माडीवरची बाई भाग ६




 राघवेंद्र जसा गेला तसा गुपचूप घरी येऊन त्याच्या खोलीत खाटवर आडवा झाला.येताना ही मदन त्याला गेटपर्यंत सोडायला आला होता. राघवेंद्र झोपायचा प्रयत्न करत होता पण त्याला झोप काही केल्या येत नव्हती. त्याच्या मनात सतत हरिणीचे विचार घोळत होते.


‛ असं कसं काय असंल? एकाद्या माणसाच्या अंगाला असा कसा अत्तर बिन लावता अंगचाच सुवास येईल? मी इतकं मुंबई आन  लंडन मदी बी राहून आलो पर असलं कधी काय ऐकलं नाय बगितलं बी नाय. नवलच हाय हे तर. उद्या अण्णांस्नी ईचारतु त्यास्नी काय ना काय म्हैत असंल ह्या बद्दल.’ 


  त्याला या सगळ्या विचारात कधी झोप लागली ते त्याला ही कळले नाही. त्याला जाग आली ती रमेच्या दार वाजवण्याने.


रमा,“ दाद्या आरं दार उघिड की. आज किती येळ झोपलायस.” ती दार वाजवत बोलत होती. राघवेंद्र डोळे चोळत उठला आणि त्याने दार उघडलं.


राघवेंद्र,“ रमे जरा दम घेत जा की. नुसतं दार वाजवत हायस ती.” तो वैतागून बोलत होता.


रमा,“ आरं दाद्या बरा हाय नव्हं तू? किती येळ झोपला हायस आज; सुर्या माथ्यावर आला की रं. आई आणि अण्णा काळजी करर्त्यात शेवटाला आईनं मला धाडलं.” ती काळजीने बोलत होती.


राघवेंद्र,“ व्हय मी बरा हाय. राती झोपच लागली नाय बग. म्हणून उठाया उशीर झाला. मी आलूच तू पाणी काडाया लाव अंगुळीला.” तो म्हणाला. 


रमा,“ व्हय.” ती म्हणाली आणि निघून गेली.



  राघवेंद्र खाली गेला आणि त्यानं त्याचं सगळं आवरलं. त्याच्या मनात मात्र तेच तेच विचार घोळत होते आणि सुभानरावांना त्याबद्दल कधी विचारेण असं त्याला झालं होतं. तो न्याहरी करायला स्वयंपाक घरात येऊन बसला.


राधक्का,“ काय रं पोरा तुझी तब्बेत बरी हाय नव्हं? आज लय येळ झोपलाया.” ती त्याच्या पुढ्यात चपाती आणि भाजीच ताट सरकवूत काळजीने विचारत होती.


राघवेंद्र,“ मला काय बी झालं नाय. राती उशीर झोप आली नाय म्हणून उठाया उशीर झाला बग. बरं आई अण्णा हायतं नव्हं घरात?” त्याने खात विचारलं.


राधक्का,“ व्हय हायतं की. बाहीर त्यांच्या खुर्चीत बसेलं हायती.”  ती म्हणाली.


राघवेंद्र,“ पर समद्या आत्या, पोरं, मामा,मामी आन तात्या कुठं गेलं? कोण बी दिसं ना.” तो इकडे तिकडे पाहत म्हणाला.


राधक्का,“ तुझं तात्या समद्यास्नी घिऊन तालुक्याला गेलं हायती. कापडं घ्याया. उद्या समदी जाणार हायती नव्हं.” ती म्हणाली.


राघवेंद्र,“ लगीच जाणार बी? दोन तर दिस झालं समद्यास्नी  इऊन.” त्याने आश्चर्याने विचारलं


राधक्का,“ आरं सासरवाशीनी त्या. आन समद्यास्नी  त्यांची त्यांची कामं हायती. चिक्कार शेती बाडी हाय समद्यास्नी  आता तर सुगी झाली नव्हं मंग बाकी कामं असत्याती की आन रमीचं लगीन तोंडावर हाय तवा समद्या येणार हायत्या पंदरा दिस आदी.” ती त्याला सांगत होती.


राघवेंद्र,“ बरं मी हाय आई चौकात अण्णा बरुबर.” तो म्हणाला आणि निघून गेला.


   सुभानराव त्यांच्या खुर्चीत बसून दिवणजीनी केलेला हिशोब पाहत होते.


राघवेंद्र,“ अण्णा तुमी काम करताया?” त्याने जवळची लाकडी खुर्ची घेऊन त्यावर बसत विचारलं.


