हरणी आता पुन्हा भेटेल की नाही या विचारानेच राघवेंद्र खूप व्याकुळ झाला. तो आणि मदन झाडाखालीच बराच वेळ उभे होते.मदन त्याला समजावत होता.
मदन,“ असं काय बी नसंल राघव. दुपारची येळ हाय नव्हं तवा समदी गेली असत्याल कुटं तरी!”
राघवेंद्र,“ फडातली इवडी माणसं एकाच येळी कशी कुटं जात्याल रं मद्या?”
तो बोलत होता आणि त्या घराकडे काही तरी हालचाल दिसली. दोघांनी नीट पाहिलं तेंव्हा हरणी आणि हौसा मावशी कुठून तरी आलेल्या दिसत होत्या. राघवेंद्र त्यांच्या दिशेने जाणार तर मदनने त्याचा हात धरला.
मदन,“ हतंच थांब तू. म्या हरणीला हतंच घिवून येतू. हतं तर कुणी बी दिसत नाय पर तरी बी तुला कोण वळकलं तर बभ्रा हुईल बाबा.” तो म्हणाला आणि राघवेंद्र मान हलवून तिथेच उभा राहिला.
तो हरणी जवळ गेला आणि काही तरी बोलून तिला घेऊन आला.
राघवेंद्र,“ कुटं गिली हुतीस? मला वाटलं आता तू मला कदीच भेटायची नाय” तो थोडा चिडून म्हणाला.
हरणी,“ आता गं बया मला काय सपान पडलं हुतं व्हय तुमी येणार म्हणूनशान. आन गेली हुती वान सामान अनाया मौशी बरुबर.” ती ही तोऱ्यातच म्हणाली.
मदन,“ पर बाकी कोण बी दिसत नाय की कुटं गेलं हायती समदी?” त्याने विचारलं.
हरणी,“ हतल्या पटलाच्या घरी बैटक हाय नव्हं. तकडं गेली हायती समदी. सरकार चिडाया तर म्या पायजे आट दिस हून गेलं आन तुमी आता आलया व्हय भेटाया मला.? किती वाट बघत होती मी” ती तोंड फुगवून पदराच्या शेवाला बोटांनी चाळा करत म्हणाली.
राघवेंद्र,“ मी काय मोकळा हाय व्हय गं. आज हतं तात्यास्नी थाप मारून आलू हाय. तर तू बी भांडाया लागली व्हय मला.” तो ही चिडूनच म्हणाला.
मदन,“ ये बाबानू म्या लय भुक्यावलो हाय. या राघवच तर पॉट तुला बगुनशान भरलं असंल पर म्या मला लय भुका लागल्या हायत्या. आदी जेवायचं बगा मंग भांडत बसा दोगं बी.” तो वैतागून म्हणाला.
हरणी,“ आरं देवा तुमी जेवला नाय दोगं अजून? दिस पार मात्यावर आला नव्हं. चला म्या घालतू जेवाया दोगास्नी.” ती काळजीने म्हणाली.
राघवेंद्र,“ नगं. कुणी बगतलं मला तर पंचाइत व्हायची.आमी जेवतु कुटं तरीआईनं दिलंया बांदून जेवान. मद्या वाईस दम धर की लेका.” तो मदनकडे रागाने पाहत म्हणाला.
हरणी,“ या माळ रानावर कोण बगाया नाय तुमास्नी. हा पर आमच्या गरीबाच्या घरची चटणी भाकर सरकारास्नी गॉड नाय लागायची.” ती पुन्हा तोंड फुगवून राघवेंद्रला तिरकस पाहत म्हणाली.
राघवेंद्र,“ असं काय बी नाय पर मला कुणी हतं बगितलं म्हंजी म्हणूनशान मी म्हणत हुतो.” तो सारवा सारव करत म्हणाला.
मदन,“ तुला हतं बगाया कुणी बी नाय. चल की बाबा मला लय भुका लगल्यात्या.” तो राघवेंद्रला जवळ जवळ ओढतच घेऊन गेला. तिघे त्या घरात गेले.
हरणी,“ बसा. मावशे पाणी आन पाट दे वाईस. म्या ताटं घेतु. तुमच्या वाणी पाच पकवाण नसत्यात जी आमच्यात पर भाकर हाय आन मेतीचं कोरड्यास, खर्डा आन धै हाय.” ती वर अडकवलेल्या शिंकाळ्यात ठेवलेलं टोपलं आणि बाकी सगळं काढत म्हणाली.
