माडीवरची बाई भाग ११

 






   दोन दिवसांनी जयसिंगराव त्यांच्या कुटुंबाला घेऊन परत साताऱ्याला गेले. जाताना लग्नाची सुपारी फोडायला या, त्या आधी पत्र पाठवून कळवा असं सांगून गेले. आता घर पूर्ण रिकामं झालं आणि घरात रमा नसल्याची जाणीव सगळ्यांना प्रकर्षाने होऊ लागली. राधक्का तर पोरीच्या आठवणीने व्याकूळ व्हायची. सारखं तिचे डोळे पाणावायचे आज ही ती दुपारच्या वेळी एकटीच दिवाणखान्यात बसली होती आणि तिचे डोळे रमेच्या आठवणीने झरायला लागले. महेंद्रप्रताप तिच्या मागे येऊन उभे राहिलेले तिला कळले ही नाही.


महेंद्रप्रताप,“ राधे लागलीस का पुण्यांदा रडाया. तुझी लेक तकडं सुखात हाय. डाक आलतं नव्हं जावईबापूच. आपली पोर हाय ती जहागिरदारांची लेक तिच्या सासरच्या लोकांस्नी म्हैत हाय ते. ते आपल्या परास हायती सावकार पर आमी जहागिरदार सरकार हाय ततं आपल्या लेकीला कुणी सरून बस म्हणायची बी हिम्मत करणार नाय तिवडी धमक नाय त्यांच्यात आन दोन तीन मासात जावईबापू म्हमईला घिवुन जाणार हायती मंग तर आपली लेक म्हमईच्या बंगल्यात राणीवानी राहील की. राघव जीप आणाया गेलता तवा जावई बापूंनी बांदून घितलेला बंगला बगून आला हाय ऐकलंस नव्हं काय म्हणला त्यो मोटा लाट बंगला बांदला हाय त्यांनी. आन तुला रडाया काय झालंया? इवडंच हुतं तर अजून दोन वरीस रमी हुंडली असती नव्हं वाड्यात. माज्या बी मनात नवतं इवड्यात रमीच लगीन करायचं पर त्वाचं तिचं लगीन करायची घाई किली नव्हं.समदं तुज्या मना परमानं झालं. लेक चांगल्या घरात पडली तरी बी तू रडतीयास?” ते नाराजीने बोलत होते.


राधक्का,“ आईचं काळीज तुमास्नी नाय कळायचं जी. परक्याच धन ते किती दिस ठिवून घ्यायचं. आन लेक जितकी जवळ राहील तितका मोव(मोह) जडतुया. पुडं तिला बी आन आपल्याला बी जड गेलं असतं नव्हं. येळच्या येळी गुष्टी व्हायला पायजेल. म्या आता या वाड्यात एकली पडलू बगा तुमी लवकर राघवशी बुलून घ्या आन त्याचं लगीन करून मालूला घरी आना. मला एकलीला नाय गमायच आता.” ती डोळे पुसत बोलत होती.


महेंद्रप्रताप,“ व्हय मला बी तेच वाटतंया. मालू हुती तवा घर कसं भरल्यावानी हुतं. तिनं जणू रमीची जगा भरून काडली हुती बग. पोरगी लय गुणाची हाय. पर जरा दमानं घ्याया पायजेल. आता तर रमीच लगीन झालं. पैकं पाण्यावानी खराचलं. आता राघवच लगीन करायचं म्हंजी तोंडाची गोट हाय व्हय. आपून जहागिरदार असलू तरी टांसाळ हाय व्हय आपल्याकडं पैक्याच? आन राघवला बी जरा उसंत दि की. आन त्याचं लगीन रमी परीस मोटं कराया पायजेल जहागिरदारांच्या या पिडीतलं शेवटाच लगीन हाय नव्हं. वाईस सबुरीनं घे. सा सात मास थांब वाईस. येती सुगी झाली की उडवून देऊ बार त्याच्याबी लग्नाचा.” ते तिला समजावत होते.


राधक्का,“ बरं जी. पर तुमी शेतावरनं हितक्यात कसं आलासा जी?” तिने विचारलं.


महेंद्रप्रताप,“ ते तुजी याद आली बग! मला म्हैत होतं तू एकलीच रडत बसणार म्हणूनशान आलू. असं बी आज राघव बाहीर गेला हाय आन अण्णा बी आज गेल्याती गावात फिरया त्यास्नी आता गाववाल्यांकडून नातीच्या लगीनाच कौतिक ऐकायचं असंल नव्हं. म्हणूनशान आलू बायकू संगट चार घटका घालवाया.” ते हसून तिचा हात धरत म्हणाले.


राधक्का,“ काय बाय तुमी! आता जावाय- इवाय आलं की.” ती लाजून पदराने तोंड झाकून घेत म्हणाली.


