माडीवरची बाई भाग ५




      राघवेंद्रला रात्रभर झोप लागली नाही. त्याला त्याने नीट पाहिलं ही नाही अशा मुलीची ओढ लागली होती. फक्त आणि फक्त तिच्या सुगंधित अस्तित्वाने. त्याला सकाळ कधी होते आणि मदन तिची खबर काढून कधी त्याला सांगतो आणि तो पुन्हा त्या मुलीला कधी भेटतो असं झालं होतं. त्या नादात तो रमाला घेतलेली साडी  द्यायची देखील विसरला होता.


    सकाळी तो लवकरच उठला. घर पाहुण्यांनी फुलून गेले होते. त्याच्या पाच आत्या आणि त्यांची मुलं यात्रेच्या निमित्ताने त्याला भेटायला आली होते. सगळ्यांना तो परदेशातुन शिकून आला याचे अप्रुब आणि तिकडं तो कसा राहिला कसा शिकला हे ऐकण्याचे कुतूहल होते. त्याने रमाला आणलेली साडी हातात घेतली आणि खाली आला तर सगळे त्याचीच वाट पाहत होते. सगळ्यांनी जवळजवळ त्याला घेरलेच. 


सुभानराव,“ आरं आता उटला हाय त्यो. त्याला अंगुळी, न्ह्यारी करू द्या. मग त्यो भेटल की समद्यास्नी जरा दमा की! राघव जा बाबा तू. राधक्का पोराला पाणीकाड अंगुळीला.” ते म्हणाले आणि त्याच्या भोवतीचा गराडा पांगला.


   राघवेंद्रने सुटकेचा निःश्वास सोडला. आणि तो साडी हातात घेऊन स्वयंपाक घरात पळाला. रमा तिथेच होती.


राघवेंद्र,“ रमे हे घे. तुला कालच सावारी पातळ आणलं हुतं जत्रंतनं पर द्यायला इसरलो. बघ आवडतंय का?” त्याने तिच्या हातात साडी देत विचारलं.


रमा,“आवडलं दाद्या लय झाक हाय. आज मी जत्रंत फिराया जाताना हेच नेसते.” ती खुश होत साडी खांद्यावर घेत म्हणाली.


राघवेंद्र,“ तुला आडवलं ना मंग झालं.” तो हसून म्हणाला.


राधक्का मात्र भावा बहिणीचा संवाद शांतपणे पण मनोमन खुश होत ऐकत होती.


राधक्का,“ नेस म्हण. तुला लय झाक दिसल बग. जा राघवा आवरून ये बाबा समदी तुलाच भेटाया आली हायती.” त्या म्हणाल्या आणि राघव निघून गेला.


   तो त्याचं आवरून आणि नाश्ता करून दिवाणखान्यात आला तर त्याच्या आत्याची मुलं आणि आत्या त्याचीच वाट पाहत होते. सगळे उत्सुक होते त्याला परदेशा विषयी विचारायला. तो सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता आणि तिकडचे किस्से ही सांगत होता. पण तो उत्सुक होता आज मदनला भेटायला पण दुपार टळून गेली तरी तो आला नव्हता. आणि राघवला  पाहुण्यांमुळे घरातून बाहेर पडता येत नव्हते.  संध्याकाळ झाली.  राघव वरच्या मजल्यावरील सज्जात  उभा होता आणि त्याला गेटातून मदन येताना दिसला आणि तो पळतच खाली आला. 


राघवेंद्र,“ आई मदन आला हाय मला भेटाया. मी वर हाय तू काय तर खायला पाठीव.” तो म्हणाला.


राधक्का,“ बरं.त्यो बग आलाच त्यो. आई बा कसं हयाती रं तुझं?” तिने विचारलं.


मदन,“समदी ठीक हायती जी.”


राघवेंद्र,“ चल की मद्या.” तो म्हणाला आणि त्याला हात धरून जवळजवळ ओढतच घेऊन गेला.


