माडीवरची बाई भाग ३




    राघवेंद्र अंघोळ वगैरे करून आला. तोपर्यंत राधक्काने झणझणीत पिठलं भाकरी केलं होतं. तो नाश्ता करायला येऊन बसला. रमा त्याला वाढत होती. राधक्का भाकरी थापत होत्या.


राधक्का,“ लय दिस जाझात बसून कट्टाळला आसशील नव्हं राघव. आणि थकला बी असशील पोरा.खा आणि माझ्या खोलीत जाऊन वाईस झोप जा. तुझी माडीवरची खोली झाडाया सांगितली हाय म्या.”


राघवेंद्र,“ व्हय आई कंटाळा तर लय आलाय आणि थकवा बी. मी जाऊन झोपतोच आता. बाकी तुझ्या हातचं पिठलं भाकरी खाऊन तोंडाला चव आली बघ. नाय तर त्या जहाजावर नुसतं भात-माशे आणि पावाचे तुकडे मिळमिळीत सगळं. ” तो खात बोलत होता.


राधक्का,“ हुंम. आपल्या घरच्या वानी जेवण भाईर कुटलं रं. बग कसं वाळलं हाय पोर माझं. अगं रमे बगत काय बसली गं वाड की त्याला भाकर.” त्या म्हणाल्या.


राघवेंद्र,“ बास आई पोट भरलं माझं. मी झोपतो जरा आता.” तो हात धुवून पाटावरून उठत म्हणाला.


रमा,“ दाद्या गोऱ्यांच्या  देशातून आलास आणि अमास्नी काय बी आणलं नाय व्हय?” तिनं तोंड फुगवून विचारलं.


राधक्का,“ या बया कुणाचं काय तर कुणाचं काय? इथं पोरगं दमून भागून आलंया इतका लांबचा परवास करून आणि तुझं काय गं रमे! म्हनं काय आणलं नाय का?” ती रागाने म्हणाली.


राघवेंद्र,“ आई कशाला चिडतीस गं तिच्यावर. रमे मी किती सामान आणलं हाय बघितलंस ना. सगळ्यांसाठी आणि तुझ्यासाठी बी आणलं हाय मी काय काय! पण मी आराम करतो मग संध्याकाळी दाखवतो तुला.” तो तिचा गालगुच्चा घेत हसून म्हणाला. 


रमा,“ खरंच? मग जा लगीच झोप आणि उट. म्या वाट बगते.” ती खुश होत उड्या मारत म्हणाली.


राधक्का,“ अगं हळू की लुगड्यात अडकून पडशील की रमे. लगीन हाय तुझं तीन मासात आणि हिचं लहानपण अजून सपना.” ती हसून म्हणाली.


राघवेंद्र,“ लहानच हाय की अजून आपली रमा.” 


राधक्का,“ अण्णा कमी हुतं बाय बाय म्हणून हिचा लाड कराया. बाची तर लाडकी हायच ती, आता तू आलास अजून म्हंजी काय खरं नाय. बरं जा निज तू. तुझं तात्या मटण अनाया गेलं हायती दुपारी जेवाया उटवते तुला. चांगलं झणझणीत कालवण करते तुला आवडतं तसं.” ती म्हणाली आणि राघवेंद्र हो म्हणून निघून गेला.


   दुपारी शिरपती आणि रंग्या जेवायला आले. दोघांनी आत्तापर्यंत सगळ्या गावात दवंडी पिटवली होती की राघवेंद्र परत आला आहे आणि त्या दोघांनीच त्याला घरी सोडलं. आज वाड्यावरून निमंत्र आहे त्यांना आणि बक्षिस देखील मिळणार आहे. गावात घराघरात  आता राघवेंद्र विषयी चर्चेला उधाण आले होते. इतक्या लांब गोऱ्यांच्या देशातून शिकून आला. आधीच राजबिंडा तो आता कसा दिसत असेल? याबद्दल सगळ्या गावाला उत्सुकता लागली होती. चावडीवर सरपंच आणि पंचांनी गावातीला परदेशातून इतकं जास्त शिकून आलेला पहिला तरुण म्हणून त्याचा सत्कार करायचा ठरवला होता. उद्या सगळे पंच मंडळी वाड्यावर त्याबद्दल त्याला निमंत्रण द्यायला आणि भेटायला जाणार होते.


  राधक्काने राघवेंद्र बरोबर शिरपती आणि रंग्याला पोटभर जेवायला घातले. राधक्का म्हणजे सुग्रन बाई तिच्या हातचे चविष्ट मटण खाऊन दोघेही तृप्त झाले. महेंद्रप्रतापनी दोघांच्या हातात पन्नास पन्नास रुपयांच्या नोटा काढून दिल्या.


