माडीवरची बाई भाग ७

 



   राघवेंद्र आज रात्री कोणाला ही न कळू देता  पुन्हा तमाशाच्या फडावर जाणार होता. रात्री सगळे झोपायच्या तयारीत होते आणि अण्णांचा चमच्या शिपरती दारात हजर होता. राघवेंद्र, महेंद्रप्रताप चौकात गप्पा मारत होते तोपर्यंत अण्णा तयार होऊन बाहेर आले.


अण्णा,“ शिरपा आला का रं?” त्यांनी चौकात येऊन विचारलं.


महेंद्रप्रताप,“ व्हय आलाया की त्यो काय. पर अण्णा बास करा की आता, वय झालं तुमचं एक तर आंदार इंदारच तुमस्नी दिसत नाय. कूट पडून आलासा म्हंजी. त्या तमाशा बिगर तुमचं काय आडतंय व्हय?” ते त्यांना समजावत होते.


अण्णा,“ राधक्का या महिंद्राला सांग. मला अडवू नगं म्हणूनशान  नाय तर ह्याच्या पेकटात काटीच घालतु बग.” ते रागाने म्हणाले.


राधक्का,“ ह्या दोगा बाप लेकाच्या भांडणाला म्या तर वैतायले रं राघवा.” ती डोक्यावरचा पदर सावरत बोलत होती.


राघवेंद्र,“तात्या कशाला आडवतासा त्यास्नी? शिरपती आन गण्या असत्यात नव्हं त्यांच्या बरुबर.” 


महेंद्रप्रताप,“ घे तू बी आज्याचीच बाजू घे बाबा.माझं काय बी नाय.”  ते खांदे उडवत पानाचा विडा तोंडात घालत म्हणाले.


अण्णा,“ राधक्का म्या येतो गं.” ते म्हणाले आणि निघून गेले.



    सात वाजता सगळी निजानीज झाली. राघवेंद्र मात्र आज तमाशाच्या फडाकडे जाऊ की नको या विचारात होता. पण मदन बाहेर त्याची वाट पाहत असेल हे त्याला माहित होतं. त्याला सांगून परत यावं म्हणून तो हळूच कंदील आणि शाल घेऊन बाहेर पडला. तर त्याच्या अपेक्षेप्रमाणे मदन त्याचीच वाट पाहत वाड्याच्या गेट बाहेर उभा होता. 


राघवेंद्र,“ मद्या तू जा.आज अण्णा तमाशाला आलं हायती मी तमाशाला आलो आन त्यांनी मला बघितलं तर मातूर घरात लय मोठा तमाशा होईल बाबा.” तो म्हणाला.


मदन,“ आरं पर अण्णा तमाशाच्या फडात जाणार तमाशा बगाया अपुन कुटं फडात जाणार हाय? अपुन तर हरणीला भेटाया आन ही पिशवी द्याया जाणार हाय नव्हं तिच्या खोलीकडं.” तो पिशवी दाखवत म्हणाला.


राघवेंद्र,“ आरं व्हय की माझ्या हे ध्यानातच आलं नाय बग.” तो डोक्याला हात लावून म्हणाला.


मदन,“ बग म्हणूनशान म्हणत हुतु तुला लय शिकू नको रं! लय शिकलं की असं हुतया.” तो हसून म्हणाला.


राघवेंद्र,“ मद्या लय जीब चालाया लागलीया रं तुझी.” तो त्याच्या पाठीवर एक  रट्टा देत म्हणाला.


मदन,“ आय आय मारुतु काय रं? उद्या लाडवाच ध्यानात ठिव. चल आता बिगिबिगी टोळकं थांमलं हाय चावडीवर आपल्या साटनं.” तो म्हणाला आणि राघवेंद्र हसून हो म्हणून त्याच्याबरोबर चालू लागला.



   सगळे पुन्हा तमाशाच्या फडाजवळ होते. बाकी सगळे फडात गेले. राघवेंद्र आणि मदनने  मात्र  हरिणीच्या खोलीची वाट धरली. मदनने दार वाजवले आणि आज हरणीनेच ते लगेच उघडले. ती तर जसं काही त्यांचीच वाट पाहत होती. ती बाहेर आली.


मदन,“ ही पिशवी, म्या हाय हतंच.” तो राघवेंद्रच्या हातात पिशवी देऊन थोडं लांब जाऊन उभा राहिला.


