माडीवरची बाई भाग ४

 




राधक्का भाकर तुकडा घेऊन बैलगाडी जवळ गेली तर त्यातून तिचा भाऊ जयसिंगराव मोहिते, वहिनी सावित्री आणि त्यांची सून विमल उतरले. राधक्काला तिची भाची मात्र दिसली नाही. तिने जयसिंगला विचारलं.


राधक्का,“ दादा मालू कुटं दिसत नाय? ती नाय आली व्हय?” तिने विचारलं.


जयसिंगराव,“अगं आक्के ती बी येणारच हुती पर तिची कसली तरी परीक्षा हाय मग नाय आली.आता रमीच्या लग्नाला येईल ती.” ते म्हणाले.


  राधक्काचा मात्र हिरमोड झाला होता. ती विचार करत तिथेच उभी राहिली. ते सुभानरावांच्या लक्षात आले आणि ते म्हणाले.


सुभानराव,“ राधक्का आता समद्या चौकशा हतंच कर्त्यास व्हय. पावण्यास्नी घरात तर येऊ दे. जयसिंगा घरात चला समदी.” ते म्हणाले आणि राधक्का भानावर आली.


राधक्का,“ व्हय व्हय घरात चला समदी.” ती उसनं हसून म्हणाली.


सगळे दिवाणखान्यात बसले होते. रमाने सगळ्यांना गुळ-पाणी दिलं आणि वाकून नमस्कार केला. तोपर्यंत बाहेर गेलेला राघवेंद्र घरी आला. जयसिंगराव आणि सावित्री त्याला न्याहाळत होते. त्याला पाहून दोघेही मनोमन खुश झाले होते. राघवेंद्रने त्यांना पाहिले आणि वाकून नमस्कार केला.


जयसिंगराव,“  औक्षवंत व्हा. मला वाटलं राघव परदेशी शुकून आला तवा आता रितिरिवाजा पाळतो का नाय.” ते हसून म्हणाले.


राघवेंद्र,“ असं कसं मामा परदेशी शिकून आलं म्हणून काय आपले रितिरिवाज विसरत्यात व्हय. आणि शंभू दादा नाय आला व्हय?” त्याने विचारलं.


सावित्री,“ नाही ना मालूची कसली परीक्सा हाय म्हणून मग भाऊ भन राहिलं.” 


राघवेंद्र,“ हुंम ती शेवटच्या वर्षाला असलं आता; व्हय ना?” त्याने विचारलं.


जयसिंगराव,“ व्हय या वर्षी बी.ए. हुतीया बघ.” ते अभिमानाने म्हणाले.


राघवेंद्र,“ अच्छा. चांगलं हाय पोरींनी शिकायलाच पाहिजे. मी आईला तेच म्हणत हुतो रमेला शिकव पण ती कुठं ऐकतेय. ठरवून टाकलं लग्न.” 


जयसिंगराव,“ मी बी तेच सांगत हुतो अक्काला पण तुझी आई कोणाचं ऐकत नाय राघवा.”


राधक्का,“  आता बोलतच बसलाय व्हय. चला जेवणं उरका मंग निवांत बोलत बसा. वैनी, इमला चल बाई आत.” ती म्हणाली आणि दोघींना आत घेऊन गेली. 


  राघव आणि जयसिंगराव बाहेर बसले. दोघांना रमाने दिवाणखान्यात  जेवायला वाढलं. स्वयंपाक घरात राधक्का सावित्री आणि विमलला जेवायला वाढत होती.


राधक्का,“ काय वं वैनी  म्या म्हणलं की तुमी मालूला घिऊन आला तर पोरं बगत्याल एकामेकास्नी एकदा दोघं एकमेकास्नी पास झाली मजी  पुडची बोलाचाल करता यील. अगुदरवानी आता  कूट राहिलं हाय. आय-बाप म्हणत्याल त्याच्या गळ्यात माळ घालायची पोरं पुरी न बगता. पर आता दोगं बी शिकली हायती तवा मालूला राघवनं आणि राघवनं मालूला बगतलं असतं.” ती नाराज होऊन बोलत होती.


