत होते की कविताने तुझ्यामुळे जीव दिला. पण दीड महिन्यांपूर्वी मालन आणि मी गावी गेलो होतो तेंव्हा ती तिच्या लहान वहनीशी बोलताना ऐकलं मी की कविताला म्हणे फिट्स येत होत्या आणि ती नदीवर कपडे धुवायला गेली तेंव्हा फिट येऊन पाण्यात पडली. आणि त्याचे भांडवल करून आजपर्यंत तिने कसे तुला आणि विशाखाला तिच्या तालावर नाचवले आहे. खूप फुशारकी मारत सांगत होती ती. आरे कविता मेली तो अपघात होता. मी तुला हे गुपचूप सांगून विशाखाला घेऊन जा म्हणून सांगणारच होतो घरातून पण तू टूरला गेलास दहा दिवस त्यानंतर ही रात्री उशिरा यायचास आणि सकाळी लवकर जायचास हे सगळं निवांत बोलायला मला वेळच मिळाला नाही रे आणि हे सगळं घडलं.” ते सांगत होते.


सिद्धार्थ,“ म्हणजे इतकी वर्षे आईने माझी फसवणूक केली? संदीप तू विशाखा आणि पोरींना घरी घेऊन जा तुझ्या. मी आमचे कपडे घेऊन येतो. बाबा तुम्ही ही येणार आहात माझ्याबरोबर घर सोडून. आईला एकटेपणाची शिक्षा मिळाली ना मग कळेल तिला माणसांची किंमत.” तो रागाने म्हणाला.


  संदीप, विशाखाची आई,भाऊ, वनिता आणि मुलांना घेऊन त्याच्या घरी गेला. सिद्धार्थ त्याच्या बाबांना घेऊन घरी गेला तर मालनबाई हॉलमध्ये त्यांचीच वाट पाहत बसल्या होत्या. त्या दोघांनाच पाहून त्यांनी विचारलं.


मालनबाई,“ विशाखा आणि पोरी कुठे आहेत? आज तिला सोडलं ना हॉस्पिटलमधून. एक तर नवीनच थेर सुरू केलं आहे. तिची आई, भाऊ इथं राहायचं सोडून पोरींना घेऊन गेल्या वनिताकडं राहायला. आता काय महाराणी आजारीच पडली मग मनमानी करणार. कुठे गेली रे ती पोरींना घेऊन?” त्या बोलत होत्या.


सिद्धार्थ,“ मनमानी तिने केली इतकी वर्षे झाली की तू गं आई? तू विशाखावर हात उचललास? मेहरबानी मान तिने आणि तिच्या आई आणि भावाने तुझ्यावर पोलीस केस केली नाही. तू इतकी वर्षे कविताने आत्महत्या केली म्हणून मला फसवलंस. तुला काहीच वाटलं नाही ना असं मला फसवायला? आणि मी मूर्ख फसलो. खरं तर या सगळ्यात विशाखाचा आणि नंतर माझ्या मुलींचा काहीच दोष नव्हता पण तू त्यांना वेठीस ठरलेस आणि मी न केलेल्या गुन्ह्याचे गिल्ट घेऊन मूग गिळून गप्प बसलो. खोटं बोलून स्वतःच्याच मुलाच्या संसारात विष कलावताना तुला काहीच वाटलं नाही ना? बाबा कपडे घेऊन या तुमचे. मी ही आलोच. हिला एकटेपणाची शिक्षा मिळाल्या शिवाय माणसांची किंमत कळणार नाही. घाबरू नकोस. रोज दोन वेळा तुला आयता डबा मिळेल. तुझे औषध-पाणी ही होईल व्यवस्थित. पण तुला या घरात एकटीला राहावे लागेल.” तो कठोरपणे म्हणाला.


मालनबाई,“ अहो काय बोलतोय हा सिद्धार्थ? तुम्हीही जाणार का याच्या पाठोपाठ? मी एकटीच इथं काय करू?” त्या रडकुंडीला येत म्हणाल्या.


बाबा,“ याचा विचार तू सिद्धार्थचीच नाही तर सगळ्या कुटुंबाची फसवणूक करण्याआधी करायला हवा होता. मीही इतकी वर्षे माझ्या मुलाच्या नकारामुळे एका मुलीचा जीव गेला आणि ती तुझी भाची होती त्यामुळे तुझा संताप कुठे तरी थोडा का असे ना बरोबर आहे असा विचार करून गप्प बसलो होतो. तू संदीपला आणि वनिताला घरा बाहेर काढले तरी गप्प बसलो पण माझं चुकलं. तू फसवलंस आम्हाला कविताने जीव दिला नाही तर तिला फॅट्स येत होत्या आणि ती नदीवर कपडे धुवायला गेल्यावर फिट येऊन नदीत पडली आणि मेली. तिचा मृत्यू अपघात होता. आणि तू तिच्या मृत्यूचे भांडवल करून आम्हा सगळ्यांना वेठीस धरलं. लाज वाटली नाही का तुला असं वागताना? वरून तू विशाखावर हात उचलला. आपल्याच चिमुकल्या नातीं विषयी वाईट साईट बोललीस. खरं तर विशाखाने तुला पोलिसात द्यायला हवी होती. पण त्या पोरीने अजून ही  चांगुलपणा सोडला नाही. पण आता खूप झाले तुझे मी जातोय माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे. तू बस या रिकाम्या भिंतींवर हुकूम चालवत. तुला हुकूम चालवायची हौस आहे ना भारी?” ते संतापाने म्हणाले.


  मालनबाई मात्र आता एकट्याच राहिल्या होत्या त्या चार भिंतींच्या घरात उर्वतीत आयुष्य एकाकीपणे काढण्यासाठी.

समाप्त

©स्वामिनी चौगुले.


कथेचे आधीचे भाग खालील लिंक्सवर👇

माझं घर माझा संसार भाग 1


माझं घर माझा संसार भाग 2

अशाच सुंदर कथा वाचण्यासाठी लाईक आणि फॉलो करा आपल्या शब्द मंथन पेजला.


 






 


    














Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post