राधक्का,“ आरं हळू की. म्या खायला पाठवून दिती रकमीकडं.” त्या हसून म्हणाल्या.


मदन,“किती उतावीळ हुतुयास रं.” तो राघवच्या खोलीत जाऊन खाटावर बसत म्हणाला.


राघवेंद्र,“ तुला दुपारी ये म्हणालु हुतं मी तर आता आलाया. तुमाला वेळेची किंमत नाय बघ.” तो चिडून म्हणाला.


मदन,“ व्हय जी सरकार तुमी परदेशातून बॅरिस्टरहून आला मंग असंच बोलणार. पर खबर न घेता आलू अस्तू तरी बी शिव्या बसल्या असत्या नव्हं. त्या पोरीची खबर काडत दिसभर फिरलू. अप्पा माझा बा त्यांच्या बी चार शिव्या खाल्ल्या. जत्रा हाय तवा दुकानात ही गर्दी हाय. आता तू बी दे बाबा शिव्या.” तो तोंड फुगवून बोलत होता.


राघवेंद्र,“ म्हणून उशीर झाला व्हय लेका. बरं सांग की कोण हाय ती? कुटली हाय?” त्याने उत्सुकतेने विचारलं आणि रकमा दोन ताटात चिवडा, लाडू देऊन गेली.


मदन,“थांब की जरा हे खातू. आरं राधक्काचा चिवडा-लाडू म्हंजी लय बेस अस्तुया बग.” तो चिवड्याचा  बकाना तोंडात  घालत म्हणाला.


राघवेंद्र,“ खा हावऱ्या.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.


मदन,“ सांगतु की रं! ती पोरगी गावात कुणाची बी पावणी म्हणूनशान नाय आली. म्या दिसभर चौकशी केली पर काय बी सुगावा लागत नव्हता. तवा इचार केला ही तामशाच्या फडाबरुबर तर आली नसंल? पर मी तमाशाला जाऊन आलू हाय कालच, ही नाचाया नव्हती. तरी बी गेलो फडाकडं तर ततंच घावली बग ती. तमाशात नाचणाऱ्या शेवंता सातारकरनीची लेक हाय ती. शेवंता फडाची परमुक नाचणारी आन गाणारी  हाय. इतकं वय झालं तर बाई काय बिजलीवानी थिरकती म्हणून सांगू. पर ती पोरीला नाचवत नाय आन नाचवणार बी नाय. पोरीला समद्याच्या नजरंतून वाचवून ठिवत्या. लगीन करणार हाय म्हण तिचं. हरणी नाव हाय बग पोरीच. पर तिला कोणाला बी भेटू देत नाय.” तो खात खात बोलत होता आणि राघवेंद्र लक्ष देऊन ऐकत होता.


राघवेंद्र,“ बरं मी आज तमाशाला येणार हाय. अण्णा आज येणार नाय तमाशाला. घरी पावनं हैती नव्हं.” तो म्हणाला.


मदन,“ पर थोरलं सरकार त्यास्नी  चालायचं नाय म्हणला हुतास तू.” त्याने राघवेंद्रला भुवया उडवत मुद्दाम विचारलं.


राघवेंद्र,“ गप ये तू. मी येणार हाय आज. आन मला तर त्या पोरीला भेटायचंच हाय. हरणी नाव ना तिचं?” तो विचार करत म्हणाला.


मदन,“ बरं राती म्या चावडीवर वाट बघतु तुझी आपल्या टोळक्या बरुबर. पर रातीच्या अंदाराच वाट घावल नव्हं चावडीची तुला?” त्याने विचारलं.


राघवेंद्र,“ मद्या तू लय बोलतु हायस. मला घावणार नाय व्हय रं रस्ता गावात हुंडण्यात लहानपण गेलं माझं. लय डोक्यावर बसू नगस नाय तर जहागिरदार सरकारचा हिसका दाखवीन तुला.” तो लटक्या रागाने त्याला एक रट्टा देत म्हणाला.