हौसा मावशी,“सरकार आन आपल्यात जेवणार हरणे?” तिने आश्चर्याने विचारलं.
हरणी,“ व्हय.”
राघवेंद्र,“ यात बी जेवाण हाय. आईनं काय दिलं म्हैत नाय पर जेवाण असणार. सोड हे बी.” तो एक कापडाने बांधलेलं गाठोडं तिच्यासमोर ठेवत म्हणाला. हरणीने गाठोडे सोडले.
हरणी,“ सरकार यात तर सांजूऱ्याच्या आन शेंगदाण्याच्या पोळ्या हायत्या जी, त्याबी तूप लावून भाजलेल्या आन बरुबर शेंगदाण्याची चटणी आन चपाती बी हायजी. म्या हेच वाडते जी तुमी भाकर कुटं खानारजी.” ती गाठोड्यातले पदार्थ पाहून हिरमुसून म्हणाली. तिला थोडी लाजही वाटत होती. तिचा खुललेला चेहरा उतरला.
राघवेंद्र,“ पर मला खायची हाय नव्हं तुझी भाकर आन भाजी. वाड की आता नाय तर मद्याचा जीव जायाचा. आन तुमी दोगी बी घ्या की.” तो म्हणाला.आणि ती खुश झाली. तिने ताटात भाजी, भाकरी, खर्डा आणि दही वाढले आणि त्याबरोबर दोन्ही प्रकारच्या पोळ्या ही.
दोघांनी जेवायला सुरुवात गेली.
मदन,“ कोरड्यास कोण केलंय? झ्याक झालं हाय.” तो खात म्हणाला.
राघवेंद्र,“ व्हय खर्डा बी झणझणीत हाय. तुमी बी घ्या की दोगी. पोळ्या तर खावा की.” तो म्हणाला.
हरणी,“ मावशी आन आयनं केलं हाय समदं. नगं जी.” ती संकोचून म्हणाली.
राघवेंद्र,“ का जहागिरदारांच्या घरीच चालत नाय व्हय? आन तुला काय येतं का नाय?” त्याने खात विचारलं.
हरणी,“ बरं मावशे घे पोळी. आन मला बी येतो की खर्डा कराया.” ती हौसाच्या हातात पोळी देऊन स्वतः खात म्हणाली.
राघवेंद्र,“ तरीच लयच तिकाट हाय.” तो हसून म्हणाला.
हौसा,“ सरकार म्या मालकीण बायच्या हाताच्या जेवणाचं नाव लय ऐकून हुते जी. पर आज तुमच्या मुळं खायला मिळालं.खरंच जी त्यांच्या हातात अनपुरणा हाय बगा.” ती पोळी खात बोलत होती.
दोघांनी जेवण केलं.
मदन,“ म्या हाय हतं तुमी जा. राघव वाईस फिरुनशान या मंग निगु अपुन.”
तो म्हणाला आणि राघवेंद्र हरणीला घेऊन मघाशीच्या झाडाखाली गेला. बराच वेळ दोघेही शांत होते. राघवेंद्र हरणीला एकटक पाहत होता आणि हरणी मात्र अंग चोरून उभी होती. तिची नजर जमिनीवर खिळली होती आणि डाव्या पायाचा अंगठा जमीन उकरत होता. थोडा वेळ असाच गेला. तिला त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावलेली जाणवत होती.
हरणी,“ काय बगताय जी? आन काय तर बोला की.” तिनेच शांतता भंग केली.
राघवेंद्र,“ काय नाय देवाने घडवलेली एक सुंदर कलाकृती डोळ्यात साठवतोय. आन एका सुगंधित फुलाचा वास श्वासात भरून घेतोय.” तो तिच्यावरची नजर जराही ढळू न देता म्हणाला.
हरणी,“ आमा आडान्यास्नी तुमच्या शिकल्या सवरल्या लोकांची भाषा नाय कळत जी.” ती लाजून त्याच्याकडे पाहत म्हणाली.
राघवेंद्र,“ कळत कशी नाय कळल्या शिवाय लाजलीस व्हय गं. बरं तुला कळंल अशा भाषेत सांगतो हरणी तू लय देकनी हायस. अक्षी नक्षत्रावाणी आन तुझा ह्यो सुगंद तर मला येड लावतुया बग. असं वाटतंया तुला मिठीत घेऊनशान….” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. त्याच्या नजरेतील भाव हरणीच्या डोळ्यांनी ओळखले आणि तिने लाजून पदराने तोंड झाकून घेतलं.