सावित्री,“ दिवनसाब आवं त्याची काय बी गरज नाय आमच्या मालूला राघवराव पसंत हायती म्हणलं. त्यांचा फुटी आणि मुलाकात का काय ते पेपरात छापून अलतं नव्हं तवाच तिला तिच्या बानी इचारलं तर लाजून मान हलवली पोरीनं. इतकं चांगलं घरदार आणि असला देकना राजबिंडा नवरा आणि त्यातून बी परदेशातून शिकून आलेला कोणाला नगु वाटतंय? आता तर राघवराव अक्षी राजकुमारागत दिसत्यात. राजकुमारागत काय राजकुमारच हायती ते. आमच्याकडून व्हय हाय. नशीबच काडलं माझ्या पोरीनं. राघवराव काय म्हणत्यात तेच बगा. तसं माजी मालू बी देकनी हाय आणि गुणवान हाय. आणि शिकली बी हाय जोडा अक्षी लक्ष्मी-नारायणागत सोबल बगा.” ती जेवण करत  खुश होत बोलत होती.


राधक्का,“ व्हय आमच्या बी समद्यांच्या मनात हाय बगा. फकस्त राघवला ईचारलं नाय अजून, पर त्यो काय आमच्या शबुदा भाईर नाय. आत्ताच आलाय नव्हं लगीच लगीन कर कसं म्हणायचं म्हणून थांबलू हाय.” ती म्हणाली.


सावित्री,“ व्हय अमास्नी बी काय घाई नाय जी. अजून मालूच एक वरीस निगायचं हाय शिकायचं. आणि रमाताईसाबच्या लग्नात बघत्यात की एकमेकांना दोघं मग बगू. तवर त्यांना बी जरा मोकळीक पायजेल की मालू सांगत हुती ते बारिस्टर व्हायला लय अभ्यास करावा लागतुया म्हणं आणि राघवरावांनी तर नंबर काढलाया म्हणं पेपरात छापून आलतं नव्हं. त्यांना बी शिनवटा घालवू द्या की जरा.” ती कौतुकाने बोलत होती.


राधक्का,“ वैनी तुमचं बराबर हाय पर मला तर कदी मालू सून होऊन घरात इती असं झालं हाय बगा. आता दोन मासात रमी जाईल सासरी मग मी एकलीच की.”ती डोळ्याला पदर लावत म्हणाली.


सावित्री,“ व्हय पर असल्या गुष्टींना दम धराव लागतया दिवनसाब. राघवरावांच्या कलानं घ्याय पायजी का नको?” ती म्हणाली.


राधक्का,“ व्हय ते बी हायच म्हणा.” ती म्हणाली.

★★★★


      दुसऱ्या दिवशी राघवेंद्र त्याचा बालमित्र मदन बरोबर जत्रा फिरायला गेला. मदन त्याच्याच गावाच्या रंगराव  शेटे या वाण्याचा मुलगा होता. शेटेंचे किराणा मालाचे एकमेव दुकान गावात होते. त्यामुळे मदन ही चांगल्या सधन घरातील होता. पहिलं गावात चौथीपर्यंत आणि नंतर दोघेही  तालुक्याच्या गावाला एकत्र एकाच खोलीत राहून मॅट्रिकपर्यंत शिकले होते. पुढे राघवेंद्र मुंबईला आणि नंतर इंग्लंडला शिकायला गेला. मदनने मात्र मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन  पिढीजात दुकान सांभाळले होते. दोघांची ही मैत्री सर्वश्रुत होती. आज मदन सकाळीच राघवेंद्रकडे आला होता आणि त्याला जत्रा फिरायला घेऊन गेला होता.


राघवेंद्र,“ मद्या अपुन बारकं हाय व्हय रं जत्रेत फिरायला?” तो म्हणाला.


मदन,“ राघव बारक्यांनीच जत्रा फिरायची असं कुठं लिव्हलय व्हय? की आता तू परदेशात राहून आलास म्हणूनशान तुला जत्रंचं अप्रुब राहीलं न्हाय?” तो त्याला रोखून पाहत म्हणाला


राघवेंद्र,“ असं काय बी नाय रं. बरं चल चार वर्षांत काय नवीन आलंय ते तरी बघू.” तो हसून म्हणाला.


मदन,“ बरं रातच्याला तमाशा बघाया येणार का? आपलं  टोळकं जाणार हाय.”.त्याने विचारलं.


राघवेंद्र,“ नको बाबा तात्यास्नी नाय चालायचं ते.”