मदन,“ आय आय लागलं की रं. बरं रातचाला भेटू. मी जातो नाय तर अप्पा माझा जीव घेत्याल.” तो राघवेंद्रसाठी ठेवलेल्या ताटातला एक बेसन आणि एक बुंदीचा लाडू उचलत म्हणाला.


राघवेंद्र,“ जा हावऱ्या. राती बी घिवून येतो तुला लाडू-चिवडा.” तो हसत म्हणाला आणि मदन निघून गेला.

★★★


   रात्री सगळ्यांची जेवणं झाली आणि सात वाजता सगळी निजानीज झाली. राघवेंद्र शाल घेऊन दबक्या पावलांनी जिना उतरून खाली आला. आणि बाहेर चौकात ठेवलेला कंदील घेऊन तो वाड्याबाहेर पडला. पण अंधारात चावडीवर जाणे जितके सोपे त्याला वाटत होते तितके त्याच्यासाठी ते सोपे राहिलेले नव्हते. तो कंदिलाच्या उजेडात अडखळत कसा बसा गेट बाहेर पडला आणि चाचपडत धडपडत चालू लागला. थोड्या अंतरावर त्याला मदन त्याची वाट पाहत असलेला दिसला.


मदन,“ काय सरकार किती चाचपताय! मला म्हैत हुतं आता वाट तुमच्या पायाखालची नाय रायली. म्हणूनशान इथंवर आलू. चला. ये बाबा विन्या सरकारास्नी नीट खंदिल दाव.” तो राघवेंद्रला चिडवत म्हणाला.


राघवेंद्र,“ लय नगं बोलू आ मद्या. पर बरं झालं लेका तू आलास.” तो म्हणाला.


मदन,“ व्हय मैतर हाय तुझा म्या. चल आता बिगिबिगी. शालीनं त्वांड झाकून घे बाबा नाय तर तुला तमाशाच्या फडात कुणी वळकलं  तर थोरलं सरकार उद्या आमची बिन पाण्याची करत्याल.” तो चालत बोलत होता.


राघवेंद्र,“ तुमची बिन पाण्याची हुईल रं पर मला फटकं मिळत्याल.” तो हसून म्हणाला.



   सगळे तामशाच्या फडावर पोहोचले.तमाशाचा फड एका मोकळ्या रानात होता. एका मोठ्या तंबूत कंदील आणि बत्त्या लावलेल्या होत्या. आणि प्रत्येक माणूस येताना आपापला कंदील सोबत घेऊन येत होता. त्यामुळे चांगलाच प्रकाश सगळीकडे पडला होता. राघवेंद्र सगळ्यांबरोबर पैसे देऊन आत गेला. एका उंच स्टेजसमोर  काही लाकडी खुर्च्या ठेवल्या होत्या तिथे गावातली काही प्रतिष्ठित माणसं बसली होती. बाकी लोक खाली ताडपत्रीवर बसले होते. राघवेंद्र त्याच्या मित्रांसोबत जाऊन खाली बसला. त्याने त्याचा चेहरा शालीने झाकून घेतला होता. त्यामुळे त्याला कोणी ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. गण सुरू झाला. चाळीशीच्या  पुढची  देखणी शेवंताबाई तिच्या सुरेल आवाजात गणेश वंदना करत होती. तिचा आवाज ऐकून सगळेच मंत्रमुग्ध झाले होते पण राघवेंद्रचे मात्र तिकडे लक्ष नव्हते.तो शाल हाताने तोंडावर झाकून घेत हळूच म्हणाला.


राघवेंद्र,“ कूट हाय ती पोरगी? चल की” 


मदन,“ जरा दम धर की रं! खेळ रंगात येवू दे मंग आपून जाऊ. हतंच जवळ एक घर रायला घेतलं हाय त्यांनी ततं असतीया ती हरणी म्या सगळं बगून गेलो हाय.  म्या घेऊन जातू तुला. आता ततं ती आणि तिच्या संगतीला एकादी बाई असंल बाकी समदं हतं असत्यात.” तो हळूच म्हणाला. 