सुभानराव,“ व्हय कराया नगं व्हय रं? त्यो एकला महिंद्रा कुठं कुठं पुरा पडायचा बाबा? आता मला लय काय होत नाय पर हिसाब-किताब बगतु बसल्या बसल्या.” ते म्हणाले.


राघवेंद्र,“खरं हाय तुमचं. आता मी बगत जाईन हिसाब- किताब आन बाकी कारभारात बी हळूहळू लक्ष घालीन म्हणतुया. इतकी जत्रा झाली की मुंबईला जावून पयला जीप घीऊन येतो बगा मंजी लय कामं सोपी व्हत्याल.” तो बोलत होता.


सुभानराव,“ अक्षी माझ्या मनतलं बोलला बग. माझ्या महिंद्राची लय दमणूक हुतीया रं. एवडा भला मोटा डोलारा बगायचा मंजी काय सोप हाय व्हय.” ते खुश होत म्हणाले.


राघवेंद्र,“ मी आलूया ना आता समदं बघतु. पर अण्णा एक ईचारायच हुतं.” तो मूळ मुद्द्यावर आला.


सुभानराव,“ इचार की मंग.”


राघवेंद्र,“ अण्णा एकाद्या माणसाच्या अंगाला अत्तर बित्तंर न लावता अंगचाच सुवास अस्तुया का? म्हंजी अक्षी फुलावाणी फुलाला कसा अंगचाच सुवास अस्तुया तसा.” त्याने विचारलं.


सुभानराव,“ आरं अस्तुया की पर लाका मंदी एकाला अस्तुया बग. लय तर बायास्नी. पर लाकात एकद बाईला अस्तुया. लाकात एकद हरणाला कसा अस्तुया अक्षी तसा. पर तू का ईचातुया?” त्यांनी विचारलं.


राघवेंद्र,“ मला तर नवल वाटतंया. अण्णा तुमी अशी बाई नाय तर बाप्या बगीतला हाय का?” त्याने विचारलं.


सुभानराव,“ व्हय लय वरसं झाली बग त्याला बी; एक बाई होती तमासगिरीन अनुसूया सातारकरीन म्हणूनशान तुला सांगतू ती नाचाया आली की समुर बसलेल्यास्नी नुसता सुवास यायचा बाबा तिच्या अंगाचा. आमच्या येळची जवान पोरं येडी हुती तिच्यासाटनं त्यातला म्या बी एक.” ते बोळकं पसरत म्हणाले.


राघवेंद्र,“ म्हंजी असा अंगाचा सुवास येणाऱ्या बाया असत्यात म्हणायचं. पर किती पुण्यवान असत्याल नव्हं त्या?  असा अंगाला  सुवास येणं म्हंजी सादी गोष्ट हाय व्हय.” तो भाबडेपणाने म्हणाला.


सुभानराव,“ न्हाय रं पोरा. माझी आय म्हंजी तुजी पंजी सांगायाची ज्या बाय्यांच्या अंगाला असा सुवास अस्तुया त्या शापित अप्सरा असत्यात बग. स्वरगात जर का एकादीकडून काय चुकलं माकलं तर त्यास्नी शिक्षा म्हणून इथं  जमिनीवर धाडलं जातया आन अशा बाया खरंच शापित असत्यातं रं! अनुसया सातारकरीन अशीच शापित हुती बग; देकनी आन गुणी हुती आन सुवास तर इचारु नगं तिच्या अंगाचा पर पार माती झाली रं तिच्या जिंदगानीची.” ते हळहळत बोलत होते.


राघवेंद्र,“ काय झालं तिचं अण्णा?” त्याने विचारलं.


सुभानराव,“ काय सांगू बाबा तुला सांगली कडला एक राजा भुलला तिला आणि घिऊन गेला संगट पर तिचं लय हाल केलं त्यानं बाबा. ते समदं जाऊ दे. तू घरात कशापायी बसलाय जा जत्रा फिराया. रमीला सावारी पातळ घीऊन आलास. पर तुला बी घिऊन ये की काय तर. हा आता तुला पास पडल का काय हतलं? तू बाबा परदेशातुन शिकून आलेला सायब!” ते मुद्दाम त्याला चिडवत बोलत होते.


राघवेंद्र,“ अण्णा माझ्यावर घसरू नगा तुमी. मला काय पसंत पडलं तर घितु की मी. आन चार दिस परदेशात राहून माणूस बदलत नसतया.” तो खुर्चीवरून उठत लटक्या रागाने म्हणाला.