हरणी,“ जावा तकडं! तुमचं काय बी.”
राघवेंद्र,“ तोंड काय झाकतीस? हा मुकडा बगाया इतक्या लांब आलो नव्हं. मी तुझ्यासाटनं काय तर आणलं हाय.” तो म्हणाला आणि त्याने सदऱ्याच्या खिशात हात घातला आणि तिच्यासमोर धरला.
हरणी,“ पंजन? पर नगं जी आय नं बगीतलं तर सवाल करील आन तुमी दिलं तिला समजलं तर लय चिडल ती.” ती म्हणाली.
राघवेंद्र,“ मंग मी काय मागारी निव व्हय गं?” त्याने रागाने विचारलं.
हरणी,“ रागावतासा कशा पाई.म्या घेती आन आता घालून दावते तुमास्नी पर मला दडवून ठिवाया पायजेल.” ती म्हणाली आणि तिथल्या दगडावर बसून पायात पैंजण घातले आणि उठून थोडी साडी वर करून त्याला दोन्ही पाय दाखवले. ते चांगलं जाडजूड पैंजण तिच्या गोऱ्या पायात उठून दिसत होतं.ते पाहून राघवेंद्र खुश झाला.
राघवेंद्र,“ झाक दिसतंया बग तुझ्या पायात. बरं आता पुडचं गाव कुटलं म्हणायचं?” त्याने विचारलं.
हरणी,“ शिरूरला जाणार पर आताच नाय अजून धा दिसानं. आता कवा भेटाया येता जी. म्या वाटकडं डोळं लावूनशान बसत्या नव्हं तुमच्या.” ती डोळ्यातले पाणी आडवत त्याला पाहत म्हणाली.
राघवेंद्र,“ व्हय काय? इतकी याद इती माजी?” त्याने तिला नाटकीपणे पाहत विचारलं.
हरणी,“ याद यायला आदी माणूस इसराया लागतुया जी. तुमास्नी म्या इसरनं या जलमात हुयाच नाय.” ती डोळ्यातले पाणी पदराने टिपत म्हणाली.
राघवेंद्र,“ मला बी तुला बगीतल्या बिगार गमत नाय पर मला सारकं तुला भेटाया नाय जमायचं. आता धा दिसनं शिरूरला भेटाया येतू तुला. आता निगाया पायजेल अमास्नी.” तो गंभीरपणे म्हणाला.
हरणी,“ बरं म्या वाट बगतु जी.” ती म्हणाली.
दोघे पुन्हा घरात गेले. राघवेंद्र आणि मदन निघाले.
हरणी,“ आरं देवा म्या इसरलेच की सरकार वाईस थांबा जी.(असं म्हणून ती एका फडताळाजवळ गेली. त्यातून एक पितळी डबा घेऊन त्यांच्यासमोर आली.) ही लाडू हायती जी मला म्हैत हाय तुमच्या घरातल्या लाडवाची सर नाय ह्यास्नी पर म्या केलं हायती. तुपातलं हायती जी खावा.” ती चार लाडू राघवेंद्र आणि चार मदनच्या हातात देत म्हणाली. राघवेंद्रने लाडू खाल्ला.
राघवेंद्र,“ पर तू तर म्हणलीस निसता खर्डा इतुया कराया तुला. पर लाडू बी चांगलं झाल्याती की पर कशाचं लाडू हायती हे? म्हंजी येगळंच हायती म्हणूनशान इचारलं?”
हरणी,“ गव्हाच्या पिटाचं हायती गूळ घालून केल्यालं जी तुमास्नी आवडलं?” तिने त्याच्याकडं कौतुकाने पाहत विचारलं.
राघवेंद्र,“ व्हय तर. पुण्यांदा आल्यावर मला पायजेल हायती बरं का खायाला.” तो हसून म्हणाला.आणि दोघे निघाले
हरणी,“ जी म्या करून ठिवतु. सरकार परत लवकर या जी.” ती त्याला पाहत म्हणाली. हे बोलताना तिचा आवाज भरून आला होता पण तिने डोळ्यातून पाणी काढलं नाही. आवंढा गिळला.
राघवेंद्र,“व्हय.” तो म्हणाला आणि निघाला.
इतक्या वेळ गप्प बसलेली हौसा आता बोलू लागली.