शिरपती,“ इतकं पैकं कशाला मोठं मालक? आव ह्यो दोन मासाचा पगार आमचा. म्या तर असंच म्हणलं की अण्णा तुमी बक्षिसी द्याल म्हणूनशान. तुमी धाकल्या मालकां बरुबर पॉटभर जेवाया घातलं हेच लय हाय आमच्यासाठी हे पैकं नगं.” तो हात जोडून डोळ्यात पाणी आणून बोलत होता.


महेंद्रप्रताप,“आरं राहू दे. पोराबाळास्नी चांगलं चुंगलं खायला घाला जा.” ते म्हणाले.


रंग्या,“ तरी बी हे  लय ज्यादा हाय जी. आमची पोटं तुमच्यात राबून भरत्यात मालक हे इतकं नगं पैकं.” त्याने शिरपतीच्या बोलण्याला दुजोरा दिला.


सुभानराव,“ आता घेतासा पैकं का घालू मूडद्यानू  तुमच्या पेकाटात काटी!” ते काठी उगारून म्हणाले आणि शिरपती आणि रंग्या नको नको म्हणून निघून गेले. 

★★★★


     संध्याकाळी राघवेंद्रने साफसफाई करून माडीवर त्याच्या रूममध्ये ठेवलेल्या बॅगा नोकरांना खाली आणायला लावल्या. त्याने राधक्का, महेंद्रप्रताप, सुभानराव आणि रमाला दिवाणखान्यात बोलवून घेतले. नोकरांनी सगळे सामान दिवाणखान्यात राघवेंद्रच्या जवळ आणून ठेवले. रमा मात्र त्याने काय आणले आहे म्हणून उत्सुक होती.


रमा,“ दाव की दाद्या लवकर काय आणलं हाय ते.” ती उत्साहाने म्हणाली.


राधक्का,“ दम की जरा दावतूय  नव्हं त्यो. उतावीळ मेली. कसं व्हायचं हीच लगीन झाल्यावर त्या पांडुरंगालाच माहिती.” ती म्हणाली राघवेंद्रने तोपर्यंत दोन ट्रंक उघडल्या आणि त्यातून वस्तू बाहेर काढून समोर असलेल्या  टेबलवर ठेवल्या. 


राघवेंद्र,“ आई सारखं तिला रागवू नको बरं, लग्न होऊन गेल्यावर ती यायची नाही माहेरी आणि रमा बाईसाहेब हा गरम कोट, हे अत्तर आणि या डब्यात चॉकलेट्स हायती ते आणि ही हॅट बी तुमच्यासाठीच  बरं का! तो तिच्या डोक्यावर फुलांची सुंदर हॅट ठेवत म्हणाला.


रमा,“ एवढं समदं माझ्यासाठी?” ती डोळे विस्फारून म्हणाली.


राघवेंद्र,“ मग कुणासाठी हाय?” त्याने विचारलं.


रमा,“ दाद्या तू लय भारी हाय बग.” ती त्याला मिठी मारून सगळं सामान घेऊन पळाली.


राधक्का,“ अगं कुटं चालली?” 


रमा,“ गावात माझ्या समद्या  मैतरणीला  दावून येते माझा दाद्या  काय काय घुवून आला माझ्यासाठी गोऱ्यांच्या देशातून ते.” ती म्हणाली.


महेंद्रप्रताप,“ अगं व्हय पर दमानं जा आणि कडूसं पडायच्या आदी ये गं. नान्या रमा बाय गावात गेली हाय तिच्या मागं जा फकस्त. तिला बोलू नगस काय बाबा नाय तर फुगून बसल तुला धाडलं तिच्या मागं म्हणूनशान.” ते नानाला हाक मारून म्हणाले आणि तो घरगडी नुसती होकार्थी मान हलवून रमाच्या मागे निघून गेला.


राघवेंद्र,“ आई हा स्वेटर तुझ्यासाठी. तिकडं गरम कपडे लय चांगले मिळत्यात. आणि तात्या आणि अण्णा  ह्या  शाल तुमच्या दोघांसाठी. आई हे चॉकलेटचे डबे आपल्या नोकरांना वाट.” तो स्वेटर राधक्काच्या आणि शाल दोघांच्या  हातात देत बाकी  सगळं टेबलवर  काढून ठेवत म्हणाला. आणि हळूच अण्णांना डोळ्यांनी इशारा केला आणि अण्णांनी डोळ्यांनीच काय म्हणून विचारलं  ते महेंद्रप्रतापरावांनी पाहिलं.