महेंद्रप्रताप,“ बरं रायलं. पर राधा बाय खायाला तर मिळल नव्हं भुका लागल्या हायत्या. का ते बी जावाय - इवाय आल्याती म्हणूनशान बद करता आमचं.” ते पुन्हा हसून म्हणाले.


राधक्का,“ हाय का आता. बसा हतं आणून देतू.” ती उठून जात म्हणाली.

★★★★


   इकडे राघवेंद्र मात्र मदनला घेऊन पुन्हा हरणीला तिच्या गावी  भेटायला गेला होता.  त्याने मदनला तिच्या घरी निरोप घेऊन पाठवून दिले होते. तो गावा बाहेर नदी किनारी थांबला होता. त्याला कोणी ओळखू नये किंवा गावात कोणाला तो आल्याचं कळू नये म्हणून त्याने  जीप देखील आणली नव्हती.  हरणीची आई आजही घरात नव्हती ती क्वचितच घरात असायची. यात्रा जत्रा संपल्या तरी मोठं मोठ्या सावकारांच्या घरी तिचे कार्यक्रम असायचे. त्यामुळे घरी हरणी आणि हौसा असायच्या. फडावरचे कोणी कधी कधी घरी यायचे. हरणीने मदनला पाहिलं आणि त्याला थोडावेळ थांबवून घेतलं. आणि तेवढ्या वेळात तिने दहा भाकरी आणि खर्डा हौसा मावशीच्या मदतीने केला.भाजी तर होतीच. तिने करून ठेवलेले लाडू आणि बाकी सगळं एका कापडी गाठोड्यात बांधलं आणि मदन बरोबर धावत पळत राघवेंद्रला भेटायला गेली. पण मदन बरोबर जाताना त्यांच्या फडातील  गणपतने तिला पाहिलं त्याने त्यांचा गुपचूप पाठलाग केला. नदी काठावर ते दोघे गेले. तो पुढे जाऊन मदनची गचुंडी धरणार तर राघवेंद्रला पाहून तो तिथेच थबकला. त्याने थोडे जवळ जात एक आडबाजू गाठली आणि तिघांचे बोलणे ऐकू लागला.


राघवेंद्र,“ आलीस? आता मी वाट बगून निगुन जाणार हुतो. किती येळ लावला तू.” तो तोंड फुगवून म्हणाला.


हरणी,“ तुमास्नी भाकर खायाची हुती नव्हं माज्या हातची म्हणूनशान मदन भाऊस्नी वाईस थांबवून घीतलं जी. उन उन भाकर, खर्डा,कोरड्यास आन लाडू बी आणलं हायती म्हणूनशान येळ लागला जी.” ती  एका मोठ्या दगडावर बसून गाठोडे सोडून बोलत होती.


मदन,“ चालू दे तुमचं म्या हाय हतंच.” असं म्हणून तो निघाला.


हरणी,“ भाऊ थांबा की वाईस. भाकर आन लाडू देतू तुमास्नी.”



    ती म्हणाली आणि दोन तीन भाकरीची चवड तिने हातावर घेऊन भाजी आणि खर्डा त्यावर घातला आणि लाडू ही ठेवले. ते सगळं दोन्ही हाताने त्याच्या हातावर ठेवलं आणि मदन त्यांच्यापासून बराच लांब जावून बसला.


हरणी,“खावा की सरकार असं त्वांड फुगवूनशान बसू नगासा.” ती त्याची मनधरणी करत म्हणाली.


राघवेंद्र,“ त्वां चार की तुझ्या सुगंधी हातानी.” तो म्हणाला आणि हरणीने भाकरी आणि भाजीचा एक घास बनवून त्याच्या ओठां जवळ नेला. राघवेंद्रने मात्र घास न खाता तिचा हात धरला आणि तिच्या हाताचे चुंबन घेतले. तशी हरणी लाजून शहारली.


हरणी,“ सोडा जी सरकार.” ती लाजून पापण्या झुकवत हळूच म्हणाली.


राघवेंद्र,“ बरं बाई रायलं.” तो म्हणाला.


 हे सगळं पाहून गणपतला दरदरून घाम फुटला. तो तिथून गुपचूप निघाला आणि पळत सुटला त्याने सरळ सावकाराचा वाडा गाठला. शेवंताबाईचा कार्यक्रम नुकताच संपला होता आणि ती तसेच तिचे सहकारी अजून वाड्यातच होते. सावकार ही अजून बैठकीतच बसून होता. तो सावकाराच्या वाड्यात गेला आणि तिथे उभ्या  एका नोकराला म्हणाला.


गणपत,“ शेवंता बाईस्नी भेटायचं हाय. तिला सांगा गणपत आला हाय.” तसा तो नोकर आत गेला आणि शेवंता बाईला त्याने निरोप दिला.


