सावते गाव म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्गाने मुक्त हस्ताने आपले दान दिलेलं छोटंसं पण टुमदार गाव होते. गावातून कृष्णा नदी वाहायची, बारा महिने पाणी त्यामुळे गाव तसं संमृद्ध होतं. त्यात जहागीरदारांचा वाडा म्हणजे एखादा राजवाडाचं जणू. दोन मजली प्रशस्त असा विस्तीर्ण वाडा. चारी बाजूने माणसाच्या कमरेच्यावर पर्यंत असलेल्या दगडी भक्कम भितींची तटबंदी. वाड्यात प्रवेश करायचा तर एक मोठे लाकडी गेट होते. ते उघडून अर्धा किलोमीटर तरी चालत आत जावे लागे. पण हा अर्धा किलोमीटरचा टप्पा म्हणजे डोळ्यांसाठी निसर्गाची पर्वणीच होती. सगळीकडे हिरवीगार झाडे. माड, केळी,आंबा, कडुलिंब, विविध फुलं, बेल अशी विविध झाडांची रेलचेलच. पुढे चालत गेलं की एखाद्या पुराण पुरुषासारखा उभ्या असलेल्या अजस्त्र वाड्याचे दर्शन व्हायचे. आधी मोठ्या दगडी भिंतीचा वरून मोकळा असा चौक लागायचा तिथे पावसाळा सोडला तर आठ महिने काही ना काही वाळवण असायचे. चौकाच्या समोर चार-पाच दगडी पायऱ्या चढून गेलं की तीन बाजूने बांधीव ओसरी होती. तिथे उजव्या बाजूला दिवाणजी त्यांचं दप्तर घेऊन दिवसभर हिसाब-किताब करत असायचे. तिथे नोकर-चाकर विसावा घ्यायचे. ओसरीतून आत गेले की प्रशस्थ असा दिवाणखाना होता. उंच छताला अडकवलेले मोठाले काचेचे झुंबर लक्ष वेधून घ्यायचे. तर बसायला लाकडी खुर्च्या आणि सोफे होते. समोर पूर्वजांच्या तस्वीरी लावलेल्या होत्या. तर बाकी भिंतींवर राम आणि श्रीकृष्णाची चित्र रेखाटलेली होती. तसेच कधी काळी शिकार केलेल्या वाघ, हरीण, कोल्हे यांची मस्तकं मोठ्या खुंट्यांवर ऐटीत विराजमान होती. त्याबरोबर तलवारी,ढाली आणि बंदुका देखील अडकवलेल्या होत्या. तसेच एका कोपऱ्यात सागवानी टेबलवर पितळी ग्रामोफोन आणि आत्ता आत्ता आलेला एक रेडिओ ही होता. असा दिवाणखाना जणू जहागीरदारांच्या पिढीजात संमृद्धीची साक्ष देत दिमाखात उभा होता. तिथे साफसफाई करण्यासाठी नोकरांचा राबता असायचा. दिवाणखान्यात प्रवेश मात्र घरचे लोक आणि ठरावीक नोकर सोडले तर फक्त पाहुणे मंडळी आणि खास मित्र परिवाराला होता. दिवणखान्यातून आत गेले की माजघर आणि त्याच्या दोन्ही बाजूला दहा बारा खोल्या होत्या. त्यातल्या एका खोलीत महेंद्रप्रताप आणि राधक्का आणि एका खोलीत सुभानराव राहत होते तर बाकी चार खोल्या पाहुणे मंडळींसाठी होत्या. महेंद्रप्रतापरावांच्या पाच बहिनीपैकी कोणी ना कोणी येत जात असे आणि बाकी सगळ्या खोल्या मात्र धान्याच्या पोत्यांनी भरलेल्या होत्या.माजघरातून पुढे गेलं की प्रशस्त स्वयंपाक घर होतं. तिथे सतत चूल धगधगत राहायची. तिथे फडतळात आणि लाकडी सागवानी फळ्यावर पितळी आणि तांब्यांची भांडी,मोठाले डबे लखाकत असायचे. तिथून उजव्या बाजूला मोठाले देवघर होते. मोठा सागवानी लाकडाचा देव्हारा त्यात रेशमी वस्त्रावर विराजमान असलेले चांदीचे टाक आणि देवाच्या मुर्त्या. देवघरातच एक मोठे लोखंडी कपाट होते तिचं जहागीरदारांची तिजोरी होती. त्यात त्यांचे धन, दागिने आणि बाकी मौल्यवान वस्तू असायच्या. तिजोरीला कायम टाळे असे आणि त्याच्या चाव्या राधक्काच्या कमरेच्या चांदीच्या छल्ल्यात गुंफलेल्या असायच्या बाकी कोणाकडेही त्या टाळ्याच्या चाव्या नसत अगदी महेंद्रप्रतापरावच काय पण सुभानराव देखील राधक्काकडून चाव्या मागून पैसे काढायचे आणि हिशोब राधक्काला सांगायचे मग तो दिवणजींकडे सांगितला जायचा.