महेंद्रप्रताप,“ काय खाणा खुणा सुरू हायत्या आज्या नाता मधी? आज्यासाठी नातानं काय तर खास आणलया वाटतं तिकडून!” त्यांनी भुवया उंचावून विचारलं.


सुभानराव,“ तुला काय करायचं महिंद्रा? म्या आणि माझा नातू बघून घेतु.” ते खेकसत म्हणाले.


राधक्का,“ चालू द्या तुमचं म्या जाती.” ती हसून म्हणाली आणि निघून गेली.


राघवेंद्र,“ ते तात्या तिकडून अण्णासाठी इंग्लिश दारू आणली हाय. अण्णा घेत्यात नव्हं म्हणून.” तो चाचरत  आणि दारूच्या चार बाटल्या टेबलवर ठेवत म्हणाला.


महेंद्रप्रताप,“ अण्णासाठी का तुझ्यासाठी बी रं? तू बी घितूस काय दारू?” त्यांनी दरडावून विचारलं तसं राघवेंद्र घाबरला.


राघवेंद्र,“ तात्या ते लय नाय पर तिकडं लय थंडी असती म्हणून आदनं मदनं घ्यावी लागती.” तो खाली मान घालून बोलत होता आणि महेंद्रप्रताप मोठ्याने हसायला लागले.


महेंद्रप्रताप,“ आरं मला म्हैत हाय ते. म्या आपलं पोरगं भायरुन शिकून आलं हाय तर त्याला बापाच भ्या अजून हाय का ते बघत हुतु. हाय हाय अण्णा पोरगं अजून सुदीक मापात हाय.” ते हसून म्हणाले आणि अण्णाची एक काठी पाठीत बसली.


सुभानराव,“ माझ्या नातवाला भ्या दावतोस व्हय रं! तुझा बा अजून हाय इथं. तुला भ्या दावायला.” ते म्हणाले आणि राघवेंद्र हसायला लागला.


महेंद्रप्रताप,“ अण्णा लागली की काटी. आता काय माझ्या पोरा समुर बी मारता व्हय मला.” ते पाठ चोळत म्हणाले.


सुभानराव,“ मंग भितु का काय कुणाला.” ते मिशी पिळत म्हणाले.

★★★


 राघवेंद्र परदेशातून परत आला आहे ही बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली.  पंधरा दिवस तर नुसता त्याला भेटायला येणाऱ्या माणसांचा राबता वाड्यावर होता. त्यातच त्याचा सत्कार देखील गावात झाला. त्यामुळे त्याला कशाचीच उसंत मिळाली नाही. आता जरा तो निवांत झाला होता. गावची जत्रा तोंडावर होती आणि महेंद्रप्रतापरावांकडे सरपंच देणगी मागायला आले होते. दरवर्षी गावदेवीच्या यात्रेसाठी महेंद्रप्रताप मोठी देणगी देत असत. यावर्षी देखील त्यांनी तशीच घसघशीत देणगी दिली. 


  असेच अजून काही दिवस निघून गेले. दुपारची वेळ होती सगळे जेवण करत होते. रमा पण अण्णांच्या ताटात बसून जेवत होती.


राधक्का,“ रमे आता गड्यांच्या मांडीला मांडी लावून जेवायचं बंद कर बाई! सासरी चालत नाय बाय.”


सुभानराव,“ राधक्का बाय इथं हाय तवर आणि म्या जिता हाय तवर बी माझ्याच ताटात जेवणार. तू जेव बाय.” ते म्हणाले.


राघवेंद्र,“ आई अगं नको इतकी काळजी करू तिची आणि इतकं प्रत्येक गोष्टीला नको टोकू तिला. मी भेटलो हाय चंद्रशेखररावांना चांगल्या आणि सुधारीत विचारांचे हायती ते. तू नको काळजी करू.” तो बोलत होता.


महेंद्रप्रताप,“ ते तिकडं शिकाया हुतं हे माहीत हाय अमास्नी पर तू कवा भेटला त्यास्नी?” त्यांनी आश्चर्याने विचारलं.


