माडीवरची बाई भाग ८

 





   आज सकाळीच राघवेंद्र मदनला घेऊन  मोरचीला निघाला. खरं तर तर मोरची गावाला जाण्याचा त्याचा खरा उद्देश हरणीला भेटणे हा होता पण आता त्याला धोंडू भिशेचा जे त्यांची मोरची गावची शेती सांभाळत होते त्याच्या मुलाला भेटून त्याचाही बंदोबस्त करायचा होता. 


  दोघे सकाळी सातच्या बसने निघाले आणि पाऊण तासात ते मोरची गावात होते. दोघे बस मधून उतरले.


मदन,“ आदी हरणीला भेटायाच का आदी तुमच्या शेतावर जायाचं सरकार?” त्याने विचारलं.


राघवेंद्र,“ मद्या किती येळा सांगायचं रं तुला मला राघव म्हण म्हणूनशान. तू माझा मैतर काय लेका. खरं सांगू मद्या हरणीला कदी बगीन असं झालं हाय बग पर आदी आपून शेतावर जाऊ त्यो भिशेचा पोरगा काय उड्या मारतुया ते बगू मग तिला भेटाया जाऊ.” तो म्हणाला आणि दोघे चालत तासाभरात शेतात पोहोचले.


मदन,“ पर म्या धाकलं सरकार म्हणलं की त्वां जे त्वांड करून बगतूस ना मला ते लय आवडतं बग राघव.” तो हसून म्हणाला.


राघवेंद्र,“ मद्या तुला तर एक दिस अण्णांच्या तावडीत देतू बग.” तो तोंड फुगवून म्हणाला आणि दोघं हसायला लागले.


  धोंडू भिशेने राघवेंद्रला ओळखले आणि तो धावतच त्याच्याजवळ आला.


धोंडू,“ सरकार तुमी हतं?” तो हात जोडून म्हणाला.


राघवेंद्र,“ का आमी यायचं नाय का काय?” त्याने जरा कठोरपणेच विचारलं.


धोंडू,“तसं नाय जी सरकार. तुमचं शात तुमचं समदं आमी चाकर माणसं. तुमास्नी कोण आडवणार जी? पर असं अचानक आलासा म्हणून ईचारल. या जी बसा. सुंदे गूळ पाणी आन धाकलं सरकार आल्याती.” तो बाजावर घोंगडी अंथरत बोलत होता.


राघवेंद्र,“ काय नाय जरा येगळाच सूर ऐकू आला नव्हं हकडनं म्हणून आलो बगाव म्हणलं आमची जहागिरी आन जमीन शाबूत हाय का गिळली कुणी?” तो बाजावर ऐटीत बसत कठोरपणे बोलत होता. तोपर्यंत साधारण  पन्नास वर्षाची  एक बाई डोक्यावरचा पदर सावरत गूळ पाणी घेऊन आली.


धोंडू,“ असं काय बी नाय सरकार आवं आमच्या पिड्या तुच्याच मातीत राबून जगल्या! आमी मिट खाल्लंया तुमचं…” तो हात जोडून मान खाली घालून  बोलत होता. तोपर्यंत त्याचा मुलगा तिथे आला.


राघवेंद्र,“ व्हय का? पर आमी तर येगळंच ऐकलं हाय. आन ह्यो कोण?”त्याने त्या तरुण मुलाकडे रोखून  पाहत विचारलं. साधारण विशी पार केलेला एक काळा सावळा आणि अंगाने मजबूत पण चेहऱ्यावर माज साफ दिसत असलेला तो  तरुण ही त्याच्या नजरेला नजर भिडवत  होता.


धोंडू,“ आरं काय करतुस खाली कर नजर ते धाकलं सरकार हायती.(तो डोळे वटारून त्याच्या  मुलाला दरडावत होता.) ह्यो सुरज्या माझा ल्योक हाय जी. आन तुमी काय ऐकलं ते….” तो पुढे बोलणार तर तो मुलगा मध्येच बोलू लागला.