राघवेंद्र,“ ही तुझी पिशवी लाडू हायती यात माझी आई लय झ्याक लाडू करतीया.” तो पिशवी तिच्या हातात देत म्हणाला.


हरणी,“ पर हे कशा पाई? नुसती पिशवी द्यायची व्हती जी.” ती म्हणाली.


राघवेंद्र,“ जहागिरदार सारकरांच्यात मोकळं काय देण्याची  रीत नाय. बरं मी जातू.” तो पुन्हा तोऱ्यात म्हणाला.


हरणी,“अवं सरकार थांबा की वाईस. हे अत्तर! मोगऱ्याचं  हाय जी. मला म्हैत हाय तुमी लय उच्ची अत्तर लावत असशीला. हे नाय तसं. पर त्या दिशी तुमी सुवास हुडकीत आलासा आन हात हलवत गेलासा मला वंगाळ वाटलं नव्हं.आन तुमच्यावर म्या हसले त्या साटनं माफी करा जी.” ती अत्तराची एक छोटी कुपी त्याच्यासमोर धरत म्हणाली आणि त्याचा चेहरा खुलला.


राघवेंद्र,“ मोगरा मला अवडतुया पर आमी नाय घेत असं कुनाकडून काय बी आमी सरकार हाऊत.नगं अमास्नी.” तो तरी चेहरा शक्य तेवढा मख्ख ठेवत म्हणाला आणि कंदील घेऊन निघाला.


हरणी,“ असं काय करता जी! म्या तुमास्नी भेट म्हणूनशान दितु हाय. तुमाला सुवास आवडला हुता नव्हं माझा म्हणूनशान. घ्या की जी.” ती अजिजीने म्हणाला.


राघवेंद्र,“ बरं पर मी बी तुला त्या बदल्यात काय तर दितु ते घ्याया पायजे.” तो अत्तराची कुपी तिच्याकडून घेत म्हणाला.


हरणी,“ जी सरकार.” ती हसून म्हणाली.


राघवेंद्र,“ आन मला काय तुझ्या हतं रातच्याला यायला जमायचं नाय. आज तर माझा आजा आला हाय तमाशाला त्यानं मला हतं बगतलं तर माझ्या घरात तमाशा हुईल.” तो म्हणाला.


हरणी,“ मंग कूट भीटू जी तुमास्नी?” तिने प्रश्नार्थक नजरेने त्याला पाहत विचारलं.


राघवेंद्र,“ अं ss नदीच्या काटाला आमचीच आमराई हाय ततं ये उद्या दुपारच्याला.” तो म्हणाला.


हरणी,“ येतू जी.” ती म्हणाली.

★★★


    तो ती अत्तराची कुपी खिशात घालून खुश होतच घरी गेला. दुसऱ्या दिवशी त्याला हरणी ठरल्या ठिकाणी ठरल्या वेळी भेटली.


राघवेंद्र,“ हे सावारी पातळ तुला पसंत पडलं हुतं अक्षी तसं नाय ते मी रमेला म्हंजी माझ्या भनीला दिलं. हे गुलाबी रंगाचंच हाय.” तो तिच्या हातात साडी देत म्हणाला.


हरणी,“ झाक हाय जी.” ती साडी उलटून पालटून पाहत. खुश होत म्हणाली.


   पुढे पाच दिवस या गाठी भेटी रोज होत राहिल्या. दोघांना ही नकळत एकमेकांची ओढ लागली होती. दोघांनाही न बोलता एकमेकांच्या मनातलं कळलं होतं. आज मात्र हरिणी राडवेली होऊन नदीच्या काठी आली होती. राघवेंद्र आंब्याच्या हिरव्या गर्द झाडाच्या सावली खाली एका मोठ्या दगडावर   तिची वाट पाहत  बसला होता. अर्थात मदनही त्याच्याबरोबर होताच. मदनने तिला येताना पाहिलं आणि मी इथेच आहे असा राघवेंद्रला  इशारा करून तो तिथून लांब गेला. हरणी आली पण गप्पच होती. थोडावेळ शांततेत गेला.


राघवेंद्र,“ काय झालं? गप गप का हायस?” त्याने विचारलं.


हरणी,“ जत्रा सपली हतली. आज रातच्याला शेवटचा खेळ हाय जी हतला. उंद्या म्या जाणार हाय.” ती डोळ्यातले पाणी आडवत कशी बशी कातर आवाजात म्हणाली.


राघवेंद्र,“ आता कूट जाणार? ” त्याने अस्वस्थ होत विचारलं.