हैसा,“ हरणे लय मोटं सपान नगं बगूस. ते सरकार हायती. आन अपुन तमासगिर ते तुला नादाला लावत्याल पर लगीन नाय करायचं तुझ्याबरुबर लय तर लय तुला ठिवत्याल. असं बी जहागिरदार खांदानीत माडीवर बाय ठिवायची रीत हाय. पर तुझ्या आयला तुझं लगीन लावून द्यायचं हाय म्हणूनशान तिनं तुला फड आन नाचगण्या पासनं लांब ठिवली हाय नव्हं. तुझ्या बानं तुला नाचगाणं शिकीवलं पर तुझ्या आयनं तुला समद्या जमान्याच्या वंगाळ नजरा पासनं वाचविलं हाय लेके. ती तुझं लगीन कराया पैका जमवत हाय. तुझी आय तुझ्या साटनं नाय नाय ते करतीया आज पटलाच्या वाड्यावर निसतं नाचगाणं नाय तर पाटील लय मोटी बिदागी देणार हाय तुझ्या आयबरोबर…….लय वंगाळ हाय बाई हे.” ती तोंडाला पदर लावत म्हणाली.
हरणी,“ मावशे मला समदं कळतंया पर वळत नाय अशी गत झाली हाय माझी. माझा जीव जडला हाय गं धाकल्या सरकार वर. आता म्या नाय मागं फिरायची. माझ्या तकदिरात असंल ते हुल.” ती रडत पण ठामपणे म्हणाली.
★★★
इकडे जहागीरदार वाड्यावर वेगळंच काही घडत होते. महेंद्रप्रतापरावांनी पहाटेच पाच सहा माणसं मोरची गावला काट्या, कुऱ्हाडी घेऊन राघवेंद्रच्या संरक्षणासाठी पाठवली होती. पण राघवेंद्रला याची सुतराम कल्पना नव्हती. पण राघवेंद्रला ते त्याच्या मागे आहेत न कळू देता तिथं जायचे. कोणी राघवेंद्रला मारायला उठलं तर त्यांचा समाचार घ्या म्हणून महेंद्रप्रतापरावांनी निक्षूण सांगून ठेवले होते.
ती माणसं आता वाड्यावर पोहोचली होती. महेंद्रप्रतापराव आणि सुभानराव त्यांचीच वाट पाहत चौकात बसले होते.
महेंद्रप्रताप,“ आलासा? काय झालं ततं कोणी धाकल्या सरकारास्नी काय केलं का? आवाज चढीवला का?” त्यांनी रागातच विचारलं. त्यांच्यातला रगेल आणि धिप्पाड रंग्या त्या पाच-सहा तशाच रगेल आणि धिप्पाड माणसांचा म्होरक्या होता.
रंग्या,“ नाय जी सरकार! कोणी बी काय बी बोललं नाय जी. उलट धाकल्या सरकारांनी त्यांची बोलतीच बंद केली जी. धाकलं सरकार म्हंजी एक लंबर हुशार माणूस जी. असा डोकेबाज माणूस समद्या पंच कोरिशिर काय पर समद्या जिल्यात सापडायचा नाय जी. त्यो धोंडू भिशाचा पोरगा लय कायदा शिकवीत हुता. धाकल्या सरकारास्नी पर सरकार समुर त्याचा पाड लागतुया व्हय. सरकार परदेशी शिकून आलेलं हायती बारिस्तर ते. काय सांगायचं तुमास्नी काय सुद्ध मराठी आन इंग्रजी तर फाडफाड बोलत हुते. सरकारांनी निसता आवाज चडवला तर लोकं थर झाली जी. त्या पोराला बेस कायदा शिकविला धाक बी दावला आन परत गॉड बी बोललं.त्यो पोरगाच त्यास्नी कोंबडं कापतू जिवून जावा म्हणूनशान अग्रव करत हुता जी.इवडा मोटा तिडा कोणतं बी वैर न घेता सोडवला.धाकलं सरकार जहागिरदार घरण्याचं नाव काडणार जी. असला हुशार माणूस माझ्या जिंदगीत बघितला नाय म्या. धाकलं सरकार हायती म्हणूनशान खोटी बडायी नाय करत जी. अमास्नी काय बी कराया लागलं नाय जी. आता पंच कुरुषीत इशय रंगणार जी.” तो कौतुकाने बोलत होता.