सुभानराव,“ रागाला आला की दिवाणजी माझा राघव. हे घी पैकं; आन जा.” ते हळूच त्यांच्या धोतरात अडकवलेल्या  पैशाच्या चंचितून दहाच्या पाच नोटा त्याच्या हातावर ठेवून डोळे मिचकावत म्हणाले.


राघवेंद्र,“ नगं मला पैसं. तात्यांनी दिलं हायती आधीच आन जत्रंत जा म्हणून मला पैसं द्याया मी बारका हाय व्हय आता.” तो म्हणाला.


सुभानराव,“ आरं म्हातारा झालास तरी बी माझ्यासाटनं बारकाच रानार त्वा; म्या आजा हाय लेका तुजा; घी पैकं ते तुझ्या बा कडनं आन हे आज्या कडनं.” ते बळेच नोटा त्याच्या हातात कोंबत म्हणाले.


राघवेंद्र,“ बरं. म्हणून तर आजा पायजे बाबा असा  लाड कराया काय दिवाणजी?” तो हसून म्हणाला.


दिवाणजी,“ व्हय धाकलं सरकार पर मोठं सरकार सारका आजा समद्यास्नीच मिळतुया असं नाय जी.” ते हसून म्हणाले.


राघवेंद्र,“ बरं अण्णा मी जातू मद्याकडं आन त्याच्या बरुबर जत्रा फिरतू.”


सुभानराव,“ व्हय पर जेवाया ये बाबा घराकडं.” ते म्हणाले आणि राघवेंद्र होकारार्थी मान डोलावून निघून गेला.

★★★


   राघवेंद्र मदनच्या दुकानात गेला तर त्याच्या वडिलांनी त्याचे हसून स्वागत केलं. त्याला बसायला खुर्ची दिली.


मदनचे वडील,“ या या धाकलं  सरकार. काय पायजेल हुतं तर माणूस धाडायचा हुता, नाय तर निरुप धाडला असता तर म्या कुणाला तर पाठवूनशान सामान पाठीवलं असतं नव्हं. तुम्ही सवता कशापाय तसदी घितली जी” ते हात जोडून बोलत होते.


राघवेंद्र,“ अप्पा मला काय बी घ्यायचं नाय, मी मदनला घिवून जाया आलू हाय. काय हाय लय दिसातून आलो हाय मी गावात तर मला काय बी कळत नाय बगा. मला जत्रा फिरायची हाय म्हणून मदन माझ्या बरुबर आला तर बरं हुईल. मी घिवून जाऊ का त्याला?” त्याने मदनकडे पाहत विचारलं.


मदनचे वडील,“ मंग मला काय ईचारायचं जी? तुमचा मैतर हाय त्यो. घिवून जा. मद्या जा धाकल्या सरकार  बरुबर.” ते म्हणाले.


मदन,“ पर अप्पा दुकानात गर्दी हाय ना?” तो मुद्दाम म्हणाला.


मदनचे वडील,“ ते म्या बगतु समदं. तुला जा म्हणलं नव्हं.” ते त्याला रागाने म्हणाले आणि मदन पडत्या फळाची आज्ञा मानून राघवेंद्रबरोबर गेला.


मदन,“ लेका तू आलास म्हणून माझी सुटका झाली बग.” तो हसून म्हणाला.


राघवेंद्र,“ मला म्हैत होतं ते.” तो म्हणाला.


   आणि दोघे जत्रेत फिरायला लागले. राघवेंद्र एका खेळण्याच्या दुकानासमोर  थबकला.


मदन,“ काय घितु आता हितं? खेळणी खेळाया बारका हायस होय रं?”


राघवेंद्र,“ मद्या आरं आत्याची  नातवंड आली हायती नव्हं घरला त्यास्नी घितु की काय तर.खुश हुत्याली पोरं.” तो रस्त्यावर तात्पुरत्या थाटलेल्या दुकानात खेळणी पाहत  म्हणाला.


दुकानदार,“ या जी सरकार काय दिवू जी?” तो हात जोडून म्हणाला.


राघवेंद्र,“ अं sss पाच भावल्या द्या आन सात नाय नाय आट भवरं. बगू भवरं फिरत्यात का? दावा मला.” तो म्हणाला 


   आणि दुकानदाराने एक भवरा आणि रस्सी त्याच्या हातात दिली. त्याने  भवऱ्याला रस्सी गुंडाळली आणि भवरा जमिनीवर सोडला. तसा भवरा गरगर फिरायला लागला.


मदन,“ आरं वा मला वाटलं हुतं सरकार समदं खेळ इसरलं असत्याल पर भवरा अजून सुदीक झाक फिरवतुस की.” तो हसत म्हणाला. 