सुरज्या,“ ते खरं आहे. आणि आप्पा हे कुठले  सरकार? आता एकच सरकार आहे भारत सरकार आणि आपण त्यांचाच कायदा मानायचा आता. तुम्ही इथं काय आम्हाला दम द्यायला आला का? पण आता तुमचे राज्य गेलं आणि जहागिरदारी पण. आता नवीन कायदा आला आहे कसेल त्याची जमीन.” तो माजात बोलत होता आणि राघवेंद्र शांतपणे ऐकत होता.


धोंडू,“ आरं गप की. चार बुकं शिकून आलास म्हंजी लय अक्कल आली व्हय तुला? सरकार माफी करा जी.” तो सुरज्याला दाटावत राघवेंद्रच्या समोर हात जोडून बोलत होता.


राघवेंद्र,“बोलू द्या की त्याला.हं तर भारत सरकारने कायदा केला आहे की कसेल त्याची जमीन!  बरं मग तो आम्ही मान्य केला असं समज. पण ही दीडशे एकर जामीन इथं जितकी लोकं काम करतात त्या सगळ्यांना मिळायला हवी ना कायद्याने? पण तुझ्या बोलण्यातून असं दिसतंय की ही सगळी जमीन तुला एकट्यालाच हवी?” तो अगदी शुद्ध मराठीत बोलत होता आणि मदन त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता.


सुरज्या,“ असं कसं पण ही जमीन तर आम्ही पिढ्यांपुढ्यां शेत मजुरांकडून  करून घेतो पण ही जमीन त्यांची नाही त्यांना वाटा कसा मिळेल? ही सगळी जमीन कुळ कायद्याने आमची आहे.” तो आता चिडून म्हणाला.


राघवेंद्र,“ अरे आपण एकाच देशात राहतो. तूच म्हणालास ना की इथं फक्त एक सरकार आहे ते म्हणजे भारत सरकार आणि त्याच सरकारचा कायदा तू मनतोस ना? मग ही जमीन कुळ कायद्याने सगळ्या मजुरांना मिळायला हवी. आम्ही तर इथं राबणाऱ्या प्रत्येकला जमीन वाटून  देणार.” तो बाजावर पायांची अढीवर- अढी घालून ऐटीत बसत पुन्हा म्हणाला.


सुरज्या,“ हे.. बरोबर नाही.” तो आता त-त प-प करत बोलत होता.


राघवेंद्र,“ का? तूच तर म्हणालास की कसेल त्याची जमीन म्हणून मग दीडशे एकर जमीन तू आणि तुझे वडील आणि कोण तुझे भावंड असतील ते एकटेच कसता का रे?” त्याने उठून  आता रागाने  ओरडून त्याला विचारलं. आणि दोघा बाप लेकाबरोबर मदन ही दचकला.त्याच्या ओरडण्याने  तिथे शेतात काम करणारे स्त्री-पुरुष  मजूर  आणि  धोंडूची बाकी  तीन मुलं ही त्याच्याभोवती गोळा झाली होती.  



सुरज्या,“नाही पण…” तो आता चांगलाच घाबरा होता. 


