माडीवरची बाई भाग १०

   






 पुढे दहा दिवसांत राघवेंद्र पुन्हा हरणीला भेटायला गेला. 


राघवेंद्र,“ आता मला एक मास तुला भेटाया येता येणार नाय हरणी.” तो म्हणाला.


हरणी,“ का जी सरकार?” तिने निराश होत विचारलं.


राघवेंद्र,“ अगं रमेचं लगीन हाय नव्हं लगीन आपल्याकडं हाय तवा मला मायनदाळ कामं हायती.जीप मिळाली या राड्यात तर कामं सुपी हुत्याली बग. पर तुला काय भेटाया यायला हुनार नाय. तवर समद्या गावच्या जत्रा बी सपत्याल मंग तुझ्या गावाला येतू मी भेटाया.” तो तिला समजावत होता.


हरणी,“ एक तर आट- धा दिस वाट बघितल्यावर तुमी भेटताया. ते बी येतासा आन लगीच जातासा हतं म्या मातूर तुमची याद काडीत बस्ती.पर तुमाला काय त्याचं तुमी सरकार हायसा नव्हं.” ती रडत म्हणाली.


राघवेंद्र,“ व्हय का? मला काय नसतं तर मी आलू असतू का लपून तुला भेटाया. आन आमी सरकार असलं म्हणुनशान काय मी बी माणूसच हाय नव्हं. मला बी तुझी याद इतिया की पर इलाज नाय हरणे. तू असं डोळ्यातनं पाणी नगं कडत जाऊ मला नाय आवडत ते.” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.


हरणी,“ म्या नाय काडणार जी डोळ्यातनं पाणी. बरं म्या वाट बगते जी.” ती डोळे पुसत म्हणाली.


राघवेंद्र,“ पर आमचं लाडू कुटं हायती? दे मी येतू आता.” तो तिच्याकडे पाहत  म्हणाला.


हरणी,“ काय बया सरकार तुमास्नी घवाच्या पिटाचं लाडू आवडलं? का माझ्या साटनं खोटं बोलतासा जी?” ती त्याच्या हातावर चार लाडू ठेवत म्हणाली.


राघवेंद्र,“ हरणी बाय आमी सरकार हाऊत खोटं बोलत नसतू. आता आवडलं मला लाडू म्हणूनशान मागतुया नव्हं. आन आणी  चार दे त्यो हवरा मद्या लाडवासाठी येतूया माझ्या संग. आन पुडच्या येळी भाकर आन खर्डा पायजे  त्यो बी तुझ्या सुवासीत हातचा.” तो हसून लाडू खात म्हणाला.


हरणी,“ तुमी बी ना सरकार. जहागीदारांच्या घरची तूप-रोटी सोडूनशान गरीबा घरची खर्डा-भाकर गॉड लागतीया व्हय तुमास्नी?” ती हसून कौतुकाने म्हणाली.


राघवेंद्र,“ व्हय मंग. पर तुला नाय कळायचं. येतू मी.” असं म्हणून तो निघून गेला.

★★★


    वाड्यावर आता रमाच्या लग्नाची धामधूम सुरू झाली.  दागिने खरेदी, कपड्याची खरेदी, बाकी तयारी हे सगळं सुरू झालं पंधरा दिवस कोणी ही घरात  चूल पेटवायची नाही म्हणून गावात दवंडी पिटवली गेली. त्याच गडबडीत राघवेंद्र  मुंबईला जाऊन आला. बरोबर वेळेवर त्याला जीप मिळाली आणि त्याची बरीच कामे आता सोपी झाली. पंचक्रोशीत आलेलं ते पहिलं आधुनिक वाहन होते. जीप पहायला पंचक्रोशीतून लोक येत होते आणि राघवेंद्रची मात्र पंचाईत झाली तरी जहागिरदारांच्या धाकामुळे लोकं जीप लांबून पाहून निघून जात होते. लग्नाला पंधरा दिवस राहिले आणि राघवेंद्रच्या पाच आत्या त्यांची मुलं-सुना नातवंड सगळा गोतावळा वाड्यावर गोळा झाला. त्यामुळे वाडा माणसांनी फुलून गेला. 