शेवंताबाई,“  माफी कराजी सावकार माजा माणूस बाहीर आला हाय तसंच महित्वाच काम असल्या बिगार त्यो येणार नाय जी. म्या त्याला भिटून येतू.” ती जराशी नाटकीपणे म्हणाली.


सावकार,“ बरं तुमी समदीच जावा आता. पर शेवंता बाय रातच्याला यायचं बरका!” तो तिला जवळ ओढून नको तिथे स्पर्श करून अर्थपूर्ण हसून बोलत होता.


शेवंताबाई,“ व्हय जी सरकार आता मातूर जातू जी.” ती स्वतःला त्याच्यापासून सोडवून घेत  नाटकीपणे हसत म्हणाली.


   शेवंताबाई बरोबर  सगळेच बाहेर आले.


गणपत,“ शेवंता बाय वाईस हकडं ये की.” तो सगळ्यांना पाहून म्हणाला.


शेवंताताई,“ तुमी व्हा रं म्होरं म्या आलीच.” ती म्हणाली आणि सगळे निघून गेले.


गणपत,“ शेवंताबाय लय गहजब झाला हाय. तुजी हरणी…” तो आवंढा गिळत म्हणाला.


शेवंता,“ आरं पुडं बोल की मूडद्या माजी हरणी काय?” तिने रागाने विचारलं.


गणपत,“ काय सांगू बाय तुला. तुज्या पोरीनं एवडं मोटं धाडीस कराया नगं हुतं आता पुडं काय हुनार या ईचारानं मला धडकी भरतीया बग.” तो घाबरूनच बोलत होता.


शेवंता,“ असं कोड्यात कशापायी बुलतुयास रं? काय ती सपस्ट सांग की काय केलं माझ्या हरणीनं?” ती आता थोडी घाबरली होती.


गणपत,“ म्या तुज्या घराकडं गेलू हुतो. उद्या म्या कामावर येणार हाय म्हणूनशान निरुप ठिवाया. तर घरातून हरणी एका पोरा बरुबर काय तर घिवून निगली हुती पळत. म्या तिच्या मागं गेलू. तर नदीच्या काटाला दोगं गेली. म्या समुर जावूनशान त्या पोराची गच्ची धरणार तर धाकलं जहागीरदार सरकार ततं हुतं. तुजी हरणी त्यांच्या नादाला लागली हाय शेवंता बाय.” तो घाबरून बोलत होता.


शेवंता,“ काय सांगतुयास? ते सावते गावचं राघवेंद्रप्रताप जहागिरदार सरकार?” तिने छातीवर हात ठेवून घाबरून विचारलं.


गणपत,“ व्हय व्हय तेच.तुला माहीत हाय नव्हं थोरलं जहागीदार सरकारास्नी  तिटकारा हाय तमाशातल्या बायांचा त्यास्नी  नाय पटत हे समदं आन तू तर पंचकोरशी गाजवली हायस निसतं नाच-गाणं नाय तर तुज्या करनाम्यानी. जर त्यास्नी  समीजलं की धाकलं सरकार तुज्या पोरीच्या नादी लागलं हायती तर काय हुईल बाय? जहागीरदार जीवडं चांगलं हायती तिवडं वंगाळ  बी हायती. अगं त्यांच्या परसात तुज्यासारक्या किती बाया गाडल्या हायत्या त्यांनी. आन सावते गावाची रामोशी आन बेरडं त्यांच्या हाताशी हायती बया. तुमा माय-लेकीला कवा गायब कर्त्याल कुणाला बी समजायचं नाय शेवंते. येडी का खुळी तू तुज्या पोरीला हरणीला आवर.” तो घाबरून बोलत होता.


शेवंता,“ आरं देवा काय झालं रं हे? म्या तिला समद्या जगाच्या नजरं पासनं दडवुन ठिवली. आन त्या धाकल्या सरकारची नजर हिच्यावर कवा पडली रं? मी हिचं लगीन कराय साटनं नाय नाय ते करतीया. माईनदाळ हुंडा आन सोनं दिलं तर तिला चांगला नव्हरा घावलं म्हणूनशान नाय तर हिच्या बा सारका एकादा  घावला तर माज्या जिंदगानीची तऱ्हा झाली तसं तिचं व्हायला नगं पर ही पोरगी न्हाय त्येच्या नादाला लागली. आन ही हौसा काय करीत हुती तवर? चल बगतु दोगीस्नी बी.” ती रागाने धावतच घरी पोहोचली तर हरणी अजून घरी आली नव्हती. शेवंताने तोपर्यंत हौसाचा समाचार घेतला.