घरच्या गृहलक्ष्मीला जहागीरदारांच्या घरात मान होता. ती परंपरा पिढ्यांपिढ्या चालत आली होती म्हणूनच कदाचित त्यांची जहागिरी अजून टिकून होती आणि लक्ष्मी जहागिरदारांच्या घरात पाणी भरत होती. स्वयंपाक घरातून परसदारात जायला एक मोठा दरवाजा होता. मागे मोठी बारमाही पाण्याने तुडुंब भरलेली विहीर होती. आणि नारळी-पोपळीची सुंदर परसबाग देखील होती. तिथेच एक मोठा बंब आणि पुरुषांच्या अंघोळीसाठीची सोय होती तर महिलांना अंघोळ करण्यासाठी न्हाणीघर म्हणजेच एक छोटी खोली राधक्काच्या सासूने बांधून घेतली होती. पुढे थोड्या अंतरावर मोठा गोठा होता. त्यात पाच गायी, दहा म्हशी आणि वासरे,बैल जोड्या, शेळ्या, कोंबड्या देखील होत्या. त्यामुळे दूध-दुभते आणि तूप लोण्याची कधी कमी नव्हती.
बाहेर चौकातून माडीवर जाण्यासाठी लाकडी जिना होता. वर देखील मोठं-मोठ्या दहा खोल्या होत्या. त्यातल्या एका खोलीत रमा राहायची तर एक खोली राघवेंद्रची होती. बाकी खोल्या बंद होत्या. माडीवर जाण्यासाठी मागून म्हणजे परसदारातून एक जिना होता. जहागीरदारांच्या घरात बायका आणि पुरुष धरून शंभर नोकर दिमतीला असायचे. गावातील बायका आणि पुरुष जहागीरदारांच्या वाड्यावर काम करायला तडफडायचे कारण जहागीरदारांच्या घरात काम करणाऱ्या लोकांना रोजचे जेवण आणि महिन्याकाठी पगार, वर्षातून एकदा कपडे मिळायचे. पण वाड्यावर काम करण्यासाठी राधक्काची मर्जी संपादन करावी लागायची. राधक्काची पारखी नजर बरोबर माणसं ओळखायची ही कला त्यांना त्यांच्या सासूबाईंकडून मिळाली होती.
अशा या जहागीरदारांच्या वाड्याने पिढ्यांपिढ्यांची संमृद्धी पाहिली होती. वाड्याच्या अंगाखांद्यावर त्यांच्या अनेक पिढ्या खेळल्या बागडल्या होत्या. असा हा जहागीरदारांचा वाडा कमीत कमी शंभर वर्षांपासून तरी जहागीरदारांच्या संमृद्धी आणि सुखी जीवनाची साक्ष देत दिमाखात भक्कमपणे उभा होता. पण याच वाड्याने काही भयंकर दृश्य काही आश्रप जीवांचे हुंदके आणि आधीच्या पिढ्यांनी केलेली पापं ही पाहिली होती. पण कदाचित पापांच्या पारड्यापेक्षा जहागीरदारांच्या पुण्यांचे पारडे जड असावे कदाचित म्हणून तर अजून तरी त्यांना कोणतेही पाप आणि श्राप बाधला नव्हता.पण तो श्राप येणाऱ्या कोणत्या पिढीला भोगावा लागणार होता हे मात्र सांगता येणार नव्हते.