     हा हा म्हणता दिवस सरत होते रोज गावातल्या बायका दिवस उजाडला की पोरं बाळ घेऊन वाड्यावर यायच्या परसात पंचवीस भर चुली मांडल्या गेल्या होत्या. त्यावर पुरण पोळ्या केल्या जायच्या. पुरुष माणसं पाट्या वरवंट्यावर पुरण वाटून द्यायची. बायका लग्नातली शुभ गाणी, ओव्या म्हणत पोळा करायच्या. आमटी मोठ्या काहिलीत केली जायची आणि दुधाचे हंडेच्या हंडे तापवले जायचे. संध्याकाळच्या वेळी बायका फेर धरायच्या, फुगड्या खेळायच्या, गाणी गायच्या. जहागिरदारांच्या घरातले लग्न म्हणजे एक मोठा सामाजिक सोहळाच होता जणू. जो तो घरचे कार्य असल्यासारखे हाताला पडेल ती कामं उपसायचा. 


   सहा दिवस आधी जयसिंगराव, सावित्री,विमल, जयसिंगरावांचा मुलगा सुमेरसिंगराव आणि  मुलगी मधुमालती आले.माहेरची माणसं पाहून राधक्का हरखून गेली होती. त्यात पण मधुमालती आल्यामुळे ती जास्तच खुश होती. सगळे दुपारच्या रेल्वेने आले आणि मुद्दाम राधक्काने त्यांना आणायला राघवेंद्रला जीप घेऊन  पाठवलं. सगळेच नविकोरी जीप पाहून हरखून गेले होते. राघवेंद्रने सगळ्यांना जीपमध्ये बसायला लावले आणि सामान मात्र बैलगाडीत पाठवून दिले. सगळे दाटीवाटीने बसले.आणि राघवेंद्रने जीप सुरू केली.


सुमेरसिंग,“ राघव दाजी कितीला घेतली जी जीप तुमी? आणि आणली कुटून? मुंबईस्न का?” त्याने विचारलं.


राघवेंद्र,“ बारा हजार चारशेला घेतली.” तो म्हणाला.


जयसिंगराव,“ काय सांगतु काय लय पैकं लागलं की रे.”


राघवेंद्र,“ पर मामा लागतीया नव्हं पाच गावात आपली जहागिरी पसरली हाय. समदी कडं ध्यान ठेवाया जायचं म्हंजी एकच सकाळची मुक्काम इस्टी उशीर झाला ती चुकली की मंग मातूर बैलं जुपून जायचं किती येळ जातूया एका दिसात लय तर लय एकच गाव हुतया. आता जीप खायमची झाली नव्हं. एका दिसात समदी गावं हुत्याल आन कडूसं पडाया घरी. म्हणूनशान घेतली.” तो बोलत होता. 


सावित्री,“ व्हय मंग जहागिरदारास्नी काय कमी हाय व्हय. आन लय बेस केलं बगा तुमी राघवराव.” ती कौतुकाने बोलत होती आणि तोपर्यंत सगळे वाड्यात पोहोचले ही.


विमल,“ बाई किती लवकर आलो जी आपण! मागच्या येळी पार सात घटका तर लागल्या हुत्या आन आता अपुन एका घटकत वाड्यात आलो की.” ती आश्चर्याने म्हणाली आणि इतका वेळ शांतपणे सगळ्यांचे बोलणे ऐकणारी आणि चोरट्या नजरेने राघवेंद्रला पाहणारी मधुमालती म्हणाली.


मधुमालती,“ हे वाहन आहे वैनीसाब बैलगाडी आणि वाहनात फरक असणारच ना.” 


   ती जीपमधून  उतरून बोलत होती.राघवेंद्रने तिचा आवाज ऐकला आणि जीपमधून  उतरून पुढे गेलेला तो मागे वळला. 