  थोड्या वेळाने गवळण सुरू झाली आणि सगळे पाहण्यात दंगुण गेले. तसा मदन राघवेंद्रला घेऊन कोणाचे लक्ष नाही पाहून तिथून बाहेर पडला. दोघे कंदील घेऊन तंबूच्या बाहेर आले आणि मदन त्याला एका छोट्या झोपडी वजा घरासमोर घेऊन गेला. तिथं मदनच्या अंदाजा प्रमाणे खरंच कोणी नव्हतं. मदनने दारावर थाप मारली. तसं आतून आवाज आला.


“ कोण हाय? तमाशा फडात सुरू हाय. तकडं जा.” आवाज एका पोक्त बाईचा होता.


मदन,“ आमी तमाशा बगाया नाय आलो. सरकार हायती त्यास्नी हरणीला भेटायचं हाय.” तो पुन्हा दारावर थाप मारत म्हणाला आणि त्या बाईने एक दार उघडलं ती घाबरलेली दिलेत होती.


“ सरकार काल झालं त्यासाठनं माफी करा जी. बारकी पोर हाय तिला न्हाय कळत काय जी.” हरणी बरोबर असलेली कालचीच बाई  डोक्यावरचा पदर सावरत घाबरून अजिजीने बोलत होती.



राघवेंद्र,“ हे बघा बाई तुमी समजता तसं काय बी नाय. मी हतं येगळ्या कारणासाठी आलो हाय. मला त्या पोरीला एकदाव भेटायचं हाय.” तो पुढे होत म्हणाला.


“ पर कशाला जी?” ती घाबरूनच बोलत होती.


मदन,“ तुमाला कशाला चौकशा? त्या पोरीला बोलवा का अमी इव आत? सरकार हायती हे त्यास्नी सवाल करायचा नाय.” तो दरडावत म्हणाला. तशी मागून हरणी पुढं आली आणि तिने दोन्ही दारं उघडली.


हरणी,“ सरकार असलं म्हणूनशान काय बी करणार व्हय?” ती रागानेच म्हणाली.


   राघवेंद्र मात्र कंदिलाच्या पिवळसर उजेडात तिला न्याहाळत होता. गोल चेहरा,कपाळावर कुरळ्या केसांची महिरप, गोरा रंग, चाफेकळी नाक, लाल चुटूक ओठ आणि सडपातळ बांध्याची  अंगावर पोपटी रंगांची सावारी साडी असलेली साधारण सोळा-सतरा वर्षांची सुंदर तरुणी उभी होती. ती बोलत होती आणि तोच ओळखीचा सुगंध दरळवत होता. ज्याने राघवेंद्रला वेड लावलं होतं.तो तिला पाहण्यात आणि तोच सुगंध श्वासात भरून घेण्यात दंग होता.


बाई,“ गप की हरणे तुला कळतंया का नाय? कुना समुर काय बोलायचं?” ती तिला दटावत होती.


मदन,“ ओ बाई ही पोरगी लै बोलतीया.” तो रागाने म्हणाला.


हरणी,“ मंग कशाला आलाया तुमी हितं बोलणं ऐकाया?” ती मानेला झटका देऊन तोऱ्यात म्हणाली.


राघवेंद्र,“ तसंच काम हाय म्हणून आलो.”


हरणी,“ काय काम हाय तुमचं? मला पसंत पडल्यालं पातळ तर तुमी घेतलं नव्हं.” ती पुन्हा रागानेच म्हणाली आणि त्या बाईने तिला चिमटा काढला.


बाई,“ गप की बाय माझे. सरकार काय काम हुतं?” तिने घाबरत विचारलं.