आज दहा दिवस झाले महेंद्रप्रतापरावांनी राघवेंद्र जहाजात बसला आहे सांगितल्यापासून सुभानराव आणि घरातील सगळेच राघवेंद्रच्या वाटेकडे चातकाप्रमाणे डोळे लावून बसले होते. सुभानरावांची आता चिडचिड सुरू झाली होती. दुपारची वेळ होती आणि ते ओसरीत बसले होते. महेंद्रप्रताप तालुक्याच्या गावाला काही कामानिमित्त गेले होते. राधक्का चौकात काही नोकर बायकांना आणि रमाला घेऊन सांडगे, पापड घालत होती आणि रमाला हे असं करायचं वगैरे शिकवत होती पण रमाचे लक्ष मात्र भलतीकडेच होतं.
राधक्का,“ अगं कार्टे ध्यान कुठं हाय तुझं? किती येळच झालं म्या सांगतीया की हे पापड असं घालायचं. लगीन हुनार हाय तुझं थोड्या दिसात. तिथं माझाच उद्धार कर्त्याल लोकं म्या तुला काय शिकवलं नाय म्हणून.” ती रागाने तिला फटका देत म्हणाली.
सुभानराव,“ राधक्का जास्त बोलायचं काम नाय माझ्या बायला. ती जहागिरदाराची एकुलती एक नात हाय. मस श्रीमंत सासर बघून दिलंय तिला, आपल्या परास जास्त नोकर-चाकर हायती तिथं. बाय तू इकडं ये माझ्याजवळ.”
तशी नुकतीच परकर पोलक्यातून साडी नेसायला शिकलेली सतरा वर्षांची रमा साडी आणि पदर सावरत त्यांच्याकडे पळाली. रमा म्हणजे महेंद्रप्रतापरावांसारखी थोडी सावळ्या रंगाकडे झुकलेली पण सरळ नाकाची आणि बोलक्या डोळ्यांची, सडपातळ देहाची अल्लड नवतरुणी!
राधक्का,“ व्हय मामंजी देवाच्या दयेनं आणि आपल्या पुण्याईनी हिला आपल्या परास मोठं घर मिळालं हाय. पोरगा बी शिकला सवरला हाय पर बाई माणसाला सगळं यायला पायजेल बगा. हिलाच काय नाय आलं तर नोकर काय करणार हायती? तुमी बाय बाय म्हणून लयच लाड केला हाय रमेचा. येती का आता? शिकून घे बाय माझी सगळं माझ्यासारखं तुझं नशीब असलंच असं नाय. मायींनी(सासूबाई) मला लय समजून घेतलं. अक्षी साव्वी लेकच मानलं मला. आज माई पायजेल हुत्या. हिची सासू कशी हाय काय माहिती? आईच काळीज हाय माझं, उद्या माझ्या लेकीला कोण बी बोलायला नगं.” ती डोळ्याला पदर लावत म्हणाली.
रमा,“ ये बाई तू रडू नगस. मी शिकते सगळं. अण्णा मी जाते.” ती म्हणाली आणि चौकात राधक्का जवळ येऊन बसली.
राधक्का,“ गुणाची माझी बाय.” ती रमाच्या अलाबला घेत कानशिलाजवळ कडकडा बोटं मोडत म्हणाल्या.