राघवेंद्र,“ तात्या ते तिथंच होते गेल्या वर्षी भेटलो मी त्यांना. म्हणजे बघा तिथं बी आपल्या हितली शिकायला गेलेली जहागीरदार आणि जमीदारांची पोरं-पोरी सहा महिन्यातून मिटिंग … मिटिंग म्हणजे भेटत्यात कोणाला काय समस्या हाय का किंवा अजून काय अडचण हाय का? ते बघत्यात.  तेंव्हा चांगली ओळख झाली होती त्यांची ते येणार होतं इकडं तेंव्हा सांगत होते की असं बी त्यास्नी चार भाऊ हायेत. जहागिरी सांभाळायला. आणि त्यांना बी शेतीत रस नाय तर ते मुंबईत बंगला घेणार होते आणि तिथं जागा घेऊन फॅक्टरी काढणार हाय असं म्हणत हुते. इंजिनिअर झाल्याती ते.  तवा रमाला काय ते गावाकडं ठेवणार न्हाईती. रमा मुंबईत राहणार. उलट रमेला आता शुद्ध बोलायला आणि मुंबईकडचे रितिरिवाज शिकवायला पायजेल. आणि रमे नऊवारी लुगडं नाय घालायचं आता सावारी गोल पातळ घ्यालचे. जत्रा झाली की अपुन तुला सावारी पातळं  घेऊन येऊ. मी तर म्हणत हुतो मामानी त्यांच्या पोरीला कॉलेजमध्ये शिकवली तसं आपल्या रमीला बी शिकू द्यावं. तिचं तसं अजून लग्नाचं वय नाय. पण आई कोणाचं ऐकत नाय. पण घर आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलगा आपल्या रमीला चांगला मिळाला बघ. तुला सगळं शिकवतो रमे मी. लग्न झालं ही चार महिन्यात मुंबईला घेऊन जाणार ते तुला. मग काय! करा राजा-राणीचा संसार.” तो हसून म्हणाला आणि रमा लाजून पळून गेली.


राधक्का,“ राघवा तू हे बुलून माझी काळजीच मिटवली बग.नाय तर आपली पोर लाडाकोडात वाडली हाय. त्यांचा एवढा मोठा खटाला कशी रायची काय करायची माझी रमी म्हणून लय काळजी हुती मला.” ती डोळ्याला पदर लावत म्हणाली.


सुभानराव,“ राघव पायजेल तिवडं पैकं घिऊन जा आणि आपल्या रमीला अक्षी पाण्यावानी झुळूझुळू पातळं घिऊन ये.” ते खुश होत म्हणाले.


राधक्का,“ बरं राघव तुझा मामा, मामी आणि बाकी समदी बी येणार हायती औदा जत्रंला. तू आल्यावर भेटाया बी आलं नायती ते; तवा समदंच हुईल.” त्या महेंद्रप्रतापरावांकडे पाहत सुचकपणे म्हणाल्या.


राघवेंद्र,“ मग येऊ देत की. तात्या मला तुमच्याशी बोलायचं हुतं. मी विचार करत हुतो की आपल्याला सतत फिरावं लागतंय. घोडा नाय तर बैलगाडीने फिरायचं म्हंजी वेळ पण लय जातोया तर एक जीप घ्यावी. घ्यायची का जीप आपण?” त्याने विचारलं.


महेंद्रप्रताप,“ घिवू पर चालवणार कोण रं?” त्यांनी विचारलं.


राघवेंद्र,“ मी अजून कोण! मी शिकलो हाय चालवायला जीप.”


महेंद्रप्रताप,“ मग हे ब्यास झालं. किती पैकं लागत्याल? आणि आणायची कुटनं?” त्यांनी विचारलं.


राघवेंद्र,“ पैसे माझ्याकडं आहेत तात्या.” तो म्हणाला.


महेंद्रप्रताप,“ तुझ्याकडं कुटून आलं पैकं?” त्यांनी विचारलं.


राघवेंद्र,“ तात्या मला स्कॉलरशिप म्हणजे मराठीत शिष्यवृत्ती म्हणत्यात ती मिळाली होती. म्हणजे बघा हुशार विद्यार्थ्यांना तिथलं सरकार पैसे देतं. तर चार वर्षांचे तिकडचे पैसे माझ्याकडं जमा होते. ते आपल्या पैशात जास्तच झाले आणि तुम्ही पाठवत होता त्यातलं बी राहायचे थोडे थोडे. तर जीप घेण्या इतके पैसे हायती माझ्याकडं.” तो सांगत होता आणि तिघे त्याच्याकडं कौतुकाने पाहत होते.


सुभानराव,“ काय लेका उडवायचं ना पैकं! आपल्याला काय कमी हाय व्हय? तू बी तुझ्या बा वानी चुंगु झाला बग.” ते बोळकं पसरून म्हणाले.