राघवेंद्र,“ असा कसा इसरीन रं?( तो पुन्हा भवरा फिरवत.) आट भवरं आन सात भावल्या द्या आणि किती पैसं झालं?” तो म्हणाला आणि पुन्हा त्याला ओळखीचा हसण्याचा आवाज आला त्याबरोबर तोच ओळखीचा सुवास त्याच्या नाकात शिरला आणि त्याने पाठीमागे फिरून पाहिलं.


हरणी,“ सरकार बारकं हाय व्हय तुमी असं भवरा खेळाया?” ती तोंडाला पदर लावून हसत विचारत होती. मदन मात्र दुकानदाराशी खेळण्याच्या किंमती वरून हुज्जत घालत होता.


राघवेंद्र,“तुला काय करायचं? आन आमी जहागिरदार सरकार आहोत तवा नीट बोलायचं.” तो तोंड फुगवून रागाने म्हणाला आणि हरणी थोडी वरमली.


हरणी,“ माफी कराजी सरकार.” ती हात जोडून खाली मान घालत म्हणाली.


मदन,“ दहा रुपय दे रे राघव.” तो मागे वळत त्याला म्हणाला.


राघवेंद्र,“ हे घे. आन खेळणी घे. आरं पर मी पिशवी कुठं आणली हाय? इसरलो बग. आता इवडी खेळणी घ्यायची कशात?” तो त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला.


मदन,“ म्या बी इसरलो. अप्पा जा जा म्हणले आन आलो तुझ्या मागं.” तो म्हणाला आणि त्यांचं बोलणं ऐकत उभी असलेली हरणी म्हणाली.


हरणी,“ ही घ्या जी. माझ्याकडं हाय पिशवी.” ती तिच्या हातातली पिशवी पुढे करत म्हणाली.


राघवेंद्र,“ नगं नगं. आमी जहागिरदार  सरकार हाय. आमी कुणाकडून काय बी घेत नसतोया.” 


   तो पुन्हा त्याच तोऱ्यात म्हणाला. मदन मात्र त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता कारण राघवेंद्रला लहानपणापासून सगळे सरकार म्हणून मागे पुढे करायचे पण त्याने कधीच कोणाला त्याच्या जहागिरदारीचा तोरा किंवा माज दाखवला नव्हता.


मदन,“ आता घिव सरकार हिची पिशवी आन परत नेवून दिवू.” तो म्हणाला.


हरणी,“ व्हय घ्या जी. आन परत आणून द्या.” ती पिशवी मदनकडे देत म्हणाली. आणि मदनने ती घेतली. राघवेंद्र मात्र भरभर पुढे निघून गेला. 


मदन,“ थांब की रं वाईस.” तो पिशवीत खेळणी भरून त्याच्या मागे पळत म्हणाला.


हरणी,“ सरकार ऐका की वाईस. म्या काय म्हणत्या!” ती त्याच्या मागे जात म्हणाली.


राघवेंद्र,“ हे बग असं माग येऊ नगंस आमच्याकडं लोकं बगत्याती.” तो पुन्हा रागाने म्हणाला.


हरणी,“ ते आज रातच्याला तुमी तमाशाला येणार हायसा का?” तिने खाली मान घालून पदराशी चाळा करत विचारलं.


राघवेंद्र,“ का? आन आलू तर इवू नाय तर नाय  बी. आमची मर्जी.” तो पुन्हा आखडत म्हणाला आणि हरणीला कोणी तरी हाक मारली आणि ती पळतच निघून गेली. 


मदन,“ काय झालं हाय धाकलं सरकार आज?” त्याने आश्चर्याने विचारलं.


राघवेंद्र,“ मद्या तू कवा पासनं मला सरकार म्हणाया लागला?” त्याने मदनला पाहत विचारलं.


मदन,“ नाय म्हंजी तू त्या पोरीला म्हणालास की आम्ही जहागिरदार सरकार हाय म्हणून.” तो त्याची नक्कल करत म्हणाला.


राघवेंद्र,“ मद्या ज्यादा शेपारु नगंस काय! आन ती पोरगी कालपासनं नुसती फिदीफिदी हस्तीया माझ्यावर म्हणून तिला सांगाया आन दावाया लागलं आमी सरकार हाय ते.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.


मदन,“ असं हाय व्हय! परं आज रातच्याला तमाशाला जायाचं का?” त्याने साळसूदपणाचा आव आणत विचारलं.


राघवेंद्र,“ म्हंजी? तिची पिशवी द्याया जावंच लागल की.” तो म्हणाला.