सुभानराव,“ कोण काय बोलतंय माझ्या बायला? त्यांचा मुडदाच बशवीन म्या. आणि लैच झालं तर बैलगाडी भरून वरसाच वाळवन पाठवून दिवू. तू नगं काळजी करू बाय. पर राधक्का आपला राघव झाजत बसून किती दिस झालं म्हणायचं? अजून आलं नाय बग पोरगं. माझं पोरगं दोन दिसात नाय आलं ना तर या महिंद्राला काठीनं फोडून काडतो कनाय बग. तीन-चार वरसं झाली पोराला बगून. परदेशात कसं राहतया? काय खातया काय माहित?” ते धोतराच्या सोग्याने पाणावलेले डोळे पुसत म्हणाले.
राधक्का,“ येईल की दोन तीन दिसात अण्णा त्यो. आणि त्यो ब्यास हुता तिकडं. दर मासाला टपाल यायचं की. आता आला राघव की सवताच्या डोळ्यानी बघा. आता नाय जायचा त्यो कुठं! त्यो काय ते बारिस्टर का काय त्यो झाला हाय म्हणत होतं हे.” ती कौतुकाने सांगत होती.तशी रमा हसायला लागली.
रमा,“ बारीस्टर नाय गं आई बॅरिस्टर म्हणत्यात. आणि दाद्या आता साहेब झाला सूट-बूट घालून येणार बघ.” ती म्हणाली. रकमा घरची मोलकरीन आणि राधक्काची खास होती ती. ती तिला चिडवत म्हणाली.
रकमा,“ धाकल्या ताईसाब तुमच्या हुणाऱ्या धन्यासारखं सुटबुट घालून येणार का धकलं मालक? नाय म्हणलं तुमास्नी बघया ते कसं आलतं सुटा-बुटात म्हणूनशान इचारलं म्या.” ती डोळे मिचकावून बोलत होती. रमा मात्र लाजून गोरिमोरी झाली.
रमा,“ आई सांग बरं या रकमा मावशीला. मी जातेच.” ती लटक्या रागाने म्हणाली आणि वर पळून गेली तसं सगळे हसायला लागले.
सुभानराव,“ लाजली बघ बाय.” ते तोंडाच बोळकं पसरत हसून म्हणाले.
★★★★
सूर्यनारायण नुकताच पूर्वेकडून त्याची लालिमा पसरत वर येत होता. ना धड उजेड ना धड अंधार अशा ब्रम्ह मुहूर्तावर गाव आणि वाडा नुकतेच जागे व्हायला सुरुवात झाली होती. राधक्काने बंब पेटवून अंघोळ केली होती. नोकर-चाकर कामावर यायला सुरुवात झाली होती. गोठ्यातून नुकताच गायीं-वासरांच्या हंबरण्याचा आवाज येत होता. राधक्का अंघोळ करून स्वयंपाक घरात गेली तोपर्यंत रखमा आणि दोन बायकांनी कामाला सुरुवात केली होती. कोणी झाडून काढत होते तर कोणी जळण आणून टाकत होते.तर कोणी साफसफाई करत होते.
राधक्का,“ रखमा अंगण झाडून झालं की सडा माराया लाव. रमाला उठवून आन. ती रांगुळी घालील. म्या पूजा करून घेते. घरं बी झाडायला लाव बायांना आणि जात्याजवळ धान्य ठेवलं हाय ते बी तुमी दुगी दळून घ्या. धार काढली असलं गोठ्यात, दूध घेऊन ये जा.” ती चूल पेटवून रात्रीचे दूध गरम करायला ठेवून सूचना देत होती. तोपर्यंत डोळे चोळत रमा आली. तिच्या पाठोपाठ महेंद्रप्रतापराव होते.
महेंद्रप्रताप,“ अंगुळीला पाणी काडाया लाव राधे माझ्यासाठी.” ते म्हणाले.
राधक्का,“ व्हय जी.बायना जा मालकास्नी आणि रमेला पाणीकाडून दे. जा रमे तू बी अंगुळी करून ये. मी पूजा करून येते.” त्या बोलत होत्या.