राघवेंद्र,“ तुमी तर काय बी बोलता अण्णा. हाय पैसा म्हणून उधळायचा व्हय. मला पटत नाय ते.” तो हसून म्हणाला.


महेंद्रप्रताप,“ बरं पण राघवा एक ईचारायचं होतं. आपल्या रमेचा नवरा म्हमईला जाणार हाय खायमचा तसा तू बी जाणार हाय का रं? म्हंजी तू तर त्यांच्या परास ज्यादा शिकला हाय. ततं जाऊन काय ते वकिली का काय म्हणत्यात ते तर करायचा इचार नाय नव्हं तुझा?” त्यांनी अडखळत पण चिंतीत स्वरात विचारलं.


राघवेंद्र,“ अण्णा रमेच्या नवऱ्याची गोष्ट वेगळी हाय आन माझी वेगळी. मी काय आपला गाव आणि इस्टेट सोडून कुठं बी जाणार नाय. तुमी काळजी नका करू. उलट मला आधी गाव आणि मग पंचक्रोशीत सुधारणा करायची हाय. आपल्या गावात फक्त चौथीपर्यंत शाळा हाय. पुढं शिकायचं म्हणलं की तालुक्याला जायचं. आपल्या रमीने मॅट्रिक केली पण तिला घरी मास्तर लावले तुम्ही शिकवायला आणि तिनं घरात अभ्यास करून  नुसती परीक्षा दिली तालुक्याला जाऊन. पण आपल्या गावातल्या सगळ्यांनाच ते शक्य नाही. मुलीच काय मुलं बी शिकत नाहीत. मला इथं मॅट्रिकपर्यंत शाळा सुरू करायची हाय. गावात दवाखाना नाय. आजी आजारी पडली तर तुम्ही वैद्य आणला. पण तिला झालेली काविळ त्याला समजली नाही. शेवटच्या टप्प्यात आपण तिला तालुक्याच्या गावाला नेलं पण तोपर्यंत उशीर झाला होता. म्हणून इथं छोटा का असेना दवाखाना सुरू झाला पाहिजे. मला तर इथंच राहून काम करायचं हाय.” तो बोलत होता आणि तिघे आवक होऊन त्याच्याकडं पाहत होते.


सुभानराव,“ महिंद्रा पोरगं नाव कडणार बग जहागीरदारांचं. पर राघवा दुसऱ्याचं कल्ल्यांण कराया जाऊन इस्टेट फुकशील! आपली इस्टेट एक एकर बी कमी व्हायला नाय पायजे.” ते म्हणाले.


राघवेंद्र,“ अण्णा काळजी नका करू मी तसं काय बी करणार नाय.” तो हसून म्हणाला.

★★★


    गावची यात्रा सुरू झाली. चांगले  आठ दिवस गावदेवीची यात्रा असायची. या आठ दिवसात गाव विविध दुकानांनी, आणि येणाऱ्या पाहुण्यारावळ्यांनी फुलून जायचा. यात्रेत विविध खेळ आणि तमाशाचा फड देखील असायचा. आज यात्रेचा पहिला दिवस आणि या दिवशी जहागिरदारांच्या घरून गावदेवीला साडी-चोळी आणि नेवैद्य जायचा आणि यात्रेची सुरुवात व्हायची. तसा रीतीप्रमाणे जहागीदारांच्या घरून देवीला आहेर आणि नेवैद्य गेला. 


   आजच दुपारून  राधक्काचा भाऊ-भावजय, तिची भाची सगळे येणार होते. राधक्का मात्र आतुरपणे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. दुपारच्या रेल्वेने ते  सगळे येणार होते. तर सकाळीच राधक्काने बैलगाडी जुंपून गडी स्टेशनवर पाठवून दिला होता. खरं तर माहेरच्या माणसांना भेटण्यापेक्षा राधक्काला तिच्या भाचीला  राघवने पहावे आणि तिने राघवला पाहावे म्हणजे पसंती आणि  पुढची बोलणी करायला मार्ग मोकळा असा आराखडा मनात आखला होता. सूर्य माथ्यावर आला आणि  बैलगाडी वाड्याच्या गेटातून आत येताना दिसली तशी राधक्का लगबगीने भाकर-तुकडा घेऊन दारात आली. ती तिच्या भाचीची वाट आतुरतेने पाहत होती.


राधक्काची भाची कशी असेल? राघवला ती आणि तिला राघव पसंत पडेल का?

क्रमशः

©स्वामिनी चौगुले 


अशाच मनोरंजक कथा वाचण्यासाठी लाईक आणि फॉलो करा आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला.   

     




 







 



Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post