राघवेंद्र,“ पण काय? तुला काय वाटतं  ही जहागीरी आणि जमीन जुमला असाच फुकट मिळाला आहे होय रे आम्हाला? पिढ्यांपुढ्यांनी कष्ट केलं. महाराजांच्या पदरी पराक्रम गाजवला तेंव्हा जाऊन मिळालं हे सगळं आणि आमच्या पिढ्यांनी त्यात भर घातली. जमिनी विकत पण घेतल्या आहेत. आणि तू कायदा दाखवतोस तो कुणाला रे मला? मी बॅरिस्टर आहे कायदा कोळून पिला आहे मी. चार बुकं शिकून आम्हाला कायदा शिकवायचा नाही. आणि जमीन फुकट लाटायला इथं काय खिराफत ठेवली आहे का? आणि वाचता येत ना तुला रीड धिस पेपर्स यु फुलीश मॅन! धिस ऑल ऍग्री कल्चर लँड इस माय विथ लिगल परमिशन! मुंबईमधून शिकून आला आहेस ना? मग इतकं इंग्रजी तर कळत असेल ना? तरी ही मराठीमधून सांगतो तुला, ही सगळी शेत  जमीन कायदेशीर रित्या आमच्या नावावर आहे. भारत सरकारचे कागद आहेत हे. आणि हो आम्हाला लोकं इथं सरकार म्हणतात ते प्रेमाने आम्ही काय त्यांना बळजबरी केली नाही आम्हाला सरकार म्हणायची. तुझ्यासारखे अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या शिक्षित लोकांपेक्षा अडाणी लोकं परवडली. आता बोला आमची जमीन कधी रिकामी करताय? आरे पण तुला फक्त कायद्याचीच भाषा समजते ना? मग पोलिसांना बोलावून आम्ही कायदेशीरपणे ही जमीन रिकामी करून घेतो आता! मदन चल.” तो रागाने बोलत होता. त्याने सुरज्याच्या हातात दिलेले पेपर्स काढून घेतले आणि तो निघाला. सुरज्या मात्र पुतळ्या सारखा जागेवर उभा होता. राघवेंद्रने त्याची बोलतीच बंद केली होती. पण धोंडूने त्याचे पाय धरले. तो रडत बोलत होता. त्याचं पाहून त्याच्या बाकी तीन मुलांनीही राघवेंद्रचे पाय धरले.


धोंडू,“ असं करू नगाजी सरकार तुमी अमास्नी हतंनं हकलून दिलं तर समद्या पंचकुरुषीत आमास्नी काम कोण बी देणार नाय जी. माझी समदी मुलं, नातवंड आना वाचून उपाशी कर्त्याल जी  ह्याच्या गुन्ह्याची शिक्षा समद्यास्नी नगा देवू जी. माझी समदी खानदान देशु धडीला लागंल जी. अमास्नी माफी करा जी सरकार.” ते रडत हात जोडून  बोलत होते. 


राघवेंद्र,“ काका तुमी माझ्या परास मोठं हायसा माझ्या तात्याच्या वयाचं हायसा तुमी. असं पाय नगा धरू. उटा तुमी समदी.”  तो त्यांना उठवत म्हणाला.


धोंडू,“ सरकार माफ करा एकदाव जी. आरं मूडद्या माग की माफी. किती येळा तुला सांगिलं म्या असं काय बोलू नगंस, मनात बी अनु नगंस पर तुला लय पकं फुटली हुती रं भाड्या. म्हमाईला कालज्यात काय शीकून आला संवताला बारिस्तर  समजाया लागला. आता का तुझी दातकीळ बसली रं बोल की मेल्या.” ते रागाने सुरज्याला मारत बोलत होते.


सुरज्या,“ माफ कराजी सरकार! मी  स्वार्थीपणे विचार केला आणि तुम्हाला कायदा दाखवायला गेलो. पण एक विसरलो की कायदा दाखवायला त्याचा आधी अभ्यास करायला पाहिजे. चूक झाली माझ्याकडून पण माझ्या एकट्याच्या आगळीकीची शिक्षा तुम्ही या सगळ्यांना देऊ नका.” तो रडत हात जोडून म्हणाला.