तोपर्यंत कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज वाड्या बाहेरून येऊ लागला. काय झालं म्हणून सगळे बाहेर पळाले. महेंद्रप्रताप दारात गेले तर शिरपती ओरडत येत होता. त्याच्या मागे कोणी तरी काही तरी सामान घेऊन दिसत होते शिरपतीच्या जवळ ही एक मोठाली ट्रंक दिसत होती. आवाज ऐकून सुभानराव पण काठी टेकत बाहेर आले होते.
सुभानराव,“ ये शिरप्या भाड्या बुडाला आग लागल्या गत रामाच्या पारी कोकलाया काय झालं रं तुला? काठीच घालतो थांब पाठीत.” ते रागाने ओरडले.
शिरपती,“ अण्णा मी कुणाला घिऊन आलो ते बगीतलं ना तर बक्षिसी द्याल मला.” तो आनंदाने ट्रंक खाली ठेवत म्हणाला.
महेंद्रप्रताप,“ कोण आलं हाय आणि ही ट्रंक कुणाची?(त्यांनी विचारलं आणि अचानक काही तरी लक्षात येऊन राधक्काकडे घाईत वळत म्हणाले.) अगं राधे भाकर तुकडा आणि पाणी घेऊन ये लवकर आपला राघव आला वाटतं.” ते आनंदाने बोलत होते.
शिरपती,“ व्हय व्हय धाकलं मालक आले हायती. म्या आणि रंग्या परसाकडं गेलो हुतो. तर सामान घिवून रेल्वे स्टेसनाकडून सुटाबुटात एक सायेब येताना दिसलं जवळ जाऊन बगीलं तर आपलं धाकलं मालक. मगं काय म्या आणि रंग्यानं समदं सामान घेतलं. म्या पळत आलो सांगाया. ते यायल्याती मागून.” तो उत्साहाने सांगत होता.
सुभानराव,“ माझा राघव आला? कसा दिस्तुया रं त्यो?” त्यांनी खुश होत.भरल्या आवाजात विचारलं.
शिरपती,“ काय सांगू अण्णा अक्षी गोऱ्या सायबा गत गोरं गोरं आणि राजकुमारा गत देकनं दिसत्यात ते.” तो कौतुकाने सांगत होता.
महेंद्रप्रताप,“ बरं बरं नजर नगं लावू तू शिरप्या! आन अण्णा त्याला काय ईचारता? आता येतूय ना त्यो मग डोळं भरून बगा की त्याला. राधे अजून तू इथंच व्हय. अगं जा की भाकर तुकडा घीऊन ये. मिट-म्हवरी बी आन बाई नजर लागायची पोराला. पाणी काडा अंगुळीला किती दिस झालं परवासात हाय पोरगं काय माहित. जा जा तयारीला लागा.”
ते घाईघाईने बोलत होते. राधक्का आणि रमा बाकी बायकांबरोबर धावत आत गेल्या आणि राघव दारात हजर झाला. महेंद्रप्रताप आणि सुभानराव त्याला पाहत होते.
उभट चेहरा जरा जास्तच उजळलेला गोरा रंग, तपकिरी बोलके डोळे, सरळ नाक आणि रुंद जिवनी, उंचापुरा आणि रुंद खांद्यांचा धिप्पाड तरुण राघवेंद्र सुटा-बुटात आणखीनच रुबाबदार दिसत होता.राधक्का आणि रमा तोपर्यंत आल्या. रमाने त्याच्या पायावर पाणी घातले. राधक्काने भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि मीठ-मिरच्या ओवाळून राखमच्या हातात चुलीत टाकायला दिल्या. आणि भरल्या डोळ्यांनी दोन्ही हाताने त्याच्या अलाबला घेत कानशिला मागे बोट कडाकडा मोडली. सुभानरावांनी मात्र त्याला मिठी मारली.