मदन,“ पर तुमी सरकार हायसा एक पिशवी द्याया कशाला जायचं संवता. म्या जाऊनशान दिवून येतू की.” तो भुवया उडवत म्हणाला.


राघवेंद्र,“ मद्या लयच शानपणा कराया लागला की तू.” तो चिडून म्हणाला.


मदन,“ मंग सांग की नीट तुला त्या पोरीला भेटाया जायाचं हाय म्हणू. कशाला रं पिशवीचा बहाना करतूस.” तो हसून म्हणाला.


राघवेंद्र,“ तू बी ना मद्या. बरं चल वाड्यावर जेवाया.” तोही हसून म्हणाला.


मदन,“ चला बाबा आज तर नशीब उगडलं आमचं; धाकल्या सरकारनी जेवाया बोलावलं. बाकी काय बी म्हण पर आज तुझ्या आत्याची पोरं-पोरी उड्या मारणार. आज त्यांच्या दाद्यानं खेळणी आणली हायती नव्हं.” तो म्हणाला.


  दोघे ही वाड्यावर गेले. राघवेंद्रने राधक्काच्या हातात खेळण्याची पिशवी दिली.


राधक्का,“ बगीतलं का मामंजी आपल्या राघवानं समद्या  पोरास्नी खेळणी आनली हायती जी. आज पोरं उड्या मारनार. माझा राघव आदी समद्यांचा इचार करणारा हाय.” ती कौतुकाने बोलत होती.


सुभानराव,“ बापावर गेला हाय बग. म्या म्हणलं की संवतासाटी काय तर घेईल तर ह्यो बहाद्दर पिशवी भरून खेळ घीऊन आला आत्याच्या नातवंडांस्नी.” तेही  खुश होत म्हणाले.


राघवेंद्र,“ अण्णा मला जत्रंत माझ्यासाटी घ्याव असं काय बी दिसलं नाय.आई जेवाया वाड मला आन मद्याला आमी हात-पाय धून येतू. लय भूक लागली हाय बग.” तो परस दाराकडे जात म्हणाला.


राधक्का,“ व्हय पर राघव ही पिशवी कुणाची रं? आपली नाय ही पिशवी.” तिने पिशवी पाहून विचारलं.


राघवेंद्र,“ ही व्हय मद्याची हाय पिशवी.” तो थोडा गडबडून म्हणाला.


राधक्का,“ बरं मदन घिवून जा जाताना पिशवी, आज बेसनाचं लाडू केल्याती घालून देते पिशवीत.” ती म्हणाली आणि स्वयंपाक घरात निघून गेली.


 दोघांनी जेवण केलं. राधक्काने पिशवीत लाडू भरून मदनच्या हातात पिशवी दिली आणि मदन वाड्याच्या  बाहेर पडला.  राघवेंद्र  त्याला बाहेरपर्यंत सोडून येतो म्हणून त्याच्याबरोबर गेला. एव्हाना मदनने पिशवीतले  लाडू दोन वेळा पाहिले होते.


राघवेंद्र,“ हावऱ्या  ते लाडू तुझ्यासाटी नायती. जीची पिशवी हाय तिच्या साटनं हायती. जर तू एक बी लाडू खाल्ला ना तुला जहागीरदार सरकारचा हिसका दावतू.” तो त्याला दम देत म्हणाला.


मदन,“ कसला मैतर हायस रं तू? एक लाडू ह्यातला खाल्ला म्या तर काय जाणार हाय व्हय तुझं!” तो बारीक तोंड करून म्हणाला.


राघवेंद्र,“ रडू नगंस मी उद्या तुला डबा भरून लाडू दितु पर यातलं लाडू नाय खायचं. आन जा आता आणि रातच्याला ये गेटाबाहीर” तो हळूच त्याला म्हणाला.


मदन,“ व्हय येतू की कालच्यावानी.” तो खुश होत म्हणाला आणि निघून गेला.


 राघवेंद्र आणि हरणीमध्ये हा जो खेळ सुरू झाला होता तो काय रंग घेणार होता? आणि हरणीने राघवेंद्रला आज तमाशाला का बोलावले असेल? 


क्रमशः

©स्वामिनी चौगुले


अशाच रोमहर्षक कथा आणि कथामालिका वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा आणि तुमचा आमच्या पेजबद्दलचा अमूल्य अभिप्राय रिव्ह्यूमध्ये स्टार देऊन आणि लिखित स्वरूपात आम्हाला नक्की कळवा.











 



   

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post