राघवेंद्र,“ तू बी आली हायस व्हय? मी म्हणलं आता तर बाईसाहेब येत्यात का नाय.” तो हसून बोलत होता आणि मधुमालतीने लाजून मान खाली घातली तरी धीटपणे ती म्हणाली.


मधुमालती,“ असं कसं येणार नाही बरं! माझ्या एकुलत्या एक आते बहिणीच लग्न आहे.” ती म्हणाली. तोपर्यंत राधक्का भाकर तुकडा घेऊन आली. सगळ्यांवरून भाकर तुकडा ओवळून तिने सगळ्यांच्या पायावर पाणी घातले आणि सगळे आत गेले. 


    मधुमालती म्हणजे घारे डोळे, गोरा रंग,नाक अगदी चाफेकळी नसले तरी धारदार,उभट चेहरा, काळेभोर लांब सडक केस,उंची पुरी शेलाट्या बांध्याची छापील साडी नसणारी आणि पदर डोक्यावरून न घेता खांद्यावरून घेणारी कॉलेज कुमारी होती. अर्थात सुंदर नव तरुणी! शिक्षण झाले असल्याने चेहऱ्यावर आणि चालण्या,बोलण्यात एक आत्मविश्वास होता तिच्या. शालीन आणि कुलीन मुलगी. म्हणून तर राधक्काला राघवेंद्रचे लग्न तिच्याशी करायचे होते कारण सगळ्याच बाजूने ती राघवेंद्र आणि त्यांच्या जहागिरदार घराण्याला साजेशी होती.


  सगळे चौकात गेले आणि रमा येऊन मधुमालतीच्या गळ्यात पडली. रमा तिच्यापेक्षा लहान होती. सुट्टीत मामाकडे गेलं की तिचं आणि मधुमालतीच चांगलं गुळपीठ जमायचं. रमा मधुमालतीच्या मागे ताई म्हणून फिरायची. दोघी खेळायच्या आणि मधुमालती  तिला गोष्टीची पुस्तक वाचून दाखवायची.


रमा,“ जा बाबा ताई लय येळ केलीस त्वा नाय नाय तू.” ती तोंड फुगवून जीभ चावत म्हणाली.


मधूमालती,“ अगं माझी परीक्षा होती ना म्हणून यायला उशीर झाला. पण बघ आले ना मी तुझ्या लग्नाच्या  सहा दिवस आधी.” ती हसून म्हणाली.


राधक्का,“ रमे बाय मालू, इमला आणि वैनीला घिवून जा आत. त्यास्नी जेवू दि. मंग बसा बोलत.” ती हसून म्हणाली आणि सगळ्या आत गेल्या. सावित्री मात्र बाहेरच थांबली होती. राघवेंद्र काही तरी काम आहे म्हणून त्यांना सोडून निघून गेला होता.


सावित्री,“ राघवरावांनी मालूला वळीकलं की.” त्या कौतुकाने म्हणाला.


राधक्का,“ नाय वळकाया काय झालं. वैनी रातीला नजर कडते मालूची पोरगी अक्षी सुक्राच्या चांनी वाणी दिसाया लागली हाय. माझीच नजर लागायची.” ती हसून म्हणाली.


जयसिंगराव,“ आक्के आपल्याच माणसाची कुटं नजर लागत असती व्हय. पर जोडा सोबतूया बग. समद्या पंचक्रोशीत असा जोडा हुडकून सुदीक मिळायचा नाय. दोगं बी गोरं गोमटं उंच पुरं हायती. राघव तर निसता मराठी सिनेमातल्या नटा वाणी दिस्तुया. कोल्हापूरला गेला तर घेत्याली सिनेमात. तुझ्या घरात पडली माझी पोर तिनं नशीबच काढलं बग. मला वाटीत हुतं आता तुझं पोर इलायतीतून शुकून आलं तर माझी पोरगी घितीस का नाय करून?” ते बोलत होते.