राघवेंद्र,“ सरकार? मघाशी तर म्हणालास की या देशात एकच सरकार आहे मग आता काय झाले. तू शिकून आलास तर चांगली गोष्ट आहे पण तुझ्या शिक्षणाचा वापर लोकांच्या कल्याणासाठी कर. असा स्वार्थासाठी करून तुझ्या हाताला काहीच लागणार नाही आणि जर तुला स्वतःच्या मालकीची  जमीन हवी असेल तर घे की मेहनत करून विकत कोण आडवलं आहे तुला? खरं तर ही शेत जमीन आणि ही जहागिरी मला देखील जन्माने मिळाली आहे. माझे यात काहीच कर्तृत्व नाही पण ती राखणे आणि जतन करणे हे माझे माझ्या कुटुंबाप्रति कर्तव्य आहे म्हणून आलो मी इथं. बाकी तुझ्यापेक्षा शुद्ध मराठी मला ही बोलता येते मराठीच का हिंदी, इंग्रजी आणि लॅटिन पण येते मला पण आपण जिथं राहतो त्या मातीतल्या बोली भाषेतला गोडवा निराळाच असतो लेका. आन काका मी काय तुमास्नी खरंच हाकलून नाय देणार. ही जमीन तुमी पिकीवतायसा या मातीला तुमच्या घामाचा वास हाय तुमच्या हाताची सवय हाय. तवा मी कोण हाय तुमास्नी हकलणारा? तुमीच करा ही जमीन पर पुन्यानदा अशी आगळीकी व्हयला नगं.” तो बोलत होता.


धोंडू,“ न्हाय जी पुण्यांदा असं काय बी व्हायचं नाय. शबूद देतो जी म्या धकलं सरकार आन आमची चूक पोटात घातलिसा लय उपकार झालं जी.” ते पुन्हा हात जोडून बोलत होते.


राघवेंद्र,“ बरं येतो मंग आमी. आन हे लाडू आन  सांडगं पापुड अजून काय बाय हाय आईनं दिलं हाय.” तो दोन मोठ्या पिशव्या मदनकडून  घेत त्यांच्या हातात देत म्हणाला.


धोंडू,“ मालकीण बाई हायत्याच मोठ्या मनाच्या माऊली हायत्या जी त्या आमची. त्यास्नी म्हैत असणार की हतं आगळीकी झाली हाय तरी बी पेरमानं काय बाय धाडलं  बगा.” ते सद्गतीत  होत बोलत होते. आणि सुरज्याचा चेहरा मात्र शरमेने झुकला.


राघवेंद्र,“ काका आवं जुनी नाती आपली अशी तुटणार हायती व्हय. आणि आमच्या घरची रीत हाय कूटं बी मोकळ्या हातानं जात नाय आमी. येतू आमी.” तो म्हणाला आणि निघाला.


सुरज्या,“ धाकलं सरकार माफ करा जी. मी लय चुकीचा वागलो. पण इथून पुढं तुम्ही म्हणाल तसं होईल. पण थांबा की जेवणाची वेळ बी झाली आहे. कोंबडं कापतो  जेवण करून जा.” तो अजिजीने बोलत होता.


राघवेंद्र,“ नको. पुन्हा कधी तरी येईन मी, आता वेळ नाही.” तो म्हणाला आणि मदन आणि तो निघाले मदन मात्र राघवेंद्रचे हे रूप पाहून आश्चर्य चकित झाला होता.


मदन, “ कसली सुद्ध मराठी बोलतुयास रं आन इंग्रजी तर फडफड बुलतुयास की त्या सुरज्याचं त्वांड बगण्यावानी झालतं लेका आन काय तुला हिंदी बी इत्या आणि लॅटिन का फटीन बी पर इवड्या भाषा कुटं आन कदी शिकलास रं?” तो कौतुकाने विचारत होता.


राघवेंद्र,“ सुध्द नाय रं शुद्ध मराठी ते मुंबईत राहूनशान शिकलू. आन हिंदी आन इंग्रजी तर शिकायलाच हुती नव्हं आन फाडफाड इंग्रजी बोलण्यात काय बी मोठं नाय पाच वरीस मी लंडन मदी हुतु ना शकाया मंग आपून मराठी बोलतु तसं त्यांची भाषा इंग्रजी हाय. तू बी वरीस दोन वरीस ततं राहिलास ना तुबी बोलणार इंग्रजी फाडफाड आन लॅटिन बी ततं बोलत्यात रं ततंलीच एक भाषा हाय ती मंग ती बी शिकलो.” तो सहज बोलत होता.