★★★

   

   इकडं नदी काठाला काय घडत आहे यापासून  अनभिज्ञ असणारी हरणी राघवेंद्रबरोबर बोलत बसली होती.


राघवेंद्र,“ झाक झालतं बग समदं.” तो म्हणाला.


हरणी,“ लय गडबड झाली जी सरकार म्या म्हणलं कसलं झालं कुणास ठाव. तुमच्या भनीच्या लगीनाचा समद्या    पंचकृषीत गाजावाजा हाय जी. समद्या पंचकृषीला दौडी पिटवून आवतान हुतं नव्हं. तुमच्या गावात तर म्हण पंदरा दिस चूल पेटली नाय कुणाच्या बी घरी. आमच्या हतनं बी लोकं गिली हुती लगनाला सांगीत हुती की काय त्यो थाट, काय ते जेवाणा, पोळ्या, भात, लाप्शी, चपाती आन कायनू बायनू हुतं म्हण जेवाया. दोन दिस तर नुसत्या जेवणावळ्या उठीत हुत्या म्हण लगीन झाल्यावर बी. आन नवरी तर निसती सोन्यानं मडली हुती म्हणं.” ती आश्चर्य मिश्रित उत्साहाने बोलत होती.


राघवेंद्र,“ व्हय अगं जहागीदाराची एकुलती एक लेक मंग ईवड तर असणारच नव्हं इतकं काय इशेष नाय त्यात. मंग त्वां का नाय आली लगनाला?” त्याने विचारलं.


हरणी,“ तुमच्या साटनं इशेष नाय सरकार पर आमच्यावानी गरीब लोकास्नी  इशेषच हाय जी. आन तुमी जीप घितली म्हणं. समद्या पाच गावात कुटं बी असलं व्हान नाय. आन म्या यायाला आय मला सोडाया पायजेल की आन तुमी इतक्या लोकांमंदी मला वळीकली असती व्हय?” तिने भाबडेपणाने विचारलं.


राघवेंद्र,“ इवडाच ईश्वास हाय तुजा माज्या वर? हरणे डोळं झाकून बी मी तुला हुडकून दावू शकतु. माजा जीव जडला हाय तुज्यावर. पेरीम हाय माजं. पर तुला न्हाय कळत ते.” तो रागाने उठत म्हणाला आणि हरणी कावरी बावरी झाली.


हरणी,“ माफी करा जी सरकार. म्या चुकुनशान बुलून गेली जी. माजा तुमच्यावर देवा परास बी ज्यादा इश्वास हाय जी.” ती रडत म्हणाली.

br />

राघवेंद्र,“ बरं रडू नगंस आता. आन आता जातू मी. लय येळ झाला हाय.” तो तिला समजावत म्हणाला.


हरणी,“ मंग येकदाव माफी केलं मला असं म्हणा जी.” ती रडतच म्हणाली.


राघवेंद्र,“ बरं बाई केलं माफ. आता रडणं थांबीव की.” तो हसून म्हणाला.


हरणी,“ खरं नव्हं? आन जातासा पर माज्यावर रुसून परत भेटाया नाय आला म्हंजी?” तिने पुन्हा रडतच विचारलं.


राघवेंद्र,“ अगं येडी का खुळी तू? मी लगीच रुसून तुला भेटाया  येणार न्हाय असं हुईल का?येतू की चार पाच दिसाणं.” तो तिला समजावत म्हणाला.


हरणी,“ बरं.” ती डोळे पुसत म्हणाली.


  आणि दोघे आपापल्या वाटेला लागले. पण घरी हरणीसाठी काय वाढून ठेवलं आहे याची तिला तिळमात्र कल्पना नव्हती. 


शेवंताला म्हणजे हरणीच्या आईला राघवेंद्र आणि हरणीबद्दल कळले होते. आता शेवंता काय करणार होती? राघवेंद्र आणि हरणी यांचे नाते इथेच संपणार होते की अजून पुढे काही घडणार होते. पण राघवेंद्र आणि हरणीचे नाते इतके सोपे नव्हतेच कधी. त्यांच्या प्रेमाची परीक्षा आत्ता तर सुरू झाली होती. एक छोटी वावटळ त्यांच्या दिशेनी येत होती पण अजून मोठी वादळे येणार होती! ज्यात यांचे प्रेम तग धरून राहील की वादळा बरोबर उडून जाईल?

क्रमशः

©स्वामिनी चौगुले


कथेचा या आधीचा भाग खालील लिंकवर👇

माडीवरची बाई भाग १०

 

टीप- कथा लेखिकेचा कोणत्याही जातीधर्मावर  टीका किंवा टिपण्णी करण्याचा उद्देश नाही. फक्त त्याकाळातील संदर्भानुसार कथेत काही जातींचा उल्लेख आला आहे. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी🙏


     

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post