हरणी,“ जत्रा पड्यालच्या गावात जाणार हाय नव्हं ततं जाणार जत्रं बरुबर.” तिने आता रडत सांगितलं.


राघवेंद्र,“ म्हंजी कुटं ते तरी सांग की?” त्याने चिडक्या आवाजात विचारलं.


हरणी,“ रेवळला.” ती पुन्हा हुंदका देत म्हणाली.


राघवेंद्र,“ अगं पर रडाया काय झालं मंग?” त्याने विचारलं.


हरणी,“ सरकार तुमास्नी भेटाया मिळणार नाय मला आता म्हणूनशान रडू येतया. तुमास्नी काय तुमी सरकार मला इसराल लगीच पर म्या.. मला इसरता येणार नाय जी तुमास्नी.” ती  पदराने रडून लाल झालेला नाकाचा शेंडा पुसत म्हणाली.


राघवेंद्र,“ हात तिच्या! येडी का हुळी गं तू? मी काय तुला लगीच इसरनार हाय व्हय गं?  रेवळला आमची जमीन हाय मी येतू की ततं भेटाया तुला.” तो हसून म्हणाला.


हरणी,“ खरं का?” तिने डोळे पुसत त्याच्याकडे आशेने पाहत विचारलं.


राघवेंद्र,“ मी खोटं बोलत नसतू हरणी.” तो म्हणाला.


हरणी,“ पर आट दिसनं ततंन म्या जत्रं बरुबर दुसऱ्या गावाला गेल्यावर?” तिने पुन्हा निरागसपणे विचारलं. राघवेंद्र आता मात्र विचारात पडला. त्याने थोडावेळ विचार गेला आणि म्हणाला.


राघवेंद्र,“ अगं पर तुला गावशिव घरदार असलंच नव्हं. मी तुझ्या गावाला येत जातू तुला भेटाया.” तो म्हणाला.


हरणी,“ व्हय मंग म्या काय बिन गावाची हाय व्हय! माजलगाव हाय जी माझं गाव ततं शेवंता सातारकरनीचं घर इचारलं की कुणी बी घरी आणून सोडलं तुमास्नी.” ती म्हणाली.


राघवेंद्र,“ माजलगाव? अगं ततं बी शेती हाय आमची.” तो म्हणाला.


हरणी,“ म्हैत हाय जी मला. आमचा निम्मा गाव तर तुमच्या शेतात राबूनच पॉट भरतु की. पर सरकार तुमास्नी ततं बी समदी वळकत असत्याल नव्हं?” तिने विचारलं.


राघवेंद्र,“ व्हय. पर अपुन असंच कूट तर गावा भाईर भिटू की. आन किती दिस तुमी असं फिरतीवर हाय ते बी सांग?” त्याने विचारलं.


हरणी,“ अं बगा म्हंजी अजून चार गावात आट-आट दिस…म्हंजी…” ती बोटावर हिशोब करत होती.


राघवेंद्र,“ म्हंजी एक मास गं खुळे. मंग आठ दिसनं भिटू. त्येच्या पुडच्या गावात. मी मद्याला पाटीवतू तू कुटं जाणार हाय ते त्येला सांग म्हंजी मी भेटाया इतु. मला बी कामं हायती. या आटा-दिसात  मुंबईला जायचं हाय जीप अनाया आन माझ्या भणीच लगीन तोंडावर हाय बग. तरी बी आदनं मदनं मी भेटाया येतू तुला.” तो बोलत होता.


हरणी,“तुमी म्हमईला जाणार हायसा ते बी जीप आनाया. सरकार जीप आनाया लय पैकं लागत असत्याल नव्हं?” तिने डोळे विस्फारून निरागसपणे विचारलं.


राघवेंद्र,“ व्हय. पर आमी सरकार हाय हरणीबाई तवा जीप लागणार हाय आमास्नी जहागिरी बगाया.” तो हसून म्हणाला.


हरणी,“ व्हय जी तुमी सरकार हायसा. बरं म्या जाते. कवा भेटाया येता वाट  बगते जी म्या.” ती डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली.


राघवेंद्र,“ येतू गं मी तुला भेटाया.” तो तिला आश्वस्त करत म्हणाला.