मदन,“ काय सांगतो लेका? तुमी जहागिरदार आणि  तमाशाला नाय येणार? तुझा आजा म्हातारा झाला तरी येतू की आन सगळ्यात जास्त दैलतज्यादा त्योच करतो नव्हं. आन तू म्हणतुया तात्याला नाय चालायचं.” 


राघवेंद्र,“ अण्णाची गोष्ट येगळी हाय. पर मी आलो तर तात्या रागावत्याल त्यास्नी नाय आवडत रं. आरं चांगलं मोठं पाळणं यायला लागलं की आणि इतकी दुकानं? चांगली मोठी जत्रा भराया लागली की आपल्या गावात बी.” तो भरलेली यात्रा पाहत बोलत होता.


मदन,“ मंग आपलं गावबी आता बाराकं  नाय राहिलं. चल भजी खाऊ.” तो म्हणाला आणि राघवेंद्रला घेऊन  तात्पुरत्या थाटलेल्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेला.दोघांनी भजी घेतली. 


   आणि पुन्हा फेरफटका मारायला लागले. राघवेंद्रला पाहून सगळे राम राम करत होते. कोणी थांबून बोलत होते. जत्रेत फिरणाऱ्या पोरींचे मात्र सगळे लक्ष राघवेंद्रकडेच होते. त्या त्याला चोरून पाहून एकमेकींच्या कानात काही तरी बोलत होत्या आणि मधूनच तोंडाला पदर लावून हसत होत्या. 


मदन,“ काय राघव सरकार आज समद्या पोरी तुझ्याकचं बगत्यात बग.” तो हसून त्याला चिडवत म्हणाला.


राघवेंद्र,“ तुझं काय तर बग. आरं कपड्याचं दुकान, सावारी पातळं दिसत्यात बग. चल बगू पसंत पडत्यात का?” तो दुकानात जात म्हणाला.


मदन,“ सावारी पातळं? अवंदा रमा ताईसाहेबांनंतर तुझा बार उडवणार का काय राधक्का?” त्याने विचारलं.


राघवेंद्र,“ ये बाबा आत्ता तर शिकून आलो हाय जरा दम तर घेऊ दे. मी काय इतक्यात लगीन करत नसतु. पातळ रमासाठी घ्यायचं हाय.” दोघे दुकानात गेले आणि त्याला पाहून मालक स्वतःच पुढं आला.


दुकान मालक,“ या सरकार काय दावू तुमास्नी?” त्याने हात जोडत विचारलं. एक कामगार दोन मुलींना सावारी साड्या दाखवत होता. 


राघवेंद्र,“ सावारी पातळं दाखवा. ते दाखवा.”तो म्हणाला आणि समोर लावलेल्या गुलाबी रंगाच्या साडीकडे त्याने आणि तिथे उभ्या असलेल्या मुलीने एकदाच बोट केलं. “ते दावा.” राघवेंद्र नकळत तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला आणि कसल्याशा सुगंधाने त्याचे लक्ष वेधून घेतले.


मुलगी,“ म्या आदी दावा म्हणाले नव्हं ते पातळ.” सोळा सतरा वर्षाची ती तोऱ्यात म्हणाली.


राघवेंद्र,“ पर मी बघितलं आधी ते.” तो म्हणाला. दुकान मालकाने ती गुलाबी रंगाची साडी राघवेंद्रच्या हातात दिली.


दुकान मालक,“ पोरी तू दुसरं पातळ बघ बया. हे सरकारास्नी पसंत पडलं हाय.” तो तिला समजावत म्हणाला.


मुलगी,“ सरकार असलं म्हणून काय झालं? म्या बी पैकं दिऊन घेणार हाय नव्हं पातळ? मला नगं दुसरं मला तेच पाजेल हाय.” ती रागाने म्हणाली. तिच्याबरोबर असलेली पोक्त बाई मात्र तिच्या अशा बोलण्याने  गडबडली.


बाई,“ ये बाई ते जहागिरदार सरकार हायती. चल तू. माफी कराजी सरकार.” 