सावित्री,“ तुमी माझ्या जावयाला नजर लावू नगा जी. दिवानसाब आदी तर म्या राघवरावांचीच  नजर काडती ते आलं की.” ती थोडी रागात म्हणाली आणि सगळे हसायला लागले.


सुभानराव,“ जयसिंगा आरं जुनी नाती सुडून घरातच नवरी असताना आमी कशा पाई भाईर सोयरीक करू रं? आन मालू देकनी हाय, शिकली हाय,आन समद्यात महित्वाच म्हंजी खानदानी हाय. मंग हातच कोण सोडलं रं?” ते म्हणाले.


जयसिंगराव,“ ते मातूर खरं हाय अण्णा.”


       पुढचे दहा दिवस राघवला मात्र उसंत नव्हती. त्याची धावपळ उठली होती. पण मधुमालतीला राधक्का सारखंच त्याच्या पुढे पाठवत होती. त्याला जेवायला वाढायला लावायची. त्याला काय हवं नको पहायला लावायची. मधुमालती होती तशी धीट पण राघवेंद्रच्या समोर तिची गाळण उडायची. ती चोरून चोरून त्याला पाहत राहायची. पण राघवेंद्रला मात्र वाड्यात काय सुरू आहे आणि त्याच्या घरच्यांच्या मनात काय आहे याची सुतराम कल्पना नव्हती. त्याचा जीव एक तर भलतीकडेच जडला होता आणि त्यातून त्याला कामातून वसंत नव्हती. तो सतत बाहेरची कामे करण्यात गुंतला होता. एक तर जीप फक्त  एकट्याला त्यालाच चालवायला येत होती आणि सतत तालुक्याच्या बाजारात जाणे. लोकांना निमंत्रण देणे बाकी बाहेरची कामं पाहणे हे सगळं त्याच्यावर येऊन पडले होते. त्यात वाडा पाहुण्यांनी गच्च  भरला होता. सतत जेवायला आणि कामाला माणसांचा राबता होता. त्यामुळे त्याचे कुठेच लक्ष नव्हते. तो त्याच्या कामात मग्न होता.


    दहा दिवसांत रमाचे लग्न धुमधडाक्यात पार पडले.दागिन्यांनी नखशिखान्त मडलेली रमा सासरी निघून गेली.  पंचक्रोशीतुन सगळी प्रतिष्ठित लोकं आली होती आणि बाकी पाच गावातून  हजोरोच्या संख्येत लोकं लग्नाला आली होती.दोन दिवस तर नुसत्या जेवणावळ्या उठत होत्या. चूल सतत धगधगत होती. बायका आणि पुरुषांना स्वयंकातून आणि कामातून उसंत नव्हती. एकदाचे लग्न पार पडले दोन दिवस पाहुणे राहिले आणि सगळे निघून गेले. जयसिंगरावांना मुद्दामच राधक्काने ठेवून घेतले होते. आता जरा वाड्याने आणि राघवेंद्रने ही मोकळा श्वास घेतला होता. पण सारखी धावपळ करून तो आता दमला होता. 


  दोन दिवस तो नुसता झोपत होता. आजही दुपारी तो वर  त्याच्या खोलीत झोपला होता. उन्हं कलून गेली तरी तो उठला नाही म्हणून सुभानराव काठी टेकत जिना चढून त्याच्या खोलीत गेले. खोलीचे दार उघडेच होते. ते दार ढकलून आता गेले. राघवेंद्र गाढ झोपला होता.सुभानराव त्याच्या उशाला बसले आणि त्याच्या केसातून मायेने हात फिरवत म्हणाले.


सुभानराव,“ बरं वाटतंय नव्हं तुला राघव? का वैद्यास्नी बोलुवायाच रं?” त्यांनी विचारलं.त्यांच्या स्पर्शाने आणि आवाजाने राघवेंद्र उठून बसला.


राघवेंद्र,“ मी बरा हाय आण्णा. शिन आलाया आन अंग दुकतंया बगा. पायचं लय दुकत्याती.” तो म्हणाला.