राघवेंद्र,“ ही पोरगी कुठलं अत्तर लावतीया? काल बी नुसता घमघमाट सुटला हुता. आता बी येतूय वास. उच्ची अत्तर असणार हाय. कुटून आणलं हाय मला सांगा? मला पायजेल हाय ते अत्तर.” त्याने विचारलं आणि हरणी मोठ्याने हसायला लागली. त्या बाईने पुन्हा तिला चिमटा काढला.


हरणी,“ मौशे किती जोरात चिमटा काडती गं! आन सरकार तुमी हे ईचाराया इतक्या लांब आला? म्या तर ऐकलं होतं तुमी गोऱ्यांच्या देशात शिकून आला हाय. लय हुशार हाय तुमी.” ती त्याला न्याहळत बोलत होती. उंचा पुरा गोरागोमटा रुबाबदार राघवेंद्र तिचा डोळ्यात मावत नव्हता.


मदन,“ मंग त्याचा हाय संमंद हितं? सरकारास्नी अत्तर आवडलं म्हणून आले ईचाराया!” तो म्हणाला.


हरिणी,“पर म्या कुटलं बी अत्तर लावत नाय जी. आमी गरीब माणसं पोटासाटी माझी आय तमाशात नाचती. बा पैकं गोळा करतु. तुमच्यावाणी आमचं कुटलं आलं जी शोक?” ती बोलत होती.


मदन,“ मग वास कसा काय इतूया? अजून बी इतुया की राघव ही खोटं बोलतीया बघ.” तो रागाने म्हणाला.


बाई,“ न्हाय जी हरणी खरं बुलतीया. ती न्हाय लावत जी अत्तर बित्तर तिच्या अंगाला वास हाय त्यो जलमा पासूनच. तिच्या आजीच्या म्हंजी आईच्या आईच्या बी अंगाला असाच वास हुता. म्हणून तर हीच नाव हरणी ठिवलया. हरणाच्या बी अंगाला असाच वास अस्तुया नव्हं अंगचाच.” तिने दुजोरा दिला.


राघवेंद्र,“ व्हय काय. बरं मद्या चल.” तो त्याच्याच विचारात निघून गेला.


हरिणी,“  काय नाव हाय गं सरकारचं? थोडं खुळच वाटत्याती?” असं म्हणून ती हसायला लागली.आणि त्या बाईने दार लावून घेतलं.


बाई,“ हसाया काय झालं गं? आन खुळं कसं असत्याल ते! अगं परदेशात शुकून आलं हायती ते. आन बाई सरकार हायती ते. त्यांचा आजा सगळ्यात ज्यादा पैकं देतूया तुझ्या आयला फकस्त गाणं म्हणायचं. मोठी माणसं ती.” ती तिला समजावत होती.


हरणी,“ व्हय बाई हौसा मौशे. पर आयला यातलं काय बी सांगू नगंस. नाय तर ती मला जत्रंत फिराया नाय सोडायची.” ती तिला लाडिगोडी लावत म्हणाली.


हौसा,“ नाय सांगत गं. बरं निज आता.” ती म्हणाली. आणि दोघी अंथरुणावर आडव्या झाल्या. हरणीच्या मनात मात्र राघवेंद्रचे विचार घोळत होते.



‛काय म्हणाला त्यांचा मैतर राघव?व्हय राघव सरकार. लयच देकनं आन रुबाबदार हायतं की सरकार. आन नाक बी लय कारी हाय की माझ्या अंगाचा वास हुडकत हितंवर आलं. अत्तर कोणतं लावतीया ईचाराया.’ या विचाराने ती पुन्हा मोठ्याने हसली.


हौसा,“ झोपती का आता?” ती ओरडली आणि हरिणी तोंडाला पदर लावून हळूच हसू लागली.



   राघवेंद्र त्याला आवडलेल्या सुगंधाचा माग काढत तर गेला होता पण त्याचा भ्रमनिरास झाला होता. ही सुगंधाची कथा इथेच संपणार होती की या कथेत एक नवीन वळण घेऊन येणार होती? 

पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः


©स्वामिनी चौगुले












Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post