महेंद्रप्रताप,“ अमास्नी म्हैत होतं आमचा राघव समदं निस्तरनार. पर जवानीच गरम रगात त्यात जहागिरदाराचं रगात म्हंजी लयच उसळ्या मारतया. पर त्यो इतकं हुशारीनं वागल. तिडा बी सोडवल, धाक बी दावल आन वैर बी घ्यायचा नाय हे मातूर म्हैत नव्हतं. आज आमी लय खुश हाय. ही तुमची बक्षिसी वाटून घ्या.तुमच्या अदमासा परास ज्यादा हाय.” ते खुश होऊन पैशाने भरलेली थैली त्याच्याकडे भिरकावून बोलत होते.
सुभानराव,“आरं महिंद्रा नातू कुणाचा हाय त्यो.” ते मिशी पिळून खुश होत म्हणाले.
रंग्या,“ थोरलं सरकार अजून काय तर सांगायचं हुतं जी. पर अमास्नी अभय पायजे तुमी रागावलासा तर अमास्नी वाड्याच्या परसात गाडशीला. म्हणूनशान भ्या वाटतंया जी.” तो हात जोडून खाली मान घालून म्हणाला.
महेंद्रप्रताप,“ दिलं अभय. बोल रंग्या घडाघडा.” ते गंभीर होऊन म्हणाले. सुभानरावांनी पण कान टवकारले.
रंग्या,“ धाकलं सरकार आन त्यांचा तो मैतर मदन. शेतावरचं काम करून कुटं तर चाललं हुतं म्हणूनशान आमी बी त्यांच्या मागं गेलो तर ते तमाशाच्या फडाच्या ततं गेलं. फडावर तर कोन बी नव्हतं. समद्य सामसूम हुतं. धाकलं सरकार एका झाडाखाली थांबलं आन त्यो मदन ततंल्या घराकडं गेला तर घर बी बंद हुतं जी त्यो फिरून आला परत आन सरकार आन त्यो काय तर बोलत ततं थांबलं हुतं जी. पर कुणी बी आलं नाय गेलं बी नाय मंग अमी आलो जी निगुन.” तो गंभीरपणे सांगत होता.
महेंद्रप्रताप,“ धाकलं सरकार त्या घराकडं गेलतं का?” त्यांनी विचारलं.
रंग्या,“ नाय जी. ते त्या झाडा खालनं हललं सुदीक नायती. त्यांचा मैतर गेला तर ततं कोणी बी नवतं जी.” तो म्हणाला.
महेंद्रप्रताप,“ मंग धाकल्या सारकरांचा त्याच्याशी काय बी संबंद नाय. मदनच काय तर काम हुतं पर त्यो पोरगा बी रंगेल नाय. चांगला आन खानदानी पोरगा हाय त्यो बी. त्याचं काय तर काम हाय असं राघव म्हणत हुता तेच कराया गेला असलं त्यो. वान सामानाची उदारी राईली असलं त्यांची ती वसूल कराया गेला असलं. असं बी या तमासगिरांचं काय बी खरं नसतया. पर ध्यानात ठिवा हे समदं वाड्याच्या बाहीर जायला नाय पायजे लोकं पराचा कावळा करत्याती. माझा राघव तसा नाय त्यो वंगाळ कदी बी नाय वागनार. इश्वास हाय माझा. पर तुमी ध्यानात ठिवा.” ते कठोरपणे म्हणाले.
रंग्या,“ थोरलं सरकार वाड्याचं मिट खाल्लं हाय जी आमी. तुमी काय सुदीक मनात नगा आनू. पुण्यांदा काय काम असलं तर हाळी मारा जी येतो आमी.” तो आणि त्याचे टोळके कमरेतून वाकत हात जोडून नमस्कार करत म्हणाले आणि निघून गेले.
केवळ आणि केवळ नशीब बलवत्तर म्हणून आज राघवेंद्र आणि हरणीचे बिंग फुटले नव्हते. पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असं नाही. ज्या दिवशी महेंद्रप्रताप आणि सुभानरावांना कळेल की राघवेंद्र एका तमाशात नचणाऱ्या बाईच्या मुलीच्या प्रेमात पडला आहे तेंव्हा काय गहजब होणार होता? आणि महेंद्रप्रताप यांचा राघवेंद्रवर असलेला गाढ विश्वास तुटेल तेंव्हा बाप लेकाच्या नात्याचे काय होईल?
क्रमशः
©स्वामिनी चौगुले