सुभानराव,“ दुकणारच की रं. दवदव काय थुडी झाली व्हय रं तुझी. आता काय नाय आट दिस आराम कर निस्ता.म्या जातू तू पड वाईस कुणाला तर ऊन ऊन पाणी घीऊनशान धाडतु. वाईस पाय शिकून घे लेका.” ते म्हणाले आणि खाली गेले.


  त्यांनी राधक्काला वर गरम पाणी पाठवायला सांगितलं. राधक्काने चुलीवर पाणी ठेवलं आणि ते एका पितळी बादलीत ओतले त्यात मूठभर मीठ घातले.


राधक्का,“ मालू  राघवला ऊन पाणी नुवून दे बाय वरी.त्याच पाय दुकत्याती.” ती म्हणाली.


मधुमालती,“ मी…आत्या मी नाही बाई. तू दुसरं कुणाला तर पाठवून दे.” ती संकोचून म्हणाली.


सावित्री,“ येडी का खुळी तू? दिवानसाब तुझ्या हुणाऱ्या सासू हायत्या त्यास्नी नाय म्हणतीस काय? तू अशी वागलीस तर माझा उद्धार हुईल हतं.” ती तिला रागवत म्हणाली.


राधक्का,“ काय जी वैनी कशापायी पोरीला भ्या दावताया. मालू म्या आदी तुझी आत्या हाय आन मगं सासू. अगं जा की वर तेवडच बोलशीला दोगं. म्हणूनशान  म्हणाले नव्हं जा.” ती तिला समजावत म्हणाली.


सावित्री,“ दिवानसाब हिला भाची सून म्हणूनशान लय डोईवर बसवू नगासा. दिसती तशी नाय जी ही लय वांडं हाय. घरामंडी समद्यास्नी गरागरा फिरवतीया बाला बी सोडत नाय.” ती सांगत होती.


मधुमालती,“ तू  माझी सख्खी आई आहेस ना की सावत्र गं? अशी चुगली करतेस ती आत्याजवळ माझी.आत्या तुमी हीच काही ऐकू नका.आणा ती बादली नेते मी. ”ती तोंड फुगवून म्हणाली.


सावित्री,“ बगतलं का कशी कैचीवानी जीब चलतीया. बानं पोरगी  शिकतीया म्हणून डूईवर बसवून घेतलीया निसती. चांगलं रट्ट द्या जी तुमी. पाय दाबून बी दे गं राघवरावांचा.” ती पदरात तोंड लपवून हसत म्हणाली.


मधूमालती,“ व्हय जी पण तू गप्प बसतीस का आता आई!” ती तिचे मोठाले घारे डोळे वटारून बादली घेऊन जात म्हणाली.


राधक्का,“ काय वैनी पोरीला छळतायसा जी.” ती हसून म्हणाली.


सावित्री,“ बगतलं का? कसा राग हाय नाकावर? तशी माझी लेक गुणाची हाय जी तुमी म्हणाल तसं करणार ती. शिकली म्हणूनशान सैपाकात  मागं नाय ना घरच्या कुणत्या बी कामात.” ती कौतुकाने सांगत होती.


विमल,“ हे मातूर खरं हाय. ताईसाब समद्यात हुशार हायत्या.”तिने री ओढली.


राधक्का,“ म्हैत हाय मला.बसा तुमी म्या खायाला काय तर देतू.” ती हसून म्हणाली.

★★★


मधुमालती गरम पाण्याची बादली घेऊन वर राघवेंद्रच्या खोलीत गेली. तो उठून काही तरी वाचत बसला होता.


राघवेंद्र,“ आरं देवा तुला बी जुपली का कामाला आईनं? ठिव ती बादली हतं.” तो म्हणाला.


मधुमालती,“ त्यात एवढं काय काम आहे. तुम्ही बसा पाय घालून गरम पाण्यात बरं वाटेल तुम्हाला.” ती त्याच्या हातालं पुस्तक वाकून पाहत बोलत होती.