मदन,“ इतकं शिकायचं म्हंजी काय खायचं काम हाय व्हय. म्या तर मॅट्रिकच कसा बसा फास झालु बाबा. ते बी तुझ्यामुळं तू अभ्यास करून घेतला नव्हं माझा.” तो म्हणाला.


राघवेंद्र,“ व्हय तर! पर मदन शेट अपुन बोलत बोलत कुटं निगालु हाय? हरणीचा फड कुटं हाय?” त्याने विचारलं.


मदन,“ अपुन बरुबर वाटंला हाय. त्यो बग तंबू दिस्तुया फडाचा. ततंच एका घरात तुमची हरणी उतरली हाय जी धाकलं सरकार.” तो डोळे मिचकावत म्हणाला आणि राघवेंद्रने त्याच्या पाठीत एक रट्टा घातला.


राघवेंद्र,“ तू पुण्यांदा मला धाकल सरकार म्हण मंग अजून एक रट्टा बसतूया पाटीत तुझ्या.” तो हसून म्हणाला.


मदन,“ काय रं मारुतु मला. तुला नाय म्हैत म्या अप्पाला चुना लावून तुझ्या हरिणीचा निरुप घिऊन आलो ती कूटं जाणार हुती त्याचा आन तू मला मारतुयास व्हय रं? एक तर भूका लागल्यात्या. त्यो सुरज्या जेवून जा म्हणत हुता तर नगु म्हणाला. ” तो तोंड फुगवून म्हणाला.


राघवेंद्र,“ बरं चल आता रडू नगंस. आईनं काय तर दिलं असलं बांदून हरणीला भेटू मगं कुटं तरी पाणी घीऊन जेवू बाबा.” तो म्हणाला.


   दोघे ही तंबूकडे न जाता त्या घराकडे वळले. राघवेंद्र त्या झोपडीपासून थोडं लांब एका झाडाखाली उभा राहिला कारण दुपारची वेळ होती आणि त्या ठिकाणी भरपूर माणसे असण्याची शक्यता होती. उगीच त्याला कोणी ओळखायला नको आणि बभ्रा व्हायला नको म्हणून त्याने मदनला पाठवून दिले. पण मदन तिथं गेला तर त्या घराला कुलूप होते आणि आसपास कोणीच दिसत नव्हते.मदन निराश होऊन राघवेंद्रजवळ आला.


मदन,“ आरं घराला कुलूप हाय त्या. माग म्या आलो तर मला हितंच हरणी भेटली हुती पर आता कोण बी नाय रं.” तो म्हणाला.


राघवेंद्र,“ पर आता कुटं गिली असत्याली समदी आन हरणी? आता कुटं हुडकायची तिला? आन ती पुडं कुटल्या गावात जाणार हाय हे कसं कळायचं मद्या आपल्याला? का तात्याला समदं समजलं हाय आन त्यांनीच समद्यास्नी हुसकलं हाय? आता हरणी मला भेटलं का रं मद्या?” तो व्याकुळ होऊन बोलत होता. त्याच्या मनात एक ना अनेक विचारांचे काहूर माजले होते.


  हरणी आणि फडातली सगळी लोकं कुठं गेली होती? की राघवेंद्रला वाटते तसं खरंच महेंद्रप्रतापना सगळं कळले होते आणि त्यांनी सगळ्यांना हुसकावून लावले होते? हरणी आणि राघवेंद्रची साथ इथपर्यंत होती का?

क्रमशः

©स्वामिनी चौगुले


ही कथा साठच्या दशकातील आहे त्यामुळे  त्या काळातील समाज व्यवस्था लेखिकेने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण लेखिका त्या काळातील कोणत्याही कुप्रथेचा पुरस्कार करत नाही याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.






Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post