  ती कमरेतून वाकून हात जोडून म्हणाली आणि मुलीचा हात धरून नेऊ लागली. ती मुलगी चालायला लागली आणि तिच्या शरीराचा झोक राघवेंद्र जवळून गेला आणि पुन्हा त्याचे लक्ष त्याच सुगंधाने वेधून घेतले. इतका वेळ तर तो सुगंध दरवळतच होता पण ती मुलगी जशी त्याच्याजवळून गेली आणि तिच्या शरीराचा वारा त्याला लागला तसा तो सुगंध तीव्र झाला आणि नंतर ती मुलगी जशी लांब लांब गेली तसा सुवास मंद होत जाऊन नाहीसा झाला. त्या सुवासाने राघवेंद्रला मात्र वेड लावलं होतं. साडी पाहण्याच्या नादात त्याने त्या मुलीला नीट पाहिलं देखील नव्हतं.


दुकान मालक,“ सरकार पातळ घेणार नव्हं?” त्याने विचारलं आणि राघवेंद्र भानावर आला.


राघवेंद्र,“ व्हय. किती पैसे झाले?” त्याने विचारलं.


दुकान मालक,“ जी दहा रुपये.”


मदन,“ इतके? लूट लावली काय रं?” त्याने दरडावत विचारलं.


दुकान मालक,“ सरकारांकडून ज्यादा पैकं घिऊन मला धंदा करायचा नाय व्हय. पोत बघा की पातळाचा अक्षी पाण्यावाणी झुळुझुळू हाय जी. मलाच दहा रुपयाला पडलं. तितक्यालाच दितुया.” तो अजिजीने बोलत होता.


राघवेंद्र,“ हे दहा रुपये. मद्या तुला काय बी कळत नाय कापडातलं तू गप बस. द्या ते पातळ. ती मुलगी कोण होती?” त्याने न राहवून चौकशी केली.


दुकान मालक,“ जाऊ द्या जी सरकार तरुण पोरगी हाय. अल्लड वय हाय जी.” तो त्याला समजावत म्हणाला.


मदन,“ सरकार काय ईचारत्यात तेवडं सांग.” तो दम देत म्हणाला.


दुकान मालक,“ गावातली तर न्हाय जी. कुणाच्या घरी आली असलं पावणी.” तो म्हणाला.


राघवेंद्र,“ बरं चल मदन.” तो साडी घेऊन म्हणाला आणि दोघे बाहेर पडले.


मदन,“ तुला राग आला का काय तिचा? सोड ना बाबा बारकी दिसत होती वयानं.” तो त्याला समजावत म्हणाला.


राघवेंद्र,“ तसं नाय मद्या तिनं लावलेलं अत्तर उच्ची होतं बघ. नुसता घमघमाट सुटला होता. तिनं कुठलं अत्तर लावलं हाय? आणि कुटून घेतलं हाय? ते इचारायचं हाय मला. तू बघितलं का तिला? कोण हाय? कुठली हाय? जरा चौकशी कर की. मला ते अत्तर पायजेल हाय.” तो म्हणाला.


मदन,“ बगितलं  हाय म्या तिला, कुरळ्या केसाची अक्षी अप्सरे गत देखणी हुती बघ ती. पण लय तोरा बाबा. नाकाचा शेंडा लाल भडक झालता नुसता. तुमी तिला आवडलेलं पातळ घेतलं ना सरकार! म्या बगतो कुणाच्यात आली हाय ती पर मला नाय वाटत ती तुला अत्तर कुटून घेतलं ते सांगल.” तो भुवया उडवत म्हणाला.


राघवेंद्र,“ तू कोण हाय  ती त्याची समदी बातमीकाडून उद्या वाड्यावर ये. बाकी मी बघून घेतु.” तो म्हणाला.


मदन,“ जी सरकार.” तो मान झुकवत म्हणाला.


राघवेंद्र,“ चल. लय नगं नाटकं करू आता.” तो हसून म्हणाला.



   राघवेंद्रचे लक्ष ज्या सुगंधाने वेधून घेतले होते तो सुगंधी अत्तर लावणारी मुलगी त्याला सापडेल का? आणि राधक्का आणि महेंद्रप्रताप राघवेंद्रला राधक्काच्या भाचीशी लग्न करण्यासाठी तयार करू शकतील का?

क्रमशः

©स्वामिनी चौगुले.


अशाच लक्षवेधक कथा वाचण्यासाठी फॉलो आणि लाईक करा आपल्या शब्द मंथन पेजला.










    

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post