राघवेंद्र,“ लय शुद्ध बोलाया शिकलीस गं. आणि ही घे शेक्सपिअरचा ड्रामा हाय. अथेल्लो.” तो तिच्या हातात पुस्तक देऊन खटावर बसून  पाय गरम पाण्यात घालत म्हणाला.


मधुमालती,“ ते कॉलेजमध्ये अशुद्ध बोललं की हसतात. म्हणून शिकले आणि तशीच सवय लागली. का तुम्हाला येत नाही का शुद्ध बोलायला? तुम्ही तर मुंबईत राहून आलात की. आणि अथेल्लो … हा ड्रामा खूप शोधला साताऱ्यात पण मला कुठेच मिळाला नाही. तुम्ही कुठून आणलात?” ती पुस्तक चाळत म्हणाली.


राघवेंद्र,“ हो येतं ना शुद्ध मराठी बोलता. पण मला तर बाबा आपली गावरान भाषा आवडते. म्हणून मी तसाच बोलतो आणि साताऱ्याची गोष्ट वेगळी आहे शेवटी जिल्हा तो, इथं असं शुद्ध बोललो तर लोकं तोंडाकडे पाहतील हे ध्यान कुटनशान आलं म्हणून!” तो तिला पाहत म्हणाला आणि त्याच्या बोलण्यावर ती हसायला लागली.


मधुमालती,“ हे मातूर खरं हाय जी. मला असंच बघतात नोकर माणसं.” ती मोठ्याने हसत बोलत होती.


राघवेंद्र,“ नाय तर काय. आणि हा ड्रामा मी लंडनवरून येताना बरीच पुस्तकं आणली त्यातच हा देखील आणला होता. तुला पायजेल का?” त्याने विचारलं.


मधुमालती,“ हो पाहिजे तर आहे पण तुम्ही वाचलात का?” ती म्हणाली.


राघवेंद्र,“ नाही अजून. पण तुला हवा असेल तर घेऊन जा.” तो म्हणाला.


मधुमालती,“ खरंच मी पुढच्या वेळी वाचून येताना घेऊन येईन.” ती खुश होत म्हणाली.


राघवेंद्र,“ अगं राहूदे तुलाच.” तो म्हणाला आणि मधुमालती  उड्या मारतच खाली पुस्तक घेऊन आली.


सगळ्यांना मधुमालती जहागिरदारांची सून म्हणून पसंत होती. पण राघवेंद्रला ती बायको म्हणून पसंत आहे का? याचा विचार कोणीच केला नव्हता. सगळ्यांनी त्याच्या परस्पर त्याचे लग्न मधुमालती बरोबर  ठरवून टाकले होते पण राघवेंद्रला यातले काहीच माहीत नव्हते. तो तर हरणीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्याच्या मनात हरणीने घर केले होते.


पण जहागिरदारांच्या वाड्यात त्याचे प्रेम मान्य होईल का? हरणीबद्दल  सगळ्यांना कळेल तेंव्हा काय गहजब होणार होता आणि मधुमालतीचे पुढे काय होणार होते. सगळे राघवेंद्र आणि मधुमालतीच्या लग्नाची आणि मधुमालती देखील राघवेंद्रबरोबरच्या लग्नाची स्वप्ने पाहण्यात दंग होती पण नियती मात्र तिचे डाव आखण्यात मग्न होती.


राघवेंद्र जहागिरदारच्या सौभाग्यवतीचे दान आता कोणाच्या पदरात पडणार होते? मधुमालती की हरणी?

क्रमशः

©स्वामिनी चौगुले.


टीप- सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात आत्याच्या मुलाला दाजी म्हणायची पद्धत होती आणि आहे. अजून ही खेड्या-पाड्यात आत्याच्या मुलाला दाजीच म्हणाले जाते. लेखनाची भाषा जुन्या काळातील ग्रामीण मराठी आहे त्यामुळे जर एखादा शब्द नाही कळला तर निःसंकोचपणे कमेंटमध्ये विचारू शकता.


कथेचा या आधीचा म्हणजे भाग नऊ खालील लिंकवर👇


माडीवरची बाई भाग 9
Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post