★★★


   त्यानंतर राघवेंद्र मुंबईला गेला. तिथे त्याने रमाच्या होणाऱ्या नवऱ्याच्या ओळखीने एका चारचाकीच्या दुकानातून निम्मे पैसे भरून एका जीपची ऑर्डर दिली. त्याला जीप एका महिन्याने मिळणार होती म्हणून तो गावी परत आला. या सगळ्या गडबडीत एक आठवडा निघून गेला. तो मदनच्या दुकानावर हरणी कोणत्या गावात गेली आहे त्याची चौकशी करायला गेला तर त्याला कळले की ती मोरचीला गेली आहे म्हणजे ते पंचक्रोशीतील म्हणजे तिच्या आणि राघवेंद्रच्या आसपासच्या गावातच फिरत आहेत. तिथेही जहागिरदारांची शेती होतीच. तो मदनला  आपण मोरचीला उद्या सकाळी जात आहोत तू तयार रहा म्हणून सांगून आला. त्याने रात्रीच्या जेवणाच्या वेळी विषय काढला.


राघवेंद्र,“ तात्या मोरचीला आपली शेती हाय नव्हं?” त्याने विचारलं.


महेंद्रप्रताप,“ व्हय हाय की पर का रं?” त्यांनी विचारलं.


राघवेंद्र,“ ततं मदनच काम हाय उद्या त्यो जाणार हाय. मी बी म्हणत हुतो की कारभारात आता लक्ष घालावं. मंग मद्या बरुबर जाऊन ततं काय काय सुरू हाय बगून येऊ काय? ततं आपली शेती कोणाकडं कराया हाय? ” तो म्हणाला.


महेंद्रप्रताप,“जाऊ का म्हणूनशान काय ईचारतु जा की. आन ततं धोंडू भीशा बगतु आपली शेती. त्याचा पोरगा म्हमईस्न शिकून आला हाय तवापास्न त्यो पोरगा लय टिवटिव करतु हाय. त्यो कसला कायदा सरकारनं काडला हाय नव्हं. कसल त्याची जमीन तर ते बेनं लय उड्या माराया लागलं हाय असं कानावर आलं हाय माझ्या. ततं नदी काटाला आपली मस दीडशे एकर बागायती हाय की. म्या जानारच होतु तकडं.” ते सांगत होते.


राघवेंद्र,“ व्हय भारत सरकारनं कुळ कायदा काडला हाय पर आपल्याकडं जमिनीचं कायदेशीर हक्क हायती नव्हं आन नुसतं धान्य पिकवाया अपुन त्यास्नी वाटा देतू ना? आन बाकी मजुरास्नी येगळा वाटा दितु मंग त्यास्नी  पोटात  का दुकाया लागलं हाय?” 


सुभानराव,“ आता मालकी हक्क पायजेल बाबा त्यास्नी.” ते म्हणाले.


राघवेंद्र,“ पर ही जहागिरी आन जमीन जुमला असाच वरनं पडला हाय व्हय. पिढ्यांपिढ्या कष्ट केलं हाय. महाराजांस्नी येळ प्रसंगी आपलं लढाईत रगात सुदीक दिलं तवा ही जहागिरी हुबी राहिली नव्हं फुकाट नाय मिळाली आन इकत घिवून भर बी घातली हाय की. मी जातो आन त्याला चांगला कायदा शिकवून येतू उद्या. मी बी बॅरिस्टर हाय. तुमी फकस्त कागदं काडून ठिवा. लय टिवटिव किली तर हाकलून देतू.आपली  जमीन पिकवाया दहा जण मिळत्याल.” तो बोलत होता.


महेंद्रप्रताप,“ व्हय. आता कसा जहागिरदार सोबलास लेका. चार माणसं घिवून जा संगट. म्या कागुद काडून देतू तुला.” ते खुश होत म्हणाले.


सुभानराव,“ मंग नातू कुणाचा हाय?” ते मिशीला पिळ देत म्हणाले.


राघवेंद्र,“ तात्या माणसांची काय बी गरज नाय. मी बगतो म्हणलं नव्हं. लयच झालं तर तालुक्याला पोलिसात तक्रार करतू. ततंला फौजदार माझा मैतर हाय.” तो म्हणाला.


महेंद्रप्रताप,“ बरं जा.” ते खुश होत म्हणाले.



    मोरचीत काय घडणार होते? आणि राघवेंद्रला हरणी तिथे भेटेल का? आणि घरातल्यापासून लपून छपून हे प्रकरण किती दिवस चालणार होते?

क्रमशः

©स्वामिनी चौगुले.


अशाच मनोरंजन कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन पेजला लाईक आणि फॉलो करा.










Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post