सुभानराव,“ माझा राघव आला! माझा राघव आला! बायो माझी चंची घेऊन ये या शिरप्याला आणि रंग्याला बक्षिसी देतो.” ते आनंदाने नाचायचेच बाकी होते.
महेंद्रप्रताप,“ अण्णा त्याची काय बी गरज नाय. तुमी दोगं बी दुपारून या. राघव चल आत. राधे पाणी काडायला लाव याला अंगुळीला कडक कडक. पोरगं दमून आलं हाय.” ते बोलत होते.
राघवेंद्र,“ हो हो तात्या पण पाया तर पडू द्या की.” तो म्हणाला आणि त्याने तिघांना वाकून नमस्कार केला.
राधक्का,“ चल बाबा घरात आणि तुमी सगळे जा तुमच्या कामाला. रकमा सामान घेऊन ये राघवचं. शिरपा, रंग्याला घेऊन जेवायलाच ये रं दुपारी.” त्या राघवेंद्रचा हात धरत त्याला घरात नेत बोलत होत्या. ते हो म्हणून निघून गेले.
महेंद्रप्रताप,“ पर राघवा निरोप द्यायचा हुता ना. बैलगाडी घिऊन आलो असतो म्या. ठेसनापासून इतकं सामान घिऊन चालत आला व्हय रं!” ते बोलत होते. सगळे बोलत बोलत दिवाणखान्यात आले.
राघवेंद्र,“ त्याला काय होतंय. आलो गावच्या वेशीपर्यंत आणि शिरपाने ओळखलं मला मग काय तो आणि रंग्या आले की घरापर्यंत सामान घेऊन. आणि रमे काय बाई लग्न काय ठरलं बाईसाहेब बोलायला पण तयार नाहीत.” तो तिला कोपऱ्यात गप्प उभं पाहून हसत म्हणाला.
रमा,“ तसं काय बी नाय. पर तुला समदी बोलत्यात नव्हं म्हणून मी गप्प हुती. पर दाद्या गोऱ्यांच्या देशात जाऊन अजूनच गोरा झाला बाबा तू.” ती म्हणाली.
राघवेंद्र,“ अगं तिथलं वातावरण थंड हाय म्हणून. बरं आई मी अंघोळ करून येतो. मला भूक लागली हाय. न्याहरीच बघ बाई आधी, झणझणीत पिठलं भाकरी कर.” तो म्हणाला.
राधक्का,“ व्हय जा तू ऊन ऊन पाणी काडलया परसात. अंघुळ करून ये. मी तवर करते पिठलं भाकरी.” त्या म्हणाल्या आणि राघवेंद्र निघून गेला.
सुभानराव,“ महिंद्रा मटण अनाया लाव कुनाला तरी. पोरगं किती वरसातून आलं बाबा माझं.” ते डोळे पुसत म्हणाले आणि महेंद्रप्रताप हो म्हणून स्वयंपाक घरात गेले.
महेंद्रप्रताप,“ राधे पोरगं आलं म्हणून देवाला इसरली की काय?” राधक्काची लगबग पाहून ते म्हणाले.
राधक्का,“ असं कसं देवाला इसरीन म्या. रमाला पूजा कर म्हणून सांगितलं हाय.” त्या म्हणाल्या.
महेंद्रप्रताप,“ बरं मी जाऊन मटण आणतो. पर लगीच राघवच्या समुर लगीन आणि तुझी भाचीचा इशय काडू नगुस. जाऊदे थोडं दिस आत्ता तर आलय पोर.” ते तिला समजावत होते.
राधक्का,“ कळतंय म्हणलं मला तेवडं. जा तुमी.” ती तोंड फुगवून म्हणाली आणि महेंद्रप्रताप हसून निघून गेले.
राघवेंद्र मायदेशी परतला होता. आता तो राधिकाबाईंच्या मनाप्रमाणे त्यांच्या भाचीशी लग्न करायला तयार होणार होता का?
क्रमशः
©स्वामिनी चौगुले
अशाच मनोरंजन कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा.
